.................................................................................................................................................................
मानवी मनाची जडणघडण विचारात घेतली, तर मला वाटते की, लग्नाचे हे गारुड मानवी समाजात आपले स्थान टिकवून राहील! लग्नसंस्था सर्व कालखंडात टिकून राहिली आहे. मानवाच्या सर्व संस्कृतींमध्ये आणि समाजांमध्येही ती आपले स्थान टिकवून आहे. याला कारण म्हणजे लग्नसंस्था मानवाच्या अगदी मूलभूत अशा प्रेरणांशी एकरूप होऊन गेलेली आहे. मानवाच्या शारिरिक, मानसिक, सामाजिक आणि नैतिक या सर्व प्रेरणांचा समन्वय लग्नसंस्थेमध्ये साधला जातो. म्हणून तर सर्व धर्म लग्नसंस्थेला सामावून घेताना दिसतात. हिंदू धर्माने तर विवाहाला एक प्रमुख संस्कार मानले आहे. हिंदू धर्माप्रमाणे विवाह हे एक नैतिक आणि आध्यात्मिक कर्तव्य आहे. विवाह, माणसाच्या उत्कट इच्छांना सुंदर शिस्त लावतो. शिवाय, मुलांच्या संगोपनासाठी तो एक अत्यंत सुरक्षित चौकट तयार करतो.
.................................................................................................................................................................
विवाहसंस्था गेली कित्येक सहस्त्रके मानवी समाजाचा आणि संस्कृतीचा कणा बनून राहिली आहे. दोन तीरांमधून नदीने वाहत जावे, तशी मानवी संस्कृती स्त्री-पुरुष संबंधांच्या तीरांमधून वाहत आली आहे. दोन तीरांच्या बंधनात नदी वाहत असते, तीर नसतील तर पाणी भटकत जाते. नदीचा ओघ आणि तिचे नदीपण फिसकटत जातो. विवाहसंस्था नसेल तर संस्कृती संकृती राहत नाही.
संस्कृती आणि मानवी जीवन लग्नसंस्थेशिवाय फिसकटत जाते. म्हणूनच लग्न म्हणा किंवा विवाहबंधनातले सहजीवन म्हणा यांचे गोडवे नेहमीच गायले जात असतात. एकंदर तीरांची बंधने पाळल्यामुळे ओघ अबाधित राहिला, तरी नदीत सगळे स्थिर-स्थावर नसते. कुठे भोवरे असतात, कुठे धबधबे खळबळ माजवतात, कुठे डोह साचून पाणी गढूळ होते. लग्नाने आणलेल्या स्थिरतेच्या प्रवाहातसुद्धा अनेक गोंधळ माजतात. अस्वस्थता, असंतोष, कंटाळा, नात्याच्या अपूर्णत्वामुळे आलेली बंडखोरी अशा कितीतरी गोष्टी.
विवाहसंस्था गेली कित्येक सहस्त्रके कायम असली, तरी कालानुरूप तिच्यात अनेक बदल होत आले आहेत. गेल्या ३०-३५ वर्षांत काय संक्रमणे जाणवत गेली, या विषयीचा ही काही निरीक्षणे!
या लेखात मुख्यत्वेकरून मध्यमवर्गाविषयी लिहिले आहे. आज मध्यमवर्ग अनेक बाबतीत त्याच्या कळत-नकळत जातीच्या पलीकडे गेला आहे, ‘पॅनइंडियन’ झाला आहे. भारतीय स्तरावर बघायला गेलं, तर जीवनमूल्यांच्या बाबतीत एकसारखा झाला आहे. हा वर्ग आज इतर वर्गांसाठी एक ‘ट्रेंडसेटर’ बनून राहिला आहे. म्हणून या वर्गाची चर्चा!
२५-३० वर्षांपूर्वी लग्न ही मूलतः सामाजिक गोष्ट होती. लग्नामागच्या प्रेरणा, स्वप्ने आणि अपेक्षा वैयक्तिक होत्या, परंतु या सगळ्याच्या मागे सामाजिक वास्तवाची पार्श्वभूमी होती. लग्न शक्यतो जातीमध्ये होणे आणि योग्य वयात होणे आवश्यक होते, आई-वडिलांच्याच काय, परंतु समग्र समाजाचे आशीर्वाद लग्नासाठी आवश्यक होते. लग्ने प्रामुख्याने एक सामाजिक घटना म्हणून होत होती.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
याचा अर्थ असा नाही की, सगळेच लोक अशा सामाजिक लग्नाला बळी पडत होते. याच काळात काय, पण अगदी पूर्वापार काळापासून लग्नाला वैयक्तिक गोष्ट मानून अत्यंत मनस्वीपणे ज्या व्यक्तीविषयी अगदी मनापासून प्रेम वाटते आहे, त्याच व्यक्तीशी लग्न करणारे आणि अत्यंत प्रगल्भ सहजीवन जगणारे लोक होते, परंतु त्यांची संख्या नगण्य होती. बाकी सारे, मुलगा वा मुलगी पाहून लग्न करणारे. इथे जाता जाता सांगावेसे वाटते की, प्रेमविवाह ही अत्यंत मनस्वी गोष्ट असली, तरी ती प्रगल्भ सहजीवनाची गॅरंटी असतेच असे नाही, परंतु अशी सुरुवात होणे चांगले कसे ठरते, हे आपण पुढे पाहूच.
माझ्या पिढीविषयी बोलायचे तर काही लग्ने सोडली, तर लग्न हा मुख्यतः सामाजिक विषय होता. त्यामुळे लग्न करताना हिशोब महत्त्वाचे होते. जातपात, सामाजिक प्रतिष्ठा, पैसा पाणी, मालमत्ता या गोष्टींना प्राधान्य दिले जात होते. या प्रकारात बहुतांश वेळा, आपल्या आवडीनिवडी, व्यक्तिमत्त्व, स्वप्ने या सगळ्यांचे बळी लग्नाच्या वेदीवर चढवले जात. प्रेम हा प्रकार लग्न झाले की, तयार होत जातो, अशी धारणा होती. आधी प्रेम आणि नंतर लग्न याऐवजी आधी लग्न आणि नंतर प्रेम अशी योजना होती.
कथा, कविता, सिनेमे, नाटके आणि इतर कलाप्रकारांत प्रेमाचे गोडवे गायले जायचे, परंतु समाजात गोडवे खऱ्या अर्थाने ठरवून केलेल्या लग्नांचेच गायले जात. प्रेम जसे पहिल्या नजरेत तयार होते, तसे ते सहवासानेही तयार होते, ही गोष्ट मान्य करता येण्यासारखी आहे. लग्न झाल्यावर प्रेम तयार होते. या प्रकारात उत्कटता आणि झिंग थोडी कमी असली, तरी सहवासामुळे काही जोडप्यांमध्ये सखोल प्रेम तयार होते. हे फारच लकी लोक! बाकी ठरवून लग्न केलेल्या लोकांच्या बाबतीत बघायला गेलं, तर यातली बहुतांश जोडपी लग्नानंतर एकमेकांच्या बरोबर राहण्याच्या सवयीलाच ‘प्रेम’ म्हणत राहतात.
मी कॉलेजात असताना म्हणजे १९८५च्या सुमारास माझ्या अनेक मैत्रिणींनी आईवडील सांगतील त्या मुलाशीच आम्ही लग्न करणार असे ठरवून ठेवले होते. ‘आम्ही नाहीत तसल्या मुली’, असा सगळा आविर्भाव होता. जे काही धर्माने ठरवले आहे, जे काही रूढी आणि समजाने ठरवले आहे, जे काही आईवडील ठरवणार आहेत, त्यात आपण कशाला चबढब करा, असा अनेक मुलींचा विचार होता. या मुलींना आपल्या आयुष्यातल्या सर्वांत महत्त्वाच्या निर्णयाची जबाबदारी स्वतःवर नको होती, असे मला तेव्हा वाटे, अजूनही वाटते. ही त्या काळची प्रातिनिधिक भूमिका होती.
यात मुलांचीही भूमिका फारशी वेगळी नव्हती. त्यांना निर्णयाची जबाबदारी स्वीकारायची होती, अशातलीही गोष्ट नव्हती. बहुतांश मुलेही जातपात, आईवडील वगैरे बाजू सांभाळून लग्न करण्याच्याच वृत्तीचीच होती. परंतु लग्न-संस्था पुरुषांच्या बाजूने झुकलेली असल्याने, या मुलांना आत्मभान न बाळगण्याची भावनिक किंमत फारशी भरावी लागणार नव्हती. माझ्याबरोबरच्या मुलींना ती भरावी लागली.
या पद्धतीने लग्न केल्यावर संसार झाले, मुले-बाळे झाली, फ्लॅट झाले, सोने-नाणे झाले, अगदी सगळे झाले; परंतु सफळ संपूर्ण असे सहजीवन झाले का, असा प्रश्न आज विचारावासा वाटतो. असे लग्न झाल्यावर, एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वांच्या मंथनातून भावनिक आणि तात्त्विक विकास होत गेला का, असा प्रश्न विचारल्यावर ‘हो’ असे उत्तर येते. परंतु सोशल मीडियावरील अनुभवाने माझ्या लक्षात आले आहे की, दहातल्या साडेनऊ वेळा हे उत्तर खोटे आणि दांभिक असते.
आजकाल व्हॉट्सअॅ, फेसबुक वगैरे सोशल मीडियामुळे खुपशा मैत्रिणी आणि खूपसे मित्र परत ‘कनेक्ट’ झाले आहेत. खूप साऱ्या मैत्रिणी पूर्वीप्रमाणे फक्त आपल्या मैत्रिणींजवळच नाही, तर आपल्या मित्रांजवळसुद्धा आपली मने मोकळी करत आहेत. पूर्वीचे आवडते मित्र आता मॅच्युअर झालेले, वय झालेले आणि व्हॉटसअॅपच्या सेफ अंतरावर असलेले! त्यामुळे त्यांच्याजवळ मन व्यक्त करावे, असे खूप जणींना वाटत असावे. माझे अनेक मित्र आणि मैत्रिणी आजकाल मनातल्या मनात ‘ग्रे-डिव्होर्स’चा म्हणजे उतारवयातील घटस्फोटाचा विचार करताना दिसतात. आयुष्यभर मुख्यतः मुलाबाळांसाठी आपले मन मारून एकत्र राहिलेले असतात. आता तो असंतोष उसळून येताना दिसतो. अर्थात यातले फारसे कुणी हा विचार अंमलात आणताना दिसत नाहीत, ही गोष्ट वेगळी!
फेसबुकवर लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची छायाचित्रे टाकून ‘तीस वर्षांचे सफल सहजीवन’, ‘माय फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड’, ‘माय बिलव्हेड लीडर’ अशी वाक्ये लिहिणाऱ्या मैत्रिणी आणि मित्रही व्हॉट्सअॅपच्या पर्सनल चॅटवर मात्र आपल्या नवऱ्याबद्दल किंवा बायकोबद्दल संताप व्यक्त करताना दिसतात. वर्षानुवर्षांचा साठलेला संताप! संसारात मी झोकून दिले, पण हाताला काही लागले नाही, अशी भावना… दोन्ही बाजूंनी!
स्त्रियांमध्ये जास्त अंसतोष दिसतो, कारण यांनी आपला साथी निवडण्याची जबाबादरी घेतली नव्हती, असे मला वाटते. माझ्या ज्या मैत्रिणींनी प्रेमविवाह केले आणि ज्यांच्या मनात आज असंतोष आहे, त्या आपल्या दुःखासाठी नवऱ्यांना जबाबदार धरताना दिसतात. ज्यांनी ‘ठरवून’ लग्न केले, त्या मैत्रिणी नवऱ्याला, आईवडिलांना आणि समाजाला जबाबदार धरताना दिसतात. हे दुःख जास्त मोठं आहे, असं मला वाटतं. माझ्या आईची आणि सासूबाईंची पिढी सरळ दैवाला जबाबदार धरताना दिसतात. म्हणजे, अजून दारुण दुःख! आणि त्याही आधीच्या पिढ्या ‘नवऱ्याने मारलं आणि पावसाने भिजवलं, सांगायचं कुणाला’, अशा वृत्तीने लग्नाकडे बघत होत्या. पुरुषी त्रास हा नैसर्गिक मानला गेला होता. नैसर्गिक गोष्टींचे दुःख कशाला करायचे?
या पार्श्वभूमीवर माझ्या मैत्रिणींची पिढी दैवाला आणि निसर्गाला जबाबदार धरताना दिसत नाही. ती नवऱ्याला किंवा आईवडिलांना किंवा सामाजिक परिस्थितीला जबाबदार धरते. ही एक मोठीच प्रगती आहे, असे म्हणावेसे वाटते. कारण आपल्या दुःखाचं किंवा असमाधानाचे कारण ‘मानवी’ मानले गेले, तर त्यावर निदान विचार तरी सुरू होतो.
या पिढीचा उल्लेख अशासाठी की, आज लग्न करणाऱ्या, सहजीवनाला सुरुवात केलेल्या मुला-मुलींची ही पालक पिढी आहे. आजच्या मुलामुलींवर आजच्या जगाने केलेल्या संस्कारांबरोबरच यांचेही संस्कार आहेत. माझ्या पिढीमधल्या मुलींचे आयुष्य जगून झाले आहे. लग्नसंस्थेचा त्यांनी अगदी सखोल अनुभव घेतला आहे. या आजच्या मुलींच्या आयांचा आजच्या काळात उसळून आलेल्या स्त्रीच्या स्वातंत्र्याला पाठिंबा आहे. उघड नसला तरी छुपा का होईना अगदी नक्की पाठिंबा आहे!
प्रातिनिधिक पातळीवर बघायला गेलं, तर माझ्या पिढीतील स्त्रिया आपल्या लग्नाबद्दल फारशा समाधानी दिसत नाहीत. अर्थात काही सन्मान्य अपवाद आहेतच. इतके लोक आपल्या सहजीवनाबद्दल फेसबुकवर इतके भरभरून बोलताना दिसतात, म्हणजे त्यातले अगदी थोडे लोक का होईना थोडेफार खरेही बोलत असणारच! पण बहुतेक स्त्रियांची भावना अशी की, संसार झाला खरा, पण त्या नादात हातून खूप काही निसटूनही गेलं! बहुतेक स्त्रियांच्या मनात ही भावना अगदी घट्टपणे घर करून राहिली आहे, असे जाणवत राहते. नवऱ्याचा पुरुषी अहंकार, त्याची असंवेदनशीलता आणि त्याचे स्वतःमध्ये मग्न होऊन राहणे, या गोष्टींमुळे संसार व्हायचा तेवढा सुखाचा झाला नाही, अशी भावना स्त्रियांमध्ये दिसते. याला सोशल मीडिया वर ‘टिपिकल इंडियन मेल मेंटॅलिटी’ असे म्हटले जाते.
मी खूप प्रेम केले, परंतु मला मात्र प्रेम मिळाले नाही, ही खंत चौफेर दिसून येते. आपल्याला आणि आपल्या प्रेमाला गृहित धरले गेले, ही भावना अनेक स्त्रियांना खूप त्रास देताना दिसते. आजच्या साठीमधील स्त्रीचे खूप सारे दुःख या भावनेतून उफाळून येते आहे, असे मला वाटते.
.................................................................................................................................................................
१९९३-९४नंतर मात्र सामाजिक परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. साधारणपणे १९७५-८०मध्ये जन्मलेल्या मुलींचे आयुष्य त्या तारुण्यात येत असताना झपाट्याने बदलत गेले. अगदी नाट्यमय पद्धतीने बदलत गेले. याला कारण कॉम्युटर होता! १९९०-९५च्या दरम्यान सॉफ्टवेअर इंडस्ट्रीने स्त्रीला प्रोफेशनल कोर्सेस खुले केले. कम्प्युटरने अनेक क्षेत्रातली शारिरीक शक्तीची गरज नाहीशी केली. मुली विविध उद्योगांमध्ये कम्प्युटराइज्ड कंट्रोल पॅनेलच्या समोर बसून इंडस्ट्री कम्प्युटरद्वारे कंट्रोल करू लागल्या. फ्लोअर शॉपवर उभे राहून घाम गाळायची गरज आता उरली नव्हती. त्या आधी अत्यंत मर्यादित ‘प्रोफेशनल कोर्सेस’ मुलींमध्ये लोकप्रिय होते. त्या काळी मुली सामान्यपणे डॉक्टर तरी होत किंवा मग एमएससी मायक्रोबायॉलॉजी! आता मात्र मुली अनेकविध प्रोफेशनल कोर्सेसमध्ये सर्वदूर कार्यरत झाल्या. अगदी संरक्षण क्षेत्रासारख्या तद्दन पुरुषांच्या क्षेत्रातसुध्दा गेल्या. मुली सैन्याच्या सिग्नल्स कॉर्प्समध्ये गेल्या, रिमोट कंट्रोल वापरून ड्रोन्स कंट्रोल करू लागल्या, ड्रोन्सद्वारे शत्रूवर बॉम्ब टाकू लागल्या, अगदी राफेलसारखी अत्याधुनिक फायटर जेट्ससुद्धा चालवू लागल्या. स्त्रीकडे पैसा आला, आत्मविश्वास आला, स्वतःच्या आयुष्याचा कंट्रोल आला
.................................................................................................................................................................
आज कित्येक जणी ‘समजुतीच्या’ शोधात आहेत. पण पाऊल टाकायचा धीर होत नाही. नुसतीच अस्वस्थता! तरीही फेसबुक वरच्या सफल सहजीवनाच्या पोस्ट्स! सगळे दुःख हसून साजरे करायचे! माझ्या पिढीला बघून एक गाणे आठवते - ‘इतना क्यूँ मुस्करा रही हो, क्या गम हैं जिसको छुपा रही हो!’
नीलांजना भौमिक यांचे एक सुंदर पुस्तक आहे- ‘लाईज अवर मदर्स टोल्ड अस’. यात आपल्या समाजात स्त्रियांचे अगदी बेसिक असे गैरसमज कसे करून दिले जातात याची चर्चा आहे. लग्न हीच स्त्रीची ‘डेस्टिनी’ आहे, लग्नाशिवाय तिच्या आयुष्याला अर्थ नाही, मुले झाल्याशिवाय स्त्रीच्या आयुष्याला अर्थ नसतो, सतत कॉम्प्रमाईज करत जगणे हेच खरे स्त्रीत्व, सतत अन्याय सहन करत जगणे म्हणजेच स्त्रीत्व, सतत अॅडजस्ट करत जगणे म्हणजेच स्त्रीत्व, सगळ्या कुटुंबाची भाविनक आणि शारीरिक उस्तवार एकटीने करत जगणे म्हणजेच स्त्रीत्व; असे समज स्त्रीच्या मनावर बिंबबले गेलेले असतात, असे भौमिक सांगतात.
त्या पुढे सांगतात की, स्त्रीने आपल्या सेक्सच्या इच्छा व्यक्त करू नयेत, लग्नात मारहाण झाली, तर होता होईल तो गप्प बसावे, लग्न होईपर्यंत कौमार्य फार आवश्यक असते, असे अनेक संस्कार स्त्रीवर तिच्या कळतनकळत झालेले असतात. सगळ्यात त्रासदायक समज म्हणजे - अत्यंत शांतपणे दुःख सोसत जगणे हे मानसिक सामर्थ्याचे लक्षण आहे! हे सर्व संस्कार पाळत स्त्री जगत असते. या उलट पुरुषाला यातले काहीच लागू होत नाही.
नीलांजना भौमिक यांनी समाजाचा हा दुटप्पीपणा आपल्या पुस्तकात उघडा पाडला आहे. स्त्रीची इज्जत ही कुटुंबाची इज्जत असते, परंतु त्याच वेळी पुरुषाची इज्जत ही कुटुंबाची इज्जत नसते. स्त्रीने अफेअर केलं, तर कुटुंबाची इज्जत जाते, पुरुषाने केलं तर तसं काही होत नाही! पातिव्रत्याचे जेवढे गोडवे गायले जातात, तेवढे गोडवे एकपत्नीव्रताचे गायले जातात का? पातिव्रत्य वटपौर्णिमेच्या व्रतामध्ये ‘क्रिस्टलाईझ’ झाले आहे, तसे एकपत्नीव्रत कुठल्या व्रतात ‘क्रिस्टलाईझ’ झालेले दिसते का?
स्त्रीवरचे हे संस्कार कुटुंब टिकवत असतात हे खरे आहे, पण त्यामुळे होणारी गळचेपी असंतोष तयार करत असते, हेही तेवढेच खरे आहे! असा असंतोष आता माझ्या पिढीमधल्या मुलींमध्ये आता उफाळून आला आहे. आपण फार विचार न करता जगत गेलो आणि आत्मभान न कमावता जगत गेलो की, आपण अनेक अन्यायांना बळी पडत जातो. या अन्यायांविषयीचा राग केव्हातरी आपल्या मनात उफाळून येणारच असतो. माझ्या पिढीच्या बाबतीत बोलायचे तर तो राग आता उफाळून येतो आहे.
माझ्या एक मानसोपचारतज्ज्ञ स्नेही आहेत. त्यांचे म्हणणे असे की, त्यांच्याकडे काउन्सिलिंगसाठी येणाऱ्या पन्नास टक्के स्त्रियांच्या मनात नवऱ्याविषयी सूडाची भावना असते. बाकीच्या पन्नास टक्के स्त्रियांमध्ये रागाची!
खरं तर, महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले आणि पंडिता रमाबाईंपासून विचार करणाऱ्या स्त्रियांची परंपरा आहे. परंतू मूलतः सामान्य स्त्री आत्मभानापेक्षा संसारालाच महत्त्व देणारी राहिली. जणू काही आत्मभान आणि संसार एकत्र जाऊच शकत नाहीत!
नीलांजना भैमिक यांच्याप्रमाणेच महाराष्ट्रामधली अत्यंत मनस्वीपणे विचार करणारी स्त्री खूप आधीपासून स्वतःला व्यक्त करत होती. विभावरी शिरूरकर यांच्या ‘कळ्यांचे निश्वास’मुळे महाराष्ट्र हलला होता. गौरी देशपांडे यांची मनस्वीपणे स्त्री-पुरुष नात्याकडे बघणारी नायिका महाराष्ट्राला माहीत होती आणि आवडतही होती.
तसे बघायला गेले, तर माझ्या तारुण्याच्या काळात स्त्री-मुक्तीची चळवळ चांगलीच फोफावली होती. विद्या बाळ, छाया दातार आणि नीलम गोऱ्हे अशी नावे ऐकू येत होती. त्यांचे लेख येत होते, त्यांची व्याख्याने होत होती. मी स्वतः १९८३-८४ दरम्यान छाया दातार यांचे पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत ऐकल्याचे मला आठवते आहे. स्त्री तिच्या देहाची मालकीण आहे, तिच्या सेक्सच्या भावनेची मालकीण आहे. समाज, धर्म किंवा राष्ट्र तिला वापरू शकत नाही, अशा आशयाचे लेख छाया दातार लिहीत होत्या. हे विचार महत्त्वाचे असले, तरी त्या काळी या सगळ्या भूमिकेची चेष्टा होत होती. त्यामुळेच माझ्या कित्येक मैत्रिणी ‘आम्ही नाही प्रेमविवाह करणाऱ्या तसल्या मुली’ अशी भूमिका घेत असाव्यात. त्या काळातल्या सामान्य स्त्रीला ‘स्त्री-मुक्ती’ खरे तर झेपत नव्हती. त्यामुळे ती ‘आम्ही नाहीत तसल्या मुली’ असे म्हणत होती. ती तसे म्हणत होती खरे, परंतु बंडखोरीचा ऑप्शन आता उपलब्ध झाला आहे, हेसुद्धा तिला आत कुठेतरी कळत होते!
तसे आम्ही पुरुष म्हणूनसुद्धा याच पिढीतले. पुरुषीपणाचे काही डंख आमच्या नकळत राहिले असणार. त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करूनही ते आमच्या व्यक्तिमत्त्वात राहिले असणार! आमच्या मुलाबाळांना ते जाणवत असणार! आपल्या आई-बापांच्या नात्यामधले अपूर्णत्व आज २५-३० वय असलेल्या मुलामुलींना जाणवत राहते. माझी मोठी मुलगी नेहमी म्हणते की, तुमचं मॅरेज ‘डिसफंक्शनल’ आहे. मला हसू येते. सौ. शांत राहतात. (इथे मी पत्नीला ‘सौ’ हे ती माझे सौभाग्य आहे, या अर्थाने म्हणतो आहे. सौभाग्यवती या अर्थाने नाही. ‘तू असा कोण आहेस तिचं सौभाग्य व्हायला?’, असा कुठलाही वाद नको आहे.) असो. तर, माझी मुलगी माझ्या लग्नाला ‘डिसफंक्शनल’ म्हणते, तेव्हा मी मुलीला होकर देऊन विषय वाढवत नाही. ही गोष्ट मी परवा मित्राला सांगितली तर तो म्हणाला की, माझ्या मुलीसुद्धा नवरा म्हणून मी कसा असायला हवा होतो, हे सांगत असतात. आमच्या पिढीतल्या बऱ्याच मुलांना आपले वडील आपल्या आईशी वागताना पाहिजे एवढी संवेदना बाळगत नाहीत, असे वाटत होते.
आम्ही आमचे संसार जास्त लोकशाहीवादी पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. असे असूनही मुलींकडून हे ऐकायला लागते आहे. म्हणजे मी संसार फार ‘ग्रेट’ केला, असे मला म्हणायचे नाही. तसे बघायला गेले, तर आपण कशीबशी का होईना नाव किनाऱ्याकडे आणली अशीच माझी भावना आहे. काही पातळ्यांवर यश आले, काही पातळ्यांवर अॅपयश आले. काय करणार! मुली तोंडावर टीका करतात म्हणजे आपण संसारात लोकशाही रुजवली, असे मानून समाधान मानायचे! मोठी मुलगी, ‘तुम्ही पेरेंट्स म्हणून चांगले होता’, असे म्हणतेय हेच ‘आमचे सहजीवन’ सफल झाले, याचे लक्षण समजायचे! मुली टीका करतात, तेव्हा मी माझ्या सासूबाईंचे आमच्या संसाराबद्दल मत काय असेल याचा विचार करतो. त्या तर अजून जुन्या जमान्यातल्या. १९६८मध्ये लग्न झालेल्या!
त्या माझ्याबद्दल मला तरी समाधानी दिसतात. जे काही आहे ते ‘ओके’ आहे, अशी भूमिका असावी. This is as good as it gets - अशी भूमिका असावी! ‘लग्नात याहून अजून असं काय हाती लागणार’ - अशी भूमिका असावी.
१९९३-९४नंतर मात्र सामाजिक परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. साधारणपणे १९७५-८०मध्ये जन्मलेल्या मुलींचे आयुष्य त्या तारुण्यात येत असताना झपाट्याने बदलत गेले. अगदी नाट्यमय पद्धतीने बदलत गेले. याला कारण कॉम्युटर होता! १९९०-९५च्या दरम्यान सॉफ्टवेअर इंडस्ट्रीने स्त्रीला प्रोफेशनल कोर्सेस खुले केले. कम्प्युटरने अनेक क्षेत्रातली शारिरीक शक्तीची गरज नाहीशी केली. मुली विविध उद्योगांमध्ये कम्प्युटराइज्ड कंट्रोल पॅनेलच्या समोर बसून इंडस्ट्री कम्प्युटरद्वारे कंट्रोल करू लागल्या. फ्लोअर शॉपवर उभे राहून घाम गाळायची गरज आता उरली नव्हती. त्या आधी अत्यंत मर्यादित ‘प्रोफेशनल कोर्सेस’ मुलींमध्ये लोकप्रिय होते. त्या काळी मुली सामान्यपणे डॉक्टर तरी होत किंवा मग एमएससी मायक्रोबायॉलॉजी! आता मात्र मुली अनेकविध प्रोफेशनल कोर्सेसमध्ये सर्वदूर कार्यरत झाल्या. अगदी संरक्षण क्षेत्रासारख्या तद्दन पुरुषांच्या क्षेत्रातसुध्दा गेल्या. मुली सैन्याच्या सिग्नल्स कॉर्प्समध्ये गेल्या, रिमोट कंट्रोल वापरून ड्रोन्स कंट्रोल करू लागल्या, ड्रोन्सद्वारे शत्रूवर बॉम्ब टाकू लागल्या, अगदी राफेलसारखी अत्याधुनिक फायटर जेट्ससुद्धा चालवू लागल्या. स्त्रीकडे पैसा आला, आत्मविश्वास आला, स्वतःच्या आयुष्याचा कंट्रोल आला.
या सगळ्या काळात स्त्रीच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडली. या काळात, ‘गियरलेस स्कूटर’ हे स्त्रीच्या मुक्ततेचे एक प्रतीक बनले. माझ्या तारुण्याच्या काळात स्त्रीचे स्कूटर चालवणे, हा चेष्टेचा विषय होता. वि. आ. बुवा यांच्यासारख्या ‘विनोदी’ लेखकांचे ‘मिसेस स्कूटर शिकते’ असे ‘विनोदी’ लेख येत असत. आता स्कूटर इंडस्ट्री सगळ्या जगाने आश्चर्य करावे इतकी फोफावली - फक्त भारतीय स्त्रीमुळे!
या काळात स्त्री खऱ्या अर्थाने पैसा कमवू लागली. पहिल्या पहिल्यांदा स्त्रीने कमावलेल्या पैशावर तिची संपूर्ण मालकी नसायची. बहुतेक वेळा स्त्रीचा पैसा कुटुंबाचा ‘कॉमन’ पैसा असायचा! मेकअप, हॉटेलिंग वगैरे निर्णय तिचे असायचे, परंतु गुंतवणुकीबद्दलचे किंवा मोठ्या खर्चाबद्दलचे निर्णय बहुतेक वेळा नवऱ्याला विचारून घेतले जायचे. आता ही परिस्थिती हळूहळू बदलत चालली आहे. या दृष्टीनेही स्त्री आपल्या पायावर उभी राहू लागली आहे.
स्त्री बदलली की लग्नसंस्था बदलते. स्त्रीला आत्मभान येऊ लागले आणि त्याचे पडसाद सामाजिक पातळीवर दिसू लागले की, विवाहसंस्था बदलत जाते. गेल्या दहा-पंधरा वर्षांत लग्नसंस्था, हा हा म्हणता म्हणता, एका महत्त्वाच्या बदलाच्या उंबरठ्यावर येऊन उभी राहिली आहे! फ्रीडरीश नीत्शेचे एक सुंदर वाक्य आहे- “A good marriage is one where each partner wants to be the friend of the other and where both work toward becoming themselves” (‘सुंदर लग्नात दोघांनाही एकमेकांचे मित्र व्हायचं असतं आणि त्याच वेळी दोघांनीही आपापले आत्मभान प्रगल्भ करत जायचं असतं, आपापली व्यक्तिमत्वे घडवत जायचं असतं!’)
माझ्या पिढीतील बहुतेक लग्ने या निकषावर अजिबात खरी उतरत नव्हती. त्या आधीच्या पिढ्यांची तर बातच नको. कुणाचे तरी लाड कुणाच्या तरी त्यागाच्या जिवावर असा सगळा मामला! कसली मैत्री आणि कसले प्रगल्भ आत्मभान! बोलायच्या गोष्टी नुसत्या! स्त्री आत्मविश्वासाने रसरसलेली असेल, तरच ती मैत्रीण बनू शकणार! नाहीतर लग्नाच्या नात्याला गुलामीचा एक पदर तरी राहणारच!
आता मात्र स्त्री या दृष्टीने खऱ्या अर्थाने प्रगतीच्या पथावर आहे असे वाटू लागले आहे! या दृष्टीने २०१४-१५मध्ये एक मोठी क्रांती घडली! १९९३-९४च्या कॉम्युटर क्रांतीनंतर २०१४-१५मध्ये स्मार्टफोन क्रांती आली. ज्ञान, पुस्तकांच्या आणि वाचनाच्या कचाट्यातून सुटले. यूट्यूबवर ज्ञान ‘ऐकू’ येऊ लागले. तत्त्वज्ञान म्हणू नका, इतिहास म्हणू नका, समाजकारण म्हणू नका, मानसशास्त्र म्हणू नका, अगदी सगळी सगळी क्षेत्रे! स्मार्टफोनने स्त्रीला नसत्या मनोगंडांमधून सोडवले, तिच्या आयांनी करून दिलेल्या गैसमजामधून सोडवत पुढे नेले!
.................................................................................................................................................................
एक गोष्ट नक्की की, लग्नसंस्था आता जास्त मोकळीढाकळी होत चालली आहे. या नव्या मुला-मुलींना घटस्फोट हा प्रकार पटकन घेऊन टाकायची गोष्ट वाटते आहे. त्यामागचा सामाजिक ‘स्टिग्मा’ गेला आहे. पटत नाही तर त्रास कशाला करून घ्यायचा? जोडप्यांना मुले झालेली असली, तरी घटस्फोट होऊ लागले आहेत. घटस्फोटाचा मुलांवर वाईट परिणाम नक्कीच होतो, परंतु विजोड लग्न कायम राहिले तर त्याचा मुलांवर अजून जास्त वाईट परिणाम होत राहतो, असा विचार केला जाऊ लागला आहे. घटस्फोट आता इतका सर्वमान्य झाला आहे की, लग्न झाल्याच्या जशा पार्ट्या दिल्या जातात, तशा घटस्फोट झाल्याच्याही पार्ट्या आजकाल दिल्या जाऊ लागल्या आहेत. या शिवाय गे, लेस्बियन, ट्रान्सजेंडर, बायसेक्सच्युअल ही सगळी ‘नॅचरल व्हेरियंटस्’ आहेत; म्हणजे हे सगळे माणसाच्या ‘सेक्सच्युअल बिहेवियर’चे निसर्गमान्य प्रकार आहेत, हे ‘सायन्स’चे मत या मुलांनी मान्य केले आहे. याला कारण ओटीटी!
.................................................................................................................................................................
या शिवाय या मीडियाद्वारे पाश्चात्य संस्कृतीचे वारे जोराने वाहू लागले. ‘लिव्ह-इन रिलेशनशिप्स’बद्दल चर्चा ऐकू येऊ लागली. मल्टिकल्चरल आणि मल्टिरेशियल लग्ने घडताना दिसू लागली. ‘पॉर्न’ आणि ‘सेक्स टॉक्स’ असे नवे आयाम आले. डेटिंग अॅप्स् आली! लेस्बियन मॅरेज, गे मॅरेज, बायसेलच्युअल नाती, असे सगळे ऐकू येऊ लागले. हे सगळे प्रकार मानवाच्या सर्व समाजांमध्ये अगदी प्राचीन कालापासून होते. परंतु आता ते सर्व उघडपणे दिसू लागले. त्यांच्यावर चर्चा झडू लागल्या. ‘जनरेशन झी’ म्हणजे १९९७नंतर जन्माला आलेली मुले-मुली या काळात वयात येत होती. ही पिढी या सगळ्यामुळे अगदी वेगळ्या पद्धतीने विचार करू लागली.
या काळात स्त्रीच्या स्वातंत्र्याला अत्यंत पोषक अशी अजून एक गोष्ट घडली. सोशल मीडियामुळे स्त्रीला नुसतेच जग दिसू लागले नाही, तर स्त्री या मीडियामुळे स्वतःला व्यक्तसुद्धा करायला शिकली. यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणे, इन्स्टाग्रामवर रील्स बनवणे, व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवणे यातून स्त्री व्यक्त होत गेली. तिच्या या अभिव्यक्तीचे मित्र-मैत्रिणींकडून कौतुक होत गेले. यामुळे तिचा आत्मविश्वास वाढत गेला. याचे फार दूरगामी परिणाम लग्नाच्या नात्यावर होऊ लागले.
आज भारतात पाच ते सहा टक्के तरुण-तरुणी निदान काही काळ तरी ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहतात. बहुतेक जोडपी त्यानंतर लग्न करतात! आमच्या पिढीतील आयांना लग्न आवश्यक वाटत होते, आजही या आयांचे तेच मत आहे. या आया स्वतः लग्नसंस्थेबद्दल खट्टू आहेत, परंतु त्यांना आपल्या पोरांनी लग्नच करून ‘सेटल’ झालेले हवे आहे. आजच्या बहुतांश मुला-मुलींनाही लग्न आवश्यक वाटते आहे. लग्नसंस्था अजूनही आपलं गारूड टिकवून आहे.
परंतु एक गोष्ट नक्की की, लग्नसंस्था आता जास्त मोकळीढाकळी होत चालली आहे. या नव्या मुला-मुलींना घटस्फोट हा प्रकार पटकन घेऊन टाकायची गोष्ट वाटते आहे. त्यामागचा सामाजिक ‘स्टिग्मा’ गेला आहे. पटत नाही तर त्रास कशाला करून घ्यायचा? जोडप्यांना मुले झालेली असली, तरी घटस्फोट होऊ लागले आहेत. घटस्फोटाचा मुलांवर वाईट परिणाम नक्कीच होतो, परंतु विजोड लग्न कायम राहिले तर त्याचा मुलांवर अजून जास्त वाईट परिणाम होत राहतो, असा विचार केला जाऊ लागला आहे. घटस्फोट आता इतका सर्वमान्य झाला आहे की, लग्न झाल्याच्या जशा पार्ट्या दिल्या जातात, तशा घटस्फोट झाल्याच्याही पार्ट्या आजकाल दिल्या जाऊ लागल्या आहेत.
या शिवाय गे, लेस्बियन, ट्रान्सजेंडर, बायसेक्सच्युअल ही सगळी ‘नॅचरल व्हेरियंटस्’ आहेत; म्हणजे हे सगळे माणसाच्या ‘सेक्सच्युअल बिहेवियर’चे निसर्गमान्य प्रकार आहेत, हे ‘सायन्स’चे मत या मुलांनी मान्य केले आहे.
याला कारण ओटीटी! ओव्हर द टॉप प्रक्षेपणे! सरळ तुमच्यापर्यंत नेटद्वारा. तुमच्या आणि कलेमध्ये ना केबल, ना सॅटेलाईट प्रोव्हायडर! यामुळे ओटीटी ही गोष्ट सेन्सॉरच्या आणि समाजातील ‘संस्कृतीरक्षकां’च्या कक्षेच्या पलीकडे राहिली! त्यामुळे इथे खूप वेगवेगळ्या आणि बोल्ड थीम्स हाताळल्या गेल्या! कलेने मानवी जीवन ‘जसे आहे तसे’ दाखवायला सुरुवात केली! पूर्वी कला एक डोळा समाजाकडे ठेवून जीवन रंगवत होती. आता नेटफ्लिक्स, अॅमेझॉन किंवा डिस्नी यांच्यासारख्या प्लॅटफॉर्मसनी ही परिस्थिती बदलून टाकली! या नव्या मुलामुलींनी ही कला बघितली, तिचे संस्कार आत्मसात केले!
आमच्या एका मैत्रिणीला त्या काळी घटस्फोट घ्यायचा होता, म्हणून तिची आई कमालीची अस्वस्थ झाली होती. आज माझी एक बाल-मैत्रीण तिची अमेरिकेत स्थायिक झालेली मुलगी ‘लेस्बियन लग्न’ करते आहे, म्हणून रडकुंडीला आलेली आहे.
असे बदल घडत अस्तानाच लग्नसंस्था आपले महत्त्व टिकवून आहे असे वाटते. सामान्य मुलेमुली म्हणजे ‘स्ट्रेट’ मुलंमुली लग्नच करत आहेत. मात्र, नाती आता जास्त मोकळी ढाकळी झाली आहेत! माझा एक ‘लिबरल’ मित्र या सर्व बदलांमुळे पुरुषी वर्चस्वाला हादरे बसू लागले आहेत म्हणून अतिशय आनंदी झाला आहे. यातूनच स्त्री-पुरुष नात्यामध्ये खरे सौहार्द येईल, असे त्याला वाटते.
खरेच येईल का? माझ्या पिढीमधल्या मुली समोर आलेले संस्कार फार विचार न करता स्वीकारत होत्या, तशीच ही मुलेसुद्धा संस्कार फारसे विचार न करता स्वीकारत आहेत? आत्मभान संस्कारांनी आपोआप येत असते का? का, आपल्यावर झालेल्या संस्कारांवर आपण सजगपणे विचार करत गेलो तरच येते? आत्मभान हा चिंतनाचा विषय आहे का ती केवळ अर्थकारणाची बटिक आहे?
फ्रीड्रीश एंगल्सने लग्नाबद्दल अगदी स्वच्छपणे लिहिले होते. एंगल्स म्हणतो की, कुणी काहीही म्हटले तरी लग्न मुळात एक आर्थिक नाते असते. हो! माझ्या पिढीमधील बहुतेक मुला-मुलींनी प्रेमाचा किंवा मानसिक अनुरूपतेचा फारसा विचार न करता, पगारपाणी आणि घरदार बघूनच लग्ने केली होती. काहींनी तर प्रेमात पडतानाही या ऐहिक गोष्टींचा विचार केला होता. इथे खरे प्रेम कसे मिळावे? एंगल्स म्हणतो की, लग्न या आर्थिक नात्यात नवरा हा प्रॉपर्टीचा मालक असतो आणि स्त्री पगारहीन अवस्थेत घरकाम करणारी नोकर! एंगल्स पुढे म्हणतो की, पुरुषाच्या आर्थिक वर्चस्वाचा पाया हादरल्याशिवाय स्त्री-पुरुषात खरे प्रेम नांदू शकणार नाही. आता हा पाया हादरला आहे, असे स्पष्टपणे दिसते आहे!
लग्नसंबंधात नवरा-बायकोतली मैत्री त्यांच्यातल्या प्रेमापेक्षाही महत्त्वाची! या मैत्रीसाठीचे पोषक वातावरण तयार होत चालले आहे, अशी लक्षणे दिसू लागली आहेत.
आजही परंपरावादी लोक स्त्रीवरचा समाजाचा लगाम पुन्हा एकदा करकचून आवळण्याचा प्रयत्न करताना दिसत असतात. आपल्या धर्मामधल्या लोकांची संख्या वाढावी म्हणून, प्रत्येक स्त्रीने किमान तीन किंवा चार मुलांना जन्म दिला पाहिजे असे सांगताना हे लोक दिसत असतात. सगळ्याच धर्मांमध्ये असे धर्मसूर्य आपल्या विचारांचा प्रकाश वितरित करताना दिसत असतात. परंतु आता या जमान्यात त्यांच्याकडे कोणी लक्ष देईल असे वाटत नाही.
हिटलरने जर्मन स्त्रीला आपल्या वंशशुद्धीच्या संकल्पनेसाठी वापरले. जर्मन मुलींना त्याने शुद्ध जर्मन आर्यवंशाच्या पुरुषांकडून प्रजोत्पादन करण्यासाठी वापरले. सध्याचे धर्मसूर्य याच वृतीच्या मवाळ आवृत्ती आहेत असे वाटते. “पुरुषी वर्चस्व आज शेवटची तडफड करत आहे”, असे माझा ‘लिबरल’ मित्र प्रसन्न चेहऱ्याने म्हणतो! खरेच असे असेल? काळच उत्तर देईल!
हा मजकूर एका मित्राला वाचायला दिला, तर तो म्हणाला –“या लेखात पुरुषांची बाजूच नाही. तू स्त्री-मुक्तीवाला कधी झालास?’’ आमच्या पिढीमधल्या पुरुषांच्या बाजूने सगळी दाने पडत गेली आहेत. लग्नसंस्थेबद्दल पोटतिडकीने विचार करायची वेळ आमच्यावर कधी आली नाही. आम्हा मित्रांमधल्या कुणाला एखादी कर्कशा मिळाली असेल, तर तेवढीच चर्चा आम्ही केली! काही गंभीर दुःख असते, तर आमच्या पिढीतल्या पुरुषांनी नक्की चर्चा केली असती! गेली ३० वर्षं आम्ही अनेक विषयांवर चर्चा केली आणि नेमका हाच विषय बरा सुटला! कारण आमच्या पिढीचा खूपसा वेळ बायकोने केलेली भजी खात खात बायकांवरच्या विनोदांना फिदिफिदी हसण्यात आणि ते विनोद फॉरवर्ड करण्यात जातो!
आम्ही आपल्या दुःखांबाबत किती बोलायचं, याला फार म्हणजे फारच मर्यादा आहेत. बायका ‘स्पेस’ देत नाहीत, एवढीच तक्रार बहुतेक पुरुष करत असतात. यावर ‘आम्ही वेळ मागतो हे खरे आहे, पण तरीही तुम्ही वेळ देता का?’, असा प्रश्न बायकांनी विचारला, तर आपण काय उत्तर देणार? पुरुष पैशासाठी खूप तडफड करतो, ही गोष्ट खरी आहे; पण स्त्रीचे कष्ट जसे सर्व कुटुंबाच्या मालकीचे असतात, तसा त्याचा पैसा सर्व कुटुंबाच्या मालकीचा असतो का? सर्व कुटुंबाचे नियंत्रण त्याने मिळवलेल्या पैशावर असते का? आणि, पैसा मिळवल्याच्या बदल्यात पुरुषाचे किती लाड होतात! ‘कुटुंबप्रमुख’ हे बिरुद काय आणि ‘अन्नदाता सुखीभव’ अशा प्रार्थना काय! स्त्री जी तडफड करते, त्या बदल्यात तिला नक्की काय मिळतं? आज स्त्री पैसा मिळवू लागली आहे, तरी घरकाम तिच्याकडेच आहे. म्हणजे तिने मिळवलेला पैसा आणि तिचे कष्ट कुटुंबाच्या मालकीचे आणि तरीही कुटुंबप्रमुख मात्र पुरुष!
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
मी अनेकदा कॅफेमध्ये जातो. आजुबाजूला तरुणाई असते. आपल्यातच मग्न असलेली. एखादी मुलगी मित्राच्या गळ्यात हात टाकते, त्याच्या गालावर पुसटसे ओठ टेकवते अर्ध्या क्षणासाठी! त्यात शारीर इच्छा कमी आणि मैत्री जास्त असते! तो प्रतिसाद म्हणून तिच्या चेहऱ्यावर आलेल्या बटा मागे सारतो. ते पुन्हा गप्पा मारू लागतात! असे काही बघितले की, माझ्या डोळ्यासमोर नीत्शे येतो. स्त्री-पुरुष नात्यात मैत्री शोधणारा! ही नवी पिढी ही मैत्री टिकवू शकेल का? का काळाच्या ओघात आणि समाजाच्या दाबात त्यांच्या नात्यातली ही मैत्री पुसली जाईल?
लग्न ही फार गंभीर गोष्ट आहे! बुद्ध, कन्फ्युशियस, गांधी, अॅरिस्टॉटल, कांट, कर्कगार्ड, नीत्शे, मिल, कार्ल युंग, सिमोन द ब्यूव्हॉ अशा अनेक थोर तत्त्वज्ञांनी या विषयावर लिहिले आहे. आत्मभान, समता, आदर, कर्तव्य, प्रेम, मैत्री, सुसंवाद आणि समर्पण अशा अनेक गोष्टी लग्नात आकार घेऊ शकतात, असे हे सर्व सांगत आले आहेत. स्वातंत्र्य आणि कर्तव्य यांचा समतोल या लोकांनी सांगितलेला आहे. प्रेमातले आणि मैत्रीमधले एकत्व सांगितले आहे, मात्र हेसुद्धा खरे की- बहुतांश नात्यांमधले गारुड वय वाढत जाते, तसे तसे हळूहळू उतरत जाते!
तरीही मानवी मनाची जडणघडण विचारात घेतली, तर मला वाटते की, लग्नाचे हे गारुड मानवी समाजात आपले स्थान टिकवून राहील! लग्नसंस्था सर्व कालखंडात टिकून राहिली आहे. मानवाच्या सर्व संस्कृतींमध्ये आणि समाजांमध्येही ती आपले स्थान टिकवून आहे. याला कारण म्हणजे लग्नसंस्था मानवाच्या अगदी मूलभूत अशा प्रेरणांशी एकरूप होऊन गेलेली आहे. मानवाच्या शारिरिक, मानसिक, सामाजिक आणि नैतिक या सर्व प्रेरणांचा समन्वय लग्नसंस्थेमध्ये साधला जातो. म्हणून तर सर्व धर्म लग्नसंस्थेला सामावून घेताना दिसतात. हिंदू धर्माने तर विवाहाला एक प्रमुख संस्कार मानले आहे. हिंदू धर्माप्रमाणे विवाह हे एक नैतिक आणि आध्यात्मिक कर्तव्य आहे. विवाह, माणसाच्या उत्कट इच्छांना सुंदर शिस्त लावतो. शिवाय, मुलांच्या संगोपनासाठी तो एक अत्यंत सुरक्षित चौकट तयार करतो.
माझ्या मते, एरिक फ्रॉम या मानसशात्रज्ञाने लग्नसंस्थेची मानसिक गरज सर्वांत सुंदर पद्धतीने सांगितलेली आहे. या जगात माणूस तसा एकटा असतो. या एकटेपणाच्या भावनेने त्याला अत्यंत असुरक्षित बनवलेले असते. नुसत्या प्रेमाने ही भावना जात नाही. निष्ठा आणि प्रेम या दोन गोष्टी हातात हात घालून माणसाच्या आयुष्यात आल्या, तरच माणसाच्या मनात सुरक्षिततेची आणि रुजलेपणाची सुंदर भावना तयार होते. लग्नामुळे मानवाच्या आयुष्यात ‘निष्ठावंत प्रेम’ येते. माणसाची ही गरज जोपर्यंत कायम राहील, तोपर्यंत लग्नसंस्था नक्कीच अबाधित राहील. आता नव्या काळात स्त्रीला प्राप्त होत चाललेल्या नव्या स्वातंत्र्यांमुळे लग्नसंस्थेला नवे आयाम प्राप्त होत राहतील. लग्नसंस्था या सर्व बदलांचा नक्कीच स्वीकार करेल आणि स्वतःला अबाधित ठेवेल!
हा लेख ‘अनुभव’ मासिकाच्या जानेवारी २०२६च्या अंकात संपादित स्वरूपात प्रकाशित झाला आहे.
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment