स्पर्धा परीक्षांच्या कृष्णविवरातून बाहेर कसे पडावे, हे सांगणारा उत्कृष्ट आणि मार्गदर्शक संदर्भग्रंथ
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
राहुल विद्या माने
  • ‘मी अधिकारी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sun , 18 May 2025
  • ग्रंथनामा शिफारस मी अधिकारी Mee Adhikari स्पर्धा परीक्षा Competitive Exam MPSC एपीएससी UPSC युपीएससी

अलीकडेच यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात महाराष्ट्रातील मेंढपाळ समाजाचा बिरदेव ढोणे आणि मुस्लीम समाजातील एका रिक्षाचालकाची मुलगी आदीबा अनाम, हे उल्लेखनीय यशामुळे प्रकाशझोतात आले. इतर यशस्वी परीक्षार्थी उमेदवारांचेही कौतुक झाले, पण आपले समाजमन अजूनही अपयशी उमेदवारांचा संघर्ष, त्यांच्यासमोरील पुढील पर्याय आणि इतर सुसंगत बाबींवर का चर्चा करत नाही?

वर्षानुवर्षे यूपीएससी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत नाही, तर दिवसेंदिवस वाढतच आहे. परीक्षेचा अति ताण, वाढती बेरोजगारी, स्पर्धा परीक्षेत यशाने दिलेल्या हुलकावणीमुळे लांबलेले लग्न, पर्यायी रोजगार-उद्योग कौशल्ये नसणे आणि आपल्या बरोबरच्या मित्र-मैत्रिणी करिअरच्या वाटेत पुढे गेल्याने आलेला न्यूनगंड या सर्वांमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी Depression HotSpot आणि Demographic Disaster बनले आहेत.

पुण्यातील एका खाजगी कोचिंग क्लासच्या सत्कार कार्यक्रमात आदीबा अनाम यांनी धाडसी  मांडणी केली. तिचे भाषण राज्य वा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे निकाल जेव्हा लागतात, तेव्हा कसा विचार करावा, हे प्रसारमाध्यमे, कोचिंग क्लासेसवाले, जाहिरातदार, आणि भविष्यातील सोनेरी आयुष्याची खात्री पटल्याने आश्वस्त झालेले नातेवाईक, अशा सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारे होते.  

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

गेली काही वर्षे नेमका हाच धागा पकडून मतपरिवर्तन करण्यासाठी बरेच जण बरेच जण झगडत आहेत. याच विषयावर डॉ. ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर यांनी लिहिलेले ‘मी अधिकारी - स्पर्धा परीक्षा : वास्तव, भवितव्य आणि दिशा’ हे संशोधनात्मक पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. शीर्षकातूनच या पुस्तकामागची भूमिका स्पष्टपणे दिसते. हे पुस्तक स्पर्धा परीक्षेच्या कृष्णविवरावर प्रकाशझोत टाकून त्यातून बाहेर पडण्याचे दृष्टीकोन बदलाचे गुरुत्वाकर्षण बल वाढवण्याचे काम करते.

मुळात हा एक संशोधन प्रकल्प आहे. जे स्पर्धा परीक्षेत अपयशी ठरले, अशांच्या आयुष्यात आशा, प्रगतीचा शुभ्र प्रकाश कोणी आणला, त्या न मळलेल्या वाटांना समजून घेण्यासाठी हा प्रचंड मेहनतीने केलेला प्रयत्न आहे. अपयशामुळे सर्वांच्या उपेक्षेचे धनी झालेल्यांच्या निराशेवर फुंकर घालण्याचा हा कौतुकास्पद प्रयत्न आहे.

‘यशदा’चे अधिकारी बबन जोगदंड या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत म्हणतात, “आतापर्यंत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा? स्पर्धा परीक्षेचे स्वरूप, यशस्वी अधिकाऱ्यांच्या मुलाखती, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप यावरच पुस्तके प्रकाशित झाली आहेत; परंतु या पुस्तकांमध्ये स्पर्धा परीक्षेची वास्तविकता, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना घ्यावयाची काळजी, संघर्षातून यश मिळवलेल्या अधिकाऱ्यांच्या यशोगाथा, वाढती बेरोजगारी आणि पालकांची ढासळत चाललेली आर्थिक परिस्थिती, तरुणांचे मानसिक स्वास्थ्य, शारिरीक आजार, शासनयंत्रणेची भूमिका, स्पर्धा परीक्षेतील विविध नोकरीच्या संधी, वास्तवतेच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील दिशा, त्याचबरोबर परीक्षेचे स्वरूप, पद्धती, स्पर्धा परीक्षेचा इतिहास, प्रशासकीय यंत्रणेचा इतिहास असे अनेक पैलू या ग्रंथामध्ये संशोधनात्मक पद्धतीने मांडले आहेत.”

या ग्रंथाची मांडणी तीन भागांत केली आहे. पहिल्या भागात बऱ्यापैकी वस्तुनिष्ठ माहिती आहे. स्पर्धा परीक्षेची प्रक्रिया, जाहिरात, परीक्षा स्वरूप, अभ्यासक्रम, पदांची रचना, त्यातील आकडेवारी, त्यातील धोरणात्मक बदल-उत्क्रांती, संबंधित प्रशासकीय यंत्रणा, अशा बाबींची चर्चा आहे. याच अंगाने स्पर्धा परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या पदांची आरक्षण व्यवस्था कशी आहे, याबद्दल विश्लेषण आहे. भाग दोनमध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांचे मानसिक स्वास्थ्य व वाढते शारिरीक आजार, पालकांची ढासळती आर्थिक परिस्थिती या विषयांचा ऊहापोह आहे. भाग तीनमध्ये बारावी आणि पदवीनंतरची शिक्षण व्यवस्था, रोजगार निर्मिती यंत्रणा, आर्थिक जगातील घडामोडी यांची चर्चा आहे.

या पुस्तकाची एक उल्लेखनीय बाजू म्हणजे या सगळ्या मुद्द्यांशी संबंधित धोरणे, आकडेवारी, व्यावहारिक मर्यादा यांची तार्किक दृष्टीकोनातून मांडणी केली आहे. पण जमेची बाजू म्हणजे स्पर्धा परीक्षेत अपयशी झाल्यानंतर खचून न जाता आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी करियर करणाऱ्यांच्या यशोगाथा यात आहेत. ही कहाणी आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या, अपघातातून बरे होऊन नवीन वाट शोधलेल्या, अत्यंत गरिबीतून-उपासमारीतून-दारिद्रयातून बाहेर येऊन विजिगीषू जिद्दीने निराशेवर मात करून पुढे आलेल्या आणि आपला स्वतंत्र मार्ग शोधणाऱ्या लढवय्यांची आहे.

या पुस्तकाने प्रशासकीय अधिकारी पदांच्या पलीकडे जाऊन ‘अधिकारी’ या संकल्पनेला आव्हान दिले आहे. हे आव्हान ‘अधिकारी’ या शब्दाच्या लोकप्रिय अशा सत्ता-शक्ती संदर्भ असलेल्या आयामालासुद्धा आहे. लेखक ज्ञानेश्वर जाधवर म्हणतात, “ ‘अधिकारी’ ही संकल्पना शासनातील पद किंवा अधिकारांपुरती मर्यादित नाही. ती व्यक्तीच्या कर्तृत्वावर, योगदानावर आणि जिद्दीवर आधारित आहे. ती व्यक्ती कुठल्याही क्षेत्रांत कर्तृत्वाने समाजात आपली छाप निर्माण करणारा असतो. एखाद्या क्षेत्रात अधिकारी होण्यासाठी केवळ पदवी किंवा सरकारी मान्यता नव्हे तर आत्मविश्वास, चिकाटी आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी योगदान महत्त्वाचे आहे.”

असे योगदान दिलेल्या काहींचे अल्प-चरित्र या पुस्तकात आहेत. संगीता जाधव या तरुणीने सेंद्रिय शेतीमध्ये केलेले काम, रमेश गुरव यांनी ग्रामीण भागात डिजिटल शिक्षणाचे केलेले काम, सिताफळाच्या विविध जातींचा विकास करणारे डॉ. कस्पटे, शेती पूरक उद्योजक बनलेले श्रीकांत घोरपडे, ग्रामीण भागातील लोककलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्या नेहा कुलकर्णी, मनोरंजन क्षेत्रातील यूट्यूबर जीवन आघाव, मीडिया मॅनेजमेंट क्षेत्रात यश मिळवलेले नयन गुरव, ग्रंथालय सुरू करणारे प्रेरित कोठारी, रंगभूमी हेच करिअर बनवलेल्या पलाश शरद हसे, ग्रामीण भागात मोठे मॉल उभे करणारे विक्रांत पवार, शेअर बाजारात यशस्वी करिअर करणारे संकेत कदम व अक्षय भिसे, फॅशन डिझाईनमध्ये यश मिळवलेल्या कविता माळी, उद्योजगता कौशल्य केंद्र सुरू करणाऱ्या मेघा पवार, ग्रीनहाऊस शेतीमध्ये यश मिळवलेले मनोहर पाटील, कृषि उद्योजक बनलेले सचिन गायकवाड, सुरक्षा सेवा पुरवणारी मोठी कंपनी चालवणारे रणजित पाटील, स्पर्धा परीक्षेच्या मुलांच्या प्रश्नांसाठी काम करणारे महेश बडे आणि याच विषयावर ‘वास्तव कट्टा’ हे यू-ट्युब चॅनेल चालवणारे किरण निंभोरे, या तरुणांच्या यशोगाथा या पुस्तकात आहेत.

या सर्वांनी वेळोवेळी स्पर्धा परीक्षा दिलेली आहे, पण अपयशाने खचून न जाता त्यांनी मोठ्या जिद्दीने आपल्या आवडीच्या क्षेत्रात उडी घेऊन तिथे जम बसवला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मिळवलेले ज्ञान, दृष्टीकोन व कौशल्ये यांचा व्यावसायिक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी प्रचंड उपयोग झाला, हे अभिमानाने सांगायला ते विसरत नाहीत.

दुसऱ्या बाजूला संघर्ष करून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांची लघुचरित्रे या पुस्तकात आली आहेत. तेजस्वी सातपुते, रमेश घोलप, ओंकार पवार, तृप्ती धोडमिसे, अभयसिंह मोहिते, सोनूल कोतवाल, गंगाधर हावळे, राजेंद्र कचरे, प्रमोद चौगुले, सुरेखा भणगे, पीयूष चिवंडे, डॉ. आर. बी. पवार अशा अधिकाऱ्यांचा परिचय आहे. हे सर्व अधिकारी गरीब परिस्थितीतून आलेले आहेत. त्यांचे म्हणणे असे आहे की, फक्त लाल दिवा आणि पैसा, पद, प्रतिष्ठा यासाठी तुम्ही या क्षेत्रांत येऊ नका. तुम्हाला या क्षेत्रातील कामाची आव्हाने खुणावत असतील आणि या कामाच्या माध्यमातून जर तुम्ही समाजासाठी काही करू इच्छित असाल, तर नक्की या.

स्पर्धा परीक्षेतल्या अपयशानंतर पॅरा-ऑलिम्पिकमध्ये यश मिळवलेल्या सचिन खिलारीचे उदाहरण खूपच समर्पक आहे. सचिनचा जन्म पश्चिम महाराष्ट्रातला दुष्काळी भाग आटपाडीत झाला. खडतर परिस्थितीत त्याने इंजिनियरिंगची पदवी मिळवली. एका अपघातात सायकलवरून पडल्याने तो गंभीर जखमी झाला आणि त्याला एक पाय गमवावा लागला. त्यानंतर त्याने अनेक वेळा स्पर्धा परीक्षा दिल्या, परंतु त्याला यश मिळाले नाही. मधल्या काळात त्याने शिकवणी घेण्याचे कामसुद्धा केले. मग त्याने हळूहळू आपल्या खेळाच्या आवडीला जोपासत वेगवेगळ्या स्पर्धांतून सहभाग घेतला आणि अनेक अडचणींवर मात करत आपले करिअर घडवले. तो म्हणतो, “संघर्ष हाच यशाचा पाया आहे. तरुणांनी स्वत:ला विचारलं पाहिजे की, आपण काहीतरी करत आहोत का? जर एक क्षेत्र जमत नसेल तर दुसऱ्या क्षेत्रांत स्वत:ला सिद्ध करा.”

सुशील काटकर या तरुणाने स्पर्धा परीक्षेमधील प्रयत्नानंतर पुण्यात ‘होय मी एमपीएससीकर काटकर बंधू’ या नावाने पोह्याचे दुकान टाकले. उमेश घाडगे या तरुणाने हॉस्टेल व्यवसायात यशस्वी जम बसवला. अभिषेक पर्वतेने मेन्स पार्लर सुरू केले. प्रेरित कोठारीने ‘ग्लोबल स्टडी रूम’ नावाच्या अभ्यासिका सुरू केल्या. नेहा पाटीलने महाराष्ट्रियन, पंजाबी, चायनीज आणि इटालियन खाद्यपदार्थ बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. प्रवीण कदमने आरोग्य व्यवस्थापन क्षेत्राचे आधुनिक ज्ञान-कौशल्य घेऊन गावात आरोग्य सेवा व मार्गदर्शन देणारे आधुनिक केंद्र सुरू केले. अंजली जाधवने तिच्या गावी महिलांना संघटित करून बचत गट व इतर उपक्रमाद्वारे महिलांच्या स्वावलंबनासाठी कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्र सुरू केले. 

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

अमोल अवचिते बातमीदार बनला. विशाल ठाकरे यशस्वी वकील व माहिती अधिकाराचा यशस्वी वापर करणारा सामाजिक कार्यकर्ता बनला. नेहा जोशीने अत्यंत अवघड असे सांख्यिकी विश्लेषण अभ्यासक्रम पूर्ण करून विदा विश्लेषक (डेटा सायंटिस्ट) म्हणून मोठी झेप घेतली. पांडुरंग शिंदे आणि बालाजी गाडे यांनी आश्वासक राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. दुर्गम भागात मेंढपाळ कुटुंबात वाढलेल्या सौरभ हाटकर याने यू.के.च्या स्कॉटलंड येथील एडिनबर्ग विद्यापीठ मध्ये पीएच.डी. संशोधन करण्यापर्यंत मोठी मजल मारली आणि ज्ञानाच्या क्षेत्रात आपले नाव मोठे केले. हे करण्याच्या प्रवासात त्याने धनगर समाजाच्या आर्थिक व सामाजिक प्रगती व हक्कांसाठी मोठे योगदान दिले.

या सर्वांचे एकच कळकळीचे सांगणे आहे की, स्पर्धा परीक्षेतील असू दे किंवा कोणत्याही क्षेत्रातील अपयश असू दे, ही एक संधी असते आणि या संधीतूनच पुढच्या वाटा खुल्या होत असतात.

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रे, नोकरी-उद्योगजगत, यांबद्दल युवक-युवतींचा व्यावसायिक कल घेऊन मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्ती, नेतृत्त्व व व्यक्तिमत्त्व विकास, यावर काम करणारे प्रशिक्षक, अशा अनेकांशी चर्चा करून आजकालचे विद्यार्थी कोणत्या दिशेने वाटचाल करत आहेत, यावरही लेखकाने प्रकाश टाकला आहे. 

स्पर्धा परीक्षा सोडून इतर कोणत्याकोणत्या व्यवसायात करिअर घडवून आयुष्य जगू शकतो, याची भरगच्च माहिती, ही या पुस्तकाची महत्त्वाची ओळख आहे.

 ‘मी अधिकारी - स्पर्धा परीक्षा : वास्तव, भवितव्य आणि दिशा’ - डॉ. ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर

रुद्र पब्लिशिंग हाऊस, पुणे | पाने – ४१६ | मूल्य – ४३० रुपये.

.................................................................................................................................................................

राहुल विद्या माने

nirvaanaindia@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

आपल्याच मातीत वाढलेले तंत्रज्ञ जर जागतिक कीर्तीची स्थापत्यरचना करू शकतात, तर ‘मी का नाही?’ ही जाणीव आपल्या भावी पिढीमध्ये वाढावी, हा माझ्या कथेमागचा मूळ उद्देश आहे...

इतिहासकारांनी शोधलेल्या संदर्भांची शृंखला एखाद्या कथेद्वारे जोडून त्यांचा मला समजलेला अर्थ वाचकासमोर मांडणाऱ्याची माझी भूमिका आहे. देवळाच्या पायरीवरचा पुष्परचनाकार फुलाफुलातून दोरा ओवून हार बनवतो, त्याचप्रमाणे विखुरलेल्या ऐतिहासिक घटनापुष्पांना गुंफून मी एक हार बनवला आहे एवढंच. हाराचं सौंदर्य वाढावं म्हणून त्यात काही काल्पनिक आणि प्रसंगरूपी पात्रं ओवली आहेत, परंतु खरं मूल्य आणि शोभा त्या फुलांचीच आहे.......