अजूनकाही
सतीश आळेकर यांचे ‘ठकीशी संवाद’ हे नाटक परवा पाहिले. अतिशय सूचक आणि मार्मिक अशी ही कलाकृती आहे. सूचकता हीच या कलाकृतीच्या केंद्रभागी आहे. रंगमंचावरील पार्श्वभूमीवर अॅमेझॉनवरून मागवलेल्या उपभोग्य वस्तूंची खोकी रचून ठेवलेली, त्याच्या बरोबरीने मोबाईलचा एक मोठा स्क्रीन, त्यावर मधून मधून इतिहास आणि इतर गोष्टी इत्यादी इत्यादी.
चंगळवाद आणि सोशल मीडिया या पार्श्वभूमीवर एक करोना झालेला रुग्ण! पण तो साधा नाही, तर एक मराठी मध्यमवर्गीय साहित्यिक/संशोधक वगैरे आहे. हाच नाटकाचा नायक आहे. त्याचे वय पाहता तो जवळ जवळ भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळचा, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून जितकी वर्षे झाली, त्या वयाचा आहे. त्याचे वडील १९४२च्या लढ्यात तुरुंगात जाऊन आलेले. त्याने स्वतः १९७५च्या आणीबाणीत काही निश्चित राजकीय भूमिका घेतलेली असते.
त्याने काही तरी गंभीर आणि सखोल संशोधन केले आहे, असे तो म्हणतो. परंतु त्याचा त्याच्या आसपास चाललेल्या महत्त्वाच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींशी काहीही संबंध नाही. किंबहुना वस्तुस्थितीपासून दूर पळण्यासाठी तो सारे सांगत असतो की, काय अशी शंका यावी. आता त्याचा अंतिम क्षण जवळ येऊ घातला आहे. आपण आयुष्यात काही तरी महत्त्वाचे केले आहे, हे तो स्वतःच स्वतःला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. हे पूर्ण नाटक म्हणजे या नायकाने स्वतःशी केलेला संवाद आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
संवादासाठी कोणीतरी संवादक तर हवा! तो संवादक म्हणजे (राम गणेश गडकरी यांची?) ठकी!!! किंवा आधुनिक काळातील अलेक्सा!! आता अंतिम समयी तरी आपण आयुष्यात निश्चितपणे काय केलेत हे सांगा, असे ठकी विचारते, आणि एका फालतू विषयावर संशोधन करणाऱ्या संशोधकाची ते सांगता सांगता पुरेवाट होते.
मधून मधून ठकी त्याला २०१४नंतरच्या काळात आपण काय भूमिका घेतलीत, असे विचारत राहते. या काळात लोकशाही विरून जात असताना, विचारवंत/लेखकांना ‘अर्बन नक्षल’ म्हणून हिणवले जात असताना, राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी होत असताना, राजकीय हिंसाचार होत असताना, इतिहासाचे चुकीचे पुनर्लेखन होत असताना आपण काय केलेत, असे ठकी विचारात राहते. आणि तो हे प्रश्न कसेबसे टाळत आपण महत्त्वाचे संशोध कसे केले आणि ते ऐतिहासिकदृष्ट्या कसे महत्वाचे आहे, हे सांगत राहतो.
साधारणपणे अशी मांडणी असलेल्या या नाटकाचा प्रयोग अतिशय देखणा, नीटनेटका झाला आहे. कलाकृतीतील सूचकता नाटकातून सतत प्रक्षेपित होते आहे. महात्मा गांधींसारख्या महत्त्वाच्या व्यक्तीला सातत्याने टाळणाऱ्या मराठी साहित्यिकांनी २०१४नंतरच्या काळातही काही निश्चित भूमिका घेतली नाही, हे सातत्याने अधोरेखित होत राहते.
यातील काही गमती तर फार छान जमल्या आहेत. संशोधनाचा विषय गडकरी यांच्यापासून सुरू होतो. ठकी म्हणजे केवळ कुणीतरी एक संवादक, असे सतीश आळेकर म्हणत असले, तरी (गडकरींच्या?) ठकीलाच संवादक करणे हा एक मास्टरस्ट्रोक. (अर्थात ही ठकी वेंधळी नाही, फार स्मार्ट आहे, हा दुसरा मास्टरस्ट्रोक). स्पॅनिश फ्लू (आणि गडकरी आणि लोकमान्य टिळक) यांच्यापासून सुरुवात करून १०० वर्षांनी सध्याच्या करोना साथीवर येणे म्हणजे १०० वर्षांचे एक साहित्यिक आणि राजकीय आवर्तन पूर्ण करून समेवर येण्यासारखे.
मराठीत साहित्याच्या निमित्ताने गडकरी यांची विडी, तपकीर यांवरही (फालतू) बरेच काही लिहिले गेले आहे. आता संशोधनासाठी घेतलेला बंद लिफाफ्यातील गडकरींचा करदोटा आणि त्याची भ्रमंती हा विषयही गमतीदार आहे. हा करदोटा साधा नाही. तो गडकरी, दिवाकर, मोकाशी, तेंडुलकर अशा साहित्यिकांना ‘साहित्यिक परंपरां’मध्ये गोवण्याचा प्रयत्न करतोच. शिवाय तो धागा पुढे कल्पकतेने चीनने उभ्या केलेल्या आव्हानापर्यंत कसा येतो, हेही लेखकाने गमतीने दाखवले आहे.
या करदोट्याच्या धाग्यातील सूत्राने सारे नाटक पुढे पुढे सरकत जाते. मधून मधून २०१४नंतर या देशात लोकशाहीला धोकादायक ठरणाऱ्या महत्वाच्या घटनांचा सरळ सरळ उल्लेख येत राहतो. लोकशाहीच्या भविष्यावरही चिंता व्यक्त होते आहे. या विचारवंताच्या तकलादू संशोधनावर आधारित एक म्युझिअम (अगदी लुव्ह्र सारखे) आणि त्यात भविष्यकाळात काय काय दाखवले जाईल, हा प्रसंग whatsappची संहारक शक्ती दाखवतो.
साहित्यिक/विचारवंतानी २०१४ नंतरच्या काळात काही निश्चित भूमिका घेतलेली दिसत नाही, हे वारंवार नाटकाच्या निमित्ताने पुढे येत राहते. यातच नाटकाचे यश आहे. मात्र असे प्रत्यक्ष न म्हणता त्याचे फक्त सूचन केले आहे. भारतातील व्यवस्थेवर भाष्य करताना सलमान रश्दी यांनी त्यांच्या ‘मिडनाईट्स चिल्ड्रेन’मध्ये १५ ऑगस्ट १९४७ला जन्मलेले सलीम सिनाई हे पात्र उभे केले होते, तसेच काहीसे हे पात्र आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
संपूर्ण नाटकभर निरर्थकता आणि अर्थपूर्णता, त्याचप्रमाणे क्षुल्लक आणि गंभीर यातील तणाव जाणवत राहतो. एकाच वेळी वर वर दिसणारी कॉमेडी आणि त्याच्या आत दडलेली ट्रॅजेडी यातला विसंवाद अधोरेखित होतो. रंगमंचावरील पार्श्वभूमीवरचा कन्झुमेरीझम आणि करोना यामुळे विषयाला वेगळी खोली आली आहे.
यातील नटांना विषयाची मोठी समज आहे. दोन्ही पात्रांनी नाटक छान तोलून नेले. Ambiguity and ambivalence often heighten aesthetics of Arts. Satish Alekar has fully exploited these to make a solid work of art out of this play.
चांगल्या कलाकृती पाहताना काही मोठ्या साहित्यकृतींची प्रकर्षाने आठवण येणे स्वाभाविक आहे. सलमान रश्दीच्या कादंबरीबद्दल लिहिलेच आहे. या शिवाय दोस्तोवस्कीच्या ‘नोट्स फ्रॉम अंडरग्राउंड’ची आठवण येत होती. त्यातला नायकही असाच गोलाकार संवाद करत राहतो, पण स्वतःच्या जबाबदारीबद्दल बोलत नाही.
आल्बेर कामूच्या ‘The Fall’मधील मुख्य पात्रही असेच स्वतःचे rationalization करत राहते. दोस्तोवस्कीच्या ‘डेमन्स’ या कादंबरीतील प्योत्र वर्खोन्स्की हे पात्रही आजूबाजूला चाललेल्या बदलाविषयी भूमिका न घेता फक्त पोपटपंची करत राहते आणि त्यातून मोठी शोकांतिका होते. नाटक पाहताना काही मोठ्या साहित्यकृतींची आठवण यावी, हेही या नाटकाचे मोठेपण आहे, असे मला वाटते.
चांगले नाटक प्रेक्षकांना विचार करायला भाग पडते. हे नाटक प्रेक्षकांना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि येऊ घातलेल्या त्यांच्या भविष्यावर विचार करायला भाग पडेल, असा भरवसा वाटतो.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment