‘अनकही’ : आपल्या अंगावर भीतीनं काटा आणणारं रहस्यमय नाटक
कला-संस्कृती - नाटकबिटक
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘अनकही’ या नाटकातील दोन प्रसंग
  • Wed , 20 May 2026
  • कला-संस्कृती नाटकबिटक अनकही Ankahee

‘आद्यम’ हा रंगभूमीविषयक उप्रकम गेल्या आठ वर्षांपासून आदित्य बिर्ला उद्योगसमूहातर्फे राबवला जात आहे. यात मुंबई व दिल्लीत हिंदी-इंग्रजी भाषेत काही नाटकं सादर केली जातात. त्यासाठी देशभरातून प्रस्ताव मागवले जातात. निवड समिती त्यातील काही प्रस्ताव स्वीकारते आणि मग नाटकांची निर्मिती होते. या वर्षी सादर झालेल्या नाटकांपैकी एक म्हणजे ‘अनकही’ हे दोन अंकी हिंदी नाटक. ते सुझन हिल (जन्म : १९४२) या ब्रिटिश लेखिकेच्या ‘वुमन इन ब्लॅक’ या कादंबरीवर आधारित आहे.

ही मूळ कादंबरी १९८३ साली प्रकाशित झाली. नंतर तिचं दोन अंकी इंग्रजी रंगमंचीय रूपांतर स्टिफन मॅलॅट्रॅट यांनी केलं. त्याचा पहिला प्रयोग १९८९ साली झाला. त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. परिणामी त्याचे प्रयोग मार्च २०२३पर्यंत सुरू होते. एका अंदाजानुसार या नाटकाचे सुमारे १३ हजार प्रयोग झाले आहेत. काही अभ्यासकांच्या मते अ‍ॅगाथा ख्रिस्तीच्या ‘माऊसट्रॅप’नंतर एवढं लोकप्रिय रहस्यप्रधान नाटक झालेलं नाही.

म्हणून ‘आद्यम’मध्ये या नाटकाचा हिंदी अवतार सादर होणार आहे, हे समजल्यापासून उत्सुकता होती. या युरोपियन नाटकाला भारतीय बाज चढवण्यात आला आहे. हिंदी रूपांतर रोहित चौधरी यांनी सफाईनं केनं आहे आणि तरुण रंगकर्मीची भूमिका केली आहे.

नाटकाची सुरुवात होते तेव्हा रंगमंचावर एक मध्यमवयीन वकील संदिपन चौहान आणि एक तरुण रंगकर्मी असतात. मध्यमवयीन वकिलानं त्याच्या तरुणपणीतली एक महत्त्वाची घटना लिहून आणली आहे. त्याला ही कथा त्याच्या कुटुंबियांसमोर दिवाळीच्या रात्री नाट्यरूपानं सादर करायची असते. त्यासाठी तो या तरुण रंगकर्मीला आगावू मानधन देऊन बोलावून घेतो. ही कथा त्याने आजपर्यंत कोणालाही सांगितलेली नसते. म्हणून नाटकाचं नाव आहे- ‘अनकही’.

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

दिल्लीतील एका मोठ्या वकिलाकडे संदिपन चौधरी वकिलीचे धडे गिरवत असतो. त्याचा बॉस त्याला बंगालमधील सुंदरबन भागातील एका मृत मुस्लीम महिलेच्या- फातिमा इलियासच्या मृत्युपत्राचा शोध घेण्यासाठी पाठवतो. इथून नाटक सुरू होतं. अनेक वर्षांपूर्वी फातिमा विधवा झालेली असून गावाबाहेरच्या एका मोठ्या हवेलीत एकटीच राहत असते. तरुण संदित चौहान तिथं जातो आणि हवेलीत काही कागदपत्रं मिळतात का, याचा शोध घेतो. इथून नाटक पकड घ्यायला लागतं.

या हवेलीत कोणीही राहत नसतं. गावातले लोक संदिपनबरोबर हवेलीत मुक्काम करायला तयार होत नाहीत. एवढंच नव्हे तर संदिपननेसुद्धा तिथं राहू नये, असा सल्ले देतात. संदिपनला हवेलीत रात्री काळ्या कपड्यातील स्त्री किंवा स्त्रीचं भूत दिसतं. गावातील एकही व्यक्ती या हवेलीबद्दल किंवा फातिमाबद्दल बोलायला तयार नसते. इतकंच नव्हे तर हा विषय जेव्हा संदिपन काढतो, तेव्हा प्रत्येक व्यक्ती दचकते, घाबरते आणि तेथून सटकते.

संदिपनच्या निवेदनातून फातिमा, तिची धाकटी बहीण, बहिणीचा तीन वर्षांचा मुलगा, दोन बहिणींत सतत होणारी भांडणं, एका रात्री बहिणीचं मुलाला घेऊन एका घोडागाडीतून निघून जाणं, पण नंतर ही घोडागाडी दलदलित फसते आणि सर्व जण मरतात. त्यांचे अतृप्त आत्मे हवेलीत वावरत असतात. संदिपनला कधी घोडागाडीचा आवाज, तर कधी लहान मुलाच्या हसण्याचा आवाज येतो, तर कधी काळ्या कपड्यातील स्त्री दिसते. हे महत्त्वाचे प्रसंग दिग्दर्शक विक्रांत पवार यांनी समर्थपणे उभे केले आहेत. काही प्रसंग तर आपल्या अंगावर भीतीनं काटा आणतात.

सुमारे दीड तास चालणाऱ्या या नाटकात आपण पूर्णपणे गुंतून जातो. याचं श्रेय संहिता, विक्रांत पवार यांचं दिग्दर्शन आणि गोपाल दत्त (वकील) व रोहित चौधरी (तरुण रंगकर्मी) या दोन मध्यवर्ती पात्रांच्या अभिनयाला आहे.

दोनच पात्रं असलेल्या या नाटकांत दोन्ही पात्रांचा कस लागतो. अशा वेळी दोन्ही पात्रं तोडीस तोड असावी लागतात. हे या नाटकात साधलं आहे. या दोन पात्रांतील अभिनयाची जुगलबंदी बघणं, हा एक प्रेक्षणीय आणि श्रवनीय अनुभव आहे.

विक्रांत पवार हा कसलेला दिग्दर्शक आहे. या आधी त्यांचं ‘ब्युटी अँड बिस्ट’ हे नाटक फार गाजलं होतं. त्यांनी या नाटकाची प्रकृती लक्षात घेऊन कमीत कमी नेपथ्य (वर्षा जैन), पार्श्वसंगीत (धवल दास) आणि प्रकाशयोजना (विक्रांत ठक्कर) वगैरेंचा यथोचित वापर केला आहे. दिग्दर्शकाचा सर्व फोकस प्रभावी नाट्य सादर करण्यावर असल्यामुळे त्यांनी नेपथ्याचा अतिरेकी वापर टाळला आहे. त्यामुळे आपलं लक्ष विचलित होत नाही.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

काही अभ्यासकांच्या मते रंगमंचावर ‘भीती’ ही भावना दाखवणं तसं अवघड असतं. ही भावना ‘सिनेमा’ या माध्यमात फार प्रभावीपणे सादर करता येते. सिनेमाच्या दिग्दर्शकाला ‘कॅमेरा’ कोठेही नेता येतो किंवा स्टुडिओत हवी तशी परिस्थिती निर्माण करता येते. अशा सुविधा रंगमंचावर नसतात. ‘अनकही’ने या मर्यादांवर मात केली आहे.

असंच ‘अंधार माझा सोबती’ हे एक नाटक मी अनेक वर्षांपूर्वी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात बघितलं होतं. ते १९६७ सालचा इंग्रजी चित्रपट ‘Wait Until Dark’चा मराठी रंगमंचीय अवतार होता. ‘अंधार माझा सोबती’मधली फैय्याजची अप्रतिम अदाकारी आजही आठवते.

‘अंधार माझा सोबती’सारखाच ‘अनकही’तील भीतीचा अनुभव फार जबरदस्त आहे. याच्या जोडीला संहितेत ठेवलेली खरं–खोटं आणि वास्तव–अवास्तव यातील धूसर सीमारेषा. अर्थात काही समीक्षकांना याबद्दल आक्षेप नोंदवले आहेत. त्यांच्या मते नाटकातील कथानकात अधिक स्पष्टता आणणं शक्य होतं. अर्थात याला दुसरी बाजू आहे. नाटकातील महत्त्वाची घटना म्हणजे संदिपनला दिसणारी काळ्या कपडयांतील स्त्री. भूत आहे की नाही, याबद्दल आजही आपल्या समाजात चर्चा होत असते. त्यामुळे ते स्पष्टपणे सांगणं योग्य नाही.

हा मुद्दा बाजूला ठेवला, तर ‘अनकही’ एक दर्जेदार नाटक आहे, यात शंका नाही. उच्च दर्जाचं दिग्दर्शन आणि त्याला साजेसा अभिनय असला तर रंगमंचावर जादुई परिणाम गाठता येतो.

.................................................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहेत.

nashkohl@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘कुठं आहे लक्ष्मी? (.MP4)’ : आजच्या काळात स्त्रीच्या अस्तित्वाचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या ‘वापरल्या’ जाणाऱ्या प्रतिमेचा वेध घेणारं अर्थपूर्ण नाटक

हा नाट्यप्रयोग केवळ प्रासंगिक नाही, तर आपल्या काळाचा दस्तऐवज आहे. जोपर्यंत व्यवस्था लक्ष्मीचा वापर करत राहील, तोपर्यंत हा प्रश्न जिवंत राहणार. जोपर्यंत हा प्रश्न जिवंत आहे, तोपर्यंत हे नाटक आवश्यक आहे. आजच्या काळात स्त्रीच्या अस्तित्वाचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या ‘वापरल्या’ जाणाऱ्या प्रतिमेचा वेध घेणारं हे नाटक अर्थपूर्ण आहे. लक्ष्मीचा प्रश्न हा केवळ एका व्यक्तिरेखेचा नाही, तर आपल्या समाजव्यवस्थेचा आहे.......

जर खोलीत शिरलेल्या हत्तीची तुम्हाला भीती वाटत नसेल, तर तुम्ही त्याला भिडण्याची क्षमता राखता आणि जर ‘लाफ्टर थेरपी’वर तुमचा विश्वास नसेल, तर तुम्ही ‘सखाराम बाईंडर’चा हा प्रयोग नक्की बघाल

माणूस या विश्वाचा केंद्रबिंदू आहे हे कधीही न मानणारे तेंडुलकर आपल्या नाटकाच्या केंद्रस्थानी मात्र नेहमी माणूसच ठेवत आले. आणि हाच माणूस, ते मानत असलेल्या दैवापुढे कसा आणि किती हतबल असतो, हेच ते आपल्या नाटकात सतत दाखवताना दिसतात. तेंडुलकर थेट विषयाला भिडतात आणि त्या विषयावर बसलेली सगळी पुटं निर्ममतेने काढून तो विषय उघडानागडा तुमच्यासमोर पेश करतात. त्यामुळे आलेला प्रेक्षक बिचकतो.......

‘अंबा’ : युद्ध थांबल्याशिवाय पुरुषांना शरीरसुख न देण्याची शपथ घेणाऱ्या बायका आणि त्यामुळे रडकुंडीला आलेल्या पुरुषांची कथा

जगाला शांततेची नितांत गरज आहे. म्हणूनच अशा स्थितीत सद्यस्थितीकडे स्त्रियांच्या दृष्टीकोनातून बघणं गरजेचं आहे. अशा वातावरणात हे नाटक मंचित होणं फार महत्त्वाचं आहे. मूळ ग्रीक नाटकाचा काळ ख्रिस्तपूर्व म्हणजे काळाच्या दृष्टीनं पक्का आहे. मात्र आजच्या जगात कोठे ना कोठे युद्धं सुरू असतं, हिंसेचं थैमान सुरू असतं. अशा स्थितीत एखादा देश किंवा एखादा काळ न दाखवता या भीषण समस्येचं वैश्विक रूप समोर आणणं महत्त्वाचं ठरतं.......