खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…
ग्रंथनामा - झलक
विकास पालवे
  • ‘कुबड आणि इतर कथा’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 02 February 2026
  • ग्रंथनामा झलक कुबड आणि इतर कथा खालिद जावेद Kubad aani Itar katha Khalid Javed विकास पालवे Vikas Palve

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

तरुण कवी, लेखक आणि ग्रंथोपासक विकास पालवे यांनी प्रसिद्ध उर्दू कथाकार खालिद जावेद यांच्या कथासंग्रहाचा ‘कुबड आणि इतर कथा’ हा मराठी अनुवाद नुकताच पपायरस प्रकाशन, कल्याणतर्फे प्रकाशित झाला आहे. या संग्रहाला त्यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश...

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

उर्दू कथात्म साहित्याला दीर्घ परंपरा लाभलेली आहे. मौखिक स्वरूपातील ‘दास्तानगोई’ हाही लिखित स्वरूपातील कथनात्म साहित्याच्या परंपरेचाच भाग आहे. प्रगतिशील आंदोलन, सामाजिक वास्तववाद, आधुनिकतावाद अशा वेगवेगळ्या टप्प्यांतून उर्दू कथेचा प्रवास झालेला आहे. या प्रत्येक टप्प्यावर आशय आणि घाट या दोन्ही अंगाने उर्दू कथेचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या साहित्यिकांची मांदियाळी पाहायला मिळते. प्रेमचंद, सआदत हसन मंटो, इस्मत चुगताई, राजेंद्र सिंह बेदी, कृष्ण चंदर, राशिद जहाँ, सज्जाद ज़हीर आदी अनेक लेखकांनी उर्दू कथेच्या विकासात अतिशय मौलिक अशी कामगिरी केलेली आहे.

यांतल्या बहुतांश लेखकांनी तत्कालीन सामाजिक समस्या, राजकीय पेचप्रसंग (मग ते स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित असोत वा फाळणीशी), सुधारणावादी चळवळीशी संबंधित प्रश्न, हिंदू-मुस्लीम संघर्ष, दलितांचं शोषण, त्या काळातील कौटुंबिक वातावरण यांविषयी वास्तववादी कथनशैलीचा अवलंब करून मोठ्या प्रमाणात कथा लिहिल्या.

त्या काळात नवशिक्षित वर्गाची वाढती संख्या आणि नियतकालिकं व वर्तमानपत्रं यांची मुबलक प्रमाणातील उपलब्धता या दोन प्रमुख कारणांमुळे कथा वाङ्मय मोठ्या प्रमाणात वाचलं जात होतं. १९६०-७०चं दशक हा एकूणच पातळीवर सगळ्याच क्षेत्रांत घुसळण होण्याचा काळ होता. आपल्या आधीच्या पिढीने केलेलं काम डोळसपणे नाकारून वा त्या कामाच्या मर्यादांना ओलांडून पुढे जाण्याची असोशी या काळातील कलेच्या विभिन्न प्रकारांत कार्य करणाऱ्या कलावंतांच्या कामात दिसून येते.

या काळातील उर्दू कथादेखील या बदलांना आत्मसात करून नव्या प्रकारच्या अभिव्यक्तीसाठी झगडताना दिसते. निव्वळ सामाजिक वास्तववाद हे तंत्र अवलंबून समूहनिष्ठ जाणिवांना अभिव्यक्त करण्याऐवजी पात्रांचं अंतर्विश्व उलगडून दाखवण्यावर अधिक भर दिला जाऊ लागला.

या कथांची आधुनिक जगण्यात माणसाच्या वाट्याला येणारा एकटेपणा, बदललेल्या मूल्यव्यवस्थेमुळे अगदी छोट्या शहरांतदेखील जाणवणारा परकेपणा, निसर्गासोबत बदलत गेलेले त्याचे संबंध, स्त्री-पुरुष संबंधांतील ताणतणाव अशी काही ठळक आशयसूत्रं सांगता येतील. स्त्री- पुरुष संबंध चित्रित करतानाही पारंपरिक रोमॅण्टिक वृत्ती पूर्णपणे नाकारून बेधडक पद्धतीने त्यांचं चित्रण करणं, हेदेखील या कथांचं एक वैशिष्ट्य सांगता येईल.

कथनाच्या निवेदन पद्धतीतही पारंपरिक एकरेषीय निवेदन पद्धतीला फाटा देऊन निवेदन पद्धतींचे वेगवेगळे प्रयोग या लेखकांनी केल्याचं दिसून येतं. अब्दुलाह हुसेन, इंतजार हुसेन, नय्यर मसूद, शम्सुर्रहमान फारुकी, अली इमाम नक्वी ते अगदी आज लिहिते असलेले रहमान अब्बास, खालिद जावेद ही या नव्या कथालेखन परंपरेतील आघाडीची नावं आहेत.

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

मराठी वाचकसमूहात आजही उर्दू कथांचा विषय निघाला की, मंटो, इस्मत चुगताई, कृष्ण चंदर या नावांच्या पलीकडे जाऊन नंतरच्या पिढीतील वा समकालीन लेखकांचा उल्लेख अपवादानेच होताना दिसतो. पण वास्तव हे आहे की, या लेखकांनंतर आलेल्या पिढीतील लेखकांनीही उत्कृष्ट कथनात्म साहित्य लिहिलेलं आहे. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची चर्चा मुख्यतः मराठी अनुवादांच्या अनुपलब्धतेमुळे फारशी झाली नाही.

उर्दू म्हटलं की, मुसलमानांची भाषा असा चुकीचा समज अजूनही लोकांच्या मनात ठाण मांडून बसला आहे. १९९०नंतर धार्मिक ध्रुवीकरणाला आधारभूत मानून बदलत गेलेल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा काहीसा परिणाम उर्दूतील लेखक मराठीत अनुवादित होण्याच्या कामावर झाला असावा. खालिद जावेद यांच्या ‘बुरे मौसम में’ या कथासंग्रहाच्या भाषांतरामुळे ही पोकळी थोडीशी का होईना भरून काढण्याची संधी मिळाली याचं अतीव समाधान आहे.

खालिद जावेद यांच्या कथांतील पात्रांना वर्तमानात जगतानाही त्यांच्या पूर्वायुष्यात घडून गेलेल्या गोष्टी सतत आठवत राहतात आणि त्यांचा सांधा ते वर्तमानात घडणाऱ्या गोष्टींशी जुळवून पाहण्याचा प्रयत्न करतात. आणि बऱ्याचदा या प्रयत्नांत त्यांच्या हाती केवळ निराशा, पश्चात्ताप आणि बेचैनी यांशिवाय दुसरं काहीही लागत नाही. कुटुंबातील सदस्यांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधांचं वर्णन करतानाही ते खोट्या भावनिकतेच्या आहारी न जाता आधुनिक जीवनशैलीमुळे येणाऱ्या ताणतणावांचं नेमकं चित्र उभं करतात. मग ते संबंध नवरा-बायकोतील असोत वा बाप-लेकीतील असोत, त्यांचा मुख्य रोख हा पात्रांच्या मनोविश्लेषणाच्या माध्यमातून त्यांच्या समोर उभ्या राहणाऱ्या अस्तित्वविषयक पेचप्रसंगांना प्रकाशझोतात आणणं हा असतो.

‘उबगलेला माणूस’ या कथेतल्या नायकाला सतत रितेपण जाणवतं. त्याला आपलं बोलणं नीट सुरू करता येत नाही. त्याला स्वतःच्या आत धडका मारणाऱ्या बेचैनीचा उगमबिंदू गवसत नाही. त्याला जगण्यातील प्रत्येक गोष्टीचा रंग उडाल्यासारखं वाटतं. त्याची अस्वस्थता ही त्याच्या वाट्याला येणाऱ्या प्रत्येक गोष्टीतील त्याच्या चिडचिडेपणातून व्यक्त झाली आहे. त्याला हव्या त्या पद्धतीने कोणतीही गोष्ट घडत नाही, त्याला हव्या असलेल्या गोष्टी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव त्याला हुलकावणी देत राहतात, तरीही तो एकामागून एक अशा अनेक गोष्टींत जीव रमवायचा अयशस्वी प्रयत्न करत राहतो. तो रितेपणा भेदण्यासाठी रात्रीच्या अडीच वाजता रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्याला थंडी वाजत असेल आणि म्हणून ते केकाटत असेल असं वाटून त्याच्या अंगावर मफलर टाकायला जातो आणि तो कुत्रा त्याच्यापासून लांब लांब पळत राहतो या प्रसंगातून तर वाचकाच्या मनात नायकाविषयी केवळ करुणाच पाझरते. त्याच्या रितेपणाचं पराकोटीपण मनाला विद्ध करतं.

ही कथा एका बाजूला आयुष्यातली निरर्थकता, सगळ्या मानवी संबंधात जाणवणारी व्यर्थता, कोणत्याही लहान-मोठ्या घटनेनंतर जाणवणारं रितेपण आणि दुसऱ्या बाजूला अवचित एखाद्या निसरड्या वळणावर, एखाद्या तरल क्षणी पुन्हा आयुष्याचा बलदंड हात आपल्याशी हस्तांदोलन करू पाहतोय असं वाटावं, अशी उन्मुक्तता अशा विरोधी भावनांचा प्रत्यय देते.

‘नदीकाठची सैर’ या कथेत गतकाळाला पांघरूणासारखं ओढून घेण्याची इच्छा असलेल्या नायकाला प्रत्येक गोष्ट हरवून जातेय आणि आयुष्य क्षणभंगुर, निरर्थक असल्याची जाणीव नदीकाठी सैर करायला गेल्यानंतर होऊ लागते. त्याला काही तरी कायमचं घट्ट पकडून ठेवायची इच्छा असते, पण काळाच्या प्रवाहात ते दूर निघून गेलेलं असतं. हा नायक मनाने भूतकाळातच अडकून पडलेला असतो. त्याला त्याच्या लहानपणीच्या, तारुण्यातल्या अनेक गोष्टी आठवत राहतात आणि त्या तो सात वर्षांच्या त्याच्या लहान भावाला सांगत असतो. मृत घोडा, लहान मुलाच्या शवाची चटई या प्रतिमा मृत्यूची अपरिहार्यता किंवा त्याची न टाळता येणारी आपल्या आसपासची उपस्थिती दर्शवतात.

वास्तव हे सतत परिवर्तनशील असतं. न बदलणाऱ्या वास्तवाची अपेक्षा करणं हेच मुळात वर्तमानापासून तुटल्याचं लक्षण आहे. भूतकाळ तर निघून गेलेला असतो. आणि हवा होऊन गेलेल्या भूतकाळाच्या खुणा वर्तमानात शोधत राहिल्यामुळे सामोऱ्या येणाऱ्या वेदनांच्या सळसळीला सहन करण्यापलीकडे काहीही उरत नाही. या नायकाच्या वाट्याला असाच काहीसा जगण्याचा तुकडा आलेला आहे, असं जाणवत राहतं.

जावेद यांना ‘कुबड’ या एका कथेसाठी पाच पारितोषिकं प्राप्त झाली आहेत. या कथेचा अनुवाद इंग्रजी आणि स्पॅनिश भाषांत झालेला आहे. वीस- पंचवीस वर्षं कधीच नमाज न पढलेल्या माणसाला ईदची नमाज पढावीशी वाटणं आणि त्यासाठी त्याने प्रचंड कष्ट घेऊन मशिदीच्या दिशेने निघणं, इथून या कथेला सुरुवात होते. आणि त्याच्या मशिदीपर्यंत पोहोचण्याच्या क्षणापर्यंत त्याचं सबंध आयुष्य त्याने जगलेल्या मूल्यांसह, यातनांसह उलगडत जातं.

वयाच्या एका टप्प्यावर सगळं हलाहल पचवल्यानंतर माणूस चांगल्या अर्थाने धार्मिकतेचा शोध घेऊ लागतो का किंवा निव्वळ खाजगी स्वरूपातील प्रार्थनेतून मनाला डागण्या देणाऱ्या भूतकाळापासून स्वतःची सुटका करण्याचा क्षीणसा प्रयत्न हा नायक करतोय का, असं वाटत राहतं. अन्यथा आजच्या धर्मात माफीला काहीही जागा नाहीय, न केलेल्या गुन्ह्यासाठी माफी मिळवणं हा अपमान आहे, हे ठाऊक असूनही तो पुन्हा याच धर्माच्या वळचणीला आला नसता. म्हणून माफी नाही तर नाही, पण किमान पश्चात्ताप व्यक्त केल्यानंतर तरी जिवाला आराम मिळेल, अशी भाबडी आशा त्याच्या मनात उमललेली पाहायला मिळते.

त्याच्या आयुष्यातील अपमानाच्या प्रसंगांची जी जंत्री तो सादर करतो. त्यातून त्याच्या विलक्षण वेदनांनी तुडुंब भरलेल्या जगण्याची कल्पना येते. त्याने सहन केलेल्या आघातांची जाणीव होते. त्याला वर्तमानात होणारे भास आणि गतायुष्यात घडून गेलेल्या वास्तवातील घटना या दोहोंच्या मध्ये हिंदकळणारी त्याची मनोवस्था वाचकाच्या मनावर चरचरीत ओरखडा उमटवते.

ही कथा एखाद्या व्यक्तीचं आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर त्याला मूलभूत वाटणाऱ्या श्रद्धा, धारणा यांसह जगण्याचा प्रयत्न करणं आणि त्यातून आयुष्याला काहीतरी आकार देण्यासाठी धडपडणं याचा आस्थेवाईकपणे विचार करायला प्रवृत्त करते. तसेच ही कथा व्यक्तिगत पातळीवरील धार्मिक ओढीची असोशी जशी व्यक्त करते तसाच सामूहिक पातळीवर धार्मिकतेच्या नावाखाली होणारा हैदोसहुल्लाही पात्रांच्या अगदी मोजक्या संवादांतून सूचित करते.

गेल्या काही वर्षांत जाणीवपूर्वक मुस्लीम समाजाविषयी इतर धर्मीयांच्या मनात नकारात्मक विचार पेरण्याचे प्रयत्न जोरकसपणे सुरू झाले आहेत. समाजमाध्यमांतून प्रसृत केले जात असलेले संदेश हे मुस्लीम समाजातील सर्व वयोगटांतील लोकांबद्दल घृणा, तिरस्कार आणि शत्रुत्वाची भावना निर्माण करणारे असतात.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

या पार्श्वभूमीवर या संग्रहातील ‘वाईट मोसमात’, ‘जन्मास न आलेलं प्रतिबिंब’, ‘कांगारू’ अशा काही कथा वाचल्या तर लक्षात येतं की, मुस्लीम समाजातील कौटुंबिक वातावरण, कुटुंबातील सदस्यांचे आपसांतील गुंतागुंतीचे संबंध, त्यांच्यासमोर असणारे जगण्याचे प्रश्न, त्यांना करावा लागणारा संघर्ष, प्रेम व मैत्री जपताना व मोडताना मनात उठणारा भावभावनांचा कल्लोळ, या बाबी जशा इतर धर्मीयांच्या जीवनात उपस्थित असतात, तशाच त्या मुस्लीम समुदायातील लोकांच्या जीवनातही असतात. फक्त घटनांचे तपशील व संदर्भ बदललेले जाणवतील. त्यामुळे या समुदायाला जाणीवपूर्वक, पद्धतशीरपणे सामाजिक स्तरावर आणि मानसिक पातळीवरदेखील ‘इतर’ या चौकटीत बंदिस्त करण्याचा जो कार्यक्रम राजकीय वरदहस्ताने राबवला जात आहे, त्याला छेद देण्याचा अल्पसा प्रयत्न या कथा करतात असं वाटतं.

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो. या दृष्टीने ‘नदीकाठची सैर’ ही कथा प्रातिनिधिक म्हणून पाहता येईल.

खालिद जावेद यांच्या उर्दू कथांच्या नजमा रहमानी यांनी केलेल्या हिंदी अनुवादावरून मराठी भाषांतर केलेलं आहे. काही ठिकाणी हिंदी अनुवादात स्पष्टता नसल्यामुळे पात्रांचं वय, ठिकाणांची नावं, घडत असलेल्या घटनांचा काळ अशा बाबींसंबंधी थेट मूळ लेखकाशी बोलून आवश्यक ते बदल केले. आहेत. काही शब्द आणि संकल्पना तसेच मुस्लीम समुदायातील रीतीरिवाज, लोकसमजुती यांच्या स्पष्टतेसाठी आवश्यक तिथे टिपाही दिलेल्या आहेत.

‘पेट की तरफ़ मुड़े हुए घुटने’ या कथेचा हिंदी अनुवाद समाधानकारक झालेला नाही, त्यामुळे त्याचा अनुवाद मराठीत करू नये, अशी सूचना खुद्द मूळ लेखकानेच केलेली असल्यामुळे ही कथा वगळण्यात आली आहे. या अनुवादाच्या कामासंबंधात गणेश विसपुते, जयप्रकाश सावंत, करुणा गोखले यांनी केलेल्या सूचना आणि मार्गदर्शन यांशिवाय मराठी भाषांतर प्रकाशित होणं शक्य नव्हतं. त्यांच्या मौलिक मार्गदर्शनामुळे मराठी संहिता अधिक परिपूर्ण, भाषांतर अधिकाधिक निर्दोष होण्यास साहाय्य झालं. मी त्यांचे तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि शरद पवार इन्स्पायर फेलोशिपशी संबंधित सर्व सदस्यांचेही मनःपूर्वक आभार मानतो.

‘कुबड आणि इतर कथा’ – खालिद जावेद, भाषांतर - विकास पालवे । पपायरस प्रकाशन, कल्याण । पाने - १८१ । मूल्य – ३५० रुपये।

..................................................................................................................................................................

लेखक विकास पालवे प्रकाशन व्यवसायात कार्यरत आहेत.

vikas_palve@rediffmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......