अजूनकाही
‘मृत्यू...’ समजून घेण्यासाठी लेखिका आभा भागवत यांनी स्वतःशी केलेला संवाद म्हणजे ‘नि:शब्द सावल्या, Grief unplugged’ हे पुस्तक. यातील एकूण ७२ गद्य स्वगतांसोबत साजेशा २३ कविता लेखिकेची भावावस्था सूक्ष्मतेने उलगडतात. लेखिकेने चितारलेले मुखपृष्ठ आणि आतील चित्रं भावावस्थेतील तरलता वाढवतात. ही स्वगतं तीव्र दुःख, शोक, वियोग, निराशा या भावकल्लोळाच्या कोंडीतून बाहेर पडत, अस्तित्वाच्या प्रश्नांना सामोरे जात, जीवनेच्छेकडे प्रवाही होतात.
लेखिकेचे वडील अनिल भागवत २०१८मध्ये, मैत्रीण शीतल २०२०मध्ये, मित्र धर्मराज २०२२मध्ये आणि आई शोभा भागवत २०२३मध्ये गेले. आईचे जाणे लेखिकेला हादरवते. पाठोपाठ झालेल्या वियोगाने आकारहीन भावभावना तिच्या अस्तित्वाचा कब्जा घेतात. कोलमडून पडणे किंवा सजगपणे धडपडत बाहेर पडण्याचा मार्ग शोधणे, यापैकी ती दुसरा मार्ग स्वीकारते. खासगी अवकाशाच्या कोलाहलाला शब्दरूप देताना सारे वैयक्तिक हे वैश्विक असते, याची खूणगाठ मनोमन असल्याने ‘लिहिणे’ सोबती बनते.
संगोपनाबद्दलचे आठव अनेक बाजूने तिला स्पर्शतात. ती भावूक होते. केवढं आनंदी, चांगलं आयुष्य आईवडिलांनी दिलं, त्याबद्दल तिला कृतज्ञ वाटतं. आईवडील हयात असताना कधीच जाणवू न शकलेल्या अनेक गोष्टी ते गेल्यावर का जाणवतात याचे गूढ उकलत नाही. लेखिका आईवडिलांना ‘अनिल-शोभा’ या त्यांच्या नावानेच हाक मारायची आणि आई-वडील लेखिकेचं नाव जितक्या प्रेमाने उच्चारायचे, तेवढं बाकी कोणीच उच्चारू शकत नाही, हे तिला आत्ता ऐकू येतं. डोळे भरून येतात. दोघंही गेल्याने पोरकं होणं म्हणजे काय हे अनुभवताना तिची घालमेल होते. आईने केलेल्या कौतुकाची जागा अख्या जगात कोणीही घेऊ शकत नाही, याची खात्री पटते. आई किती नेटक्या शब्दांत कौतुक करायची, याचे प्रसंग नजरेसमोर उभे राहतात.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
पन्नाशीतील लेखिका आईवडिलांच्या आजारपणात ‘केअर गिव्हर’च्या भूमिकेत जाते. आईच्या वेगळ्या तत्त्वज्ञानाशी जुळवून घेते. ‘आभा रागावते मला, मी छान आहे सांगितलं की.. पण मी खरंच छान आहे’. ‘माणसाने अचानक नाही जाऊ. आजूबाजूच्यांच्या मनाची तयारी नसते. आजारी पडून सावकाश जावं. म्हणजे कोणाला जड जात नाही.’ आईचे शब्द तिला ऐकू येतात. माणसं मुळात चांगलीच असतात, यावर आईचा ठाम विश्वास होता. थोडं बरं वाटलं की, स्वतःला ढकलून इतरांचा त्रासही आई सोसायची.
‘केअर गिव्हर’ म्हणून लेखिकेची झालेली होरपळ, इमर्जन्सी निभावताना आलेला, पण न जाणारा ताण, आईला होत असणारा त्रास बघणं, हे सारं खूप क्लेशदायक होतं. वडील गेल्यानंतर आईने लेखिकेच्या घरी राहायला येणं, दोघींनाही स्वातंत्र्याची सवय असल्याने ते सोयीचं नाही हे लक्षात येणं, थोडे दिवस ‘केअर सेंटर’मध्ये राहणं आणि शेवटी मदतनीस ठेवून स्वतःच्याच घरी राहणं, मदतनीसांचे चांगले-वाईट अनुभव झेलणं, आईच्या चांगुलपणाचा फायदा मदतनीसांनी घेणं, म्हाताऱ्या आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवलं म्हणजे मुलं नालायक आहेत, असा समज सामाजिक वातावरणात असल्याने त्याची झळ पोहोचणं, असे सारे चढउतार लेखिकेने सोसले.
स्वगतातून वाचकाला तिची मनोवस्था समजते. ताण समजून घेताना स्वतःचं दुःख ओळखणं, दुःखात कायमचं न राहता ते व्यक्त करण्यापासून स्वतःला न रोखणं असे ती आवर्जून करते. जेव्हा मन दुःखानं ग्रासते, तेव्हा कोणतीही सकारात्मक भावना स्पर्श करत नाही. त्या वेळी मन आणि शरीर दोन्ही मौनात जातात. आतली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करतात. आईवडील जाण्यामुळे पोकळी वाटते, त्यापेक्षा फार मोठी आहे. विनाअट प्रेम म्हणजे काय हे आई गेल्यावर समजतं. आपल्याला हवं ते माणूस नाही याचा राग येतो. राग, दुःख, निराशा, गोंधळ याची ये-जा चालू राहते. आपलं त्या माणसाशी असणारं खास नातं आता अनुभवता येत नाही, याचं फार दुःख होतं.
झालेल्या वियोगाला शब्द देताना लेखिका लिहिते – “कशामुळे आपलं शरीर जणू बंड पुकारतं आणि गेलेलं माणूस परत येईल अशी इच्छा करत बसतं, हे समजत नाही. पायाखालचा आधार नाहीसा होऊन जरा अधांतरी, एकटं वाटतं. गेलेली माणसे आठवणीच्या रूपात काळजात रुतून बसतात. आपल्या लाडक्या माणसाची सर्व त्रासातून सुटका झाली असं का नाही वाटत असा प्रश्न पडतो. त्या माणसासारखी माया आपल्यावर दुसरं कोणीही करणार नाही, हे आपल्या शरीराला आणि मनालाही माहीत असतं. गेलेल्या जवळच्या माणसांच्या रिकाम्या जागा कधीच भरत नाहीत. माणसं गेली तरी ती आपल्याला समांतर चालत राहतात, पण गेलेलं माणूस मात्र कधीच नाही येणार.”
शोक ही फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ती मानवी आयुष्याचा मोठा आणि महत्त्वाचा हिस्सा आहे. सुरवातीला लेखिका बधीरपणा अनुभवते. स्वतःच्या मनाचं ऐकत, हवा तेवढा वेळ देत-घेत शोक पचवण्याच्या प्रक्रियेतून जावं लागतं, असं तिला वाटतं. तिला माहीत आहे तिचा स्वभाव वाहवत जाण्याचा आहे. या स्वभावामुळे शोक तिला गर्तेत खेचत राहतो. तिथून बाहेर येता येत नाही, अशी अवस्था होते. खचायला होतं. आपणच हात द्यावा लागतो खड्ड्यातून बाहेर काढायला. गेलेल्या माणसाशिवाय कसं जगायचं आणि का जगायचं याची स्पष्टता जाते. आत्मविश्वास कमी होतो. कुणाला भेटावंसं वाटत नाही. काही दिवस लांब निघून जावं असं वाटतं. आयुष्य कोणतं वळण घेईल आणि शोक कसा बदलत जाईल, हे समजून घेण्याचा धीर ती दाखवते. तिचा शोध चालू राहतो.
त्या शोधात तिला अस्तित्वाचे प्रश्न पडतात. अनाकलनीय, अपुरं, अनिश्चित आणि अर्थहीन असूनही आयुष्याचा अर्थ आपण लावत राहतो; आयुष्य हे बहुदा अर्थ लावण्यासाठी नाहीच; अस्तित्वाचा अर्थच एक दिवस नाहीसं होणं आहे; आईवडील गेल्यावर खरंच नवा जन्म सुरू होतो; काळ, अवकाश आणि त्याला व्यापून राहिलेले आपण, म्हटलं तर शाश्वततेचा भाग आहोतही आणि नाहीही. असे बरेच पदर लेखिका सावकाशीने उलगडते. अर्थ लावण्यासाठी तिच्या सर्व क्षमता पणाला लावते.
एका टप्प्यावर तिला शांत वाटू लागतं. सावकाशीने आठवणी आता ‘पाहुणे’ म्हणून सहज येतात-जातात. वाईट वाटण्याची तीव्रता कमी होत जाते. तिला वाटतं- एकही अपराधी भावना नसणं; एकही पश्चाताप न राहणं; एकही खदखद शिल्लक न राहणं ही भावावस्था अनुभवता येईल. दुःख, वियोग, शोक याने हळव्या झालेल्या मनात उमेद रुजेल. लिहिणं, बोलणं, चित्र काढणं, गाणी म्हणणं, ऐकणं वरदानं आहेत. त्यामुळे ताकद मिळते. जोडीनं योग्य वेळी गरज असल्यास काही उपचार घ्यावेत.
शोकातून बाहेर येताना लेखिकेला जीवन हे आजचा दिवस आनंदानं, समाधानानं जगण्यात आहे, हे कळतं; काही अर्थपूर्ण सुचतं; स्वतःचं अंतरंग जास्त चांगलं समजतं; करुणा वाढते, कृतज्ञता म्हणजे नेमकं काय हे अजून खोलवर उमजतं; शरीर या महत्त्वाच्या सुंदर साधनाची किंमत कळते. असे काही बदल लेखिका नोंदवते. या टप्प्यावर तिला जास्त शांत, समजूतदार, जबाबदार, करुणामय, संयमी आणि तृप्त असं व्यामिश्र काहीसं वाटतं.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
गेलेल्यांच्या नात्यात जादू होती, म्हणूनच ते नसण्यानं एवढा फरक पडला. आपणही आवर्जून अशी जादू करत राहायला हवी. आईवडिलांची साधी राहणी; झपाटून, निरपेक्ष काम करणं; काळाचं परिमाण असणारी साधी आणि लवचीक स्वप्नं बघण्याचा समंजसपणा त्यांनी दाखवणं; आता आईवडिलांनी दाखवलेल्या मूल्यांचं काय करायचं हे आपल्या हातात आहे. लवकर पूर्वीचा उत्साह परत येईल आणि नव्या जोमानं काही चांगलं काम करता येईल, अशी आशा लेखिका व्यक्त करते.
आपल्या प्रिय माणसाला निरोप सावकाशच देता येतो. निरोप देता देताच आठवणींचा दिवा उजळतो. त्या उजेडात समजतं ‘तिने माझ्यामध्ये तिला स्वतःलाच जन्म दिला होता कदाचित. म्हणून एवढी माया केली... ’
लेखिका चित्रकार आहे. उजळलेल्या वाटेवर सम्यक भाव तिच्या मनाला सहज उभारी देतात. लेखिका ‘दिवसातल्या प्रत्येक तासाचा, मिनिटाचा एकेक टाका घालत… देखणी, अगदी घट्ट गोधडी शिवताना दोऱ्याला गाठ मारायची विसरत’ नाही!
शोभाच्या आठवणींच्या दिव्याच्या उजेडात प्रदीर्घ स्व-शोधानंतर लेखिका आभा मार्गस्थ होते!
‘नि:शब्द सावल्या, Grief Unplugged’ – आभा भागवत
अमलताश बुक्स, पुणे | पाने – २०० | मूल्य – ३०० रुपये.
.................................................................................................................................................................
लेखिका अरुणा बुरटे सामाजिक कायर्यकर्त्या आहेत.
aruna.burte@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment