अजूनकाही
मुंबईतील बिगर–मराठी रंगभूमीवर सतत निरनिराळे प्रयोग होत असतात. हिंदी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाची नटी कल्की केकला यांनी २०२१ साली ‘The Elephant in the Womb’ हे चित्रपुस्तक लिहिलं. यात त्यांनी त्यांना आलेल्या गरोदरपणाच्या आणि मातृत्वाच्या अनुभवांची चर्चा केली आहे. आता या पुस्तकावर आधारित ‘Belly of the Beast’ हे इंग्रजी नाटक मंचित झाले आहे. आदित्य बिर्ला उद्योगसमूहाच्या ‘आद्यम’ या उपक्रमाखाली हे नाटक सादर झाले आहे.
सनातन काळापासून स्त्रीच्या जननक्षमतेबद्दल सर्व समाजांत कमी-अधिक प्रमाणात कुतूहल असल्याचे दिसून येते. एका बाजूने स्त्रीचा ‘जननी’ म्हणून सन्मान केला जातो, तर दुसरीकडे तिच्यावर अमानुष अत्याचार होत असतात. शिवाय तिच्यावर असंख्य प्रकारची बंधनं लादली जातात. या संदर्भात सर्वच समाज कमीअधिक प्रमाणात दोषी असल्याचे दिसते. असं असलं तरी जवळपास सर्व समाजांत स्त्रीच्या अदभुत जननक्षमतेबद्दल भीतीयुक्त आदर दिसून येतो. खुद्द स्त्रीलासुद्धा मातृत्वाची ओढ असते.
मात्र एकविसाव्या शतकातील तरुण स्त्रिया या समजांना आणि श्रद्धांना आव्हान देत आहेत. आज अनेक स्त्रिया ‘आम्हाला आई व्हायचं नाही’ असे ठामपणे सांगताना दिसतात. हे बरोबर की चूक हे ज्याचं त्याने (किंवा जिचं तिने) ठरवावं. मातृत्वाचे गोडवे गाणाऱ्या समाजाला गरोदरपणात आणि बाळंतपणात बाईला काय आणि किती त्रास होतो, याची कल्पनासुद्धा नसते. स्त्रीचं वाढत असलेलं वजन आणि पोट, शरीरात होत असलेले बदल, बाळंतपणात–गरोदरपणात कोणती काळजी घ्यावी, याबद्दल सल्ला देणारी आई व सासू, गर्भपात झाल्यास (किंवा केल्यास) नातेवाईकांत उडणारा हलकल्लोळ…वगैरे डोळ्यांत अंजन घालणारे (mother, a gift like no other) मुद्दे उपस्थित केले जातात.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
या व्यापक पार्श्वभूमीवर या नाटकाचा विचार करायचा आहे. प्रथम हे नमूद केलं पाहिजे की, या नाटकाला गोळीबंद कथानक नाही. यात विविध स्त्रियांना गर्भारपणाचे, बाळंतपणाचे तसंच मुलं वाढवतानाचे अनुभव सादर केले आहेत. नाटकातील अनेक प्रसंगांत रंगमंचावर पाच स्त्रिया आणि एक पुरुष वावरत असतात. संहितेतला वेगळा आशय व्यक्त करण्यासाठी ही स्त्री पात्रं विविध भूमिकांत शिरतात.
एका पातळीवर हे चर्चानाट्य आहे. यातील प्रत्येक स्त्रीला आलेला अनुभव प्रेक्षकांना अंतर्मुख करतो. स्त्री जर गरोदर होत नसेल, तर मग विविध वैद्यकीय व बिगर वैद्यकीय उपायांचा तिच्यावर मारा केला जातो. आजुबाजूंची सर्व यंत्रणा तिच्या गरोदर होण्याची वाट पाहते. प्रत्यक्षात तिला मात्र अनेकदा ‘त्या’ कोरड्या ओकाऱ्यांची किळस येत असते. शिवाय बाळंत होतानाच्या मरणप्राय यातना… याचा अर्थ असा खचितच नव्हे की, या नाटकात फक्त नकारात्मक विचार आहे. उलट असा प्रयत्न आहे की, मानववंश टिकून राहण्यासाठी वंशसातत्य गरजेचं आहे, याबद्दल वाद नाही. मात्र या संदर्भात स्त्रीच्या योगदानाची चर्चा करताना तिला प्रत्यक्षात होत असलेल्या त्रासाचे आणि मानसिक व शारिरीक वेदनांचे समाजाने भान ठेवले पाहिजे.
नाटकात पाच स्त्रिया केंद्रस्थानी आहेत. या भूमिका रॅशेल डिसुझा, शनाया राफात, श्रुती व्यास, अंबा शहानी के झाला आणि खुद्द कल्की केकला यांनी सादर केल्या आहेत, तर एकमेव पुरुषाच्या भूमिकेत केत्तन सिंग आहे. त्याची ही पहिलीच भूमिका असली, तरी ती त्याने चोखपणे केली आहे. खास करून पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणारा मराठी भाषिक पत्रकार आणि जाहिरात क्षेत्रातील अॅड फिल्मचा दिग्दर्शक.
या तशा अवघड नाटकाचे दिग्दर्शन शीना खलिद यांनी आणि सादरीकरण कल्की केकलाची नाट्यसंस्था ‘लिटल प्रॉडक्शन्स’तर्फे करण्यात आले आहे. एनसीपीएच्या जमशेटजी भाभा सभागॄहाच्या विस्तिर्ण रंगमंचावर हा प्रयोग सादर झाला होता. या नाटकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे याला लाइव्ह म्युझिक आहे. शीना खलिद यांनी या मोठ्या जागेचा चांगला वापर केला. नाटकाला संगीत देणाऱ्यांना रंगमंचाच्या उजव्या कोपऱ्यात बसवले होते. मागच्या बाजूला उंच, काही प्रमाणात पारदर्शक असलेले पडदे सोडले होते. यातून पात्र ये–जा करत होते. काही प्रसंगांत तर या पडद्यामागे जे घडत आहे, ते प्रेक्षकांना सावल्यांद्वारे दाखवण्यात आले. यामुळे सादरीकरणात वेगळेपणा तर आलाच, शिवाय काळ्या रंगामुळे प्रसंगांतील खल भाग प्रेक्षकांच्या मनावर ठसत होता. सादरीकरणात अनेकदा कळसूत्री बाहुल्यांचा कल्पक वापर केला आहे. या सर्वांमुळे सादरीकरण कमालीचे नेत्रदीपक झाले आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
पाचही कलाकारांनी आपापल्या भूमिका सफाईने आणि सहजतेने सादर केल्या आहेत. नाटकाची प्रकृती एका प्रकारे प्रचारकी असल्यामुळे आणि अनेक महिलांचे या संदर्भातील अनुभव सादर करायचे असल्यामुळे इतर नाटकांत जसं नटाला पात्राचा विकास दाखवावा लागतो, पात्रातील बदलांच्या आलेखाकडे कक्ष पुरवावे लागते, तसं इथं नाही. त्यामुळे असेल कदाचित सर्व पात्रं फार आत्मविश्वासाने रंगमंचावर वावरत होती.
आता कथानकाबद्दल. नाटकाच्या सुरूवातीला एक स्त्री म्हणते- ‘Where does one begin with stories like this?’ हे निरीक्षण महत्त्वाचे आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे या नाटकाला पांरपरिक म्हणजे आदी–मध्य–अंत प्रकारचे कथानक नाही. त्या संदर्भात हा प्रश्न समजून घेतला पाहिजे. म्हणूनच नाटकातील बहुतेक प्रत्येक कथेची सुरुवात ‘Once upon a time’ या वाक्याने होते. अर्थात याबद्दलसुद्धा इतर नट आक्षेप घेतातच.
सुमारे सव्वा दोन तास चालणारे हे नाटक नंतर नंतर मात्र कंटाळवाणे व्हायला लागते. मध्यंतर जेथे होते, त्याच्या आसपास जर नाटक संपले असते, तर त्याचा परिणाम अधिक गडद झाला असता. नाटकात स्त्रियांच्या जितक्या कथा आणि प्रसंग घेतले आहेत, तेवढे घेण्याची गरज नव्हती. त्याला कात्री लावून जर नाटक तासा–सव्वा तासात बसवले, तर परिणाम चांगला होईल. स्त्रियांच्या अनेक कथांत नंतर तोचतोचपणा येतो. एकदा स्त्रीला गर्भारपणात आणि बाळंतपणात होत असलेला त्रास लक्षात आला की, नंतरच्या कथा हेच आशयसूत्र पुन्हा पुन्हा सादर करतात. हे टाळता येऊ शकते. हा दोष नजरेआड केला, तर मात्र नाटकाची प्रेक्षकांना विचारात पाडण्याची क्षमता जबरदस्त आहे.
.................................................................................................................................................................
लेखक प्रा. अविनाश कोल्हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहेत.
nashkohl@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment