माणूस जे तत्त्वज्ञान जगत असतो, त्यात त्याचे माणूसपण लपलेले असते, असे सॉक्रेटिससारख्या लोकांना वाटत असते आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांना काहीही करून जिवंत राहण्यात, तगून राहण्यात आणि काहीही करून सुखी राहण्यात आपले माणूसपण लपलेले आहे असे वाटत असते. तगून राहणे हाच शहाणपणा!
सॉक्रेटिस सत्तर वर्षांचा असताना त्याच्या विचारांसाठी त्याला देहदंड झाला. म्हणजे ईसपू ३९९ साली. आपल्या विचारांसाठी मरण्याची वेळ आली, तर आपण आपले विचार निश्चितपणे बदलू. सॉक्रेटिसने आपले विचार बदलले नाहीत. माणूसपण हरवणार असेल तर जिवंत कशाला राहायचे?
सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटोने सॉक्रेटिसचे विचार लिहून ठेवले आहेत. त्याने त्याच्या मृत्यूचीही गोष्ट लिहून ठेवली आहे. सॉक्रेटिस मुख्यतः चर्चा आणि संवादांमधून आपले तत्त्वज्ञान मांडत असे. सॉक्रेटिस विविध विचारवंतांशी चर्चा छेडत असे. त्यांमधून त्याचे तत्त्वज्ञान वाहत असे. त्यामुळे प्लेटोनेसुद्धा त्याचे विचार मांडण्यासाठी संवाद हेच माध्यम निवडले.
प्लेटो साधारणपणे तीस वर्षांचा असताना सॉक्रेटिसला देहदंड झाला. त्यानंतर लगेचच प्लेटोने आपले डायलॉग म्हणजे संवाद लिहायला सुरुवात केली. प्लेटोचे संवादलेखन सॉक्रेटिसच्या मृत्यूनंतर सुरू झाले आणि त्याच्या स्वतःच्या मृत्यूपर्यंत सुरू राहिले.
प्लेटोने तीसएक संवाद लिहिले आहेत. सॉक्रेटिसच्या चर्चा हा प्लेटोच्या प्रेमाचा विषय होता. त्या चर्चांच्या प्रेमामधून आणि आठवणींमधून प्लेटोच्या लेखनासाठी संवादांचा नाट्यमय फॉर्म तयार झाला. आपल्या संवादांमधून प्लेटोने तत्त्वज्ञानामधील विविध प्रश्नांची विस्तीर्ण चर्चा केली आहे.
अगदी सुरुवातीला त्याने तीन संवाद लिहिले- ‘यूथिफ्रो’, ‘अपॉलॉजी’ आणि ‘क्रिटो’. हे संवाद सॉक्रेटिसवरचा खटला आणि त्याला झालेला मृत्यूदंड या काळातले आणि संदर्भातले आहेत.
पहिल्या संवादामध्ये सॉक्रेटिस आणि युथिफ्रो यांच्यामध्ये ‘धार्मिकता म्हणजे काय?’ याबद्दल संवाद होतो. युथिफ्रो स्वतःला धर्माधिकारी समजत असतो. त्यावरून सॉक्रेटिस त्याच्याशी ‘धार्मिकता म्हणजे काय?’, या विषयावरून चर्चा छेडतो.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
प्लेटोने हा संवाद लिहिला, कारण त्या दरम्यान सॉक्रेटिसवर अधार्मिकतेचा आरोप केला गेला होता. अथेन्समधील तरुणांना धार्मिक भ्रष्टाचार शिकवल्याचा आरोप. ‘करप्टिंग द यूथ ऑफ अथेन्स’चा गुन्हा!’ ‘इम्पाईटी’चा गुन्हा! अधार्मिकतेचा गुन्हा! या संवादामध्ये सॉक्रेटिस युथिफ्रोला त्याच्या धार्मिकतेच्या संकल्पना किती भोंगळ आहेत हे दाखवून देतो. थोडक्यात, आपल्या गुरूवर किती भोंगळ संकल्पनांचा आधार घेऊन आरोप केले गेले होते, हे या संवादामधून प्लेटो सांगतो.
आपल्या ‘अपॉलॉजी’ या संवादात सॉक्रेटिस खटल्यामध्ये आपली बाजू मांडतो आहे, असे प्लेटोने दाखवले आहे. त्या काळी देहदंडाची शिक्षा असलेले खटले ५०० ज्युरींसमोर चालवले जायचे! हे ज्युरी नागरिकांमधून निवडले जायचे आणि या खटल्यात इतर नागरिकसुद्धा अर्थातच उपस्थित असायचे.
‘अपॉलॉजी’ या शब्दाचा इंग्रजी अर्थ ‘माफी’ असा असला तरी ग्रीक भाषेत ‘अपॉलॉजी’ म्हणजे ‘कायदेशीर बचाव’! सॉक्रेटिसवरचे आरोप आणि त्याचा बचाव हा एका वेगळ्या लेखाचा विषय आहे. सॉक्रेटिसवरचा सर्वांत महत्त्वाचा आरोप होता की, त्याने अथेन्समधील युवकांना धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांबद्दल प्रश्न विचारायला शिकवले. या अर्थाने त्याने धार्मिकदृष्ट्या युवकांना भ्रष्ट केले. हा आरोप मुळामधून बघण्यासारखा आहे-
“Socrates is guilty of wrongdoing in that he busies himself studying things in the sky and below the earth; he makes the worse into the stronger argument, and he teaches these same things to others.” (ग्रीक ते इंग्रजी भाषांतर जी. एम. ए. ग्रूब - या लेखातील सर्व भाषांतरे ग्रूब यांची.)
(“सॉक्रेटिसचा गुन्हा असा की, तो आकाशातल्या आणि पृथ्वीच्या पोटातल्या अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करतो, त्यांच्याबद्दल विचार करतो. यापेक्षा अजून वाईट गोष्ट म्हणजे तो या अभ्यासातून अभेद्य युक्तिवाद तयार करतो आणि ते तरुणांना शिकवतो.”)
थोडक्यात, आरोप करणाऱ्या लोकांना धर्माबद्दल आणि परंपरेबद्दल प्रश्न विचारलेले, त्यांच्याबद्दल विचार केलेला आवडत नव्हते.
आपल्या बचावामध्ये सॉक्रेटिस म्हणतो, प्रश्न विचारले जाण्यातच अथेन्सचे कल्याण आहे. लोकांना प्रश्न विचारायला शिकवणे, हे देवाने आपल्यावर सोपवलेले कार्य आहे. माझे अस्तित्व एखाद्या गोमाशीसारखे आहे. गोमाशा जातिवंत घोड्यांना चावतात आणि त्यामुळे मंदावलेले घोडे खडबडून जागे होतात. ते आळसाच्या आणि मंदगतीच्या अधिन होत नाहीत. त्याचप्रमाणे मी जे प्रश्न विचारतो, त्यामुळे अथेन्स धार्मिक, वैचारिक आणि तत्त्वज्ञानात्मक आळसाच्या आहारी जात नाही. खोट्या आत्मतृप्तीच्या आहारी जात नाही. या अर्थाने मी अथेन्सचे कल्याणच करत आहे. धार्मिक आणि इतर विचारांना व परंपरांना प्रश्न विचारले गेलेच पाहिजेत.
सॉक्रेटिसचे एकूण म्हणणे असे की, मी नागरिकांना त्यांच्या श्रद्धांबद्दल आणि त्यांच्या विचारांबद्दल प्रश्न विचारतो. त्यामुळे त्यांना स्वतःच्या श्रद्धांचा आणि विचारांचा बचाव करावा लागतो. त्यांच्या मनात विचार सुरू होतात. या अर्थाने मी अथेन्सच्या संस्कृतीचे कल्याणच करत असतो. अथेन्स नावाच्या जातिवंत घोड्याला मी वैचारिक आळसामध्ये लोळू देत नाही.
येथे सॉक्रेटिस एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडतो. तो म्हणतो की, माणसाने आपले विचार आणि वागणे चांगले आहे की वाईट आहे, याचाच फक्त विचार करावा. आपले विचार आणि वागणे आपल्या जिवाचे रक्षण करते आहे की, आपल्याला मृत्यूच्या दाढेमध्ये ढकलते आहे, याचा विचार करू नये. नैतिकदृष्ट्या माणसाने ‘डबल स्टॅन्डर्ड’ने राहू नये. त्याने दांभिकपणा करू नये. नैतिकदृष्टया माणसाने एकसंध असावे. माणसाच्या आयुष्यात नैतिक प्रामाणिकपणा नसेल, तर मग त्याच्या आयुष्यात काय उरले?
हे मुद्दे मांडून झाल्यावर सॉक्रेटिस ‘सुप्रीमसी ऑफ सोल’चा मुद्दा मांडतो. ‘आत्मा हाच सर्वोच्च आहे’ हा विचार. (इथे आपल्याकडील ‘आत्मा’ आणि पाश्चात्य ‘सोल’ किंवा ‘सायकी’ यांच्यात गल्लत होऊ शकते. आपल्याकडील आत्मा ब्रह्मतत्त्वाचा म्हणजे हे विश्व निर्माण करणाऱ्या सर्वोच्च चैतन्याचा अंश आहे. ग्रीकांच्या दृष्टीने ‘सायकी’ किंवा ‘सोल’ म्हणजे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा इसेन्स! माणसाच्या भावना, माणसाचे विचार आणि माणसाचा स्वभाव यांचे एकत्रित सार! आपण सोपेपणासाठी या लेखापुरते याला माणसाचे ‘व्यक्तिमत्त्व’ म्हणू.)
सॉक्रेटिस म्हणतो की, माझ्यावर हा खटला दाखल करून माझे काही वाईट करण्याची इच्छा माझ्यावर आरोप करणाऱ्या मेलिटस आणि आनिटस यांची आहे. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, कुणी दुष्ट माणूस किंवा कुणी कमी प्रतीचा माणूस त्याच्याहून चांगल्या माणसाला इजा करू शकत नाही. या विश्वात अशी इजा करू दिली जात नाही.
“Neither Meletus nor Anytus can harm me in any way; he could not harm me, for I do not think it is permitted that a better man be harmed by a worse; certainly he might kill me, or perhaps banish or disfranchise me, which he and maybe others think to be great harm, but I do not think so.”
(“मेलिटस किंवा अॅनिटस मला कुठलीही इजा करू शकत नाहीत. मला नाही वाटत की, चांगल्या माणसाला त्याच्यापेक्षा कमी प्रतीच्या माणसाने इजा पोहचवली आहे, असे या जगात होऊ दिले जात असेल. हे लोक मला ठार मारू शकतात, मला हद्दपार करू शकतात, माझा मतदानाचा हक्क हिरावून घेऊ शकतात. ही फार मोठी हानी आहे असे काही लोकांचे मत असूही शकते, परंतु मला मात्र ही फार मोठी हानी आहे, असे वाटत नाही.”)
इथे सॉक्रेटिसला म्हणायचे आहे की, हत्या करणे, मालमत्ता जप्त करणे असे प्रकार करून माणसाच्या चांगुलपणाची काहीच हानी होत नाही. माणसाचे असे नुकसान करून त्याचे गुण संपून गेले असे होत नाही. तो कमी प्रतीचा माणूस झाला असे होत नाही. नैतिक अखंडता संपणे, चांगुलपणा संपणे, सदवर्तन संपून जाणे, सदाचार मिटणे आणि सद्गुणसंपन्नतेचा नाश होणे ही खरी हानी! माणसातल्या या गोष्टींचा नाश कुणालाही करता येत नाही. या गोष्टींचा नाश होऊ दिला जात नाही.
(नैतिक अखंडता, चांगुलपणा, सद्वर्तन, सदाचार आणि सद्गुणसंपन्नता - या सर्व अर्थाने सॉक्रेटिस आणि प्लेटो ‘व्हर्च्यु’ (Virtue) - हा शब्द वापरतात. व्हर्च्यु म्हणजे सद्गुण, परंतु सॉक्रेटिसच्या विश्वात सद्गुण आणि चांगुलपणा या एकाच नाण्याच्या बाजू आहेत. या लेखात सोपेपणासाठी ‘चांगुलपणा’ असा शब्द वापरला आहे.)
व्यक्तिमत्त्वाचा नाश हीच एकमेव हानी, असे सॉक्रेटिस इथे म्हणत आहे. माणसाच्या माणूसपणाची हानी हेच माणसाचे वाईट होणे. बाकी सगळ्या भौतिक गोष्टी वरवरच्या!
माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा नाश प्रश्न न विचारल्यामुळे होतो, असा विचार सॉक्रेटिस मांडतो. धर्मविचार, परंपरा, राजकीय विचार, सामाजिक विचार आणि एकूणच जीवनविषयक सगळ्या श्रद्धा व विचार या सगळ्यांबाबत प्रश्न विचारले गेले पाहिजेत. सॉक्रेटिसचे म्हणणे असे की, प्रश्नांमधून अथेन्सची सेवा होते, तशीच आपल्या व्यक्तिमत्त्वाचीसुद्धा सेवा होते. मी प्रश्न विचारतच राहणार!
“Men of Athens, I am grateful and I am your friend, but I will obey the god rather than you, and as long as I draw breath and am able, I shall not cease to practice philosophy, to exhort you and in my usual way to point out to any one of you whom I happen to meet : ‘Good Sir, you are an Athenian, a citizen of the greatest city with the greatest reputation for both wisdom and power; are you not ashamed of your eagerness to possess as much wealth, reputation and honors as possible, while you do not care for nor give thought to wisdom or truth, or the best possible state of your soul?”
(“हे अथेन्सवासियांनो, मी आपला कृतज्ञ आहे आणि मी तुमचा मित्रही आहे, परंतु आज्ञा मात्र मी देवाचीच मानणार, तुमची नाही. जोपर्यंत माझा श्वास चालू आहे, तोपर्यंत मी तत्त्वज्ञात्मक विचार करत राहणार आणि तत्त्वज्ञान शिकवत राहणार. मी तुम्हाला विचारत राहणार की, तुम्ही या अथेन्सचे रहिवासी आहात, येथे उच्च ज्ञान आणि महान सत्ता एकत्र राहतात अशी या राज्याची कीर्ती आहे. असे असताना संपत्ती, कीर्ती आणि सन्मान प्राप्त करण्यासाठी तुम्ही जेवढे उतावीळ आहात, तेवढे उतावीळ तुम्ही ज्ञान आणि शहाणपण प्राप्त करून घेण्याविषयी नाही आहात, या गोष्टीची तुम्हाला लाज वाटत नाहिये का? आपल्याला सत्याशी काहीही घेणे-देणे नाही, याची तुम्हाला लाज वाटत नाही का? आपली संपत्ती राखण्यासाठी तुम्ही जेवढे सतर्क आहात, तेवढे सतर्क तुम्ही आपल्या व्यक्तिमत्त्वाची शुद्धता राखण्यासाठी आहात का?”)
आरोपीने ज्युरींची एवढी अक्कल काढल्यावर कुठले ज्युरी त्याला निर्दोष सोडतील? सॉक्रेटिससारख्या अतितीव्र बुद्धिमता असलेल्या माणसाला हे कळले नसेल का? पण नाही! प्रश्न विचारणे आणि प्रश्न विचारायला शिकवणे, विचार करणे आणि विचार करायला शिकवणे, हे कार्य देवानेच मला दिले आहे, असे सॉक्रेटिसचे म्हणणे होते. असे असताना अगदी देहदंड समोर ठाम उभा असला, तरी सॉक्रेटिसने ज्युरींना का वाजवायचे नाही!
मृत्यूच्या दाढेखाली उभे राहून तत्त्वज्ञानाची ही सेवा! आपण ‘अपॉलॉजी’ वाचायला लागलो की, आपल्याला सॉक्रेटिसबद्दल एक गोष्ट अगदी आवर्जून जाणवत राहते. इतकी महान प्रज्ञा, इतके महान कार्य, इतके महान नाट्य, परंतु अभिनिवेश कुठेही नाही! प्रेम, नम्रता आणि ऋजुता सॉक्रेटिसच्या संपूर्ण भाषणात भरून राहिलेली दिसते! त्यासाठी तरी ‘अपॉलॉजी’ हा संवाद मुळातूनच वाचायला हवा.
एवढे सगळे ठणकावून सांगितल्यावर ज्युरी अर्थातच सॉक्रेटिसला दोषी ठरवतात. एकदा गुन्हेगार दोषी आहे असे ठरल्यावर अर्थातच शिक्षा कुठली दिली जावी, अशी चर्चा करणे आले. येथे सॉक्रेटिस म्हणतो की, मला हद्दपारीची शिक्षा देण्यात यावी, फार तर माझ्याकडून दंडही वसूल करण्यात यावा. पण मला सोडले तर मी गप्प राहीन असे आश्वासन मात्र तो देत नाही. सॉक्रेटिस पुढे स्वतःच हा विषय काढतो आणि वाढवतो. तो म्हणतो की, येथील काही लोक यावर म्हणतील- आम्ही तुला सोडले तर तू गप्प राहशील का? गप्प राहणे मला शक्य नाही!
“…I say that it is the greatest good for a man to discuss virtue every day and those other things about which you hear me conversing and testing myself and others, for the unexamined life is not worth living for men…”
(‘‘माझे असे मत आहे की, चांगुलपणा म्हणजे काय, सद्गुण म्हणजे काय यावर सतत चर्चा होत राहणे मानवाच्या कल्याणासाठी अतिशय आवश्यक आहे. तुम्ही मला ज्या चर्चा करताना आजवर ऐकत आलेले आहात, त्या चर्चाही अगदी रोज होत राहणे आवश्यक आहे. दररोज, अगदी दररोज स्वतःचे आणि इतरांचे विचार आणि वर्तन तपासून घेणे अतिशय आवश्यक आहे. प्रश्न न विचारता जगलेले जीवन जगण्याच्या लायकीचेच नसते!’’)
एवढे सगळे सुनावल्यावर ज्युरी अर्थातच सॉक्रेटिसला देहदंडाची शिक्षा देतात, पण ही शिक्षा केवळ ३० मतांच्या फरकाने दिली जाते. सॉक्रेटिसला याचा आनंद होतो. ज्युरींमधील काही लोकांना तरी त्याचे म्हणणे पटले! विचार करणे हा गुन्हा आहे, असे काही लोक तरी मानत नाहीत. काही लोकांना तरी प्रश्न विचारणे धोकादायक वाटत नाहिये. पुढे सॉक्रेटिस म्हणतो - “I was convicted because I lacked not words but boldness and shamelessness and the willingness to say to you what you would most gladly have heard from me.”
(“मला दोषी ठरवले गेले आहे याचे कारण मला बाजू मांडायला शब्द कमी पडले हे नाहिये, तर तुम्हाला माझ्याकडून जे ऐकायचे आहे ते ऐकवण्याचा निर्लज्जपणा माझ्यामध्ये कमी पडला हे आहे.”)
सॉक्रेटिसला सत्याशिवाय काहीच प्यारे नव्हते! तो ज्युरींना ऐकवतो - “It is not difficult to avoid death, gentlemen; it is much more difficult to avoid wickedness…”
(“हे सद्गृहस्थहो! मृत्यू टाळणे फार अवघड नसते. दुष्टतेपासून स्वतःचा बचाव करणे, हे मृत्यू टाळण्यापेक्षा फार फार अवघड असते.”)
मृत्यू टाळणे ही नैसर्गिक प्रेरणा आहे. ते सहज जमून जाते. दुष्टतेच्या आहारी माणूस स्वार्थामुळे जातो आणि स्वार्थ हीसुद्धा नैसर्गिक प्रेरणा आहे. त्यामुळे दुष्टता टाळायची असेल, तर नैसर्गिक प्रेरणांच्या विरुद्ध जायला लागते. म्हणून दुष्टता टाळणे अवघड आहे, असा सॉक्रेटिसचा विचार आहे.
या पुढे सॉक्रेटिस एक अनपेक्षित प्रश्नाकडे निर्देश करतो. तो म्हणतो, “मला शिक्षा व्हावी म्हणून तुम्ही मला मारून टाकत आहात. पण मृत्यू माणसाचे खरंच वाईट करतो का? मृत्यू म्हणजे कदाचित एक स्वप्नांचा त्रास नसलेली झोप असेल किंवा मग आत्म्याला दुसरीकडे कुठेतरी नेले जात असेल. मृत्यूनंतर होमर, हेसियाड आणि ऑर्फियस यांच्यासारख्या महान लोकांना भेटता येत असेल. माझ्यासारखा अन्याय्य मृत्यूदंड झालेल्या लोकांनाही भेटता येत असेल. मला असे लोक भेटले, तर त्यांच्या आणि माझ्या अनुभवावर मी चर्चा करेन. त्यांच्या अनुभवाशी मी माझा अनुभव ताडून पाहीन. आणि, होमरसारख्या महान लोकांना भेटता येणार असेल तर मी हजारवेळा मरायला तयार आहे!”
मृत्यूनंतर माणसाचे चांगलेही होऊ शकत असेल, ही शक्यता वर्तवून सॉक्रेटिस ज्युरींना ऐकवतो-
“You too must be of good hope as regards death, gentlemen of the jury, and keep this one truth in mind, that a good man cannot be harmed either in life or in death, and that his affairs are not neglected by the gods.”
(“तुम्ही लोकांनीही मृत्यूविषयी हा आशादायक दृष्टीकोन बाळगला पाहिजे. तुम्ही एक सत्य आपल्या हृदयात जपून ठेवले पाहिजे. ते असे की, चांगल्या माणसाचे काहीही वाईट होऊ शकत नाही. त्याच्याकडे देवसुद्धा कानाडोळा करू शकत नाहीत.”)
थोडक्यात, सॉक्रेटिस सहा गोष्टी अधोरेखित करतो - धर्म असो, परंपरा असो किंवा कोणीही माणूस असो, मी प्रश्न विचारत राहणार. प्रश्न विचारून मी स्वतःमधल्या आणि जगामधल्या चांगुलपणाचे आणि सद्गगुणांचे रक्षण करत राहणार. मी तत्त्वज्ञानाच्या सेवेला माझ्या जिवापेक्षा जास्त महत्त्व देतो. सत्य आणि मृत्यू यांच्यात द्वंद्व झाले, तर मी सत्याची बाजू घेणार आणि जीव वाचवण्यासाठी तुमचे लांगूलचालन करणार नाही. मी मृत्यूला भीत नाही. मी चांगुलपणाची तत्त्वज्ञानात्मक सेवा केली आहे आणि त्यामुळे जिवंतपणी किंवा मृत्यूनंतरही माझे कुणी वाईट करू शकत नाही, असा माझा विश्वास आहे.
हे मुद्दे मांडून झाल्यावर सॉक्रेटिस सगळ्यांचा निरोप घेतो. ‘अपॉलॉजी’ या संवादातले शेवटचे वाक्य आहे – “I go to die, you go to live. Which of us goes to the better lot is known to no one, except the god.”
(“मी आता मृत्यूकडे चाललो आहे आणि तुम्ही जीवनाकडे! आपल्यातले जास्त चांगल्या जागी कोण चालले आहे, हे त्या देवालाच माहीत!”)
खरं तर या स्वार्थी जगातला हा तत्त्वज्ञानाचाच बचाव आहे! म्हणून हा संवाद महत्त्वाचा मानला जातो!
*****
‘अपॉलॉजी’ संपल्यावर प्लेटोने ‘क्रिटो’ हा संवाद लिहिला. हा अतिशय छोटा संवाद आहे. या संवादाचा विषय आहे- ‘सोशल कॉन्ट्रॅक्ट’! (सामाजिक कृतज्ञता).
या संवादाचे स्थळ आहे सॉक्रेटिसची तुरुंगातली खोली. वेळ आहे पहाटेची! सॉक्रेटिस गाढ झोपला आहे. देहदंडाच्या शिक्षेचा सॉक्रेटिसवर कुठलाच ताण आलेला नव्हता.त्याचा शिष्य क्रिटो तो जागा होण्याची वाट पाहत आहे. सॉक्रेटिसला जाग येताच क्रिटो त्याला सांगतो की, ‘उद्या तुला देहदंड देण्यात येईल.’ सॉक्रेटिस त्यावर म्हणतो की, ‘ठीक आहे, जशी देवांची इच्छा असेल तसे होईल.’ यावर क्रिटो म्हणतो की, ‘हे बघ, आम्ही तुरुंग अधिकाऱ्यांशी संधान बांधले आहे. त्यांना पैसे देऊन तुला येथून पळवून नेण्याची सगळी व्यवस्था झालेली आहे. तू आता नाही म्हणू नकोस.’ सॉक्रेटिसचा पळून जायला तात्त्विक विरोध असणार आहे, हे माहीत असल्यानं क्रिटो पहिल्यांदा अनेक भावनिक आवाहनं करतो.
क्रिटो म्हणतो की, तुला वाचवले नाही तर लोक आमच्याविषयी काय बोलतील? ते म्हणतील की, सॉक्रेटिस या लोकांचा एवढा मोठा गुरू व मित्र आणि हे लोक दोन पैसे खर्च करून त्याला वाचवू शकले नाहीत. आम्ही तुला पळवून नेण्याची सर्व तयारी केलेली असतानाही तू देहदंड भोगण्यासाठी स्वतः होऊन तुरुंगात थांबला, यावर कुणाचा विश्वास बसणार आहे? आता ऐनवेळी तू आला नाहीस, तर आमच्याबद्दल समाजात काय मत होणार आहे?
या आवाहनानंतर क्रिटो म्हणतो की - आम्ही तुला पळवून नेले, तर आम्हाला शिक्षा होईल याची भीती तुला वाटत आहे का? आमच्या मालमत्ता जप्त होतील, आमची नागरिकता हिरावून घेतली जाईल. शिवाय आम्हाला इतरही शिक्षा होतील असे तुला वाटते आहे का?
नंतर क्रिटो सॉक्रेटिसच्या मुलांचा विषय काढतो- तू गेलास तर मुलांकडे कोण बघणार? थोडक्यात, तुझ्या पळून न जाण्याच्या निर्णयाने तुझे शिष्य, तुझे मित्र आणि तुझी मुले अशा सगळ्यांवर अन्याय होणार आहे आहे. तुझे न्यायाचे तत्त्वज्ञान आहे ना? मग, पळून जाऊन इतक्या सगळ्यांवर अन्याय का करतो आहेस, असा क्रिटोचा युक्तिवाद आहे!
या वेळी क्रिटो स्वतःला आणि सॉक्रेटिसच्या इतर मित्रांनाही दूषणे देतो. उद्विग्नपणे म्हणतो, हे सगळं अपयश खरं तर आमचं आहे. आम्ही हा खटला उभाच राहू द्यायला नको होता. सहज करता आलं असतं हे. तेव्हा आपण निर्णय घेतला नाही. आता तू तरी वेळ संपून जाण्याआधी तू निर्णय घे. आजच्या आज हा निर्णय घ्यायला हवा.
क्रिटोने उपस्थित केलेले मुद्दे सॉक्रेटिसला महत्त्वाचे वाटत नाहीत. माणसाच्या भौतिक जीवनातले हे मुद्दे! त्यांचा किती विचार करायचा? सामान्य माणसाला भौतिक आणि भावनिक मुद्दे महत्त्वाचे वाटत असतात, सॉक्रेटिससारख्यांना तत्त्वज्ञानाचे!
भावनिक मुद्द्यांमध्ये फारसा रस नसला, तरी क्रिटोच्या मुद्द्यांवर सॉक्रेटिस थोडेबहुत बोलतो! लोकांच्या टीकेचे काय मानायचे? मी पळून गेलो काय आणि मृत्यू पावलो काय, मी जवळ नसल्यामुळे मुलांच्या दृष्टीने दोन्ही सारखेच असणार आहे, अशी सॉक्रेटिस मोघम उत्तरं देतो.
या संवादामध्ये पळून जाणे योग्य की अयोग्य या मुद्द्यावर खरी तात्त्विक चर्चा इथून पुढे आकार घेते. सॉक्रेटिस म्हणतो, मला भावनिकदृष्ट्या काय वाटत आहे, हे मी महत्त्वाचं मानत नाही. मी विचार करून ठरवलेलं तत्त्वज्ञान काय म्हणत आहे, हे मी महत्त्वाचं मानतो. माझ्या नशिबी हे आलं आहे म्हणून मी तत्त्वज्ञानाला बाजूला सारणार नाही.
सॉक्रेटिस इथे सूचित करतो की, सामान्य लोकांप्रमाणे वागण्यात आणि विचार करण्यात अर्थ नाही. इथे सॉक्रेटिस क्रिटोला एक उदाहरण देतो. तो विचारतो, आपल्याला आपले शरीर सुदृढ करायचे असेल तर आपण प्रशिक्षकाचे ऐकू का सामान्य माणसाचे ऐकू? अर्थातच प्रशिक्षकाचे! त्याचे न ऐकता आपण व्यायाम केला तर आपल्याच शरीराला इजा पोहोचेल. त्याप्रमाणेच आपण तत्त्वज्ञानात्मक विचार करून वागलो नाही, तर आपल्यामधील चांगुलपणाला इजा पोहोचते. आपले वागणे न्याय्य असायला हवे. कुठलेही अन्याय्य वागणे आपले नुकसानच करत असते, कारण ते आपल्या सदगुणांचा नाश करत असते, आपल्या व्यक्तिमत्त्वाचा नाश करत असते.
ज्याप्रमाणे आपले शरीर उत्तम अवस्थेत नसेल, तर आपले जीवन जगण्यालायक राहत नाही, त्याप्रमाणे आपले वर्तन न्याय्य नसेल, तर आपले व्यक्तिमत्त्व भ्रष्ट होते आणि आपले जीवन जगण्याच्या लायकीचे राहत नाही. इथे सॉक्रेटिस एक अतिशय भव्य असे सत्य सांगतो. तो क्रिटोला विचारतो, चांगले जीवन, सुंदर जीवन आणि न्याय्य जीवन हे सर्व एकच नाही का?
मानवी जीवनातला चांगुलपणा, मानवी जीवनातली सुंदरता आणि मानवी जीवनातली न्यायप्रियता यांचे एकत्व सॉक्रेटिस अधोरेखित करतो. क्रिटोला या त्रिसूत्रीमधील एकत्व मान्य करावे लागते. इथे आपल्या नकळत आपल्याला मानवी जीवनातील चांगुलपणाचा आणि सुंदरतेचा पाया सापडतो- न्याय! तो नसेल तर जीवन चांगलेही राहत नाही आणि सुंदरही राहत नाही. मृत्यूच्या भीतीला तर सॉक्रेटिसने ‘अपॉलॉजी’मध्येच फेकून दिले आहे. आता त्या निर्भयतेला या संवादात सॉक्रेटिस न्यायाचे अधिष्ठान देतो.
एवढे बोलून झाल्यावर सॉक्रेटिस क्रिटोला म्हणतो- आता आपल्याला मान्य करायला पाहिजे की, पळून जायचे की नाही, या प्रश्नाचा निर्णय आपण मुलांचे काय होईल, मित्रांचे काय होईल किंवा मित्रांना समाज काय म्हणेल या गोष्टींचा विचार करून घेण्यापेक्षा न्यायतत्त्व काय सांगते आहे, याचा विचार करून घ्यायला हवा. क्रिटोला हेसुद्धा मान्य करायला लागते.
सॉक्रेटिस पुढे म्हणतो- आपल्याला एक गोष्ट इथे मान्य करायला पाहिजे की, जर आपल्याला न्यायाने वागायचे असेल, तर आपल्याला कुठलीही चुकीची गोष्ट करून चालणार नाही आणि कुणाला इजा करूनही चालणार नाही. सॉक्रेटिस आपल्या संभाषणात चांगुलपणा, सौंदर्य, न्याय, इजा न करण्याचे तत्त्व हे सारे झरझर बोलत जातो. त्यांच्यातील अंर्तगत संगती ऐकणाऱ्याने झरझर समजून घ्यावी अशी त्याची अपेक्षा आहे. या लेखात ही संगती सोपेपणाच्या दृष्टीने थोडी उलगडून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
न्याय हवा असेल तर कुणालाही चुकीचे वागून चालणार नाही. अगदी आपल्याशी जे चुकीचे वागले आहेत, त्यांच्याशीही आपल्याला चुकीचे वागून चालणार नाही. आपल्याशी कुणी चुकीचे वागले, म्हणून आपण चुकीचे वागलो, तरी ते योग्य ठरत नाही. कारण याही परिस्थितीमध्ये चुकीचे आपणच वागत असतो. कारण कुठलेही असो, अन्यायाचा बदला घ्यायचा असो, आपण चुकीचे वागलो की, नुकसान आपलेच होते. चुकीच्या वागण्याने आपल्या जीवनातला चांगुलपणा, न्याय आणि सौंदर्य अशा सगळ्यांनाच हानी पोहोचते. हाच विचार पुढे नेत आपल्याला मान्य करावे लागते की, आपल्यावर अन्याय करणाराच काय, पण समाजातल्या कुणाशीही आपल्याला कुठल्याही परिस्थितीत चुकीचे वागता येणे अशक्य असते.
सॉक्रेटिसची न्यायाची ही संकल्पना तत्कालीन ग्रीकांच्या न्यायाच्या संकल्पनेपेक्षा वेगळी होती, क्रांतिकारक होती. त्या काळच्या न्यायाच्या तत्त्वाप्रमाणे मित्राला मदत आणि शत्रूला हानी पोहोचवणे योग्य होते. सॉक्रेटिसच्या ‘व्यक्तिगत न्यायसंकल्पने’मध्ये कुणालाही इजा न करणे हेच योग्य होते. (अन्याय झाला तर समाजाने तयार केलेला कायदा न्याय करेल. व्यक्तीने कुणालाही इजा करायची नाही.)
कुठलेही चुकीचे वागणे किंवा कुणालाही इजा पोहोचवणे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला हानी कसे पोहोचवते, हे आपण स्वतःच्या अनुभवावरून समजून घेतले, तरच सॉक्रेटिसचे हे उदात्त तत्त्व आपल्याला समजून घेता येते. आपण चुकीचे वागलो, आपण कुणाला हानी पोहोचवली किंवा आपण कुणाला इजा केली, तर त्याचा आपल्या संवेदनेवर काय परिणाम होतो, आपल्या सेल्फ-इमेजवर काय परिणाम होतो, याचे आपण निरीक्षण करत राहिलो, तर सॉक्रेटिस काय म्हणतो आहे, हे आपल्या हळूहळू लक्षात येत जाते.
एवढे बोलून झाल्यावर सॉक्रेटिस क्रिटोला म्हणतो- आपण इथून पळून जायचा निर्णय घेतला, तर आपल्या हातून अथेन्सच्या समाजाची हानी होईल असे नाही का तुला वाटत?
सॉक्रेटिसला नक्की काय म्हणायचे आहे, हे क्रिटोला कळत नाही. तो तसे सॉक्रेटिसला सांगतो. सॉक्रेटिस आपला मुद्दा उलगडून सांगतो. तो क्रिटोला म्हणतो- “हे बघ, आत्ता इथे अथेन्सची राजसत्ता आणि अथेन्सचा कायदा येऊन उभा राहिला आणि आपल्याला म्हणाला की, अरे तुम्ही चालवलंय काय? अथेन्सच्या कायद्याने दिलेला निर्णय जर कुणी एखादी व्यक्ती तुरुंगातून पळून जाऊन उलथून टाकणार असेल, तर अथेन्समध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहणार कशी? त्यावर आपण काय उत्तर द्यायचे त्यांना क्रिटो? आमच्याविरुद्ध कायद्याने चुकीचा निर्णय दिला म्हणून आम्ही तो मोडत आहोत?’’
यावर क्रिटो म्हणतो, अर्थातच!
त्यावर सॉक्रेटिस म्हणतो की, यावर कायद्याने आणि राजसत्तेने आपल्याला त्यांनी आजवर आपल्यावर जे उपकार केले आहेत, त्याची आठवण करून दिली, तर आपण काय बोलायचे? याच कायद्याच्या राज्यामुळे आपण आयुष्यभर सुरक्षित राहिलो. याच कायद्याखाली आपल्या आई-वडिलांचे लग्न लागले, आपला जन्म शक्य झाला, सुरक्षित वातावरणात आपले बालपण आणि तारुण्य गेले, आपले शिक्षण झाले. हे सारे नागरिक आणि कायदा यांच्यामधल्या अलिखित कराराप्रमाणे झाले आहे. कायद्याने नागरिकाचे रक्षण करायचे, आणि त्या बदल्यात नागरिकाने कायदा पाळून कायद्याचे रक्षण करायचे! कायदा आपल्या पूर्वजांनी तयार केला आहे. त्यामुळे, आपण जसे आपल्या पूर्वजांचे वारस आहोत, त्याचप्रमाणे आपण त्यांचे सेवकसुद्धा आहोत. त्यांनी केलेले कायदे पाळून, त्यांनी तयार केलेल्या राज्याशी एकनिष्ठ राहून आपण त्यांची सेवा करणे अपेक्षित आहे.
क्रिटो बिचारा यावर काय बोलणार?
सॉक्रेटिस पुढे म्हणतो - अथेन्सचा कायदा जर मला म्हणाला की, हे सॉक्रेटिस तू सत्तर वर्षे माझा फायदा घेतलास. आनंदाने अथेन्समध्ये राहिलास. तुला कुणीही इथे राहण्याची सक्ती केली नव्हती. तू स्पार्टाला जाऊ शकत होतास, क्रेटेचा नागरिक बनू शकत होतास, पण तू तसे केले नाहीस. अथेन्स तुला योग्य वाटत होते म्हणून केले नाहीस. या सत्तर वर्षांत तू कधीही म्हणू शकत होतास की, अथेन्सचे कायदे अन्याय्य आहेत. तसे तू कधीही म्हणाला नाहीस. आणि आता केवळ एकदा कायदा चुकला म्हणून, तू तो मोडतो आहेस का? केवळ स्वार्थासाठी? सांग क्रिटो, अथेन्सच्या कायद्याला मी काय उत्तर देऊ?
जीवनभर कायद्याचा फायदा घेऊन नेमका आता तू पळून गेलास तर किती हास्यास्पद होशील तू सॉक्रेटिस, असे कायदा मला म्हणाला तर त्याला मी काय उत्तर देऊ क्रिटो? कायदा मोडून आपल्या मित्रांना शिक्षांच्या जंजाळात का अडकवतो आहेस सॉक्रेटिस, असे मला कायद्याने विचारले तर मी काय उत्तर देऊ क्रिटो?
क्रिटो निराश होऊन निघून जातो. दुसऱ्या दिवशी जीवनातील चांगुलपणासाठी, सौंदर्यासाठी आणि न्यायतत्त्वासाठी आपल्या तत्त्वज्ञानी मित्रांच्या घोळक्यात बसून सॉक्रेटिस विषाचा प्याला ओठांना लावतो, आणि माणसाच्या इतिहासातले एक विराट नाट्य जन्माला येते… तत्त्वज्ञान मृत्यूपेक्षा मोठे हे तत्त्व जन्माला येते.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
सॉक्रेटिसच्या आधी काही तत्त्वज्ञांनी ‘सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी’ मांडली होती. ग्रीक तत्त्वज्ञ ग्लाउकाँने मांडली होती, भारतात कौटिल्याने मांडली होती. बौद्ध संकृतीनेसुद्धा मांडली होती. जंगलराज आणि त्यातील अनागोंदी संपवण्यासाठी लोक एकत्र आले, त्यांनी राजा निवडला आणि त्याला धान्यरूपाने कर द्यायचे मान्य केले, अशी थिअरी सर्वत्र होती. यात उपयुक्ततावाद होता. सॉक्रेटिसने या उपयुक्ततावादी कराराला नैतिक अधिष्ठान दिले!
‘अपॉलॉजी’ने तत्त्वज्ञानाला मानवी आयुष्यातील सौंदर्याचा पाया बनवले आणि ‘क्रिटो’ने ‘सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी’ला नैतिक अधिष्ठान दिले. आपल्या जिवाची आहुती देऊन सॉक्रेटिसने मानवी आयुष्यात असलेली तत्त्वज्ञानाची अनिवार्यता मानवाच्या मनावर बिंबवली!
‘अपॉलॉजी’मध्ये सॉक्रेटिस ज्युरींना म्हणजे कायद्याला म्हणतो की, मी देवाचा आदेश मानणार, तत्त्वज्ञानाने घडवलेले माझे मत मानणार, तुमचा आदेश नाही, तेव्हा आधुनिक काळातील ‘सिव्हिल डिसओबिडियन्स’च्या संकल्पनेचा पाया घातला गेला. क्रिटोमध्ये जेव्हा अन्याय्य शिक्षा कायद्याचा आदर म्हणून सॉक्रेटिस भोगतो, तेव्हा काहीही झाले, तरी कायद्याचे राज्य राहिले पाहिजे, या तत्त्वाचे महत्त्व अधोरेखित झाले.
व्यक्ती आणि कायदा एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आपण मानवी इतिहासात नेहमी बघतो. त्यांच्यातला हा ताण ‘अपॉलॉजी’ आणि ‘क्रिटो’मध्ये उभा राहतो. तत्त्वज्ञानाचा आदर म्हणून सॉक्रेटिस कायद्याविरुद्ध उभा राहिला आणि कायद्याचा आदर म्हणून त्याने कायद्याने दिलेली शिक्षा अन्याय्य असली तरी भोगली!
व्यक्तीने परंपरेला प्रश्न विचारून तत्त्वज्ञान घडवायचे, त्या तत्त्वज्ञानाचा पाया वापरून जीवन चांगले, सुंदर आणि न्याय्य बनवायचे, वेळ पडली तर धर्माला आणि परंपरेला प्रश्न विचारून त्यांच्यात बदल घडवून आणायचे, आणि या सगळ्या प्रकारात कायद्याने अन्याय्य शिक्षा जरी केली, तरी ती परंपरेचा, कायद्याचा, पूर्वजांचा आणि समाजाचा आदर म्हणून भोगायची, अशी ही संगती सॉक्रेटिसने आपल्याला लावून दिली आहे.
प्लेटो आपल्या पुढील संवादांमध्ये मानवी जीवनाची इतर अंगे तपासतो. आपण प्लेटोच्या या संवादांचे चिंतन करत राहिलो तर आपल्या जीवनात सर्व बाबतीत सुसंगती यावी अशी संवेदना आपल्यामध्ये तयार होत जाते.
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment