प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात
पडघम - देशकारण
विनय हर्डीकर
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • Thu , 09 July 2026
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP

प्रिय नरेंद्रभाई,

तुमच्या आयुष्यभरच्या महत्त्वाकांक्षेची पूर्तता झाल्याबद्दल, तुमच्या ‘उत्कट’ (उद्धट?) ध्येयापर्यंत पोहोचल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. (ते ध्येय नेमकं काय असू शकेल, याचं मला कायमच कुतूहल होतं!) अखेर तुम्ही नेहरूंवर एका बाबतीत तरी मात केली आहे. आता तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त दिवस ‘निवडून आलेले पंतप्रधान’ म्हणून सत्तेवर आहात. पण तुमचं राजकारण पाहता, एकूण कार्यकाळाच्या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकाल बहुतेक. ऑगस्ट १९४७ ते मे १९६४ — जवळपास १७ वर्षं ते सत्तेत होते, (तुमचं काय होतं पाहू!)

आणि तुम्ही नेहरूंपेक्षा फार काही वेगळेही नाही. दोघांनाही सत्ता सहज मिळाली, अगदी ताटात वाढून समोर आली म्हणा ना! नेहरूंना गांधींचे वारसदार म्हणून, तर तुम्हाला (सोनिया) गांधींनी दिलेल्या “मौत का सौदागर” या उपाधीमुळे. ‘मुसलमानांचे रक्त सांडताना कसलाही विधिनिषेध न बाळगणारा निर्दयी हिंदू राजकारणी’ अशी तुमची प्रतिमा त्यांनी उभी केली. त्यांनी तुम्हाला तसं म्हटलं नसतं, तर कदाचित तुम्ही अजूनही गुजरातमध्येच असता. गांधींनी नेहरूंना धर्मनिरपेक्ष भारताचा चेहरा म्हणून पुढे केलं; तर सोनियांनी तुम्हाला ‘हिंदूंचा तारणहार’ म्हणून ओळख मिळवून दिली.

नेहरूंप्रमाणेच तुम्हालाही पक्षांतर्गत विरोध झाला नाही. दुसरं म्हणजे, नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे आणि त्यांची स्तुती करण्याच्या बाबतीत त्यांच्यात अहमहमिका असायची. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

यातला उपरोध बाजूला ठेवला तरी, नेहरू आणि तुम्ही दोघंही महत्त्वाच्या ऐतिहासिक क्षणी सत्तेवर आलात, हे मात्र नक्की. ‘भारताने नियतीशी केलेला करार’ साकार होत असताना, एका विविधतेनं आणि कमालीच्या अंतर्विरोधांनी भरलेल्या समाजामध्ये ‘आधुनिक धर्मनिरपेक्ष राष्ट्रा’चा पाया घालणं हे आव्हान मोठं होतं. ते पेलण्यासाठी नेहरूंचीच गरज होती. आणि तुमच्या बाबतीत बोलायचं तर, जेव्हा आघाडी सरकारांना कंटाळलेल्या जनतेला केंद्रात काही प्रमाणात स्थैर्य हवं होतं; तेव्हा जनतेनं तुम्हाला स्वीकारलं.

“देशातल्या सगळ्या समस्यांचं मूळ इंग्रजांच्या वसाहतवादी राजवटीत आहे”, या भावनेच्या लाटेवर नेहरू स्वार झाले; तर अण्णा हजारे यांचं भ्रष्टाचारविरोधी आंदोलन आणि आम आदमी पक्षाच्या पहिल्या दिल्ली सरकारची फजिती, यांचा फायदा घेऊन तुम्ही पुढे आलात. तुम्ही खूप शिताफीनं ‘स्थिर आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार म्हणजे बिगर काँग्रेस सरकार’ अशी भावना मतदारांमध्ये जागी केलीत.

नेहरूंनी त्यांच्या काळी देशवासीयांना आश्वस्त केलं की, “भारतीयांनी वसाहतवादी मानसिकता झटकून राष्ट्रनिर्माणात मनापासून सहभाग घेतला, तर सर्व काही शक्य आहे”. आणि तुमच्या काळात “खऱ्या अर्थाने भ्रष्टाचारमुक्त भारत म्हणजे काँग्रेसमुक्त भारत” हे तुम्ही लोकांच्या गळी उतरवलंत. दोघांचं तंत्र एकच होतं. पण नेहरूंनी त्यांच्या आरोपांच्या तोफा देशाबाहेर डागल्या होत्या; तुम्ही त्या काँग्रेसच्या दिशेनं वळवल्यात. आणि इथूनच तुम्ही नेहरूंपासून वेगळे व्हायला लागता. दोघांनाही सत्ता पहिल्यांदा मिळाली, तेव्हा देशाची परिस्थिती अराजकाचीच होती; पण नेहरूंनी त्यातून मार्ग काढण्यासाठी ‘आशा आणि स्वप्नं’ यांची कास धरली, आणि तुम्ही मात्र ‘द्वेष आणि ध्रुवीकरणा’चा मार्ग निवडलात!

नेहरू विरोधकांना सामोरे जायचे, ते मुत्सद्दीपणानं आणि सुसंस्कृतपणानं; तुम्ही मात्र पहिल्यापासूनच आणि आक्रमकपणे आणि बेमुर्वतखोरपणे वागत आला आहात. “आपल्याला आव्हान देऊ शकेल असं नेतृत्व किंवा विरोधी पक्ष देशात अस्तित्वात नाही”, हे नेहरूंना ठाऊक होतं. तरीही त्यांनी विरोधकांना सन्मानाची वागणूक दिली. ते संसदेत हजर राहायचे, विरोधकांची भाषणं ऐकायचे, प्रसंगी त्यांचं कौतुकही करायचे. नरेंद्रभाई, तुम्ही स्वतःच्या बाबतीत अशा वागण्याची कल्पना तरी करू शकता का?

नेहरूंना जगभरातून प्रेम आणि आदर मिळाला. नासेर आणि टिटो यांच्या सहकार्यानं त्यांनी उभारलेली अलिप्त राष्ट्रगटाची चळवळ ही त्यांची महत्त्वाची कामगिरी ठरली. त्या तिघांनंतर त्या चळवळीचा आत्मा हरवल्यासारखा झाला खरा; पण आजही जगात अनेक संघर्ष आणि युद्धं सुरू आहेत, आणि त्यांच्याशी अर्थाअर्थी काहीही संबंध नसलेल्या देशांनाही नाईलाजानं कोणाची तरी बाजू घ्यावी लागते आहे. अशा परिस्थितीत नेहरूंच्या अलिप्ततावादाची गरज प्रकर्षानं जाणवते आहे.

तुम्ही निवडून आल्यावर पहिल्या दोन-तीन वर्षांत असंख्य परदेशवाऱ्या केल्यात. (संघाचे प्रचारक म्हणून देशातच अडकून राहिल्याची भरपाई म्हणून का हो?) तेव्हा तुमचं सगळीकडे अगदी उत्स्फूर्त स्वागत झालं, असं आम्हाला असं दाखवलं गेलं. पण ते म्हणजे खरं तर गुजराथी लोकांच्या ‘आपणो नरेंद्रभाई’ या भावनेचे प्रदर्शनच होतं, असं नाही वाटत तुम्हाला?

मला वाटतं. कारण जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झालेल्या भारतीय समाजात गुजराथी लोकांचंच प्रमाण सगळ्यांत जास्त आहे! नुकतंच तुम्ही देशवासीयांना काटकसरीचं आवाहन केलंत, पण विसरू नका, तुमच्या पहिल्या कार्यकाळात तुम्हीही ‘सोन्याचा अंगरखा’ (Million Dollar Golden Suit) परिधान केला होतात! लोकांची स्मरणशक्ती इतकी क्षीण असते, असं तुम्हाला खरंच वाटतं?

तुम्ही चोवीस तास नेहरूंवर टीकेची झोड उठवत असता. त्या निमित्तानं तुम्हाला आठवण करून देतो - भारत आज तीव्र पेट्रोलियम टंचाईपासून वाचला आहे, त्याचं कारण म्हणजे आपला कच्च्या तेलाचा चाळीस टक्क्यांहून जास्त पुरवठा रशियाकडून येतो. तुम्ही इतिहास किती वाचला आहे, ते मला माहीत नाही; पण नरेंद्रभाई, स्वतःला किंवा तुमच्या ‘थिंक टॅंक’ला  (असलाच तर!) विचारा — भारत-रशिया किंबहुना भारत-सोव्हिएत मैत्रीचे शिल्पकार कोण होते? नेहरूच ना! त्याच मैत्रीला स्मरून बांगलादेश युद्धाच्या काळातही सोव्हिएत संघ भारताच्या पाठीशी उभा राहिला होता.

नेहरूंची भलामण करण्याचा माझा हेतू नाही. भारतात विकासाची ‘शासन-नियंत्रित सोव्हिएत पद्धत’ (कमांड इकॉनमी) आणल्याबद्दल आणि झपाट्यानं औद्योगिकीकरण करण्याच्या नावाखाली कृषी क्षेत्राकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याबद्दल मी त्यांच्यावर नेहमीच टीका करत आलो आहे. पण म्हणून तुम्ही इतिहास तुम्हाला वाटेल तसा फिरवू शकत नाही.

उदाहरणार्थ, मध्यंतरी तुम्ही बराच कांगावा केलात की, “काँग्रेसने ‘हिंदू’ या शब्दाची, संकल्पनेची आणि समुदायाची खूप बदनामी केली आहे.” त्यापूर्वी ‘हिंदू’ हा शब्द, ‘हिंदू’ ही संकल्पना, आणि ‘हिंदू समाज’ हे अगदी धुतल्या तांदळासारखे होते, अत्यंत कठोर निकषांवर त्यांची परीक्षा केली, तरी ते निर्दोष ठरले असते, याची खात्री तुम्ही देऊ शकता का? कदाचित हा प्रश्न तुमच्या आवाक्याबाहेरचा असेल, पण एवढं तरी सांगा की, काँग्रेस इतकी हिंदूविरोधी असती, तर जिना आणि आंबेडकर यांनी स्वतंत्र पक्ष का स्थापन केले असते? त्यांना त्याची गरज वाटली, कारण काँग्रेस हा मुळात ‘हिंदू पक्ष’च होता!

काँग्रेसमधल्या सहकाऱ्यांना नेहरूंचा धाक होता, नेहरूंचं वर्चस्व मान्य करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हतं. भाजपमध्ये तुमचाही दरारा तसाच आहे. नेहरू जिवंत असताना “त्यांच्यानंतर कोण?” हा प्रश्न उघडपणे कधीच विचारला गेला नाही. चर्चा झालीच असेल तर अगदी क्वचित, खासगीत आणि आडून आडून झाली असेल. त्यांच्या निधनानंतर मात्र सगळंच बिनसलं आणि त्यांच्या अंत्यसंस्काराच्या आधीच गटबाजीमुळे काँग्रेसला पडलेली खिंडारं उघडी पडली. तुमच्या माघारी भाजपला असा धक्का झेपेल का? इथे मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो : मी तुमच्या अकाली निधनाचं भाकित वगैरे करत नाही. तुम्हाला दीर्घ आणि आणखी चांगलं आयुष्य लाभो. तरी पण एक मात्र नक्की की, ‘तुमचा उत्तराधिकारी कोण?’ हा प्रश्न आज ना उद्या उद्भवणारच आहे. तुम्हाला सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याची संधी मिळावी म्हणून कदाचित भाजप निवृत्तीचं काल्पनिक वय ऐंशी वर्षांवर नेईलही. तरी उत्तराधिकारी कोण हा प्रश्न उरतोच.

टीका करण्याच्या निमित्तानं का होईना, तुम्ही नेहरूंच्याविषयी इतके सतत बोलत असता की, आता तुमचीच एक बाजू ‘नेहरूमय’ झालेली आहे. गंमत म्हणजे, तुमच्या कट्टर ‘विरोधभक्ती’मुळे तुम्ही नेहरू-गांधी कुटुंबाच्या तीन्ही पिढ्यांतले नेमके नको ते गुण (?) अंगी बाणवले आहेत. त्यातही मागच्या पिढीपेक्षा पुढच्या पिढीकडून वाढता ‘वसा’ घेतला आहे. इंदिरा गांधी त्यांच्या वडिलांप्रमाणे ‘एकाधिकारशाही’ वृत्तीच्या तर होत्याच; पक्षावर त्यांची जरबही होती. पण त्याही पुढे जाऊन त्यांच्या स्वभावात एक निष्ठूरता आणि सूडबुद्धी होती. त्यांचा मुलगा संजय गांधी. त्याच्या अंगी आजोबा आणि आईमधले हे सगळे गुण(दोष?) तर होतेच; शिवाय त्याचं राजकारण बेतालपणाचं आणि असभ्यही होतं. पण तुम्ही तर या सर्वांपेक्षा एक पाऊल पुढे आहात!

तुमच्यात हे सारे ‘गुण’ तर आहेतच; शिवाय ‘दुटप्पीपणा’तही तुमचा हातखंडा आहे. ‘मुत्सद्देगिरी’ हा राजकारणाचा भाग आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात दिशाभूल करणारं, संदिग्ध, दुटप्पी बोलणं अपरिहार्य असतं, हे मला मान्य आहे. पण त्यामागचा हेतू सहसा दुटप्पी नसतो. तुमच्याकडे मात्र ‘दुटप्पी हेतू’ आहे. राष्ट्रीय पुनर्निर्माणासाठी विरोधकांनी सरकारसोबत यावं, असं आवाहन तुम्ही त्यांना करता; पण निवडणूक प्रचारसभांमध्ये त्यांनाच ‘देशद्रोही’, ‘जनतेचे शत्रू’ आणि काय काय म्हणत सुटता!

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

‘एक देश, एक निवडणूक’ म्हणून तुम्ही मारे मोठ्या घोषणा देता; पण देशाच्या वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या वेळी जेव्हा विधानसभा निवडणुका होतात, तेव्हा मात्र तुम्ही अगदी उत्साहात असता. कारण तेव्हा तुम्हाला प्रादेशिक पक्ष फोडण्याची आणि त्यातली निवडक ‘उपयोगी’ मंडळी भाजपमध्ये आणण्याची आयती संधी मिळते. एकीकडे तुम्ही संविधानावर तुमचा पूर्ण विश्वास असल्याचा दावा करता; पण दुसरीकडे त्याच संविधानात, जगातल्या सर्वांत मोठ्या लोकशाहीचा पाया असलेल्या त्याच घटनेत, मूलभूत (तुमच्या सोयीचे) बदल करण्याचा तुमचा अंतःस्थ हेतू असतो. आणि त्याच हेतूनं एनडीएच्या खासदारांची संख्या वाढवण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस प्रयत्न करत असता. नरेंद्रभाई, यात ‘खिलाडूपणा’पेक्षा ‘खुनशीपणा’ जास्त आहे.

तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल आणि ‘मन की बात’द्वारे थेट जनतेशी संवाद साधत असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात. मात्र तिथं तुम्ही क्वचितच उपस्थित राहता. विरोधक हे तुमचे शत्रू नाहीत. तुम्ही त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याची गरज नाही; पण त्यांच्याशी सौजन्यानं वागणं आवश्यक आहे. त्यांचं ऐकून घ्या, त्यांच्याशी बोला - ही काही फार मोठी अपेक्षा नाही! बारा वर्षं सत्तेत राहिल्यानंतर देश नेहरूंकडे तारणहार म्हणून पाहत होता, विध्वंसक म्हणून नव्हे. जमलं तर त्यातून काही धडा घ्या.

नेहरूंचं राहू द्या एकवेळ; तुमच्याच पक्षाचे माजी पंतप्रधान अटलजी – त्यांचं तरी अनुकरण करा. तेही करणं इतकं अवघड आहे का? आणि हो, तुमच्या (सोयीस्करपणे) लक्षात नसेल तर आठवण करून देतो — अटलजींना ‘जनसंघाचे नेहरू’ म्हणत असत!

तुमचा निष्ठावान टीकाकार

विनय हर्डीकर

.................................................................................................................................................................

२० जून २०२६ रोजी ‘कर्तव्य साधना’वर प्रकाशित झालेल्या मूळ इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद.

अनुवादक - ऋचा मुळे

ruchamg@gmail.com

.................................................................................................................................................................

लेखक विनय हर्डीकर गेली पाच दशकं महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेक पैलूंनी समृद्ध असले, तरी प्रस्थापित लेखक, पत्रकार, संपादक, समीक्षक, कार्यकर्ते आणि शिक्षक ही त्यांची प्रमुख ओळख राहिली आहे.

vinay.freedom@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

बिहारमधील एसआयआर : मतदार यादीची पडताळणी की मताधिकाराची पुनर्परीक्षा? महाराष्ट्रात चाललेल्या एसआयआर प्रक्रियेत हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जाणे गरजेचे आहे

प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क प्रत्यक्षात बजावता यावा याची खात्री करणे, हे निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी मतदार यादी हे एक साधन आहे. अंतिम उद्दिष्ट नाही. मृत व्यक्तींची नावे वगळणे आवश्यक आहे. दुबार नोंदी काढणे आवश्यक आहे. मतदार यादी अचूक ठेवणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियांचा अंतिम हेतू मतदाराला मतदानापासून वंचित करणे, हा नसून त्याचा मतदानाचा हक्क सुरक्षित करणे हा असतो.......