पहलगाम हल्ल्यानंतर भारताने काय करावे? : तीन मोठे सैनिकी अधिकारी आणि दोन संरक्षणतज्ज्ञ यांच्या दृष्टीकोनातून...
पडघम - देशकारण
श्रीनिवास जोशी
  • डावीकडे पहलगाम हल्ल्यानंतरची काही छायाचित्रे. उजवीकडे लेफ्टनंट जनरल (रिटायर्ड) दीपिन्दर सिंग हूडा, मेजर जनरल, जी. डी. बक्षी, लेफ्टनंट जनरल मोहन भंडारी, मोहन भंडारी, अजय शुक्ला आणि प्रवीण सोहनी
  • Tue , 06 May 2025
  • पडघम देशकारण पहलगाम Pahalgam

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर युद्धाचे ढग जमले आहेत. कुठल्याही क्षणी कारवाई सुरू होऊ शकते. पाकिस्तानप्रणीत आतंकवादाचा त्रास भारताला गेली सदतीस-अडतीस वर्षं होत आहे. इतकी वर्षं पाकिस्तान कसा त्रास देऊ शकतो, हा विचार आपल्या मनात येतो. हे समजून घेण्यासाठी आपल्याला पाकिस्तानची नीती समजून घ्यावी लागेल.

पाकिस्तान हे अण्वस्त्र सज्ज राष्ट्र आहे, हे आपल्याला माहीत आहे. दोन आण्विक राष्ट्रांमध्ये युद्ध होणं अवघड असतं. एका बाजूला अण्वस्त्रांच्या छत्राखाली बसायचं आणि त्याच वेळी कुठल्या तरी ‘सुपर पॉवर’च्या मांडीवर बसून भारताला त्रास द्यायचा, असा उद्योग पाकिस्तान गेली तीन-चार दशकं करत आहे.

पारंपरिक युद्ध जिंकण्याची औकात पाकिस्तानमध्ये नाही. भारत सर्वार्थानं पाकिस्तानला या युद्धामध्ये भारी पडू शकतो. भारताच्या संरक्षण खर्चाच्या केवळ एक दशांश पैसा पाकिस्तान आपल्या संरक्षणावर खर्च करू शकतो आहे. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

म्हणूनच एका बाजूला आण्विक छत्राखाली बसायचं आणि दुसऱ्या बाजूला सतत अतिरेकी हल्ले करत राहायचं, अशी युद्धनीती पाकिस्तानने अवलंबली आहे.

भारत-पाकिस्तानमध्ये तीन हजार किलोमीटरची सीमा आहे. भारत आणि पाकव्याप्त काश्मीर यांच्यामध्ये सुमारे ७०० किलोमीटरची सीमा आहे. एवढ्या मोठ्या सीमा 24×7 सीलबंद ठेवणं, हे केवळ अशक्य कोटीमधलं काम आहे. त्यामुळे या सीमांच्या पार अतिरेकी घुसवणं पाकिस्तानला अनेक वेळा शक्य होतं. भारतीय सैन्यानं आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्सनं कितीही प्रयत्न केला, तरी अतिरेक्यांना काही वेळा यश मिळतंच. 

एका बाजूला पाकिस्तानकडं अणुबॉम्ब आहेत आणि त्यात भर म्हणून त्याला ‘सुपर पॉवर्स’चासुद्धा पाठिंबा आहे. त्यामुळे सर्वंकष युद्ध अशक्य होऊन बसलेलं आहे, आणि त्याच वेळी अतिरेकी कारवायासुद्धा शंभर टक्के बंद करता येत नाहियेत. हा एक मोठा तिढा भारतासमोर आहे, तो गेली चाळीस वर्षं सुटलेला नाही. 

पाकिस्तानच्या भाषेत याला ‘ब्लीडिंग इंडिया बाय थाउजंड कट्स पॉलिसी’ असं म्हणतात. ही पॉलिसी जनरल झिया यांच्या काळापासून सुरू आहे. छोटी-मोठी युद्धं करून भारताला सतत जखमी करत राहायचं, अशी ही युद्धनीती आहे.

काँग्रेस आणि मोदी यांच्या आधीची भाजपची सरकारं यांनी सैन्य न वापरता हा प्रश्न कसा सोडवता येईल, याचा विचार केला. पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय, राजनैतिक आणि आर्थिक दबाव टाकत राहायची नीती अवलंबली. आण्विक युद्धाचा धोका स्वीकारायची या सरकारांची तयारी नव्हती आणि ते योग्यही होतं.

या दबाव टाकण्याच्या प्रयत्नांना अर्थातच फारसं काही यश मिळू शकलं नाही. पहिल्यांदा अफगाणिस्तानात उतरलेल्या रशियाच्या विरुद्ध लढण्यासाठी आणि नंतर तालिबानच्या विरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानच्या भूमीची गरज होती. त्याच वेळी भारताला वायव्य दिशेनं घेरण्यासाठी चीनलाही पाकिस्तानची गरज होती. या सगळ्या परिस्थितीमुळे पाकिस्तानला अमेरिकेचं आणि चीनचंसुद्धा छत्र उपलब्ध झालं होतं. 

गेल्या काही वर्षांत अफगाणिस्तानमधून अमेरिकेनं लक्ष काढून घेतलं. अफगाणिस्तान तालिबानच्या हातात गेला तरी चालेल, पण आता या लांबलेल्या लढाईवर पैसा खर्च करायचा नाही, असं ठरवून अमेरिका २०२१ साली या भागातून निघून गेली. दुसरीकडे भारतानं ३७० कलम हटवलं. त्यामुळे चीन खूप अस्वस्थ झाला. याचा परिणाम म्हणून चीननं पाकिस्तानशी आपली मैत्री अजून घट्ट् केली. म्हणजे आता अमेरिकेचं छत्र फारसं उरलं नाही, तरी चीनचं छत्र अजून गडद झालं.

पाकिस्तानकडे आण्विक शस्त्रं आल्यापासून भारतानं सीमा ओलांडून पाकिस्तानशी युद्ध केलेलं नाही. सर्जिकल स्ट्राईकसाठी एखाद्या तुकडीनं ‘लाइन ऑफ कंट्रोल’ ओलांडली असली, तरी बटालियनच्या बटालियन सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये शिरल्या आहेत, असं १९७१च्या युद्धानंतर झालेलं नाही.

१९९९ साली कारगिल युद्ध झालं. तेव्हा भारताच्या भूमीवर येऊन अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आपल्या चौक्या स्थापन करायचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता, पण तेव्हासुद्धा सीमा ओलांडण्याचा प्रश्न आला नव्हता, कारण कारगिल भारताच्या हद्दीमध्येच होतं. भारताने सीमा ओलांडल्या नाहीत, म्हणून कारगिल युद्धाकडं चीननं दुर्लक्ष केलं.

.................................................................................................................................................................

हा लेख तुम्ही या व्हिडिओ लिंकवर पाहू-ऐकू शकता

.................................................................................................................................................................

आण्विक शस्त्रं असलेल्या देशांमध्ये चकमकी होत राहिल्या, तरी त्यांच्यात ‘ऑल आऊट वॉर’ होत नाही, असं म्हटलं जातं. याला ‘MAD डॉक्ट्रिन’ म्हणतात. ‘MAD’ म्हणजे ‘म्युच्युअली अश्युअर्ड डिस्ट्रक्शन’! अणुयुद्धात युद्ध करणाऱ्या दोन्ही बाजूंचा संपूर्ण विनाश होतो. विजयाची चव चाखायला कोणीच उरत नाही. या युद्धाचा इतर आजुबाजूच्या देशांनाही त्रास होतो. आण्विक युद्धातून तयार होणाऱ्या रेडिएशनचा त्रास सर्वदूर होतो. उद्या भारत-पाकिस्तान अणुयुद्ध झालं, तर चीन, बांगला देश, नेपाळ आणि इराण या देशांना त्याचा त्रास होऊ शकतो. कित्येक वेळा आपण टाकलेल्या अणुबॉम्बचा त्रास आपल्यालाच होतो. म्हणजे आपण कराचीवर बॉम्ब टाकला, तर त्याचा त्रास मुंबईलासुद्धा होईल.

अणुयुद्ध दोन्ही देशांना अश्मयुगात ढकलू शकतं. या युद्धात दोन्ही बाजूचे कोट्यवधी लोक मृत्यूमुखी पडतात आणि कित्येक कोटी जन्मभरासाठी जायबंदी होऊन जातात. अणुबॉम्ब फुटल्यावर जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्लस निघते. त्यामुळे सर्व बँकांचे सर्व्हर्स बंद पडून सर्व रेकॉर्डस डिस्ट्रॉय होऊ शकतात. कित्येक कोटी लोकांच्या जन्मभराच्या कमाईची सगळी रेकॉर्डस एका क्षणात नष्ट होऊ शकतात. जी गोष्ट बँकांची, तीच गोष्ट स्टॉक मार्केटच्या सर्व्हर्सची. तीच गोष्ट जमिनी आणि इतर सर्व रेकॉर्ड्सची.

हे होऊ नये म्हणून ‘फॅराडे केज’ नावाच्या सिस्टीम्स उभारल्या गेलेल्या असतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्लस या पिंजऱ्यांच्या आत ठेवलेल्या सर्व्हर्सपर्यंत पोहचत नाही, परंतु ऐनवेळी यांनी काम केलं नाही, तर काय हा प्रश्न उरतोच. आणि, सगळ्याच बँकांचे सगळेच ‘सर्व्हर्स फॅराडे केज’मध्ये ठेवले गेलेले नसतात.

अणुबॉम्ब फुटल्यानंतर हाइड्रोकार्बन्सचे ढग तयार होतात. त्यातून सूर्याचे किरण पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. याला ‘अणु-हिवाळा’ असं म्हणतात. कित्येक वर्षं शेती होऊ शकत नाही. आपण पाकिस्तानच्या पंजाबमध्ये अणुबॉम्ब टाकला, तर आपल्या पंजाबमध्येसुद्धा ‘अणु-हिवाळा’ तयार होईल. एवढे गंभीर परिणाम होत असल्यामुळे जगातला कोणताही अण्वस्त्रधारी देश आण्विक युद्धाला तयार होत नाही. या सगळ्याचा परिस्थितीचा फायदा घेऊन पाकिस्तान भारताला त्रास देत आहे.

मोदी सरकार आल्यापासून भारतानं ही कोंडी फोडण्याचे काही प्रयत्न केले. उरी हल्ल्यानंतरचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला गेला. पुलवामानंतर बालाकोट हल्ला केला गेला. आता इथून पुढं तुम्ही अतिरेकी हल्ला घडवून आणलात, तर त्याची किंमत तुम्हाला भरावी लागेल, असा इशारा देण्याचा हा प्रयत्न होता.

एवढं करूनही पहलगाम हल्ला झाला. म्हणजे भारतानं दिलेल्या इशाऱ्यांकडे पाकिस्ताननं फारसं लक्ष दिलेलं नाही. अर्थात पाकिस्तानच्या करवायांना थोडा लगाम निश्चितपणे बसला आहे. करवाया थोड्या विराळ झाल्या आहेत, हे दिसत आहे, पण त्या संपलेल्या नाहीत, हेसुद्धा नाकारता येत नाही.

उरी सर्जिकल स्ट्राईक ज्यांच्या नेतृत्वाखाली झाला, ते लेफ्टनंट जनरल (रिटायर्ड) दीपिन्दर सिंग हूडा हे सेक्युलर विचारांचे अधिकारी आहेत. अनेक पातळ्यांवर ते मोदी सरकारला विरोध करताना दिसतात, परंतु तेसुद्धा या बाबतीत मर्यादित प्रमाणात का होईना मोदी सरकारला यश मिळालं आहे, हे मान्य करताना दिसतात. त्यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तसं स्पष्टपणे म्हटलेलं आहे.

आपण आत्तापर्यंत आतंकवादाच्या प्रश्नाची पार्श्वभूमी पाहिली, आता पहलगाम हल्ल्यानंतर भारताने काय करावं, याबद्दल तीन मोठे सैनिकी अधिकारी आणि दोन संरक्षणतज्ज्ञ काय म्हणतायत ते बघू.  पहिल्यांदा आपण मेजर जनरल जी. डी. बक्षी यांचे मत-

‘न्युक्लियर वेपन्स’चा फार विचार न करता भारतानं सरळ हल्ला करावा. जगात इतकी युद्धं सुरू आहेत, कुठेही आण्विक शस्त्रं वापरली गेलेली नाहीत. यूक्रेन आणि रशियामध्ये गेली तीन वर्षं युद्ध सुरू आहे. रशियाकडे अण्वस्त्रं आहेत. यूक्रेनकडे ती नसली, तरी अण्वस्त्र धारण केलेल्या ‘नेटो अलायन्स’चा पाठिंबा आहे. तरीही तीन वर्षं झाली, तरी यातल्या कोणीही अणुबॉम्ब वापरलेला नाही. दुसरं म्हणजे गाझा आणि इस्राएल यांच्यातसुद्धा युद्ध सुरू आहे. तिथंही अणुबॉम्बचा वापर झालेला नाही. सिरियामध्ये गेलं दशकभर युद्ध सुरू होतं. अमेरिका, रशिया, इराण अशी राष्ट्रं या ना त्या स्वरूपात लढत होती, पण तरीही अणुबॉम्ब वापरला गेला नाही.

जी. डी. बक्षी यांचं म्हणणं असं आहे की, पाकिस्तानी जनरलस् हे स्वार्थी लोक आहेत. अणुयुद्धात त्यांना आपली बेसुमार संपत्ती आणि आणि सोन्यानं मढलेल्या बायका खलास झालेल्या चालणार नाहीत. भारतानं अगदी बिनधास्त राहावं. भारतानं पहिल्या आठ-दहा दिवसांत पाकिस्तानचं विमान-दल खलास करावं आणि पाक सैन्यावरचं विमानदलाचं छत्र नष्ट झालं की, पाकव्याप्त काश्मीर कब्जात घ्यावं. जी. डी. बक्षी यांच्या या म्हणण्याला इतर तज्ज्ञ मंडळींपैकी कुणाचाही पाठिंबा नाही.

लेफ्टनंट जनरल मोहन भंडारी हे एक वलय असलेले अधिकारी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतानं कारगिलचं युद्ध जिंकलं होतं. त्यांचं मत असं की, पाकिस्तानला त्याच्या वागण्याची किंमत भरावी लागेल, हे प्रत्येक वेळी दाखवून द्यायला लागणार आहे. एका मुलाखतीत जनरल भंडारी म्हणाले की, सध्या चीनचा पाकिस्तानबद्दल मुखभंग झालेला आहे. पाकिस्तानमध्ये चीननं जी गुंतवणूक केलेली आहे, ती सर्व बरबाद झालेली आहे, वाया गेलेली आहे. पाकिस्तानमध्ये काम करणारे चीनचे नागरिक सुरक्षित नाहीत. पाकिस्तानी अतिरेकी या लोकांवर अधूनमधून हल्ले करत असतात. या शिवाय अमेरिकेने चीनशी ‘टॅरिफ वॉर’ सुरू केलं आहे.

या परिस्थितीमध्ये चीन भारतासारख्या मोठ्या ट्रेड पार्टनरला दुखावणार नाही. जनरल भंडारी या मुलाखतीमध्ये पुढं म्हणाले की, पाकिस्तान सध्या अतिशय वाईट स्थितीमध्ये आहे. तो आर्थिकदृष्टया अतिशय दुर्बळ झाला आहे. त्यांचे रणगाडे कंडिशनमध्ये नाहियेत, तेलसाठे मर्यादित आहेत. या परिस्थितीमध्ये भारताने पाकिस्तानवर अगदी निश्चितपणे कारवाई करावी. पाक-व्याप्त काशीरमध्ये काही ऑपरेशन्स शक्य आहेत, असं जनरल भंडारी यांचं म्हणणं आहे. भारताच्या सीमेमध्ये राहून भारतीय विमानांनी सीमेपलीकडच्या ठिकाणांवर हल्ला करावा, असं त्यांचं मत आहे.

ज्यांना मोठं युद्ध हवं आहे, त्यांना जनरल भंडारी यांचं सांगणं आहे की, एक गोष्ट सगळ्या नागरिकांनी लक्षात ठेवायची आहे. एकदा युद्ध सुरू झालं की, ते फक्त सैन्यापुरतं मर्यादित राहत नाही. सगळी प्रजा त्यात ओढली जात असते. पेट्रोल टंचाई, महागाई, वाढलेले टॅक्सेस, अर्थव्यवस्थेवर आलेला असह्य ताण, त्यातून निर्माण होणारी बेरोजगारी आणि दारिद्रय हे सगळं जनतेला सहन करायला लागतं!

लेफ्टनंट जनरल दीपिंदर सिंग हूडा हेसुद्धा एक सेलिब्रेटेड अधिकारी आहेत. उरी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे नियोजन आणि नेतृत्व त्यांनीच केलं होतं. या जनरल हूडा यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला एक मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनीसुद्धा मर्यादित हल्ला करण्याचा उपाय सुचवला आहे.

सर्वंकष युद्ध छेडून सीमा पार जाण्याविषयी हूडा फार उत्साही दिसले नाहीत, पण मर्यादित हल्ले निश्चितपणे केले गेलेच पाहिजेत, असं त्यांचं मत आहे. मात्र हे हल्ले करताना ‘ऑल आऊट वॉर’ सुरू होऊ शकतं, हे लक्षात ठेवून तसं प्लॅनिंग केलं गेलं पाहिजे, असंही ते म्हणाले. ते म्हणाले की, पाकिस्तानमध्ये चीनच्या अनेक गुंतवणूक आहेत, या गोष्टीची जाणीव आपण पाकिस्तानवर हल्ले करताना ठेवली पाहिजे. चीनची आर्थिक आणि मनुष्यहानी झाली नाही पाहिजे, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ.

याशिवाय जनरल हूडा म्हणाले की, ही ऑपरेशन्स सुरू करताना आपण लक्षात ठेवायला पाहिजे की, आपल्याला फार लांबवर चालणाऱ्या युद्धात अडकायचं नाहिये. रशिया-यूक्रेनयुद्धा सारख्या रेंगाळत राहणाऱ्या युद्धात अडकण्याला हूडा यांचा विरोध आहे. एक मोठा हल्ला करून पाकव्याप्त काश्मीर आपल्याला ताब्यात घेता येईल, असं वाटत नाही, असं हुडा म्हणाले. अशा मोठ्या गोष्टी करायच्या ठरवून युद्धात उतरण्याला त्यांचा विरोध आहे. याचमुळे आपण लांबवर चालणाऱ्या युद्धात अडकण्याची शक्यता असते. जिथं यशाची शंभर टक्के शक्यता आहे, तेवढ्याच गोष्टी आपण कराव्यात आणि मग पुढे जर युद्ध विस्तारत गेलं, तर त्यासाठीसुद्धा आपण तयार राहावं, असा जनरल हूडा यांच्या म्हणण्याचा अर्थ!   

आता ‘सिव्हिलियन एक्सपर्ट’ याबद्दल काय म्हणतायत ते आपण बघू.

अजय शुक्ला हे अत्यंत प्रतिष्ठित असे सिक्युरिटी एक्सपर्ट आहेत. ‘सत्य हिंदी’ या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, आपण एका ‘न्यूक्लिअर पॉवर’शी लढत आहोत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आण्विक युद्ध सगळ्या जगाला भारी पडू शकतं, त्यामुळे पारंपरिक युद्धसुद्धा आपण सुरू करू नये. ‘न्यूक्लिअर रेडिएशन’चा त्रास सगळ्याच शेजारी राष्ट्रांना होऊ शकतो. या राष्ट्रांबरोबरच अमेरिका आणि युरोपातील देशसुद्धा असाच दबाब आपल्यावर टाकू शकतात.

असा दबाव येणार हे पाकिस्तानच्या आर्मी चीफ असीम मुनीर यांना माहिती आहे. त्याच बळावर त्यांनी पहलगाम हल्ल्याला हिरवा झेंडा दाखवला आहे. परिस्थिती कितीही स्फोटक बनली, अगदी कडेलोटापर्यंत गेली, तरी आपल्याला शेवटी निसटून जाता येईल, असा हिशोब मुनीर करत आहेत.

शेवटी आपण प्रवीण सोहनी यांचं मत आपण पाहू. सध्या प्रवीण सोहनी यांचं ‘The Last War : How AI Will Shape India's Final Showdown With China’ हे युद्धनीतीवरचं एक पुस्तक चर्चेमध्ये आहे.

प्रवीण सोहनी यांचं म्हणणं असं की, भारत-पाक युद्धाची शक्यता शून्य टक्के आहे. उरी सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोटसारखंच काहीतरी घडेल, असं त्यांना वाटतं.

सोहनी यांच्या मते आता असे स्ट्राईक्स करणेसुद्धा अवघड होऊन बसलं आहे. कारण गेल्या दोन्ही वेळी पाकिस्तान सैन्य आणि विमानदल यांना असं काही घडेल, असं वाटलंच नव्हतं. या वेळी मात्र पाकिस्तान आर्मी, एअर फोर्स आणि नेव्ही हे सगळेच ‘फुल ऑपरेशनल अलर्ट’वर आहेत.

चीन प्रत्यक्ष युद्धात उतरला नाही, तरी तो पडद्यामागे राहून पाकिस्तानला मदत करू शकतो. तो ‘सायबर वॉर’ छेडून भरतातल्या बँका, एअर ट्रॉफिक कंट्रोल आणि ट्रेन्स सगळ्या सिस्टीम्स बंद पडू शकतो. भारतभर गोंधळ माजवू शकतो. समुद्रात टाकलेल्या इंटरनेट केबल्स तोडण्याची क्षमता चीनकडे आहे. त्या तोडल्या गेल्या तर मोठा गोंधळ उडेल. पाकिस्तानात आणि चीनमध्ये जाणाऱ्या केबल्स तोडण्याची क्षमता भारताकडे नाही. भारत-चीन सीमेवर चीन आपल्या हालचाली वाढवू शकतो. भारताच्या सैन्याचा मोठा हिस्सा आणि खूपशी विमानं चीनच्या सीमेवर कशी अडकून पडतील, हे बघू शकतो. याशिवाय चीनकडे शत्रूराष्ट्राच्या सॅटेलाईटसचा नाश करणारे सॅटेलाईटस आहेत. चीन असे काही करू शकला, तर तो भारतासाठी खूप मोठा धक्का असेल. हे सर्व बघता भारत ‘ऑल आऊट वॉर’पासून दूर राहील, असं सोहनी यांचं म्हणणं आहे.

प्रवीण सोहनी जरा जास्तच गडद चित्र रंगवत आहेत, अशी टीका त्यांच्यावर होत आहे. पण त्यांच्या टेक्निकल अभ्यासाबद्दल आणि मास्टरीबद्दल त्यांचं कौतुकसुद्धा होत आहे. त्यांनी युद्धविषयक चर्चा AI युगात नेली, असं काही तज्ज्ञ म्हणत आहेत.

जनरल भंडारी असो किंवा दीपिंदर हूडा, या दोघांनीही युद्धविस्तार होणार नाही, याची काळजी घेतली जावी, असं निश्चितपणे सूचित केलं आहे. परंतु त्याच वेळी युद्ध विस्तारत गेलं, तर त्यासाठीसुद्धा भारतानं तयार राहायला हवं, असं हूडा यांचं म्हणणं आहे. प्रवीण सोहनी यांच्या मतांची फारशी चिंता करताना सैन्याचे अधिकारी दिसत नाहीत. कारवाई जरूर करा, पण युद्ध वाढू देऊ नका, असा संदेश दोन सेलिब्रेटेड आणि अतिवरिष्ठ सेना आधिकाऱ्यांनी दिलेला आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

अजय शुक्ला यांनी एक सांगितलं की, देशाच्या अस्मितेच्या दृष्टीनं काहीतरी करून दाखवणं सगळ्याच राजकारणी लोकांना आवश्यक होऊन बसलेलं असतं. सध्या पाकिस्तान आर्मी स्वतः अशा प्रेशरमध्ये आहे. बलुचिस्तान प्रॉब्लेम, रेल्वे हायजॅक, आर्थिक तबाही, महागाई असे अनेक प्रॉब्लेम्स पाकिस्तानला सतावत आहेत. जनतेला अस्मितेच्या प्रश्नामध्ये अडकवून ठेवणं पाकिस्तान आर्मीला आवश्यक वाटत आहे.

इकडे भारतामध्येसुद्धा पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेचा प्रश्न तयार झाला आहे. एक स्ट्राँग नेता म्हणून मोदीजींनी आपली प्रतिमा तयार केलेली आहे. आपण सत्तेवर आलो, तर एकसुद्धा हल्ला होणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं. या पार्श्वभूमीवर उरी, पठाणकोट, पुलवामा आणि आता पहलगाम असे हल्ले झालेले आहेत. उरी आणि बालाकोट सर्जिकल स्ट्राईक्स केले, तरी पहलगाम हल्ला झालाच. आता काहीतरी निर्णायक करायचा दबाब त्यांच्यावर आहे. आता या वेळी नेमका कुठला पर्याय मोदीजीं निवडत आहेत, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

अजय शुक्ला म्हणाले की, उरी आणि बालाकोटच्या वेळी अमेरिकेने मध्यस्थी केली होती. त्या वेळी ‘पुन्हा असं होणार नाही’ असं आश्वासन पाकिस्तानं दिलं होतं. असं आश्वासन मिळाल्यावर भारतानं तेव्हा आपली पावलं मागे घेतली होती, परंतु आता परत त्रास दिला गेला आहे, तेव्हा आता पुन्हा मध्यस्थ काय बोलणार?

अजय शुक्ला यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, युद्ध ही गोष्ट पाकिस्तानला परवडणारी नाही. पाकिस्तानची परिस्थिती वाईट आहे. पाणी, धरणं आणि कालव्यांची अवस्था अत्यंत वाईट अवस्थेत आहे. असं असलं तरी पाकिस्तान केवळ अस्मितेच्या मुद्द्यावर हे करत आहे. खरं तर भारतालासुद्धा लांबवर चालणाऱ्या युद्धात अडकून पडणं परवडणारं नाही. हे युद्धाचं वातावरण जेवढ्या लवकर ‘डीएस्क्लेट’ होईल तेवढं चांगलं, असं अजय शुक्ला यांचं म्हणणं आहे.

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘आप’च्या पराभवाची जबाबदारी अरविंद केजरीवाल यांची आहे. त्यांच्या अहंमन्य तत्त्वशून्य आणि स्वार्थी राजकारणामुळे ‘आप’चा पराभव झाला...

अशा तत्त्वशून्य अहंमन्यतेचा पराभव होणं गरजेचं होतं. तसा तो झाला. याबाबतीत वाईट वाटण्याचं कोणतंच कारण नाही. भ्रष्टाचारविहीन शुद्ध चारित्र्याच्या राजकारणाचे स्वप्न ‘इंडिया अगेन्स करप्शन’ आंदोलनाने जनतेला दाखवले होते. त्याकडे मध्यमवर्गीय समाज आणि तरुण आकर्षितही झाले होते. या मध्यमवर्गाचा भ्रमनिरास करण्याचं पाप केजरीवालांनी केलं आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. दुःख इतकंच की, ‘सापनाथ गेला आणि नागनाथ आला’.......