अजूनकाही
नुकताच देवल क्लब कोल्हापूरच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरामध्ये सतीश आळेकर लिखित ‘ठकीशी संवाद’ या नाटकाचा प्रयोग पाहिला. या नाटकाचे संहितावाचन सतीश आळेकरांनी आमच्या ‘प्रत्यय’च्या मित्रपरिवारासमोर केले होते, पण त्या वेळी या संहितेचे वेगळेपण जाणवूनही त्याचे अनेकानेक अर्थ उमजले नव्हते. ‘काहीतरी वेगळं आहे बुवा’ अशा पद्धतीने चर्चा झाली होती, असे आठवते. त्या वेळी हे नाटक तयार होत आहे, बसवले जात आहे, असे आळेकर म्हणाले होते. त्यामुळे आम्हा सर्वांनाच प्रयोग बघायची खूप उत्सुकता होती.
खरे तर आळेकरांनी या नाटकाचे नाव ‘ठकीशी संवाद’ याऐवजी ‘मध्यमवर्गाचे महानिर्वाण’ असे त्यांच्या अगोदरच्या नाटकाच्या धर्तीवर ठेवायला हवे होते. करोनाच्या साथीत एकट्या पडलेल्या एका कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनाचे म्हणजे त्याच्या मनोवस्थांचे, त्याच्या विविध अफलित विकारांचे, चिल्लर इच्छा-आकांक्षांचे, हे रंगमंचीय विश्लेषण म्हणता येईल.
(पण खरे तर हा वर्ग म्हणजे त्यातल्या व्यक्ती कधी एकट्या नसतात? प्रस्थापितांचे सारे रंगढंग आवडणारा, पण काही करण्याचे धाडस अंगी नसलेल्या काठावर बसून टाळ्या पिटण्यात हा वर्ग कायम मग्न!) कोणत्याही कृतीचा न-कर्ता वा युद्धाचा न–नायक असलेल्या ‘धनी’ या कशाचाही धनी नसलेल्या सामान्य माणसाच्या जीवनात त्याची करोनाकाळात साथ करण्यासाठी आलेली आया-कम-नर्स-कम-सर्वसाधारण केअरटेकर अशी ही ठकी.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
खरे तर ‘ठकी’ हे नाव एकेकाळी खेळण्यातल्या लाकडी बाहुलीचे असायचे. ही ठकी कशीही आपटली, फेकली, तरी ते सारे पचवून ती आपली पुन्हा त्रयस्थ! खेळ खेळायला तयार असायचीच. ही नाटकातली ठकी स्मृतींच्या, विचारांच्या खेळात ‘धनी’ची साथ द्यायला तयार आहे, तत्पर आहे.
पण हा कनिष्ठ मध्यमवर्गीय ‘धनी’ नुसता वर्तमानात जगणारा नाही. त्याच्या स्मृतींना भूतकाळाच्या अनेक स्मरणरंजक धाग्यांनी बांधलेले आहे. अगदी वैदिक काळापासून ते ग्रीक रोमन काळापासून ते मोघल, त्यांच्याशी लढलेले शिवाजी महाराज इत्यादी ऐतिहासिक बाबींपर्यंत आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यापासून ते परमपूज्य मोदींच्या मते २०१४ साली मिळालेल्या ‘दुसऱ्या स्वातंत्र्या’नंतरच्या काळापासून ते आजच्या वर्तमानाकाळातल्या राजकीय, सामाजिक, बहुसंख्याकांच्या सांस्कृतिक दहशतवादाशी भिडणाऱ्या अशा सगळ्या स्थित्यंतरांपर्यंत धनींची स्मृती गरगरा भिरभिरते.
नवभांडवली चंगळवाद, त्याला लालचावलेली सुखासीन वृत्ती, काहीही झाले, तरी मला काय त्याचे, हा मूळ स्वभाव आणि त्या साऱ्या इतिहास-भूगोलांना, सांस्कृतिक बदलांना पुरून दशांगुळे उरलेली खुज्या मध्यमवर्गाची ‘दण्णी’ (हा शब्दप्रयोग आळेकरांचाच) निष्क्रियता त्या स्मृतींना एका व्याज- अकादमिक स्वरूपाच्या बेचव, मचूळ आणि निष्फळ उपयोगशून्य प्रयोगात एकत्र गुंफू इच्छिते.
हा धागा आहे करदोट्यांचा. धनी ‘करदोट्यांचा इतिहास’ नावाच्या निरर्थक संशोधनप्रकल्पाच्या धाग्याने स्वत:ला इतिहास भूगोलाशी जोडून घ्यायचा प्रयत्न करताहेत. त्यात सिनेमातली गाणी, भावभीनी दृश्ये येतात, रडकी खोटीखोटी, ‘कित्ती गोड’ भावगीते येतात, चटखोर नाट्यगीते येतात. खोट्या बद्द वाजणाऱ्या नाण्यांसारखी मध्यमवर्गाची मानसिकता त्या साऱ्यातून उटपटांगपणे प्रत्ययाला येत रहाते. आळेकरांनी त्यांच्या तिरकस, उपरोधिक व्याज-गांभीर्याने ओथंबलेल्या शैलीत लिहिलेल्या त्यांच्या इतर नाटकांचीच परंपरा पुढे नेणारे हे नाटक आहे.
पण संहितेतील हे विविध अर्थ आजची कलाकारांची पिढी कसे पाहते? त्यांच्या दृष्टीला हे नाटक, त्यातले विविध व्यंगार्थ कसे दिसतात? तरुण दिग्दर्शक अनुपम बर्वे याने या नाटकाचे सारे व्यंगार्थ ज्या पद्धतीने संहितेत अचूकपणे टिपून बाहेर साकारले आहेत, त्याच्या ‘दृष्टी’ला आणि ‘कर्ते’पणाला खरोखरीच दाद द्यायला हवी. (त्याच्या ‘उच्छाद’ या नाटकाने पूर्वी धुमाकूळ घातला होता!)
या नाटकाचे नेपथ्य (पूर्वा पंडित) खरे तर विलक्षण वेगळे आहे. जवळजवळ अर्धा (की थोडा अधिकच) रंगमंचीय अवकाश अमेझॉनसारख्या विविध कंपन्यांकडून मागवलेल्या वस्तूंच्या विविध आकारांच्या लहान-मोठ्या खोक्यांनी भरलेला आहे. त्यातूनच पात्रांनी कपडे बदलून अवतरण्याची किमया करणारे एन्ट्री नि एक्झिट्सचे मार्ग, पेशंटसाठी वापरायची खुर्ची, वैद्यकीय उपकरणे, विविध गाण्यांची, स्मृतींची व गतकाळाची दृश्यं पडद्यावर प्रेक्षकांसमोर मांडणारी सगळी टेक्नॉलॉजी, या साऱ्यांचा अत्यंत संयमित पण विचक्षण वापर अनुपमने केला आहे.
संगीताचे विविध प्रकार व प्रकाशयोजनांचा सुंदर मेळ घालणे आणि प्रेक्षकांची नाटकातली गुंतवणूक अधिकाधिक भक्कम करणे, हे काम अजिबात सोपे नाही. बऱ्याचदा टेक्नॉलॉजीच्या हौसेपायी संहिता फिसकटते, पण अनुपमने अत्यंत कल्पकपणे या साऱ्यांचा वापर करत नाटकातील अनेक आशयसूत्रे प्रखरपणे बाहेर काढली आहेत. खरे तर त्याच्याच शब्दांत सांगायचे तर हे नाटक ‘इंटिमेट थिएटर’मध्ये अधिक परिणामकारक होते, पण आम्हा कोल्हापूरकरांना ‘प्रोसिनियम थिएटर’मध्येही नाटकाची परिणामकारता काही कमी वाटली नाही.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
सुव्रत जोशी आणि गिरिजा ओक यांचा रंगमंचावरचा वापर अत्यंत प्रभावी आहे. सुव्रत जोशी ‘धनी’च्या भूमिकेतील मध्यमवर्गाचे सारे तिरकसपण, सारी कृतीहीनता उभी करतात. मात्र विशेष कौतुक केले पाहिजे ते गिरिजा ओक या अभिनेत्रीचे. जवळजवळ दर तीन मिनिटांनी तिची भूमिका बदलते, त्या त्या भूमिकेनुसार तिने केलेले देहबोलीमधले बदल, संवादफेकींमधली अचूक टायमिंग साधण्याची कला आणि विविध बोलींच्या शैलींमधले संवाद विलक्षण होते. मेस्मरायझिंग!
धनींची मोलकरीण, त्यांना कंपनी देणारी सखी, त्यांच्या स्मृतींमधून त्यांच्या कनिष्ठ मध्यमवर्गीय स्वभावातली निष्क्रीयतेची वृत्ती बाहेर काढण्याचे कसब असलेली पत्रकार, नर्स आणि अखेरीला अजिबात भावविवश वगैरे न होता मृत धनींची खुर्ची (बहुधा) अंत्यसंस्कारांसाठी निरिच्छपणे, त्रयस्थपणे बाहेर ढकलणारी एक प्रकारे ‘काळदूत’च अशी प्रतिमा असलेली केअरटेकर, पुन्हा पुढच्या करोनाबळीकडे जाण्यास तत्पर असलेली सखीसेविकादि... गिरिजा ओक यांच्या अभिनयातून या भूमिकेचे सारे कंगोरे, सारी गुंतागुंत बाहेर येते.
या साऱ्यांमागे कलाकारांची अभिनयकला आणि दिग्दर्शकाचे कौशल्य यांचा मस्त मेळ जमला आहे. नाटकाची संहिता आळेकरांची असली तरी प्रयोग दिग्दर्शक अनुपमचाच आहे. या दोघांचे मिळून नाटक आहे, असेच म्हटले पाहिजे.
एक सुंदर आणि वेगळा नाट्यानुभव देणाऱ्या या निर्मात्यांचे व या टीमचे अभिनंदन!
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment