अजूनकाही
ऋतू अलगद कुस बदलून भवतालाशी एकरूप होतात. सृष्टीचं वेळापत्रक जीव ओतून सांभाळतात. हस्तक्षेपी न होता नेमानं हजेरी नोंदवतात. सुटी नाही. रजा नाही. अनाहूत दांडी नाही की, कुठचा पोबारा नाही. निव्वळ सातत्य. आणि सोबतीची हमी. ४.५ अब्ज वर्षांपासूनची. अखंड, असीम ऊर्जा देण्याचं वचन सूर्यानं पृथ्वीला दिलं त्या घटकेपासून खरं तर.
उत्क्रांतीच्या इतिहासात जन्माला आलेली सगळ्यात रोमांचक कहाणी कोणती असेल, तर ती पृथ्वीनिर्माणाची. जीवसृष्टी मग सावकाश उमलत गेली तिथं. तिथल्या एकेक नवजन्मांच्या कथा तर खूप खूप अगम्य. आणि हे सगळं घडून आलं निव्वळ एका वचनातून. अविरत ऊर्जा पुरवत राहण्याचं वचन. कोणताही मोबदला नाही की, कुठची अपेक्षा नाही. लेखी करार नाही की, कसला पुरावा नाही. कुणाची सही नाही की, कुणी साक्षीला नाही.
‘माझी ऊर्जा घेऊन एक जीवसृष्टी तू जन्माला घालणार असलीस, जीव ओतून तिला तू जपणार असलीस तर ही ऊर्जा कधीच खंडित होणार नाही. माझी ही साथ अंतहीन असेल’, अशी एक अबोल निःशब्द खात्री.
विश्वाच्या पसाऱ्यात इतकं प्रदीर्घ काळ जपलं गेलेलं हे एकमेव वचन. सूर्यानं पृथ्वीला दिलेलं... आणि या वचनाला पुरेपूर जागायचं म्हणून पृथ्वी नेमानं फिरत आहे त्याच्याभोवती. जन्मापासून. अविश्रांत. ३६५ दिवस, ५ तास, ४८ मिनिटं आणि ४६ सेकंद.
आजवर कुठलीही सबब नाही. थापा नाहीत की, लबाड आश्वासनं नाहीत. ‘तू ऊर्जा दे, मी परिभ्रमण करत राहीन’, इतकं साधं गणित. वसा म्हणून स्वीकारलेलं. ‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला… गतजन्मीची खूण सापडे, ओळखले का मला?’ आणि असलीस तर अशी एक भरून राहिलेली आर्तता या वचनाच्या तळाशी.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
इथंच, याच वचनाच्या गाभ्यात मग बहरत गेलेली सृष्टी आपल्याला सापडते. उत्क्रांतीचा इतिहास सांगतो, पृथ्वीनिर्माणानंतर जवळपास एक अब्ज वर्षांचा कालावधी जावा लागला, पृथ्वीच्या कुशीत जीवसृष्टी जन्माला येण्यासाठी. एका अतीसूक्ष्म जीवाणूच्या रूपात. आणि ऋतुचक्राची उत्पत्ती तर पृथ्वीजन्माला समांतर. तिचा किंचित झुकलेला कक्ष आणि तिच सूर्याभोवतीच अविरत परिभ्रमण यातून सुरू झाला ऊन-सावलीचा खेळ. यालाच आपण एक गोंडस नाव दिलं- ‘ऋतुचक्र’!
तर अगदी सुरुवातीला म्हणलं तसं, या सृष्टीला ऋतूंनीही सोबतीची हमी देऊन टाकलीय. अगदी सूर्यानं पृथ्वीला दिलेल्या वाचनाइतकी गंभीर नाही, पण गेली ४.५ अब्ज वर्षं झाली उत्क्रांतीचे सगळे आघात सोसत ही सोबत टिकून आहे. पृथ्वी गोल गोल घिरट्या घेत राहते आणि तिच्या संथ लयीत ऋतू कुस बदलत राहतात. निदान मागची चाळीसेक वर्षं तरी ही लय काहीशी अबाधित होती. सृष्टीनं घालून दिलेला प्रघात सगळेच ऋतू निगुतीनं सांभाळत होते. आपापल्या आगमनाच्या आणि निर्गमनाच्या वेळा विनासायास पाळत होते. सृष्टीचं वेळापत्रक चोख सांभाळत होते. १२ महिन्यांचं जीवनचक्र एका लयीत सुरू राहावं म्हणून आखलं गेलेलं… सूर्याचं उगवणं अन् मावळणं यावर बेतलेलं.
कॅलेंडर, वार, तारखा ही नंतरची सोय. निर्भेळ, विमुक्त जगणं काबूत ठेवण्याचा विचार सुरू झाल्यानंतरची. सृष्टीचं वेळापत्रक नियंत्रित करण्याच्या प्रयत्नांची सुरुवात इथंच असणार आगेमागे… तोपर्यंत पावसाळा पावसाचा आणि हिवाळा थंडीचाच असायचा. उन्हाळ्यातलं ऊन उबदार असायचं, भाजणारं नाही. वारा उनाड होऊन वाहायचा, बेफाम नाही. पावसाची झड नद्या ओढ्यांशी उन्मुक्त खेळत राहायची. झाडांची, प्राणी-पक्ष्यांची तहान शांतवत. झरे, ओहोळ सारेच ओसंडून वाहत राहायचे, काठ सोडून बेभान न होता.
सगळं आवाक्यात असण्याचा हा काळ. कुणीच आपले बांध ओलांडून दुसऱ्याच्या हद्दीत डोकावायचं नाहीत. उगाच रेंगाळत राहायचे नाहीत. प्री-बुकिंग असल्यासारखं वेळेत येऊन वेळेत निघायचेही. सगळे प्रवास अगदी चोख. हव्यास नाही.
प्रत्येक ऋतूची एक खास अनामिक भाषा. फुलापानांशी, माती-पाण्याशी बोलत राहण्याची त्याची असोशी त्यामुळेच. संवादातूनच तर बहरतात नाती! आणि त्या त्या ऋतूंची खासीयत अंगावर मिरवत बहरून आलेली सृष्टी तर कोणत्याही ऋतूंत देखणीच दिसते. पण तिचं अस्तित्व कधीच इतकं सिमित नव्हतं. उत्क्रांतीच्या इतिहासात कितीही मागे जात राहिलं तरी कुठेच हा संदर्भ गवसत नाही.
ताणलेले कॅमेरे अन् केवळ शोभा म्हणून सृष्टीसौंदर्य न्याहाळणारे चेहरे ही अगदी अर्वाचीन घडामोड. उत्क्रांतीचा याच्याशी कणभर संबंध नाही. तर, ऋतूंची भाषाबोली वेगानं बदलत आहे. सृष्टीसोबतची त्यांची समंजस लय विस्कटत आहे, हा मुख्य मुद्दा.
वसंत ऋतूंबद्दल बोलूया... म्हणजे ओसरत चाललेल्या थंडीच्या पार्श्वभूमीवर गर्द होत जाणारी चैत्रपालवी ही वसंत ऋतूची ठळक भाषा. ती पक्ष्यांना उमगते आणि ते गात सुटतात. कोवळ्या नितळ कळ्यांना उमलण्याचे संकेत मिळतात. रसरशीत पानं देठाशी फुलून येतात. हा सृजनसोहळा जन्माला घालणाऱ्या वसंत ऋतूला दुर्गाबाई भागवत ‘ऋतूराज’ म्हणतात.
ज्या काळात त्यांनी वसंताचं भरभरून वर्णन केलं, तो काळ संपून गेलाय. असा बहरलेला, रसरसलेला वसंत आता दुर्गाबाईंच्या ‘ऋतूचक्र’मध्येच उरलाय. त्याची भाषा बदलून गेलीय. त्याचा संयम पणाला लागलाय. आता त्याला घाई असते येण्याची. किंवा कधी तर तो येणार, येणार म्हणताना येतच नाही. फुलंपानं वाट बघत राहतात. पक्ष्यांचे सूर कंठाशी दाटून येतात. वसंताची काहीतरी खूण गवसेल म्हणून तिष्ठत उभे सगळे... त्याचं अकाली येणं किंवा अवचित येणं रद्दच करणं, हे सगळं लहरी होत चाललंय आताशा. का बरं?
सृष्टीचं वेळापत्रक चुकलंय की, त्याचीच वाट अवघड होऊन गेलीय परक्या हस्तक्षेपांनी? पण मग त्याच्या अवेळी येण्यानं किती काय बिघडून जातं! अनाहूत पाहुणा आल्यासारखंच. पक्ष्यांना इच्छा नसताना, मूड बदलून गावं लागतंय. पानां-फुलांचीही फुलता-उमलताना दमछाक होत नसणार का? सगळंच विनासूचना. मग कोणतही हितगुज नाही की, प्रेमळ विचारपूस नाही. वसंत आणि पक्षी-फुलांत असलेला संवादाचा धागा असा झिरझिरीत होतोय. सगळेच कोरडे सोपस्कार.
ऋतूंची ही बदलत असलेली भाषा कुणालाच खरं तर अवगत नाहीये. तज्ज्ञांपासून अभ्यासकांपर्यंत सगळेच आडाखे बांधण्यात मग्न. स्वतः वसंतही स्वमग्न होत चाललाय मागची काही वर्षं आणि ते अधिक बोचणारं आहे. आगमनाची घाई वसंताला राहिलेली नाही. दिरंगाईचा निर्णयही तो घेत नाही. हवामान बदलाच्या वेगाचा तो स्वतःच ‘व्हिक्टीम’ आहे.
वैशाखाचा थेट संबंध ग्रीष्मातल्या काहिलीशी. काहीएक वर्षापूर्वीपर्यंत ती कायम सहनीय होती. लखलखीत उन्हात आसमंत झळाळून टाकायची. शेतकरी, कातकऱ्याची सोबतीण असायची. ‘पाऊस-पेरणीची लगबग सुरू होण्याआधी तू जरा सावलीला विसावा घे,’ असं प्रेमळ सूचन करायची. पावसाळा सुखकर होण्याआधी तप्त झळा सोसायला लावणारी, रखरखीत, निष्पर्ण डोंगरावर लालबुंद बहर फुलवणारी ग्रीष्मा मागच्या काहीएक काळापर्यंत असह्य झालेली नव्हती. तिच्या तापट गुणातही एक सुखद गोडवा होता. आता ती तापलेलीच राहते. उग्र उष्मा तावातावानं फेकत. जनजीवांची लाही लाही करत. घशाला कोरड पाडत, जगणं भकास करत नेणारी आताची ही जीवघेणी ग्रीष्मा ती नव्हे. हिला जन्माला घातलं ‘होमो सेपियन्स’ने उत्क्रांतीच नैसर्गिक कॅलेंडर आपल्याच ताब्यात घेण्याच्या अट्टाहासत.
इकडे उन्हाळाही मग हटवादी होतोय. उन्हं झेलून झेलून हैराण झालेल्या जीवांचा अंत पाहतोय. इतका की, आता तो येतोही लवकरच थंडीशी हुज्जत घालत आणि निघण्याचं मात्र नाव घेत नाही. एक मूक बंड पुकारल्यासारखं. चराचराशी की, माणूस नावाच्या प्रजातीशी?
‘नेमेचि येतो पावसाळा’ ही ग्वाही देणं सृष्टीनं बंद केलंय, त्यालाही काही दशकं उलटून गेलीत. उन्हाळ्यासारखाच मान्सूनही मनमानी करतोय. न येण्याची सूचना, न जाण्याची खबरबात. ‘आधुनिक’ नावाच्या शब्दाला ही थेट चपराक.
उन्हाळ्याचं अती होणं, पावसानं हाहाकार माजवणं आणि गुलाबी थंडीनं रुसून निघून जाणं... समाधानाचं जग असं आकसत चाललंय. निसर्गावर ताबा मिळवणं शक्य आहे याची लख्ख जाणीव झाल्यापासून…
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
ज्ञान हे जोवर फक्त कुतूहल शमवत होतं, तोवर सगळं आलबेल होतं. आत-बाहेरच्या पर्यावरणात एकमेळ होता. ‘इको सिस्टिम’ संवादी होती. परस्परावलंबन समंजस होतं. रोखलेल्या कॅमेऱ्यात टिपण्यापलीकडचं...
निसर्गाची ही प्राचीन ‘टेपेस्ट्री’ आरपार बदलण्याचा हव्यास घाट आता रोज घातला जातोय. ज्ञान-विज्ञानाच्या सगळ्या शक्यता आजमावत. संवेदनाहीन तंत्रज्ञानाला होकार भरत. नेमक्या कुठल्या सुखासाठी? नेमकं कुणाच्या हितासाठी? या अवघड प्रश्नांची उत्तरं तर त्याहून अवघड.
लुप्त होत चाललेली वनराई, उजाड होत चाललेल्या गर्द सावल्या, हरवत चाललेल्या रानवाटा.. गुदमरवून टाकणारं कार्बनचं उत्सर्जन अन् अस्वस्थ चराचराचा पार बिघडून गेलेला नूर... हे खुपणारं वास्तव अभ्यासात शिकण्यापुरतं, स्क्रीनवर वाचण्यापुरतं अन् चर्चासत्रांतून बोलण्यापुरतंच शिल्लक उरायला नको. इतकंच!
.................................................................................................................................................................
लेखिका शुभांगी गबाले स्त्रीप्रश्न आणि पर्यावरण यांच्या अभ्यासक आहेत.
shubhangi.enw87@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment