‘ईडन क्रिक बेंगाल’ : जर पाश्चात्य नाटकांचं सफाईनं भारतीयीकरण झालेलं असेल, तर उत्तम नाट्यानुभव पदरात पडतो!
कला-संस्कृती - नाटकबिटक
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘ईडन क्रिक बेंगाल’ या नाटकातील काही प्रसंग
  • Thu , 09 July 2026
  • कला-संस्कृती नाटकबिटक ईडन क्रिक बेंगाल Eden Creek Bengal

ड्वाईट वॉटसन (Dwight Watson) या अमेरिकन नाटककाराच्या ‘ईडन क्रिक’ (Eden Creek) या मूळ नाटकाचं ‘ईडन क्रिक बेंगाल’ हे भारतीय रूप. जर पाश्चात्य नाटकांचं सफाईनं भारतीयीकरण झालेलं असेल, तर उत्तम नाट्यानुभव पदरात पडतो, या संदर्भातील ताजं उदाहरण म्हणजे या नाटकाचा हा इंग्रजी प्रयोग. अमेरिकेत या नाटकाचे पहिल्यांदा १९८६ साली प्रयोग झाले.

विसाव्या शतकातील अमेरिकेच्या इतिहासात १९३०च्या दशकातील ‘आर्थिक मंदी’ ही फार महत्वाची घटना समजली जाते. या घटनेवर अनेक कलाकृती निर्माण झालेल्या आहेत. यातील चटकन आठवणारं नाव म्हणजे जॉन स्टाईनेबकची ‘द ग्रेप्स ऑफ राथ’ ही कादंबरी. वॉटसनच्या ‘ईडन क्रिक’मध्ये ‘आर्थिक मंदी’ ही घटना महत्वाची आहे. तिचे ईडन क्रिक या अमेरिकेतील छोट्या गावातील महिलांच्या जीवनावर काय परिणाम झाले, याचं चित्रण म्हणजे हे नाटक.

या मूळ अमेरिकन नाटकात कैझाद कोतवाल यांनी यथोचित बदल करत ही घटना १९४०च्या दशकातल्या बंगाल प्रांतात आणली. म्हणून या नाटकाचं ‘ईडन क्रिक बेंगाल’ असं आहे. मात्र एक छोटासा फरक आहे. अमेरिकेत ‘ईडन क्रिक’ नावाचं गाव आहे, तर कोतवाल यांच्या नाटकात हे काल्पनिक ठिकाण आहे. आणखी एक पण जास्त महत्त्वाचा फरक म्हणजे मूळ अमेरिकन नाटकातल्या पाचही स्त्रिया साध्या कुटुंबातल्या आहेत. या नाटकात या स्त्रिया हिंदू-मुस्लीम-ख्रिश्चन अशा बहुधर्मीय आहेत. यातून कोतवाल यांनी आपल्या देशातील धार्मिक विविधतेकडे अंगुलीनिर्देश केला आहे. ‘स्वतंत्र होण्याच्या उंबरठ्यावरचा भारत’ ही काळाची निवड फार महत्त्वाची आहे. अर्थात प्रजासत्ताक भारतातील काळसुद्धा दाखवता आला असता.

आणखी एक. भारतीय स्वातंत्रयलढ्यातलं १९४०चं म्हणजे शेवटचं दशक खळबळजनक होतं. त्यात ४२ची ‘चले जाव’ चळवळ, ४७ सालचं स्वातंत्र्यं आणि त्याबरोबर झालेली फाळणी अशा घटना घडल्या.

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

या नाटकातील पाचही स्त्रियांचं त्यांच्या गावाशी म्हणजे ‘ईडन क्रिक’शी फार जिव्हाळ्याचं नातं आहे. यातील चार स्त्रिया तिथं वाढतात, मोठ्या होतात आणि यथावकाश बाहेरच्या दुनियेत जातात. पाचवी स्त्री मात्र नंतर ईडन क्रिकला परत येते. तिने स्त्री सूत्रधाराला कथन केलेले अनुभव म्हणजे हे दीड तास चालणारं इंग्रजी नाटक.

या नाटकातील पहिली स्त्री आहे झाहाबिया (हिबा शहा) ही मुस्लीम तरुणी. ती आई-वडिलांबरोबर राहत असते. १९४३ साली बंगालमध्ये मोठा दुष्काळ पडल्यामुळे तरुण झाहाबियाला जवळच्या बाटानगरमधल्या बुटांच्या कंपनीत नोकरीला जावं लागतं. अशा प्रकारे दररोज बाहेर जाणं, तेसुद्धा सात–आठ तास आणि अर्थाजन करणं, हे एका मुस्लीम तरुणीसाठी फार मोठं आणि एका प्रकारे क्रांतिकारक असतं. पण त्यामुळे झाहाबियाला बाहेरचं जग दिसतं, त्याचबरोबर स्वत:चीही ओळख होते. ती एका टप्प्यावर इंग्लंडचे पंतप्रधान चर्चिल यांना शिव्याशाप देते. कारण त्या काळी अशी चर्चा होती की, बंगालचा दुष्काळ कृत्रिम असून सरकारने सर्व धान्यं दुसऱ्या महायुद्धात लढत असलेल्या सैनिकांसाठी परदेशात पाठवल्यामुळे ओढवलेला दुष्काळ आहे. झाहाबिया जेव्हा खूप वर्षांनी परत ईडन क्रिकला परत येते, तेव्हा ती बालपणीच्या बारीकसारीक आठवणींनी वेढली जाते. अम्मीच्या हातचं लोणचं, तिच्या लहान बहिणीचा जन्म…इ.

नंतर नाटक बंगालमधील दुष्काळातून पुढे सरकतं आणि स्वातंत्र्यलढ्याकडे येतं. इथून पिरोजा (रिहा अमीन) या पारशी मुलीची कथा सुरू होते. तिचे वडील त्यांना सोडून पलायन करतात, परिणामी घर चालवण्याची जबाबदारी पिरोजाच्या आईवर येते. याचा एक परिणाम म्हणजे धाकट्या भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी पिरोजावर येते. नंतर तिची एक मैत्रीण तिला दिल्लीला घेऊन जाते. अशा प्रकारे ईडन क्रिक या छोट्या गावातील पिरोजा देशाच्या राजधानीत येते. हे वर्ष असतं १९४५. ईडन क्रिक ते दिल्ली हा बदल अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरतो. ती दिल्लीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं लाल किल्ल्यावरचं भाषण ऐकते. त्यातील समता, बंधुता वगैरे तत्त्वांचा तिच्यावर खोलवर परिणाम होतो.  नंतर ती एका दलित युवकाच्या प्रेमात पडते आणि त्याच्याशी लग्न करते.

या नाटकात अनेकदा कथानकाच्या प्रवासात कर्तृत्ववान स्त्रियांची नावं येतात. भारतीय पातळीवर नावाजलेल्या सरोजिनी नायडू, सुचेता कृपलानी वगैरेंच्या जोडीनं ईडन क्रिकमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या डॉ. श्रीमती गांगुलींचा (अवंतिका आकेरकर) उल्लेख येतो. डॉ. गांगुली ईडन क्रिकमधील स्त्रियांना कुटुंब नियोजनाचे आणि बाळंतपणात काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल सल्ले देत असते.

या स्त्रियांपैकी एक लक्षणीय स्त्री म्हणजे पहिलं महायुद्ध संपल्यानंतर पोलंडहून भारतात आलेली नतालिया (कॅथरिन तबोन) ही तरुणी. ती जाझ गायिका असल्याने कलकत्त्यातील नाईट क्लबमध्ये गाणं म्हणत असते. हाच तिच्या उपजीविकेचा व्यवसाय असतो. जेव्हा ती तरुण, सुंदर आणि मादक असते, तेव्हा तिचं उत्पन्न जबरदस्त असतं. मात्र जसं वय वाढतं, तसं उत्पन्न कमी–कमी होत जातं. शेवटी तिलासुद्धा ईडन क्रिकमध्ये यावं लागतं.

या नाटकातील पाचवी स्त्री म्हणजे मारिया (महाबानू मोदी–कोतवाल). ती तरुणपणी ईडन क्रिकमधून पळून जाते. कारण तिचे वडील तिचं लग्न तिच्यापेक्षा वयानं मोठ्या माणसाशी ठरवतात. ती १९४८ साली ईडन क्रिकला परत येते, तेव्हा देशात फाळणीचे दंगे सुरू असतात. एव्हाना मारियाचं आयुष्य उदध्वस्त झालेलं असतं. आता ती ईडन क्रिकमध्ये वाडवडलांची शेती करण्याच्या उद्देशानं परत येते.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

या नाटकात एक वेगळ्या प्रकारची स्त्री सूत्रधाराची (देवकी) योजना केली आहे. या पाचही स्त्रिया आपापली कहाणी तिला सांगतात. ती प्रसंगी यात छोटीशी पूरक भूमिका निभावते. उदाहरणार्थ पिरोजा या पारशी मुलीच्या कहाणीत तिला लहान भावंडांना सांभाळावं लागतं.

अशी नाटकं आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात. प्रजासत्ताक भारतात साठच्या दशकात स्त्रीमुक्तीचे वारं शिरलं, मात्र त्याआधीपासून, खास करून गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्त्रिया मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्या. या नाटकात सामान्य स्त्रियांच्या कथा आहेत. त्यामुळेच त्या प्रेक्षकांना भिडतात. आजही मुलींची लग्न मोठ्या प्रमाणात त्यांचे आई-वडील ठरवतात. अशा स्थितीत याविरुद्ध बंड करत घर सोडून पळालेली मारिया प्रेक्षकांना आपली वाटते.

या नाटकाची निर्मिती पूअर बॉक्स प्रॉडक्शन्स या स्त्रीकेंद्री नाटकं सादर करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाट्यसंस्थेनं केली आहे. दिग्दर्शन ज्येष्ठ रंगकर्मी श्रीमती महाबानू मोदी–कोतवाल आणि कैझाद कोतवाल यांनी केलं आहे. नाटकाची प्रकाशयोजना ज्येष्ठ प्रकाशयोजनाकार हिदायत सामी यांनी केली आहे, तर नेपथ्य कैझाद कोतवाल यांचं आहे.

.................................................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहेत.

nashkohl@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

‘कुठं आहे लक्ष्मी? (.MP4)’ : आजच्या काळात स्त्रीच्या अस्तित्वाचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या ‘वापरल्या’ जाणाऱ्या प्रतिमेचा वेध घेणारं अर्थपूर्ण नाटक

हा नाट्यप्रयोग केवळ प्रासंगिक नाही, तर आपल्या काळाचा दस्तऐवज आहे. जोपर्यंत व्यवस्था लक्ष्मीचा वापर करत राहील, तोपर्यंत हा प्रश्न जिवंत राहणार. जोपर्यंत हा प्रश्न जिवंत आहे, तोपर्यंत हे नाटक आवश्यक आहे. आजच्या काळात स्त्रीच्या अस्तित्वाचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या ‘वापरल्या’ जाणाऱ्या प्रतिमेचा वेध घेणारं हे नाटक अर्थपूर्ण आहे. लक्ष्मीचा प्रश्न हा केवळ एका व्यक्तिरेखेचा नाही, तर आपल्या समाजव्यवस्थेचा आहे.......

जर खोलीत शिरलेल्या हत्तीची तुम्हाला भीती वाटत नसेल, तर तुम्ही त्याला भिडण्याची क्षमता राखता आणि जर ‘लाफ्टर थेरपी’वर तुमचा विश्वास नसेल, तर तुम्ही ‘सखाराम बाईंडर’चा हा प्रयोग नक्की बघाल

माणूस या विश्वाचा केंद्रबिंदू आहे हे कधीही न मानणारे तेंडुलकर आपल्या नाटकाच्या केंद्रस्थानी मात्र नेहमी माणूसच ठेवत आले. आणि हाच माणूस, ते मानत असलेल्या दैवापुढे कसा आणि किती हतबल असतो, हेच ते आपल्या नाटकात सतत दाखवताना दिसतात. तेंडुलकर थेट विषयाला भिडतात आणि त्या विषयावर बसलेली सगळी पुटं निर्ममतेने काढून तो विषय उघडानागडा तुमच्यासमोर पेश करतात. त्यामुळे आलेला प्रेक्षक बिचकतो.......

‘अंबा’ : युद्ध थांबल्याशिवाय पुरुषांना शरीरसुख न देण्याची शपथ घेणाऱ्या बायका आणि त्यामुळे रडकुंडीला आलेल्या पुरुषांची कथा

जगाला शांततेची नितांत गरज आहे. म्हणूनच अशा स्थितीत सद्यस्थितीकडे स्त्रियांच्या दृष्टीकोनातून बघणं गरजेचं आहे. अशा वातावरणात हे नाटक मंचित होणं फार महत्त्वाचं आहे. मूळ ग्रीक नाटकाचा काळ ख्रिस्तपूर्व म्हणजे काळाच्या दृष्टीनं पक्का आहे. मात्र आजच्या जगात कोठे ना कोठे युद्धं सुरू असतं, हिंसेचं थैमान सुरू असतं. अशा स्थितीत एखादा देश किंवा एखादा काळ न दाखवता या भीषण समस्येचं वैश्विक रूप समोर आणणं महत्त्वाचं ठरतं.......