अजूनकाही
उद्धव ठाकरे शिवसेनेचे फुटीर खासदार संजय दिना पाटील यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे उठलेल्या वादळावरून आमच्या काळची पत्रकारिता आणि पत्रकार आठवले. आमचा काळ म्हणजे १९७० ते ८०च्या दशकात जे पत्रकारितेत आले आणि ज्यांनी पत्रकारिता केली तो काळ. तेव्हा फक्त मुद्रित माध्यमं आणि दूरदर्शन होतं. संपूर्ण राज्यात मिळून जास्तीत जास्त साडेसातशे आठशे पूर्णवेळ पत्रकार होते, त्यांना ‘श्रमिक पत्रकार’ म्हणत. मुंबईच्या वृत्तपत्रांच्या डाक आवृत्ती महाराष्ट्राच्या उर्वरित भागात पोहोचत असा तो काळ होता. मंत्रालयातही दैनंदिन येणारे १८-२० पत्रकार असत. काही विशेष असेल किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीचं ब्रीफिंग असेल, तर ही संख्या २२-२५ वर पोहोचत असे. मुख्यमंत्र्यांचं ब्रीफिंगही त्यांच्या बैठकीच्या खोलीत होत असे, इतकी पत्रकारांची संख्या कमी होती.
पत्रकार आणि पत्रकारितेला विश्वासार्हता होती. पत्रकारांचा मान सन्मान राखला जात असे. अगदी मुख्यमंत्र्यांकडेही पाच-सात पत्रकार एकत्र मिळून अचानक गेले तर बैठक थांबवून मुख्यमंत्री, ‘काय झालं रे बाबांनो?’ हे विचारायला बाहेर येत. त्या काळात पूर्णवेळ पत्रकारिता करणाऱ्यांची संघटना सशक्त होती. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर अशा काही ठिकाणी पूर्णवेळ पत्रकारांची संख्या लक्षणीय होती आणि तिथे श्रमिक पत्रकार संघ असे. राज्यस्तरावर महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ होता. तेव्हा राजकारणी आणि प्रशाकीय अधिकारी फारच क्वचित बेताल वागत.
अलीकडच्या काळात राजकारण आणि प्रशासनातील नेते-अधिकारी बोलणं आणि वागण्यातही खूपच बेताल आणि उर्मट झाले आहेत. आमचा एकेकाळचा सहकारी आणि आता शिवसेनेचा बडा नेता असलेला खासदार संजय राऊत तर शिव्यांना ओव्या म्हणतो मानतो. शस्त्रापेक्षा शब्दाचा घाव जास्त दुखावणारा असतो, हे संजय विसरूनच गेला आहे! किती नावं घ्यावी? ‘हुच्च’ नेत्यांची फौजच आता राजकारणात आहे.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
राजकारणात आडदांडपणा आणि ‘राडा संस्कृती’ आणली ती शिवसेनेनं आणि त्याची लागण सर्वपक्षीय झालेली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेच्या वेळी तेव्हाच्या औरंगाबादला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसैनिकांनी पत्रकारांना कसं तुडवलं आणि जीवाच्या भीतीनं काही पत्रकार कसे झाडावर चढले होते, या हकीकती जुने पत्रकार आजही उमाळे काढून सांगतात.
तेव्हा पत्रकार जसे संख्येने कमी होते, तसंच व्यवस्थापन ‘धंदेवाईक’ नव्हतं. अनेक व्यवस्थापनात स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित असणारे उच्चपदस्थ होते. त्यामुळे एक गांभीर्य पत्रकारितेला होतं. त्या काळातल्या एक-दोन आठवणी इथं सांगण्याचा मोह आवरत नाही. वसंतराव साठे हे तेव्हा काँग्रेसच्या राजकारणातलं एक बडं प्रस्थ होतं. गांधी कुटुंबीयांशीही त्यांचा निकटचा संपर्क होता. साठे यांचं व्यक्तिमत्त्व मोठे रुबाबदार, शिवाय त्यांचं मराठी आणि इंग्रजीही वाचन समृद्ध होतं. राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात वावरल्यामुळे एक मुरब्बीपणा त्यांच्या अंगात होता. इंदिरा गांधी आणि नंतर राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळातही ते मंत्री होते. ब्लॅक अँड व्हाईट आणि नंतर रंगीत टीव्ही देशभर पोहोचवण्याचं श्रेय इंदिरा गांधी यांच्यासोबत साठे यांनाही जातं. ते संपूर्ण विदर्भाचेच ‘बापूसाहेब’ होते.
साठे तेव्हा केंद्रीय खाण आणि कोळसा मंत्री होते. ते नागपूरला आले की, हमखास एक पत्रकार परिषद घेत. आमच्यासारखे काही नवखे वगळता बाकी सगळे ज्येष्ठ पत्रकार त्यांच्या वैयक्तिक संपर्कात होते नंतर आम्हीही त्यांच्या संपर्कात आलो आणि आम्हा सर्वांना ते अगदी पहिल्या नावाने संबोधत असत इतका संपर्क निकटचा होता, पण साठे यांना एक मोठी खोड होती. ते कधीच कुठे वेळेवर जात नसत. पत्रकार परिषदेलाही ते तास-दीड तास उशिरा येत.
एक मात्र खरं, वसंत साठे नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या पंचशील चौकातल्या चांद्रमौळी कार्यालयात येत आणि एकदा आले की, दीड-दोन तास पत्रकारांमध्ये रमून जात. अनेकदा साठे आमच्यासोबत पत्रकार संघासमोरच्या कॉफी हाऊसमध्ये बैठक ठोकत. त्यांच्याशी मैत्रभाव असा होता की, आमच्या पिढीचेही पत्रकार बिनदिक्कत त्यांच्यासमोर कॉफी हाऊस कल्चरला साजेसं धूम्रपान करत. साठे यांचा उशिरा येणं आम्हाला फार खटकायचं. आमच्या सोबतचे काही जेष्ठ पत्रकार निवृत्त झाल्यावर आम्ही तरुण पत्रकारांनी साठे यांना धडा शिकवायचं ठरवलं.
अशीच एकदा साठे यांची पत्रकार परिषद ठरली. ठरल्याप्रमाणे आम्ही पत्रकारभवनात सकाळी ११ वाजता पोहोचलो. साडेअकरापर्यंत वाट पाहून आम्ही पत्रकारभवनाला कुलूप लावलं आणि समोरच्या कॉफी हाऊसमध्ये जाऊन गप्पा मारत बसलो. इकडे पत्रकारभवनाला कुलूप बघून तिथे आलेले खाण मंत्रालयाचे अधिकारी चमकले आणि आम्हाला बघून त्यांनी पत्रकार परिषदेला चालण्याची खूप आर्जवं केली, पण पत्रकार काही बधले नाहीत. दरम्यान साठे हेही पत्रकार भवनाच्या आवारात पोहोचले. पत्रकार भवनला कुलूप बघून त्यांनाही आश्चर्य वाटलं. अधिकाऱ्यांनी त्यांना जे काय सांगायचं ते सांगितलं. साठे यांनी कॉफी हाऊसकडे बघितलं. त्यांना काचेतून तिथं बसलेले पत्रकार दिसले. त्यांनी तिथूनच पत्रकारांना हात हलवून अभिवादन केलं आणि सर्व शिष्टाचार बाजूला सोडून साठे कॉफी हाऊसमध्ये येऊन आम्हा पत्रकारांच्या घोळक्यात स्थानापन्न झाले.
खरं तर, केंद्रीय मंत्र्याचा एक प्रकारे उपमर्द पत्रकारांनी केला होता, पण साठे यांनी ते मनावर घेतलं नाही तर खिलाडूपणे घेतलं. आमच्यासोबत वेळही घालवला. नंतर मात्र त्यांनी पत्रकार परिषदेची वेळ कधीच चुकवली नाही. गोपीनाथ मुंडे यांच्यावर ‘लेट लतीफ’ असा शिक्काच बातमीतून मी मारला होता. अमरावतीचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप देशपांडे याच्या एका बातमीच्या निमित्तानं रा. सू. गवई यांचा पत्रकारांनी जाहीर निषेध केला होता. मात्र साठे, गोपीनाथ मुंडे, रा. सू. गवई यांच्यासारखा उमदेपणा असणारे राजकारणी तेव्हा बहुसंख्य होते. पत्रकारांना मारण्याची भाषा त्यांनी कधीच केली नाही; ते कंत्राट शिवसेनेकडे होतं!
एक खास हकीकत सांगायला हवी. नागपूरला सध्या धरमपेठ मध्ये पत्रकार वसाहत ज्या जागेवर उभी आहे, ती जागा मंत्री वसंतदादा पाटील यांच्याकडून मिळाली. ती मिळवून देण्यात नागपूरचे तत्कालीन पालकमंत्री मधुकरराव किंमतकर यांचा मोठा वाटा होता. (हे घडवून आणणाऱ्या पत्रकारांपैकी प्रकाश देशपांडे, मनोहर अंधारे, अनिल शर्मा आता हयात नाहीत. बाकी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची यादी बरीच मोठी असल्याने ती मी देत नाही.) ती जागा मध्यवर्ती होती, पण त्या जागेवर एक खूप मोठं अतिक्रमण होतं. पत्रकार वसाहत उभारण्याआधी ते अतिक्रमण दूर करणं अतिशय आवश्यक होतं. त्यासाठी सर्व पत्रकार जीव तोडून प्रयत्न करत होते.
या प्रयत्नांचा एक भाग म्हणून या अतिक्रमणाला आशीर्वाद कुणाचा आहे याची माहिती काढली, तर समजलं की, नागपूरचे तत्कालीन एक बडं प्रस्थ असलेले आमदार गेव्ह आवारी यांचा त्या झोपडपट्टीवासीयांना आशीर्वाद आहे. मग त्या संदर्भात पत्रकार संघाच्या सभागृहात खूप चर्चा झाली आणि गेव्ह आवारी यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पत्रकारांनी घेतला. गेव्ह आवारी तेव्हा नागपूर काँग्रेसचे अध्यक्षही होते, शिवाय एक टर्म त्यांनी खासदारपदही भूषवलेलं होतं. त्यांच्या वडिलांचं स्वातंत्र लढ्यात मोठे योगदान होतं अशी पार्श्वभूमी गेव्ह आवारींची होती. त्यामुळे बहिष्काराचा हा निर्णय कितपत अंमलात येऊ शकेल याविषयी शंका होती, पण ज्येष्ठ पत्रकारांनी तेव्हा वृत्तपत्रांच्या व्यवस्थापनाला भेटून सर्व माहिती दिली आणि बहिष्काराच्या निर्णयात सहभागी होण्याची विनंती केली.
उल्लेखनीय बाब म्हणजे सगळ्या वृत्तपत्रांच्या व्यवस्थापनानं श्रमिक पत्रकारांच्या या निर्णयाला होकार दर्शवला आणि गेव्ह आवारी यांच्या बातम्यांना प्रसिद्धी मिळणं बंद झालं. स्वाभाविकच त्यामुळे गेव्ह आवारी आधी चिडले आणि नंतर अगतिक झाले. व्यवस्थापनाला भेटून त्यांनी पत्रकारांचा निर्णय मोडून काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आलं नाही. अखेर पत्रकारांशी चर्चा करून त्या अतिक्रमणवासीयांना असलेलं संरक्षण यापुढे देणार नाही असं त्यांनी मान्य केलं आणि हा बहिष्कार उठला. सांगायचं तात्पर्य हे की, पत्रकार संघटित असले की, काय घडू शकतं!
तपशील नेमका आठवत नाही, पण शिवसैनिकांकडून औरंगाबादला पत्रकारांना मारहाण झाल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. मुंबईच्या पत्रकारांनी शिवसेनेची दहशत न जुमानता शिवसेना भवनासमोर निदर्शने केली होती आणि उल्लेखनीय म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनीही त्या निदर्शनांना हरकत घेतली नव्हती. याच मोहिमेचा एक भाग म्हणून शिवसेनेचे तत्कालीन नेते (जे पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले) मनोहर जोशी यांच्या नागपुरात झालेल्या एका पत्रकार परिषदेवर आम्ही सर्व पत्रकारांनी बहिष्कार टाकला होता. मनोहर जोशी यांचे अनेक पत्रकारांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध तरी हा बहिष्कार टाकला गेला. बहिष्काराच्या काही तासानंतर आम्ही दोन-तीन पत्रकार मनोहर जोशींची भेट घ्यायला गेलो आणि सोबत चहापान केलं होतं. मात्र त्याची बातमी केली नव्हती.
अशा अनेक घटना सांगता येतील. तोपर्यंत पत्रकारिता म्हणजे मुद्रित माध्यम एवढाच परिघ होता. साधारण १९८८ नंतर हे चित्र बदललं. नंतर व्हिडिओ आला, प्रकाश वृत्तवाहिन्या आल्या आणि वृत्तपत्र व्यवसाय ‘माध्यम’ झाला. जागतिकीकरण आणि खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यावर पुढे तर सोशल मीडिया, डिजिटल मीडिया त्याही पुढे जाऊन युट्युबसारखी वैयक्तिक चॅनल्स आली, माध्यमांचा अफाट विस्तार झाला. मुंबई-पुण्यापुरत्या मर्यादित असलेल्या वृत्तपत्रांच्या साखळी आवृत्ती राज्यात सुरू झाल्या आणि महाराष्ट्रात पत्रकारांचं अमाप ‘पीक’ आलं; इतकं पीक आलं की, महाराष्ट्रातील पत्रकारांची संख्या किमान २५ ते ३० हजार झाली असावी.
इतकी संख्या वाढल्यानंतर पत्रकारितेची गुणवत्ताही ढासळली आणि विश्वासार्हताही कमी झाली, शिवाय गळेकापू स्पर्धा आल्यानं पत्रकारितेला एक वेगळं ‘परिमाण’ लाभलं. समाजाच्या सर्वच स्तरांचं जे सुमारीकारण झालं त्याचं प्रतिबिंब पत्रकारितेत उमटलं. पत्रकार गटा-तटांत, विविध राजकीय रंगात विभागले गेले. श्रमिक पत्रकारांची एकमेव संघटना असलेल्या महाराष्ट्रात पत्रकारांच्या आज कमीत कमी २५ तरी संघटना असतील आणि त्या संघटनांमध्ये कोणताही संवाद नाही, सामंजस्य नाही, शिवाय पत्रकारितेचं स्वरूपही आता ‘धंदेवाईक झालं आहे.
स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी असलेली व्यवस्थापनातील पिढी कधीच काळाच्या पडद्याआड गेली; त्यांची तिसरी पिढी माध्यमांचं नेतृत्व करत आहे. हे नेतृत्व केवळ व्यवस्थापकीय पातळीवर राहिलेलं नसून संपादकीय पातळीवरही आलेलं आहे. पूर्वी ‘संपादक’ ही एक विश्वसनीय ‘संस्था’ होती, परिणामी संपादकाचा शब्द प्रमाण होता. आता ‘संचालक संपादक’ संपादकीयही निर्णय घेतात आणि संपादक तसेच संपादकांचे सहकारी त्या निर्णयांची अंमलबजावणी करतात अशी परिस्थिती आहे.
प्रकाश वृत्तवाहिन्यांनी तर भाषा आणि वृत्तमूल्य या दोन्ही पातळ्यांवर जी काही पातळी गाठलेली आहे, ती अतिशय चिंताजनक आहे. वृत्तवाहिन्यांच्या संपादकांना अचूक भाषा व वृत्तमूल्यापेक्षा टीआरपीची जास्त चिंता असते, तर मुद्रित माध्यमातील संपादकांना सहकाऱ्यापेक्षा स्वतःच्या भवितव्याची जास्त काळजी असते.
बहुसंख्य संपादकांना डोनाल्ड ट्रम्पच्या चहाच्या कपात साखर कमी पडली की, जास्त हे ठाऊक असतं, पण या राज्यातल्या असहाय्य सामान्य माणसांच्या प्रश्नाची माहिती नसते. परिणामी आजची पत्रकारिता निव्वळ प्रतिक्रियावादी झाली असून पत्रकार प्रस्थापितांना खडसावून प्रश्न विचारण्याचं विसरले असल्याचं चित्र आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
आता संपादक संस्था राहिली नसून ‘पत्रकारांचा पालक’ हे बिरुदही बहुसंख्य संपादकांनी गमावलेलं आहे. प्रयोगशाळेतल्या शेपटी तोडलेल्या उंदरासारखी अवस्था बहुसंख्य संपादकाची झालेली आहे. करोनाच्या काळात संपादकीय विभागातील कोणते सहकारी कमी करावे, याच्या याद्याच बहुसंख्य संपादकांनी व्यवस्थापनाकडे दिल्या होत्या. पत्रकारांच्या त्या कपातीबद्दल कुठल्याही संपादकांनी आजवर कधी आवाज काढलेला नाही.
ही एक प्रकारची अधोगती आहे. यामुळे पत्रकारितेचा सन्मान आणि विश्वसनीयता धोक्यात आली शिवाय ते पत्रकारांच्या संघटितपणाला अतिशय बाधक ठरलं आहे. त्यामुळे कितीही म्हटलं तरी, कोणत्याही आणि कितीही खालच्या पातळीवरच्या नेत्यावर पत्रकार बहिष्कार टाकू शकत नाहीत, अशी आजची परिस्थिती आहे, कारण पत्रकार, संपादक आणि व्यवस्थापन यांचे ‘अजेंडा’ आणि ‘पॅकेजेस’ वेगवेगळे आणि धंदेवाईक आहेत.
पत्रकारितेची आजची अवस्था अनेकांना अस्वस्थ करणारी असली, तरी वास्तव वेगळं आहे. जेव्हा पत्रकारांचा पालक म्हणजे संपादक आणि त्याचे सहकारी पत्रकार, धंदेवाईक व्यवस्थापनाच्या ताटाखालचं मांजर होतात, तेव्हा पत्रकारिता निर्भीड आणि समाजातील असहाय्य अबोलांचा आवाज असावा अशी अपेक्षा कशी काय बाळगता येईल? कणा मोडून पडलेल्या विद्यमान पत्रकारितेकडून अपेक्षा बाळगणंच व्यर्थ आहे!
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment