चला, वैयक्तिक स्वच्छतेचा मंत्र अंगीकारत करोनासह भविष्यातील अन्य संसर्गजन्य आजारांचा सामना करायला सिद्ध होऊया!
पडघम - देशकारण
प्रदीप दंदे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 24 March 2020
  • पडघम देशकारण करोना विषाणू Corona virus करोना Corona करोना व्हायरस Coronavirus

करोना व्हायरसने जगातील १७७ देशांत थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) त्याला ‘महामारी’ (Pandemic) म्हणून घोषित केले आहे. या आजाराने आजवर १३ हजार नागरिकांचा बळी घेतला, तर तीन लाख लोक संक्रमित आहेत. चीननंतर इटली, इराण या देशात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. चीनपेक्षा इटली हा या आजाराचा केंद्रबिंदू ठरत आहे. कारण तिथे आतापर्यंत अधिक लोकांचा बळी गेला आहे.

आपल्या देशाची लोकसंख्या पाहता आपण या आजारासाठी एक ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरू शकतो. या आजाराचा तिसरा टप्पा अत्यंत घातक असल्याने सरकार याबाबत गंभीर पावले उचलत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार २२ मार्च रोजी संपूर्ण देशाने ‘जनता कर्फ्यू’ला पाठिंबा देत स्वयंस्फुर्तीने घरातच राहून करोनाविरुद्धच्या लढ्यात साद दिली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, कर्नाटक, केरळ, तामिलनाडू या राज्यांनी ३१ मार्चपर्यंत ‘लॉक डाऊन’ जाहीर केला आहे.

भारतात आतापर्यंत करोनाचे ३४१ संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाने आपले कामकाज (अत्यावश्यक कामे सोडता) बंद केले आहे. रेल्वेसेवाही ठप्प झाली आहे. परंतु जनतेत पाहिजे तेवढे गांभीर्य दिसून येत नाही. परवा दिवसभर ‘जनता कर्फ्यू’ पाळला तरी सायंकाळी पाच वाजता एकत्र येऊन टाळ्या, फटाके, बँड वाजवल्याने मूळ हेतूलाच हरताळ फासला गेला. अजागरूकता, अतिउत्साह हा आपला जीव घेईल हे ज्यांना कळत नाही, त्यांना करोनापासून वाचवणे हाच प्रशासनापुढे मोठा प्रश्न आहे.

करोना व्हायरस

करोना व्हायरस वा Covid-19 हे ‘करोना व्हायरस SARS-CoV-2’ या आजारासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ११ फेब्रुवारी २०२० रोजी दिलेले नाव आहे. ‘Corona virus disease 2019 (Covid-19)’ हे त्याचे संक्षिप्त नाव. Severe Acute Respiratory Syndrome (SARS CoV) 2002, Middle East Respiratory Syndrome (MERS CoV) २०१२ हे दोन्ही करोना व्हायरस आहेत. Covid-19 हा SARS व MERS नंतर नव्याने विकसित झालेला विषाणू आहे. या रोगाची सुरुवात २०१९ च्या उत्तरार्धात चीनच्या वुहानमध्ये झाली आणि त्यानंतर ती जगभरात पसरली.

या आजाराची लागण झाल्यावर पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात खोकला (सुरुवातीला कोरडा), श्वास घेण्यास अडचण, अतिसार आणि तीव्र ताप ही लक्षणे आढळतात. हा नवीन विषाणू आहे. त्याची लक्षणे सर्दी, खोकला, अतिसार व ताप येणे अशी फ्लू व सार्स या आजारांप्रमाणे असली तरी करोना विषाणू हा सतत म्युटेड होत असल्याने त्यावर अजून कोणतीही लस वा विशिष्ट औषध उपलब्ध नाही. स्वच्छ हात धुणे, इतरांपासून किमान एक मीटर अंतरावर राहणे आणि सारखे सारखे तोंडाला हात न लावणे, अशी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. करोनाचा संसर्ग हातावर विषाणू असल्याने, तसे संसर्ग असलेल्या व्यक्तीने खोकल्याने, हात मिळवल्याने होतो. त्यामुळे आपले हात स्वच्छ ठेवणे व इतरांपासून दूर राहणे हाच या रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय आहे.

२१ व्या शतकातील संसर्गजन्य आजार

जगातील साऱ्या मानवजातीला चिंता करायला लावणारे दुष्काळ, साथीचे रोग व युद्धे हे तीन प्रश्न आहेत. दुष्काळापाठोपाठ मानवतेचा दुसरा मोठा शत्रू म्हणजे साथीचे आणि त्यासारखे संसर्गजन्य आजार. व्यापारी, सरकारी अधिकारी, पर्यटक व प्रवासी यांनी गजबजलेली शहरे ही जरी मानवी संस्कृतीचा पाया वाटत असली, तरी संसर्गजन्य रोगजंतूंचे पुनरुत्पादन वेगाने पसरवण्यासाठी त्या आदर्श जागा ठरत आहेत. चीनच्या वूहान येथून जगभर थैमान घालणारा करोना त्याचेच एक उदाहरण आहे.

आपण जसजसे प्रगत होत जात आहोत, तसतसे दर काही वर्षांनी नव्यान येणाऱ्या साथीच्या रोगाची घंटा वाजत आहे. २००२ साली चीनमध्ये आलेला SARS - CoV, २००५ साली बर्ड फ्लू, २००९-१० साली स्वाईन फ्लू, २०१२ साली सौदी अरेबियातील (डायरियासदृश्य) MERS - CoV, निपाह विषाणू आणि २०१४ साली आफ्रिकेत आलेला ‘इबोला’, असे साथीचे व संसर्गजन्य आजार आले आहेत.

चीनमधील सार्समुळे प्लेगसारखी भीती वाटायला लागली, परंतु प्रतिबंधात्मक उपाययोजनेमुळे ती साथ आटोक्यात आणण्यात लवकर यश आले. तसेच प्रतिबंधात्मक उपायामुळे इबोलाचा प्रादुर्भाव आफ्रिकेबाहेर जाऊ शकला नाही. भारतात टीबी, कॅन्सर मलेरिया, डेंगू, डायरिया, न्यूमोनिया, जीका वायरस अशा आजाराने मरणाऱ्यांची संख्याही खूप आहे. त्याशिवाय कुपोषण, भूखमरी यामुळे मरणाऱ्याची संख्या वेगळी. मागील शतकात स्पॅनिश फ्लू, प्लेग, कांजण्या, देवी या आजारांनी कहर केला होता. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात जेवढी माणसे मेली नाहीत, त्यापेक्षा अधिक या आजारांमुळे मेली होती.

‘मृत्यू’ मानवजाती विरुद्ध गुन्हा

जगामध्ये मानवाचे आयुष्य ही सर्वांत मौल्यवान गोष्ट आहे, याची आपल्याला सतत जाणीव करून देण्यात येत असते. प्रत्येक जणच शाळेतल्या शिक्षकापासून ते राजकारणी, वकील, समाजसेवक, साहित्यिक, साधूसंत आणि अभिनेते/त्री हीच गोष्ट सांगतात. संयुक्त राष्ट्रसंघाने दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी हक्काची घोषणा केली होती. त्यामध्ये अगदी ठळकपणे म्हटले आहे की, जीवन जगण्याचा हक्क हा मानवजातीचा सर्वांत मूलभूत हक्क आहे! मृत्यूमुळे सरळसरळ या हक्काचे उल्लंघन होत असल्यामुळे, मृत्यू हा मानवजातीविरुद्ध असणारा गुन्हाच आहे. त्यामुळे आपण त्याविरुद्ध युद्ध पुकारले पाहिजे असे लोकांना वाटू लागते. म्हणूनच मृत्यूवर मात करण्यासाठी वैज्ञानिकांनी वैद्यकशास्त्र व जैव-तंत्रज्ञान यात प्रगती करून प्रतीजैविकांची (Antibiotics) निर्मिती करून मानवाचे आयुर्मान वाढवण्याचे महत्कार्य केले आहे. त्यामुळे एकविसाव्या शतकात मृत्यू हा एक आध्यात्मिक गूढ राहिले नाही, तर ती एक तांत्रिक बाब असण्याइतपत आपली समज वाढली आहे. एवढेच नव्हे तर त्यावर मात करण्याचे प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत.

ही प्रगती एकीकडे होत असताना एक छोटासा विषाणू सर्व जगाचे व्यवहार ठप्प करतो, हे आपण पाहत आहोत. करोनामुळे चीन, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, इटली, फ़्रान्स, पोलंड, इराण, स्पेन, दक्षिण कोरिया अशा अनेक देशांनी ‘लॉकडाऊन’ केले. भारताने एक दिवसाचा ‘जनता कर्फ्यु’ केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाविरुद्धची लढाई ही एक प्रकारचे युद्ध आहे, असे म्हटले. करोनाची भयावहता पाहता सर्व देश करोनाविरुद्धच्या लढ्यात एकजुटीने प्रयत्नशील असल्याचे दिसून येते.

करोना जैव-आयुध (bioweapan) विषाणू?

करोना हे चीनने लॅबमध्ये विकसित केलेले जैव-आयुध (bio-weapan) तर नाही ना, अशीही शंका घेतली जात आहे. करोनाचा जगभर होणारा प्रकोप पाहता २०११ साली आलेल्या ‘contagion’ या चित्रपटाची सर्वदूर चर्चा सुरू आहे. ‘Contagion’ याचा अर्थ संसर्ग असा आहे. तो Severe Acute Respiratory Syndrom SARS- Corona Virus आणि NIPAH या रोगावर आधारित होता. स्टिव्हन सोडरबर्ग (Steven Soderbergh) दिग्दर्शित व स्कॉट झेड. बर्न (Scott Z. Burns) लिखित ‘Contagion’ हा एक अमेरिकन थ्रील्लर सिनेमा आहे. तो करोनावर आधारित असल्याचाच भास होतो. Covid-19 हा रोग SARS-CoV नंतर विकसित झालेला नवीन विषाणू (Novel Corona Virus) आहे. चित्रपटातील लक्षणे व उपाय ही करोनाचीच लक्षणे व उपाय आहेत, असे वाटायला लागते. हा चित्रपट आणि काही वैज्ञानिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया यांवरून करोना हे युद्धात वापरावयासाठी तयार केलेले एक हत्यार तर नाही ना, अशी शंका घेतली जाते आहे.

ग्लोबल हँडवॉश डे

वैयक्तिक स्वच्छता म्हणून सॅनिटायझरने हात धुणे, इतरांचा संपर्क टाळणे, यातून करोनापासून स्वत:चा बचाव करता येतो. म्हणूनच सॅनिटायझर व मास्क खरेदीसाठी झुंबड उडताना दिसून येत आहे. एकप्रकारे करोनाने वैयक्तिक स्वच्छतेचा नवा मूलमंत्रच दिला आहे. वैयक्तिक स्वच्छतेअभावी फ्लू, न्यूमोनिया, डायरिया अशा साथीच्या आजारांमुळे मरणाऱ्यांची संख्या करोनामुळे मरणाऱ्यांच्या संख्येपेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. त्यामुळे साथीच्या रोगापासून बचाव व्हावा म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने २००८ साली १५ ऑक्टोबर हा दिवस ‘ग्लोबल हँडवॉश डे’ म्हणून घोषित केला होता. त्याला या वर्षी १२ वर्षे पूर्ण झाली. या काळात संयुक्त राष्टसंघाने वेगवेगळ्या संकल्पना घेऊन जनजागरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु यामुळे जनजागरण खरेच झाले काय? जनतेत जागृती झाली काय? तर त्याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाला ‘Global Handwash Day’ साजरा करावा असे का वाटले? २००२ साली आलेल्या सार्स, स्वाईन फ्लू व अन्य आजारांचे कारण ‘स्वच्छ हात न धुणे आहे’ हे लक्षात आल्यामुळे. परंतु मागील १२ वर्षांचा अभ्यास केल्यास आपण भारत म्हणून ते जनजागरण करण्यास अपयशी ठरलो आहोत, हेच यातून दिसून येते.

शाळामध्ये ‘मिड डे मिल’ दिले जाते. ते खाण्यापूर्वी किती शाळामध्ये hand sanitizer आहेत? किती मुले स्वच्छ हात धुतात, हा खरा प्रश्न आहे. समाजातील सुजाण, तसेच अनेक नागरिकांमध्ये जागरूकता नसणे, हाच भारतीय जनमानसाचा दोष आहे. दुसरीकडे ती बाब विद्यार्थी हिताची म्हणून आणली तर ती त्या शाळेचा ऑफिसचा स्टाफ घरी नेणारच नाही, याची हमी कुणी देऊ शकत नाही. आजही अनेक शाळांत विद्यार्थ्यांना हात धुवायला/प्यायला मुबलक पिण्याचे पाणीच उपलब्ध नाही, ही शोकांतिका आहे. मुलींसाठीच्या ‘वेंडिंग मशीन’ची तशीच अवस्था आहे.

डर के आगे जीत हैं!

करोनाच्या भीतीमुळे सध्या बहुतांश लोक वैयक्तिक स्वच्छतेसाठी जागरूक होत आहेत. परंतु भारतात हातावर पोट असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्या वर्गात जागरूकता येणे गरजेचे आहे. तो दिहाडी मजूर असल्याने अनेक ठिकाणी त्याला कामावर जावे लागते. अशा स्थितीत हा आजार त्यांच्या वस्तीत जोमाने फैलावू शकतो, हेही ध्यानात घ्यावे लागेल.

जपानमधील ८० टक्के लोकांनी स्वाईन फ्ल्यूनंतर सतर्कता म्हणून स्वच्छ हात धुणे, मास्क लावणे हा स्वयंस्फूर्त उपक्रम सुरू ठेवल्याने तेथे करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला नाही. चीनच्या जवळ असलेल्या तैवाननेही असेच पाऊल उचलले.

भारतातही साबणाने हात धुणे, मास्क लावणे, वैयक्तिक स्वच्छता पाळणे, हे केवळ करोनापुरते मर्यादित न ठेवता त्यात सातत्य ठेवले आणि आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवले तर न्युमोनिया, डायरिया, फ्लू व भविष्यात उद्भवणाऱ्या करोनासारख्या अन्य संसर्गजन्य आजारांपासून स्वत:ला व अखिल मानवजातीला वाचवता येऊ शकते. हात स्वच्छ धुण्यामुळे आजाराचा प्रादुर्भाव होणार नाही आणि आपली प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) चांगली राहील.

करोनाच्या भीतीमुळे हे सर्व करत असलो तरी ‘डर के आगे जीत है’ आणि करोनाविरुद्धच्या लढ्यात ‘आपले हातच, आपले भविष्य’ घडवणार आहेत. त्यामुळे ‘Our hand, Our future, lets away from Corona virus’ म्हणत करोनाला न घाबरता वैयक्तिक स्वच्छतेचा मंत्र अंगीकारत करोनासह भविष्यातील अन्य संसर्गजन्य आजारांचा सामना करायला आणि पर्यावरणाचा समतोल राखायला सिद्ध होऊया.

.............................................................................................................................................

हेही पाहा, वाचा

जगातील दोन अब्ज लोकांचे वास्तव्य असलेला दक्षिण आशिया करोनाचे पुढचे केंद्र ठरू शकतो? - जोआना स्लेटर आणि निहा मासी

https://www.aksharnama.com/client/article_detail/4116

लोकांच्या राष्ट्रवादी आकांक्षांकडे पुरोगाम्यांनी दुर्लक्ष केल्यानं हा देश रसातळाला जाण्याची वेळ आली आहे, एवढा धडा करोनापासून आपण शिकायला हवा! - सुनील तांबे

https://www.aksharnama.com/client/article_detail/4115

करोना व्हायरस : कुठलाही आजार काही प्रमाणात जैविक, तर काही प्रमाणात सामाजिक-सांस्कृतिक असतो. - अनुज घाणेकर

https://www.aksharnama.com/client/article_detail/4114

करोना व्हायरस : अफवा, गावगप्पा आणि व्हॉटसअ‍ॅप युनिव्हर्सिटीवरील ‘फॉरवर्ड’ नावाची फेकमफाक यांच्यापासून सावध रहा - टीम अक्षरनामा

https://www.aksharnama.com/client/article_detail/4108

करोना व्हायरस : तज्ज्ञ डॉक्टर काय सांगतात, ते आणि तेवढंच ऐका; अफवांवर विश्वास ठेवू नका, घाबरून जाऊ नका

https://www.aksharnama.com/client/article_detail/4106

साथीचे आजार आणि जागतिकीकरण यांचा संबंध आता अधिक गुंतागुंतीचा बनला आहे!

https://www.aksharnama.com/client/article_detail/4103

करोना विषाणूमागे षडयंत्र असणार आणि या संकटाला कोणीतरी जबाबदार असणार, ही जनभावना आहे!

https://www.aksharnama.com/client/article_detail/4099

फक्त ‘साथीच्या रोगाने येणारे मरण’ आपल्याला एकत्रित आणू शकते?

https://www.aksharnama.com/client/article_detail/4107

करोनाचा तात्पुरता ‘साईड इफेक्ट’ : पर्यावरणपूरक जीवनशैली

https://www.aksharnama.com/client/article_detail/4100

.............................................................................................................................................

लेखक प्रदीप दंदे महिला कला, वाणिज्य महाविद्यालय चांदूर रेल्वे, जि. अमरावती येथे राज्यशास्त्र विभाग प्रमुख आहेत. 

pradipdande@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा