अजूनकाही
‘आता थांबायचं नाय!’ या मराठी चित्रपटाची मला जमेची बाजू वाटते, ती ही की, या चित्रपटात एकच एक विशिष्ट नायक नाही. इथे अनेक जण नायक आहेत. खलनायकही बरेच आहेत. त्या दृष्टीने पाहता ही कुणा एका माणसाच्या विजयाची कथा न राहता ती एका समाजाच्या विजयाची कथा होते. त्यामुळेच अधिक तीव्रतेने भिडते. खूप हसवते आणि बऱ्याच ठिकाणी हसवता हसवता डोळ्यांत पाणीही आणते. हा चित्रपट नुकताच महाराष्ट्र दिनी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे आणि सगळीकडे तुफान गर्दीत चालू आहे, ही त्याहून आनंदाची बाब आहे.
काही वर्षांपूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २३ चतुर्थ श्रेणी कामगारांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली आणि ते सगळे त्यात उत्तीर्ण झाले, या सत्यघटनेवर हा चित्रपट आधारित आहे. उदयकुमार शिरूरकर हे अधिकारी असताना त्यांनी या कामगारांना रात्रशाळेत जायला लावून दहावीची परीक्षा द्यायला लावली. चित्रपट सुरू होतो या सगळ्या कामगारांची कहाणी सांगत. अचानक एके दिवशी फर्मान निघतं रात्रशाळेत जाण्याचं. सुरुवातीला सर्वांचा विरोध होतो. मात्र या सगळ्यांचे शिक्षक माळी सर जिद्द सोडत नाहीत. शिरूरकर माळी सरांना प्रोत्साहन देतात आणि हे सर्व कामगार पास होतात.
हा सगळा प्रेरणादायी प्रवास चित्रपटगृहात भरलेल्या गर्दीतच अनुभवण्यासारखा आहे. अनेक दृश्यांना टाळ्या वाजतात, तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात. काहीतरी खूप मोठं आपणच जिंकल्यासारखं वाटत राहतं, हेच या चित्रपटाचं यश आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
दिग्दर्शक शिवराज वायचळ आपल्याला आजवर एक गुणी अभिनेता म्हणून परिचित आहे. अनेक मालिका आणि चित्रपटांतून त्याचा उत्तम अभिनय प्रेक्षकांनी पाहिलाय. मात्र या पहिल्याच चित्रपटात त्याचं दिग्दर्शकीय कौशल्यही दिसून येतं. इतक्या कलाकारांना सोबत घेऊन काम करणं खचितच सोपं नाही. ते शिवधनुष्य पेलण्यासारखंच आहे. शिवराजने ते लीलया पेललं आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे चित्रपट कुठेही मेलोड्रॅमॅटिक न होता प्रामाणिक आणि निरागस वाटत राहतो. त्यातली नितळ भावना जाणवत राहते. सर्व पात्रांचं साधं जगणं अगदी आतवर रुजत जातं. संदीप यादव यांच्या कॅमेऱ्याने साकारलेली मुंबई सुंदर दिसते. शिवराज वायचळ, ओंकार गोखले आणि अरविंद जगताप यांचं लेखन जमून आल्यामुळे चित्रपटाला चार चांद लागले आहेत. गुलराज सिंग यांचं संगीत कर्णमधुर आहे. विशेषतः ‘सांग सांग भोलानाथ’ आणि ‘आता थांबायचं नाय’ ही दोन गाणी मस्त जमली आहेत.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय हे या चित्रपटाचं आणखी एक बलस्थान. भरत जाधवचा मंचेकरांच्या भूमिकेतला कमबॅक विलक्षण सुंदर आहे. सिद्धार्थ जाधवने साकारलेला मारुती कदम शेवटच्या भाषणाच्या दृश्यात ‘इंग्लिश विंग्लिश’मधल्या शशी गोडबोलेच्या अर्थात श्रीदेवीच्या भाषणाची आठवण करून देतो. ओम भूतकरने साकारलेले माळी सर जीव तोडून मुलांना शिकवणारे सगळेच शिक्षक स्वतःचं प्रतिबिंब ज्यात पाहू शकतील, इतके खरे वाटतात.
विशेषतः सर्वांनी मध्येच शाळेत येणं बंद केल्यावर त्यांच्या डोळ्यांतले सपशेल हरल्याचे भाव पार काळजाचं पाणी करतात. शिरूरकरांची भूमिका आशुतोष गोवारीकरांनी उत्तम केली आहे. प्राजक्ता हनमघर यांनी साकारलेली जयश्री पाहताना हसून हसून पुरेवाट होते. किरण खोजे यांची अप्सराही छान जमून आली आहे. रोहिणी हट्टंगडी, पर्ण पेठे, दीपक शिर्के, श्रीकांत यादव आणि इतर सर्व कलाकारांचा अभिनयही देखणा झाला आहे.
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे झीने या चित्रपटाचं केलेलं उत्तम मार्केटिंग. साधारण दोन महिन्यांपूर्वीच या चित्रपटाची जाहिरात वारंवार झी मराठीवर दिसू लागली होती. प्रदर्शनाची तारीखही महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त पाहून निवडली आहे. याचा चित्रपटाला फायदाच होतो आहे. बरेच चांगले मराठी चित्रपट मार्केटिंगमध्ये कमी पडल्यामुळे तिकीटबारीवर चांगला नफा मिळवू शकत नाहीत. अशा चित्रपटांनी हे उदाहरण लक्षात घ्यायला हरकत नाही. बऱ्याच काळानंतर कुटुंबासोबत बसून चित्रपटगृहात पाहावा, असा एक नितळ, प्रामाणिक चित्रपट आलाय.
..................................................................................................................................................................
लेखक संदेश कुडतरकर मुंबईस्थित कलासमीक्षक आहेत.
msgsandesa@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment