अजूनकाही
आजकाल आपण जे काही पाहतोय, अनुभवतोय, त्यामुळे खरं तर काळ तर मोठा कठीण आला, असंच म्हणावंसं वाटतंय. कारण केव्हा, कुठे काय घडेल याचा अंदाजच कुणालाच येत नाहीय. बेकारी, महागाई वाढतेय, अनेकांच्या नोकऱ्या जाताहेत, पण हजारो कोटींची गुतवणूक होतेय, त्यामुळे अनेक रोजगार निर्माण होतील, असं सांगितलं जातंय. मात्र नक्की किती रोजगार वाढणार, याबाबत मात्र मौन पाळलं जातंय. म्हणजे काही वेळा आकडे दिले जातात एवढंच. पण त्यातही बनवाबनवी असते. कारण नंतर त्याबाबत काहीच घडत नाही. त्यांना वाटतं की, लोक विसरतील. पण लोक सहजासहजी विसरत नाहीत.
तरीही काही करण्याची इच्छा आणि ताकद त्यांनी गमावली आहे. एकीकडं कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे असं सांगितलं जातं, पण दुसरीकडे तर गुन्ह्यांची संख्या सतत वाढतीय. सर्वांना सकस अन्न पुरवलं जातंय, असं सांगितलं जातंय, पण वास्तवात उपासमारीनं, कुपोषणानं अनेक जण जीव गमावताहेत. अर्थात हे काही नवीन नाही. गेल्या एका तपात आपण सारे या थापेबाजीला निर्ढावलो आहोत, त्याचं कुणाला काहीच वाटेनासं झालंय…
आपले ‘विश्वगुरू’ म्हणत होते- रशिया-युक्रेन युद्ध आम्ही थांबवलं. त्यांच्या भक्तांना ते खरंही वाटलं. पण चार वर्षं झाली, तरीही ते युद्ध थांबण्याचं नाव नाही. चार महिन्यांपासून अमेरिका-इराण युद्ध सुरू होतं. तूर्त तरी ते थांबलंय. त्याचं श्रेय मात्र पाकिस्ताननं घेतलंय. मात्र तेही खरंच थांबलंय की, तात्पुरतं हे कुणालाच सांगता येत नाही. पण या प्रकरणानं पाकिस्तानचा भाव मात्र जगात वाढला आहे. …तर या युद्धामुळे आपल्याकडं मात्र इंधन, गॅस आदींच्या किमती वाढल्या. मात्र सरकार सांगत होतं की, सर्व काही ठीक आहे.
भाव वाढले, टंचाई जाणवू लागली, तरी सरकारचंच म्हणणं खरं मानायचं? मानणारे मानतीलही. पण सर्वसामान्य माणसाला त्याची मोठीच झळ लागतेय हे खरं. त्यालाच रांगेत गॅससाठी तासन्तास उभं राहावं लागतंय. सरकार मात्र आमच्याकडं मुबलक साठा आहे, असं सांगतं. इंधनाचे भाव वाढले की, एकूणच महागाई वाढते. प. बंगाल काबीज करायचा होता म्हणून तेथील निवडणूक पार पडेपर्यंत भाव वाढवले गेले नाहीत आणि त्यात यश मिळालं की, लगेच भाववाढ केली. मतदारांच्या विश्वासाचा अशा प्रकारे फायदा घेतला जातो. त्यांना पाच वर्षं वा पुढील निवडणुकीपर्यंत काहीच करता येत नाही, अन् त्या वेळी काही लालूच दाखवली की, ते पुन्हा हुरळल्या मेंढ्यांसारखे त्यांच्यामागूनच जातात. नंतर पुन्हा तेच. असं गेली बारा वर्षं चाललंय.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
पंडित नेहरूंचा उद्धार वारंवार करायचा. त्यांच्यामुळेच ही वेळ आलीय असं सांगायचं. पण त्यांनी घातलेल्या भक्कम पायामुळेच आपण गमजा मारतोय, हे यांच्या ध्यानात येत नाही. परदेशात नेहरूंना अद्यापही मानतात. त्यांच्या शांततेच्या धोरणांची वाखाणणी करतात. आम्ही फक्त युद्ध थांबवल्याच्या ‘वल्गना’ करतो. पदोपदी काँग्रेसला नांव ठेवायची, आम्हाला ‘काँग्रेसमुक्त भारत’ करायचा आहे, असं म्हणत राहायचं आणि जास्तीत जास्त काँग्रेसवाल्यांना आपल्यात सामावून घ्यायचं. लोकं म्हणतात की, ‘काँग्रेसमुक्त भारत’ होवो ना होवो, भाजप मात्र ‘काँग्रेसयुक्त’ झाला आहे. खरं तर यांना केवळ काँग्रेसच नाही, तर विरोधी कोणताही पक्ष नकोय. त्यांना एकछत्री अंमल हवाय. तोही एकाच नेत्याचा. हुकुमशहासारखा.
त्यामुळे पूर्वी काँग्रेसवाल्यांना ज्यावरून नावं ठेवली, ती सारी कृत्यं आता भाजपच करत आहे. ‘भ्रष्टाचार आम्ही संपवला’, असं गर्जून सांगितलं जातं, पण त्याच वेळी ठिकठिकाणांहून अमक्याला लाच घेताना अटक, अशा बातम्या आपण वारंवार वाचतच असतो.
लोकांच्या श्रद्धेचा पुरेपूर फायदा घेऊन वारेमाप पैसा जमवून अयोध्येत राममंदिर उभं केलं, पण त्यात चाललेला भ्रष्टाचार आता उघड्यावर आला आहे. करोडो रुपयांची अफरातफर झालीय. लोकांनी श्रद्धेनं दिलेल्या देणग्यांचा अपहार केला गेला. तो करणारे कोण, हे आता उघडकीला येऊ लागलंय. पण हे सांगणार- ‘आम्हाला हे माहीतच नव्हतं’! नाइलाजानं आता आठ जणांवर गुन्हा दाखल केलाय, पण त्यांचा प्रमुख त्यात नाही. खरं तर, त्याला सारं काही माहीत असूनही त्यानं वर्षानुवर्षं हा प्रकार सुरू ठेवला, म्हणून तोच प्रमुख दोषी असायला हवा. मात्र तसं होणार नाही. तो तर म्हणे राजीनामा देऊन मोकळा झाला आहे. त्याला कोणाचं अभय आहे, हे सांगायला नकोच. लोकांना ते पुरेपूर माहीत आहे. असा यांचा कारभार.
काही जण तर म्हणतात की, राममंदिराच्या उभारणीपासूनच अशा प्रकारे पैसा जमवला जात होता. त्या प्रचंड पैशाधारेच त्यांनी निवडणुकीसाठी, पक्ष फोडण्यासाठी किती पैसा ओतला असेल, याची कल्पनाच केलेली बरी. पण हे सांगतात, आम्ही काही केलं नाही, आमच्याकडं हे आले ते आमच्या विकासाच्या मुद्द्यावरून. अर्थात आमचा ‘विकास’ झाला, तसा त्यांना स्वतःचा ‘विकास’ करून घ्यायचा असतो. पण तो ‘विकास’ही लोकांना दिसतच असतो. ‘दिन दूना, रात चैगुना’ म्हणतात त्या गतीनं हा ‘विकास’ होत असतो.
या ‘विकासा’बरोबर मग्रुरीही येते. त्यामुळेच ‘विकासा’साठी त्यांच्यात दाखल झालेला एक खासदार माध्यम प्रतिनिधींना अरेरावीने सुनावतो. आम्ही पाच खून केलेत, तुमच्यावर बॉम्ब टाकीन, अशा धमक्या देतो. त्याबाबत त्याला नवे धनी काहीच सुनावत नाहीत. कदाचित त्यांना समाधान होत असावं. आपल्यात सामील झाल्याबरोबर त्याच्या बुद्धीचाही चांगलाच ‘विकास’ झालाय, हे पाहून ते समाधान पावत असतील! पण आधी ज्यांच्या टाळ्या वाजवल्या त्यांना यानं काय प्रकारे दगा दिला, याकडं ते दुर्लक्ष करतात. यामुळे नव्यानं यांच्यात सामील झालेला खासदार आणखी शेफारला नाही, मुजोर झाला नाही, तरच नवल म्हणायचं!
राज्याचे गृहमंत्री जे मुख्यमंत्रीही आहेत, ते सांगतात की सारं काही ठीक आहे, पण राज्यात शेतकरी, विद्यार्थी आणि अनेक पीडित महिला आत्महत्या करत आहेत, हे बहुधा त्यांच्या गावीच नसावं. अशा आत्महत्यांची कारणं काय, याचा मागोवा मात्र ते घेत नाहीत. ‘विकास’ म्हणून यांनी (गरज नसलेले) अनेक रस्ते बांधले. तेवढ्यानं समाधान झालं नाही, म्हणून आता देवस्थानांना जोडण्यासाठी ‘शक्तीपीठ’ नावानं त्यांना रस्ता बांधायचाय. तोही बाजूलाच दुसरा चांगला महामार्ग असताना. पण यांना शेतकऱ्यांचं भलं करायचं असल्यानं शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घ्यायच्या आहेत.
सुदैवानं शेतकरी आता स्वाभिमानी झाला आहे, आणि तो या बेताला जोरदार विरोध करतोय. पण आपलंच खरं करायचं ही यांची वृत्ती. त्यामुळे ते काय करतील ते पाहायचं. कारण आपल्याला विरोध करणाऱ्यांना ‘देशद्रोही’ ठरवायचं हे यांचं ब्रीद. लोकांच्या देशभक्तीला आवाहन करायचं, हा सोपा मार्ग ते अमलात आणतात.
अनेक शहरांत टोळीवाल्यांची दहशत असते. त्यांना कुणीच अडवत नाही. ते गाड्या फोडतात. रस्त्यावर तलवारीनं केक कापून कुणाचा तरी वाढदिवस साजरा करतात. पोलीस त्यांना अडवायचं धाडसही करत नाहीत. इतका त्यांचा धाक असतो. खेरीज त्यांना कुणाचं पाठबळ असतं, ते पोलिसांना माहीत असतं. त्यामुळेच ते त्या टोळ्यांना चाप लावत नाहीत. परिणामी पोलिसांचा धाकच नाहीसा होत आहे, त्यांची बदनामी होते. तरी ते गप्पच असतात, आणि गरीब बिचारी प्रजा निमूटपणे सारं सहन करत आहे.
पुण्या-मुंबईत अनेक गुन्हेगार मोकाट आहेत, पण गृहखात्याचे डोळे मिटलेलेच आहेत. त्यांचं लक्ष फक्त विरोधकांतील लोक कसे फोडायचे, त्यासाठी साम, दाम, दंड, भेद या मार्गांचा वापर कसा करायचा, यावरच. आणि आता तर त्या मार्गानंच यांच्याकडं आलेले लोक त्याच प्रकारे आपले जुने पक्ष फोडण्याचं काम करत आहेत. ‘आम्ही मिंधे झालो, तसे तुम्हीही व्हा’ असा सांगावाच जणू देत आहेत. कुठं कुणाला दूरच्या राज्यात न्यायचं, तर कुणाला शेजारच्या राज्यात. ते राजी झाले तर बरं, नाहीतर सीआयडी, ईडी, इन्कमटॅक्सचे अधिकारी त्यांच्यामागं लावायचे, हे तंत्र आता जगजाहीर झालं आहे.
ईडीनं लक्षावधी गुन्हे दाखल केले खरे, पण त्यातील कणमात्र, म्हणजे जास्तीत जास्त दोन टक्के सिद्ध झाले, याचीही लाज यांना नाही. अर्थात ज्यांच्याकडं लाजच नाही, त्यांना काय लाज वाटणार? शिवाय तोवर अनेक जण यांच्या डेऱ्यात की लाँड्रीत, आलेले असतात!
माध्यमांवर बहुतांशी यांचाच ताबा. त्यामुळे यांच्या गैरकृत्यांना प्रसिद्धी मिळत नाही. माध्यमं फक्त यांच्याच आरत्या ओवाळत असतात. यांना जराही दुखावलं, तर लगेच बदल्या होतात किंवा कामावरून काढून टाकलं जातं. पण तरीही यांचं समाधान नाही, कारण अद्यापही काही स्वाभिमानी लोक यांच्यावर टीका करतात, यांच्या भ्रष्ट कारभाराला वाचा फोडतात. देशातच नाही, तर परदेशातही ते प्रसिद्ध होतं. मग मात्र यांचा चडफडाट होतो, कारण तिथं यांना काही करता येत नाही. तरीही ते तसा प्रयत्न करतात. थोडंफार यश मिळालंच तर, बघा आमचंच खरं म्हणून स्वतःचीच पाठ थोपटतात. यश नाही मिळालं, तर मात्र संबंधिताना तळतळाट, शिव्याशाप देऊन गप्प राहतात.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
आता काही दिवसांपासून ‘स्मार्ट मीटर’ची सक्ती केली जातेय. तरीही सक्ती नाही असं सांगत ते सर्रास बसवण्यात येत आहेत. लोकांनी कितीही विरोध केला, त्यांना दोनशेच्या ऐवजी दोन हजाराची बिलं आली, तरी सारं काही सुरूच आहे. लोकांची गरज निवडणुकीपुरती. त्यामुळेच तर हा आग्रह सुरू आहे. यामागचं कारणही आता स्पष्ट झालंय. अडानीसाठी हे सारं आहे आणि त्याच्यावर तर साक्षात स्वघोषित ‘विश्वगुरू’चा वरदहस्त. मग काय विचारता. कामं जोरात सुरू आहेत. लोक कितीही ओरडू देत, पण लक्षात कोण घेतो!
युद्धामुळे इंधनांचे भाव वाढले, पण आता युद्धबंदी झाल्यानंतर ते पुन्हा मूळपदावर आले आहेत. मात्र आपल्याकडचे भाव कमी झालेच नाहीयेत. कारण एकदा वाढलेले भाव कमी होतच नाहीत, हा अनुभव आहे. पुन्हा सरकारी इंधन कंपन्यांना तोटा होतो, हे कारण दिलं जातं. हा तोटा कुठला आणि किती ते लोकांना कळत नाही, कारण कंपन्यांच्या हिशोबात तर कोट्यवधी रुपयांचा फायदाच दाखवलेला असतो.
दुसरीकडं संघाचा निगरगट्टपणा तर वाढतच चालला आहे. नोंद का नाही असं विचारलं की म्हणतात, हिंदू धर्माची तरी कुठं नोंद आहे? पैशाचा हिशोब देत नाहीत. गुरुदक्षिणेच्या कुठं नोंदी ठेवायच्या नसतात म्हणे! मग हिशोब कसले देणार आणि मोठेपणानं सांगतात की, आम्ही कसला हिशोब ठेवत नाही. काही वर्षांपूर्वी मात्र असं नव्हतं. कारण वेगळे सरकार होत. तेव्हाची गोष्टच वेगळी होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. त्यांना याबाबत विचारलंच जात नाही. विचारलं जाणार नाही. शिवाय इतर स्वयंसेवी संस्थांना परदेशांतून मदत घेण्यावर बंदी, पण यांचं मात्र आमच्या कार्याला मदत येते. त्यावर आयकर, ईडी सारे मिठाची गुळणी घेऊन बसतात.
संघवाले मानभावीपणानं आम्ही कोणच्याही पक्षाचे नाही, असं सांगतात. पण प्रत्यक्षात ते सध्याच्या सत्ताधाऱ्यांना सर्व प्रकारची मदत देत असतात. निवडणुकांत त्यांच्यासाठीच मोठी रसद आणि फौजा पाठवतात. त्यांना यश कसं मिळेल याची खबरदारी घेतात. कारण अन्य कुणी आलं, तर मग आपली धडगत नाही, अशी भीती त्यांना वाटत असावी. खरं काय ते त्यांचं त्यांनाच ठाऊक. पण ज्यांनी जाब विचारायचा तेच त्यांचं गुणगान करत असतील, तर अपेक्षा तरी कसली करायची!
.................................................................................................................................................................
लेखक आ. श्री. केतकर ज्येष्ठ पत्रकार आहेत.
aashriketkar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment