अजूनकाही
भारत हा अंधश्रद्धाळू लोकांचा देश आहे, ही केवळ भावनिक प्रतिक्रिया नसून ते सामाजिक वास्तवाचे कठोर प्रतिबिंब आहे, असे म्हटले अतिशयोक्ती ठरणार नाही. हजारो वर्षांच्या सामाजिक रचनेत धर्म, कर्मकांड, परंपरा आणि आध्यात्मिकता यांचा प्रभाव इतका खोलवर रुजलेला आहे की, तो केवळ श्रद्धेपुरता मर्यादित राहत नाही, तर तो अनेकदा विवेकबुद्धीवर मात करतो. बाबाबुवा, गुरू, साधू, संत या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींनी लोकांच्या या मानसिक दुर्बलतेचा, अज्ञानाचा आणि भीतीचा गैरफायदा घेत सातत्याने समाजाचे शोषण केले आहे – विशेषत: स्त्रियांच्या शोषणाच्या घटना वारंवार समोर येतात. तरीही समाजाचा एक मोठा घटक अशा व्यक्तींच्या मागे अंधपणे उभा राहतो, ही गोष्ट केवळ दुःखद नाही, तर चिंताजनक आहे.
इतिहासाच्या पार्श्वभूमीवर पाहिले, तर प्राचीन आणि मध्ययुगीन काळात लोक मोठ्या प्रमाणावर निरक्षर होते. शिक्षणाची साधने मर्यादित होती आणि ज्ञानाचा प्रसार अत्यंत कमी होता. त्यामुळे निसर्गातील घटनांचे, आजारांचे, अपघातांचे किंवा अनिश्चिततेचे स्पष्टीकरण देण्यासाठी लोकांकडे कोणताही वैज्ञानिक आधार नव्हता. अशा परिस्थितीत धर्मगुरू, बाबाबुवा आणि धार्मिक कथाकथन करणारे लोक म्हणजे कीर्तनकार हेच ‘ज्ञानाचे केंद्र’ बनले. त्यांनी सांगितलेल्या कथा, पुराणातील आख्यायिका आणि कर्मकांड यांवर लोकांनी विश्वास ठेवला. त्यामुळे त्यांना तात्पुरता मानसिक आधार मिळाला असेल, पण त्याच वेळी त्याचा गैरफायदा घेऊन अनेक बाबाबुवांनी राज्यकर्त्यांना हाताशी धरून स्वतःचे साम्राज्य उभे केले.
आधुनिक काळात, विशेषतः स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रांमध्ये भारताने प्रगती केली. तरीही अंधश्रद्धा कमी होण्याऐवजी अनेक बाबतीत ती अधिक बळकट झालेली दिसत आहे. ही विसंगती समजून घेणे आवश्यक आहे. शिक्षण म्हणजे केवळ माहिती मिळवणे नव्हे, तर विचार करण्याची क्षमता विकसित करणे होय. आपल्या शिक्षणव्यवस्थेत अनेकदा माहिती देण्यावर भर दिला जातो, पण विवेकबुद्धी, प्रश्न विचारण्याची सवय, आणि तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता विकसित करण्यावर पुरेसा भर दिला जात नाही. त्यामुळे उच्चशिक्षित व्यक्तीही अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकतात. कारण माणूस हा मूलतः अनिश्चिततेला घाबरणारा प्राणी आहे. भविष्याबद्दलची भीती, अपयशाची शक्यता, आजारपण, आर्थिक अस्थिरता या सर्व गोष्टी माणसाला अस्वस्थ करतात. विज्ञान या गोष्टींचे स्पष्टीकरण देऊ शकते, उपाय सुचवू शकते, पण ते निश्चितता देऊ शकत नाही.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
विज्ञान सांगते की, निसर्ग अनिश्चित आहे, बदल हा त्याचा स्थायीभाव आहे, पण ही अनिश्चितता स्वीकारणे माणसाला कठीण जाते. त्यामुळे तो ‘निश्चिततेचा भास’ देणाऱ्या बाबाबुवांकडे आकर्षित होतो. ते भविष्य सांगण्याचा दावा करतात, संकट टाळण्याचे उपाय सांगतात आणि ‘देवाच्या कृपेने सर्व काही ठीक होईल’ असा दिलासा देतात. हा दिलासा वैज्ञानिकदृष्ट्या खोटा असला, तरी मानसिकदृष्ट्या सामान्य जनांना आकर्षक वाटत आला आहे.
याच वळणावर अंधश्रद्धेचा सर्वांत मोठा प्रभाव पडत असतो, कारण अंधश्रद्धा माणसाला वास्तवापासून दूर नेते आणि त्याला खोट्या सुरक्षिततेच्या भावनेत ठेवते. उदाहरणार्थ, एखादा आजार झाल्यावर वैद्यकीय उपचार घेण्याऐवजी बाबाबुवांकडे जाणे, किंवा आर्थिक अडचणींवर उपाय म्हणून पूजा-पाठ करणे, हे केवळ अवैज्ञानिक नाही, तर धोकादायकही आहे. अशा कृतींमुळे समस्या सुटत तर नाहीच, उलट त्या अधिक गुंतागुंतीच्या होतात.
अंधश्रद्धेच्या प्रसारात माध्यमांची भूमिकाही महत्त्वाची आहे. छपाईचा प्रसार झाल्यानंतर धार्मिक साहित्य, पोथ्या, पुराणकथा मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचल्या. या साहित्यामध्ये अनेकदा अतार्किक, चमत्कारिक आणि अवैज्ञानिक गोष्टींचा भडिमार असतो. लोकांनी या गोष्टींना प्रश्न न विचारता स्वीकारले. पुढे दूरदर्शन, रेडिओ आणि आता इंटरनेट व सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अशा गोष्टींचा प्रसार अधिक वेगाने होऊ लागला आहे. विशेषतः वर्तमानपत्रे आणि टीव्ही चॅनेल्स यांनी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम केले आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये.
गेल्या दहा वर्षांपासून राजकारण्यांनी परधर्म द्वेष शिकवणाऱ्या आणि धार्मिक कर्मकांडांना प्राधान्य देणाऱ्या अनेक तथाकथित बाबाबुवा आणि संतांना हाताशी धरून एक गठ्ठा मते मिळवण्यासाठी लोकांना अंधश्रद्ध बनवण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे कुंभमेळा, जत्रा, चमत्कार, बाबाबुवांचे ‘अलौकिक’ कार्य यांची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी केली जाते. या बातम्या केवळ माहिती देण्यासाठी नसतात, तर त्या एक प्रकारे त्या गोष्टींना वैधता देतात.
जेव्हा एखाद्या प्रतिष्ठित माध्यमातून अशा गोष्टींची चर्चा होते, तेव्हा लोकांचा त्यावर विश्वास अधिक दृढ होतो. यामागे आर्थिक आणि राजकीय हितसंबंधही असतात. धार्मिक कार्यक्रम, जत्रा, मठ, मंदिर यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा फिरतो. यामुळे अनेक लोकांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे या व्यवस्थेला टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. राजकीय पक्षही अनेकदा धार्मिक भावना भडकवून आपला फायदा करून घेतात. धार्मिक ओळख ही मतांसाठी प्रभावी साधन ठरते, त्यामुळे अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारे वातावरण तयार होते.
भारतीय संविधानाने स्पष्टपणे वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि सुधारक वृत्ती यांचा प्रचार करण्याचे आवाहन केले आहे. पण प्रत्यक्षात या मूल्यांची अंमलबजावणी मर्यादित प्रमाणातच झाली आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी शिक्षण, माध्यमे आणि सामाजिक चळवळी यांची एकत्रित भूमिका महत्त्वाची असते. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे केवळ फक्त प्रयोगशाळेत केले जाणारे प्रयोग नव्हेत; तर ती एक जीवनदृष्टी आहे. प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारून, पुरावे तपासून, तर्कशुद्ध विचार करून पाहण्याची वृत्ती म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन.
एखादी गोष्ट परंपरेने चालत आली आहे, म्हणून ती खरी असेलच असे नाही. ती योग्य आहे का, तिला काही वैज्ञानिक आधार आहे का, तिचा समाजावर काय परिणाम होतो, हे विचारणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, ग्रह-नक्षत्रांच्या आधारावर भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषशास्त्राला वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोणताही ठोस आधार नाही. तरीही लाखो लोक त्यावर विश्वास ठेवतात, कारण त्यांना सुरक्षिततेची गरज असते. पण हा विश्वास त्यांना चुकीच्या निर्णयांकडे नेतो. विवाह, करिअर, व्यवसाय यांसारख्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये ज्योतिषाचा आधार घेणे म्हणजे आपल्या आयुष्याचे नियंत्रण एका अ-वैज्ञानिक पद्धतीकडे सोपवणे होय.
तसेच, आयुर्वेद किंवा पारंपरिक औषधोपचार यांचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. आयुर्वेद ही एक प्राचीन वैद्यकीय प्रणाली आहे, तिचा अभ्यास, संशोधन आणि आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर तपासणे आवश्यक आहे. पण अनेक ‘बाबा’ आणि तथाकथित वैद्य हे आयुर्वेदाच्या नावाखाली चुकीचे समज पसरवतात. ते एखादे विशिष्ट औषध सर्व आजारांवर चमत्कारीक उपाय असल्याचा दावा करतात, जे पूर्णपणे भ्रामक आहे. गर्भसंस्काराच्या नावाखाली समाजातील स्त्रियांच्या शोषणाचा प्रश्न आयुर्वेदातील अंधश्रद्धेशी घट्ट जोडलेला आहे.
तसेच अनेक बाबाबुवांनी ‘आध्यात्मिक साधना’, ‘देवाची कृपा’ किंवा ‘उपचार’ यांच्या नावाखाली स्त्रियांचे लैंगिक शोषण केले आहे. तरीही त्यांच्या अनुयायांनी त्यांना समर्थन दिले, ही गोष्ट समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभे करते. याचे एक कारण म्हणजे अंधश्रद्धेमुळे निर्माण झालेली अंधभक्ती. जेव्हा एखाद्या व्यक्तीला ‘देवाचा अवतार’ मानले जाते, तेव्हा त्याच्या कृतींवर प्रश्न विचारणे लोकांना धर्माला विरोध करणे वाटते. याचा विचार केला, तर एक गोष्ट स्पष्ट होते - अंधश्रद्धा ही केवळ अज्ञानाची समस्या नाही, तर ती एक सामाजिक, मानसिक, आर्थिक आणि राजकीय समस्या आहे. तिचा मुकाबला करण्यासाठी बहुआयामी प्रयत्न आवश्यक आहेत.
प्रथम, शिक्षण व्यवस्थेत मूलभूत बदल आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांना केवळ माहिती देण्याऐवजी त्यांना प्रश्न विचारण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची सवय लावणे आवश्यक आहे. विज्ञान हा विषय म्हणून नव्हे, तर जीवनदृष्टी म्हणून शिकवला गेला पाहिजे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
दुसरे म्हणजे, माध्यमांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणाऱ्या बातम्या आणि जाहिराती टाळल्या पाहिजेत. त्याऐवजी वैज्ञानिक दृष्टीकोन, संशोधन, आणि तर्कशुद्ध विचार यांचा प्रचार केला पाहिजे. तिसरे म्हणजे, सामाजिक चळवळींची भूमिका महत्त्वाची आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणाऱ्या संस्था लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतातच, पण जोपर्यंत समाजातूनच त्या चळवळीच्या कार्याला मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत नाही, तोपर्यंत ते कार्य समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचणे कठीण!
शेवटी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक व्यक्तीने काळानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणणे आवश्यक आहे. अंधश्रद्धा ही बाहेरून लादली जात नसते, ती आपल्या मनात भावी निर्माण होत असते. आपण स्वतः प्रश्न विचारायला सुरुवात केली, तर अंधश्रद्धेचा प्रभाव कमी होऊ शकतो. निसर्गाचा मूलभूत स्वभाव अनिश्चितता आहे. तो स्वीकारणे कठीण असले तरी आवश्यक आहे. भूतकाळ बदलता येत नाही आणि भविष्य पूर्णपणे नियंत्रित करता येत नाही. त्यामुळे वर्तमानात जगणे, आणि उपलब्ध माहिती व तर्काच्या आधारावर निर्णय घेणे, हेच योग्य आहे.
अंधश्रद्धेचा मुकाबला हा केवळ वैज्ञानिक लढा नाही, तर तो मानवी स्वातंत्र्य, सन्मान आणि प्रगती यांसाठीचा लढा आहे. जोपर्यंत समाजात विवेकबुद्धीचा, प्रश्न विचारण्याचा आणि सत्य शोधण्याचा आग्रह निर्माण होत नाही, तोपर्यंत बाबाबुवांचे साम्राज्य टिकून राहील. आणि जोपर्यंत हे साम्राज्य टिकून आहे, तोपर्यंत खऱ्या अर्थाने प्रगत, वैज्ञानिक आणि मुक्त समाजाची निर्मिती होणे कठीण आहे.
.................................................................................................................................................................
लेखक जगदीश काबरे समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.
jetjagdish@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment