अजूनकाही
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
एखादा आशेचा अंकुर कथानायकाच्या किंवा नायिकेच्या मनात उगवण्याच्या छटा सुनील साळुंके यांच्या कथावाङ्मयात दिसतात. मनाला जाणवणाऱ्या, कोमेजून जाणाऱ्या मानसिकतेच्या सावल्या आपसात खेळत असतात. कधी चांदण्यात, कधी शिवारात, तर कधी रुक्ष वाळवंटातदेखील नकळत उमलत जाणाऱ्या पाऊसकळ्यांचे ते प्रतिबिंब असते. ज्याला आपण एकमेकांना सांभाळून घेणे म्हणतो. उत्कटतेने पोचणारं कथानक सहज, नकळत उमजून येतं, तेव्हा वाचक आणि लेखकाला जे स्वीकारशील असतं, ते मनोत्कट कथाबीज.
सुनील साळुंके या कथालेखकाचा संदर्भ देत म्हणायचं झालं तर एखाद्या मुख्य पात्राच्या कडवट विचाराला मोहाच्या फुलाचा विचार सुगंध देऊन जातो, हे सांगणारी मानसिकता व्यापक स्वरूपात व्यक्त करण्याची संधी हा लेखक वाचकाला देत राहतो. कथेतून फेरफटका मारताना आणि बाहेर पडताना एक प्रकारचं जडपण मनाला येतं. शब्द आपले होतात. खरी मजा तर असते आस्वादकाची. या पुस्तकातील एकही कथा विस्मरणात जात नाही.
नायक किंवा नायिका आपल्या जगण्याशी प्रामाणिक असले की पात्रांचे रंग पुसता येत नाहीत. त्यांचा वावर माजघरात असो की, स्वयंपाकघरात. इथे काळ, वेळ, स्थळ खिजगणतीतही धरता येत नाही. कथात्मक आशयाला अधोरेखित करणारा, समाधान देणारा हा रूपबंध आपल्याला चकित करतो.
सुनील साळुंके यांच्या कथेतील पात्रांच्या गडद रंगाच्या प्रयोजनाची किमया लक्षात येते आणि ती कथा वाचकांच्या कायम लक्षात राहते. मनाला धक्के देणारे धक्कातंत्र सुनील साळुंके यांच्या कथेत सहज मुरलेले आहे. त्यांनी ते आत्मसात केलेले आहे. अगदी वाचता वाचता शेवटाविषयी उत्सुकता लागून राहते. मराठी कथासाहित्यात हा प्रयोग बहुधा नवा आहे. कारण कथेतील घटना ठरवून घडत नाहीत. डोळसपणा असल्याशिवाय हे होत नाही.
नाटक साकारण्यासाठी रंगमंचाला भौतिक साधनसामग्रीची हौस असतेच असे नसते. रचना साधनविनादेखील सजीव होऊ शकते. इथे आशयाला महत्त्व देणारा कथाकार असेल तर कथावस्तूतील घटक केंद्रवर्ती होऊ शकतात. यातील प्रत्येक कथा आपल्या सराईत नजरेला धक्का देत जाते. मग आशयाचा शोध लावण्याचं काम आपल्याला लागतं.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.
अंगप्रत्यंगाच्या कथा वाचकांच्या पटलावर ठेवणाऱ्या कथालेखकाचा मोठा काळ अनुभवल्यानंतर स्वतःची पाठ खाजवून घेणारे सरकारदरबारी मोठे झाले. त्या पंक्तीत सुनील साळुंके बुद्धिबळ खेळत बसले नाहीत. तो त्यांचा पिंड नाही. पुरवठ्यानुसार मागणी हा त्यांचा गुण नाही. म्हणून ते मोजके आणि चांगलेच लिहीत राहिले. त्यांचा हा कथासंग्रह म्हणजे ठसठशीत पुरावाच नाही काय? म्हणूनच कदाचित साक्षेपी वाचक त्यांच्या पाठीशी आहेत. घोरपडीचा चिवटपणा त्यांच्याकडे असल्याने त्यांचा प्रवास एकतर्फीच राहिला. पापण्या कोमट ठेवून. इम्पोर्टेड कथाबीज कलम करून उजळ माथ्याने मिरवणाऱ्यांपासून हा कथालेखक दूरच राहिला. ही एक त्यांची जमेची बाजू.
सुनील साळुंके यांना वाङ्मयक्षेत्रात पाय पसरण्यासाठी कोणीही वाली नाही. स्त्रीबरोबर स्त्री होणारं त्याचं मन, परकायाप्रवेशाची किमया त्यांच्या लेखनात दिसते. सुष्ट-दुष्ट प्रवृत्ती, नीती-अनीतीचा संघर्ष, बाळसेदार कथावस्तू रचना प्रकारात वाचकवर्ग मांडणीच्या विशेष अंगाने विषयाकडे बघत बघत मनोरंजन अभिरुची आणि त्याचा भवताल त्यांच्या सवयीचा होत असतो. याचाच अर्थ वाङ्मयीन चाकोरीच्या परिप्रेक्ष्यात लेखक तसे होऊ देत नाही. अंतस्थ दृष्टीला, सर्जनशीलतेला जाणवलेली ओल मानवी स्वभावाला महत्त्वाचीच. अशीच कथा अंतर्मुख आणि बहिर्मुख या अंगाने वाचकाला नवं काही देत जाते. कथानिर्मितीच्या मुळाशी स्वत्व विसरणारा माणूसच असायला हवा, असं कथाकार सांगत जातो. जर अपूर्णता सांगणाऱ्या कथा मराठीत दुधाचा रतीब घालावा त्या पद्धतीने लिहिल्या गेल्या, तर त्यातील भावना कायम मृतवत होते.
सुनील साळुंके यांचा हा कथासंग्रह वाचताना मुख्यतः दिसतो, तो मनातील भावविचार. आणि आकृतिबंधाचे विवेचन करत असताना त्यासंदर्भात मन:पटलावर तरंगणाऱ्या आशयाला न्याय देण्याचा वकूब लेखकाकडे भरपूर आहे. तो त्यांनी जपला पाहिजे. आचार-अनाचाराचे दर्शन घडवण्यासाठी काही गटांना हा मुख्य विषय वाटत असला, तरी संभ्रमित होण्याचा तो स्वभावधर्म आहे. तो काही कथेतून दृष्टीस पडतो. अर्थात प्रवृत्ती दाखवण्यासाठीचाच हा अट्टहास असतो. लोकसमुदायासाठी म्हणूनच लोकसमुदायाला ही कथा जवळची न वाटण्याचे ते एक कारण असतं. आणि असावं.
राम कोलारकर संपादित सर्वोत्कृष्ट मराठी कथासंग्रह १९६५ साली प्रसिद्ध झाला. त्याला जवळपास ५६ वर्षे होत आहेत. त्यातील पाच-सहा कथांचा तोंडावळा ओळखीचा वाटतो. बाकी सगळे नवे आहेत म्हणून तत्कालीन नव्यांची जडणघडण लक्षात घेण्यासाठी तरी हा निवडक कथासंग्रह जरूर वाचावा. अभ्यासाचा भाग म्हणून. यातील कथाप्रवासाचा आलेख, कथालेखकाची दृष्टी कथासंभाराचा रचनात्मक डौल यांचे विवेचन नवलेखकांना करता आले, तर स्वभावाच्या सूक्ष्मातिसूक्ष्म व्यवहारात जाणे शक्य होईल आणि सुनील साळुंके यांची कथा कशासाठी जपायची तेही कळेल.
कथा वाचताना परिस्थिती, काळ, सामाजिकता, राजकीय भान, सामूहिकतेने एकवटून येत असते. ते कसेही कोणत्याही अर्थाने आले, तरी वाचक त्यातील संदर्भीय अर्थाला स्वीकारतातच असं होत नाही. ते कथेतील आशयाला सामाजिक रचनेतूनच बघतात. ‘दिंडी’ या कथेत तसं होत जातं. मराठी वाचकात आस्वादनासाठी लागणारा जाणतेपणा मुळातच कमी आहे. ‘घनदाट’, ‘तू ही गोष्ट सांगायला नको होती’, ‘दिंडी’, ‘पोस्टमनच्या आयुष्यातील एक दिवस’, इत्यादी कथा अधिक प्रगल्भतेचा बाज घेऊन आल्यानंतर समीक्षक नावाच्या ज्योतिषाला गुणात्मकता सांगण्याची सोय लेखकाने ठेवली नाही.
‘जे. कृष्णमूर्ती आणि सायकीॲटिस्ट’ या कथेचा मूळ गाभा व्यापक, विस्तृत आहे. या कथेचा प्रवास करता झाला तर सुनील साळुंके यांच्या नावावर एक चांगली दीर्घकथा जमा होऊ शकते. ‘आत्मकथना’चंही तसेच आहे. ‘एक ब्रेकिंग न्यूज’ यासारख्या कथा नीतिमूल्यांचे धिंडवडे निघत असतानाही समाजवास्तव जी बघ्याची भूमिका घेत असतो, त्याचाच मानवी प्रवृत्तीला विरोध आहे. हा सगळा कथाऐवज संदर्भ आणि समाज, अंधार आणि प्रकाश, रक्तबदलाचा आणि प्रवाहातील खळखळत्या वाहणाऱ्या स्वार्थाच्या परीप्रेक्ष्यात येतो. वेगळा घाट देण्याच्या फसव्या प्रायोजित नादात हा कथाकार अडकून पडत नाही.
समकालीन परंपरेत त्याबाबतीत अनेक कथालेखकांची नावे समोर येतात. काही जण पारंपरिकतेत अडकून पडतात. आधुनिक कथासाहित्य परंपरेचा विचार केला तर विद्याधर पुंडलीक, अरविंद गोखले, श्री. दा. पानवलकर, जी. ए., अंबिका सरकार, सानिया, इत्यादींच्या कथेचा बाज आणि प्रचलित विषयाला वर्तुळाबाहेरच्या रस्त्याने बाहेर काढताना तंत्रात अडकून पडत नाही.
तसे काहीसे साळुंके यांच्या कथात दिसते. मुळात कथेची व्याख्या अजूनपर्यंत कोणी केली नाही... ती केली नाही ते बरे झाले. नाही तर चौकट मोडून आलेल्या कथा वाचायला मिळाल्या नसत्या. उदाहरणार्थ, मेघना पेठे, पंकज कुरुलकर, मुकुंद गायकवाड, चंद्रकांत खोत इत्यादी. विषयाच्या विविधतेमुळे यांचे कथालेखन वेगळे ठरते. तर बाबूराव बागूल, खोत, पाध्ये आणि जी. के. ऐनापुरे यांचे कथाविषय वाचकांना अंतर्मुख करतात.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
बाबा पाटील यांची ‘एकूर’मधील कथा व्यावहारिक, सांस्कृतिक परंपरेत बदल करून एका विशिष्ट उंचावर नेऊन ठेवलेली वाचकांना दिसते. वामन पात्रीकर, मनोहर शहाणे, अनिल डांगे, सखा कलाल, उद्धव शेळके यांनी जतन करून ठेवलेल्या भाषा, भाषाशास्त्रात म्हणूनच अडकून पडत नाहीत.
सुनील साळुंके यांच्या कथांचे नमुने जरी वानगीदाखल पाहिले, तर त्यांच्या कथा मराठी समीक्षकांना कोणता सांगावा देतात याचा विचार मनात येतो. नऊ महिने नऊ दिवस आधी जन्म घातलेल्या, कुपोषित जन्माला आलेल्या कथांचा उल्लेख येथे करण्याची गरज नाही. तीस वर्षांनंतरची केव्हातरी लिहिलेली कथा थोड्याफार असल्या, तरी त्या वेगळ्या कालखंडात उठून दिसतात. प्रचलित कथेची चाकोरी मोडून टाकणाऱ्यांना पूर्णपणे समीक्षा बाहेरचा रस्ता दाखवण्याची मोठी कामगिरी आपणच केलेली आहे. तिसऱ्या पिढीतील कथालेखकांच्या बाबतीत हे अधिक झालेले दिसते.
कथांच्या कायाकल्पाचा विचार करू जाता साचेबद्धपणातून कथा बाहेर काढली, ती गंगाधर गाडगीळ, शरच्चंद्र चिरमुले यांनी. बेगडी मानसिकता आणि व्यवहारातील भोंगळी नीतिमत्ता फुलवण्यात जे कथाकार रमले होते, त्यांचं नसलेलं मोठेपण देव जागर भोपळ्याएवढं दाखवण्यात बराच काळ गेला. न साधल्या जाणाऱ्या परिणामकारकतेकडे वाचकांचं लक्ष जावं म्हणून केलेले प्रयत्न यशस्वी ठरतात, तेव्हा सूचकतेला घोड्यावर बसवलं जातं, आशयातील धूसरता पुढे आणली जाते. परिणामांची व्याप्ती मर्यादित होते.
या पार्श्वभूमीवर सुनील साळुंके यांच्या कथांचा विचार करता अनुभवाची संगती, बांधणी आणि व्यक्तित्वाचा विचार, सहज ओघवत्या भाषेत जपलेलं आशयद्रव्य या कथाकाराने जाणीवपूर्वक जोपासलेले दिसते. तसे झाल्याने अर्थपूर्ण भावबंध कथात्मक रचनेतून वाहताना दिसते. वाहत्या प्रवाहाला सदिच्छा!
‘तू ही गोष्ट सांगायला नको होती!’ – सुनील साळुंके | शब्द शिवार प्रकाशन, मंगळवेढा | पाने – १५६ | मूल्ये – २२० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment