_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
२७वे अखिल भारतीय मराठी-ख्रिस्ती साहित्य संमेलन नाशिक येथे ९, १० व ११ जानेवारी २०२६ दरम्यान पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित अंश...
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
आपणा सर्वांचं एकत्र येणं ही माणसाच्या अभ्युदयाची आशा आहे. ज्यांना सुंदर भविष्याचे वेध लागलेले आहेत, ते आपण सर्व जण खांद्यावर शब्द घेऊन वाट चालत आहोत. जीवनावर श्रद्धा असलेल्यांचा हा जमाव आहे. अगदी निराशाजनक परिस्थितीत आशावादी कसं राहायचं? विनाशाच्या कळसावरही जीवनाचं संवर्धन कसं करायचं? आपल्याला नवीन पहाट दिसू शकते का?
ब्रेख्त नावाचा प्रसिद्ध कवी आपल्या कवितेत म्हणतो-
‘दिवस अंधारून येतील तेव्हा
गाणं असेल का?
हो, तेव्हादेखील गाणं असेल.
अंधारून आल्या दिवसाचं.’
संघर्ष आहेच, पण जीवनाचं संवर्धन करण्यासाठी ऊर्जा मिळावी म्हणून एकत्र यायचं.
आज जगभरात जी संस्कृती उदयाला आली आहे, तिचा उद्देशच मुळी सपाटीकरण हा आहे. धर्म, भाषा आणि मूळ संस्कृतीचे प्रभाव पुसून टाकून भोगवादी संस्कृती रुजवणं हा एक प्रकारचा ‘फॅसिझम’च आहे.
सर्वसमावेशकता हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. निरनिराळ्या विचारपरंपरांच्या धाग्यांनी भारतीय संस्कृतीचं महावस्त्र विणलेलं आहे. या देशाच्या जडणघडणीत सर्व धर्मीयांचा सहभाग आहे. तो तसा आहे म्हणूनच आपला देश सांस्कृतिकदृष्ट्या श्रीमंत आहे. ख्रिस्ती धर्मानं या देशाला सेवा, शिक्षण, साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात जे योगदान दिलेलं आहे, त्यामुळे देश समृद्ध आणि समर्थ बनलेला आहे. निकोप धर्मप्रेरणा राष्ट्रउभारणीसाठी कशी महत्त्वाची कामगिरी बजावू शकते, याचं जिवंत उदाहरण म्हणजे ख्रिस्ती धर्म आहे.
भारतीय अध्यात्म चिरंतन सत्याचा उद्घोष करतं आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करील, अशी ग्वाही प्रभू ख्रिस्ताने दिलेली आहे. सत्यावर ज्यांची निष्ठा आहे अशांसाठी ख्रिस्त आणि ख्रिस्ताचा विचार कधीच परका असू शकत नाही. जातीयता आणि धर्मांधतेला सध्या ऊत आलेला आहे, पण हा प्रकारच मुळात भारतभूमीच्या आध्यात्मिक प्रेरणेविरोधात आहे. सहिष्णुतेपेक्षा परस्पर स्वीकार ही कल्पना अधिक उदात्त आहे. समाजाचा प्रवाह नितळ, निर्मळ ठेवता यावा म्हणून भाषा, साहित्य आणि संस्कृती संवर्धनाच्या माध्यमातून ख्रिस्ती धर्म महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आमची उपासनेची भाषा मराठी आहे. या देशाच्या संस्कृती आणि परंपरेतून आम्ही आमचं अध्यात्म विकसित केलेलं आहे. तुकानामक सेतूवरून आम्ही ख्रिस्तचरणी आलेलो आहोत.
सर्वधर्मस्नेहभाव हा चर्चचा महत्त्वाचा उपक्रम आहे. यापुढे आपल्याला केवळ धार्मिक असून चालणार नाही, तर बहुधार्मिक असणं गरजेचं आहे. त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून आम्ही साहित्याकडे पाहतो. साहित्याच्या माध्यमातून आम्ही सर्वांशी जोडून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. साहित्याच्या माध्यमातून आम्ही भाषा, संस्कृती संपन्न करत आहोत. साहित्याद्वारे आम्ही तुमच्याशी संवाद साधत आहोत. जेथे संवाद असतो, तेथेच शांतता असते.
ख्रिस्ती लेखक हा विश्वात्मक विचार करणारा असावा. आपलं साहित्य जीवनाचा ठाव घेणारं आणि सत्याला सामोरं जाणारं असावं. साहित्यातून आपला गाव, आपला परिसर प्रकट करावाच, पण त्याचबरोबर आपल्या लेखनातून वैश्विक मूल्यांचाही आग्रह असावा. लेखन जेव्हा सत्याला सामोरं जातं, तेव्हाच ते वाचकांच्या मनाचा ठाव घेतं. लेखन ही अतिशय गंभीर कृती असते आणि कृती असते तेव्हा तिचे परिणामदेखील असतात. त्या परिणामाला सामोरं जाण्याची जबाबदारी केवळ लेखकाची नसते, तर वाचकांचीदेखील असते. कारण लेखक हा समाजाचा प्रवक्ता असतो. तो त्याच्या काळाबद्दल बोलत असतो. परिणामांची पर्वा न करता जे सत्य प्रकट करत राहतात, तेच कायम टिकून राहतात.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
समाज धर्म व साधना धर्म
समाज धर्म आणि साधना धर्म अशी उपाध्याय यांनी धर्माची विभागणी केली. भारतात राहणारा भारतीय ख्रिस्ती माणूस ‘अस्सल भारतीय’ असला पाहिजे. भारतीय संस्कृती, संस्कृतीतील उदात्त मूल्यं, थोर परंपरा, आध्यात्मिक संचित हा सर्व भारतीयांचा समान वारसा आहे, तसा तो ख्रिस्ती लोकांचाही आहे. मात्र ख्रिस्ती लोकांचं उपास्य दैवत ख्रिस्त आहे आणि तो त्यांचा साधना धर्म आहे.
अशा प्रकारे धर्माची विभागणी केल्यानंतर धर्म आणि राष्ट्र यांच्यात वाद उरणार नाही. धर्म निराळे असल्यामुळे श्रद्धांबाबत शंका घेण्यासाठी जागा राहणार नाही. समाज धर्म आणि साधना धर्म एकाच व्यक्तीच्या दोन डोळ्यांप्रमाणे आहेत. देश आणि धर्म हे माणसाला हृदयाच्या डाव्या-उजव्या झडपांप्रमाणे प्रिय असले पाहिजेत.
स्वधर्मावरील प्रेमामुळे स्वदेश, स्वभाषा आणि स्वसंस्कृती यावर आपण इतरांपेक्षा अधिक प्रेम केलं पाहिजे. कारण ‘तुमच्या संस्कृतीत जे जे उच्च, उदात्त आणि मंगल आहे, त्यांचं संरक्षण करून संवर्धन करा’, असा ख्रिस्ती लोकांना धर्मपीठाचा आदेशच आहे.
ख्रिस्ताकडे एक नवक्रांतिकारक, समाजसुधारक म्हणून जरी पाहिलं, तरीही विषमता व पिळवणुकीने गांजलेल्या देशासाठी ख्रिस्ताचं महत्त्व मोलाचं आहे. जीवनाला अधिक उन्नत करणारा कोणताही विचार भारतीय माती स्वीकारते. ख्रिस्ती धर्माचा कोणत्याही देशातील संस्कृतीशी संघर्ष व्हायचा प्रश्न येत नाही. जे काही प्रकार झालेत, त्यांना त्या त्या काळातील राजकीय, आर्थिक, सामाजिक बाबी कारणीभूत होत्या. भारतातील ख्रिस्ती माणूस हा ‘खराखुरा भारतीय’च आहे. सर्वच धर्म हे एकाच ईश्वराप्रत नेतात. एकाच सूर्याच्या दोन किरणांची तुलना होऊ शकत नाही.
ख्रिस्त भारतात येणं हे अटळच होतं. कालपरवा जगाच्या इतिहासात उगवलेल्या राज्य (स्टेट) या संकल्पनेपेक्षा शेकडो वर्षं आधी ख्रिस्त भारतीय झाला आहे. राजकीय सत्तास्वार्थासाठी राज्य ही यंत्रणा वापरून ख्रिस्ताला अभारतीय, संस्कृतीविरोधक ठरवणं शक्य नाही. आई आपल्या बाळांमध्ये फरक करेल काय? भारतमातेच्या भव्योदात्त शरीरावर जातीय संस्कृतीसंघर्ष करणारी ही राजकीय विचारसरणी, हे गळू वाढणार नाही. ख्रिस्त हा भारताचा नागरिक कालपरवाचा नाही. लाट येते-जाते, तशा विविध संस्कृती, देश, राष्ट्रं येतात जातात. चिरंतन असतं ते सत्य!
भारतीय अध्यात्म चिरंतन सत्याचा उद्घोष करतं. या सत्याच्या उद्घोषाला जहालवादी जातीय राजकारणाच्या सीमारेषा घालता येणार नाहीत. हा आकाशाला ठिगळं जोडू पाहण्याचा वेडगळपणा होईल. ख्रिस्त तेच म्हणतोय - केवळ सत्यच तुम्हाला मुक्त करेल. सत्यावर अपार निष्ठा असणाऱ्या महात्मा गांधींच्या देशात सत्यरूप ख्रिस्त परका नव्हता, नाही आणि नसेलच.
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
भारतीय असणं हीच आमची अस्मिता
काय आहे ख्रिस्ती अस्मिता? अस्मिता या संकल्पनेचा मूळ अर्थ काय आहे आणि जर आम्ही येशूचे अनुयायी असू, तर कुठल्या प्रकारची अस्मिता आम्हाला अपेक्षित आहे? कारण जात, वर्ण, धर्म, देश, भाषा, संस्कृती यांविषयी प्रेम आणि निष्ठा असणं नैसर्गिक आहे. पण सध्याच्या काळात याच मुद्द्यावरून माणसा-माणसात तट पडलेले आहेत. एका भाषेची टोकाची अस्मिता दुसऱ्या भाषिक गटाच्या द्वेषाला आणि रागाला कारणीभूत ठरत आहे. एका देशाबद्दल प्रेम म्हणजे इतर देशाबद्दल आकस याचा अनुभव आपण घेत आहोत आणि ख्रिस्ताला तर कुठलाही देश नाही, ख्रिस्ताला कुठल्याही सीमा नाहीत. तो तर सर्व मानवजातीचा आहे. कारण तो एक जीवन मार्ग आहे.
एकदा ख्रिस्त अनुसरला की, सारं विश्व माझं, मी साऱ्या विश्वाचा ही आपली भूमिका होते. साहित्य संमेलनाच्या मार्गावरून आपण सारे जण येशूच्या मूळ विचाराकडे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठीच आज आपण एकत्र जमलेलो आहोत. वैश्विक पातळीवर आपल्या धार्मिक व राष्ट्रीय अस्मिता वेगवेगळ्या असू शकतात, पण राष्ट्रउभारणी, अर्थव्यवस्था, सार्वजनिक सुखसोयी या गोष्टी जेव्हा येतात, तेव्हा आपण सर्व जण एकाच विषयावर येतो. म्हणूनच भविष्यातल्या आव्हानाचा विचार करता यावा म्हणून हे संमेलन आहे.
यापुढची सर्व आव्हानं जागतिक स्वरूपाची असतील. तापमानबदलामुळे जगभरात जो हाहाकार उडालेला आहे, तो आपणही अनुभवत आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने भविष्यात काय वाढून ठेवलंय, हे अजून आपल्याला कळलेलं नाही. अनेकांना रोजगार गमवावे लागणार आहेत, हे सत्य आहे. दहशतवाद आपला कधीही घास घेऊ शकतो आणि नजीकच्या काळात तो अजून उग्र रूप घेईल, म्हणूनच जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या ख्रिस्तविचाराची गरज आहे.
माणूस स्वयंपूर्ण झालेला आहे, पण त्याच वेळेला तो एकाकी आहे. स्वयंपूर्ण झालेला माणूस त्याचं कुटुंब आणि त्याचा समाज यांच्या वाट्याला आलेलं एकाकीपण तापदायक आहे. कारण आमच्या भौतिक गरजा खूपशा प्रमाणात पूर्ण झालेल्या आहेत. विज्ञान तंत्रज्ञानामुळे जगणं सुखकारक झालं आहे. आजवरचं आमचं जगणं जिवंत राहण्यासाठी, अन्न-वस्त्र-निवाऱ्यासाठी होतं, पण पुढचं जगणं केवळ जगण्यासाठी असेल. म्हणूनच हा संभ्रमाचा काळ आहे. जेथे जुनी समाजरचना मोडीत निघालेली आहे आणि नवीन विचार जन्माला आलेले नाहीत.
या काळात अनेक विचारसरणी उदयाला आल्या आणि आपल्याला वाटलं की, त्यांच्या स्वीकाराने जगाचा चेहरामोहरा बदलणार आहे. पण लवकरच त्यातून भ्रमनिरास झाला. त्या विचारसरणी नसून केवळ प्रतिक्रिया होत्या. त्यातून ज्या क्रांती झाल्या, त्यातूनही फारसं काही निष्पन्न झालं नाही. लक्षावधी जनतेची कत्तल करून उभ्या राहिलेल्या क्रांत्या सपशेल फसलेल्या आपण पाहिल्या. कारण त्यात विधायक विचार फारच थोडे होते. विधायक वाटचालीत समग्रपण असतं. त्यात साऱ्यांना कवेत घेणारा विचार असतो. त्याचाच अभाव असल्यामुळे सर्वत्र असुरक्षितता, भीती आणि हिंसेचं साम्राज्य पसरलेलं असून माणूस माणसाकडे संशयाने पाहण्याच्या या काळात सर्वांना कवेत घेणारा येशू ख्रिस्ताचा विचार ही उद्याच्या अभ्युदयाची आशा आहे.
असुरक्षितता इतकी वाढलेली आहे की, प्रत्येक जण आपल्या जातीत, आपल्या समूहामध्ये सुरक्षितता शोधत आहे. आपल्या येथे तर आपण आणि इतर अशीच सरळ सरळ विभागणी झालेली आहे आणि आपला समावेश तर त्यांनी ‘इतर’ या गटामध्ये केलेला आहे. इतरांपासून आम्हाला धोका आहे. इतर आमच्या प्रगतीतील अडसर आहेत, हा समज दृढ करण्यात जातीयवादी शक्ती यशस्वी झालेल्या असल्यामुळे या शतकाच्या प्रारंभीच भारत देशात स्थिरावलेल्या ख्रिस्ती धर्मीयांना कुठल्या समस्येला तोंड द्यावं लागणार आहे, त्याचा समग्रपणे विचार करता यावा म्हणून आपण एकत्र जमलेलो आहोत.
जो धर्म स्वतःच्या पलीकडे पाहायला शिकवतो, तो ख्रिस्ती धर्म. या धर्माची मूळ प्रेरणा काय आहे? त्यासाठी येशू ख्रिस्ताचं मिशन स्टेटमेंट अभ्यासणं गरजेचं आहे. ज्या नाझरेथात त्याचा जन्म झाला होता, तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला. तेव्हा यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो उघडून जे स्थळ काढलं, त्यात असं लिहिलेलं होतं- ‘‘परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे. कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. त्याने मला पाठवले आहे अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ व्हावा. जे ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे आणि परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी.’’ ख्रिस्ती धर्माचा एकूण सारांश येथे आलेला आहे.
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
गोरगरिबांना सुवार्ता सांगणं म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना सक्षम करणं. आंधळ्यांना दृष्टीदान यात तर गहन अर्थ दडलाय. शारीरिकदृष्ट्या दुर्बलांना सक्षम करायचंच आहे, पण डोळे असून जे पाहू शकत नाहीत, कान असून जे ऐकू शकत नाही आणि वाचा असूनही जे बोलू शकत नाहीत, अशा सर्वार्थानं दुबळ्यांना सक्षम करणं. सर्व प्रकारची किंमत मोजून बोलणारी पिढी तयार करणं हा उद्देश आहे. बंदिवानाची सुटका म्हणजे सामाजिक व राजकीयदृष्ट्या जे दुर्बल आहेत, त्यांच्यासाठी असलेलं कार्य अपेक्षित आहे. परमेश्वराच्या कृपाप्रसादाच्या वर्षाची घोषणा म्हणजे नवीन जगाची सुरुवात. त्यासाठी येशूने आपल्या आयुष्याची आहुती दिली. त्याच प्रकाशात असंख्य ख्रिस्तभक्तांनी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन माणूस रचायचं स्वप्न पाहिलं. त्यांनी प्रथम येशू हे रसायन काय आहे याची ओळख जगाला करून दिली.
आपण ज्या काळात राहत आहोत, त्या काळाचं लक्षण भीती हे आहे. येथे खोट्या व काल्पनिक गोष्टी मोठ्या प्रमाणात पसरवल्या गेल्या असून तेच सत्य आहे, असा बहुजनांचा समज झालेला आहे. जग विद्वेषाच्या टोकावर उभं आहे. युद्धामध्ये शहरं, गावं, घरं आणि माणूस बेचिराख होत आहे. स्थलांतरितांचे लोंढे जीव वाचवण्यासाठी आशाळभूतपणे बड्या राष्ट्रांकडे याचना करत आहेत, तर श्रीमंत देशांनी भक्कम तटबंदी उभी करून दरवाजे बंद केलेले आहेत. उदारमतवादाला ग्रहण लागलेलं आहे. श्रीमंत देश म्हणत आहेत- जे दुर्बल आहेत त्यांची जबाबदारी आमच्यावर नाही.
आधी साम्राज्यवादातून गरीब राष्ट्रांची यांनी लूट केली. आता बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून गरीब राष्ट्राच्या बाजारपेठा ताब्यात घेऊन त्यांचं रक्त शोषलं जात आहे आणि ही बडी राष्ट्रं म्हणत आहेत की, गरीब जनतेच्या कल्याणाची जबाबदारी आमची नाही. मी माझ्या भावाचा ठेका घेतला आहे काय? असा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला होता, तेव्हा जे स्पष्ट उत्तर मिळालं होतं ते आपणा सर्वांना ठाऊक आहे. तुला तुझ्या भावाचा ठेका घ्यावाच लागेल.
गरिबाचं रक्त सतत ओरडत असताना संवेदनशील माणूस शांत बसू शकत नाही. आम्ही काय खावं, काय प्यावं, काय परिधान करावं, कसा विचार करावा हे आता दुसराच कोणीतरी ठरवत आहे. केवळ ग्राहक म्हणूनच आपली ओळख असेल. महाविदा, बिग डाटा आणि अल्गोरिदममुळे डिजिटल हुकूमशाही अस्तित्वात येत आहे. जगभरातील निवडणुकांचे निकाल बदलले जात आहेत आणि बड्या राष्ट्रांत उजव्या विचारसरणीची सरकारं अस्तित्वात आलेली आहेत. मर्यादित स्वतंत्र्यात राहा आणि आम्ही देऊ तेवढेच स्वातंत्र्य, विचार करण्याचं स्वातंत्र्य, अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे.
नागरिकांवर पाळत ठेवण्याच्या साधनांचा सातत्यानं विकास केला जात आहे. त्यामुळे स्वातंत्र्य हे मूल्यच उरणार नाही. अघोषित आणीबाणीचा अनुभव आपण घेत आहोत. व्यक्त झाला तर अंध भक्तांच्या टोळ्या तुटून पडणार आहेत. तुमची घरं जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. आंदोलन करत आहात, तर सावधान, तुमच्या रस्त्यावर खिळे ठोकले जाणार आहेत. तुमची सर्व बाजूंनी कोंडी केली जाणार आहे. मत व्यक्त केलं तर तुम्ही लिस्टवर येणार आहात. अदृश्य कॅमेरे तुमच्यावर सर्वत्र दिवस-रात्र पाळत ठेवत आहेत. एक निष्क्रिय, विचारहीन मांसाचा गोळा म्हणून जगणार असाल तरच तुम्हाला जगण्याचा परवाना मिळणार आहे. या संकुचित राजवटी राष्ट्र, राज्याच्या सीमांच्या बाहेरही मुक्तपणे बोलणं मुश्कील करून ठेवत आहेत.
येशूच्या तत्त्वज्ञानामध्ये समतेचा जागर करण्यात आलेला आहे, परंतु सध्या समता नावाच्या मूल्याची परवड झालेली आपण पाहतो आहोत. जी रचना उदयाला आलेली आहे, तेथे केवळ काही जण अधिक भाग्यवान आहेत, तेच तेवढेच येथे जो स्वर्ग उतरलेला आहे त्याचे भागीदार आहेत. त्यांच्याच नावाने अधिक शेअर्स आहेत. बाकीचे जे आहेत, ते निव्वळ बाकीचे आहेत. त्यांना ओळख नाही. त्यांना चेहरा नाही. आम्ही ठरवू ते त्यांचं भाग्य आणि आम्ही लिहू ते त्यांचं प्राक्तन.
माणसा-माणसात तट पाडून सत्ता हस्तगत केली जात आहे. जातीपातीच्या अस्मिता टोकदार झाल्यामुळे माणसांना माणूस सहन होईनासा झालाय. खोटे ‘नॅरेटिव्ह’ पसरवून भ्रम निर्माण केला जात आहे. ज्याचा उद्देश आहे माणसांना सतत भीतिग्रस्त ठेवणं. भीतीच्या छायेत असलेला माणूस विचार करू शकत नाही. जेथे स्थिरचित्त आहे, जेथे भीतीमुक्त वातावरण आहे, त्या देशासाठी रवींद्रनाथांची प्रार्थना होती, तिची आठवण होते. माणसांचे समूह विखंडित झालेले आहेत. त्यांचं छिन्नविच्छिन्नपण ही या युगाची देणगी आहे आणि त्यासाठी प्रयत्नपूर्वक सध्या पेरणी केली जात आहे. कष्टकरी झगडत आहेत. स्त्रिया असुरक्षित आहेत. इथल्या असंतोषाचा सर्वाधिक फटका लहान बालकांना बसत आहे. ‘हमास’ ही संघटना दहशतवादीच आहे, पण इस्रायलने जी अखंड कत्तल चालू ठेवलेली आहे, त्याला नरसंहाराशिवाय दुसरा शब्द नाही.
संपूर्ण जग ही कत्तल उघड्या डोळ्यांनी पाहतं आहे. आम्हाला वाटत असेल की, आम्ही सुरक्षित आहोत, तर काही काळाकरता आम्ही असूही सुरक्षित, पण मानवता धोक्यात आहे. एक सुंदर जगाचं स्वप्न, स्वर्गाच्या राज्याचं स्वप्न येशूने पाहिलं होतं. ते काळवंडलेलं आपण पाहतो आहोत. कुठे आहे भ्रातृभाव? समोरचा माणूस तुझा शत्रू आहे हीच विचारधारा प्रबळ होत आहे. समुद्र दुभंगून आम्हाला रस्ता करून देण्यात आलेला होता. आमचा पाठलाग करणारं फारोचं सैन्य नंतर समुद्रात गडप झालं होतं. जे जिवंत राहिले होते, त्यांच्या घरात जल्लोष झाला होता, पण जे मरून गेले होते त्यांचं काय?
एकाला वाचवण्यासाठी दुसऱ्याचा बळी ही विचारधाराच येशूने बदलून टाकली. त्यानेदेखील आम्हाला दुधा-मधाच्या प्रदेशात नेलं. त्याने आम्हाला वचनदत्त भूमीकडे नेलं. जेथे प्रेम हाच आमचा धर्म असेल. त्याने अशी क्रांती केली की देवालाच धरतीवर आणलं. त्यापूर्वी देव ही काही धर्माधिकाऱ्यांचीच मालकी होती. देवाचं नाव उच्चारणं म्हणजे धर्मनिंदा होती. येशू आला आणि त्याने प्रथम अशी मांडणी केली की, ‘भिऊ नका, तुमचा देव दयाळू आहे, तो कृपाळू आहे, तो मंद क्रोध आहे.’ शाप देणाऱ्या देवाऐवजी त्याने प्रथमच अभिशाप देणाऱ्या देवत्वाची प्रतिष्ठापना केली. माणूस ही देवाची सुंदर निर्मिती आहे हा सिद्धान्त त्याने दृढ केला. त्याने तुला निवडलं आहे. आईच्या गर्भात येण्यापूर्वी तू त्याच्या भव्य स्वप्नात होतास. त्याच्या तळहातावर तुझं नाव कोरलं गेलंय म्हणून तू मोलाचा आहेस हे अभिवचन येशूने दिलं.
या विश्वात कधीच समता नव्हती. ग्रीक गणराज्य असो की, रोमन साम्राज्य असो, जगातल्या कुठल्याही संस्कृतीत कधीही समता हे मूल्य नव्हतं. ते आणलं प्रथम येशूने. डोंगरावरल्या प्रवचनात त्याने दुःख भोगणारे, कष्टी, भाराक्रांत, शारीरिक व्याधीने ग्रस्त या साऱ्यांना देवाच्या दरबारातले मानकरी केलं. हे होतं समतेचं तत्त्वज्ञान. त्यासाठी आभाळाचं काळीज लागतं. त्यासाठी आईचं हृदय लागतं. येशूची क्रांती हीच होती की त्याने मानवजातीला मुक्तीचं अभिवचन दिलं. ‘तुझा कोणीही शत्रू नाही, तू कुणाचाही शत्रू नाहीस’ ही संकल्पना प्रत्यक्ष जगण्यातून येशूने दिली.
येशूचा धर्म जी एक विचारधारा आहे, जेथे प्रेम हा तुमचा स्वभाव होऊन जातो आणि सर्वत्र तुम्हाला तुमचे बांधव दिसतात. म्हणूनच विसाव्या शतकात जगभरात ज्या चळवळी उभ्या राहिल्या त्यामागे संपूर्ण मानवजातीचा विचार होता. याउलट एकविसाव्या शतकात ज्या राजवटी जगावर अधिराज्य गाजवायची स्वप्नं पाहत आहेत, त्यांचा संकुचितवाद अधिक अतिधोकादायक आहे. लोकशाही, मानवी हक्क आणि सामाजिक उत्तरदायित्व याविषयी त्यांना ममत्व उरलेलं नाही. सर्वदूर पसरलेली प्रसारमाध्यमं हे तर सत्ता हस्तगत करण्याचं हत्यार झालेलं असून, त्यावरील नियंत्रणामुळे सत्ताधारी आपल्या अपयशाचं खापर इतरांवर फोडतात आणि काल्पनिक भीतीचा बागुलबुवा उभा करून लोकांचं लक्ष खऱ्या समस्यांकडून इतरत्र वळवण्यात यशस्वी होतात. महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यात प्रतिवर्षी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल फारशा चर्चा होताना दिसत नाही. याउलट शहरांची नावं बदलण्यावरून जो गदारोळ उठवला जात आहे, त्या आवाजात अभाग्यांचा आक्रोश दडपला जात आहे.
याच काळात लेखकाचं, कार्यकर्त्यांचं आणि संवेदनशील माणसांचं उभं राहणं आवश्यक असतं. जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या मार्गाने आपण सर्वत्र समता प्रस्थापित करू शकू, असं आश्वासन देण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात काय स्थिती आहे? जागतिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाने जग हे खेडं झालेलं असलं तरी माणसा-माणसांमध्ये प्रचंड दरी निर्माण झालेली आहे. धर्म, जात, पंथ, भाषा आणि देशाच्या अस्मितांनी मानवजात गटातटात विभागली गेली आहे, विषमता वाढत आहे आणि त्यामुळे तणावही वाढलेला आहे. यावर कुठली कृती आवश्यक आहे, लेखक, कार्यकर्ते म्हणून आमची भूमिका काय आहे? यावर विचार व्हावा.
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
संवाद संपल्याचा परिणाम
माणसा-माणसातील संवाद संपल्याचे परिणाम जग आज भोगत आहे. माणूस माणसापासून तुटलेला आहे. कुटुंबसंस्था मोडकळीस आलेली आहे. समाज विखंडित अवस्थेत आहे आणि एकूण मानव समाजाचा निसर्गाबरोबरचा संवाद संपलेला आहे. त्यामुळे एकटेपणा, एकाकीपणा हा या काळाचा आजार झालेला आहे. माणूस आपल्या शरीरापासून तुटला, तर तो आनंदाने कसा जगू शकेल? माझ्या विचारांचा नाही, तो माझा शत्रू, ही धारणा वाढीस लागल्यामुळे विरोधी मत पचवणं जड जाऊ लागलं आहे. सामाजिक ध्रुवीकरणामुळे एकाच देशात दोन किंवा अनेक देश वसू लागले आहेत. फूट पडलेलं राष्ट्र विकास करू शकत नाही, हा नियम आहे. पण फूट पाडूनच सत्ता हस्तगत करता येते, म्हणून द्वेषाची बीजं पेरली जात आहेत. समाजमाध्यमावर ट्रोलर्सच्या टोळ्या निर्माण झालेल्या आहेत. त्यांच्या विषारी प्रचाराने सामाजिक पर्यावरण कधी नव्हे एवढं कलुषित झालेलं आहे.
बहुराष्ट्रीय कंपन्या पूर्वी आपला स्मार्टफोन, संगणक किंवा बँक खात्यावर डल्ला मारण्यासाठी टपलेल्या असायच्या असं आपण म्हणत असू. त्यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा असायची. संगणक हॅक होण्याची आपल्याला भीती असायची; पण आता परिस्थिती बदललेली आहे. आता माणसांनाच हॅक करण्याची यंत्रणा अस्तित्वात आलेली आहे. म्हणून गरज आहे स्वतःला जाणून घेण्याची, आपल्या आत डोकावण्याची. आपली खरी ओळख करून घेण्याची. त्यासाठीच अशा साहित्य संमेलनाची आवश्यकता आहे.
अनेकदा आपल्याला खऱ्या जीवनाचा अनुभव येतच नाही. त्या अर्थाने आपण जीवनाला मुकलेलो असतो. जीवनाच्या गाभ्याला आपण कधी स्पर्श करू शकतो? माझ्या अंत:करणात ख्रिस्त वास करत असेल तर माझी वाटचाल सत्याच्या मार्गावर असते का? माझे मार्ग कुठले आहेत? आपण म्हणतो की, आम्ही ख्रिस्ताचे आहोत, तर आमच्यात मेळ का नाही? एकच मार्ग असेल, आणि एकाच सत्याच्या दिशेनं आपण जात असू, तर आमच्यात एवढी दुफळी का आहे? पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आमची वाटचाल होते की, मानवी दुर्बलतेतून आखलेल्या वाटेवरून आमचा प्रवास सुरू आहे? आमचं कार्य आणि आमचं जगणं झळाळून का उठत नाही? मान्य आहे आमच्यात विविधता आहे, पण आपण ऐक्यापर्यंत का जाऊ शकत नाही? आपण सदैव गोंधळलेले का असतो? या प्रश्नाची उत्तरं शोधता यावीत म्हणून आपल्याला एकत्र यावं लागेल.
पेरणारा पेरत निघालाय
आपल्या भूमीत खूप काही पेरलं जातं, पण काहीच उगवून येत नाही. काही बियाणं वाटेवर पडलेलं आहे ते पाखरांनी येऊन खाऊन टाकलं. काही बी खडकाळ जमिनीवर पडलंय. तेथे माती खोल नसल्यामुळे ते लगेच उगवलंय आणि सूर्य वर आल्यावर उन्हाने करपून गेलेलं आहे. काही बी काटेरी झुडपांमध्ये पडलंय, पण काटेरी झुडपं वाढून बियांची वाट रोखून धरली आहे. काही बी मात्र चांगल्या जमिनीत पडलंय, त्याला तीसपट, साठपट, शंभरपट पीक आलंय. ज्याला कान आहेत, तो ऐको. एक तर खडकाळ जमीन आहे आपली किंवा काटेरी झुडपं बेसुमार वाढली आहेत. सुपीक जमीन असेल तरच बी उगवून येऊ शकतं. शतकापासून पेरणारे बी पेरत आहेत, पण आपल्यात काही रुजून येतच नाही. आपल्या एकत्र येण्याचं कारण तेच तर आहे. आपल्या जमिनीची मशागत आपल्याला करायची आहे. मग पेरणारा पेरत येईल, तेव्हा आपल्या भूमीतून शंभर पट पीक येईल.
प्रेम हा ख्रिस्ताच्या मंडळीचा स्वभाव आहे. त्यात लीनपणा, दयाळूपणा आणि करुणा आहे. हा जो वारसा आपल्याकडे सोपवलेला आहे, त्यासाठी सर्व शक्तीनं आणि कृतीनं सिद्ध होता यावं, म्हणून आपला मेळावा असतो. श्रद्धावंतांचा मेळा असा शब्दप्रयोग आपण सातत्याने ऐकत असतो आणि अगदी वरवरच्या अर्थानं आपण ती संकल्पना समजतो. पण सृजनात्मक असं काही निर्माण करायचं असेल, तर आपण श्रद्धावंत असावं, श्रद्धाहीन नाही. विश्वास धरणारं असावं, विश्वासहीन नाही. विश्वास, प्रीती, आशा ही ख्रिस्ताची कृपा आहे. आज त्याच कृपेच्या बळकटीकरणासाठी आपण एकत्र आलेलो आहोत.
सुवार्ता म्हणजे काय? असादेखील प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. माणसाला जगण्याचं आश्वासन ज्या शब्दात आहे, ती सुवार्ता. लेखक आपल्या साहित्यातून, सुवार्तेचीच घोषणा करत असतो. लेखकाचे शब्द जेव्हा सांत्वन बनून येतात, लेखकाच्या शब्दांनी मानवी जीवनाला जेव्हा स्पर्श होतो, लेखकाच्या शब्दातून मानवजातीला जेव्हा आशेचा किरण दिसतो, तेव्हाच नवीन जगाची निर्मिती होते.
जग स्थितिशील नाही. ते सातत्याने बदलत असतं. येथे बदल हेच शाश्वत सत्य आहे. या बदलाचा वेध घेणं हेच लेखकाचं प्रथम कर्तव्य आहे. ख्रिस्ती लेखकाचं वेगळेपण कशात आहे, असा प्रश्न विचारला जातो. तेव्हा क्रुसावरील सात उद्गार हे त्याच्या लेखनातून आणि व्यक्तिगत जीवनातून प्रतीत होणं आवश्यक आहे. कारण त्यातून आपला आंतरिक स्वभाव प्रकट होत असतो. आपल्या अबोध मनावर ती मूल्यं कोरली गेलेली असतात. याचा अर्थ ख्रिस्ती लेखकाचं लेखन कायम प्रचारकी असण्याची आवश्यकता नाही. ज्या लेखनातून उदात्त मानवी मूल्यांचं दर्शन होतं ते उत्तम लेखन. आपण आपली वैशिष्ट्यं घेऊन मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात सामील झालेले आहोत. त्यामुळे मुख्य प्रवाह अधिक समृद्ध झालेला आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
मंदिराची उभारणी
आमचं लेखन म्हणजे मंदिराची उभारणी आहे. हे दगडधोंड्यांचं मंदिर नाही. ख्रिस्तानं स्वतःची तुलना बांधकामासाठी नाकारलेला दगड अशी केलेली आहे. तोच दगड भव्य इमारतीची कोनशिला झाला. आम्ही असं मंदिर उभं करत आहोत, जिथे सर्वांना मुक्त प्रवेश असेल. एक दगडाची इमारत ते भव्य आकाशाचा मंडप आणि अखंड पृथ्वीचा व्यास व्यापून राहिलेलं हे मंदिर म्हणजे सर्व धर्मीयांना कवेत घेणारं, पूर्णत्वाला गेलेलं एक तत्त्वज्ञान आहे.
लेखक तेच स्वप्न पाहत असतो. लिहिणारा प्रत्येक जण एकेक शब्द रचत असतो. त्यातूनच एक विशाल प्रार्थनागृह आकाराला येतं. बॉम्बचा वर्षाव होत असताना, शहरं बेचिराख होत असताना आणि आमच्या डोळ्यासमोर नरसंहार सुरू असताना स्वप्नातील मंदिर धुराच्या लोटात काळवंडून गेलंय. मग ही हिंसा थांबणारच नाही काय? कुणाहीकडे या प्रश्नाचं उत्तर नाही.
या निराश अवस्थेतच आपल्याला विशाल मंदिराची पायाभरणी करायची आहे. त्यासाठी पायाचा दगड होणं म्हणजेच आपलं लेखकपण आहे. जीवनातून हद्दपार केलेल्या लाखो अभागी जीवांचा कळवळा घेऊन आमचं लेखन यावं. ज्यांचे चेहरे पाहिले नाहीत, त्यांचे अश्रू आमच्या लेखनातून झिरपावेत. कोसमैल दुरातून होणारा आक्रोश आमच्या शब्दातून व्यक्त व्हावा. आम्ही केवळ बोलून किंवा लिहून थांबू नये तर आमच्या शब्दांची, आमच्या बोलण्याची किंमत मोजण्यासाठी आम्हाला जो धैर्याचा आत्मा प्रदान केलेला आहे, त्याच्या प्रकाशात आम्ही वाटचाल करावी. म्हणजे एक दिवस आम्ही ख्रिस्ताच्या दुःखसहनात सामील होऊ. आम्ही जर क्रुसाचे वाटेकरी आहोत, तर आम्ही पुनरुत्थानाचेदेखील भागीदार आहोत. त्या अर्थानं लेखकाला मृत्यू नसतो, कारण तो पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो. ज्याचा नव्याने जन्म झालाय तोच लेखक असतो.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment