‘दिल का हाल सुने दिलवाला’ : या नाटकाची खरी गंमत त्याच्या कल्पक प्रयोगात आहे. हे नाटक खऱ्या अर्थानं ‘आजचं’ आहे
कला-संस्कृती - नाटकबिटक
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘दिल का हाल सुने दिलवाला’ या नाटकाली काही प्रसंग
  • Mon , 08 June 2026
  • कला-संस्कृती नाटकबिटक दिल का हाल सुने दिलवाला Dil Ka Haal Sune Dilwala मोहित टाकळकर Mohit Takalkar

मोबाईल फोनमुळे जगभरच्या सामाजिक जीवनात झालेले बदलसुद्धा अभूतपूर्व आहेत. आज सर्वत्र आढळणारा ‘मोबाईल फोन’ हा प्रकार फार निराळा आहे. त्यामध्ये दर चारपाच वर्षांनी नवनवे फीचर्स येत असतात. सुरुवातीला फक्त संभाषणापुरता असलेला मोबाईल फोन नंतर स्मार्टफोन झाला. नंतर त्यावर व्हॉटसअप आलं, छायाचित्रं पाठवता येऊ लागली, रिल्स बनवता येऊ लागल्या. हे बदल अवघ्या दहा-पंधरा वर्षांतले आहेत. याच्याच बरोबरीनं नकारात्मक बाजू म्हणजे ऑनलाईन घोटाळे.

ही नवीन वस्तुस्थिती अमेरिकन नाटककार सारा रूहल (जन्म : १९७४) यांच्या लक्षात आली आणि त्यांनी ‘डेड मॅन्स सेल फोन’ हे धमाल नाटक लिहिलं. यात एक मध्यमवयीन माणूस अचानक मरतो, पण तो एका प्रकारे त्याच्या मोबाईल फोनद्वारे जिवंत राहतो. त्याच्या फोनमध्ये अनेक गोष्टी, अनेक व्यक्तींचे फोन नंबर, अनेक प्रकारची छायाचित्रं असतात.

कधीकाळी माणूस मेला की, तो फक्त व्यक्तींच्या आठवणींच्या रूपानं जिवंत असायचा. आता परिस्थिती बदलली आहे. हे समोर ठेवून सारा यांनी हे धमाल नाटक लिहिलं आहे. याचा पहिला प्रयोग अमेरिकेत २००७ साली झाला. आता आदित्य बिर्ला उद्योगसमूहाच्या ‘आद्यम’ अंतर्गत या नाटकाचा दोन अंकी हिंदी अवतार ‘दिल का हाल सुने दिलवाला’ नुकताच मुंबईत सादर झाला.

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

या अमेरिकन नाटकाचं फार सफाईनं भारतीयीकरण करण्यात आलं आहे. याचं श्रेय चिराग खंडेलवाल यांचं. आशा पारेख नावाच्या सुरतमध्ये राहणाऱ्या तरुणीला मुंबईत येऊन अभिनयक्षेत्रात नाव कमवायचं असतं. अशा स्वप्नांना कनिष्ठ मध्यमवर्गीय पालक कधीही परवानगी देत नाही. म्हणून आशा पळून मुंबईत येते. इथून नाटकाला सुरुवात होते.

मुंबई तिची ओळख कॅफेत बसलेल्या एका माणसाशी होते. तो तिला सिनेमा-सिरियल्समध्ये भूमिका मिळवून देतो, असं सांगत हळूहळू तिचे पैसे लुबाडतो. पैसे संपल्यावर तो गायब होतो. परिणामी आशाला त्याच कॅफेत उदरनिर्वाहासाठी नोकरी करावी लागते. तिथं तिला मध्यमवयीन मॅक एका वेगळ्या प्रकारे भेटतो. म्हणजे तो बसल्या बसल्या खुर्चीवर मेलेला असतो. अचानक त्याचा मोबाईल वाजतो. तो उचलत नाही म्हटल्यावर आशा फोन उचलते. इथून नाटक गती घेतं. आशाला काही वेळानंतर समजतं की, तो मेलेला आहे आणि तिच्याजवळ त्याचा फोन आहे. हा फोन अनेकदा वाजतो. त्यामुळे ती त्याच्या सहवासातल्या लोकांच्या सहवासात येते. यातून वेगळ्या प्रकारचं नाटक निर्माण होतं.

आलेल्या प्रत्येक फोनमुळे जसं आशाला मेलेल्या व्यक्तीबद्दल वेगळं काही तरी समजतं, तसंच प्रेक्षकांसुद्धा. मॅकच्या प्रेमात असलेली आणि त्याला भेटायला हैदराबादहून आलेली रझिया सुलतान ही मुस्लीम तरुणी, मॅकची कटकटी गोवन बायको अ‍ॅन्ना, मॅकची आई, मॅकचा भाऊ लिओ, मॅकबरोबर किडनी विकण्याचा व्यवसाय करणारी बंगाली महिला, मॅकचा ब्रांद्रयातील बंगला… अशा अनेक गोष्टी आशाला समजतात.

मृत्यू पावलेल्या मॅकला आलेल्या फोन्सना उत्तर दिल्यामुळे आशाला मॅकला फोन करणाऱ्यांना भेटायला जावं लागतं. या साठी तिला मुंबईतील अनेक ठिकाणी जावं लागतं. यातून नाटक पुढे सरकत जातं. अशा विविधांगी कथानकांना एकत्र गुंफण्यासाठी एका सूत्रधाराची गरज असते. म्हणूनच या नाटकात ‘सूत्रधार’ हे अतिशय महत्त्वाचं पात्रं आहे.

या नाटकाच्या केंद्रस्थानी राज कपूरच्या १९५५ साली प्रदर्शित झालेल्या ‘श्री ४२०’ या सिनेमातील ‘दिल का हाल सुने दिलवाला…’ हे गाजलेलं गाणं आहे. शैलेंद्रच्या या गाण्यातून एकमेकांशी बोलण्याचा, एकमेकांना समजून घेण्याचा, संवादाचा, माणुसकी जपण्याचा संदेश दिला आहे. तिचा वापर करण्याची कल्पकता कौतुकास्पद आहे.

या सगळ्यात आशा पारेखचं नटी बनण्याचं स्वप्न मागे पडतं आणि तिचे मॅकच्या कुटुंबियांशी संबंध निर्माण होतात. त्यांचे एकमेकांविषयीचे गैरसमज लक्षात आल्यावर मुळात चांगल्या स्वभावाची आशा त्या सर्वांना खोटं सांगून मॅकची नकारात्मक प्रतिमा सुधारून सकारात्मक करायला सुरुवात करते. (माझ्या आठवणीप्रमाणे ही क्लृप्ती राजेश खन्नाच्या १९७२ साली आलेल्या ‘बावर्ची’ या हिंदी सिनेमात आणि १९९७ साली आलेल्या गोविंदाच्या ‘हिरो नंबर १’मध्ये यशस्वीपणे वापरली होती).

उदाहरणार्थ मॅकच्या आईला मॅकबद्दल फार राग असतो. खोटं बोलून आशा तो राग घालवते. या प्रकारात ती मॅकच्या धाकट्या भावाच्या लिओच्या प्रेमात पडते. तो बांद्रयाचा एका कोपऱ्यात भाड्याच्या जागेत दुकान चालवतो आणि इतर वेळी कविता करतो. आता या कविता ऐकायला आशा असते. बघता बघता त्याच्या आयुष्यात वेगळंच दु:ख येतं. दुकानाचा मालक जागा खाली करायला सांगतो.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

अनेक वर्षं एकत्र राहिलेली माणसं, एकाच कुटुंबातील माणसं, एकमेकांना ओळखत असलेली माणसं, एकाच आईची मूलं… पण कालौघात एकमेकांतील संवाद हरवलेली माणसं… हे गुंतागुंतीचं कथानक रंगमंचावर सादर करणं हे अवघड आव्हान होतं, पण चिराग खंडेलवालच्या प्रवाही संहितेमुळे, मोहित टाकळकरच्या कल्पक दिग्दर्शनामुळे आणि मुख्य पात्रांच्या दर्जेदार अभिनयामुळे हे नाटक रंगत जातं. अशा नाटकाचा पारंपरिक शेवट नसतो, मात्र यातील चांगुलपणाचा संदेश लक्षात राहतो. मुख्य चांगल्या कामासाठी खोटं बोलणं न्याय्य असतं, अशीही भूमिका या नाटकात घेतलेली दिसून येते.

या नाटकाची खरी गंमत त्याच्या कल्पक प्रयोगात आहे. यातील सर्व महत्त्वाच्या पात्रांचा अतिशय दर्जेदार आणि खिळवून ठेवणारा अभिनय, ही या नाटकाची जमेची बाजू आहे. सागर देशमुख (सूत्रधार), दिलनाझ इराणी (आशा पारेख), व्रजेश हिर्जी (लिओ आणि मॅक), फॉएजे जलाली (अ‍ॅना, मॅकची आई आणि रजिया सुलताना) यांचा अभिनय फार बहारदार आहे. त्यातही खास उल्लेख करावा लागेल सूत्रधाराच्या भूमिकेतील सागर देशमुखचा आणि तीन-चार भूमिका सफाईनं सादर करणाऱ्या फॉएजे जलालीचा. त्यांची देहबोली, खणखणीत उच्चार, रंगभूमीवरचा सफाईदार वावर वगैरे लक्षवेधी होती.

मोहित टाकळकरने या नाटकात लाईव्ह ऑर्केस्ट्राचा वापर करून त्यांचं रंजक मूल्य वाढवलं आहे. हा ऑर्केस्ट्रा रंगमंचाच्या वरच्या भागात कायमस्वरूपी असतो आणि खाली घडत असलेल्या प्रसंगांना पूरक गाणी सादर करतो. ही गाणी अमृता पटवर्धन आणि ऋवेद इनामदार यांनी गायिली आहेत. ऑर्केस्ट्राच्या कल्पक वापरामुळे नाटक एक क्षणभरही रेंगाळत नाही. हे नाटक खऱ्या अर्थानं ‘आजचं’ आहे.

.................................................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहेत.

nashkohl@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘कुठं आहे लक्ष्मी? (.MP4)’ : आजच्या काळात स्त्रीच्या अस्तित्वाचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या ‘वापरल्या’ जाणाऱ्या प्रतिमेचा वेध घेणारं अर्थपूर्ण नाटक

हा नाट्यप्रयोग केवळ प्रासंगिक नाही, तर आपल्या काळाचा दस्तऐवज आहे. जोपर्यंत व्यवस्था लक्ष्मीचा वापर करत राहील, तोपर्यंत हा प्रश्न जिवंत राहणार. जोपर्यंत हा प्रश्न जिवंत आहे, तोपर्यंत हे नाटक आवश्यक आहे. आजच्या काळात स्त्रीच्या अस्तित्वाचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या ‘वापरल्या’ जाणाऱ्या प्रतिमेचा वेध घेणारं हे नाटक अर्थपूर्ण आहे. लक्ष्मीचा प्रश्न हा केवळ एका व्यक्तिरेखेचा नाही, तर आपल्या समाजव्यवस्थेचा आहे.......

जर खोलीत शिरलेल्या हत्तीची तुम्हाला भीती वाटत नसेल, तर तुम्ही त्याला भिडण्याची क्षमता राखता आणि जर ‘लाफ्टर थेरपी’वर तुमचा विश्वास नसेल, तर तुम्ही ‘सखाराम बाईंडर’चा हा प्रयोग नक्की बघाल

माणूस या विश्वाचा केंद्रबिंदू आहे हे कधीही न मानणारे तेंडुलकर आपल्या नाटकाच्या केंद्रस्थानी मात्र नेहमी माणूसच ठेवत आले. आणि हाच माणूस, ते मानत असलेल्या दैवापुढे कसा आणि किती हतबल असतो, हेच ते आपल्या नाटकात सतत दाखवताना दिसतात. तेंडुलकर थेट विषयाला भिडतात आणि त्या विषयावर बसलेली सगळी पुटं निर्ममतेने काढून तो विषय उघडानागडा तुमच्यासमोर पेश करतात. त्यामुळे आलेला प्रेक्षक बिचकतो.......

‘अंबा’ : युद्ध थांबल्याशिवाय पुरुषांना शरीरसुख न देण्याची शपथ घेणाऱ्या बायका आणि त्यामुळे रडकुंडीला आलेल्या पुरुषांची कथा

जगाला शांततेची नितांत गरज आहे. म्हणूनच अशा स्थितीत सद्यस्थितीकडे स्त्रियांच्या दृष्टीकोनातून बघणं गरजेचं आहे. अशा वातावरणात हे नाटक मंचित होणं फार महत्त्वाचं आहे. मूळ ग्रीक नाटकाचा काळ ख्रिस्तपूर्व म्हणजे काळाच्या दृष्टीनं पक्का आहे. मात्र आजच्या जगात कोठे ना कोठे युद्धं सुरू असतं, हिंसेचं थैमान सुरू असतं. अशा स्थितीत एखादा देश किंवा एखादा काळ न दाखवता या भीषण समस्येचं वैश्विक रूप समोर आणणं महत्त्वाचं ठरतं.......