अजूनकाही
सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अतिशय तणावपूर्ण टप्प्यावर आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील काही दहशतवादी तळांवर ‘टार्गेटेड स्ट्राइक’ केल्यामुळे राजकीय आणि लष्करी पातळींवर तीव्र हालचाली सुरू आहेत. तथापि, या कारवाईनंतरही भारताने अधिकृतरित्या ‘युद्ध’ घोषित केलेले नाही, पण भारतीय टीव्ही मीडिया मात्र युद्धाचे वातावरण निर्माण करत आहे.
युद्ध म्हणजे केवळ रणभूमीवरची धूळ, स्फोटकांचा गंध, आगीचे लोळ आणि गोळ्यांचा वर्षाव नसतो, तो एक ‘राजकीय’ निर्णय असतो. युद्धामुळे हजारो सैनिकांच्या आयुष्यावर, सीमावर्ती भागातील आणि देशातील सामान्य नागरिकांच्या जगण्यावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम घडतात. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये युद्ध ही घटना माध्यमांच्या, खासकरून टीव्ही माध्यमांच्या हातातलं खेळणी बनत चालली आहे. सध्या भारत-पाकिस्तान दरम्यानची वाढती तणावाची स्थिती आणि त्याबाबतचे भारतीय टीव्ही माध्यमांचे वर्तन, हा अतिशय काळजीचा, चिंतेचा आणि धोकादायक असा विषय झालेला आहे.
युद्ध ही राज्यांनी अधिकृतपणे केलेली सशस्त्र कारवाई असते. ती दोन किंवा अधिक राष्ट्रांमध्ये होते. युद्ध हा आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत एक गंभीर आणि संवेदनशील विषय आहे. त्याची व्याख्या सशस्त्र संघर्ष, उद्दिष्टांवरील सहमतीचा अभाव आणि युद्धसंधी किंवा तहाच्या समाप्तीनंतर सशस्त्र सामंजस्य या तीन निकषांवर केली जाते. युद्धाचे परिणाम केवळ सैनिकी मर्यादेत मर्यादित राहत नाहीत. त्याचा प्रभाव सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय आणि मनोवैज्ञानिक पातळीवरही भयंकर असतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
युद्ध घोषित होण्याची अधिकृत प्रक्रिया
भारत संसदीय लोकशाही असलेले राष्ट्र आहे. अशा देशात युद्ध घोषित करणे, हा फक्त संरक्षण मंत्रालयाचा निर्णय नसतो, त्याची एक अधिकृत प्रक्रिया असते -
१) पंतप्रधान व मंत्रिमंडळाची भूमिका : पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री युद्धाचे धोरण आखतात.
२) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि लष्करी प्रमुखांचे अहवाल : युद्ध आवश्यक आहे की नाही याचा अंदाज घ्यावा लागतो.
३) राष्ट्रपतीची अधिकृत मंजुरी : भारताचे राष्ट्रपती हे सैन्याचे सर्वोच्च कमांडर आहेत. त्यांच्याकडून अधिकृत मंजुरी घेतली जाते.
४) संसदेत युद्ध जाहीर करणारा ठराव मंजूर करणे : दोन तृतीयांश बहुमताने संमती मिळवावी लागते.
५) आंतरराष्ट्रीय संस्थांना माहिती देणे: संयुक्त राष्ट्रसंघासह, संबंधित आंतरराष्ट्रीय संघटनांना युद्धाबद्दल कळवले जाते.
सध्या भारत-पाकिस्तान दरम्यान अशी कोणतीही अधिकृत प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे भारत सरकारच्याच दृष्टीने हे युद्ध नाही, तर सीमावर्ती सुरक्षा कारवाई आहे. ती ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पहलगाम हल्ल्यानंतर करण्यात आली आहे. हे ऑपरेशन भारत सरकारच्या गुप्तचर व संरक्षण यंत्रणांनी संयुक्तरित्या आखले होते. यामध्ये नियंत्रण रेषेजवळच्या पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केले गेले आहेत. या कारवाईला भारताने ‘आत्मरक्षण’ म्हणून वैध ठरवले आहे. नंतर त्याला पाकिस्तानने ‘ॲक्ट ऑफ वॉर’ सांगून भारतावर प्रतिहल्ला केला. त्या हल्लांना परतवून लावण्याचे काम भारतीय सैन्य दलाने केले.
टीआरपीसाठी युद्धाच्या आभासी रंगमंचाची निर्मिती
प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते, पण सध्या भारतीय टीव्ही माध्यमांनी भारत-पाक यांच्यातला तणाव हाच आपल्या ‘टीआरपी’चा विषय केला. त्यासाठी ही माध्यमे कुठलाही विधिनिषेध बाळगताना दिसत नाहीच, उलट युद्धाच्या संभाव्यतेबाबत विपर्यस्त, चुकीचे आणि पूर्वग्रहदूषित माहिती देत आहेत. उदा. ‘पाकिस्तानवर अणुबॉम्ब?’, ‘दिल्ली ते कराची – क्षेपणास्त्र पोहोचू शकतं का?’, ‘युद्धाचा काऊंटडाऊन सुरू!’ असे भडक आणि सपशेल दिशाभूल करणारे मथळे दिले जात आहेत.
त्याचबरोबर प्रत्येक चॅनेलवर ‘डिबेट’च्या नावाखाली ‘राष्ट्रवादाची फॅक्टरी’ भरवली जात आहे. निवृत्त जनरल, अति-उत्साही अँकर आणि राजकीय प्रवक्ते यांच्या लठ्ठालठ्ठीत प्रेक्षकांना केवळ भावनिक पातळीवर भडकावण्याचे काम केले जात आहे. ‘ब्रेकिंग न्यूज’ची व्हिज्युअल्स, युद्धपात्रांचे पार्श्वसंगीत, तिरंगा झेंडा आणि सैन्याची पायबंद चित्रण, यामुळे युद्धाचा ‘नाट्यात्मक रोमँटीसिझम’ तयार केला जात आहे.
‘भ्रमित राष्ट्रवादा’ची निर्मिती
टीव्ही माध्यमे निर्माण करत असलेल्या या युद्धसदृश वातावरणाचा सामान्य जनतेवर काय परिणाम होऊ शकतो? तर -
१) भावनात्मक राष्ट्रवाद : युद्धावरील वृत्तांत पाहून जनतेत शत्रूविरोधी भावना निर्माण होते. ‘देशभक्ती’ ही संकल्पना केवळ शत्रूविरोधी द्वेषामध्ये गुरफटून टाकली जात आहे.
२) अंधश्रद्धा आणि अफवांची साखळी : सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जातात. उदा., ‘सरहद्दीवर ५०० सैनिक तैनात’, ‘दुसऱ्या बाजूने अणुहल्ल्याचा धोका’, ‘धान्याचा साठा करून ठेवा’, असे मॅसेजेस जनमानसात भीती व गैरसमज पसरवतात.
३) आर्थिक चिंता : युद्धाच्या चर्चांमुळे बाजारपेठांमध्ये अस्थिरता, चलनाचे अवमूल्यन आणि गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होतो. सामान्य नागरिकही रोजगार, दरवाढ आणि दैनंदिन गरजांवर परिणाम होतो का, या भीतीने अस्वस्थ होतो.
टीव्ही माध्यमांना ‘सामूहिक अल्झायमर’
टीव्ही माध्यमांना चढलेला हा युद्धज्वर एकीकडे पत्रकारितेच्या नीतीमूल्यांवर बोळा फिरवण्याचे काम करतो आहे, तर दुसरीकडे भारतीय जनतेला आक्रमक, द्वेषी आणि हिंसक बनवण्याचेही काम करत आहे. आणि हे अधिक धोकादायक आहे. टीव्ही माध्यमांनी एकतर्फी, निखालस खोटी माहिती न देता सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती देणे गरजेचे आहे. संरक्षणविषयक संवेदनशील गोष्टींची काळजीपूर्वक मांडणी करणे, युद्धाची भीषणता स्पष्ट करणे गरजेचे आहे. पण ती विशिष्ट हेतूने नियंत्रित चर्चा करतात, ‘राष्ट्रवादा’च्या नावाखाली टीआरपीसाठी चढाओढी आणि ‘ब्रेकिंग न्यूज’च्या नावाखाली दिशाभूत करणारी माहिती देण्याचे काम करत आहेत.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
अजून तरी भारत-पाकिस्तान दरम्यान प्रत्यक्ष युद्ध घोषित झालेले नाही आणि त्याची फारशी शक्यताही नाही. भारताने केवळ पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून मर्यादित स्वरूपात लक्ष्यित कारवाई केली, तर पाकिस्तानने त्याला उत्तर देताना काही ड्रोन हल्ले केले, तेदेखील सीमित आणि नियंत्रित स्वरूपाचे होते.
या सर्व घडामोडी लष्करी पातळीवर काटेकोर नियोजनात पार पडत असतानाच, देशातील काही टीव्ही माध्यमे मात्र या परिस्थितीचं ‘युद्ध सुरू झालंय’ अशा प्रकारे अतिरंजित आणि भ्रामक चित्र रंगवत आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणे किंवा एव्हरेस्ट सर करणे आणि युद्ध करणे, या दोन गोष्टींमध्ये फरक असतो. युद्ध हा काही हर्षवायू होण्याच्या आणि जनमानसांत इतरांविषयी द्वेष-तिरस्कार पसरवण्याचा कार्यक्रम नसतो. पण कुठलाच कॉमनसेन्स नसलेल्या भारतीय टीव्ही माध्यमांना हे कोण सांगणार? आणि सांगितले तरी ती कुणाचे ऐकणार?
‘युद्ध’ हा कधीही सामान्य माणसाचा विजय नसतो. युद्धाचा टीव्ही माध्यमे ‘शो’ करतात; परंतु युद्धाचा ‘शोक’ दाखवत नाहीत. सैनिकाची आई, त्याची पत्नी, त्याचं अपंग झालेलं आयुष्य, सामान्य नागरिकांची मृत्युमुखी पडलेली मुले, हे वास्तव लपवून केवळ भारताच्या चढाईच्या बातम्या मीठमसाला लावून सांगितल्या जात आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे युद्धाची घोषणा सरकारने करावी लागते, माध्यमांनी नव्हे.
खरे तर या टीव्ही माध्यमांना चाप लावण्याचे काम केंद्र सरकारनेच केले पाहिजे. पत्रकारितेच्या नीतीमूल्यांचे उल्लंघन करणाऱ्या आणि युद्धपत्रकारिता करताना पाळावयाच्या नियमांना धाब्यावर बसवणाऱ्या टीव्ही माध्यमांवर केंद्र सरकारे कडक कारवाई करायला हवी. पण सरकारने त्याबाबत अजून तरी काही पावले उचलल्याचे दिसत नाही. हेही खेदजनकच म्हणावे लागेल.
.................................................................................................................................................................
लेखक अनिरुद्ध राम निमखेडकर मूळचे नागपूरचे असून एका आयटी कंपनीमध्ये काम करतात.
aniruddhanimkhedkar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment