अजूनकाही
“आहे… आहे… इथेच आहे ती…” हा पोस्टरवरचा आश्वासक स्वर आणि रंगमंचावर उमटणारा प्रश्न ‘कुठे आहे लक्ष्मी?’ यामधली दरी हाच या नाटकाचा गाभा आहे. यातील ‘लक्ष्मी’ नेमकी कोण? ती फक्त तीच एक स्त्री आहे का? की बाकीच्या स्त्रियाही? की लक्ष्मी म्हणजे पैसा? की कल्याणकारी योजना? की आपलीच शासनव्यवस्था? या सगळ्या प्रश्नांना भिडणारं नाटक म्हणजे ‘कुठं आहे लक्ष्मी? (.MP4)’
रंगमंचावर प्रकाश पडतो. एक छोटीशी चौकट उजळते. जणू मोबाईलच्या स्क्रीनची फ्रेम. त्या चौकटीत उभी आहे ‘लक्ष्मी’. साधी, सामान्य, गर्दीत हरवून जाणारी, पण त्या क्षणी ती केंद्रस्थानी आहे. कारण तिच्या हातात आहेत १५०० रुपये आणि त्या रुपयांभोवती फिरत आहे संपूर्ण व्यवस्था.
नुकताच रंगभूमीवर दाखल झालेला ‘कुठं आहे लक्ष्मी? (.MP4)’ हा दीड तासांचा प्रयोग आजच्या सामाजिक वास्तवाला भिडतो. तरुण नाटककार आणि दिग्दर्शक ऋत्विक व्यास यांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं हे नाटक महाराष्ट्र फाऊंडेशनच्या नाट्यलेखन पुरस्कारानं सन्मानित झाल्यानंतर रंगमंचावर आलं आहे. नव्या दमाच्या कलाकारांची ही टीम समकालीन भाषेत, समकालीन तंत्रासह, प्रेक्षकांसमोर एक अस्वस्थ करणारा प्रश्न ठेवते.
डिजिटल युगात एखाद्या माणसाचं आयुष्य कसं ‘व्ह्यूज’मध्ये मोजलं जातं आणि त्याची किंमत ‘व्हॅल्यू’पेक्षा कमी कशी ठरते, यातील दरी तो अत्यंत प्रभावीपणे उलगडतो. हा केवळ नाट्यप्रयोग नाही, तर आपल्या काळाच्या अस्वस्थ सत्याला थेट सामोरं जाण्याचा अनुभव आहे.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
कथा अगदी साधी वाटणारी आहे. झोपडपट्टीत राहणारी ‘लक्ष्मी’… घरकाम करून संसार चालवणारी... तिला नवरा नाही. कमावत्या वयातील मुलगा बेरोजगार आहे. वस्तीत छोटंसं घर आहे. ज्यात पुरेशी जागा नाही. कोणतीही सोय नाही. वस्तीतले घर ते घरकाम इतकंच पण रोजचं जसं असेल तसं आयुष्य सुरू असतं. त्यात शासनाची ‘कल्याणकारी’ म्हणवणारी योजनेची बातमी येते. शासनाने ‘लाडकी बहीण’च्या नावानं आश्वासनं आणि दिवास्वप्नं दाखवण्यापासून ते सरकारी व्यवस्थेत तो फॉर्म पूर्ण भरून होईपर्यंतचा एक मोठा पल्ला अतिशय वास्तववादी विनोदी कोपरखळ्या देत मांडला आहे.
जेव्हा शासनाच्या योजनेतून मिळालेले १५०० रुपये लक्ष्मीच्या खात्यात जमा होणार असं ठरतं, तेव्हा तिच्यासाठी ते पैसे म्हणजे छोटासा दिलासा असतो. पण लगेच तिच्या भोवती माध्यमं, राजकारण आणि बाजार यांची नजर फिरू लागते. त्या सोबतच सुरू होतो ‘व्ह्यूज, लाईक आणि सबस्क्राईब’चा खेळ. माध्यमं तिच्या आयुष्याला ‘फ्रेम’ देतात. तिच्या दारिद्र्याला ‘हेडलाईन’ मिळते. तिचं वस्तीतलं छोटंसं घर, शेजार, गळकं छप्पर, घरकाम अशा प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींचा ‘क्लोज-अप’ घेतला जातो. तिच्या प्रत्येक गोष्टीची ‘हेडलाईन’ बनू लागते. व्ह्यूज वाढू लागतात. ‘फेम’ मिळू लागतो. तिच्या नावानं चर्चासत्रं होतात. राजकीय पक्षासाठी ती मतदार ठरते आणि ‘पोस्टर’वरील चेहरा बनते.
‘लक्ष्मी १५०० रुपयांत काय घेणार?’ त्या १५०० रुपयांच्या बदल्यात मतांची आणि बाजारपेठेची गणितं मांडली जातात. बाजारपेठेला तिच्या हातात आलेल्या पैशात संधी दिसते. तिच्याभोवती सतत जाहिराती, ऑफर्स, हप्ते यांचा विळखा सुरू होतो.
लक्ष्मी हप्त्यावर एक भलं मोठं कपाट विकत घेते. तो प्रसंग रंगमंचावर विलक्षण प्रभाव टाकतो. तिच्या छोट्याशा घरात नीट राहू शकेल इतकी पुरेशी जागा नसतानाही ती ‘कपाट’च घेते. ते भलं मोठं कपाट तिच्या अरुंद घरातून आत येत नाही. मग शेजाऱ्यांची मदत होते. मुस्लीम शेजारणीच्या घराच्या छपरातून कपाट आत सरकवलं जातं. त्या क्षणी माणुसकीची उब जाणवते. त्या कपाटाशी संबंधित तिला तिची स्वप्नं दिसू लागतात.
लेखन आणि दिग्दर्शनातून ‘कपाट’ हे या नाटकातील एक रूपक म्हणून मांडलं आहे. या कपाटापासून लेखक अनेक प्रश्नही समोर मांडतो आणि लक्ष्मीच्या भावना समजून घ्यायलाही मदत करतो. उदा., या कपाटाची खरंच निकडीची गरज होती का? तिच्यासाठी ते कपाट म्हणजे स्वप्नांचा कोपरा का असतो?
लक्ष्मी १५०० रुपयांची स्वप्नं रंगवत असताना, पण पुढच्या दृश्यात अतिक्रमणाच्या नावाखाली झोपडपट्टी जमीनदोस्त होते. बातमी होते कारवाईची. पण लक्ष्मीची बातमी मात्र दिसत नाही. लक्ष्मीचं घर, तिचं कपाट, तिची स्वप्नं ढिगाऱ्याखाली जातात. त्या दृश्याला मात्र कॅमेरे नाहीत? आता तिथं कोणतीही गर्दी दिसत नाही. ना तिची मालकीण, ना राजकारणी, ना शेजारी, ना व्ह्यूज आणि लाईक दिसतात. मीडिया पुढच्या स्टोरीकडे वळतो. राजकारण पुढच्या निवडणुकीकडे. बाजार पुढच्या ग्राहकाकडे, आणि प्रेक्षक बाहेर पडताना मनात एक प्रश्न घेऊन जातो.
नाटकाची रचना आधुनिक आहे. ती सोशल मीडियाच्या भाषेत कथा सांगितली जाते. ऑनलाइन चॅटिंगचे संवाद प्रोजेक्टरवर दिसतात. व्हिडिओ कॉल रंगमंचावर जिवंत होतो. सुरुवातीचा व्लॉग आणि प्रत्यक्ष अभिनय इतक्या अचूक जुळतो की, तो रेकॉर्डेड आहे की लाईव्ह असा संभ्रम निर्माण होतो. प्रोजेक्टर आणि स्क्रीनचा वापर हा केवळ तांत्रिक आकर्षण नाही, तर आशयाशी घट्ट जोडलेला घटक आहे. प्रकाशयोजना विशेष उल्लेखनीय आहे. निळ्या LED पट्टीने आखलेली चौकट जणू डिजिटल जगाची मर्यादा दाखवते. त्यात अडकलेली लक्ष्मी दिसते. पार्श्वसंगीत संयत आहे. ते प्रसंगाला अधोरेखित करतं, भावनांवर भार टाकत नाही.
अभिनय हा या प्रयोगाचा आत्मा आहे. लक्ष्मीची भूमिका साकारणारी समृद्धी खडके रंगमंचावर पूर्णपणे झोकून देऊन उभी राहते. तिच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि आशा यांची एकत्र छटा प्रेक्षकांच्या मनाला भिडते. मुलाच्या भूमिकेत यश भालेराव राग, असहायता आणि संताप यांची तीव्र अभिव्यक्ती करतो. नील देशपांडे, हिमांशू पिले, वैभव काळे, मंगेश माने, सई शाळीग्राम आणि अदिती देवळणकर या कलाकारांनी कोरस आणि इतर भूमिकांतून नाटकाचा लयबद्ध प्रवास समर्थपणे उभा केला आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
हे नाटक वर्गवास्तव आणि धार्मिक वास्तव प्रभावीपणे दाखवतं. घरकाम करणारी लक्ष्मी आणि तिची मालकीण यांच्यातील संवादातून सामाजिक दरी स्पष्ट होते. मुस्लीम शेजारणीच्या संदर्भातून असुरक्षिततेची जाणीव होते. बेरोजगारी, बाजारीकरण आणि मीडिया राजकारणाचं नातं या सगळ्यावर सूचक भाष्य केलं जातं.
नव्या पिढीचे हे कलाकार आणि दिग्दर्शक विषय हाताळताना कुठेही उपदेशात्मक होत नाहीत. ते कथा सांगतात. त्यातून प्रश्न उभा राहतो. प्रेक्षक हसतो, काही प्रसंगांत हलका होतो, पण शेवटी अस्वस्थ होतो.
हा नाट्यप्रयोग केवळ प्रासंगिक नाही, तर आपल्या काळाचा दस्तऐवज आहे. जोपर्यंत व्यवस्था लक्ष्मीचा वापर करत राहील, तोपर्यंत हा प्रश्न जिवंत राहणार आहे. जोपर्यंत हा प्रश्न जिवंत आहे, तोपर्यंत हे नाटक आवश्यक आहे.
आजच्या काळात स्त्रीच्या अस्तित्वाचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या ‘वापरल्या’ जाणाऱ्या प्रतिमेचा वेध घेणारं हे नाटक अर्थपूर्ण आहे. लक्ष्मीचा प्रश्न हा केवळ एका व्यक्तिरेखेचा नाही, तर आपल्या समाजव्यवस्थेचा आहे.
.................................................................................................................................................................
लेखिका अंजली प्रविण NALSAR Universityच्या Fair Trial Programमध्ये डेटा विश्लेषक (Data Analyst) म्हणून कार्यरत आहेत. क्रिमिनल जस्टीस सिस्टीम, लिंग आणि न्याय यावरील विषयांच्या अभ्यासक आहेत.
amkar.anju@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment