आमच्या, आताच्या पिढीतल्या कवींना, लेखकांना, कलावंतांना प्रश्नचिन्हांच्या लांडग्यांच्या कळपांना सामोरे जावे लागते आहे!

आज सत्त्योत्तर युग, पोस्ट-ट्रूथ एज, आहे असे म्हटले जाते. सत्य काय आणि असत्य काय, काही फरकच राहिलेला नाही. असत्य वारंवार बोलले गेले की तेच सत्य आहे असे सामान्य लोकांना वाटत असते. राजकीय आणि आर्थिक सत्ता असा सत्यासत्याचा भ्रम निर्माण करतात. त्यांचे असत्यांचे घोडे चौखूर उधळत असतात. कुणी सत्य सांगायचा प्रयत्न कला तर त्यांचे तोंड बंद करण्यात येते. पण आपण बोलले पाहिजे हे आपल्याला कुसुमाग्रजांच्या कवितांनी सांगितलेले आहे.......