पहलगाम हल्ल्यानंतर भारतात संतापाची एकच लाट उसळली, आणि असा संताप वाटणं योग्यसुद्धा आहे. कुठल्याही संवेदनशील माणसाचं हृदय हेलावून जावं, अशीच ही घटना आहे.
हा प्रश्न कायमचा सोडवला गेला पाहिजे, अशी मागणी जनमानसात वाढत चालली आहे.
मोदी सरकारने तातडीने सिंधू नदी पाणी करार रद्द केला. त्यानंतर मोदी सरकार आता काय पावले उचलत आहे, याकडे प्रत्येक भारतीयाचे आणि जगामधील सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे.
भारताचा प्रतिकार कसा असेल, या विषयी प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. याबाबत अजून थोडी स्पष्टता आली की, आपण त्याचा विचार करूच. दरम्यान, पहलगाम हल्ल्यासारखा मन हेलावून टाकणारा विषय उपस्थित झाला असला, तरी त्यावरही कसे राजकारण केले जातेय, हे बघणे गरजेचे आहे. सरकारवर टीका करणारे हिंदी विचारवंत सध्या एक वाक्यप्रयोग वापरत आहेत- ‘आपदा में अवसर!’ (संकटात संधी शोधणे!)
खरंच मोदी आणि त्यांचा पक्ष असा वागतो आहे का? की सगळेच पक्ष असे वागत आहेत? ‘आपदा में अवसर’ म्हणणारे पत्रकारसुद्धा तसेच आहेत का? आणि सोशल मीडियासुद्धा याच तत्त्वांवर वापरला जातो आहे का?
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
हल्ल्यामध्ये जे लोक मारले गेले आहेत, त्यांच्याबद्दल डोळ्यात पाणी आणायचे, ते मारले गेल्याबद्दल संताप व्यक्त करायचा आणि पुढच्याच क्षणी आपले राजकारण सुरू करायचे, असा प्रकार दोन्ही बाजूचे पक्ष करताना दिसत आहेत का? हल्ला झाला आहे, तेव्हा आपण देश म्हणून एक होऊन उभं राहायला पाहिजे, असं सगळेच म्हणत आहेत आणि ते योग्यही आहे, पण आपण तसे वागत आहोत का?
हल्ला झालाय, तेव्हा सुरक्षेमध्ये नक्की काय चुका झाल्या आहेत, हे शोधले गेले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली, तर तीसुद्धा योग्यच आहे.
चुका कुणाकडून झाल्या आणि कुणाच्या नेतृत्वाखाली झाल्या, त्या लोकांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी झाली, तर तीसुद्धा योग्यच आहे. कारण आपल्या देशात लोकशाही आहे. अक्षम्य चुकांची जबाबदारी कुणीतरी स्वीकारली पाहिजे. गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागितला गेला, तर तेसुद्धा योग्य आहे.
पण म्हणून मग हा हल्ला कोणीतरी ‘घडवून आणला’ आहे का, याबाबत पत्रकारांनी सूचक बोलायचं?
गेल्या काही वर्षांत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या एका यू-ट्यूब चॅनेलवर एक अत्यंत प्रतिष्ठित पत्रकार म्हणाले - “पुलवामा झाला की, करवला गेला, की होऊ दिला गेला; या सगळ्याची उत्तरं आजूनही मिळालेली नाहीत. पहलगाम हल्ल्याबाबतसुद्धा असंच होणार का?”
त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न महत्त्वाचा आहे. आमचा प्रश्न, हा प्रश्न उपस्थित करण्याच्या वेळेबाबत आहे. हल्ल्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी हे प्रश्न उपस्थित करायलाच पाहिजे होते का?
अजून एका प्रसिद्ध चॅनेलने म्हटले - “पहलगाम हल्ले की सच्चाई - CRPF हटाई गई - आतंकियो को खुली छूट”.
या ‘सुपरचार्ज्ड’ वातावरणात चौकशी आयोग नेमल्या जायच्या आधीच हा प्रश्न उपस्थित करणे गरजेचे होते का? कित्येक प्रेक्षक, या भूमिकेचं समर्थन करतील. असं सांगावं की सांगू नये, हा मुद्दा नाही. जरूर सांगावं. ते पत्रकारांचं कामच आहे, पण हत्याकांडाच्या दुसऱ्याच दिवशी?
जी गोष्ट डाव्या पत्रकारांची, तीच उजव्या पत्रकारांची.
टेलीव्हिजनवर ‘प्राईम टाईम’मध्ये आरडाओरडा करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या एका अतिउजव्या पत्रकाराने पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी उत्तर द्यावं, अशी भूमिका घेण्याऐवजी रॉबर्ट वड्रा यांच्यावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली. निमित्त होतं रॉबर्ट वड्रा यांनी केलेल्या एका विधानाचं!
रॉबर्ट वड्रा एवढंच म्हणाले की, “भारतामधील मुसलमान अस्वस्थ आहेत”. ते काय चुकीचे बोलले? अतिरेकी पाकिस्तानी असतील, पण त्यांना मदत करणारे लोक इथलेच असणार ना? या ‘गोदी अँकर्स’ना, अस्वस्थ लोकांचा उद्रेक होऊन आतंकवाद जन्म घेऊ शकतो, ही थिअरीच मान्य नाही!
.................................................................................................................................................................
हा लेख तुम्ही या व्हिडिओ लिंकवर पाहू-ऐकू शकता
.................................................................................................................................................................
आतंकवाद हा आर्थिक, राजकीय किंवा इतर सामाजिक कारणांमुळे तयार होऊच शकत नाही, तो फक्त इस्लाममधूनच तयार होतो, असं या लोकांचं मत आहे, असं दिसतं. ठीक आहे, ‘गोदी-विद्वान’ म्हणत आहेत, म्हणजे असू शकेल तसं! पण हेच मत सगळ्या जगाचं असायला पाहिजे, हा आग्रह का? मग लगेच वड्रा, काँग्रेस आणि सगळे विरोधी पक्ष ‘पाकिस्तानपरस्त’ आहेत, ही सगळी इकोसिस्टीमच जॉर्ज सोरोसप्रणीत आहे, ही सगळी सिस्टीम ‘डिस्ट्रॉय’ केली गेली पाहिजे, ‘गांधी फॅमिली’ला देशाच्या राजकारणात कुठलीही जागा दिली गेली नाही पाहिजे, अशा सगळ्या लोकांना देशातून हाकलून दिलं पाहिजे, असा आरडाओरडा सुरू झाला!
“मला एक स्ट्रॉन्ग इकोसिस्टीम देशात आलेली पाहिजे आहे”, असं हे विद्वान अँकर म्हणाले. म्हणजे काय करायचं? भाजपच्या सगळ्या विरोधकांच्या कपाळावर ‘हे लोक ‘पाकिस्तानपरस्त’ आहेत’ असं लेबल लावून देशातून हाकलून द्यायचं का? भारतामधले सगळे मुसलमान आनंदात आहेत, असं या गोदी-विद्वानांचं म्हणणं आहे? का रॉबर्ट वड्रा खोटं बोलत आहेत, असं यांना म्हणायचं आहे? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या कुठल्या कलमाप्रमाणे आपण हे करायचं? का आपण आपली घटना धाब्यावर बसवून या लोकांना हाकलून द्यायचं? का घटना बदलून हाकलून द्यायचं?
गोदी मीडियाने गेल्या काही दिवसांत मुसलमान समाजाविरुद्ध जो गदारोळ उठवून दिला आहे, तो अभूतपूर्व आहे. या जगातला प्रत्येक मुसलमान हा ‘पोटेन्शियली’ अतिरेकीच असतो, हा संदेश प्रत्येक क्षणी दिला जात आहे.
या पार्श्वभूमीवर एक गोष्ट आपल्याला आज लक्षात घ्यायची आहे. या पहलगाम आणि पुलवामा हल्ल्याचा संदर्भ जोडणाऱ्या व्हिडिओला यूट्यूबवर दहा लाख व्हूज आहेत आणि या आरडाओरडा करणाऱ्या अँकरच्या चर्चेला अठ्ठेचाळीस हजार! आपण यातून काही निष्कर्ष काढायला नको. तो कधीतरी आपोआप बाहेर येणार आहे, तेव्हा आपण या विषयाची पुन्हा चर्चा करू.
जी गोष्ट पत्रकारांची, तीच गोष्ट सोशल मीडियाची. तिथं मुसलमानविरोधी मेसेजेसचा पाऊस पाडला जात आहे : एक हिंदू म्हणून तुम्ही कसे घेरले जात आहात. कुठल्याही क्षणी तुम्ही कसे मारले जाऊ शकत आहात. भारत कसा घेरला जात आहे. सामान्य लोकांना घाबरवून टाकणारे मेसेजेस.
गंमत म्हणजे हे लोक २०१४पूर्वी हेच मेसेजेस पाठवत होते : ‘आम्हाला निवडून द्या, आम्ही तुम्हाला सुरक्षित करतो!’, ‘मोदींसारखा स्ट्रॉन्ग नेता पाहिजे. तो तुमची ही सर्व असुरक्षितता घालवून टाकेल’, ‘मोदी हैं तो मुमकिन हैं ’, ‘मोदीजींना पाकिस्तान घाबरतो’, ‘मोदीजी आले की एकसुद्धा हल्ला होणार नाही’.
काय झालं? उरी झालं, पठाणकोट झालं, पुलवामा झालं, पहलगाम झालं. तरी आता पुन्हा तेच नॅरेटिव्ह! देश फार असुरक्षित झाला आहे, हा सुरक्षित व्हायला पाहिजे असेल, तर मोदीजींना पर्याय नाही!
काल एक मेसेज आला. यात वक्ता म्हणत होता की, पंतप्रधान राष्ट्रासाठी पित्यासारखा असतो. या पित्याला आम्ही विनंती करत आहोत की, या गोष्टीचा प्रचंड बदला घेतला जावा!
आता मोदीजी पंतप्रधान झाल्यावर पंतप्रधान एकदम पित्यासारखा झाला का? मनमोहनसिंग आणि इतर लोक होते, तेव्हा पंतप्रधानावर टीका केलेली चालत होती. विरोधी पक्षाचे पंतप्रधान असतील, तर ते फक्त ‘सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणून निवडले गेलेले असतात, म्हणून पंतप्रधान झालेले असतात का? त्यामुळे त्यांच्यावर टीका केलेली चालते का? आणि मोदीजींच्या काळात काही झालं, तर त्यांना कुठलाही प्रश्न कुणीही विचारायचा नाही. कारण मोदीजी म्हणजे राष्ट्राचे पिता!
तसं बघायला गेलं, तर किती टीका केली आहे मोदीजींनी मनमोहनसिंग यांच्यावर! ‘मौनमोहनसिंग’ काय, रेनकोट घालून आंघोळ करणारा पंतप्रधान काय, किती गोष्टी सांगायच्या? त्यांना म्हणे परिस्थिती हाताळता आली नाही!
आता काय? उरी झालं, पठाणकोट झालं, पुलवामा झालं, पहलगाम झालं! या शिवाय कारगिल दुर्लक्ष, संसदेवर हल्ला आणि कंदाहार हायजॅक, हे सगळं कुठला पक्ष सत्तेवर असताना झालं?
भाजपच्या काळात जेव्हा जेव्हा घटना घडल्या, त्या त्या प्रत्येक वेळी जनता पंतप्रधानांकडे हा प्रश्न एकदाचा संपवा, अशी विनंती घेऊन गेली होतीच ना? मग पुढे काय झालं? का काँग्रेसच्या काळात काही झालं, तर पंतप्रधान जबाबदार आणि भाजपच्या काळात काही झालं, तर मुसलमान जबाबदार, असं काही आहे का ?
हल्ले दोन्ही पक्ष सत्तेत असताना झालेले आहेत हे जनतेला दिसत आहे. याचा अर्थ हा प्रश्न खूप कॉम्प्लिकेटेड आहे, तो सहजासहजी सुटणारा नाही, असा होत नाही का? या परिस्थितीमध्ये भारताची आतापर्यंतची सगळीच सरकारं मनापासून काम करत होती, अशी भूमिका घेतली तर चालणार नाही का? या परिस्थितीत सगळ्यांनीच एकमेकांबद्दल आदरानं बोललं, तर चालणार नाही का ?
हल्ल्यावर प्रतिक्रिया म्हणून पंतप्रधानांनी पाकिस्तानबरोबरची ‘इंडस वॉटर ट्रीटी’ रद्द केली. फार मोठं पाऊल उचललं. इतकी युद्धं झाली, तरी भारतानं ही गोष्ट करण्यापासून स्वतःला आजवर रोखलं होतं. पण आता परिस्थितीच अशी झाली आहे की, पंतप्रधानांना हे पाऊल उचलावंसं वाटलं! पण मग लगेच सोशल मीडियाच्या अंगात आलं. उजवे नाचू लागले. आता पाकिस्तान ‘पाणी पाणी’ करून मरणार! पाकिस्तानची सगळी शेती खलास होणार! पाकिस्तान आता सरळ होणार! इतकं सारं सोपं होतं, तर मोदीजींनी आधीच का नाही केलं?
जी गोष्ट उजव्यांची, तीच डाव्या लोकांची. सिंधूनदी पाणी करार रद्द झाला की, लगेच यांचे मेसेजेस! ‘याने काय होणार आहे? ‘सिंधू रिव्हर सिस्टीम’मधल्या सगळ्या नद्यांवर धरणं वगैरे बांधून पाकिस्तानचं पाणी बंद करायला किमान तीस वर्षं लागतील!
लगेच थैमान! पाकिस्तानचं दहा टक्के पाणी जरी कमी झालं, तरी पाकिस्तानच्या निदान काही भागात तरी गोंधळ नाही का उडणार? काहीच परिणाम होणार नसता, तर हा करार रद्द केल्यावर, हे आमच्याशी युद्ध सुरू करण्यासारखंच आहे, असं पाकिस्तान का म्हणत आहे? पण कसलाही विचार न करता मेसेजेस फॉरवर्ड करत राहायचं!
आपण एका ‘न्युक्लिअर कंट्री’\अण्वस्त्रसज्ज देशाबद्दल बोलत आहोत, याचं जरासंही भान नाही. पाकिस्तान आज क्षीण झाला असला, तरी तो चीनच्या मांडीवर बसून आपल्याला त्रास देतो आहे. पंतप्रधान आणि त्यांच्या टीमला काम करू द्या! प्रत्येक निर्णय जोखमीचा आहे. पाकिस्तान आणि चीनकडे एकत्रितपणे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रं आहेत. पण नाही, आम्ही बोलणार!
जी गोष्ट पत्रकारांची, सोशल मीडियाची; तीच गोष्ट विरोधक आणि सरकारचीसुद्धा.
सत्ताधारी आणि विरोधक यांची या परिस्थितीवर एकत्र बैठक झाली. देशावर संकट आलं की, पंतप्रधानांच्या मागे सगळे पक्ष उभे राहतात. लोकशाही जगामधली ही एक परंपरा आहे. या संकटाच्या काळात आम्ही एक आहोत, हे शत्रूला आणि जगाला कळावं म्हणून अशी बैठक घेतली जाते.
नेमक्या याच बैठकीला पंतप्रधान आले नाहीत. ही बैठक म्हणे गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
ही बैठक करून बाहेर आल्या आल्या सगळ्या विरोधी पक्षांनी स्टेटमेन्टस दिली की - पाकिस्तानला जे काही प्रत्युत्तर द्यायचे आहे, त्यासाठी आम्ही पंतप्रधानांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत. चांगली गोष्ट झाली. पण, पुढच्याच काही तासांत विरोधी पक्षांचं पुढचं स्टेटमेंट आलं. काश्मीरच्या सुरक्षेबद्दल मोठी चूक आमच्याकडून झाली, अशी कबुली सरकारने या बैठकीत आमच्या समोर दिली! - अहो, तुम्ही या अवघड परिस्थितीमध्ये पंतप्रधानांच्या मागे उभे आहात ना, मग लगेच हे काय सुरू केलंत?
हे झाल्यावर सरकारी पक्ष लगेच म्हणणार की, हे लोक काय पंतप्रधानांच्या मागे उभे राहणार, यांना राजकारणाच्या पलीकडचं काही दिसत नाही.
मग या बैठकीत पंतप्रधान गैरहजर का राहिले? सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाली, अशी कबुली पंतप्रधानांनी दिली, असं म्हणायची संधी विरोधकांना मिळू नये म्हणून का?
टीका नको म्हणून मोदीजी एकात्मता अधोरेखित करण्याच्या बैठकीपासून दूर राहिले. अहो, तुम्हीच पुढे उभे राहिला नाहीत, तर विरोधकांनी तुमच्या मागे कसं उभं राहायचं? आपण सगळ्यांनी एकत्र उभं राहाण्याची गरज देशाला नक्की आहे ना?
यानंतर काँग्रेसवाले लगेच प्रसिद्धीच्या मागे लागले - एवढ्या महत्त्वाच्या बैठकीला मोदीजी आले नाहीत.
एकमेकांवर ‘गोल्स’ चढवत राहायचे नुसते!
नंतर मग मोदीजींनी पाकिस्तानला कडक प्रत्युत्तर देण्याची घोषणा केली.
पंतप्रधान म्हणाले की, या आतंकवादी लोकांना कल्पनासुद्धा करता येणार नाही, एवढं मोठं प्रत्युत्तर आम्ही देऊ!
झालं! लगेच या अशा वातावरणात यूट्यूब मीडिया म्हणायला लागला की, ही घोषणा बिहारमध्ये जाऊन का केली? तिथं निवडणुका येऊ घातल्या आहेत, म्हणून का? ही घोषणा पंतप्रधानांनी काश्मीरमध्ये जाऊन का केली नाही? भाजपला राजकारणाशिवाय काही दिसत नाही. सगळे एका सुरात बोलू लागले!
मग या लोकांना मोदीजी नीतीशकुमार यांचं हसून अभिवादन करत आहेत, असं छायाचित्र सापडलं!
लगेच शहीद झालेल्या लोकांना विसरून पंतप्रधान कसे हास्यविनोद करत आहेत बघा! पाकिस्तानला गंभीर इशारा देण्याच्या आधी पाच मिनिटं पंतप्रधान कसे हास्यविनोद करतायत बघा! ज्या व्यासपीठावरून गंभीर इशारा त्याच व्यासपीठावर हास्यविनोद!
म्हणजे काय मोदीजींनी नीतीशकुमार यांचं अभिवादन करायचं नव्हतं का? नीतीशकुमार यांनी हसून मोदीजींचा हात हातात घेतल्यावर मोदीजींनी प्रत्युत्तर म्हणून हसायचं नव्हतं का? मोदीजींनी गंभीर चेहरा ठेवून अभिवादन केलं, तर तिकडूनही बोलायला तयार! मोदीजीने नीतीशजी का सम्मान नहीं किया! भावना दाखवल्या तरी प्रॉब्लेम करायचा, नाही दाखवल्या तरी प्रॉब्लेम!
अर्थात यात भाजप अजिबात मागे नाही. पुलवामाच्या शहिदांना अभिवादन करायला राहुल गांधी आले होते, तेव्हा त्यांनी फक्त एक सेकंदभर आपला फोन उघडून बघितला. झाले! भाजपने ते छायाचित्र देशभर व्हायरल केलं! बघा या माणसाला शहिदांबद्दल काही भावना नाहीत! आता या वेळी मोदीजींचं छायाचित्र ‘व्हायरल’ केलं गेलं. सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून सगळ्याचा सूड घेत राहायचा!
पण या वेळच्या ‘सोशल मीडिया वॉर’मधली सगळ्यात मोठी घटना म्हणजे मोदीजींचं २०१३ सालचं एक भाषण विरोधी पक्षांकडून व्हायरल केलं गेलं. लोकांनी अगदी चवीनं ऐकलं ते! तेव्हा तुम्ही तसं केलंत ना, घ्या आता, अशी भावना!
.................................................................................................................................................................
मोदीजींचे भाषण
पण या वेळच्या सोशल मीडिया वॉर मधली सगळ्यात मोठी घटना म्हणजे मोदीजींचे २०१३ सालचे एक भाषण विरोधी पक्षांकडून व्हायरल केले गेले. लोकांनी अगदी चवीनं ऐकलं ते भाषण! तेव्हा तुम्ही तसं केलंत ना, घ्या आता, अशी भावना! या भाषणात मोदी २०१३ सालच्या सभेत कॉंग्रेसला प्रश्न विचारत आहेत -
“सारी सीमाएं आपकी हाथ में हैं, कोस्टल गार्ड आपके हाथ में हैं, बॉर्डर सिक्युरिटी आपके हाथ में हैं, सेना आपके हाथ में हैं, नेव्ही आपके हाथ में हैं तो विदेशी घुसपैठिए घुस के कैसे आ सकते हैं? सारा कम्युनिकेशन भारत सरकार के हाथ में हैं, कोई भी टेलिफोन करता हैं, ईमेल करता हैं तो भारत सरकार उसको इन्टरसेप्ट कर सकती हैं, सरकार जानकारी हासिल कर सकती थेहैं की आतंकवादी क्या कम्युनिकेशन कर रहैं हैं. आप उसको रोक सकते हो. मैं पूछना चाहता हूँ प्रधानमंत्रीजी को की इस संबंधमें आपने क्या किया हैं?”
आता मोदीजींचेच भाषण व्हायरल करून कॉंग्रेसवाले मोदीजींना हेच प्रश्न विचारायला लागले आहेत.
(हे भाषण आपण वर लिंक दिलेल्या व्हिडिओमध्ये ऐकू शकता.)
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
देशाच्या रक्षणाचे मुद्दे अतिशय कॉम्प्लिकेटेड असतात. जे सरकार प्रश्न हाताळत आहे, त्याला थोडी ‘स्पेस’ द्यायची असते. अशा वेळी थोडा काळ टीका रोखून धरायची असते. कुणीही कसलाही संयम पाळायला तयार नाही. कुणालाच काहीही पडलेलं नाही. कुणीच कुणाला सोडायला तयार नाही. हिंदीमधली जी म्हण यू-ट्यूबवर वापरली जात आहे, ती अगदी खरी आहे : ‘आपदा में अवसर ढूंढना’!
हा असा सगळा माहौल आहे. यावर आपापल्या नेत्याच्या आणि पक्षाच्या मागे उभं राहून दुसऱ्या बाजूवर आगपाखड करणाऱ्या सगळ्यांनी विचार करायचा आहे. या सगळ्यात आपलं कोण आहे? आपलं खरंच कुणी आहे का? आपलं कुणी असतं का? कुठला पक्ष आपला असतो? सगळेच राजकारणी आपापल्या राजकीय स्वार्थामध्ये मशगूल असतात. त्यांच्या ‘सर्व्हायव्हल’चा प्रश्न त्यांना भेडसावत असतो. अशा परिस्थितीमध्ये कोण कुणाचा कसा असू शकेल?
आपापल्या नेत्यांवर भाळलेल्या लोकांना अजून एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर स्वतःलाच द्यायचं आहे. भारताची राज्यघटना आपली की, हे सगळे नेते आपले? राज्यघटना आणि नेते, यांत जास्त ‘रिलायबल’ कोण असू शकतं? लोकशाही आपली की, हे नेते आपले? राज्यघटना आणि हे नेते यात शेवटी आपलं रक्षण कोण करणार?
नेते येत-जात असतात, घटना कायम असते. घटनेमधल्या तत्त्वांचं नुकसान झालं, तर त्यांची परत एकदा प्रतिष्ठापना करण्यासाठी पन्नास-पन्नास वर्षं झगडावं लागतं आपल्यासारख्या सामान्य लोकांना!
तुम्ही विचार करा! यू बी द थर्ड अंपायर!!
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment