खरा प्रश्न श्रद्धा विरुद्ध विज्ञान असा नाही; तो आहे विवेक विरुद्ध अविवेक… श्रद्धा कधीही विवेकपूर्ण असू शकत नाही
पडघम - विज्ञाननामा
जगदीश काबरे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 08 May 2026
  • पडघम विज्ञाननामा श्रद्धा अंधश्रद्धा विज्ञान

माणूस हा मूलतः जीवनात अर्थ शोधणारा प्राणी आहे. त्याला केवळ जगणे पुरेसे नसते; जगण्याला अर्थ, आधार हवा असतो, आणि अनिश्चिततेशी सामना करण्यासाठी एखादी अदृश्य शक्ती हवी असते. या मूलभूत मानवी गरजेतूनच श्रद्धेचा उगम झाला. म्हणून मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वारे या केवळ दगड-मातीच्या वास्तू राहत नाहीत; तर त्या सामूहिक समाज भावनांचे मूर्त रूप बनतात. समाजशास्त्रज्ञ एमिल डर्कहेम यांनी धर्माला ‘सामाजिक एकात्मतेचे साधन’ म्हटले होते. त्यांच्या मते, धार्मिक विधी आणि संस्था समाजातील व्यक्तींना एकत्र बांधून ठेवतात, एक सामायिक ओळख निर्माण करतात. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात हे विशेषतः खरे आहे. येथे प्रत्येक धर्म, प्रत्येक पंथ, प्रत्येक जात-समुदाय आपल्या श्रद्धास्थळाभोवती एकत्र येतो. उत्सव, यात्रा, प्रार्थना या सगळ्यातून एक अदृश्य सामाजिक धागा विणला जातो आणि तो माणसांना जोडतो. परंतु समाजशास्त्रीय विश्लेषण केवळ भावनिक पातळीवर थांबत नाही.

श्रद्धेच्या या सामाजिक भूमिकेच्या पलीकडे जाऊन विचार केला, तर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे श्रद्धा ही खरोखरच मुक्त, वैयक्तिक भावना आहे की, ती एका विशिष्ट सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेने टिकवून ठेवलेली आहे? उदा. वसईच्या चर्चसाठी जमा झालेले पाच-सहा कोटी रुपये असो की, कोणत्याही देवळाच्या जीर्णोद्धारासाठी उभारलेला निधी असो, त्या केवळ देणग्या नसतात, तर त्या मागे सामाजिक दडपण, समुदायाकडून मान्यता मिळवण्याची इच्छा आणि काही प्रमाणात भीतीदेखील असते. ‘देव पावेल’ या आशेबरोबरच ‘समाज काय म्हणेल?’ ही चिंतादेखील अशा देणग्या देण्यामागे असते. हे मानवी वर्तनाचे एक जटिल वास्तव आहे, जे आपण अनेकदा उघडपणे मांडत नाही.

भारतातील धार्मिक स्थळांना दरवर्षी मिळणारी मिळकत आणि त्यांचा होणारा खर्च पाहिला, तर आकडे थक्क करणारे असतात. तिरुपती बालाजी मंदिराला दरवर्षी शेकडो कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. शिर्डी साईबाबा संस्थान, वैष्णोदेवी मंदिर, अजमेरचा दर्गा, या सर्व ठिकाणी भाविकांकडून येणाऱ्या देणग्यांची रक्कम राज्य सरकारांच्या काही विभागांच्या वार्षिक अर्थसंकल्पाइतकी असते. यातील काही संस्था खरोखरच शिक्षण, रुग्णालये आणि समाजसेवेत काही प्रमाणात योगदान देतात. पण बहुतांश ठिकाणी हा पैसा पुन्हा मंदिर विस्तार, मूर्तीचे दागिने, सोन्याचे कळस यासाठीच वापरला जातो.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कितीही नुकसान झाले वा कितीही मोठा दुष्काळ पडला, तरीही देवस्थानांकडून कधी मदत दिल्याचे फारसे ऐकीवात येत नाही. यावरून एखाद्या समाजाचे प्राधान्यक्रम कसे ठरतात, हे लक्षात येते. जेव्हा एखाद्या गावात शाळा मोडकळीस आलेली असते, सरकारी रुग्णालयात औषधे नसतात, पण त्याच गावातील ग्रामस्थ मंदिरासाठी लाखो रुपये उभे करतात, तेव्हा ही केवळ वैयक्तिक निवड नसते, तर ते सामूहिक प्राधान्यक्रमाचे प्रतिबिंब असते.

याचा अर्थ असा नाही की, श्रद्धा चुकीची आहे, पण श्रद्धेच्या नावाखाली होणारा भौतिक खर्च आणि त्याचे सामाजिक परिणाम यांचे विवेकपूर्ण मूल्यमापन होणे आवश्यक आहे. संकुचित आर्थिक दृष्टीकोनातून पाहिले, तर धार्मिक खर्च हा पूर्णपणे व्यर्थ जाणारा नसतो असे भक्त म्हणतात. कारण तो पर्यटन, रोजगार, स्थानिक अर्थव्यवस्था यांना चालना देतो. पण दीर्घकालीन मानवी विकासाच्या दृष्टीने — शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास — यांमध्ये केलेली गुंतवणूक धार्मिक उलाढालीपेक्षा कितीतरी अधिक परिणामकारक असते.

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी त्यांच्या ‘डेव्हलपमेंट अज फ्रीडम’ या ग्रंथात मांडल्याप्रमाणे, खऱ्या विकासाचे मोजमाप केवळ जीडीपीमध्ये नाही, तर माणसाच्या क्षमता किती विकसित होतात, यात आहे. श्रद्धेवर होणारा अतिरिक्त खर्च या क्षमता विकासाच्या मार्गात अडथळा बनत असेल, तर समाजाने त्याचे पुनर्मूल्यांकन करणे अपरिहार्य आहे.

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांमधील फरक (?) समजून घेणे, हे चिकित्सक विचारांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भक्तांना श्रद्धा ही आंतरिक बळ देते, जीवनाला अर्थ देते, मृत्यूच्या भीतीशी सामना करण्याची शक्ती देते आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे की, धार्मिक भावना असणाऱ्या लोकांमध्ये नैराश्याचे प्रमाण काहीसे कमी असते, पण धार्मिक नशेमध्ये बुडालेले ते एकप्रकारचे मनोरुग्ण असतात. जेव्हा श्रद्धा कार्यकारण संबंध नाकारू लागते, वैज्ञानिक उपचारांना विरोध करते, आणि भ्रामक आशेच्या नादी लावून माणसाची फसवणूक करते, तेव्हा ती अंधश्रद्धा बनते. त्यामुळे जी जी श्रद्धा चिकित्सेला नकार देते, ती प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते.

महाराष्ट्रात १९८२नंतर श्याम मानव, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर लढा दिला आणि त्यासाठी त्यांना प्राण पणास लावावे लागले. हे एका क्रूर वास्तवाचे प्रतीक आहे. समाजात जेव्हा कोणी श्रद्धेवर प्रश्नचिन्ह उठवतो, तेव्हा त्याला तीव्र विरोधाला सामोरे जावे लागते. कारण श्रद्धा ही केवळ धार्मिक नसते; तर ती सामाजिक सत्तेशी, जातिव्यवस्थेशी, आणि काही वेळा राजकीय स्वार्थाशी जोडलेली असते.

बुवाबाजी, जादूटोणा, नरबळी या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धेच्या आहारी गेल्यामुळे आजही घडत आहेत. गरीब, अशिक्षित आणि असुरक्षित माणसे जशी याचे बळी ठरतात, तशीच अगदी उच्च शिक्षित माणसेही अति लोभापायी सुखाचा शॉर्टकट शोधण्याच्या नादात या सगळ्यांना बळी पडत असतात. त्यामुळे श्रद्धेला आव्हान देणे, हे केवळ बौद्धिक काम नाही; तर ते एक सामाजिक न्यायाचेही काम आहे.

मध्ययुगात किल्ले हे सत्तेचे, सुरक्षेचे आणि प्रशासनाचे केंद्र होते. लोक किल्ल्यांसाठी प्राण देत असत, किल्ले जिंकण्यासाठी वर्षानुवर्षं लढत असत. त्या काळात कोणाला सांगितले असते की, हे किल्ले एक दिवस पर्यटनस्थळे बनतील, तर कदाचित त्यांनी विश्वास ठेवला नसता, पण तोफा आल्या, विमाने आली, आण्विक शस्त्रे आली आणि किल्ल्यांचे सामरिक महत्त्व संपले. आज रायगड, सिंहगड, शिवनेरी इ. सगळे किल्ले ऐतिहासिक वारसा म्हणून महत्त्वाचे आहेत, पण त्यांचे मूळ कार्य पूर्णपणे संपुष्टात आले आहे.

हा इतिहास आपल्याला एक मोठा धडा देतो. कोणतीही संस्था, मग ती कितीही शक्तिशाली असो, तंत्रज्ञान आणि सामाजिक बदलांसमोर कायम टिकून राहू शकत नाही. मध्ययुगीन युरोपात चर्चचे प्रभुत्व इतके होते की, राजे-सम्राटदेखील पोपच्या आज्ञेला मान देत असत. पुनर्जागरण, वैज्ञानिक क्रांती, आणि धर्मसुधारणा चळवळींनी हे प्रभुत्व हळूहळू मोडीत काढले. आज युरोपात चर्चमधील उपस्थिती कमालीची घसरली आहे. जसे हे पाश्चात्त्य देशांत घडले, तसे भारतासारख्या श्रद्धाप्रवण समाजातसुद्धा हे बदल हळूहळू होतीलच, यात शंका नाही. जशी आज हजार वर्षांपूर्वीची हेमाडपंथी देवळे ही पर्यटनस्थळे झाली आहेत, तशीच आजची देवस्थानेही भविष्यात फक्त पर्यटनस्थळे होतील देवपूजेचे अवडंबर माजवणारे कमी होतील.

आज एआयने मानवी जीवनाच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रात प्रवेश केला आहे. वैद्यकीय निदान, कायदेशीर सल्ला, शैक्षणिक मार्गदर्शन, मानसिक आरोग्य, या सगळ्यांसाठी एआय आधारित साधने उपलब्ध होत आहेत. धार्मिक स्थळांकडे काही जण शांतीसाठी, काही मार्गदर्शनासाठी, काही भविष्याची चिंता घेऊन, तर काही आजारपणातून बरे होण्याच्या आशेने जातात. पण आता यापैकी अनेक गरजा एआय तंत्रज्ञान भागावू लागले आहे, तेही नेहमीपेक्षा अधिक अचूकपणे आणि तत्परतेने.

उदा. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात एआय समुपदेशक कार्यरत झाले आहेत. अनेक लोक एआयशी बोलून आपले मन हलके करतात. कारण ते खाजगीपणा जपण्याचे आणि गुप्तता ठेवण्याचे आश्वासन देते, त्याच वेळी उत्तर त्वरित देते. आरोग्यसेवेत एआय आधारित निदान प्रणाली कर्करोगाची लक्षणे माणसापेक्षाही अधिक अचूकपणे ओळखू लागली आहेत. शिक्षणात डिजिटल गुरू प्रत्येक विद्यार्थ्याच्या गतीनुसार शिकवू लागले आहेत.

या पार्श्वभूमीवर, भविष्यात ज्ञान, मार्गदर्शन आणि आधाराचे केंद्र धार्मिक संस्थांवरून तंत्रज्ञानाकडे सरकणारच नाही, असे ठामपणे म्हणता येत नाही. परंतु येथे एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायला हवी, एआय किंवा कोणतेही तंत्रज्ञान माणसाच्या जीवनाला अर्थ देऊ शकते काय? मृत्यूच्या भीतीशी सामना कसा करायचा? जीवनाचा उद्देश काय? दुःखाचा अर्थ काय? या अस्तित्ववादी प्रश्नांची उत्तरे तंत्रज्ञानाकडे नाहीत. एकूणच श्रद्धेचे हे आयाम केवळ बौद्धिक नाहीत; ते भावनिक, सांस्कृतिक आणि अस्तित्वात्मक आहेत. त्यामुळे तंत्रज्ञान श्रद्धेची जागा पूर्णपणे घेईल, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल. पण श्रद्धेच्या काही व्यावहारिक कार्यांची जागा — सल्ला, मार्गदर्शन, माहिती — तंत्रज्ञान निश्चितपणे घेऊ शकते.

पुढे काय होऊ शकते, याचा विचार करताना तीन वेगळ्या शक्यता दिसतात. पहिली शक्यता म्हणजे श्रद्धास्थळे आपल्या कार्याचे रूपांतर करतील. त्या केवळ उपासनेची नाही, तर समाजसेवेची केंद्रे बनतील. अनेक मठ, देवळे आणि चर्च आधीच रुग्णालये, शाळा आणि अनाथाश्रम चालवतात. पुढे हे प्रमाण वाढू शकते. ज्या संस्था स्वतःला बदलू शकतील, त्या टिकतील. ज्या केवळ धार्मिक विधी आणि परंपरांमध्ये अडकून पडतील, त्यांचा प्रभाव कमी होत जाईल.

दुसरी शक्यता म्हणजे शिक्षण आणि वैज्ञानिक जागृतीसह समाज हळूहळू अधिक तर्कसंगत विचार करू लागेल. नव्या पिढीचे प्रश्न वेगळे आहेत. ते गूगलवर उत्तरे शोधतात, युट्युबवर माहिती घेतात, एआयकडे सल्ला मागतात, अशा वेळी त्यांच्यासाठी धार्मिक अधिकाराचे महत्त्व हळूहळू कमी होत जाणे स्वाभाविक आहे, परंतु हा बदल अचानक होणार नाही. कारण तो पिढ्यानुपिढ्यांच्या सांस्कृतिक उत्क्रांतीचा भाग आहे.

तिसरी शक्यता म्हणजे श्रद्धास्थळे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा म्हणून उरतील, पण त्यांचा जीवनावरील व्यापक प्रभुत्व संपुष्टात येईल. ताजमहाल आज पर्यटनस्थळ आहे, प्रेमाचे प्रतीक आहे. तो उभारण्यामागे जो धार्मिक उद्देश होता, तो आता पूर्णपणे लोप पावलेला आहे. त्याचप्रमाणे भविष्यात मंदिरे-मशिदी-चर्च सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक राहतील, पण दैनंदिन जीवनावरील त्यांचा निर्णायक प्रभाव कमी होईल.

कोणत्याही समाजात श्रद्धेचे विश्लेषण करताना राजकारणाची भूमिका दुर्लक्षित करता येत नाही. भारतातच नाही, जगभरातच राजकीय नेते धार्मिक भावनांचा वापर मतांसाठी करत आलेले आहेत. धर्मस्थळांचे निर्माण, यात्रांचे आयोजन, धार्मिक कार्यक्रमांना सरकारी पाठिंबा देणे या सगळ्यांच्या मागे राजकीय हिशेब असतो. जोपर्यंत श्रद्धा राजकीय सत्तेसाठी उपयुक्त आहे, तोपर्यंत श्रद्धास्थळांना संरक्षण आणि प्रोत्साहन मिळत राहील. हे एक गुंतागुंतीचे आणि काहीसे अस्वस्थ करणारे वास्तव आहे.

लोकांची श्रद्धा खरी असते; पण त्या श्रद्धेचा राजकीय वापर होतो, हेदेखील खरे आहे. याचा परिणाम असा होतो की, श्रद्धेवर प्रश्न विचारणे हे कधीकधी राष्ट्रविरोधी किंवा धर्मविरोधी ठरवले जाते. यामुळे समाजातील चिकित्सक चर्चा दडपली जाते. एक खुल्या दिलाचा आणि विवेकशील समाज घडवायचा असेल, तर भीती किंवा आक्रस्ताळेपणाशिवाय श्रद्धेबद्दल सार्वजनिक संवाद होणे आवश्यक आहे.

समाजातील श्रद्धेचे स्वरूप बदलण्याचा सर्वात शाश्वत मार्ग म्हणजे दर्जेदार शिक्षण. शिक्षण म्हणजे केवळ अक्षरओळख नाही; ते विचार करण्याची क्षमता प्रदान करते, प्रश्न विचारण्याचे धाडस निर्माण करते, आणि माहितीची चिकित्सा करण्याचे कौशल्य कसे आत्मसात करावे ते शिकवते. जिथे शिक्षण पोहोचले आहे, तिथे लोकांना अंधश्रद्धेने ताब्यात घेणे कठीण होते.

केरळसारख्या राज्याचे उदाहरण हेच आपल्याला सांगते की, उच्च साक्षरतेमुळे तिथे अंधश्रद्धेचे प्रमाण तुलनेने कमी आहे, आणि लोक धार्मिक श्रद्धा ठेवतानाही विज्ञाननिष्ठ राहण्याचा प्रयत्न करताहेत. नुकतेच वसईच्या चर्चसाठी जमा झालेले पाच-सहा कोटी रुपये जर त्याच भागातील मुलांच्या शिक्षणासाठी, तरुणांच्या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी, किंवा गरीब महिलांच्या उद्योजकतेसाठी वापरले गेले असते, तर त्याचे दीर्घकालीन सामाजिक परिणाम किती वेगळे झाले असते? हा प्रश्न केवळ आर्थिक नाही; तो नैतिक आहे. कारण संसाधने मर्यादित असताना प्राधान्यक्रम ठरवणे, ही प्रत्येक समाजाची जबाबदारी आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

एवंच एक मूलभूत सत्य मान्य करायला हवे की, माणूस हा सत्याचा, ज्ञानाचा आणि अर्थाचा शाश्वत शोधक आहे. हा शोध कधीकाळी देवळातून घेतला जात होता, पण आता तो प्रयोगशाळेतून आणि गणिती अल्गॉरिदममधून घेतला जात आहे. या शोधावर कोणा एकट्याचे स्वामित्व नाही... ना धर्माचे, ना विज्ञानाचे. जेव्हा धर्म या शोधाला प्रोत्साहन देतो, विचारांना खतपाणी घालतो, माणसाला माणसाशी जोडतो तेव्हा तो श्रेष्ठ असतो, आणि जेव्हा तो या शोधाला दडपतो, प्रश्न विचारणाऱ्यांना अपराधी ठरवतो, आणि माणसाला अज्ञानात बुडवून ठेवतो, तेव्हा तो समाजाच्या प्रगतीचा शत्रू बनतो.

तसेच तंत्रज्ञान जेव्हा माणसाला मुक्त करते, त्याच्या क्षमता वाढवते, आणि त्याला अधिक मानवीय जीवन जगण्यास मदत करते, तेव्हा ते कल्याणकारी असते. पण जेव्हा ते माणसाला अधिक एकाकी, अधिक यांत्रिक, आणि अधिक असंवेदनशील बनवते तेव्हा ते देखील धोकादायक ठरते. म्हणूनच खरा प्रश्न श्रद्धा विरुद्ध विज्ञान असा नाही; तो आहे विवेक विरुद्ध अविवेक. श्रद्धा कधीही विवेकपूर्ण असू शकत नाही आणि विज्ञान मानवतावादी असेलच असेही नाही. कारण श्रद्धा ही भावनिक असते, तर विज्ञान हे निसर्गातील घटिते असल्यामुळे तटस्थ असते. त्यामुळे या दोघांनी एकत्र नांदले पाहिजे, असा अट्टाहास करणे चुकीचे आहे.

समाज हा सतत बदलत राहतो. श्रद्धास्थळे बदलतील, त्यांचे स्वरूप बदलेल, त्यांची सामाजिक भूमिका बदलेल, हे निश्चित आहे. किल्ल्यांचे पर्यटन स्थळात रूपांतर झाले, राजवाड्यांची संग्रहालये झाली, आणि एके काळी निरुपयोगी वाटलेल्या गोष्टी आज सांस्कृतिक अभिमानाच्या प्रतीक झाल्या. श्रद्धास्थळांचे भवितव्यसुद्धा त्यांच्या अनुयायांवर अवलंबून आहे. ते त्यांना बदलत्या काळानुसार रूपांतरित करतात, की केवळ जुन्या परंपरांना चिकटून राहतात, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

म्हणून एक गोष्ट सतत लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे श्रद्धा ही आंतरिक असली, तरी सक्तीची नसावी. ती माणसाचे उन्नयन करणारी असावी, माणसाला दडपणारी नसावी. ‘देव देवळात नसतो, देवळात असते पुजाऱ्याचे पोट. तो माणसाच्या सेवेत माणसांतच असतो’, हे गाडगेबाबांचे वाक्य लक्षात ठेवावे. खरी प्रार्थना ती असते जी माणसाला माणसाजवळ आणते, त्याच्यापासून दूर नेत नाही. आणि खरे शिक्षण तेच असते जे माणसाला विचार करायला शिकवते. मग तो विचार देवाबद्दल असो वा विज्ञानाबद्दल... त्या विचारांच्या स्वातंत्र्यातच, चिकित्सक विचारधारेतच, माणसाचे उज्वल भवितव्य दडलेले आहे.

.................................................................................................................................................................

लेखक जगदीश काबरे समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.           

jetjagdish@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 15 May 2026

जगदीश काबरे,
श्रद्धा जर विवेकी कधीच नसेल तर विवेकानंदांनी झक मारली, असं म्हणायला पाहिजे. विवेक हे श्रद्धेचेच एक स्वरूप आहे. श्रद्धेशिवाय विवेक अस्तित्वांत येउच शकंत नाही. कारण की श्रद्धा म्हणजे पोकळ नाममात्र विश्वास नव्हे. श्रद्धेस रोकड्या अनुभूतीचा आधार लागतो. श्रद्धा = श्रत् + धा. श्रत् म्हणजे ऐकलेले वा अनुभवलेले सत्य आणि धा म्हणजे धारण करायची शक्ती. श्रद्धा ही एक मनाची शक्ती आहे. केवळ तोंडदेखला स्वीकार नव्हे. मनांत जर शक्ती नसेल तर विवेक कुठनं निर्माण होणार? सारांश : केवळ श्रद्धावंतच विवेकी असतो.
जाताजाता : देवळांत जर पुजाऱ्याचे पोट असेल तर मंदिरांचे सरकारीकरण कशासाठी?
आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लोकसंख्येच्या प्रमाणातच जागा द्यायच्या झाल्या, तर महिलांना जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास जागा द्याव्या लागतील. पण तशी मागणी कुणीच, महिला प्रतिनिधीही, करत नाहीत, ही आश्चर्याचीच बाब म्हणायला हवी!

एकीकडे ‘नारीपूजा’ म्हणायचे, तर दुसरीकडे असे वर्तन, हे संघ-भाजपच्या दुतोंडीपणाचेच लक्षण आहे. या विधेयकामुळे त्यांचा मुखवटा गळून पडला असून खरा चेहरा उघड झाला आहे. खरे तर त्यांना हे विधेयक नव्याने आणण्याचीच आवश्यकता नव्हती, कारण २०२३मध्ये संसदेत ते एकमताने मंजूर झाले होते. पण तसे केले असते, तर तेच अडचणीत आले असते. कारण त्यांना महिलांना असे सामर्थ्य मिळायला नको होते.......

बाबाबुवा, गुरू, साधू, संत या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींनी लोकांच्या मानसिक दुर्बलतेचा, अज्ञानाचा आणि भीतीचा गैरफायदा घेत सातत्याने समाजाचे शोषण केले आहे – विशेषत: स्त्रियांच्या

अनेक बाबाबुवांनी ‘आध्यात्मिक साधना’, ‘देवाची कृपा’ किंवा ‘उपचार’ यांच्या नावाखाली स्त्रियांचे लैंगिक शोषण केले आहे. तरीही त्यांच्या अनुयायांनी त्यांना समर्थन दिले, ही गोष्ट समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभे करते. याचा विचार केला, तर एक गोष्ट स्पष्ट होते - अंधश्रद्धा ही केवळ अज्ञानाची समस्या नाही, तर ती एक सामाजिक, मानसिक, आर्थिक आणि राजकीय समस्या आहे.......