अजूनकाही
.................................................................................................................................................................
‘तळटीप’ या नव्या भाषाविषयक प्रश्नांचा गंभीरपणे विचार करणाऱ्या नियतकालिकाचा नुकताच दुसरा अंक प्रकाशित झालाय. त्यात संपादकांनी मांडलेली भूमिका...
.................................................................................................................................................................
नुकत्याच झालेल्या जंतरमंतरवरच्या निदर्शनांच्या चर्चेत सगळ्यात जास्त चर्चेत आली ती जेन-झीची दुधारी भाषा. तिने ऐरणीवर आणलेले भाषाविषयक प्रश्न इतके भेदक आणि लक्षवेधी होते की, एरवी भाषेला महत्त्व न देणाऱ्या, भाषेविषयी बोलायला नाखूष असलेल्या लोकांनाही भाषेविषयी बोलायची वेळ आली. भाषा ही जणू काही आपली खाजगी स्थावरजंगम मालमत्ता आहे, अशा भासात जगणाऱ्या कित्येक भाषामालकांच्या लक्षात आले की, प्रमाणभाषा बदलतेय, भाषेचं पुनर्प्रमाणीकरण करायला हवं आहे आणि त्यासाठी आपल्या भाषिक चिंतनात या जेन-झीभाषेच्या केंद्रकांचा समावेशही करायला हवा आहे.
भाषा ही गोष्ट आपण किती गृहित धरतो (टेकन फॉर ग्रांटेड) हेही या निमित्ताने आता उघड होत आहे. ज्या आत्मविश्वासाने, आत्मियतेने आणि पोटतिडीकेने ही जेंझीय भाषा घडलेली आहे, ती बघता भाषावैज्ञानिकांनी अतिशय काळजीपूर्वक आणि जबाबदारीने भाषेचा अभ्यास करण्याची आणि त्याविषयी बोलण्याची गरज निर्माण झाली आहे.
कवितेमध्ये ही उपबोधनिर्देशित भाषा दीर्घकाळपासून वापरली जाते, त्यामुळे त्यांना त्यात नवे काही नाही. जर कवी लोकांना या भाषेचा धक्का बसला, तर त्यांच्या कवीपणावरच शंका घ्यायला हवी. कारण भाषेची सर्वांत जास्त मोडतोड, बंडखोरी आणि प्रयोगपरायणता कवितेत अनुभवायला मिळत असते. भाषेच्या जमीनदारीविरोधात पहिला बंडाचा झेंडा कवी सातत्याने न थकता पिढ्यानपिढ्या रोवत आलेले आहेत. कवितेची भाषा ही उपबोधनिर्देशित असते. माध्यमे, प्रसारतंत्रे, राजकीय/बाजारव्यवस्था यांचे जे दैनंदिन संज्ञापन असते त्या मार्गे इच्छा, एषणा, भय, आकांक्षा इत्यादींचे अनेकानेक सांस्कृतिक संकेत यांनी भारलेले एक मानसक्षेत्र तयार होते. ते म्हणजेच उपबोध.
बोध हे जाणीवपूर्वक स्वीकारलेले किंवा पत्करलेले ज्ञान असते या उलट उपबोध नकळत साठलेले संदर्भ आणि पूर्वपरिचित संबंध यांनी तोललेला, संदर्भनिर्देशित प्रांत असतो. उदा., कॉल हा बोध आहे आणि मिस्ड कॉल हा उपबोध आहे. उपबोध ही संकल्पना अवचेतन (Subconscious), संदर्भनिर्देशशास्त्र (Pragmatics) आणि चिन्हपर्यावरण (Semiotic environment) या तीन संकल्पनांवर आधारित आहे. (भाषेचं फुटकं ड्रेनेज/उपबोधाख्यान, सलील वाघ, महाराष्ट्र टाईम्स मे/जून २०१०)
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
जेंझीय भाषा ही कवितेच्या म्हणजे उपबोधनिर्देशित भाषेला जास्त जवळची भासते. याची कारणे काय आहेत हा तपशीलात विचार करण्याचा मुद्दा आहे. कोणत्याही भाषारूपाची निर्मिती अकस्मात होत नाही. त्यामागे काही काळापासून अनेक वेगवेगळ्या स्तरांवर आणि दिशांनी भाषिक प्रक्रिया घडत असतात. त्या जडणघडणींचा मागोवा आता भाषाभ्यासकांना आणि समाजचितकांना घ्यावा लागेल. जेंझीय भाषेत किंवा जेझीभाषेत मीम्स या संकल्पनेला केंद्रीय महत्त्व आहे. पारंपरिक भाषाभ्यास किंवा साहित्यशास्त्राच्या अभ्यासात पदिम, रूपिम, प्रतिक, प्रतिमा अशा सर्व संकल्पनांपेक्षा वेगळ्या अशा या घटकाचा/एककाचा हा वावर गेल्या दोन दशकांपासून प्रभावी भूमिका बजावतो आहे. चिन्हार्थाच्या पुनर्रचनेचे काम (Resemiotization) करणाऱ्या मीम्स या संकल्पनेवर पारिजात पंड्या या तरुण अभ्यासकाचा मीम्सवरचा निबंध तळटीपच्या या अंकात आहे, तो वाचनीय ठरेल आणि समयोचितही.
या लेखाप्रमाणेच स्नेहल महाजन यांचा, भाषेचा जैविक आणि सामाजिक पाया हा केवळ ध्वनिचिन्हात्मक नसून तो मेंदू, ज्ञानेंद्रियांची उत्क्रांती, जनुकीय विचलने वा परिवर्तने, जनुकशास्त्र आणि मानवी स्थलांतराच्या प्रक्रियांचा मागोवा घेत आकलनाच्या आवाक्यात येतो हे मांडणारा, वर्तमान भाषारूपांच्या जटील व्यवस्थेचा वेध घेणारा लेखही अभ्यासकांना विचारप्रवृत्त करेल असा विश्वास वाटतो.
समकालीन भाषिक वास्तवाचा हा वेध घेताना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते - भाषेतील प्रत्येक नवीन रूप, प्रत्येक प्रयोग आणि प्रत्येक भाषिक बदल यामागे एक दीर्घ ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रक्रिया कार्यरत असते. आजच्या भाषिक घडामोडींचे आकलन केवळ वर्तमानाच्या चौकटीत होऊ शकत नाही; त्यासाठी इतिहास, व्युत्पत्ती, पाठपरंपरा किंवा संहिता, समाजभाषाविज्ञान, व्याकरण, साहित्य आणि सांस्कृतिक अभ्यास या सर्व क्षेत्रांशी संवाद साधावा लागतो.
प्रस्तुत अंकातील लेख हीच व्यापक दृष्टी विविध अंगांनी विकसित करतात. प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेपासून आधुनिक भाषावैज्ञानिक चिंतनापर्यंत, क्षेत्रीय बोलींच्या दस्तऐवजीकरणापासून छंद-वृत्त, समीक्षा आणि भाषांतराच्या प्रश्नांपर्यंत, तसेच ग्रंथचिकित्सा, पुस्तकपरीक्षणे आणि संशोधकांच्या अनुभवविश्वापर्यंत पसरलेला हा वैचारिक प्रवास भाषेला एका अखंड सांस्कृतिक उपक्रमाच्या मापात समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
याच व्यापक संदर्भातून अंकातल्या विविध लेखांकडे पाहिले तर भाषा ही केवळ अभिव्यक्तीचे माध्यम नाही; ती मानवसमूहांच्या बहुरेषीय संस्कृतीची स्मृती, इतिहास-परंपरांचे एक संग्रहालय आणि ज्ञाननिर्मितीचे सर्वांत प्रभावी साधन आहे हे लक्षात येईल. समाजाचे अनुभव, मूल्यव्यवस्था, श्रद्धा, विचार, संघर्ष आणि सर्जनशीलता यांची नोंद शेवटी भाषेतच होत असते. म्हणूनच भाषेचा अभ्यास हा शब्द, ध्वनी किंवा व्याकरण यांच्या चौकटीत मर्यादित राहत नाही. तो इतिहास, पुरातत्त्व, व्युत्पत्ती, पाठचिकित्सा, भाषांतर, समाजभाषाविज्ञान, साहित्य, समीक्षा आणि सांस्कृतिक अभ्यास अशा अनेक ज्ञानशाखांशी सतत संवाद साधत राहतो.
गेल्या काही दशकांत या संवादाचे स्वरूप अधिक व्यापक झाले आहे. भाषेकडे केवळ संरचनात्मक प्रणाली म्हणून न पाहता, मानवी संस्कृतीच्या गुंतागुंतीच्या अनुभवांचे अर्थकारण करणारी व्यवस्था म्हणून पाहण्याची गरज आहे. तळटीपच्या अंकातील लेख, मुलाखती, टिपणे आणि पुस्तकपरीक्षणे ही या समावेशक धोरणाचाच भाग आहेत. भाषेकडे मानवी ज्ञानपरंपरेची मध्यवर्ती संकल्पना म्हणून पाहण्याची भूमिका असल्याने विषयांची विविधता असूनही त्यांना जोडणारा समावेशकतेचा समान धागा यात वाचकांना आढळेल.
कोणत्याही ज्ञानपरंपरेची विश्वासार्हता ही तिच्या स्रोतांवर उभी असते. इतिहासाची पुनर्मांडणी असो, व्याकरणग्रंथाचे पुनर्संपादन असो किंवा एखाद्या ऐतिहासिक समजुतीची चिकित्सा असो भाषिक अभ्यासाची पहिली अट म्हणजे उपलब्ध पुराव्यांचे संयमी आणि चिकित्सक वाचन. म्हणूनच या अंकातील काही लेख इतिहासापेक्षा इतिहासलेखनाच्या पद्धतीविषयी अधिक बोलतात. ते आपल्याला निष्कर्षांपेक्षा ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया समजावून सांगतात.
प्रसाद बर्वे यांनी जगज्जीवनपूर येथील पालकालीन बौद्ध विहाराच्या उत्खननाचा घेतलेला वेध हा त्याचा उत्तम नमुना आहे. एका ताम्रपटाच्या शोधामुळे इतिहासाच्या पानांवरून जवळजवळ लुप्त झालेल्या एका राजघराण्याचा माग पुन्हा कसा सापडतो, पुरातत्त्वीय पुरावे इतिहासाच्या प्रस्थापित मांडणीत कोणते बदल घडवू शकतात आणि भौतिक अवशेष ज्ञाननिर्मितीचे साक्षीदार कसे ठरतात, हे या लेखातून स्पष्ट होते. त्याचप्रमाणे मुक्ता केसकर यांचा काशिकावृत्तीच्या संगणकसाहाय्यीकृत चिकित्सक आवृत्तीवरील लेख आधुनिक पाठचिकित्सेचे बदलते स्वरूप उलगडतो. हस्तलिखितांच्या वाचनापासून डिजिटल संपादनापर्यंतचा प्रवास हा केवळ तांत्रिक बदल नाही; ते ज्ञानसंपादनाच्या प्रक्रियेतील तपशीलांचे अनुभवाधारित वर्णन आहे.
भारतीय व्याकरणपरंपरेचा अभ्यास आज आंतरराष्ट्रीय सहकार्य, डिजिटल साधने आणि नवीन संपादनपद्धती व तंत्रे यांच्या साहाय्याने कसा नव्या टप्प्यावर पोहोचला आहे, याचे प्रभावी चित्र या लेखातून उभे राहते. विद्यागौरी टिळक यांचा लेख या चर्चेला आणखी एक परिमाण जोडतो. लोकप्रिय इतिहास आणि अभ्यासाधिष्ठित इतिहास यांतील फरक अधोरेखित करत त्यांनी मराठेशाही आणि मुद्रणकलेविषयी रूढ झालेल्या एका समजुतीची मूळ साधनांच्या आधारे चिकित्सा केली आहे. आज माहितीचा वेग अभूतपूर्व असला, तरी अभ्यासाचा वेग पुराव्यांच्या संयमी वाचनानेच ठरतो, याची जाणीव हा लेख करून देतो.
अशा प्रकारे जगज्जीवनपूर, काशिकावृत्ती आणि मुद्रणकलेवरील हे तीनही लेख इतिहास, पुरातत्त्व, पाठचिकित्सा आणि स्रोतसमीक्षा यांना एका समान चिकित्सक चौकटीत आणतात. ज्ञाननिर्मितीचा पाया हा मतांवर नव्हे, तर पुराव्यांवर उभा असतो, हा त्यांचा सामायिक संदेश आहे.
इतिहासाचा शोध घेताना संशोधकाला अखेरीस भाषेकडेच परत यावे लागते. कारण शब्द हेही पुरावे असतात. ते आपल्या अंगी अनेक शतकांचे अनुभव, अर्थच्छटा आणि सांस्कृतिक स्मृती जपून ठेवतात. एखाद्या शब्दाचा इतिहास शोधणे म्हणजे त्या समाजाच्या विचारपद्धतीचा मागोवा घेणे; एखाद्या ग्रंथातील भाषिक निर्देशांचा अभ्यास करणे म्हणजे त्या काळातील सामाजिक वास्तवाशी संवाद साधणे. म्हणूनच भाषेचा इतिहास हा केवळ ध्वनीबदलांचा किंवा व्याकरणपरिवर्तनांचा इतिहास नसून अर्थनिर्मितीचा, सांस्कृतिक स्मृतीचा आणि बदलत्या मानवी अनुभवांचा इतिहास आहे.
या संदर्भात सुनिला गोंधळेकर यांचा नाट्यशास्त्रविषयक लेख विशेष लक्षवेधी ठरतो. नाट्यशास्त्रातील प्रादेशिक भाषांच्या उल्लेखांचा त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संदर्भात पुनर्विचार केला आहे. भाषांचे वर्गीकरण हे निव्वळ भाषिक प्रश्न नसून ते तत्कालीन समाजरचनेशीही जोडलेले असते, ही जाणीव या लेखातून प्रकर्षाने पुढे येते.
दुसरीकडे माधवी कोल्हटकर यांनी वैदिक लक्ष्मी या संकल्पनेच्या व्युत्पत्तीचा घेतलेला शोध शब्दांच्या इतिहासातून सांस्कृतिक इतिहास कसा उलगडतो, याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. एखादा शब्द आपल्या मूळ अर्थातून पुढे जात असताना समाजाच्या मूल्यव्यवस्थेतही बदल घडत असतात; व्युत्पत्तीशास्त्र हे त्या बदलांचे सूक्ष्म दस्तऐवजीकरण असते, हे या लेखातून स्पष्ट होते.
याच प्रवाहात मयूर गोहाड यांचा फ्रेंच भाषेच्या इतिहासावरील लेख आणि उमेश कोचरेकर यांचा व्युत्पत्तीशास्त्र व द्वितीय भाषा-अधिग्रहण यांतील संबंध स्पष्ट करणारा लेख हे दोन वेगवेगळे, पण परस्परपूरक दृष्टिकोन मांडतात. एका बाजूला भाषेचा ऐतिहासिक विकास आहे; दुसऱ्या बाजूला त्या इतिहासाचा आधुनिक भाषा-अध्यापनात होणारा उपयोग आहे. भाषेचा भूतकाळ आणि वर्तमान यांना जोडणारा हा संवाद या अंकातील एक महत्त्वाचा बौद्धिक धागा ठरावा.
भाषेचा इतिहास जितका महत्त्वाचा, तितकेच महत्त्व तिच्या वर्तमानातील विविधतेचेही आहे. भाषेचे वैभव तिच्या प्रमाणरूपाइतकेच तिच्या बोलीरूपांतही सामावलेले असते. भूगोल, स्थलांतर, व्यवसाय, धार्मिक परंपरा, सामाजिक संपर्क आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांच्या दीर्घ प्रक्रियेतून बोलीभाषा आकार घेतात. त्यामुळे त्यांचा अभ्यास हा केवळ ध्वनिविचार, रूपविचार किंवा वाक्यरचनेचा अभ्यास राहत नाही; तो एका समाजाच्या सांस्कृतिक स्मृतीचा, त्याच्या जीवनपद्धतीचा आणि ऐतिहासिक अनुभवांचा शोध ठरतो. जागतिकीकरण, नागरीकरण आणि प्रमाणभाषेच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक बोली झपाट्याने बदलत असताना त्यांचे दस्तऐवजीकरण अधिकच आवश्यक बनले आहे.
या संदर्भात नेहा सावंत यांनी उत्तर वसईतील सामवेदी ख्रिस्ती समाजाच्या कुपारी बोलीचा केलेला अभ्यास आणि अपर्णा झा यांनी हलबी-कोष्टी या मराठीच्या पोटभाषेचे केलेले भाषाशास्त्रीय विश्लेषण हे महत्त्वाचे आहे. दोन्ही अभ्यास हे प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षणावर (Fieldwork) आधारित असून ध्वनिवैज्ञानिक, रूपवैज्ञानिक आणि व्याकरणिक वैशिष्ट्यांबरोबरच त्या त्या भाषिक समुदायांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचाही विचार त्यात केला आहे. भाषिक संपर्क, स्थलांतर आणि सामाजिक परिवर्तन यांच्या ओघात भाषेची रूपे कशी घडत जातात, तसेच बोलीभाषा या समाजाच्या सांस्कृतिक इतिहासाच्या जिवंत साक्षीदार कशा ठरतात, याचे प्रभावी दर्शन या दोन्ही लेखांतून घडते.
भाषेचे सामाजिक आणि ऐतिहासिक आयाम जितके महत्त्वाचे आहेत, तितकीच तिची बौद्धिक परंपराही महत्त्वाची आहे. समीक्षा, व्याकरण आणि छंदशास्त्र या तीनही शाखांनी मराठीतील भाषिक आणि साहित्यिक चिंतन समृद्ध केले आहे. परंपरेचा केवळ गौरव करण्याऐवजी तिचे चिकित्सक पुनर्वाचन करणे, प्रस्थापित संकल्पनांना नव्या संदर्भांत तपासून पाहणे आणि आवश्यक तेथे नव्या मांडणीचा आग्रह धरणे, हेच ज्ञानसाधनेचे खरे सत्व आहे. प्रस्तुत अंकातील काही लेख हीच चिकित्सक परंपरा नव्या संदर्भांत पुढे नेताना दिसतात.
जयश्री पाटणकर यांनी कृ. ना. आठल्ये यांच्या कार्याच्या निमित्ताने मराठीतील चिकित्सक समीक्षापरंपरेचा मागोवा घेत तिच्या वैचारिक अधिष्ठानाचा वेध घेतला आहे. त्यांच्या लेखात कृ. ना. आठल्ये यांच्या केरळकोकिळ मासिकाद्वारे घडवलेल्या मराठी साहित्यसमीक्षेच्या परंपरेचा आढावा घेतला आहे. व्याकरण, छंद, शुद्धता आणि साहित्यिक गुणवत्तेचा आग्रह धरणाऱ्या आठल्ये यांनी निर्भीड व तिरकस टीकेद्वारे मराठी साहित्याला चिकित्सक दृष्टी दिली.
आठल्ये हे प्रबोधनकार ठाकरे यांचे गुरू. प्रबोधनकारांच्या कुशाग्र आणि तेखदार (शब्दश्रेय-ठाकरे) भाषेचे रहस्य समजून घेण्यासाठी आठल्येंचे समग्र लेखन आवर्जून वाचायला हवे. एकोणीसाव्या शतकात अनेक वेगवेगळ्या पॉकेट्समधून मराठी भाषा अशी रसरशीतपणे फुलुन आलेली आढळते याच एक कारण तिला मिळालेल्या इंग्रजीच्या बुस्टर डोसमधे असावं. डॉ.मीना वैशंपायन यांचा लेख प्रा०कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त (२०२६) लिहिलेला आहे. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ‘अद्वैतवेदान्तकोविद’ पदवी मिळवणाऱ्या अर्जुनवाडकरांनी मो०के०दामले यांच्या व्याकरणाची संपादित आवृत्ती व मम्मटाच्या 'काव्यप्रकाश'ची चिकित्सक आवृत्ती सिद्ध केली; शिवाय ‘पंतोजी’ नावाने सामान्यजनांसाठी व्याकरणाचे धडे आणि ‘कण्टकार्जुन’ या टोपणनावाने संस्कृत रचनाही केल्या. त्यांच्या या बहुआयामी व्यासंगाचे चित्रण करून त्यांच्या व्याकरणविषयक संशोधनाचे, अध्यापनाचे आणि मराठी व्याकरणाभ्यासाला दिलेल्या विद्वत्तापूर्ण योगदानाचे स्मरण केले आहे. विवेक काणे यांनी गझलच्या छंदरचनेचा अरबी–फारसी, संस्कृत आणि मराठी परंपरांच्या तुलनात्मक संदर्भात पुनर्विचार करून मराठी छंदशास्त्रातील काही प्रस्थापित समजुतींना नव्याने तपासण्याचा प्रयत्न केला आहे. आशय आणि विषय वेगळे असले, तरी या सर्व लेखांना जोडणारा समान धागा म्हणजे चिकित्सक विचारांची परंपरा. ज्ञानाचा वारसा जपण्याइतकेच त्याचे पुनर्परीक्षण करणेही आवश्यक असते, याची जाणीव हे दोन लेख प्रभावीपणे करून देतात.
संशोधनाचा इतिहास हा केवळ ग्रंथांचा इतिहास नसतो; तो संशोधकांच्या जिज्ञासेचा, अनुभवांचा आणि बौद्धिक प्रवासाचाही इतिहास असतो. या अंकातील दोन विस्तृत मुलाखती या दृष्टीने विशेष महत्त्वाच्या आहेत. चारहून अधिक दशके भाषाभ्यासाच्या आणि भाषाध्ययनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या या भाषाविदांची दीर्घ मुलाखत मराठीत प्रथमच प्रकाशित होत आहे.
डॉ. नीती बडवे यांच्याशी झालेल्या संवादातून भाषाभ्यास, भाषांतर, तौलनिक साहित्य, अध्यापन, दृश्यकला आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अनुभव यांचा बहुआयामी पट उलगडतो. प्रा. डॉ. रमेश धोंगडे यांच्या अनौपचारिक मुलाखतीत क्षेत्रीय भाषासंशोधन, शैलीविज्ञान, भाषा-अध्यापन आणि भाषेकडे पाहण्याचा व्यापक मानवी दृष्टिकोन समोर येतो. ज्ञाननिर्मिती ही केवळ माहिती संकलित करण्याची प्रक्रिया नसून सातत्याने प्रश्न विचारत राहण्याची वृत्ती आहे, याची प्रचीती या दोन्ही संवादांतून येते. शर्मिष्ठा खेर, आसावरी गोखले आणि मृणाल धोंगडे यांनी अनेक अडचणी व अडथळ्यांवर मात करून अनुक्रमे नीतिताई आणि धोंगडे सरांची मुलाखत यशस्वीपणे साकार केली आहे. भाषाभ्यासकांना दोन्ही मुलाखती आकर्षक आणि प्रेरक ठरतीलच शिवाय भाषाध्ययनाचे संदर्भ साहित्य म्हणूनही त्या उपयोगी पडतील असा विश्वास वाटतो.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
भाषाज्ञानाच्या अभ्यासक्षेत्रात पुस्तकपरीक्षणांचे स्थानही तितकेच महत्त्वाचे आहे. चिकित्सक परीक्षण हे एखाद्या ग्रंथाचा परिचय करून देण्यापुरते मर्यादित राहत नाही; ते त्या ग्रंथाचे संशोधनातील स्थान, त्याची कार्यपद्धती, त्याचे योगदान आणि पुढील अभ्यासासाठी उघडणाऱ्या शक्यता यांचेही मूल्यमापन करत असते. या अंकातील पुस्तकपरीक्षणांचा विभाग याच अर्थाने उल्लेखनीय आहे. जयश्री पाटणकर यांच्या ग्रंथसंचाचे अनुराधा मोरे यांनी केलेले मूल्यमापन, नीती बडवे यांच्या पुस्तकत्रयीचा शुभांगी पातुरकर यांनी घेतलेला चिकित्सक परामर्श, भालचंद्र नेमाडे यांच्या भाषाशास्त्रीय संशोधनग्रंथाच्या मराठी अनुवादाचे मधुरा दामले यांनी केलेले परीक्षण, डॉ. मिलिंद मालशे यांच्या सोस्यूर ते चॉम्स्की या भाषांतरग्रंथाचा विजया देव यांनी घेतलेला अभ्यासपूर्ण आढावा आणि डॉ. अमोल वाघमारे यांच्या मावळी बोली आणि महादेव कोळी समाजजीवन या संशोधनग्रंथाचे मानसी केळकर यांनी केलेले परीक्षण—ही सर्व परीक्षणे संशोधनसंवाद अधिक समृद्ध करणारी ठरतात. चिकित्सक वाचन ही ज्ञाननिर्मितीची अविभाज्य प्रक्रिया आहे, याची जाणीव हा विभाग करून देईल अशी आशा आहे.
अंकाच्या प्रारंभी निर्मला कुलकर्णी यांचे ‘सुखदायी पाण्याच्या निमित्ताने’ हे लघु टिपण आहे. वैदिक ‘मयोभूः’ या शब्दाच्या निमित्ताने भाषेच्या आशयविश्वाकडे पाहण्याची संवेदनशील दृष्टी या टिपणातून उमटवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. याशिवाय, भटक्या व स्थलांतरित समाजातल्या मुलांसाठी डोअरस्टेप फाऊंडेशन ह्या संस्थेने अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी भाषाशिक्षणाची पुस्तके तयार केली आहेत. आसावरी गोखले यांनी त्या पुस्तकांचा थोडक्यात परिचय करून दिला आहे.
तळटीपचा प्रयत्न नेहमीच भाषा, भाषाविज्ञान, व्याकरण, कोशविज्ञान, साहित्य, भाषांतर आणि सांस्कृतिक अभ्यास या विविध ज्ञानक्षेत्रांमध्ये विधायक संवाद घडवून आणण्याचा राहिला आहे. यात ‘झपुर्झा’पासून ते ‘वास्ते गुना हुइया’पर्यंत भाषेच्या सगळ्या संकेतरूपांची तत्पर दखल आहे, प्राचीन भारतीय व अन्यही ज्ञानपरंपरेचा चिकित्सक अभ्यास आहे, जनुकशास्त्रीय भाषावेध आणि आधुनिक भाषावैज्ञानिक चिंतन आहे; क्षेत्रीय बोलींचे जिवंत दस्तऐवजीकरण आहे, तसेच व्युत्पत्ती, छंदशास्त्र, समीक्षा आणि पाठचिकित्सेचा सखोल विचारही आहे. ज्ञाननिर्मिती हा कुठला अंतिम निष्कर्षरूप टप्पा नसून सतत चालणारा प्रश्नांचा आणि संवादाचा प्रवास आहे, या विश्वासातून या अंकाची जडणघडण झाली आहे. प्रस्तुत अंक त्या विश्वासाला पात्र ठरतो आहे की नाही हे वाचकांनी सांगावे. या अगोदरच्या अंकाला मिळालेला प्रतिसाद अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त चांगला होता. या ही अंकाला तसा प्रतिसाद मिळाला तर अजून काही महत्त्वाकांक्षी योजना आखण्याची ऊर्मी तळटीपला मिळू शकते.
taltipfootnote@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment