चीनमध्ये सर्वांत कठोर आणि सुरक्षित प्रवेश परीक्षा कशी घेतली जाते? चीनमध्ये नियम केवळ कागदावर नसून त्यांची काटेकोर अंमलबजावणीही केली जाते...
पडघम - विदेशनामा
आकाश
  • प्रातिनिधिक छायाचित्रं
  • Sun , 23 August 2026
  • पडघम विदेशनामा चीन China गाओकाओ Gaokao

अनुवाद - कॉ.भीमराव बनसोड

जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये एका विशिष्ट दिवशी संपूर्ण देश जणू स्तब्ध होऊन जातो. रस्त्यांवरील वाहतूक मर्यादित केली जाते, काही भागांतील रस्ते पूर्णपणे रिकामे केले जातात. परीक्षा केंद्रांच्या परिसरातून विमानांच्या उड्डाण मार्गातही आवश्यक ते बदल केले जातात. काही कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सेवांवर तात्पुरते निर्बंध घातले जातात. सर्वत्र पोलिसांचा कडक बंदोबस्त, अत्याधुनिक सर्व्हेलन्स कॅमेरे आणि प्रगत तंत्रज्ञानाची यंत्रणा सज्ज असते.

हे सर्व कशासाठी केले जाते?

कारण त्या दिवशी चीनमधील सुमारे १ कोटी ३३ लाखांहून अधिक विद्यार्थी एका अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेला बसलेले असतात. परीक्षा केंद्राबाहेर त्यांचे पालक चिंताग्रस्त नजरेने त्यांची प्रतीक्षा करत असतात. परीक्षा संपल्यानंतर अनेक पालक आपल्या मुलांचे पुष्पगुच्छ आणि शुभेच्छा देऊन स्वागत करतात. या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात मात्र पेपरफुटीची भीती अजिबात नसते. भारतात अनेकदा मोठ्या परीक्षांनंतर ‘पेपर फुटला का?’ हीच चर्चा सुरू होते. परंतु चीनमध्ये परीक्षा व्यवस्थेवर इतका विश्वास आहे की अशा प्रकारची भीती दिसून येत नाही.

भारतात NEET-2026 परीक्षेनंतर पेपरफुटीचे आरोप झाले. त्यामुळे पुन्हा परीक्षा घेण्याची वेळ आली. या पार्श्वभूमीवर ‘सुपर-३०’चे प्राध्यापक आनंद कुमार यांनी भारताने चीनसारखी कठोर परीक्षा व्यवस्था स्वीकारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

‘गाओकाओ’ म्हणजे काय?

भारतात बारावीनंतर दिल्ली विद्यापीठ, जेएनयू, बीएचयू किंवा इतर विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी विविध प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. त्याचप्रमाणे चीनमध्ये विद्यापीठ प्रवेशासाठी राष्ट्रीय उच्च शिक्षण प्रवेश परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला ‘गाओकाओ’ असे म्हणतात. विद्यार्थ्यांच्या संख्येवरून या परीक्षेचे महत्त्व लक्षात येते. या परीक्षेसाठी…

२०२० – १ कोटी ७ लाख विद्यार्थी

२०२१ – १ कोटी ७८ हजार विद्यार्थी

२०२२ – १ कोटी १९ लाख ३० हजार विद्यार्थी

२०२३ – १ कोटी २९ लाख १० हजार विद्यार्थी

२०२४ – १ कोटी ३४ लाख २० हजार विद्यार्थी

इतक्या मोठ्या प्रमाणावरील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी चीनने अत्यंत कठोर आणि शिस्तबद्ध व्यवस्था उभी केली आहे. ती पुढीलप्रमाणे आहे.

प्रश्नपत्रिका तयार करण्याची प्रक्रिया

‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तानुसार, परीक्षा होण्याच्या सुमारे तीन महिने आधी शाळा आणि विद्यापीठांमधील अनुभवी शिक्षकांची निवड केली जाते. या शिक्षकांना बीजिंगच्या बाहेरील सुरक्षित आणि निर्जन भागात नेले जाते. अनेकदा त्यांची व्यवस्था लष्करी तळावर किंवा विशेष सुरक्षा असलेल्या संकुलात केली जाते. त्यांना प्रश्नपत्रिकेची गोपनीयता कशी राखायची याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. या काळात त्यांना इंटरनेट वापरण्याची परवानगी नसते. कुटुंबीयांशी संपर्क साधण्यासाठी फक्त लँडलाईन फोन उपलब्ध असतो.

प्रश्नपत्रिका तयार झाल्यानंतर ती छपाईसाठी पाठवली जाते. संबंधित शिक्षकांना परीक्षा पूर्ण होईपर्यंत बाहेर जाण्याची परवानगी दिली जात नाही, जेणेकरून प्रश्नपत्रिका बाहेर जाण्याचा कोणताही धोका निर्माण होऊ नये.

प्रश्नपत्रिकेची छपाई आणि वाहतूक

चीनच्या शिक्षण मंत्रालयाच्या तसेच National Administration of State Secrets Protectionच्या देखरेखीखाली प्रश्नपत्रिकांची छपाई केली जाते. छपाई केंद्रांमध्ये २४ तास सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखरेख, सशस्त्र सुरक्षा रक्षक आणि अत्यंत कडक नियंत्रण असते.

छपाई पूर्ण झाल्यानंतर प्रश्नपत्रिका विशेष सुरक्षित गोदामात ठेवली जाते. त्यानंतर परीक्षा केंद्रांपर्यंत ती बुलेटप्रूफ वाहनांमधून पोहोचवली जाते. या वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा बसवलेली असते. २०२५पासून अशा वाहनांसोबत विशेष SWAT पथकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर किमान आठ पोलीस अधिकारी तैनात असतात.

परीक्षा केंद्रांवरील सुरक्षा

परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याची फिंगरप्रिंट आणि फेस रेकग्निशनद्वारे ओळख पडताळली जाते. चीटिंग रोखण्यासाठी परीक्षा केंद्राच्या सुमारे ५०० मीटर परिसरात ड्रोनद्वारे देखरेख ठेवली जाते. रेडिओ सिग्नल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर होऊ नये, यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत असते.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सेवांवर निर्बंध

‘द गार्डियन’ आणि ‘ब्लूमबर्ग’च्या वृत्तानुसार गाओकाओ परीक्षेदरम्यान चीनमधील अनेक मोठ्या AI कंपन्या काही सेवा तात्पुरत्या बंद करतात. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारल्यास AI उत्तर देत नाही. ByteDance, DeepSeek, Tencent, Alibaba आणि Moonshot AI यांसारख्या कंपन्यांनी परीक्षा काळात प्रश्नांची उत्तरे देणारी किंवा चित्र ओळखणारी काही वैशिष्ट्ये बंद ठेवली होती. यामागील उद्देश एकच—परीक्षेची निष्पक्षता कायम राखणे.

कोणकोणत्या संस्था सहभागी असतात?

गाओकाओ परीक्षेच्या सुरक्षिततेसाठी केवळ शिक्षण मंत्रालयच नव्हे, तर सार्वजनिक सुरक्षा मंत्रालय, राष्ट्रीय सुरक्षा मंत्रालय, राज्य इंटरनेट माहिती कार्यालय, राज्य गोपनीयता संरक्षण प्राधिकरण, सर्वोच्च जनन्यायालय, तसेच विविध पोलीस यंत्रणा एकत्रितपणे काम करतात.

पेपरफुटीच्या आरोपांवर तत्काळ कारवाई

२०२२मध्ये सोशल मीडियावर गाओकाओची प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप करण्यात आला होता. ‘ग्लोबल टाइम्स’च्या वृत्तानुसार, शिक्षण मंत्रालयाने तात्काळ सार्वजनिक सुरक्षा विभागाकडे चौकशी सोपवली. चौकशीत निष्पन्न झाले की, सोशल मीडियावरील स्क्रीनशॉट बनावट होते. परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका इंटरनेटवर आली नव्हती. काहींनी संपादित (Edited) केलेले स्क्रीनशॉट वापरून अफवा पसरवली होती.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

चीटिंग करणाऱ्यांला कठोर शिक्षा

‘टाइम’ मासिकाच्या २०१६च्या वृत्तानुसार, परीक्षा काळात चीटिंग करताना पकडलेल्या विद्यार्थ्यांना सात वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. तसेच त्यांना पुढील गाओकाओ परीक्षेसाठी अपात्र ठरवले जाऊ शकते. ‘China.org’च्या २०१५ च्या वृत्तानुसार चीटिंगच्या प्रकरणात ४२ जणांवर कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये २२ सरकारी अधिकारी होते. संबंधित अधिकाऱ्यांना पदावरून हटवून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

२०२२मध्ये एका परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका दहा मिनिटे उशिरा पोहोचली. परिणामी १२ अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली. काहींना पदावरून हटवण्यात आले.

यावरून चीनमध्ये नियम केवळ कागदावर नसून त्यांची काटेकोर अंमलबजावणीही केली जाते, हे स्पष्ट होते.

भारतासाठी धडा

भारतातही परीक्षा सुरक्षेसाठी अनेक नियम आहेत. मात्र त्यांची प्रभावी अंमलबजावणी होते का, हा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. २०२४मधील नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या आरोपांनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. कर्मचारी निवड आयोग (SSC)सारख्या परीक्षांमध्येही वेळोवेळी पेपरफुटीचे आरोप झाले. विद्यार्थी रस्त्यावर उतरले, आंदोलन झाले; परंतु दोषींवर नेमकी आणि तातडीची जबाबदारी निश्चित झाल्याचे चित्र अनेकदा दिसत नाही. प्रश्न असा आहे की, या वेळी तरी जबाबदारी निश्चित होईल का? की पुन्हा एकदा ‘येरे माझ्या मागल्या’सारखेच घडेल? काही दिवस चर्चा होईल आणि नंतर सर्व काही पूर्ववत होईल?

(‘खबरगांव’वरून साभार)

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

बिहारमधील एसआयआर : मतदार यादीची पडताळणी की मताधिकाराची पुनर्परीक्षा? महाराष्ट्रात चाललेल्या एसआयआर प्रक्रियेत हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जाणे गरजेचे आहे

प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क प्रत्यक्षात बजावता यावा याची खात्री करणे, हे निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी मतदार यादी हे एक साधन आहे. अंतिम उद्दिष्ट नाही. मृत व्यक्तींची नावे वगळणे आवश्यक आहे. दुबार नोंदी काढणे आवश्यक आहे. मतदार यादी अचूक ठेवणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियांचा अंतिम हेतू मतदाराला मतदानापासून वंचित करणे, हा नसून त्याचा मतदानाचा हक्क सुरक्षित करणे हा असतो.......

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......