अजूनकाही
तरुण लेखक अभिजीत केतकर यांची ‘कथा वेरूळच्या कैलास निर्मितीची’ ही कादंबरी नुकतीच स्नेहल प्रकाशन, पुणेतर्फे प्रकाशित झाली आहे. वेरुळच्या लेण्यांच्या निर्मितीचा कादंबरीमय इतिहास सांगणाऱ्या या पुस्तकाला त्यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर शहराजवळ वेरूळस्थित कैलास मंदिराची वास्तू जगप्रसिद्ध आहे. ह्या मंदिराच्या भव्यतेची, अप्रतिम शिल्पकामाची आणि एकाच दगडात कोरून योजलेल्या अद्भुत स्थापत्याची भुरळ पडली नाही, असा मनुष्य लाखात एखादाच असेल. शंकराचं हे अतिभव्य आणि शेकडो शिल्पांनी सजलेलं मंदिर साकारणाऱ्या निर्मात्यांनी आपल्या प्रतिभेची, स्थापत्यकलेची, भक्तीची, ज्ञानाची आणि कर्तृत्वाची जी काही उंची गाठली आहे, तिची तुलना केवळ कैलास-पर्वताशीच होऊ शकेल. एकाच पाषाणात एवढं अवाढव्य मंदिर कोरून काढणाऱ्या शिल्पी आणि स्थपतीबरोबरच अशा योजनेची कल्पना स्वीकारून ती पुरस्कृत करणाऱ्या द्रष्ट्या राज्यकर्त्यांसमोर आपण आदराने नतमस्तक होतो. आणि अशा प्रतिभावंत लोकांना प्रेरणा देणाऱ्या उमा-महेशाचा महिमा गौरवायला तर शब्दच सुचत नाहीत. मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक महर्षी डॉ. गो. ब. देगलूरकर सरांच्या शब्दात सांगायचे तर जागतिक सात आश्चर्यांत कैलासमंदिर गणलं जात नाही, हेच खरं आश्चर्य आहे.
दुर्दैवाने अशा अत्युच्च निर्मितीचे स्थपती (आर्किटेक्ट) आणि राज्यकर्ते दोघंही जनमानसाला फारसे माहिती नाहीत. साधारण बाराशे पासष्ट वर्षांपूर्वी राष्ट्रकूट राजांच्या कारकिर्दीत (इसवीसन सातशे अठ्ठावन्न साली) ह्या मंदिराची निर्मिती झाली, एवढंच इतिहास सांगतो. कैलास-मंदिराच्या कर्त्यांना आपली नावं कोणालाही कळू नये, असं वाटलं असावं. त्याबद्दल नंतरच्या राष्ट्रकूट राजांनी शिलालेख लिहून ठेवला आहे तो असा-
“मंदिराचे मुख्य स्थपती आणि त्यांचे मोजके ज्येष्ठ सहकारी जेव्हा हे निर्माणकार्य संपन्न झाले तेव्हा दूर जाऊन मंदिराकडे बघू लागले. ही विलक्षण निर्मिती आपल्या हातून घडली ह्यावर त्यांचा विश्वासच बसेना. आपले हात केवळ निमित्तमात्र होते, हे अद्भुत कार्य प्रत्यक्ष शंभो शंकराने आपल्या हातून घडवलं ह्याची खात्री वाटल्याने त्यांनी कुठेही आपली नावं कोरली नाहीत.”
हा त्यांचा मोठेपणा आहे. प्रत्यक्ष पुरावे नसल्यामुळे कैलासमंदिरनिर्मितीसंबंधी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. ह्या दंतकथा मनोरंजक असल्या तरी एक इंजिनियर म्हणून मला त्या तार्किक वाटत नाहीत. त्यामुळे दंतकथेपलीकडे जाऊन भावी पिढ्यांना आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाची ओळख होणं, मला नितांत गरजेचं वाटतं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
शिल्पकला, धर्म आणि तत्त्वज्ञान ह्याला अभियांत्रिकी (इंजिनियरिंग) आणि व्यवस्थापनाची (मॅनेजमेंट) जोड देऊन पूर्ण केलेली ही अशक्यप्राय योजना आपले पूर्वज साकारू शकले, ही भावना अतिशय भारावून टाकणारी आहे. जागतिक स्पर्धेत तोडीस तोड उतरण्यासाठी, विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी आपल्या पूर्वजांची ही इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटमधील जगविख्यात कामगिरी भावी पिढ्यांना आत्मविश्वास देऊन भविष्यात अशाच योजना घडवण्यास प्रोत्साहित करो, ही ह्या कथेच्या रचनेमागची प्रेरणा होती.
‘इतिहास’ शब्दाची फोड ‘इति+ह+आस’ म्हणजे ‘हे असे झाले’ अशी होते, परंतु तेवढ्यावर इतिहास संपत नाही. इतिहासाची अजून परिपूर्ण व्याख्या करणारा एक सुंदर श्लोक मला सापडला, तो असा-
“धर्मार्थ काम मोक्षाणाम् उपदेश समन्वितम् ।
पूर्ववृत्तकथायुक्तम् इतिहासं प्रचक्षते ।।”
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्याविषयी उपदेश असलेल्या, भूतकाळात घडलेल्या कथांना इतिहास म्हणतात. म्हणजे इतिहास हा फक्त ‘हे असे झाले’ असं सांगण्यापुरता नसून त्यापासून काहीतरी बोध घेणं महत्त्वाचं आहे.
राष्ट्रकूट सम्राट दंतिदुर्गासारख्या असामान्य राजाच्या चरित्रावरून आजच्या पिढीला बोध घेण्यासारखं बरंच काही आहे. दंतिदुर्गाची साम्राज्य निर्मिती आणि कैलासमंदिराची वास्तूनिर्मिती ह्या दोन्हीही घटना एकमेकींपासून वेगळ्या करणं मला अशक्य वाटलं. त्यामुळेच ह्या कथेतील घटना प्रथम साम्राज्यनिर्मिती आणि नंतर मंदिरनिर्मिती ह्यावर केंद्रित आहे. त्या दंतिदुर्गाला उद्युक्त करणाऱ्या आणि प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींवर आणि घटनांवर प्रकाश टाकतात. कथेतील बहुतेक पात्रे आणि घटना आपल्याला अनेक विषयांवर बोध देतात. हा बोध घेण्याचा मीही प्रयत्न केला आणि कथा स्फुरत गेली.
कथेचा उद्देश सापडला आणि मी ऐतिहासिक शोध घेण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम कैलास मंदिर वेरूळलाच का, इतर ठिकाणी का नाही, हा प्रश्न पडला. त्याचा शोध घेताना तत्कालीन इतिहास, राज्याराज्यातील संघर्ष, तत्कालीन मानवी जीवन, व्यापार, कला, भक्ती, धर्म आणि तत्त्वज्ञान ह्या मधले आश्चर्यकारक दुवे मिळत गेले.
दक्षिणेतल्या महाबलीपूरम, कांचीपूरम, ऐहोळ, पट्टदीकल आदी मंदिरांचा कैलास लेण्याच्या निर्मितीशी असलेला घनिष्ठ संबंध समोर आला. उत्तरेतील कनोज, उज्जयिनी आदी नगरं, पश्चिम किनाऱ्यावरील बंदरं, मध्य प्रदेशातील माहिष्मतीच्या कलचुरी साम्राज्यातील कृष्णराजाने कोरलेल्या श्रीपुरी (घारापुरी लेण्या, पुण्याचचं पाताळेश्वर मंदिर आदींचे एकमेकात गुफलेले संदर्भ मी जोडत गेलो आणि कैलास मंदिर निर्मितीची पार्श्वभूमी बनत गेली.
सुर्वणचतुष्कोण (गोल्डन क्वड्रीलॅटरल) रस्त्याची योजना जरी आजची असली, तरी हे रस्ते आजचे नाहीत. त्यांना हजारो वर्षांचा इतिहास आहे. आजचा बदामी (वातापि), विजयपूर, सोलापूर, (वेरूळ/एलापूर), धुळे हा रस्ता (एनएच ५२) त्या काळच्या ‘नॉर्थ साऊथ कॅरिडोर’ म्हणजेच दक्षिणपथाचा एक भाग असावा. सातवाहनांची प्रतिष्ठान (पैठण), राष्ट्रकूटांची एलापूर (वेरूळ) आणि यादवांची देवगिरी आदी राजधान्या ह्याच प्रदेशात का होत्या, ह्याचेही व्यावहारिक उत्तर मिळते. ह्या रस्त्यातून पूर्व पश्चिमेस फुटणारे फाटे समुद्रकिनाऱ्यावरील विविध बंदरांना जाऊन मिळत. मुंबईला पुण्याशी जोडणारा बोरघाट किंवा कल्याण-अहिल्यानगर (अहमदनगर) नाणेघाट हे त्याचंच उदाहरण.
त्या काळी यवन, हबशी, अरब आणि मिस्र देशांशी समुद्रमार्गे चालणारा व्यापार भरभराटीला आला होता. त्यामुळे ह्या व्यापारी मार्गावर ज्या सत्तेचं नियंत्रण, ती सत्ता संपन्न आणि समृद्ध. सुवेज कॅनल किंवा चीनचा ‘बेल्ट अँड रोड’ योजनेवर नियंत्रण मिळवू पाहणाऱ्या आजच्या सत्ता बघितल्या की, ह्या दक्षिणपथाचं ऐतिहासिक महत्त्व कळतं. आणि मोक्याच्या जागी वसलेल्या पैठण, वेरूळ आणि देवगिरीचं व्यापारी स्थान माहात्म्यही कळतं.
इ.स. तिसऱ्या शतकापासून पाचव्या-सहाव्या शतकापर्यंतचा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. कोणी ही कालमर्यादा आठव्या शतकापर्यंत नेतो. ह्याच काळात अनेक पुराणं रचली गेली. मंदिरनिर्माण आणि वास्तुशास्त्र हे एक वेगळं शास्त्र म्हणून उदयाला आलं. महाकवी कालिदास ह्याच काळातले. ह्याच काळात गणितात अनेक संशोधनं झाली. आर्यभट्ट आदी गणितज्ज्ञांमुळे ज्योतिष आणि खगोलशास्त्र प्रगल्भ झालं. ह्याच काळात चरक आणि सुश्रुत ह्यांनी गौरवलेलं आयुर्वेद आणि रसायनशास्त्र अजूनच समृद्ध झालं. हा ऐतिहासिक सुवर्णकाळ आजच्या विकसित भारताची व्याख्या करताना उत्कृष्ट मापदंड ठरू शकावा.
ही कथा राजा दंतिदुर्गाच्या साम्राज्यनिर्मितीबरोबरच प्रत्यक्ष मंदिर-निर्मिती प्रक्रियेवर विशेष भर देते. ज्योतिष, गणित, धर्म, पुराणं, शिव महिमा, तत्त्वज्ञान, कला, शिल्पशास्त्र, राजकारण आदी अनेक तत्कालीन विषय आपोआपच कथेमध्ये येतात. त्या काळी प्रचलित असलेल्या प्रगल्भ वास्तुशास्त्राच्या ग्रंथांवरून मिळणारी माहिती वाचल्यावर एखादा निष्णात वास्तुशास्त्री बनायला किती कष्ट घ्यावे लागतात, ह्याचा अंदाज येतो.
उदाहरणार्थ, कैलासमंदिराच्या दरवाज्याची दिशा बरोबर पश्चिम म्हणजे एकवीस मार्चला मावळत्या सूर्याचे किरण मुख्य दरवाजातून आत येतील अशी आहे. पुण्याचं पाताळेश्वरही बरोबर पूर्वेला तोंड करून योजलेलं आहे.
इसवीसन चारशेच्या आसपास लिहिलेल्या ‘सूर्यसिद्धान्त’ नावाच्या गणिती ग्रंथात सूर्ययंत्र आणि दिशा शोधणं ह्याची सोपी सुटसुटीत पद्धत दिली आहे. सूर्य दररोज उगवायची जागा बदलत असल्यामुळे ह्या पद्धतीनुसार त्या दिवशीची पूर्व कळली, तरी अब्सोल्यूट किंवा निरपेक्ष पूर्व दिशा कळत नाही. त्यासाठी पंचांग बघून सूर्याच्या उत्तर-दक्षिण हालचाली लक्षात घ्याव्या लागतात. म्हणजे अशा योजना आधी गणित करून, आराखडे रेखाटून मगच सुरू केलेल्या असणार.
विष्णूधर्मोत्तर पुराणातील चित्रसूत्रात मनुष्यशरीराच्या अवयवांची मापं आणि गुणोत्तरं काटेकोरपणे दिलेली आहेत. वराह-मिहीराच्या बृहदसंहितेत मूर्तिशास्रावर संपूर्ण प्रकरण आहे. मत्स्यपुराणातही वास्तुशास्त्र आणि मूर्तिशास्त्र आहे. किमान वीस-पंचवीस प्राचीन ग्रंथांतून वास्तू आणि मूर्तिकला याविषयी सखोल चर्चा केलेली आहे.
म्हणूनच ‘एक माणूस उठला आणि दगड कोरायला लागला’ किंवा ‘कोणा साधूच्या सांगण्यावरून आधी कळस मग पाया अशी चतुराई केली आणि राणीचा उपास मोडला’ अशा दंतकथा मनोरंजन म्हणून ठीक वाटतात. परंतु अशा कथा आपल्या इंजिनियर्स, गणितज्ज्ञ, शिल्पी, वास्तुतज्ज्ञ आणि प्रोजेक्ट मॅनेजर्सचा अवमान करणाऱ्या ठरतात. त्याबरोबरच सातवाहनकालीन राणी नागनिकेपासून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांपर्यंत राजघराण्यातील अनेक स्त्रियांनी मंदिरनिर्मितीत लावलेला हातभार मला विशेष भावला. भारतीय इतिहासात स्त्रियांचा सहभाग हा केवळ अर्धनारीश्वर शिल्पात कोरला नसून तो प्रत्यक्ष होता, हे सत्य लोकांसमोर येणं मला गरजेचं वाटलं.
कैलासातील शिल्पांनी माझी झोप उडवली होतीच, पण अशा अनेक विचारांनी माझ्यातला इंजिनियर आणि प्रोजेक्ट मॅनेजर जागा झाला. शोधनिबंध न लिहिता सहज समजेल आणि मनोरंजन करेल अशी, ऐतिहासिक तथ्यांना न डावलणारी कथा लिहिण्याचं पक्कं केलं. मी कैलास लेण्यांचा अभ्यास करायला लागलो, तशी प्रत्यक्ष लेण्यापेक्षाही तत्कालीन घडामोडींनी मला जास्त आकर्षित केलं. दंतिदुर्गासारख्या महानायकाची ओळख सर्वांना हवी, हे प्रकर्षाने जाणवायला लागलं.
केवळ ताकदीच्या बळावर साम्राज्य न चालवता आर्थिक, ऐहिक, धार्मिक, वैचारिक, नैतिक, सांस्कृतिक, पारमार्थिक अशा अनेक अंगानी राष्ट्राची उन्नती झाली, तरच ते राष्ट्र दीर्घकाळ टिकतं, हा विचार राष्ट्रकूटांनी ओळखला असावा. आज अनेक ठिकाणी शिवाची प्रतिमा ही स्मशानात गजचर्म गुंडाळून भूताप्रेतांमध्ये राहणारा योगी अशी आहे. राष्ट्रकूट काळातील अनेक अनेक शिल्पांमधून आपल्या कुटुंब परिवारासह गृहस्थाश्रमात रममाण झालेला शिव साकारलेला दिसतो. उदाहरणार्थ, शिव-पार्वती विवाह, कामदेवाची किंवा अंधकासुराची कथा किंवा शिव-पार्वतीचा सारीपाट खेळ आदी कैलासमंदिरातील शिल्पं.
घारापुरीतील अर्धनारीश्वर शिल्प हे सांख्य योगातील पुरुष प्रकृतीचे प्रतीक असले, तरी सामान्य माणसासाठी पती-पत्नी समान आहेत आणि दोघांनी मिळून एकत्र संसार करावा, हेच तत्त्व समोर येते. गृहस्थाश्रम हा संपूर्ण समाजाचा पाया आहे, हे दर्शवण्यासाठीच अशी शिल्पे योजली असावीत असं मला वाटतं. त्यामुळे ही शिल्पं केवळ तत्कालीन समाजाच्या पेहरावाची, दाग-दागिन्यांची आणि केशरचनेची ओळख करून देत नाहीत, तर थोड्याफार प्रमाणात समाजातील वैचारिक प्रगल्भतेचीही झलक दाखवतात.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
मी काही शिलालेखांचा, भूर्जपत्रांचा किंवा नाण्यांचा शास्त्रीय अभ्यासक नाही. भारतीय आणि परकीय इतिहासकारांनी अविरत परिश्रम करून शोधलेल्या, प्रत्यक्ष किंवा सतर्क सिद्ध केलेल्या ऐतिहासिक घटनांच्या अभ्यासाचं श्रेय घेण्याचा माझा अजिबात उद्देश नाही. मला तो अधिकारही नाही. भारताच्या इतिहासावर, परंपरेवर, समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या संस्कृतीवर जीवापाड प्रेम करणारा, महाराष्ट्रातील देवळं, किल्ले, लेण्या अशा ऐतिहासिक स्थळांना भेट देणारा मी एक भटक्या आहे. पेशाने आणि प्रकृतीने इंजिनियर आणि प्रोजेक्ट मॅनेजर असल्यामुळे भारतीय स्थापत्य कलाकृती मला त्या दृष्टीने मोहित करतात.
इतिहासकारांनी शोधलेल्या संदर्भांची शृंखला एखाद्या कथेद्वारे जोडून त्यांचा मला समजलेला अर्थ वाचकासमोर मांडणाऱ्याची माझी भूमिका आहे. देवळाच्या पायरीवरचा पुष्परचनाकार फुलाफुलातून दोरा ओवून हार बनवतो, त्याचप्रमाणे विखुरलेल्या ऐतिहासिक घटनापुष्पांना गुंफून मी एक हार बनवला आहे एवढंच. हाराचं सौंदर्य वाढावं म्हणून त्यात काही काल्पनिक आणि प्रसंगरूपी पात्रं ओवली आहेत, परंतु खरं मूल्य आणि शोभा त्या फुलांचीच आहे.
आपल्याच मातीत वाढलेले, आपलीच भाषा बोलणारे, आपल्या-सारखे दिसणारे आणि वागणारे तंत्रज्ञ जर जागतिक कीर्तीची स्थापत्यरचना करू शकतात, तर ‘मी का नाही?’ ही जाणीव आपल्या भावी पिढीमध्ये वाढावी, हा माझ्या कथेमागचा मूळ उद्देश. कैलासमंदिरासारखी जगप्रसिद्ध वास्तू निर्माण करणाऱ्या कोकशदेवांसारखे महान स्थपती भारतभूमीत परत परत घडावेत, दंतिदुर्गासारख्या महान राज्यकर्त्याची सर्वांना ओळख व्हावी आणि त्याद्वारे प्रेरणा घेऊन विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यास नवीन पिढीला चालना मिळावी, हीच शिवचरणी प्रार्थना.
‘कथा वेरूळच्या कैलास निर्मितीची’ - अभिजीत केतकर
स्नेहल प्रकाशन, पुणे | पाने ३२४ | मूल्य - ५०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment