‘जेन-झी’ची अभिव्यक्ती वरवर अश्लील असली, तरी ती अभिव्यक्ती काय सांगते आहे, हे जास्त महत्त्वाचे नाही का?
पडघम - सांस्कृतिक
श्रीनिवास जोशी
  • प्रातिनिधिक छायाचित्रं
  • Sun , 23 August 2026
  • पडघम सांस्कृतिक कॉकरोज जनता पार्टी Cockroach Janta Party सीजेपी CJP जंतरमंतर JantarMantar जेन-झी Gen-Z

जंतरमंतरवर नुकत्याच झालेल्या ‘जेन-झी’च्या आंदोलनात दिल्या गेलेल्या शिव्यांनी संपूर्ण भारत देशात मोठाच गोंधळ उडवून दिला आहे.

खरं तर, माणसाला शिव्यांचे फार मोठे आकर्षण आहे, हे आपल्याला नाकारता येत नाही. जगाच्या कुठल्याही समाजात शिव्या हा संभाषणाचा एक अविभाज्य भाग बनून राहिल्याचे दिसून येते. शिव्या नाहीत असा एकही समाज नाही आणि ज्याने आपल्या जन्मात एकही शिवी दिलेली नाही, असा माणूस सापडणे अवघड आहे.

ज्यांना शिव्यांचे मानवी आयुष्यातील स्थान माहीत आहे, त्यांनी ‘जेन-झी’ने दिलेल्या शिव्या त्यांच्या रागाची एक नैसर्गिक अभिव्यक्ती म्हणून घेतल्या. अगदी गंमत म्हणूनही घेतल्या. बाकीच्या लोकांना या शिव्यांचा भयंकर त्रास झाला. संताप, उद्वेग, निराशा!

या लोकांनी खरं तर स्वतःला दोन प्रश्न विचाराले पाहिजेत. एक म्हणजे, ही पोरे या शिव्या शिकली कुठून? याचे उत्तर आहे समाजातून! यातून दुसरा प्रश्न तयार होतो की, समाजात तरी या शिव्या आल्या कुठून? याचे उत्तर आहे मानवाच्या स्वभावामधून.

आपण जेव्हा विचार करून बोलतो, तेव्हा आपल्या डाव्या मेंदूमधील प्रगत भाग काम करत असतात. या वेळी शब्द आणि त्यांचे व्याकरण यांची आपण जणीवपूर्वक निवड करतो. शिव्या मात्र मेंदूच्या ‘लिम्बिक सिस्टिम’मध्ये उगम पावतात. ते आपल्या आदिम भावनांचे स्थान असते. शास्त्रज्ञ या भागाला ‘इमोशन्सचे इंजिन’ असे म्हणतात. आदिम भावना प्रदिप्त झाल्या की, विचार करणाऱ्या मेंदूला ‘बायपास’ करून शिव्या उत्फूर्तपणे बाहेर पडतात. थोडक्यात, प्रदिप्त भावनांच्या कल्लोळात मानवाला काही कळण्याच्या आत शिव्या बाहेर पडत असतात. त्यामुळेच मेंदूला इजा झालेले रुग्ण इतर काही बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नसले, तरी शिव्या मात्र अस्खलितपणे देताना दिसतात.

या शिवाय मानवाच्या आयुष्यात शिव्या या भावनिक ‘शॉक अॅब्सॉर्बर’चे काम करताना दिसतात. डॉ. रिचर्ड स्टीव्हन यांनी सिद्ध केले आहे की, बर्फात हात घालून बसण्याच्या प्रयोगात शिव्या देण्याची सवय असलेले लोक इतर लोकांपेक्षा जास्त वेळ बर्फात हात घालून बसू शकतात. शिव्या देण्यामुळे वेदनेकडून त्यांचे लक्ष थोडे दूर वळवले जाते. जे शब्द उच्चारणे लोकमान्य नाही ते शब्द उच्चारले की, हृदयाचे ठोके थोडे वाढतात, अॅड्रिनॅलिन सीक्रिट होते. त्यामुळे ‘फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स’ तयार होतो. या अवस्थेत वेदना कमी जाणवतात हे शास्त्राने सिद्ध केलेले आहे. थोडक्यात, शिव्या देणे म्हणजे एका अर्थाने वेदनेपासून लांब जाणे!

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

याही पलीकडे जाऊन मानसशास्त्रज्ञ सांगतात की, शिव्या देणे हा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो. शारिरीक हिंसा करावीशी वाटत असताना, शाब्दिक हिंसा करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे शिव्या देणे! राग तर व्यक्त करायचा, परंतु हिंसा तर नाही करायची, अशा अवस्थेत शिव्या दिल्या जातात! शिव्या दिल्यामुळे शाब्दिक हिंसा होते आणि त्यामुळे भावनांचा निचरा होतो, माणूस शारिरीक हिंसेवर उतारू होत नाही! थोडक्यात, सामाजिक रचनेला धक्का न लावता आपल्या आत निर्माण झालेल्या टेन्शनला वाट करून देण्याचे काम शिव्या करतात!

याशिवाय, शिव्या अजून अनेक कामे करताना दिसतात. मानसशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार शिव्यांमुळे सामाजिक बाँड तयार होतात. शिव्यांमुळे संभाषणाचा फॉर्मल ढाचा मोडला जातो आणि जवळिकीची भावना तयार होते. याशिवाय कित्येक वेळा शिव्या माणसाचा प्रामाणिकपणा अधोरेखित करतात. एखादा माणूस शिव्या देतो आहे, म्हणजे तो सामाजिक बंधने झुगारून देऊन आपल्या भावना व्यक्त करतो आहे, असा अर्थ घेतला जातो. सामाजिक प्रतिष्ठेपेक्षा या व्यक्तीला भावना जास्त महत्त्वाच्या वाटत आहेत, असा संदेश शिव्यांमधून दिला जातो. मोकळेपणाने भावना व्यक्त करणाऱ्या माणसाबद्दल लोकांमध्ये विश्वास तयार होतो.

कित्येक वेळा मुले, आपल्या आसपासचे लोक शिव्या देत आहेत म्हणूनही शिव्या देताना दिसतात. आपला ग्रूप शिव्या देतो आहे म्हणून मुले शिव्या देतात. केवळ एक पद्धत म्हणून! बाकी काही अर्थ त्या शिव्यांमध्ये नसतो. जस्ट टू बिलॉन्ग टू द ग्रूप, मुले शिव्या देतात! 

या पलीकडे जाऊन पाहिले, तर अगदी विनोद म्हणूनही शिव्या दिल्या जातात! दोन मित्र प्रेम व्यक्त करण्यासाठी एकमेकांना विनोदाने  शिव्या देत आहेत, हे चित्र आपण अनेक वेळा पाहिलेले असते. पुलंची ‘रावसाहेब’ ही व्यक्तिरेखा या दृष्टीने पाहण्यासारखी आहे. पुल लिहितात - रावसाहेब एखाद्या खिलाडू कलेक्टरचं स्वागतसुद्धा ‘आलं तिच्यायला लोकांच्यात काड्या सारून’ असं करत असत. या मालिकेतील शिव्यांचा शेवटचा उपयोग म्हणजे आपल्या म्हणण्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी शिव्या देणे, आपले म्हणणे अधोरेखित करण्यासाठी शिव्या देणे!

वरील सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर जंतरमंतरवर ‘जेन-झी’ने दिलेल्या शिव्या आपल्याला खूप काही सांगून जातात, खूप काही शिकवून जातात.

माणसाच्या सर्व समाजांमध्ये, खूप महत्त्वाच्या गोष्टी साध्य करण्यासाठीही शिव्यांचा वापर केला गेलेला आपल्याला दिसून येतो. आपण कुठल्याही संस्कृतीचा विचार केला तर अनेक संत, समाजसुधारक आणि साहित्यिक यांनी शिव्यांचा अतिशय सृजनशीलतेने वापर केलेला आहे, असे आपल्याला दिसून येते. 

कित्येक संत आणि समाजसुधारक शिव्या वापरताना दिसतात. याचे कारण, शिव्या हा लोकांच्या भाषेचा अविभाज्य भाग आहे, हे त्यांना कळलेले असते. त्यामुळे कित्येकदा ते लोकांशी ‘कनेक्ट’ होण्यासाठी त्यांची भाषा वापरताना दिसतात. या शिवाय, अतिशय अघोरी स्वरूपाच्या प्रस्थापित व्यवस्थेविषयीच्या रागामधूनही संत आणि समाजसुधारक शिव्यांचा वापर करताना दिसून येतात.

संत तुकाराम महाराज आपला आध्यात्मिक राग आणि विद्रोह व्यक्त करण्यासाठी शिव्या वापरतात.

‘देखोनि हरखली अंड । पुत्र झाला म्हणे रांड।

तंव तो झाला भांड । चाहाड चोरटा शिंदळ ॥१॥’ (अभंग क्र २२)

(आपल्या वासनेतून जन्म देणारी माता म्हणजे केवळ रांड असते.) पुढे दुर्जन लोक कसे असतात हे सांगताना तुकाराम महाराज लिहितात -

‘दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी। देखोनियां दुरी व्हावें तया ॥१॥

दुर्जनाचे अंगीं अखंड विटाळ । वाणी रजस्वला स्रवे तैशी ॥३॥’ (अभंग क्र ९२)

(दुर्जन हा मायेमध्ये रमून गेलेला जीव असतो. फक्त स्वतःविषयी विचार करणारा असतो. त्याला देवत्वाचा गंधही नसतो. अशा माणसाविषयी घृणा व्यक्त करताना महाराज म्हणतात की, दुर्जन हा एक अखंड विटाळ असतो आणि त्याची वाणी म्हणजे तर केवळ रजस्वलेचे स्त्रवणे असते!)

पुढे निरीश्वरवाद्यांवर हल्ला करताना तुकाराम महाराज म्हणतात -

‘मातेचीं जो थानें फाडी । तया जोडी कोण ते ॥१॥

वेदां निंदी तो चांडाळ । भ्रष्ट सुतकीया खळ ॥२॥

आगी लावी घरा । मग वसती कोठें थारा ॥३॥

तुका म्हणे वर्म येरा नाचवितो भ्रम ॥४॥’ (अभंग क्र ७९३)

(जो माणूस वेदार्थाची निंदा करतो, ‘ब्रह्म हे अंतिम सत्य आहे’, या प्रतिपादनाची चेष्टा करतो, तो आपल्या स्वतःच्या मातेचे स्तन फाडणाऱ्या लेकासारखा असतो.)

वासनेला महत्त्व देणाऱ्या शक्तिपूजक लोकांविषयी घृणा व्यक्त करताना तुकाराम महाराज म्हणतात की -

‘वेदबाह्य लंड बोले तो पाषांड । त्याचें काळें तोंड संतांमध्यें ॥४॥

तुका म्हणे खंडी भक्तपण । वरिष्ठ त्याहूनि श्वपच तो ॥५॥’ (अभंग क्र ९१९)

वासनेला महत्त्व देऊन जगण्यामुळे माणसाचे अध्यात्ममार्गात काय नुकसान होते, हे तुकाराम महाराज येथे अत्यंत अशिष्ट भाषा वापरून सांगत आहेत. महाराज येथे अत्यंत तीव्र भावना अत्यंत तीव्र शब्दांत व्यक्त करत आहेत. आपल्या आध्यात्मिक प्रतिपादनातली तीव्र भावना लोकांना कळावी म्हणून ते जनसामान्यांची असंस्कृत भाषा वापरत आहेत.

अध्यात्मात शिव्यांचा वापर करणारे अजून एक प्रसिद्ध महात्मे म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ! समर्थ यांच्या आठवणी ‘श्री स्वामी समर्थ बखर’ म्हणून प्रसिद्ध झाल्या आहेत. स्वामींबरोबर राहिलेले श्री गोपाळबुवा केळकर यांनी ही बखर लिहिलेली आहे. या बखरीमध्ये वारंवार लिहिलेले आहे की स्वामी, आपल्या भक्तांचा अहंकार घालवण्यासाठी त्यांना थप्पड मारत आणि त्याबरोबर शिव्या देत! या शिव्यांना ‘वरदगाळी’ म्हणजे ‘आशीर्वादरूपी शिव्या’ असे म्हटले जाते.

या शिव्यांमधून अगदी राजेलोकसुद्धा सुटत नसत. एकदा अक्कलकोट संस्थानचे मालोजी राजे हत्तीवर बसून दर्शनाला आले होते. राजे नमस्कार करण्यासाठी वाकले, तेव्हा समर्थांनी राजांच्या श्रीमुखात भडकवली. ते म्हणाले - “तुझे मोठेपण तुझ्या घरात, येथे मोठेपणा कशाला पाहिजे? मा***दा, असे बदबुलके राजे आपण पुष्कळ बनवतो”. यावर मालोजी राजे स्वामींची क्षमा मागून निघून गेले. पुढे जेव्हा जेव्हा राजे दर्शनाला जात, तेव्हा हत्ती वगैरे लांब ठेवत. आपले राजेपण आणि आपला अहंकार लांब ठेवून ते आश्रमात  पायी जात. (श्री स्वामी समर्थ बखर, अनमोल प्रकाशन, पान ८४)

थोडक्यात काय, तुम्ही राजे असलात तरी या जगात मस्ती करायची नसते. केली तर समर्थांच्या शिव्या बसणारच! आजकाल आपण केवळ पंतप्रधान आहोत म्हणून काही लोक राजासारखे वागताना आपण पाहत असतो. या बाबतीत जगभरात वेळोवेळी दिसून आलेले आहे की, अशा लोकांचा अहंकार घालवायला स्वतः जनता पुढे येऊन शिव्या देते. लोकशाहीमध्ये ‘अकाउंटिबिलीटी’ नाकारली, उत्तरदायित्व नाकारले की, जनतेच्या मनात राग तयार होतो. लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्यांना मिळणाऱ्या शिव्यांचा उगम या रागात असतो. आपल्या मतांवर निवडून आलेला माणूस आम्ही विचारलेल्या न्याय्य प्रश्नांची उत्तरे देत नाही म्हणजे काय, असा विचार लोकांच्या मनात येणे ही अगदी रास्त गोष्ट आहे!

समर्थांनी शिवी दिल्यावर मालोजीराजांना आपली चूक उमगली. त्यांनी हत्ती लांब उभा करायला सुरुवात केली. त्यांनी ‘या मुलांनी मला तर शिव्या दिल्याच, पण माझ्या स्वर्गीय आईलासुद्धा शिव्या दिल्या’ असे ‘व्हिक्टिम कार्ड’ पुढे केले नाही. आपल्याला बसणाऱ्या शिव्या बहुतेक वेळा आपल्या वर्तनाचा आरसा म्हणून आपल्या समोर येतात, हे मालोजीराजांनी लक्षात घेतले.

पुढे एकोणिसाव्या शतकात महात्मा फुले यांनी अत्यंत तीव्र भाषेचा वापर केल्याचे आपल्याला दिसून येते. त्यांनी शिवराळ भाषेचा वापर केला नाही, तरी भद्र समाजाला ‘रक्तपिपासू’ किंवा ‘वाळवी’ अशी शेलकी विशेषणे दिली. शिव्यांचा उगम विद्रोहात असतो तसाच तीव्र भाषेचा उगमसुद्धा विद्रोही भावनेत असतो. त्यांचे एक वाक्य विचारात घेण्यासारखे आहे – “मुखात सुधारणा आणि पोटात सनातनी स्वार्थ बाळगणारे हे ढोंगी सुधारक उघडे पडल्याशिवाय बहुजन समाजाचा उद्धार होणार नाही.”

महात्मा फुले यांचे हे वाक्य अगदी आजही तंतोतंत लागू पडते. त्यांच्या या वाक्यात ‘सुधारक’ या शब्दाऐवजी ‘विकास’ हा शब्द वापरला की, महात्मा फुले यांचे वाक्य एकदम ‘अल्ट्रा मॉडर्न’ संदर्भ प्राप्त करते. पूर्वी उच्चवर्णीय लोक ‘समाजसुधारणे’विषयी बोलत, आता त्याऐवजी ‘विकास’ हा शब्द आला आहे, बाकी सनातनी स्वार्थ तोच आहे.

ज्याचे जळते आहे तो तीव्र भाषा बोलतो. जो सगळी मलई खातो आहे तो कशाला तीव्र भाषा बोलेल आणि शिव्या देईल? ‘जेन-झी’मधील लाखो मुले शेताचे तुकडे विकून शिक्षण घेत आहेत, चौदा चौदा तास अभ्यास करून प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा देत आहेत. आणि अशी परिस्थिती असताना लाखो रुपये खर्च करू शकणारे लोक पेपर खरेदी करून आपल्या नादान पाल्यांची पोळी भाजून घेत आहेत. अशा परिस्थितीत निराश झालेले विद्यार्थी तीव्र भाषिक प्रतिक्रिया देणारच. गेल्या तीन वर्षांत १०० वर परीक्षांचे पेपर फुटल्यावर मुले चिडली आहेत, हे समजून घ्यायला पाहिजे.

आणि, तसं बघायला गेलं तर, कुठली तरुण पिढी शिव्या देत नाही? मी ‘जनरेशन-एक्स’मधील आहे. अगदी आमच्या पिढीतसुद्धा राजकारण्यांना शिव्या द्यायची पद्धत होती. जाहीरपणे, सगळा देश बघत असताना, आमच्या काळात शिव्या दिल्या गेल्या नाहीत, तरी खाजगी गप्पांमध्ये किंवा छोट्या मोर्च्यांमध्ये शिव्या दिल्या जात. त्या वेळी सोशल मीडिया नव्हता म्हणून प्रकरण थोडक्यावर निभावले. नाहीतर त्या काळीसुद्धा जाहीर शिव्या दिल्या गेल्या असत्या.

महाराष्ट्राच्या आधुनिक साहित्यानेसुद्धा शिव्या आणि अश्लील भाषा वापरली आहे. अत्यंत ग्राम्य भाषा वापरणारे थोर साहित्यिक महाराष्ट्रात होऊन गेले आहेत. समाजात शिव्या दिल्या जात असतील, तर त्या शिव्यांनी साहित्यात का येऊ नये? संभोग जर संज्ञाहीन बनला असेल, तर मर्ढेकरांनी त्यावर का लिहू नये?

‘चकाकणारे अब्लख पिस्टन

हिस्के घेती मारित मिटक्या

संज्ञेवाचुन संभोगाची अशीच

कसरत असते हलक्या’

यांत्रिकपणे पुढेमागे होणारे पिस्टन ही यांत्रिक संभोगाची प्रतिमा बनून गेली! त्यावर १९४७ साली केवढा गोंधळ तयार झाला! कृष्णराव मराठे म्हणून एक सनातनी होते. त्यांनी खटला भरला. शेवटी स. ज. भागवत या साक्षेपी समीक्षकाची साक्ष काढली गेली. भागवत म्हणाले की, मर्ढेकरांच्या कवितेमधील अश्लीलता ही समाजातीलच अश्लीलता आहे. कोर्टाने भागवतांचे म्हणणे मान्य केले आणि मर्ढेकरांची सुटका झाली.

त्या निकालात न्यायाधीशांनी स्पष्ट केले की, एखाद्या कवितेतील शब्द केवळ बाह्यरूपाने अश्लील वाटले, तरी कवितेचा एकूण आशय, उद्देश आणि कलात्मक हेतू लक्षात घेणे आवश्यक आहे. केवळ वास्तव मांडणे म्हणजे अश्लीलता पसरवणे नव्हे.

‘जेन-झी’ची अभिव्यक्ती वरवर अश्लील असली, तरी ती अभिव्यक्ती काय सांगते आहे, हे जास्त महत्त्वाचे नाही का? त्याकडे नको का लक्ष केंद्रित करायला? का अश्लीलतेवरच आपण थांबणार आहोत? आणि आपण थांबू म्हटल्याने ‘जेन-झी’ आपल्याला थांबू देणार आहे का? त्यांना स्वच्छ स्पर्धेचे वातावरण द्यायला नको का, त्यांना नोकऱ्या प्राप्त करण्याचे न्याय्य वातावरण निर्माण करून द्यायला नको का?

मर्ढेकरांची आशयाची आणि भाषेची क्रांती १९६०च्या दशकात भाऊ पाध्ये यांच्या ‘वासूनाका’ या कादंबरीने पुढे नेली. या कादंबरीत त्यांनी रंगवला गरिबीने गांजलेल्या भारत देशातील बेरोजगार युवक! तो शिव्या देणारच होता. पाध्यांनी ती सर्व भाषा आपल्या कादंबरीत लिहिली. स्त्री-पुरुषांच्या जननेंद्रियांचे ग्राम्य उल्लेख, संभोगक्रियेविषयीची ग्राम्य क्रियापदे, संभोगक्रियेविषयीची ग्राम्य विशेषणे, त्यातून निर्माण होणाऱ्या आईबहिणींविषयीच्या शिव्या हे सगळे भाऊ पाध्यांनी अगदी बेधडक पद्धतीने मांडले. शतकानुशतके साहित्याने केलेली लपवाछपवी उधळून लावली. खाजगीत समाजाने काहीही बोलावे आणि साहित्याने मात्र शिष्टसंमत भाषा वापरत राहावे, हा दंभ पाध्यांनी उधळून लावला!

पाध्यांनी खरं तर समाजातलीच भाषा लिहिली पण केवढा गदारोळ उठला तेव्हा! आचार्य अत्रे यांच्यासारखा प्रतिभावान माणूससुद्धा समजून नाही घेऊ शकला. अगदी आजच्या सारखाच चौफेर उद्वेग भद्र समाजात! वास्तवच अश्लील आहे, तर साहित्यिकाने तरी काय करावे, हा विचार तेव्हा कोणी केला नाही!

मर्ढेकर आणि पाध्ये यांनी जबरदस्त सुरुवात केली होती, परंतु आधुनिक मराठी साहित्यात मराठी भाषेला खऱ्या अर्थाने शिष्टसंमत संस्कृतीच्या परिघाच्या बाहेर नेले ते नामदेव ढसाळ यांनी! समाजात सर्वत्र नांदत असलेल्या अश्लील अभिव्यक्तीच्या जवळ मराठी भाषेला खऱ्या अर्थाने ढसाळांनी नेले. तुकाराम महाराजांनी शिव्या देत देत अध्यात्म शिकवले. नामदेव ढसाळ शिव्या देत देत स्वातंत्र्याचे आणि समतेचे सूक्त गात राहिले. ढसाळ लिहितात -

‘स्वातंत्र्य नावाची रांड कधीच इथं नांदत नाही…

मुकी, बहिरी झाली ही वांझ व्यवस्था,

आक्रोश तिला दिसत नाही…’

दलितांचा आक्रोश हजार हजार वर्षे झाली तरी या व्यवस्थेच्या कानावर पडला नाही कधी. ढसाळांनी तरी या संस्कृतीने मान्य केलेल्या सुसंस्कृत भाषेची पालखी किती काळ वाहावी?

आपल्या, ‘त्यांची सनातन दया’ या कवितेत ढसाळ लिहितात -

“त्यांची सनातन दया फॉकलंड रोडच्या भडव्याहून उंच नाही…”

उच्च वर्णांचे स्वार्थ साधणारी संस्कृती आणि उच्च वर्गांचे आर्थिक स्वार्थ पाहणारी अर्थव्यवस्था या दोन्हींच्या दयेला तसा काय अर्थ असतो? भडव्याने वेश्येला दाखवलेली दया जशी उथळ असते, तशीच स्वार्थी माणसाची आणि स्वार्थी संस्कृतीची दयासुद्धा उथळ असते असे ढसाळ सांगत आहेत! १०० पेपर लीक होऊ देणारी व्यवस्था जर न्यायाची भाषा करत असेल, तर त्याला काय अर्थ आहे?

स्वातंत्र्य मिळून पंचवीस वर्षे झाली तरी दलितांना न्याय मिळेना म्हणून दलित प्रतिभा चवताळून उठली, आज शिक्षण आणि नोकऱ्या फक्त पैसेवाल्या लोकांच्या झाल्या आहेत म्हणून ‘जेन-झी’ प्रतिभा चवताळली आहे. जंतरमंतरवरील मीम्समधून व्यक्त झालेली सृजनशीलता ज्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेली आहे, त्यांना या ‘मुक्त’ प्रतिभेमागची वेदना जाणवलेलीच असणार!

जातिवादी संकृतीविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ढसाळांनी अगदी उत्स्फूर्तपणे अश्लीलता एक अभिव्यक्ती म्हणून हाती घेतली. आणि आज, आपल्यावरच्या अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्यासाठी ‘जेन-झी’ने ढसाळांएवढ्याच उत्स्फूर्तपणे अश्लीलता आपल्या हाती घेतली. दोन्हीकडे अन्यायातून मुक्ती हवी हाच उद्देश आहे! अन्यायातून मुक्तता हेच स्वप्न!

‘अंधाराने सूर्य पहिला तेव्हा’ या कवितेत ढसाळ म्हणतात -

‘मुक्तछंदाच्या संजीवनीने आम्ही जिवंत झालो आहोत-- तुमच्या पापाचे छिनाल घट फोडण्यासाठी!’

‘जेन-झी ’ची अश्लीलता आपण ढसाळांचा ‘मुक्तछंद’ समजून घेतो तशी समजून घेतली पाहिजे.

आपल्या ‘आढी’ या कवितेत ढसाळ म्हणतात -

‘तुम्हाला गिळत सुटलेलं बदफैली संस्कृतीकरण

लांडंभुंडं पहातोय चिरफाळलेल्या डोळ्यांनी’

राग, रागामधून विद्रोह आणि विद्रोही मनःस्थितीमुळे विचलित झालेल्या लिम्बिक सिस्टिममधून उसळून आलेली अश्लीलता, अशी ही सगळी साखळी आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

शिव्या सर्वत्र आहेत आणि त्यामुळेच त्या कित्येकदा आपल्या संभाषणात अगदी उद्गारवाचक चिन्हांसारख्या सतत येत असतात. आपण एखाद्या किरकोळ गोष्टीसाठी ‘हात्तिच्या एवढेच ना’, असे अगदी नेहमी म्हणतो. यातील हात्तिच्याचा अर्थ खरं तर, ‘अरे, मी हत्तीच्या आईला लागलेलो आहे. त्यामुळे ही गोष्ट तर माझ्यासाठी अगदी किरकोळ आहे’ असा आहे. असे सर्व असताना या समाजात कुणी कुणाला  शिव्या दिल्यातर उद्वेग वाटल्याचे ढोंग कशाला करायचे?

आजच्या ओटीटी प्लॅटफॉर्म वरील सर्व फिल्म्स, सर्व मालिका आणि सर्व नाटके अश्लील भाषेने ओतप्रोत भरलेली आहेत. ‘जेन-झी’ ही भाषा ऐकतच मोठी झालेली आहे. इतकेच कशाला, स्वतः नरेंद्र मोदी यांच्या शपथग्रहणाच्या आणि भाषणाच्या क्लिप्स ज्या ‘धुरंधर’ या सिनेमात आहेत, त्यामधील भाषा काय आहे? ‘मैं तुझे मेरे ***पे रखता हूँ’ अशी वाक्ये या सिनेमात जागोजागी विखुरलेली आहेत. भारतीय सेन्सॉर बोर्डाने पास केलेल्या सिनेमातील भाषा समाजात वापरली गेली, तर कुणी का हरकत घ्यावी? ज्या सिनेमात आपण आपल्या क्लिप्स वापरू दिल्या आहेत, त्या सिनेमातली भाषा ‘जेन-झी’ने वापरली तर आपल्याला वाईट का वाटावे? याशिवाय, पेपर लीक रोखण्यात आपण कमी पडलो, हेसुद्धा आपण मोकळ्या मनाने मान्य करायला काय हरकत आहे?

तुकाराम महाराजांनी लिहिले आहे –

‘दर्पणासी नखटें (नकटें) लाजे । शुद्ध खिजे देखोनि’॥१॥ (अभंग - ४३५)

(आपण नकटे असलो, तर आरशात आपले रूप बघून आपल्याला खूप वाईट वाटते. आरसा खरं तर आपले रूप आपल्याला दाखवत असतो, त्यावर कशाला चिडायचे?)

या जगात उगीच कुणी कुणाला शिव्या देत नसते. शिव्या ज्याप्रमाणे आदिम ‘लिम्बिक सिस्टिम’मधून येतात. त्याचप्रमाणे त्या आपल्याला मिळाल्यावर त्या आपल्याही ‘लिम्बिक सिस्टीम’पर्यंत पोहोचतात. आपण समूळ हादरून जातो. तो अनुभव सहन करू शकणे म्हणजे आपल्या अहंकारावर विजय मिळवणे.

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

बिहारमधील एसआयआर : मतदार यादीची पडताळणी की मताधिकाराची पुनर्परीक्षा? महाराष्ट्रात चाललेल्या एसआयआर प्रक्रियेत हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जाणे गरजेचे आहे

प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क प्रत्यक्षात बजावता यावा याची खात्री करणे, हे निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी मतदार यादी हे एक साधन आहे. अंतिम उद्दिष्ट नाही. मृत व्यक्तींची नावे वगळणे आवश्यक आहे. दुबार नोंदी काढणे आवश्यक आहे. मतदार यादी अचूक ठेवणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियांचा अंतिम हेतू मतदाराला मतदानापासून वंचित करणे, हा नसून त्याचा मतदानाचा हक्क सुरक्षित करणे हा असतो.......

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......