अभिव्यक्तीस्वातंत्र्याची जाण आणि तिचे महत्त्व जाणणाऱ्या एका कलाकाराच्या आठवणींचा ठेवा म्हणजे अमोल पालेकर यांचे ‘ऐवज : एक स्मृतिबंध’ हे पुस्तक. ‘ऐवज’ म्हणजे किमती जिन्नस, जो नेहमी जपून ठेवला जातो. हे पुस्तकही त्याच्या नावाप्रमाणेच बहुमोल ठेवा आहे. यात लेखकाने त्याच्या लहानपणीच्या आठवणींपासून नाटक-चित्रपट कारकिर्दीपर्यंतचे अनुभव सांगितले आहेत… तेही ‘जसे घडले तसे’ या स्वरूपात, मात्र ते कालानुक्रमे नाहीत. जे आठवले ते सांगितले, या प्रकारे कथन केले आहेत. त्यामुळे ते झोक्याप्रमाणे कधी मागे, तर कधी पुढे गेले आहेत, परंतु त्यामुळे रसभंग होत नाही, कारण ते त्या त्या विषयाशी संबंधितच आहेत.
स्वतःच्या बालपणाविषयी मात्र लेखकाने फारच थोडे लिहिले आहे. अर्थात त्याला प्रामुख्याने आपल्या कलाजीवनातील स्मृती सांगायच्या आहेत. त्यामुळे त्या संदर्भात जेवढे अगदी आवश्यक तेवढेच त्याने सांगितले आहे. म्हणजे चित्रकलेबाबत कथन करताना लेखकाने शाळेतील प्रसंग, तसेच नाटक-अभिनयाबद्दल लिहिताना शाळा-कॉलेजातील त्याबाबतचे अनुभव तेवढे सांगितले आहेत. त्यामुळे हा कलावंत कसा घडत गेला, याचीही माहिती आपल्याला मिळते.
नाटक-चित्रपटसृष्टीबाबत आपण अनेक गोष्टी ऐकत असतो. सध्या तर असा मजकूर नियतकालिकांचा आणि दैनिकांचा अपरिहार्य भाग बनला आहे. बऱ्याचदा त्या केवळ अफवा असतात किंवा निव्वळ गॉसिप्स. त्यावरून आपण अनेक कल्पना करतो, मात्र या पुस्तकात लेखक जे सांगतो, ते अंतर्मनातले आणि अनेकदा ते त्याच्या अनुभवाचे बोल असल्याने, अगदी सच्चे आहेत. त्यामुळे काही लोकांबाबतच्या आपल्या समजुतींना धक्का पोहोचतो, भ्रमनिरास होतो, तर काहींबाबत आदर वाटतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
या पुस्तकाचे एकूण पाच भाग वा प्रकरणे आहेत. त्यांची नावे, ‘डबल रोलची गोची’, ‘चक्रव्यूहात... अपघातांच्या’; ‘कवडसे... अंतर्मनातले’; ‘दालीच्या विस्तीर्ण पठारावर...’ आणि ‘ ‘अल्ट्रामरीन ब्लू’ थेंबापाशी’, अशी आहेत. त्याशिवाय सुरुवातीला ‘फेकलेल्या थोटकांच्या अस्ताव्यस्त पसाऱ्यातून...’ हे मनोगतही आहे.
पुस्तकातील क्यू.आर. कोड म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच आहे. ते कसे वापरावे, याची माहितीदेखील कोडशेजारीच दिली आहे. त्याआधीची अर्पणपत्रिकाही लक्षणीय आहे, कारण ती ‘विरोध करण्यावर ज्यांचा विश्वास आहे, त्या सगळ्यांना...’ अशी आहे.
स्वतःच्या आयुष्यातील घटनांबाबत लिहिणे, हा नकोसा प्रयास असल्यासारखे लेखकाला वाटते. कारण त्या आठवणींची गोणी सतत मोठी मोठी होत जात असल्याचे त्याला जाणवते. याला त्याने यीस्ट घालून मुरलेल्या, आकारहीनपणे वाढत जाणाऱ्या मैद्याची रास्त उपमा दिली आहे. फुसक्या फुटकळ वाटणाऱ्या तपशिलांनाही महत्त्व आहे, असे त्याचे मत आहे.
अशा अनेक गोष्टी त्याला आठवतात, परंतु पुस्तकाच्या मर्यादेत त्यांना स्थान नसणार, हे त्याला माहीत आहे. मुद्दाम गाडलेल्या किंवा विस्मरणात गेलेल्या घटनादेखील या गोणीत भरता येतील, असे तो म्हणतो. पण त्यामुळे त्याला येणारी अस्वस्थता तो सांगतो, कारण तरीही गोणीबाहेर पसरलेला भवताल उरतोच.
सिगरेटच्या व्यसनामुळे आपण असंख्य लोकांना ‘पॅसिव्ह स्मोकर’ केल्याची खंत त्याला आहे. त्यामुळे तो अस्वस्थ होतो. मुलीच्या सांगण्यावरून सिगरेट सोडली. त्यानंतर तीन दशके कधी सिगरेटची आठवण झाली नाही, हे सारे त्याला आठवते आणि ते कसे सादर करायचे, स्नोमॅनसारख्या ओबडधोबड रूपात की, कॅनव्हासवर थापलेल्या तैल रंगाच्या थरांप्रमाणे, असा प्रश्न त्याला पडतो. त्याचप्रमाणे सांस्कृतिक-सामाजिक संदर्भ टाळून कसे चालेल? आणि अत्यंत समाधानाचे क्षणही कथन करायचे, तर त्या आठवणींची प्रचंड उतरंड बनेल, असे तो म्हणतो.
टाळता न आलेले अमाप निर्णायक क्षण भरले, तर त्यांच्या बोचऱ्या टोकांनी गोणीच फुटणार आणि कोंबलेले सर्व तपशील हळुवार संथ गतीने बाहेर पडतील, इकडेतिकडे पसरतील, तो क्षण पकडायला हवा. परंतु त्रयस्थपणे हे सारे लिहायला जमेल का, हे सारे असंगत (अॅब्सर्ड), मोकाट असेल का, अशी शंकाही त्याला येते, पण अखेर सारे सांगून वाचकांना तो आता सुखेनैव वाचा, असा शेवट करतो.
एका कार्यक्रमात कलावंतांच्या स्वातंत्र्यावर फतवे निघू लागल्याचे भाषणात सांगायला सुरुवात करतानाच त्याला थांबवले जाते, आणि उपस्थित अनेक कलाकारांपैकी एकही या बंधनाचा निषेध करत नाही, याचे त्याला वाईट वाटते. तो सांगतो की, राजाचे भाट त्याला खूश करण्यासाठी क्रौर्याचा वापर करतात आणि ते जबरदस्त विखारी असते, याचा अनुभव त्याला गेल्या दहा वर्षांत अनेकदा आलाय.
मानवी स्वातंत्र्यावर गदा आणण्यासाठी हिंदूंमध्ये मुस्लिमांच्या विरोधात पद्धतशीरपणे द्वेष पसरवला जात आहे, इतिहासाची घडणच बदलली जात आहे, यावर एक सच्चा, देशप्रेमी भारतीय म्हणून वैयक्तिक पातळीवर काही करता येत नाही, म्हणून तो घुसमटलेला आहे. त्याला प्रश्न पडतो की, सरकारी मनमानीला विरोध करायची संधी मिळाली असता, तिचा वापर केल्याने औचित्यभंग कसा होतो? पुढे तो म्हणतो तसे केले नसते, तर स्वतःच्याच मनातून तो उतरला असता.
गुरुस्थानी असणाऱ्या सत्यदेव दुबेला नाटकाच्या तालमीतील नटावर ओरडल्याने तो सरळ बाहेर जाण्यास सांगतो. कारण तालमीच्या वेळी यायचे नाही, हे त्याचे सांगणे दुबेने मान्य केलेले असते. त्यामुळे गोविंद निहलानीही लेखकाची बाजू घेऊन दुबेला बाहेर नेतो.
बादल सरकार त्याला संहितेत बदल करण्याला मान्यता देतात, पण त्याच वेळी म्हणतात की, ‘दिग्दर्शक म्हणून करायचे ते तू कर, पण मला ते आवडले नाही, तर ‘माझ्या नाटकाचा तू खून केलास’, असे मत जाहीरपणे व्यक्त करायचा अधिकार मात्र मी माझ्याकडे ठेवीन.’ पण त्याबरोबरच सव्वादोन तासाचे नाटक केवळ नव्वद मिनिटांत बसवल्याबाबत त्याचे कौतुकही करतात.
दुबेने नाटकाची ओळख करून दिली, चालायला शिकवले आणि भरारी घेण्याचे बळ दिले, बादल सरकार यांनी अपरिचित क्षितिजे धुंडाळण्याची दृष्टी दिल्याचे ऋण मान्य करतो. ‘पार्टी’ या नाटकात बदल केल्याने एलकुंचवार म्हणतात की, ‘असे बदल करायचे तर दिग्दर्शकाने स्वतःच नाटक लिहावे’. त्यावर लेखक त्यांना म्हणतो की, ‘कंसातल्या रंगसूचनेप्रमाणे नाटक बसवावे, असे अपेक्षित असेल, तर लेखकाने स्वतःच ते दिग्दर्शित करावे.’
‘ ‘पार्टी’ हे नाटक फिल्मी तर त्यावरील निहलानीचा चित्रपट नाटकी आहे’, असे एलकुंचवार सांगतात. तेव्हा त्यांना ‘नाटकी वा नाट्यमय म्हणजे काय आणि फिल्मी म्हणजे काय, या संकल्पनांना समजून घेण्याची ही चांगली संधी आहे’, असे लेखक त्यांना म्हणतो.
प्रवाहाविरुद्ध जात राहण्याची, वेगळे असणे-बोलणे याची किंमत मोजावी लागते, हे त्याचे अनुभवाचे बोल आहेत. ठरावीक वर्तुळाबाहेर राहावे लागते, असे सांगून तो पुढे म्हणतो की, समाजाकडून होणारा विरोध कित्येक वेळा टोकाचा असतो, तेव्हा पोलीस अथवा कायद्याची मदत घ्यावी लागते. यासाठी तो ‘गिधाडे’, ‘अवध्य’, ‘वासनाकांड’, ‘सखाराम बाइंडर’, ‘घाशीराम कोतवाल’ इ. नाटके आणि ‘थांग’ हा चित्रपट या संदर्भात सेन्सॉरशिपशी दिलेले लढे त्याने जवळून पाहिले आहेत. म्हणून त्याला वाटते की, खरे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याकरता, व्यवस्थेच्या अन्याय्य नियमांविरुद्ध आवाज उठवण्याची जबाबदारी कलावंतांएवढीच नाट्यप्रेमींचीही आहे, पण तसे होत नाही, याचे त्याला वाईट वाटते. कुणाला न पटणारा विचार, न रुचणारी भाषा आणि न भावणारा आविष्कार इ. गोष्टींना विरोध करण्यासाठी मुस्कुटदाबी वा बंदी हे थेट जुलूमशाहीचे हत्यार असते.
प्रगल्भ लोकशाहीच्या गाभ्याला झुंडशाहीच्या हातांनी नख लावणारे कृत्य असते, असे लेखक म्हणतो. या संस्कारी प्रवृत्तीला अलीकडे राजकीय पाठिंबा मिळत असल्याची नोंदही तो करतो. नाट्य-चित्रपटप्रेमी पुरोगामी रसिक याच्या विरोधात उभे राहत नाहीत, तोवर कलावंतांना माघारच घ्यावी लागते, असे सांगून तो त्याची उदाहरणेही देतो.
प्रख्यात लेखिका नयनतारा सहगल यांना साहित्य संमेलनाच्या उदघाटक म्हणून दिलेले निमंत्रण आयोजकांनी मागे घेतले होते. खरे तर यामुळे सरकारविरोधी लेखन करणाऱ्या व्यक्तीचे विचार ऐकून घेण्याऐवजी झुंडशाहीला पाठबळ दिले गेले. त्यामुळे मराठी सारस्वतांची आणि पुरोगामी चळवळीचीही मानहानी झाली. त्यामुळे विरोध प्रदर्शित करण्याकरता ‘चला, एकत्र येऊ या’, असे आवाहन केले गेले. त्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील अनेक नामवंत हजर होते. महाराष्ट्राच्या वतीने सहगलबाईंची माफी मागण्यात आली. अशी माणसे अवतीभवती असणे, सुदृढ लोकशाहीकरता अत्यंत आवश्यक आहे, या विश्वासाने आयोजिलेला तो कार्यक्रम महत्त्वाचा ठरला, याची नोंदही लेखक करतो.
काही ‘बोलक्या बाहुल्यां’च्या आधारे चित्रपट-नाटक माध्यमांमध्ये बंदी असलेल्या शब्दांची यादी अधिकृतपणे प्रसिद्ध केली गेली, त्यालाही पालेकरने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. तो दावा अजूनही चालू आहे. कलेच्या तीन क्षेत्रांत अर्धशतकभर भरघोस काम करूनही पालेकरला सरकारी पुरस्कार मिळत नाही, यातच बंडखोर पालेकर यशस्वी झाला आहे, असे सांगून देशोदेशीच्या अशा बंडखोरीची उदाहरणेही देतो.
‘दायरा’ला मिळालेले लंडनच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यश मिळूनही, भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘इंडियन पॅनोरमा’ या मानाच्या विभागासाठी त्याची निवड झाली नाही. कारण ‘गाणी असलेल्या चित्रपटाला समांतर कसं म्हणता येईल,’ असे निवड समितीच्या सदस्यांचे म्हणणे. त्याच कारणाने गुलजारसाहेबांचा ‘माचिस’ही नाकारला गेला होता. अशा नाकारले गेलेल्या चार-पाच चित्रपटांचा समांतर महोत्सवही त्रिवेंद्रमच्या (तिरुअनंतपुरम) महोत्सवातच केला गेला. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला.
‘दायरा’ला राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये स्पेशल ज्यूरी पुरस्कार मिळाल्याचे लेखक सांगतो. नंतर काँग्रेस आणि शिवसेनेने देऊ केलेले विधानसभा निवडणुकीचे तिकिटही नाकारतो. पुण्यातील पर्यावरण रक्षणासाठी ‘हिरवाई ट्रस्ट’ने स्वखर्चाने केलेले काम, बिल्डर्स आणि राजकारणी यांच्यामुळे या प्रकल्पाची कालांतराने लागलेली वाट, हेही कथन करतो.
दुसऱ्या प्रकरणात आपण नास्तिक कसे बनलो, याचे वर्णन लेखक करतो. सर्वपित्रीलाच ‘अनाहत’ प्रदर्शित केला, तरी तो पन्नास आठवडे चालला, भरपूर आर्थिक यश मिळाले, तेव्हा मित्र-मैत्रिणी म्हणाले, ‘म्हणजे तुम्हाला अमावास्या लाभते तर!’ पितृपक्षातच मोठे ऑपरेशनही झाले, म्हणून लेखक म्हणतो- ‘पितृपक्षच आम्हाला मानवतो’. जे. जे.स्कूल ऑफ आर्टमधील आठवणींबरोबर ग्लॅडस्टन सॉलोमन अॅवार्ड मिळाल्याचे सांगतो. चित्रकार आरांची भेट, बँकेतील नोकरी, त्याचे पहिले प्रदर्शन, त्यासाठी मिळालेली वेगळीच सवलत इ. हा त्याला पहिला अपघात वाटतो.
चित्रा मुर्डेश्वरची भेट, दोघांनी ‘फिल्म फोरम’च्या संध्याकाळच्या खेळांना लावलेली हजेरी, सत्यदेव दुबेने नाटकासाठी केलेली निवड, हा दुसरा अपघात, असे तो म्हणतो. यामुळे अभिनेता बिरुद लावण्याची मुळालेली संधी यामुळे हरखतो, मोजक्या प्रेक्षकांसमोर केलेला ‘सुनो जनमेजय’चा प्रयोग, त्याआधी दुबेचे ‘आज एक्स्ट्रा इंटेन्सिटी से परफॉर्म करोगे’ असे बजावणे. त्याचे ते शब्द आयुष्याच्या शिदोरीचा भाग बनून राहतील, याची तेव्हा जाणीव नव्हती, हे मान्य करतो.
अ.भा. नाट्य संमेलनात प्रमुख पाहुणा म्हणून कृतज्ञतापूर्वक दुबेला श्रद्धांजली वाहतो. शंभू मित्रांची शिकवण सांगतो, अमजदने दिलेली दाद, चाकोरीबाहेरचा चित्रपट बनवण्यासाठी स्वतःच निर्माता बनण्याचा निर्णय, खलनायक उभा करण्याची संधी, संध्या गोखलेशी गाठ, आणि तिनेच हे सारे लिहायला उद्युक्त केले, हेही सांगतो. प्रकरणाच्या शेवटी अरुण कोलटकरची ‘तक्ता’ ही कविता दिली आहे.
नंतर येतात ‘कवडसे (लेखकाच्या) अंतर्मनातले...’, गेल्या दशकात गारठून गेलेली न विरघळणारी अस्वस्थता. तिच्यामुळे त्याला आपण अश्मीभूत अवशेष झाल्यासारखं वाटते. विषप्राशन केलेली माणसं धुडगूस घालताहेत. पण साथीच्या विषाणूसारखे पसरणारे ते विष त्याच्यात शिरू शकत नाही. त्याच्याभोवतीचे बर्फाचे कवच अभेद्यच आहे. बर्फाबाहेर येण्याची वेळ आलीय, असे त्याला वाटते. बिल्किस बानूची आठवण त्याला अस्वस्थ करते, कारण आपण काहीच करू शकलो नाही, ही जाणीव. आभासी जगात स्वतःची पारख ज्याची त्यालाच करावी लागते, पण त्यात आपण तोकडे पडतो, असे त्याला वाटते. आभासी दुनियेपासून दूर राहणं त्याला पसंत आहे. विठाबाई नारायणगावकरांचा तमाशा पाहताना तिनं ‘तुमच्या घरी आयाबहिणी नाहीत का?’ असे विचारून टवाळांना कसे फटकारले, ते आठवते. हिंदी गाण्यावर बेताल न होता मनोरंजन करत राहण्याचं तिचं कसब पाहतो. लोककलेला समकालीन रूप देण्याचा प्रयत्न त्याला आवडतो.
मराठी साहित्याच्या आवडीविषयी तो बोलतो. जी.ए.कुलकर्णी आणि चिं.त्र्यं. खानोलकर (आरती प्रभू) यांनी त्याला समृद्ध केलंय. कविता त्याला जास्त आवडतात. खानोलकरांचे प्रत्यक्ष रूप पाहून त्याला वाटते, हाच का तो हळुवार लिहिणारा कवी, पण त्यांचा मानधनासाठी तडजोड करण्याचा पैलू विसरून, तो त्यांच्या कवितांवर प्रेम करत राहतो. ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा’ या एकांकिकेत पुतळ्यासारखे स्तब्ध राहूनही, व्यक्तिमत्त्वात होणारा बदल दाखवणाऱ्या दत्ता भट यांच्या अभिनयाला तोड नव्हती, असे त्याला वाटते.
खानोलकरांच्या निधनानंतर झालेल्या या कार्यक्रमात पालेकर ‘बकरीची दोन पोरे’ ही दीर्घ कविता सादर करतो. प्रचंड दाद मिळते. नंतर त्यांच्याच कवितांच्या पु. लं.बरोबर केलेल्या जाहीर वाचनात सुनीताबाई त्याचा आवर्जून उल्लेख करतात. जी.ए. कुलकर्णी त्याला म्हणतात- ‘प्रवाहाविरुद्ध जाण्याचं धाडस करून ‘आक्रीत’ बनवलात, नायकाची वाटचाल सुरू न ठेवता खलनायक उभा केलात. तुम्ही पुढे पुढे जातच राहाल’. अशा दिलाशामुळे उभारी येई, असे तो सांगतो. बासू चॅटर्जी आणि स्वतःच्या नात्यातला आकृतीबंध सांगता येणार नाही, असे म्हणतो. त्यासाठी अनेक प्रसंगकथन करतो. अनेक वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतरही ते बदलले नाहीत, याचा उल्लेख करतो.
अशोक कुमार त्याच्या अभिनयाबाबत म्हणतात- ‘हा नाट्यक्षेत्रातून आला असूनही त्याच्या अभिनयात नाटकीपणाचा लवलेशही नाही.’ नंतर त्यांची गट्टी जमते. ते त्याच्या चित्रांच्या प्रदर्शनालाही जातात. दादामुनी हा सिनेसृष्टीतील एकमेव कलावंत असे त्याचे मत. बासू चॅटर्जी यांच्या गाजलेल्या त्याच्या चित्रपटांबाबत बोलतो. ‘चिरेबंदी’ या बंगल्यातल्या आठवणी सांगतो. इंडस्ट्रीत सारे जण आपला ‘मामा’ करायला टपले असल्याने, त्यांच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी ‘चिरेबंदी’, हे नाव हा तिरकस विनोद बहुतेकांना समजलाच नाही, याची मजा घेतो.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
याशिवाय हेमंत कुमार, टीना मुनिम यांच्या मैत्रीविषयी लिहिलंय. हृषिकेश मुखर्जींनी ‘तुला भेटायला येऊ का’, असे विचारल्यावर तो स्वतःच त्यांना ‘मीच भेटायला येतो’ म्हणतो. जाताना लेखकाच्या मनात धाकधूक असते, त्याचे कारण म्हणजे ते बड्या कलाकारांनाही जरबेत ठेवतात, ही वदंता, असे लेखक त्यांना सांगतो. त्या वेळी दोघेही हसतात. हृषीदा त्याला घेऊन पाच चित्रपट करायचे आहेत, असे सांगतात आणि हा वादा निभावतात.
खरे तर लिहिण्यासारखे बरेच आहे, पण येथे गोषवाराच देतो. स्वतः वाचकांनीच त्याचा आस्वाद घ्यावा असे वाटते. ‘दालीच्या विस्तीर्ण पठारावर...’ या प्रकरणात नाट्यसृष्टीबाबत सविस्तर सांगितले आहे, त्या सृष्टीतील अनुभवही सांगितले आहेत. नारायण चक्रवर्तींचा आणि विश्राम बेडेकरांचाही किस्सा आहे. अमजद आणि राम नगरकर यांच्याबाबतही सांगितले आहे. ऋत्विक घटक यांच्यावर लिहिले आहे. विविधभाषांतील केलेल्या चित्रपटांबाबतचे अनुभव, व्यावसायिक आणि समांतर चित्रपट यांच्यातील फरक सांगून तो हळूहळू कमी होत आहे, हेही सांगितले आहे.
अखेरच्या ‘अल्ट्रामरीन ब्लू थेंबापाशी...’ या प्रकरणात आत्मपर चिंतन आहे. ‘पोस्ट संध्या एरा’बद्दलही सांगितले आहे. ‘पहेली’, ‘कैरी’, ‘थोडासा रुमानी हो जाय’, त्या निमित्ताने नाना पाटेकरचे वेगळे रूप सांगितले आहे. दामू केंकरे आणि विक्रम गोखले यांच्याबाबतही लिहिले आहे. ‘कुसूर’, ‘थांग’, ‘दायरा’बाबत, तसेच माध्यमांबाबत चुकीची अपेक्षा, ‘थांग –क्वेस्ट’, ‘अँड वन्स अगेन’, ‘ध्यासपर्व’, ‘धूसर’, ‘समांतर’ यांबाबत कथन केले आहे. अखेरीला त्याची एक मनोगत स्वरूपाची कविता आहे. सारेच वाचनीय आणि बरीच माहिती देणारे आहे.
‘ऐवज : एक स्मृतिबंध’ - अमोल पालेकर
मधुश्री पब्लिकेशन, पुणे | पाने - ३१० | मूल्य - ७५० रुपये.
.................................................................................................................................................................
लेखक आ. श्री. केतकर ज्येष्ठ पत्रकार आहेत.
aashriketkar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment