सद्यकालीन सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करायचे असेल, तर इतिहास समजून घेणे अत्यंत उपयुक्त ठरते. कारण वर्तमान ही एकाएकी निर्माण झालेली अवस्था नसते; ती भूतकाळातील अनेक घडामोडी, बदल आणि प्रक्रियांचा परिणाम असते. त्यामुळे आजचे वास्तव समजून घेण्यासाठी आणि भविष्यातील संभाव्य दिशेचा अंदाज घेण्यासाठी इतिहासाची मदत घेणे उपयुक्त ठरते.
भूतकाळातील प्रत्येक घटना आणि व्यक्ती त्या-त्या काळाच्या विशिष्ट संदर्भात घडलेली असते. कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे कार्य हे तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि राजकीय परिस्थितीच्या चौकटीतच घडत असते. त्यामुळे अशा व्यक्तींचे मूल्यांकन करताना त्यांच्या काळातील मूल्ये, आदर्श आणि मर्यादा लक्षात घेणे आवश्यक ठरते. आधुनिक मूल्यांच्या कसोटीवर भूतकाळातील व्यक्तिमत्त्वांचे मूल्यमापन करणे अनेकदा दिशाभूल करणारे ठरू शकते.
इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे आपल्या काळाच्या मर्यादा ओलांडून नवीन मूल्यांची स्थापना करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे समाजातील प्रस्थापित चौकटी विस्तारतात, कधी कधी मोडूनही पडतात. तरीही अशा व्यक्तिमत्त्वांनाही आपल्या काळाच्या मर्यादांपासून पूर्णपणे मुक्त होता येत नाही. उदाहरणार्थ, संत कितीही उदारमतवादी असले तरी त्यांच्याकडून आधुनिक अर्थाने सर्वांगीण सामाजिक न्यायाची अपेक्षा करणे योग्य ठरणार नाही. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचे राज्य रयतेच्या हितासाठी होते यात शंका नाही; परंतु त्यांनी आधुनिक लोकशाही पद्धती स्वीकारली नाही, असा आरोप करणेही तितकेच अनैतिहासिक ठरेल. थोडक्यात, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व हे त्यांच्या काळाचेच अपत्य असतात.
इतिहासाचा अभ्यास करताना तत्कालीन परिस्थिती, धर्म, रूढी, परंपरा, सामाजिक मूल्ये आणि त्या चौकटीत घडलेल्या राजकीय व सामाजिक घटनांचा विचार करणे आवश्यक असते. इतिहासातील काही आदर्श आजच्या काळात कालबाह्य वाटू शकतात किंवा चुकीचेही असू शकतात; तरीही त्या व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास करताना केवळ प्रशंसा किंवा निंदा या दोन टोकांच्या भूमिकांवर न राहता विवेकपूर्ण दृष्टी ठेवणे अधिक योग्य ठरते. इतिहासाचा अभ्यास हा भूतकाळाचे आकलन करून वर्तमान अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी आणि भविष्याच्या दिशेचा विचार करण्यासाठी करायचा असतो.
त्यामुळे एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करताना त्या व्यक्तीचे सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरण, तिच्या कार्यांचे संदर्भ, तिच्या विशिष्ट कर्तबगारीची पार्श्वभूमी, तिच्या निर्णयांना आकार देणाऱ्या प्रेरणा आणि त्या काळातील राजकीय वास्तव यांचा विचार करणे आवश्यक ठरते.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
टिपू सुलतान समजून घेण्यापूर्वी
या पार्श्वभूमीवर टिपू सुलतान या व्यक्तिमत्त्वाचा विचार करणे आवश्यक वाटते. टिपू सुलतान हा एक पराक्रमी आणि महत्त्वाकांक्षी शासक होता, यात संशय नाही. तत्कालीन इतर राज्यकर्त्यांप्रमाणेच सत्ता मिळवणे, ती टिकवणे आणि तिचा विस्तार करणे, हे त्याचेही प्रमुख उद्दिष्ट असणे स्वाभाविक होते. मात्र तो भारतातील इस्लामी परंपरेशी संबंधित शासक होता, ही बाबही तितकीच लक्षात घेण्यासारखी आहे. त्यामुळे इस्लामने दिलेल्या प्रेरणांचा प्रभाव त्याच्या विविध निर्णयांवर आणि त्याच्या अनेक कृतींवर पडणे तत्कालीन समाजाच्या दृष्टीने घातक असले तरी स्वाभाविक होते.
इस्लामच्या मूलभूत स्वरूपाचा विचार केल्यास, सहिष्णुता हा गुण त्या धर्माचा अविभाज्य भाग होता, असे म्हणता येत नाही. इस्लाम हाच एकमेव सत्यधर्म आहे अशी त्या धर्माची कल्पना आहे. त्यामुळे इस्लाम हा गैर-इस्लामिक लोकांच्या सहअस्तित्वाला विशिष्ट परिस्थितीतच फक्त मान्यता देतो. त्यामुळे गैरमुस्लिमांचे धर्मांतर करणे, हे इस्लाममध्ये एक धर्मकर्तव्य मानले जाते. म्हणूनच इस्लाम जगात जिथे-जिथे पोहोचला, तिथे तिथे मोठ्या प्रमाणावर धर्मांतरे झाल्याचे इतिहास सांगतो.
इस्लामिक तत्त्वाप्रमाणे मूर्तीपूजेला विरोध करणे हेही इस्लाम धर्मियांचे धर्मकर्तव्य ठरवले गेले होते. बहुसंख्येने हिंदू असलेल्या आपल्या देशात मूर्तीभंजन करणे हे इस्लामिक शासकांसाठी व्यवहार्य नसले तरी त्यांनी अधूनमधून मूर्तीभंजनाचा आपला कार्यक्रम राबवल्याची अनेक उदाहरणे आहेत.
टिपू सुलतान हा राज्यकर्ता असला तरी तो इस्लामचा निष्ठावान अनुयायीदेखील होता. त्यामुळे इस्लामच्या प्रभावाखाली तो आपली बरीच राजकीय धोरणे आणि कृती ठरवत होता, असे अनेक इतिहासकारांचे मत आहे.
टिपू सुलतान हा एक राजकीय शासक असला, तरी त्याच्या वैयक्तिक धार्मिक श्रद्धेचा त्याच्या राजकीय वर्तनावर बऱ्याच प्रमाणात प्रभाव पडल्याचे अनेक इतिहासकारांचे मत आहे. इस्लाममध्ये उम्मत (जागतिक मुस्लीम समुदाय) ही संकल्पना महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे भारतातील काही मुस्लीम शासक आपल्या राज्याला इस्लामी जगतातील प्रतिष्ठित धार्मिक-राजकीय केंद्राशी जोडण्याचा प्रयत्न करीत असत. मुसलमानांचा धार्मिक आणि राजकीय प्रमुख म्हणून मानल्या गेलेल्या खलिफाची मान्यता घेण्याचा सुद्धा टिपू सुलतानने प्रयत्न केला होता. त्यासाठी १७८५ साली त्याने आपले एक प्रतिनिधीमंडळ इस्तंबूल येथे ऑटोमन सुलतान अब्दुल हमीद पहिला यांच्याकडे पाठवले होते. ऑटोमन सुलतानाकडे प्रतिनिधीमंडळ पाठवण्यामागील हेतू स्पष्ट करताना इतिहासकार Kate Brittlebank आपल्या ‘Tiger : The Life of Tipu Sultan’ या पुस्तकात लिहितात- "In approaching the Ottoman Sultan in this way, Tipu was conforming to the practice of earlier Muslim rulers in India, who prior to the ascendancy of the Mughals had themselves turned to the Ottoman Caliph to legitimate their rule."
(“अशा प्रकारे ऑटोमन सुलतानाशी संपर्क साधून टिपू भारतातील पूर्वीच्या काही मुस्लीम शासकांच्या परंपरेचेच अनुसरण करत होता. मुघलांच्या उदयापूर्वी या शासकांनीही आपल्या सत्तेला वैधता मिळवण्यासाठी ऑटोमन खलिफाकडे मान्यता मागितली होती.”)
यावरून हिंदू भारतातील मुस्लीम प्रशासक टिपू सुलतानला मुस्लीम खलिफाची मान्यता घेण्याची गरज पडत होती, हे स्पष्ट आहे.
इस्लामी प्रतीकांचा वापर
टिपू सुलतान बहुसंख्य हिंदू लोकसंख्या असलेल्या प्रदेशावर राज्य करत होता. तरीही त्याच्या राज्यकारभारात त्याने इस्लामी परंपरा आणि प्रतीकांचा बऱ्याच प्रमाणात वापर केल्याचे आढळते. त्याच्या पत्रव्यवहारातून तो स्वतःला इस्लामी शासक म्हणून पाहत असल्याचे संकेत मिळतात. काही फारसी पत्रांमध्ये इस्लामच्या संरक्षणाचा किंवा प्रसाराचा उल्लेख आढळतो. उदाहरणार्थ, कोडगू प्रदेशातील मोहिमांच्या संदर्भात त्याने तेथील लोकांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडल्याचे किंवा इस्लामचा प्रसार करणे हे आपले कर्तव्य असल्याचे विधान केल्याचे काही इतिहासकार नमूद करतात.
टिपूने स्वतःला इस्लामशी जोडून घेण्याचा प्रयत्न आपल्या पदव्या आणि राजकीय भाषाशैलीतही केला. काही पत्रांमध्ये तो स्वतःला ‘खुदादाद सरकारचा रक्षक’ (म्हणजे ईश्वरकृपेने प्राप्त झालेल्या राज्याचा संरक्षक), ‘इस्लामचा सेवक’ किंवा धर्माच्या शत्रूंविरुद्ध लढणारा शासक अशा शब्दांत संबोधतो. त्याच्या काही पत्रांमध्ये मलबार प्रदेशातील मोहिमांदरम्यान अनेक लोक इस्लाममध्ये आणल्याचा उल्लेख आढळतो, असेही काही स्रोत सांगतात.
मलबार आणि कूर्ग मोहिमांदरम्यान धर्मांतराच्या घटना घडल्याचे उल्लेख काही समकालीन तसेच नंतरच्या स्रोतांत आढळतात. याशिवाय काही ब्रिटिश आणि स्थानिक स्रोतांमध्ये त्या काळात काही हिंदू मंदिरे आणि ख्रिश्चन चर्च यांचे नुकसान झाल्याचेही नमूद केलेले आहे. तथापि या घटनांचे स्वरूप, प्रमाण आणि त्यामागील उद्देश याबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत.
टिपूने आपल्या शासनव्यवस्थेत काही इस्लामी प्रतीकांचा वापर संस्थात्मक पातळीवरही केला. त्याने काही फारसी-इस्लामी पदव्या स्वीकारल्या. तसेच पारंपरिक हिजरी कालगणनेऐवजी त्याने मौलूदी कालगणना (Mauludi calendar) सुरू केली, जी पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मावर आधारित होती. त्याच्या नाण्यांवरही अल्लाहचा उल्लेख किंवा इस्लामशी संबंधित धार्मिक संदर्भ आढळतात.
काही इतिहासकारांच्या मते त्याच्या कारकिर्दीत काही शहरांची नावे बदलण्याचा प्रयत्नही झाला. उदाहरणार्थ, मंगळूरला ‘जलीलाबाद’ आणि कालीकटला ‘इस्लामाबाद’ अशी नावे देण्याचे उल्लेख काही ऐतिहासिक स्रोतांत आढळतात. तथापि या नामांतरांचे स्वरूप आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर किती काळ झाला, याबाबत इतिहासकारांमध्ये एकमत नाही.
आपण इस्लामचे कट्टर अनुयायी असल्याचे सिद्ध करण्यासाठी बऱ्याच मुस्लीम शासकांनी हिंदूंच्या देवळांचा विध्वंस केल्याचे पुरावे इतिहासात आढळतात. टिपूनेदेखील काही प्रसंगी देवळांचा नाश केला आहे किंवा त्यांची लूटमार केली आहे, असे काही इतिहासाचे स्रोत सांगतात.
मलबार गॅझेटियर / मलबार मॅन्युअल या साधनांनुसार टिपूने त्रिक्कावू मंदिर (पोन्नानी), थळी मंदिर (कोझिकोड), पोन्मेरी मंदिर (बडागरा) या मंदिरांचा विध्वंस किंवा लूटमार केल्याचे उल्लेख आहेत. मार्क विल्क्स याच्यानुसार टिपूने कूर्ग (कोडागू) प्रदेशातील ओंकारेश्वर मंदिर परिसर उदध्वस्त केला होता. तसेच टिपूच्या सैन्याकडून हरिहरेश्वर मंदिर (हरिहर) देखील लुटल्या गेले होते, असे मैसूर गॅझेटियरनुसार दिसून येते.
धर्मांतराच्या संदर्भातील वाद
टिपू सुलतानच्या कारकिर्दीतील सर्वाधिक वादग्रस्त मुद्द्यांपैकी एक म्हणजे धर्मांतराचा प्रश्न होय. काही इतिहासकारांच्या मते, मलबार (केरळ) आणि कूर्ग (कर्नाटक) या प्रदेशांमध्ये त्याच्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणावर सक्तीने धर्मांतरे घडवून आणली गेली. या संदर्भातील उल्लेख त्याच्या स्वतःच्या पत्रव्यवहारात आणि काही समकालीन ऐतिहासिक स्त्रोतांमध्ये आढळतात. मात्र, या घटनांचे नेमके स्वरूप, प्रमाण आणि त्यामागील उद्देश यांबाबत इतिहासकारांमध्ये आजही मतभेद आहेत. त्यामुळे या विषयाचा स्वतंत्रपणे आणि तपशीलवार विचार करणे आवश्यक ठरते.
विल्यम किर्कपॅट्रिक यांनी संकलित केलेल्या ‘Select Letters of Tippoo Sultan to Various Public Functionaries’ (१८११) या पुस्तकातील टिपू सुलतानच्या विविध पत्रांच्या आधारे त्याच्या धार्मिक धोरणाचा पुढीलप्रमाणे आढावा घेण्यात आलेला आहे.
टिपू सुलतानने १७ सप्टेंबर १७८५ रोजी लिहिलेल्या पत्र क्रमांक CXVIIमध्ये मीर झैन-उल-आबिदीन (Mir Zain-ul-Abidin) याला उद्देशून पुढील आदेश दिले होते- “अलीकडे आम्हाला कळविण्यात आले आहे की, कूर्ग लोकांनी झफराबाद (Zafarabad - मडिकेरीचे तत्कालीन नाव) येथे काही अतिरेक केले आहेत... सहकार्याने तुम्ही कूर्ग लोकांवर सर्वसाधारण हल्ला करावा आणि त्यांच्यातील सर्वांना ठार मारावे किंवा कैद करावे. तसेच, ठार मारलेले आणि कैद केलेले अशा दोघांनाही मुसलमान बनवावे.”
या पत्रातून धर्मांतराबरोबरच गैर-इस्लामी हिंदूंच्या कत्तलीचा संदर्भदेखील प्राप्त होतो.
मलबार किनारा आणि मैसूरचे राज्य यांच्यामधील मोक्याचे ठिकाण असलेल्या कूर्गवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी टिपूने या प्रांतावर अनेक हल्ले केले होते. १७९१ मध्ये टिपूने या प्रांतावर केलेल्या हल्ल्याचा तपशील ५ जानेवारी १७९२च्या पत्र क्रमांक CXCVIमध्ये पुढीलप्रमाणे दिला आहे- “ही परिस्थिती समजताच आम्ही अत्यंत वेगाने पुढे सरसावलो आणि एकाच वेळी चाळीस हजार संधीसाधू व बंडखोर कूर्ग लोकांना बंदी बनवले... त्यानंतर त्यांना त्यांच्या मातृभूमीतून दूर नेऊन आम्ही त्यांना इस्लामचा सन्मान दिला आणि त्यांना आमच्या 'अहमदी' (Ahmadi) दलात समाविष्ट करून घेतले.”
टिपू सुलतानच्या या पत्रात त्याने चाळीस हजार कूर्ग लोकांना धर्मांतरित केल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. तसेच, मीर मुईनुद्दीन (Mir Muin-ud-din) यास ८ जानेवारी १७८६ रोजी लिहिलेल्या पत्र क्रमांक CCIIमध्ये त्याने ईश्वर आणि पैगंबर यांचे आभार मानून कूर्ग टोळीतील पन्नास हजार स्त्री-पुरुषांना बंदी बनवण्यात आल्याचे आणि त्यांना ‘अहमदी’ वर्गात सामील करून घेतल्याचे नमूद केले आहे. या पत्रात टिपूने इस्लामवरील श्रद्धा व्यक्त करताना आपल्या कर्तबगारीच्या बढाया मारल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही; परंतु त्याने मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले असण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही.
दुसऱ्या आंग्ल-मैसूर युद्धानंतर (मंगलोरचा तह, १७८४) टिपू सुलतानने मलबारमध्ये आपली सत्ता मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी नायर लोकांनी अनेकदा स्थानिक उठाव केले होते. हे उठाव दडपण्याचा टिपू सुलतानने सातत्याने प्रयत्न केला. बद्र-उझ-झमान खान (Badr-uz-Zaman Khan) याने केलेल्या अशाच एका कार्यवाहीचे कौतुक करून टिपू सुलतानने त्याला १३ फेब्रुवारी १७८६च्या पत्र क्रमांक CCXXIVमध्ये पुढील आदेश दिले होते- “तुमची दोन पत्रे आणि त्यासोबत जोडलेली नायर (Nair) कैद्यांची टिपणे प्राप्त झाली आहेत. त्यांपैकी १३५ जणांचे सुंता करण्याचे तुम्ही जे पाऊल उचलले, ते योग्यच होते. त्यांतील सर्वांत तरुण असलेल्या ११ जणांना ‘असद इलाही’ (Asad-i-Ilahi) तुकडीत आणि उर्वरित ९४ जणांना ‘अहमदी’ (Ahmadi) दलात समाविष्ट करून, या सर्वांना एकाच वेळी नगर (Nagar - बेडनूर) येथील किल्लेदाराच्या स्वाधीन केल्याचे समजले”
एशियाटिक ॲन्युअल रजिस्टर'मध्ये टिपू सुलतानच्या एका पत्राचा संदर्भ दिला जातो. LETTER XXVII असा या पत्राचा क्रमांक उल्लेखित केलेला आहे, परंतु या पत्राचा मूळ दस्तऐवज उपलब्ध नाही. त्यामुळे इतिहासकार या पत्राच्या सत्यतेवर शंका घेतात. बद्र-उझ-झमान खान यास लिहिलेल्या या पत्रात टिपू सुलतानने खालील गोष्टींचा उल्लेख केला आहे-
१. मलबार प्रांतातील काफिरांच्या प्रदेशावर विजय मिळवलेला असून, देवाच्या कृपेने चार लाख काफिर मुसलमान बनवले गेले आहेत.
२. यानंतर त्रावणकोरचा राजा राम वर्मा (Rama Varma - ज्यांना ‘धर्म राजा’ म्हणून ओळखले जाते) याच्याविरुद्ध मोहीम हाती घेण्याचा आणि त्या काफिर वंशाचा संपूर्ण नाश करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
३. तो (टिपू) पुढे म्हणतो की, 'धार्मिक बाबी आणि काफिरांच्या विरुद्ध युद्ध (जिहाद) करण्याला तो इतर सर्व गोष्टींपेक्षा अधिक महत्त्वाचे मानतो आणि त्यामुळे त्याने श्रीरंगपट्टणमला परतणे पुढे ढकलले आहे.
टिपूच्या हिंदूंवरील अत्याचाराची माहिती 'स्कॉट मॅगझिन' (Volume 62, published in 1800)मध्येसुद्धा उद्धृत केलेली आढळते. या माहितीनुसार, टिपूने आपल्या अधिकाऱ्यांना काही आदेश दिले होते. त्या आदेशानुसार-
१. ५०० कूर्ग (Coorg / Kodagu) कैदी पकडले गेले होते. त्यांना ५०-५०च्या गटांत दहा किल्ल्यांमध्ये ठेवण्याचे सांगण्यात आले.
२. त्या कैद्यांना अशी वागणूक द्यावी की, २०-३० दिवसांत त्यांचा मृत्यू व्हावा.
३. तरुण स्त्रिया मुसलमानांना द्याव्यात, तर उरलेल्या स्त्रिया व मुलांना श्रीरंगपट्टण येथे कैदेत ठेवावे.
मार्क विल्क्स या ब्रिटिश अधिकाऱ्याने ‘Historical Sketches of the South of India’ (खंड २, लंडन १८१०, मैसूर आवृत्ती १९३२) या ग्रंथात टिपूविषयी बरीच माहिती संकलित केली आहे. त्यानेही टिपू सुलतानने गैर-मुस्लीम लोकांवर अत्याचार करून त्यांचे धर्मांतर घडवून आणल्याची माहिती दिली आहे. त्याच्या माहितीनुसार- “टिपूने जंगलांमध्ये अशा प्रकारे शोधमोहीम राबवली की, जणू काही शिकारीला हुसकावून लावत आहेत. अशा रीतीने त्यांनी सुमारे ७०,००० पुरुष व स्त्रिया अशा मोठ्या लोकसमूहाला वेढ्यात पकडले आणि गुरांच्या कळपासारखे त्यांना हाकलत श्रीरंगपट्टण येथे नेले, जिथे सुलतानाच्या धमक्या अत्यंत कठोरपणे अमलात आणल्या गेल्या.”
वरील सर्व प्राथमिक आणि दुय्यम स्रोतांवरून असे दिसून येते की, टिपू सुलतानने गैर-इस्लामी लोकांचा छळ करून त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले होते. परंतु जेव्हा आपण या माहितीची सखोल चिकित्सा करू लागतो, तेव्हा त्यातील अर्धसत्य आणि ऐतिहासिक अतिशयोक्ती आपल्या लक्षात येऊ लागते.
टिपूला धर्मांध ठरवणाऱ्या माहितीचे परीक्षण
टिपू सुलतानाला धर्मांध शासक म्हणून चित्रित करणाऱ्या विविध ऐतिहासिक कथनांचे परीक्षण केले असता काही महत्त्वाच्या बाबी लक्षात येतात. या संदर्भातील स्रोतांचा अभ्यास केला असता असे दिसून येते की, टिपूविषयी उपलब्ध असलेल्या माहितीमध्ये अनेकदा परस्परविरोधी दावे आढळतात. त्यामुळे त्या माहितीचे ऐतिहासिक पद्धतीने परीक्षण करणे आवश्यक ठरते.
टिपूविषयीची माहिती देणाऱ्या प्रमुख स्रोतांमध्ये विल्यम किर्कपॅट्रिक यांनी संपादित केलेला ‘Select Letters of Tipu Sultan’ हा ग्रंथ, तसेच ‘Scots Magazine, Asiatic Annual Register’ आणि ‘Historical Sketches of the South of India’ (खंड २) यांसारखे ग्रंथ महत्त्वाचे मानले जातात. या स्रोतांमधील माहितीचा परस्पर तुलनात्मक विचार केला असता काही विसंगती जाणवतात. ‘Select Letters of Tipu Sultan’ हा ग्रंथ टिपूच्या पत्रांचा संग्रह असल्यामुळे तो प्राथमिक स्रोत म्हणून अधिक महत्त्वाचा मानला जातो. तथापि, या पत्रांचे स्वरूप लक्षात घेतले असता टिपूने स्वतःला इस्लामचा निष्ठावान समर्थक म्हणून दाखवण्यासाठी काही ठिकाणी बढाया मारल्या असण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. तरीही या पत्रांना टिपूविषयीची समकालीन माहिती देणारे सर्वाधिक महत्त्वाचे साधन मानले जाते.
याउलट, ‘Scots Magazine’, ‘Asiatic Annual Register’ किंवा ‘Historical Sketches of the South of India’ यांसारख्या ग्रंथांमध्ये टिपूच्या अत्याचारांचे अतिरंजित वर्णन आढळते, असे काही इतिहासकारांचे मत आहे. टिपूचे ब्रिटिश सत्तेशी असलेले तीव्र शत्रुत्व लक्षात घेतले असता, ब्रिटिश लेखकांनी त्याचे नकारात्मक चित्र अधिक ठळकपणे मांडले असण्याची शक्यता विचारात घ्यावी लागते. म्हणूनच इतिहासकार साधारणतः प्राथमिक स्रोतांना अधिक महत्त्व देण्याची भूमिका स्वीकारतात.
टिपूच्या पत्रांचा विचार केला असता असे दिसून येते की, धर्मांतराच्या घटना मुख्यतः कुर्ग (कोडागू) आणि मलबार या प्रदेशांमध्ये घडल्या. हे दोन्ही प्रदेश टिपूच्या दृष्टीने बंडखोर किंवा शत्रुत्वाची भूमिका घेणारे प्रदेश होते. टिपूच्या मूळ राज्याच्या इतर भागांमध्ये अशा प्रकारच्या व्यापक धर्मांतरांच्या घटना क्वचितच आढळतात. या पार्श्वभूमीवर काही इतिहासकारांचे असे मत आहे की, टिपू सुलतानने धर्मांतराचा वापर हा धार्मिक विस्ताराच्या हेतूने नव्हे, तर बंडखोर प्रदेशांवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी राजकीय साधन म्हणून केला असावा.
इतिहासकार मोहिब्बुल हसन यांनी ‘History of Tipu Sultan’ (2005) या ग्रंथात या संदर्भात पुढील निरीक्षण नोंदवले आहे- “We should also remember that, except for Coorg and Malabar, Tipu did not adopt the policy of proselytisation in other parts of his kingdom, for the rebellions there were few and far between.”
यावरून असे दिसून येते की, धर्मांतराच्या घटना विशिष्ट राजकीय परिस्थितीशी संबंधित असाव्यात.
टिपूच्या पत्रांमध्ये धर्मांतराच्या आणि बंदींच्या संदर्भात दिलेली आकडेवारी आणि इतर दुय्यम स्रोतांमध्ये दिलेली आकडेवारी यांची तुलना केली असता त्यांच्यामध्ये लक्षणीय फरक दिसून येतो. काही वेळा असेही सुचवले जाते की, इस्लामचा कट्टर अनुयायी असल्याची प्रतिमा निर्माण करण्यासाठी टिपूने आपल्या पत्रांमध्ये प्रत्यक्षात झालेल्या धर्मांतरांच्या संख्येपेक्षा जास्त आकडे दिले असण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा, त्याच्या पत्रांमध्ये दिलेली संख्या अनेक दुय्यम स्रोतांमध्ये दिलेल्या संख्येपेक्षा कमीच असल्याचे आढळते.
उदाहरणार्थ, टिपूच्या स्वतःच्या पत्रांमध्ये कुर्ग प्रदेशात सुमारे ४० ते ५० हजार हिंदूंचे धर्मांतर केल्याचा उल्लेख येतो. परंतु ‘Asiatic Annual Register’ किंवा ‘Historical Sketches of the South of India’यांसारख्या ग्रंथांमध्ये ही संख्या कुर्गमध्ये ७० हजार आणि मलबारमध्ये चार लाख इतकी असल्याचे नमूद केलेले दिसते.
लोकसंख्येच्या ऐतिहासिक अंदाजांचा विचार केला असता या आकड्यांवर प्रश्न उपस्थित होतात. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात कुर्ग प्रदेशाची एकूण लोकसंख्या सुमारे एक लाखाच्या आसपास असल्याचे इतिहासकार सुचवतात. या पार्श्वभूमीवर ७० हजार लोकांचे धर्मांतर झाले, असे गृहित धरल्यास जवळपास संपूर्ण कोडावा समाजाचे धर्मांतर झाले असे मानावे लागेल. परंतु कुर्गच्या आजच्या लोकसंख्येची रचना पाहता असा निष्कर्ष वस्तुस्थितीशी सुसंगत वाटत नाही.
त्याचप्रमाणे ‘Asiatic Annual Register’मध्ये मलबार प्रदेशात चार लाख हिंदूंचे धर्मांतर झाल्याचा उल्लेख आढळतो. तथापि, त्या काळात मलबारची एकूण लोकसंख्या सुमारे दहा ते बारा लाखांच्या दरम्यान असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. जर त्यापैकी चार लाख लोकांनी इस्लाम स्वीकारला असता, तर त्या प्रदेशाच्या नंतरच्या लोकसंख्यात्मक रचनेवर त्याचा स्पष्ट परिणाम दिसून आला असता. परंतु सध्याच्या लोकसंख्येच्या संरचनेवरून अशा दाव्यांची पुष्टी होत नाही.
या संदर्भात आणखी एक ऐतिहासिक घटक लक्षात घेणे आवश्यक आहे. चौथ्या अँग्लो–मैसूर युद्धानंतर ब्रिटिशांनी टिपूचे राज्य हस्तगत केले. कोणत्याही नवीन सत्तेला नव्याने बळकावलेल्या राज्यात आपली सत्ता स्थिर करण्याची गरज असते. त्यासाठी अशी नवीन सत्ता त्या राज्यातील लोकांचे समर्थन मिळवणे आणि त्यांच्यापुढे आपल्या सत्तेची वैधता सिद्ध करणे यासाठी प्रयत्न करत असते. हे साध्य करण्यासाठी पूर्वीच्या सत्ताधीशाचे नकारात्मक चित्र निर्माण करणे, ही एक परिचित राजकीय रणनीती मानली जाते. या पार्श्वभूमीवर ब्रिटिश लेखकांनी टिपूच्या कारभाराचे वर्णन अधिक तीव्र आणि नकारात्मक पद्धतीने केले असण्याची शक्यता विचारात घेतली जाणे आवश्यक आहे.
काही ब्रिटिश स्रोतांमध्ये टिपूने धर्मांतरांबरोबरच गैर-मुस्लीम लोकांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केल्याचे चित्रण केलेले दिसते. अलीकडेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतानने ७५,००० आणि ३५,००० हिंदूंच्या कत्तली केल्या होत्या, असे विधान केले होते. या विधानानंतर टिपूच्या काळातील कथित कत्तलींच्या आकडेवारीबाबत सार्वजनिक चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली.
त्याशिवाय कोडावा समाजात प्रचलित असलेल्या एका लोकपरंपरेनुसार टिपू सुलतानच्या सैन्याने कुर्गमधील उठाव दडपण्यासाठी अनेक कोडावा पुरुषांना पकडून देवटीपरंबू येथे एकत्र आणले. काही कथनांनुसार या लोकांची सामूहिक हत्या करण्यात आली, तर काही परंपरांमध्ये काहींना ठार मारण्यात आले आणि उर्वरितांना कैद करून श्रीरंगपट्टणम येथे नेण्यात आले, असे सांगितले जाते. तथापि, या घटनेचा स्पष्ट उल्लेख समकालीन लिखित स्रोतांमध्ये आढळत नाही. त्यामुळे या कथनांकडे मुख्यतः स्थानिक लोकपरंपरेच्या स्वरूपात पाहिले जाते.
टिपूच्या पत्रांचा आणि इतर उपलब्ध स्रोतांचा विचार केला असता असे दिसून येते की, त्याने बंडखोर प्रदेशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकांना बंदी बनवणे किंवा त्यांचे धर्मांतर करणे या उपायांचा वापर केला असावा. परंतु हिंदू समाजाची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली असल्याचे सिद्ध करणारे विश्वसनीय समकालीन पुरावे तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेख केलेली आकडेवारी दुय्यम स्रोतांमधील असून कैद केलेल्या किंवा धर्मांतरित लोकांच्या संख्येशी संबंधित असण्याची शक्यता काही इतिहासकार व्यक्त करतात. ती आकडेवारी संपूर्णपणे टिपू सुलतानने केलेल्या कत्तलीची असल्याचे इतिहास सांगत नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
शत्रूंच्या राज्यात काढलेल्या मोहिमांच्या वेळी शत्रूंवर दहशत निर्माण करण्यासाठी टिपूने तेथील देवळांचाही विध्वंस आणि लूट केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु ते त्याचे सर्वकालिक धोरण होते, असे म्हणता येत नाही. त्याच्या मूळ राज्यात त्याने हिंदू देवालयांना संरक्षणच दिले असण्याची शक्यता व्यक्त करता येते. त्यासाठी पुढील उदाहरणे उपयुक्त ठरतील.
बेंगलोर इंटरनॅशनल पोर्टजवळ देवनहळली नावाचे गाव आहे. तिथे टिपू सुलतानचा जन्म झालेला होता. त्याच्या जन्मस्थळाच्या समोर टिपू सुलतानचा फोर्ट असून त्यामध्ये गणेश, लक्ष्मीनारायण आणि हनुमान यांची देवळे आहेत. टिपूच्या काळापासून आतापर्यंत ती टिकून आहेत आणि तिथे आजही पूजाअर्चा होत असते. बेंगलोरच्या मध्यभागी टिपू सुलतानाचा समर पॅलेस हा राजवाडा आहे. त्याच्या जवळ कोट्टया व्यंकट रमण मंदिर आहे. आणि ते मंदिर आजही व्यवस्थितरित्या टिकून आहे. टिपू सुलतान जर मूर्तीभंजक असता, तर त्याच्या सानिध्यात असणारी वरील मंदिरे टिकली असती काय, याचा विचार केला पाहिजे.
कथित धार्मिक सहिष्णु धोरण
एका बाजूला टिपू सुलतानने हिंदू समाजावर केलेल्या कथित छळ, धर्मांतरे आणि दडपशाही यांची चर्चा इतिहासात आढळते; परंतु त्याच वेळी त्याच्या धार्मिक सहिष्णुतेविषयीची उदाहरणेही अनेक ऐतिहासिक स्रोतांमध्ये नोंदलेली दिसतात. या परस्परविरोधी स्वरूपाच्या पुराव्यांमुळे टिपूच्या धार्मिक धोरणाचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे वाटते. काही ऐतिहासिक पुराव्यांवरून असे दिसून येते की, आपल्या राज्यातील हिंदू समाजाशी त्याने अनेक प्रसंगी सलोख्याचे संबंध राखले होते. या पार्श्वभूमीवर टिपू सुलतानच्या सहिष्णु म्हणवल्या जाणाऱ्या धोरणांचा आढावा घेणे आवश्यक ठरते.
टिपू सुलतानच्या हिंदूविरोधी प्रतिमेवरच केवळ विश्वास ठेवला, तर त्याने आपल्या राज्यात व्यापक धार्मिक दडपशाही केली होती, असे वाटू शकते. तथापि, ही प्रतिमा पूर्णपणे वास्तवाशी सुसंगत नाही, असे सूचित करणारी अनेक उदाहरणे इतिहासात नोंदलेली आढळतात.
मराठ्यांच्या सैन्यातील एका गटाने—बहुधा पेंढाऱ्यांनी—शृंगेरीच्या शंकराचार्यांच्या मठावर हल्ला करून त्याची लूट केल्याची घटना प्रसिद्ध आहे. या घटनेनंतर शृंगेरीच्या शंकराचार्यांनी टिपू सुलतानाला पत्र लिहून घडलेली हानी कळवली होती. त्यानंतर टिपूने मठाच्या व्यवस्थेसाठी आर्थिक मदत केल्याचा स्पष्ट उल्लेख ऐतिहासिक साधनांमध्ये आढळतो. मराठ्यांच्या हल्ल्यानंतर शृंगेरी मठाला सुमारे २०० रहाटी रोख मदत देण्याचा आदेश त्याने दिला होता.
ए. के. शास्त्री यांनी संपादित केलेल्या ‘Records of Sringeri Matha’ (2009) या ग्रंथात या संदर्भातील पत्रव्यवहाराचा उल्लेख आढळतो. शृंगेरी मठाच्या लुटीबद्दल कळल्यानंतर टिपू सुलतानने शंकराचार्यांना उद्देशून एक पत्र लिहिले होते. ए. के. शास्त्री यांनी सदर पत्रातील टिपू सुलतानचे पुढील विधान उद्धृत केले आहे-
टिपू लिहितो, “People who sin against such a holy place will at no distant date suffer the consequences of their misdeeds. People do evil smiling, but will suffer the penalty in torments of agony.’”
ए. के. शास्त्री पुढे असेही नमूद करतात की, शृंगेरीचे गुरु प्रवासावर असताना त्यांच्या सुरक्षित प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी तसेच त्यांच्या ताफ्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांची उपलब्धता करून देण्यासाठी टिपूने विशेष काळजी घेतली होती.
ए. के. शास्त्री यांच्या मते या पत्रव्यवहारावरून टिपू सुलतान आणि शृंगेरीच्या शंकराचार्यांमध्ये दीर्घकाळ सलोख्याचे संबंध टिकून होते, असे दिसून येते. काही विद्वानांनी हे संबंध राजकीय हेतूंमुळे होते असे सुचविले असले तरी शास्त्री यांचे मत असे आहे की या संबंधांमध्ये टिपूच्या वैयक्तिक श्रद्धेचा आणि आध्यात्मिक भावनेचाही काही अंश होता.
शृंगेरीच्या पिठाच्या https://www.sringeri.net या संकेतस्थळावरील माहितीवरूनदेखील वरील ऐतिहासिक नोंदींना पुष्टीच मिळते.
याशिवाय टिपू सुलतानाने इतरही अनेक हिंदू मंदिरांना दान दिल्याचे उल्लेख आहेत. हिंदू मंदिरांविषयी माहिती देणाऱ्या https://www.onlinedarshan.com या संकेतस्थळावर सुलतानाने श्रीरंगपट्टणम येथील मंदिराला काही भांडी दान दिल्याचे उल्लेख आहेत. सदर संकेतस्थळावरील संबंधित नोंद पुढीलप्रमाणे आढळून येते.
“Tipu Sultan donated to the Srirangapattana temple three silver vessels, and these carry inscriptions to this effect.”
मेलकोटे येथील मंदिर आणि नंजुंडेश्वर मंदिरालाही टिपूने दान दिल्याच्या नोंदी उपलब्ध आहेत. या मंदिरांच्या नोंदींमध्ये आजही टिपूने दिलेल्या काही मौल्यवान भांड्यांचा आणि दागिन्यांचा उल्लेख आढळतो.
इतिहास अभ्यासिका जे. जेमी मर्लिन राणी यांनी ‘IOSR Journal of Humanities and Social Science’च्या एप्रिल २०१८च्या अंकात प्रकाशित झालेल्या लेखात टिपू सुलतानच्या धार्मिक धोरणाचे विश्लेषण केले आहे. त्यांच्या मते टिपू सुलतान आपल्या राज्यातील मुस्लीम आणि हिंदू या दोन्ही समुदायांच्या कल्याणाची काळजी घेत होता. त्यांनी टिपूच्या एका आदेशाचा उल्लेख केला आहे. त्या आदेशानुसार १७९०–९१मध्ये त्याने आपल्या अधिकाऱ्यांना मंदिरांमधील देवपूजा, दीपप्रज्वलन आणि देणग्यांची व्यवस्था व्यवस्थित पार पाडली जावी, अशा सूचना दिल्या होत्या. या आदेशावरून तो मंदिरांच्या व्यवस्थापनातदेखील काही प्रमाणात रस घेत होता, असे दिसून येते.
टिपू सुलतानच्या प्रशासनात अनेक हिंदू अधिकारी उच्च पदांवर कार्यरत होते. शामा अय्यंगार हे दफ्तर, महसूल आणि पत्रव्यवहाराशी संबंधित महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणारे अधिकारी होते. कृष्णराव हे राज्याच्या खजिना आणि महसूल व्यवस्थापनाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी होते. पूर्णैय्या हेदेखील प्रशासनातील महत्त्वाचे अधिकारी होते. याशिवाय टिपूने अप्पाजी राम आणि श्रीनिवास राव यांना पेशव्यांच्या दरबारात राजनैतिक वाटाघाटीसाठी प्रतिनिधी म्हणून पाठवले होते.
या उदाहरणांवरून टिपूच्या प्रशासनात हिंदू अधिकाऱ्यांना महत्त्वाचे स्थान होते, हे स्पष्ट होते. या परिस्थितीवरून असे सूचित होते की प्रशासनिक कारभारात धार्मिक भेदाभेद हा एकमेव निकष नव्हता. तो धर्मांध असता तर राज्यकारभारात हिंदूंना महत्त्वाची जबाबदारी देणे अवघड ठरले असते.
टिपू सुलतान खरोखर कसा होता?
धार्मिक बाबतीत टिपूने घेतलेल्या वेगवेगळ्या आणि परस्परविरोधी भूमिका व त्यानुसार त्याने केलेल्या कृतींमुळे, तो एकाच वेळी कट्टर मुस्लीम शासक असण्याबरोबरच धार्मिकदृष्ट्या सहिष्णू असल्याचेही जाणवत राहते.
टिपू सुलतान हा प्रामुख्याने मुस्लीम धर्माचा एकनिष्ठ अनुयायी होता. त्याला त्याच्या धर्माचा प्रचंड अभिमान होता आणि त्याला आपल्या धर्माप्रती असलेली निष्ठा प्रदर्शित करण्याची इच्छादेखील होती. त्याने बंडखोर प्रदेशातील हिंदू आणि ख्रिश्चन लोकांवर अत्याचार करून त्यांचे धर्मांतरदेखील केले. तथापि, त्याच्या राज्याची बहुसंख्य प्रजा हिंदू होती आणि त्याला आपल्या धर्मापेक्षा भिन्न असलेल्या या हिंदू प्रजेवर राज्य करायचे होते. कोणत्याही शासकाला आपल्या परधर्मीय प्रजेवर सतत जुलूम-जबरदस्ती करून यशस्वीपणे राज्य करता येत नसते.
त्याच्या हिंदू प्रजेच्या स्वतःच्या धार्मिक धारणा, संस्कार, जीवनदृष्टी आणि परंपरा होत्या. या धार्मिक बाबींनी त्यांचे संपूर्ण जीवन व्यापलेले होते. त्यामुळे हिंदूंना त्यांच्या धर्मापासून वेगळे करणे सोपे नव्हते. म्हणूनच अशा धार्मिक समाजाचे व्यापक स्तरावर धर्मांतर करणे शक्य नसते, ही वस्तुस्थिती टिपू सुलतानला माहीत होती. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, त्याच्या राज्याला हिंदूंचा पाठिंबा आणि वैधता मिळवणे त्याच्यासाठी आवश्यक होते. म्हणूनच, मुस्लीम असूनही हिंदूंशी सलोख्याचे संबंध ठेवणे त्याला भाग होते. त्याने शृंगेरीच्या शंकराचार्यांशी आपले संबंध शेवटपर्यंत कायम राखले, याचे कारण हेच होते. आपल्या धोरणांचा एक भाग म्हणून त्याने अनेक हिंदू मंदिरांना देणग्या दिल्या होत्या, ज्याचे पुरावे आजही उपलब्ध आहेत. त्याचे अनेक अधिकारी हिंदू असण्यातही त्याला काही अस्वाभाविक वाटले नाही.
टिपू सुलतानच्या एकंदर राजकीय आणि धार्मिक धोरणांचा विचार केल्यास, तो हिंदू प्रजेवर राज्य करणारा एक व्यवहारवादी मुस्लीम शासक होता, असे म्हणता येते. त्यामुळे, मुस्लीम असूनही हिंदूंवर राज्य करताना त्याने हिंदू प्रजेच्या संदर्भात व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारला होता. म्हणूनच, जे. जेमी मर्लिन राणी यांनी टिपूच्या धोरणाचे समर्पक शब्दात वर्णन केले आहे. त्या म्हणतात- “Tipu Sultan As a devout Muslim ruler in a largely Hindu land (Mysore), Tipu Sultan‟s religious legacy has now become a source of religious and historical controversy. It is not surprising that Tipu Sultan faced problems in establishing the legitimacy of his rule. He was torn between reconciling his desire to be seen as a devout Islamic ruler and the need to be pragmatic.”
(“म्हैसूरसारख्या प्रामुख्याने हिंदू बहुल प्रदेशात एक निष्ठावान मुस्लीम शासक म्हणून राज्य करणाऱ्या टिपू सुलतानचा धार्मिक वारसा आता धार्मिक आणि ऐतिहासिक वादाचा विषय बनला आहे. टिपू सुलतानला आपल्या सत्तेची वैधता प्रस्थापित करताना अडचणींचा सामना करावा लागला, यात आश्चर्य नाही. एक निष्ठावान इस्लामिक शासक म्हणून दिसण्याची इच्छा आणि व्यावहारिक असण्याची गरज, या दोन टोकांच्या विचारांमध्ये तो विभागला गेला होता.”)
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
समारोप
उपलब्ध ऐतिहासिक पुरावे आणि विविध स्रोतांचा तुलनात्मक विचार केला असता टिपू सुलतानची प्रतिमा एकरेषीय स्वरूपात मांडणे कठीण ठरते. काही प्रसंगी त्याने बंडखोर प्रदेशांमध्ये गैरइस्लामिक लोकांच्या विरुद्ध कठोर उपाययोजना केल्या, तर दुसरीकडे आपल्या राज्यातील हिंदू धार्मिक संस्थांशी सलोख्याचे संबंध राखले. त्याचप्रमाणे आपल्या प्रशासनातसुद्धा हिंदूंना महत्त्वाचे स्थान दिले. या परस्परविरोधी वाटणाऱ्या उदाहरणांवरून असे सूचित होते की, त्याचे धार्मिक धोरण केवळ कट्टरतेवर आधारित नव्हते, तर त्यामध्ये राजकीय व्यवहार्यता आणि सत्तेची वैधता टिकवून ठेवण्याची गरजही महत्त्वाची होती. म्हणूनच टिपू सुलतानचे मूल्यमापन करताना त्याला केवळ धर्मांध, अत्याचारी किंवा पूर्णपणे सहिष्णु शासक अशा कोणत्याही एका चौकटीत बसवता येत नाही. त्याऐवजी त्या काळातील राजकीय परिस्थिती, सामाजिक वास्तव आणि त्याच्या वैयक्तिक धार्मिक श्रद्धा या सर्व घटकांचा विचार करून त्याच्या बाबतीत अधिक संतुलित दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक ठरते.
संदर्भ सूची
1. Brittlebank, Kate. Tiger: The Life of Tipu Sultan. New Delhi : Oxford University Press. Kirkpatrick, William (ed.).
2. Select Letters of Tippoo Sultan to Various Public Functionaries. London, 1811.
3. Wilks, Mark. Historical Sketches of the South of India. Vol. II. London, 1810. (Reprint : Mysore edition, 1932).
3. Logan, William. Malabar Manual. Madras Government Press, 1887.
(मलबार प्रदेशावरील प्रशासनिक-ऐतिहासिक माहितीचा प्रमुख स्रोत.)
4. Mysore Gazetteer. Government of Mysore. (मैसूर राज्याचा अधिकृत गॅझेटियर.)
5. Asiatic Annual Register. London (19th century publication). – टिपू सुलतानसंबंधी समकालीन संदर्भ.
6. Scots Magazine. Volume 62, 1800. – टिपू सुलतानच्या कारवायांबद्दल प्रकाशित वृत्त.
7. Hasan, Mohibbul. History of Tipu Sultan. New Delhi: Aakar Books / (originally 1951; later reprints).
8. Shastry, A. K. (ed.). Records of Sringeri Matha. Bangalore, 2009.
9. Rani, J. Jemi Merlin. “Religious Policy of Tipu Sultan.” IOSR Journal of Humanities and Social Science.(April 2018)
10. https://www.sringeri.net
11. https://www.onlinedarshan.com
.................................................................................................................................................................
लेखिक हरिहर सारंग माजी राज्यकर उपायुक्त आहेत.
harihar.sarang@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment