काळ्या करड्या ढगांची आभाळात दाटी झालेली, त्याच्या खाली तांबडं फुटतंय, हलकासा पावसांच्या सरींचा आवाज, मधूनच किंचितसा गडगडाट... सैनिक भरतीचा फॉर्म भरताना वडिलांची सही अनिवार्य, कारण मुलगा अजून सज्ञान नाही! आता ती सही स्वतःच करावी का? पण त्याला मन तयार होईना! या द्विधावस्थेत असतानाच तत्क्षणी वडिलांची खोटी सही करतो... फ्रेंच शत्रूच्या पोटात सुरा भोसकल्यावर त्यालाच वाचवण्याची धडपड करणारा जर्मन पोरसवदा सैनिक... ‘इम वेस्टेन निश्ट्स नॉईयस’ (‘ऑल क्वाएट ऑन वेस्टर्न फ्रंट’ – पश्चिम सीमेवरवर काहीच नवं घडत नाही) हा चित्रपट सव्व्वादोन तास आपल्याला काहीतरी सांगू पाहतो...
अनेकविध, तीव्र विरोधाभासी प्रतिमांनी युद्धाच्या निरर्थकतेवर बोट ठेवणाऱ्या या २०२२ साली आलेल्या चित्रपटाने ‘सर्वोत्कृष्ट परकीय भाषेतील चित्रपटा’चा (मूळ भाषा - जर्मन) ऑस्कर पटकावलेला आहे. एरीश मारिया रीमार्क या जर्मन लेखकाच्या याच नावाच्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे. १९३० आणि १९७९ सालीसुद्धा या पुस्तकावर दोन सिनेमे येऊन गेले आहेत. रीमार्क हा स्वतः एक सैनिक होता आणि पहिल्या महायुद्धात त्याचा सक्रीय सहभाग होता. त्याच्या स्वानुभवावर आधारित हे एक जर्मन साहित्यामधील अत्यंत महत्त्वाचं आणि लोकप्रिय असं पुस्तक आहे. १९२९ साली ते प्रकाशित झालं, पण हिटलरच्या काळात त्यावर बंदी घालण्यात आली होती.
युरोपियन देशांमध्ये युद्धपट नवीन नाहीत. कुठल्याही चित्रपट महोत्सवात किमान १० युरोपियन युद्धपट असतातच. त्यात क्रौर्य, युद्धाची निरर्थकता आणि निराशा असते. त्यामुळे बऱ्याच वेळेला ते एकसारखेच भासतात. त्यात प्रामुख्यानं माणसांची गोष्ट कमी आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणावर जास्त भाष्य असाच मामला असतो. त्यामुळे कथेच्या आणि नाविन्याच्या मुद्द्यांवर ते निराश करतात, पण जर्मन सिनेमा याला बऱ्याच अंशी अपवाद ठरतो. त्यामध्ये एक ठोस (राजकीय वा सामाजिक) भूमिका असते, माध्यमाचा सर्वांगीण विचार असतो, ध्वनीचा विचारपूर्वक व सूचक वापर केलेला असतो आणि डोळसपणे मुद्द्यांना भिडण्याची सचोटी असते. मुख्य म्हणजे तो सामान्य माणसांचा, त्यांच्याच आयुष्याचा चित्रपट असतो.
आपल्या गतकाळातून आपण काहीतरी शिकू शकतो, हा अगम्य आशावाद जर्मन लोकांमध्ये आहे. मग तो २००६ साली आलेला ‘लाइव्स ऑफ अदर्स’ असू देत, नाहीतर शीतयुद्धानंतरच्या परिस्थितीवर आलेला ‘गुडबाय लेनिन’ असू देत. ‘मानवी नाती’ या चित्रपटांच्या केंद्रस्थानी होती. बाह्य परिस्थितीमुळे माणसांत होत असलेले बदल/परिणाम आणि त्यामधून व्यक्तिगत आयुष्यात घडणाऱ्या घटना त्यांच्या परीघावर होत्या. त्यामुळे जर्मन सिनेमा हा ‘सामान्य माणसाचा सिनेमा’ मानला जातो. गेल्या काही वर्षांतल्या जर्मन चित्रपटांचं व्यक्तिकेंद्रित कथा हे बलस्थान राहिलेलं आहे.
मानवी संबंधामधले तणाव, नात्यांमधला तुटकपणा, विरोधाभासी व्यक्तिमत्त्वं हे घटक आपल्याला जर्मन चित्रपटात सर्रास सापडतात. त्यामुळेच की काय, जर्मन चित्रपटातील अभिनेते-अभिनेत्री झोकून देऊन काम करतात!
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
२०२२ साली रशिया-युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू झालं होतं. जर्मनीशी त्याचा थेट संबंध नसला, तरीही युक्रेनमार्गे येणाऱ्या रशियन वायुपुरवठ्यात त्यामुळे अनंत अडचणी आल्या, युक्रेनमधील गहू येईनासा झाला आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर व पर्यायानं सामान्य लोकांच्या जगण्यावर झाला. बटरची कमतरता आली, तेलाचे भाव वाढले, थंडीत हीटरसाठी लागणारा वायू कुठून आणायचा हा प्रश्न निर्माण झाला. असाच फटका बाकी युरोपियन देशांनाही बसला. युक्रेनमधल्या अपरिमित हानीमुळे संपूर्ण जगातून युद्धविरोधी सूर उमटू लागले. अशा वातावरणात हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि जगभरातील समीक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं.
पहिल्या महायुद्धादरम्यान युद्धभरतीमध्ये सैनिक म्हणून सामील झालेले १७-१८ वर्षांचे विद्यार्थी आणि तरुण या युद्धात कसे होरपळले जातात, हा या चित्रपटाचा गाभा आहे! साधारणपणे साहित्यकृतीवर आधारित चित्रपट हे बऱ्याच वाचकांचा भ्रमनिरास करणारे असतात. कारण पुस्तक या माध्यमातून शब्दांत मांडलेलं एक वास्तव अमूर्ततेकडे नेणारं असतं आणि ते वाचताना एक प्रकारची वैचारिक तंद्री लागते. अनेकविध विचारांचे तरंग मनात उमटतात. चित्रपट हे माध्यम प्रामुख्यानं दिग्दर्शकीय माध्यम असल्यामुळे त्यात एका वाचकाच्या (दिग्दर्शक हाही एक वाचकच) नजरेतून उतरलेलं सत्य प्रतिमांच्या स्वरूपात पडद्यावर उमटत असतं. म्हणजेच शब्दरूपी अमूर्ततेकडून प्रतिमारूपी मूर्ततेकडे दिग्दर्शक नेतो. आणि नेमकं यामुळेच वाचकांना आपल्याला हाताला धरून कोणीतरी काहीतरी मारून मुटकून आपल्याला समजावत आहे, असं वाटत राहतं. त्यामुळे या प्रतिमा त्यांच्यासाठी अडचणीच्या ठरतात. (वाचनाचा असा ‘एक संस्कार वर्ग’ झालेला वाचकांना आवडत नाही), पण त्याच वेळी एका विशिष्ट कालखंडात (रूढार्थानं जुन्या) कुठल्याश्या साहित्यावर कोणी एक चित्रपटरूपी प्रतिक्रिया दिली, तर त्याचा मागोवा घेणं भाग पडतं. कारण ती प्रतिक्रिया एकतर तद्दन व्यावसायिक नफा समोर ठेवून दिलेली असते किंवा एका संवेदनशील व्यक्तीनं दिलेला एक आर्त हुंकार तरी...
सध्याच्या काळात तर व्यावसायिक गणितं आणि संवेदनशीलता एकाच साच्यात बसवून एक छान आवरणसुद्धा तयार करता येतं. वानगीदाखल अनेक भारतीय आणि जुने इंग्रजी चित्रपट पाहता येतील. म्हणजे ‘साऊंड ऑफ म्युसिक’मधील गाणीच लक्षात राहतात, पण त्यातील ज्यू लोकांवर असलेला तणाव लक्षात राहत नाही, कारण सुरेल गाण्याचं कवच देऊन सिनेमा सामूहिक आवड जोपासण्यासाठी आणि त्यातूनच नफा कमण्यासाठी बनवला आहे. (अर्थात त्याचं मूल्यमापन काळाच्या कसोटीवरच व्हायला हवं आणि इतर कुठल्याही काळात तो सिनेमा वेगळाच भासू शकतो, ही शक्यता गृहीत धरायला हवीच!)
अशी आवरणं असतील तर अत्यंत टोकाच्या आणि तीव्र प्रतिक्रिया प्रेक्षकांत उमटू शकतात आणि त्याचा परिणाम काहीही होऊ शकतो. अर्थात अशा प्रकारचे विरोधाभास काही नवीन नाहीत. मनुष्य जीवनच विरोधाभासांनी भरलेलं आहे. फक्त सध्याच्या काळात त्याची तीव्र टोकं सतत आपल्याला पाहायला मिळतात; किंबहुना सोशल मीडियामुळे ती चटकन पृष्ठभागावर तरंगत येतात.
पण अशाच विरोधाभासी मनुष्याप्राण्यांची गोष्ट पडद्यावर आली तर?
असे विरोधाभास मानवी जीवनात कुठे कुठे पाहायला मिळतात? प्रामुख्यानं राजकारणात. त्यातल्या वारेमाप कुरघोड्या आणि त्यामधूनच नागरिकांसमोर सर्रास, बिनबोभाट खोटं बोलणं आणि एक वेगळाच कार्यभाग उरकून घेणं, अशा प्रकारची विरोधाभासी कृत्यं जगभर चालू असतात.
पहिल्या-दुसऱ्या महायुद्धात आणि त्या नंतरच्या शीतयुद्धात ज्या प्रकारची निराशा सामान्य नागरिकांनी (विशेषतः युरोपियन) अनुभवली, त्यामुळे एका प्रकारच्या असुरक्षिततेला संपूर्ण समाज सामोरा गेला. आज युद्ध, उद्या अचानक दोन जर्मन देश, परवा काय तर शीतयुद्ध, तेरवा काय तर चलनच बदललं, अशा एका पाठोपाठ अचानक आलेल्या स्थित्यंतरांमुळे लग्नसंस्था मोडीत निघाली, लोकसंख्या वाढ कमी झाली, नात्यांमधला दुरावा वाढला आणि आज तर जर्मनीसारखा देश वृद्ध लोकांचा देश होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे एकीकडे सरकारकडून समृद्ध जीवनाची हमी, जागतिक पटलावर विकसित देश म्हणून स्थान मिळेल याची शाश्वती आणि दुसरीकडे मात्र वैयक्तिक जीवनात निराशा, कटुता आणि एकाकीपणा!
‘गुडबाय लेनिन’ या जर्मन चित्रपटानं याच अडचणीवर विनोदी पद्धतीनं बोट ठेवलं आहे. पूर्व जर्मनीमध्ये कोमात गेलेली बाई पश्चिम जर्मनीमध्ये जागी होते आणि तिला मानसिक धक्का बसू नये म्हणून पूर्व जर्मनी तिच्यासमोर उभं करताना तिच्या पोराबाळांची उडालेली तारांबळ या चित्रपटात पाहायला मिळते. समूहासाठी असलेला सुखावह बदल एखाद्या माणसाकरता प्राणघातकदेखील ठरू शकतो, हे इतक्या सहजपणे अधोरेखित करणारी तो एक महत्त्वाचा चित्रपट आहे, यात काही शंका नाही!
अशीच टोकाची दृश्यं एकाच वेळी, एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळाली, तर त्याचा काय परिणाम होईल? म्हणजे ‘ऑल क्वाएट ऑन वेस्टर्न फ्रंट’मध्ये एकीकडे दिसणारा एखाद्याला भोसकल्यावर त्यालाच आटोकाट वाचवण्याचा प्रयत्न करणारा सैनिक आणि दुसरीकडे दिसणारा युद्धबंदी जाहीर झाल्यावर कागदोपत्री युद्ध संपायला वेळ असल्यामुळे युद्ध सुरू ठेवायला लावणारा एका बटालियनचा प्रमुख. हे नक्की कशाचे द्योतक आहे? ही कुठली मूल्यव्यवस्था आहे? या प्रश्नांची उत्तरं महत्त्वाची आहेत की, असे मूलगामी प्रश्न पडणं महत्त्वाचं आहे?
चित्रपट हा मुळात फ्रेम्सचा असतो, त्यात दृश्यात्मकतेला फार महत्त्व असते. म्हणजे दृश्यांचा, प्रतिमांचा प्रभाव प्रेक्षकांवर पडायला हवा. (मात्र बऱ्याच वेळा तद्दन गल्लाभरू सिनेमामधून त्याला हरताळ फासला जातो, हेही तितकंच खरे!)
जगात गाजलेले युद्धपट बरेच आहेत. अगदी भारतीय सिनेमातही आहेत, पण युरोपियन युद्धपटांत प्रामुख्यानं थंडपणे घडणाऱ्या क्रूरतेवर अधिक भर दिला जातो. एका स्त्रीचा जबरदस्तीनं उपभोग घेतल्यानंतर तिच्या माथ्यावर बंदूक ठेवून अतिशय थंड डोक्यानं मारून टाकणं किंवा प्रेतांच्या ढिगासमोर पार्टी चालू असणं इत्यादी प्रकारची मन हेलावून टाकणारी दृश्यं युरोपियन युद्धपटांद्वारे प्रेक्षकांवर बिंबवली जातात. पण त्यामधून कालातीत किंवा ठोस असं काही निष्पन्न होत नाही. थंड डोक्यानं केलेली क्रूर कृत्यं, विकृती एवढ्याच गोष्टी आपल्या मनःपटलावर बिंबवल्या जातात किंवा एखाद्या माणसाला थेट ‘हिरो’ केलं जातं. (उदा., ‘शिंडलर्स लिस्ट’ - अर्थात हे एक फक्त ढोबळ उदाहरण झालं) त्यामुळे ते सगळे एका ठराविक साच्यात, काळात अडकलेले वाटतात.
पण याच घटना एखाद-दुसऱ्या सामान्य नागरिकाच्या जीवनात काय काय आणि कशा प्रकारे उलथापालथ करू शकतात, हे दाखवलं गेलं तर त्या मनाचा ठाव घेतात. कारण कुठल्याही प्रेक्षकाला एका मानवी जीवनात झालेले बदल, उलथापालथ ही जास्त विचलित करते. अशी गोष्ट फक्त एका समूहाची एका काळातली गोष्ट बनून न राहता मानवी पातळीवर येते. त्या गोष्टीतली पात्रं चुकतात, पडतात, पुन्हा उभारी घेतात आणि त्यांचा स्वतःशी आणि दुसऱ्याशी असलेला संघर्ष अधोरेखित करतात. अशा कलाकृती मग कालातीत, स्थल-काल विरहित ठरतात.
या चित्रपटात तद्दन युद्धपटात असतात तशी विचलित करणारी दृश्य आहेतच; पण तीव्र, दोन टोकाच्या स्वभावाच्या बाजू एकाच वेळेस सामावलेली असणारी व्यक्तिमत्त्वं आहेत, ‘खरी माणसं’ आहेत, क्रूरता तर आहेच, पण त्याहून जास्त आयुष्यातील निरर्थकता आहे. ‘सैनिकांना सतत खाण्याची वानवा असते’ हे स्पष्टपणे दाखवणारी दृश्यं या चित्रपटात भरपूर आहेत. एका शेतकऱ्याच्या घरातून टर्की पक्षी चोरून अत्यंत रटाळ आणि रावडी पद्धतीनं शिजवून खाणारे, शत्रुपक्षाच्या बंकरमध्ये गेल्यावर तिकडचे अन्न अधाश्यासारखे खाणारे सैनिक आपल्याला यात दिसतात. कारण मुळात ते प्रशिक्षित सैनिक नाहीतच! ते तात्पुरते आहेत, बदली आहेत, सक्तीनं सैनिक झाले आहेत, ते सामान्य माणूस आहेत. पोटाची भूक ही सामान्य माणसासाठी सर्वांत महत्त्वाची असते. तिचं अशा भेदक दृश्यांमधून अधोरेखित होत जाणं आपल्याला एक प्रेक्षक म्हणून विचार करायला भाग पाडतं.
अशातच युद्धभूमीपासून थोडे दूर एके ठिकाणी दोन सैनिक (सामान्य नागरिकच!) प्रातर्विधीला बसले आहेत असं एक दृश्य आहे. (आधीच पोटात किडूकमिडूक अन्न आणि त्यातून प्रातर्विधी – अजून एक विरोधाभास!) त्यातील एक सैनिक दुसऱ्याला पत्र वाचून दाखवतो आहे. त्याला वाचता येत नाही म्हणून हा सगळा खटाटोप. घरी परत येण्यासाठी त्या पत्रात त्याच्या बायकोकडून एक आर्त विनवणी आहे. त्यांच्या स्वर्गवासी बाळाच्या कबरीला लवकरच त्याची बायको भेट द्यायला जाणार आहे आणि पुढील वर्षी आपण एकत्र त्याचा दहावा वाढदिवस साजरा करू असं तिने त्यात लिहिलं आहे. हे सगळं ऐकल्यावर त्यावरील प्रतिक्रिया म्हणून, आपण सगळे सैनिक मित्र एकत्र भाजलेले बटाटे खात वेळ व्यतीत करत आहोत, असं दृश्य डोळ्यासमोर आल्याचं तो वाचणाऱ्याला सांगतो.
एकीकडे प्रातर्विधी, दुसरीकडे भावना, आर्तता, विनवणी आणि तिसरीकडे भूक! अशा तीव्र गोष्टींच्या कात्रीत एकाच वेळी सापडलेला ‘तो’ नंतर अचानक म्हणतो, ‘आता मला कंटाळा आला. मी जातो’. आणि तो निघून जातो. काय ही जगण्यातील निरर्थकता! यात संवाद फारसे नाहीतच. केवळ डोळ्यांतून आणि काही शब्दांतून म्हटलं तर अर्थहीन आणि तरीही मन हेलावणारा प्रसंग आपल्यासमोर येतो.
या संपूर्ण चित्रपटात एकही स्त्री पात्र नाही. (एक दृश्य वगळल्यास, जिथं सर्व सैनिकांना दूरवर काही मुली दिसतात आणि त्यातील एक त्यांच्या जवळ जाऊन, त्यांना मदत करून ‘पोरगी पटवण्याचा’ प्रयत्न करतो). पण स्त्रीविषयी वाटणाऱ्या भावनांचे/विचारांचे दाखले आहेत. पहिल्या दिवशी मार्च करताना सगळे जोरजोरात एक गाणं म्हणत असतात. ते साधारण असे, ‘‘मुली, तुझ्यावर मी प्रेम करतो पण सध्या लग्न केवळ अशक्य आहे. एक वर्षभर थांब, मग तुझे हे स्वप्न सत्यात उतरेल’’. आणि हे म्हणत असताना त्यांच्यात एक उत्साह संचारत असतो.
एक बटालियन प्रमुख एका कोवळ्या विद्यार्थिदशेतील सैनिकाला ट्रकमध्ये विचारतो की, त्याला मळकट आणि गलिच्छ स्त्री मैत्रीण म्हणून आवडेल का? त्याचं ‘नाही’ असे उत्तर आल्यावर प्रमुख विचारतो की, ‘मग बंदूक अशी का घाण ठेवली आहे? ती मैत्रिणीसारखी कायम चकाचक आणि स्वच्छ पाहिजे’.
स्त्रीकडे वस्तू म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन दुर्दैवानं नवीन नाही, पण स्त्री या संकल्पनेचा पुरुषी पद्धतीनं भावनिक वापर युद्धात कशा प्रकारे होऊ शकतो किंवा केला जातो, याचं हे मूर्तिमंत उदाहरण ठरावं. अशी दृश्यं बघत असताना आपण आपल्या रोजच्या जीवनात अश्या प्रकारची उदाहरणं किती सर्रास आणि जाहीरपणे देत असतो, हे आठवल्याशिवाय राहत नाही. त्यातून स्वतःचीच घृणा वाटत राहते.
पहिल्या दृश्यापासून ते शेवटच्या दृश्यापर्यंत या सिनेमात एक प्रकारचा ‘नैराश्यवादी आशावाद’ही दिसत राहतो. सुरुवातीला आपल्या मित्रांबरोबर सैनिक म्हणून दाखल झालेला १७ वर्षांचा पाउल बॉयमर हळूहळू एकटा पडत जातो आणि एके दिवशी आपण शत्रूला हरवून फ्रान्समध्ये आगेकूच करू अशा आशेवर लढत राहतो. (पण खरं तर जीव वाचवत राहतो). या सगळ्यामध्ये तो शेवटपर्यंत कसा काय जगला किंवा वाचला आहे, असा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही. त्याला आलेलं मरणसुद्धा एक शोकांतिका म्हणूनच आपल्या समोर येतं हा भाग वेगळा. या सगळ्या पार्श्वभूमीवर युद्ध थांबावं म्हणून प्रयत्न करणारे पण एक पात्र आहे. त्याचीसुद्धा एक भेदक, मन हेलकवणारी कहाणी आहे. युद्ध थांबू नये, राष्ट्रवादाच्या नावाखाली ते सुरू राहावं म्हणून प्रयत्न करणारे सैन्यदलातील अधिकारीही आहेत.
या चित्रपटाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गोष्ट एका समूहाबरोबर सुरू होते आणि पुढे पुढे व्यक्तिकेंद्रित होत जाते. त्यामुळे प्रेक्षक म्हणून आपण अधिकाधिक अंतर्मुख होत जातो.
फेलिक्स कामेरेर या नटानं पाउलची भूमिका समरसून केली आहे. सुरुवातीला ‘समूहातलाच एक’ ते ‘संपूर्ण पडद्यावर त्याचंच भावविश्व’ हा प्रवास त्याने कुठलीही कसर न ठेवता टिपला आहे. अशा प्रकारची भूमिका ही अवघडच! कारण ‘आपण कोणी नाही’ आणि पुढे पुढे जाताना ‘आपणच’ हा विचार नट म्हणून पेलणे दिग्दर्शकीय आव्हान तर आहेच, कारण त्यात भूमिकेचा आलेख कायम एकवटलेला आणि तीव्र असा एकाच वेळेस दाखवायचा आहे. शिवाय न विसरता सामाजिक-राजकीय चित्रही चितारायचं आहे, पण त्याहूनही जास्त इथं नट म्हणून हे बदल चेहऱ्यावर दाखवणं अवघड आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
अशा पेचातले सिनेमे एकतर सपाट (सरधोपट) तरी होतात, नाहीतर अति भावनिक! त्यामुळे त्यांचा वैचारिक आत्मा हरवून जातो. हा सिनेमा कायम हिंदोळत राहतो, त्यासाठी छायाचित्रकाराचंही विशेष कौतुक करावं लागेल. कुठे कॅमेरा जवळ (क्लोज अप) न्यायचा, कुठे मोठं चित्र (पॅन) दाखवायचं हे अचूक कळणंदेखील महत्त्वाचं असतं. त्यासाठी चित्रपटाची वैचारिक बैठक समजून घेणं आवश्यक आहे. एआय तंत्रज्ञानावर अवलंबून न राहिल्यामुळे बरेसचे प्रसंग बाहेर घडवले गेले आहेत. त्यामुळे प्रत्येक कलाकार समरसून तर गेलाच आहे, पण एक माणूस म्हणून त्यात स्थित्यंतर घडलं आहे, हे वेळोवेळी जाणवत राहतं.
युरोपियन सिनेमे आणि विशेषकरून जर्मन सिनेमा हा साऊंड डिझाईनवर विशेष मेहनत घेतो. म्हणजे नेमकं काय हे हा सिनेमा बघितल्याशिवाय समजणार नाही. आवाज हे पण एक पात्र आहे आणि असलं पाहिजे याकडे विशेष लक्ष दिलं जातं. वानगीदाखल एक उदाहरण. सिनेमाच्या सुरुवातीला सगळीकडे कसं शांत शांत आहे. आसमंतात हलक्या पावसाच्या सरीचे आवाज आणि एकदम कॅमेरा आपल्याला सैनिकांची प्रेतं दाखवतो. पुढे पुढे कॅमेरा जातो आणि आपल्याला वाटतं- युद्ध थांबलं आहे… आणि अचानक बंकरमधले सैनिक, त्यांची धावपळ आणि बॉम्बचे आवाज यांनी पडदा व्यापून जातो. क्षणभंगुर शांतता मिथ्या आहे असंच जणू काही सांगणारा आणि ऐकवणारा निवेदक आपल्याला भेटतो! ‘नेटफ्लिक्स’वर या सिनेमाच्या मेकिंगवर एक छोटी फिल्म आहे. त्यात आपल्याला रंगभूषेपासून वेषभूषेपर्यंत आणि छायाचित्रणापासून ध्वनिसंयोजनापर्यंत अनेक बारकावे समजतात.
एक प्रेक्षक म्हणून आपल्याला जर्मनी हरणार आहे हे कळतं, कारण घडून गेलेला इतिहास म्हणून आपल्याला तो ज्ञात असतो. तरीसुद्धा या एकाकी मुलाच्या कथेत आपण गुरफटतो. एका देशामधल्या समूहानं एकाकी पडत जाण्याची (सामाजिक स्थित्यंतरातून आलेली) प्रक्रिया ही एका कोवळ्या मुलाच्या एकाकी पडत जाणाऱ्या आयुष्याशी इतकी तादात्म्य पावते की, त्यातून एक थंडपणा संपूर्ण सिनेमात झिरपत जातो. जो अर्थातच संवेदनशील प्रेक्षक म्हणून त्रासदायक आहेच! पण त्याहूनही जास्त तो विचार करायला लावणारा आहे. कोवळ्या देहांच्या कलेवरांमधून नावाच्या पट्ट्या काढत जाणारा दुसरा किशोरवयीन सैनिक बघत प्रेक्षक आपसूकच अंतर्मुख होतो आणि पडद्यावरील काल्पनिक वास्तवाशी आपली वास्तववादी नाळ आपसूकच जुळली जाते. ‘वेस्टर्न फ्रंटवर काहीच घडत नाही’ असं जरी या चित्रपटाचं नाव असले तरी त्यातल्या पात्रांच्या बाबतीत मात्र खूप काही घडतं, मात्र त्यांना त्यांच्यातील बदल दिसायला आता ते जिवंतच नाहीत. हे समजतंय ना तुम्हाला, असाच प्रश्न जणू हा चित्रपट आपल्याला शेवटाला विचारतो.
शेवटी प्रेक्षक म्हणून आपण थंडपणे आपल्या चुकांकडे बघत अंतर्मुख होतो आणि मनात प्रश्न ठेवून बाहेर पडतो.
हेच तर कुठल्याही कलाकृतीला अपेक्षित असायला हवं, हो ना?
.................................................................................................................................................................
इम वेस्टेन निश्ट्स नॉईयस (२०२२)
भाषा - जर्मन / इंग्रजी वेळ - १४७ मिनिटं, मूळ कादंबरीकार - एरीश मारिया रीमार्क
पटकथा – एडवर्ड बेर्गेर, लेस्ली पॅटरसन, इयान श्टॉकेल, दिग्दर्शक - एडवर्ड बेर्गेर
निर्मिती – माल्टं ग्रुनर्ट, डॅनियल द्रायफुस, एडवर्ड बेर्गेर ब्र्यूह्ल
अभिनय – फेलिक्स कामेरेर, अलब्रेख्त शुख, डॅनियल ब्र्यूह्ल
छायांकन – जेम्स फ्रेंड, संकलन – स्वेन बुडेलमान, संगीत – फॉल्कर बेरटेलमान
नेटफ्लिक्सवर मूळ जर्मन चित्रपट इंग्लिश सबटायटल्ससह किंवा इंग्लिश भाषेत पाहता येईल.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment