सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल
ग्रंथनामा - झलक
विनोद शिरसाठ
  • ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 11 March 2026
  • ग्रंथनामा झलक प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध Pravahasathi Pravahavirudhha विनोद शिरसाठ Vinod Shirsath

‘साधना’ साप्ताहिकात २०१३ ते २०२३ या दहा वर्षांच्या काळात लिहिलेल्या संपादकियांपैकी निवडक १०० संपादिकायांचा संग्रह असलेले ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ हे ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांचे भारदस्त आणि दमदार पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला त्यांनी लिहिलेल्या सविस्तर प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

१५ ऑगस्ट १९४८ रोजी साने गुरुजींनी सुरू केलेले ‘साधना’ साप्ताहिक मागील ७७ वर्षे अखंड प्रकाशित होत आहे. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन प्रसिद्ध करणाऱ्या साधनाची ओळख एक वैचारिक व परिवर्तनवादी नियतकालिक अशी राहिली आहे. गुरुजींच्या नंतर आलेल्या आचार्य जावडेकर, रावसाहेब पटवर्धन, यदुनाथ थत्ते, नानासाहेब गोरे, वसंत बापट, ग. प्र. प्रधान या संपादकांनी अनेक लहान-थोरांच्या साहाय्याने साधनाला सुवर्णमहोत्सवी वर्षापर्यंत आणले. त्यानंतरची पंधरा वर्षे डॉ. नरेंद्र दाभोलकर संपादक होते; त्यांची ओळख जरी अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रणेते अशी होती तरी, त्यांनी त्या पंधरा वर्षांत साधनाचा वसा व वारसा नुसताच जपला असे नाही, तर वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्या अखेरच्या दहा वर्षांत मी स्तंभलेखक, अतिथी संपादक, युवा संपादक, कार्यकारी संपादक अशा नात्यांनी त्यांच्याशी आणि साधनाशी जोडलेला राहिलो. डॉक्टरांना जाऊन आता बारा वर्षे झाली आहेत. पण ते गेल्यानंतरच्या दहा वर्षांतील, म्हणजे १५ ऑगस्ट २०१३ ते १५ ऑगस्ट २०२३ या काळातील, निवडक संपादकीय लेखांचे पुस्तक करावे असा विचार मागील तीन वर्षांपासून माझ्या मनात होता. हाच कालावधी समोर ठेवण्याचे आणखी एक कारण म्हणजे, साधना साप्ताहिकाची ६५ ते ७५ वर्षे असा हा कालखंड आहे. त्या दहा वर्षांतील चारशेपैकी निवडक शंभर लेखांचे पुस्तक करावे, असा विचार मनात होता. त्यामुळे अंतिम निवडीपर्यंत जाण्यासाठी काही गाळण्या लावाव्या लागणार होत्या.

गाळण्या लावताना, निश्चित व निर्णयात्मक भूमिका मांडणारे आणि त्यातही निर्विवाद वाचनीय असलेले लेख निवडायचे हे सूत्र मध्यवर्ती होते. अखेर १२० लेख उरले, त्यांनाही वाचनीयतेचे आणि कालसुसंगततेचे काटेकोर निकष लावून अंतिम शंभर संपादकीय लेख निवडले. ते सर्व लेख प्रसिद्ध झाले त्याच (तारखांच्या) क्रमाने पुस्तकात घेणे बऱ्याच विचाराअंती निश्चित केले. मात्र वाचकांची व अभ्यासकांची सोय लक्षात घेऊन, विषयानुसार लेखानुक्रम तयार केला आणि तो पुस्तकाच्या शेवटी टाकायचे ठरवले.

आपणच आपले उत्तम लेख निवडायचे ठरवले तरी अचूक निवड करता येईल याची मला खात्री होती. पण तरीही ती निवड करताना अस्वस्थ होतो. कारण या लेखांना त्या-त्या घटना-प्रसंगांचे बरेच संदर्भ आहेत. ज्यांना ते संदर्भ जास्त माहीत त्यांना त्यातील गंमत कळेल, ज्यांना ते नव्याने शोधण्यात रस असेल, त्यांनाही हे पुस्तक वाचावेसे वाटेल. पण असा वाचक असणार तरी किती, हा प्रश्न पुन्हा पुन्हा मनात येत होता. पण त्याच वेळी आणखी एक विचार मनात प्रबळ होता. तो असा की, व्यक्ती म्हणून मला स्वतःला बाजूला ठेवले तरी, त्या दहा वर्षांत साधनाच्या संपादकीय लेखांमधून कोणते महत्त्वाचे विषय हाताळले गेले, त्यातून काय भूमिका घेतल्या गेल्या, कोणते धोके अधोरेखित केले, कोणती भाकिते वर्तवली, कोणत्या समाजघटकांवर काय भाष्य केले, हे सर्व एखाद्या सूत्रात बांधून ठेवायला हवे; आज-उद्याच्या थोड्या का होईना वाचकांसाठी-अभ्यासकांसाठी उपलब्ध करून द्यायला हवे. म्हणजे माझ्या मनात हे पुस्तक तयार करताना कर्तव्यभावना जास्त तीव्र होती, ती नसती तर पुस्तक आलेच नसते. आणि स्वतःचे पुस्तक यावे ही भावना माझ्या मनात पुरेशी तीव्र नव्हती, ती असती तर हे पुस्तक दोन वर्षांपूर्वीच आले असते. कारण सर्व मजकूर तयार होता, निवड करणे आणि छापण्यासाठीचे अंतिम संस्करण एवढेच काय ते बाकी होते.

वस्तुतः, साधनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाची समाप्ती १५ ऑगस्ट २०२३ रोजी झाली, तेव्हाच हे पुस्तक यायला हवे होते. पण त्यानंतर दोन वर्षांनी येते आहे, हे एका अर्थाने बरेच झाले. पुरेसा कालावधी लोटल्याने त्या दहा वर्षांकडे अधिक निरपेक्ष पद्धतीने पाहता आले. आणि म्हणूनच २०२३ ते २५ या दोन वर्षांतील लेख या पुस्तकात घेतले नाहीत. याचे एक कारण, ती दहा वर्षे व्यवस्थित अधोरेखित व्हावीत, हे तर होतेच, पण अलीकडच्या दोन वर्षांतील लेखही निवडायचे ठरवले असते, तर एकूण लेखांचा आकडा शंभरमध्ये बसला नसता. आणि अर्थातच, अंतिम निवड करताना अलीकडच्या दोन वर्षांकडे निरपेक्षपणे पाहता येणे थोडे अवघड गेले असते.

तर अशा प्रकारे शंभर लेख निवडून झाल्यावर असे वाटले की, हे पुस्तक वाचणाऱ्या वाचकांना लिहिणाऱ्याचे मानस कळले, तर अधिक फायदा होईल का? अनेकांना त्याची गरज वाटत नाही, मला स्वतःला वाटते. म्हणजे लिहिणाऱ्याचे अंतरंग माहीत असतील, त्याचा दृष्टीकोन कळलेला असेल आणि त्याच्या विचारांचा गाभा व आवाका यांचा अंदाज आलेला असेल, तर त्या व्यक्तीने केलेले लेखन समजून घ्यायला निश्चितच अधिक मदत होते. अर्थात त्यामुळे त्या व्यक्तीचे गुणदोष आधीच माहीत होतात, परिणामी काही वाचकांच्या मनात काही पूर्वग्रह तयार होऊ शकतात. पण लेखकाविषयी अनभिज्ञ राहून त्याचे लेखन वाचणे हा एक पर्याय आणि लेखकाविषयी माहिती झाल्याने पूर्वग्रहासह त्याचे लेखन वाचणे हा दुसरा पर्याय असेल तर, मी केव्हाही दुसरा पर्याय निवडतो. त्यामुळे स्वतःच्या लेखनाचे पुस्तक तयार करताना मी दुसरा पर्याय निवडणे अगदीच साहजिक ठरते. मग, माझा दृष्टीकोन आणि विचारप्रक्रिया कळू शकेल असे काही पूर्वप्रसिद्ध लेख या पुस्तकाला परिशिष्ट म्हणून जोडता येतील का, याचा विचार करू लागलो. पाच लेख तसे सापडले, ते पाचही लेख २०१३-१५च्या दरम्यान प्रसिद्ध झालेले किंवा त्या वेळचे चिंतन असलेले आहेत. याचा अर्थ या पुस्तकातील सर्व संपादकीय लेख लिहिण्याच्या थोडेसे आधीचे किंवा त्या दरम्यानचे ते पाच लेख आहेत. हे एका दृष्टीने चांगलेच आहे. तर अशा प्रकारे शंभर संपादकीय लेख आणि पाच परिशिष्टे अशा १०५ लेखांचे हे पुस्तक आहे.

त्या दहा वर्षांत साधनाचे संपादकीय लेख लिहिताना विषयांची निवड कशी होत होती, ती लेखनप्रक्रिया कशी होती, ते कोणत्या परिस्थितीत लिहिले गेले, याविषयी सांगण्यासाठी हेच स्थळ योग्य आहे असे वाटते, म्हणून थोडक्यात सांगतो.

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

साधना साप्ताहिकाचे दर आठवड्याचे एक चक्र असते. प्रत्येक शुक्रवारी अंक छापायला जातो, सोमवारी पोस्टात पडतो आणि बुधवारी-गुरुवारी वाचकांच्या हातात पडतो. त्यामुळे प्रत्येक शुक्रवार, संपादकीय लेख वगळता उर्वरित अंक तयार करून प्रेसमध्ये पाठवण्यासाठी राखून ठेवला जातो. त्या अंकासाठी सर्व लेखांची निवड अंतिम करणे, गरजेनुसार ते कमी-जास्त करणे, अनुवाद-शब्दांकन तपासून घेणे, लेखांना प्रास्ताविक किंवा तळटिपा जोडणे, लेखांमध्ये वापरण्यासाठी चित्रे-छायाचित्रे निवडणे, मुखपृष्ठे व जाहिराती तयार करून घेणे इत्यादी काम संपवायचे असते. शिवाय, अगदी अचानक एक-दोन लेख नव्याने समाविष्ट करणे किंवा एक-दोन लेख उशिरा आलेले असतील तर त्यांचे कॉपी एडिटिंग करणे, ऐनवेळी काही लेख रद्द करणे किंवा पुढे ढकलणे इत्यादी प्रकार प्रत्येकच आठवड्यात होत असतात. त्यामुळे तो संपूर्ण दिवस भलत्याच धावपळीचा असतो. अंकाचा मजकूर तपासणारे, अक्षरजुळणी करणारे, मांडणी सजावट व मुखपृष्ठ करणारे यांच्यासोबत आदानप्रदान चालू असते. आणि प्रेसमधील कर्मचारी छपाईसाठी अंक कधी येतोय याची वाट पाहत असतात. या वेळापत्रकात फारसा बदल करता येत नाही.

परिणामी, या सर्व घटकांचा ताण संपादकावर असतो. त्यामुळे त्या दिवशी अगदीच महत्त्वाचे असल्याशिवाय कोणत्याही भेटीगाठी किंवा बैठका ठेवल्या जात नाहीत. मात्र प्रत्येक आठवड्यात अंक प्रेसमध्ये पाठवायचा असतो त्या दिवशी (न कळवता) अचानक भेटीला येणारे लोक तर असतातच. त्यातील काहींना तरी कमी-अधिक वेळ द्यावा लागतो. त्यातून मनातल्या मनात निर्माण होणारा ताण वेगळा असतो आणि तो दाखवता येत नाही ही अडचण आणखी वेगळीच.

तर अशी बरीच कसरत करून प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी अंक छापायला जातो. त्यातली गंमत अशी असते की, अंक छापायला सोडण्याच्या दिवशी जेवढे जास्त डोके लावाल (म्हणजे अचूक व आकर्षक अंक होण्यासाठी प्रयत्न कराल) तेवढे काम वाढत जाते, वेळही जास्त लागतो. आणि अचूकतेचा व आकर्षकतेचा आग्रह जेवढा कमी कराल तेवढे काम कमी होत जाते, मग वेळही पुरतो किंबहुना उरतो. माझी कार्यपद्धती शेवटपर्यंत काम करत परिपूर्णतेच्या दिशेने जाण्याची असते. त्यामुळे, येणारा ताण माझ्याबरोबरच सर्व सहकाऱ्यांना सहन करावा लागतो. अर्थातच, श्रमसाफल्याचा आनंद त्यांनाही मिळतो. त्यामुळे ‘अंकाचे काम झाले का?’ असा प्रश्न त्या दिवशी कोणी विचारला तर, ‘नाही झाले, वेळ संपली म्हणून अंक छापायला सोडला’ असे उत्तर आम्ही देत असतो.

अंक छापायला जाण्याचा दिवस इतका तपशीलवार सांगितला, याचे कारण संपादकीय लेखांचे विषय कोणत्या दिवशी व कोणत्या परिस्थितीत मनात आकार घेत असतात आणि ते लेख कसे लिहिले जातात, याची कल्पना थोडीबहुत यावी. तर अंक छापायला गेल्यावर, त्या दिवशी रात्री आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत एवढाच वेळ संपादकीय लेखनासाठी हाताशी असतो. अर्थात, तो अंक जुळवण्याचे काम आधीचे चार-पाच दिवस चालू असते, तेव्हा संपादकीय लेख कशावर लिहायचा हा विचार मनात घोळत असतो. त्या काळात काही विषय मनात चमकतात व निघून जातात, काही विषय चमकतात व रुजतात, तर काही विषय अगदी शेवटच्या क्षणी उगवतात आणि तेच अंतिम होतात. त्या विषयावर आपली पूर्वतयारी किती आहे, नसेल तर ती करायला वेळ आहे का, त्या विषयावर आपल्याकडे सांगण्यासारखे काही आहे का, वेगळे काही सांगण्यासारखे असेल तरी त्या लेखन विषयाला पूर्णत्व आलेले आहे का, तो अंक वाचकांच्या हातात पडेपर्यंत त्या विषयासंदर्भात काही बदल झालेले असतील का, तो विषय दैनिके व अन्य माध्यमांनी संपवून टाकलेला असेल का, इत्यादी प्रश्न मनात असतात.

शिवाय, त्या अंकामध्ये अन्य कोणते लेख आहेत, आणि मुखपृष्ठकथा कशावर आहे, हा विचार करून त्या आशयाला पूरक किंवा पुढे घेऊन जाणाऱ्या विषयाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे संपादकीय लेख लिहिताना ढोबळमानाने दोन स्तरांवर विचार चालू राहतो. परिचित विषयावर अपरिचित असे काही उपलब्ध वेळेत सांगता येणार आहे का आणि अपरिचित किंवा आडबाजूचा विषय पुढे आणून उपलब्ध वेळेत लिहिता येणार आहे का? म्हणजे ‘उपलब्ध वेळ’ हाच माझ्यासाठी तरी संपादकीय लेख चांगला होण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा घटक ठरत आला आहे.

पूर्ण लांबीचे व विशिष्ट विषयावर गांभीर्याने लिहिलेले (दोन-तीन पानांचे) संपादकीय लेख लिहितानाही, मी तरी ऐनवेळी केलेली तयारी फार कमी असते. आवश्यक ते आकडे, वर्ष-तारखा, व्यक्तींची नावे, उदधृत करायची असतील तर ती विधाने आणि तत्सम थोडे तपशील (आता गुगलवर आणि पूर्वी पुस्तकांतून किंवा दैनिकांतून) मिळवणे एवढीच माझी ऐनवेळची तयारी असते. ऐनवेळी अभ्यास करून परीक्षेचे पेपर लिहिणे, ही सवय मला शाळा-कॉलेजात नव्हती आणि संपादकीय लेख लिहितानाही नाही. साहजिकच, एखादा विषय अगदी अचानक उद्भवला, तर आधीची तयारी होती म्हणून त्यावर लिहिले किंवा तो विषय एक-दोन आठवडे पुढे ढकलून, आवश्यक तयारी केली आणि मग लिहिले असेच माझ्याबाबत घडत आले आहे.

मात्र इथे आवश्यक पूर्वतयारी म्हणताना मला फक्त डेटा व फॅक्ट्स एवढेच अपेक्षित असते; त्या विषयावर विश्लेषण करण्याची किंवा भाष्य करण्याची तयारी बरीच आधी झालेली असणे आवश्यक असते. अर्थातच, लेखन करताना अशी मानसिक स्थिती असल्यामुळे अन्य कोणी लिहिलेल्या विषयावर, त्याच पद्धतीने (कळत- नकळत कॉपी करून) लिहिणे मला शक्य होत नाही. किंबहुना आपल्या मनात जे विचार आहेत, तेच अन्य कोणी साधनात किंवा अन्यत्र जवळपास त्याच पद्धतीने मांडले असतील, तर त्या विषयावर लिहिणे मी टाळले आहे. त्यामुळे साधनात काही वेळा असे उत्तम लेख येतात की, त्या विषयावर संपादकीय लिहिण्याची गरज मला वाटत नाही.

साहजिकच, निवडलेल्या विषयावर संपादकीय लेख लिहिताना मनात येणारा पहिला विचार हा असतो की, विषयाची पार्श्वभूमी वाचकांना कळावी, त्या विषयाच्या विविध बाजू समोर याव्यात, त्यातील गुंतागुंत उलगडण्याचा प्रयत्न करावा आणि योग्य-अयोग्य ठरवणारी भूमिका मांडता यावी. आता तर हे संपादकीय लेख वाचनीय असायलाच हवेत, पण भविष्यातील वाचकांनाही ते समजायला अडचण येऊ नये. त्यासाठी भाषा सुबोध व स्पष्ट असावी, मांडणीत संदिग्धता नसावी, टीकात्मक सूर लावतानाही शेरेबाजी टाळावी. आणि अर्थातच, आपल्या आकलनाच्या अलीकडे दोन पावले थांबावे.

थोडक्यात, संपादकीय लेख लिहिताना माझ्या मनात गणिती प्रक्रिया चालू असते. त्यासाठी मनात एखादे सूत्र आकाराला यावे लागते, किमान एखादी विचारसाखळी किंवा त्या विषयाची चौकट दिसावी लागते. यांपैकी काहीच घडत नसेल, तर त्या विषयावर पूर्ण लांबीचे संपादकीय लेख लिहिणे मी टाळलेले आहे.

मात्र साधनातील प्रत्येक लेख पूर्ण लांबीचा व्हावा आणि त्या विषयाच्या संदर्भात भूमिका मांडून तो पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा असते; माझी आणि असंख्य वाचकांचीही! ती भूमिका ढोबळमानाने पुरोगामी असणार हे तर उघड असते. म्हणजे जात, धर्म, भाषा, प्रांत, लिंग या पाचही घटकांच्या बाबतीत अधिकाधिक उदारमतवादी किंवा संकुचितपणाला विरोध करणारी. पण ते खूप सहजतेने किंवा आपोआप घडते, त्यासाठी मला किंचितही सायास करावे लागत नाहीत. कारण माझा स्वाभाविक पिंड व व्यक्तिमत्त्व आणि साधनाचा वारसा व वसा यात अंतर्विरोध नाही.

परिणामी, संपादकीय लिहिताना त्याबाबतीत माझ्यावर अजिबात ताण नसतो. मात्र ती भूमिका सम्यक सकारात्मक दृष्टीकोनातून यावी असा माझा आग्रह असतो. ते करताना आपला तोल जाण्याची भीती मला नसते, पण वाचक-हितचिंतक त्याचा कसा अर्थ लावतील, याची थोडीशी चिंता असते. कारण सम्यक सकारात्मक दृष्टीकोनातून विचार केला तर अनेक चांगल्या ठिकाणी वाईट काहीतरी दिसते आणि अनेक वाईट ठिकाणी चांगले असे काहीतरी दिसते. ते दोन्ही कमी-अधिक प्रमाणात अधोरेखित करायचे, तर कोणाची तरी नाराजी ओढवणारच.

सर्व बाजूंनी सहानुभूतीपूर्वक विचार करायचा आणि प्राप्त परिस्थितीतून पुढे जाण्यासाठी त्यातल्या त्यात चांगला मार्ग काढायचा किंवा सुचवायचा किंवा त्याचे समर्थन करायचे, हाच त्या दृष्टीकोनाचा गाभा असतो. मात्र पुरोगामी वर्तुळातील अनेकांना असा दृष्टीकोन नको असतो. त्यांना टोकदार विरोध प्रत्येक वेळी प्रखर शब्दांत (त्यांना हव्या त्या पद्धतीने) व्यक्त होणे अपेक्षित असते. अर्थातच ती अपेक्षा मला तरी पूर्ण करता येत नाही.

पुरोगामी वर्तुळात असाही एक वर्ग असतो, ज्याला सतत ‘पोलिटिकली करेक्ट’ भूमिका घ्यावी असे वाटत असते. वस्तुतः व्यक्तीसाठी किंवा लढाऊ कार्यकर्त्यांसाठी तो गुण असला तरी वैचारिक नियतकालिकाच्या संपादकासाठी तो अवगुण असतो. अर्थात ती अपेक्षा मूलतः वावगी नसली तरी, ती अपेक्षा बाळगणाऱ्यांच्या मनातील ‘पोलिटिकली करेक्ट’चा अर्थ सदोष असतो. आपल्या बाजूच्या लोकांना अडचणीचे प्रश्न विचारू नयेत, महत्त्वाच्या प्रसंगी आपल्या बाजूचे नकारात्मक काही दाखवू नये, आपल्या बाजूच्या व्यक्ती-संस्था-संघटना-पक्ष यांच्यावर टीका करू नये, अशी ती अपेक्षा असते. त्याही पुढे जाऊन त्यांची अशीही अपेक्षा असते की, जे लोक काल-परवा आपल्या बाजूला नव्हते (आणि भविष्यातही कदाचित नसतील), पण आज आहेत तर त्यांच्यावर टीका कशाला? मला हे आग्रह कधीच पटले नाहीत. आपली बांधिलकी जर विचारांशी व वर्तनाशी असेल, मूल्यांशी व ध्येयधोरणांशी असेल, तर आपले व परके हे त्याच निकषावर ठरवायला हवे, अशी माझी धारणा राहिली आहे. त्यामुळे असा प्रकार अनेक संपादकीय लेखनातून मी केला, तेव्हा तो अनेकांना आवडला नाही. उदाहरणार्थ, राहुल गांधी, नीतिश कुमार, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे यांच्यावर ते पुरोगाम्यांच्या बाजूने असतानाही वेळोवेळी टीका केली आहे.

दुसऱ्या बाजूला राजकीय बाबतीत उदारमतवादी किंवा उजवीकडे झुकलेल्या लोकांना साधनाच्या संपादकीय लेखांमधून केलेली राजकीय टीका नेहमीच अतिरिक्त वाटली. त्यांचा तो आक्षेपही मला कधी पटला नाही, याचे कारण साधनाची व माझीही भूमिका उघड उघड ‘लेफ्ट टू द सेंटर’ असेल, तर अतिरिक्त उजव्यांच्यावर अतिरिक्त टीका होणे अपरिहार्य ठरते.

मात्र त्यांचा एक मोठा आक्षेप असा असतो की, ‘तुम्हाला उजव्यांचे चांगले काहीच का दिसत नाही किंवा तुम्ही उजव्यांच्या चांगल्या गोष्टींचे कधीच कौतुक का करत नाही?’ हा आक्षेप अगदी बरोबर आहे. चांगल्या गोष्टीसाठी राजकीय उजव्यांचे कौतुक साधनाच्या संपादकीय लेखनातून होत नाही आणि साधनातील अन्य लेखनातूनही क्वचितच होते. मात्र त्या संदर्भात माझा इतकाच दावा आहे की, उजव्यांच्या ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या त्यावर संपादकीयांतून टीका केलेली नाही. (उदाहरणार्थ, कल्याणकारी योजना कार्यक्षम पद्धतीने राबवल्या जातात तेव्हा. किंवा महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर केले तेव्हा...)

साधनाच्या संपादकीय लेखनातून आर्थिक बाबतीत उजव्या शक्तीवर प्रखर टीका झालेली नाही, असे कोणी म्हणताना दिसत नाही, पण ते खरे आहे. मात्र त्याचे प्रमुख कारण, अर्थकारणाच्या संदर्भात साधना खूपच कमी लेखन प्रसिद्ध करते, मुळात तसे लेखन मराठीत कमीच होते. शिवाय ठोकळेबाज विरोध करण्याला अर्थ नाही, म्हणून तसे लेखन प्रसिद्ध करण्यापेक्षा न केलेले बरे असे मी मानतो. आंतरराष्ट्रीय राजकारणाबाबतही साधनात खूप कमी लेखन येते. त्याचेही कारण, तसे लेखन होण्याला मराठीत अंगभूत मर्यादा आहेत. एकंदरीत विचार करता अर्थकारण व आंतरराष्ट्रीय राजकारण या दोन्ही विषयांत मागील दशकातही साधनाला मनात असून व प्रयत्न करूनही फार कमी करता आलेले आहे.

मात्र अगदीच कळीचे किंवा मोठ्या वादाचे म्हणता येतील असे काही राष्ट्रीय स्तरावरचे विषय दीर्घकाळ चर्चेत असतात. त्या विषयांच्या संदर्भात, साधनाच्या संपादकीय लेखनातून सुस्पष्ट व निःसंदिग्ध भूमिका घेतल्या. त्याबाबत थोडे सांगायला हवे.

नक्षलवादाच्या संदर्भात गेल्या दहा वर्षांत खूपच कमी लेखन साधनातून आले, पण त्या आधीच्या पाच-सहा वर्षांत नक्षलवादाविषयी साधनातून जितके लेखन आले, तेवढे मराठीत तरी अन्य कोणी प्रसिद्ध केलेले नाही. नैतिक, तात्त्विक व व्यावहारिक या तीनही दृष्टीने नक्षलवाद त्याज्य आहे, अशी भूमिका आम्ही साधनातून घेतली. तेव्हा काही लहान-थोरांनी नाराजी व्यक्त केली. त्याचे कारण ते नक्षलवादाचे पाठीराखे होते असे नाही, पण अशा पद्धतीने कठोर टीका केल्यामुळे आदिवासींचे शोषण करणारे पोलीस, प्रशासन व भांडवलदार वर्ग यांना उचलून धरल्यासारखे होते, असा त्यांचा आक्षेप होता. मात्र त्या संदर्भात साधनाने घेतलेल्या सुस्पष्ट भूमिकेमुळे ओपिनियन मेकर वर्गात नक्षलवादाविषयीचा भाबडेपणा कमी झाला.

या दशकात मुस्लीम समाज सुधारणांच्या संदर्भात आग्रही भूमिका मांडल्या, तेव्हा काही पुरोगामी गटांतून हलक्या स्वरूपात का होईना नाराजी व्यक्त केली गेली. पण हमीद दलवाईंच्या वैचारिक वारशाला उजाळा देण्याचा तो प्रयत्न असल्याने आणि पूर्वी दलवाईंची पाठराखण करण्यात साधनाच आघाडीवर असल्याने. ती नाराजी मर्यादित स्वरूपात राहिली. दलवाईंना उचलून धरले तर सर्वसामान्य मुस्लीम समाज दूर जातो आणि हिंदुत्ववादी शक्ती त्याचा गैरफायदा घेतात, असा एक आक्षेप घेतला गेला (इथेही पोलिटिकली करेक्ट राहण्याचा आग्रह दिसला). पण मुस्लीम समाज सुधारणेविषयी आग्रही भूमिका घेताना साधनाने हिंदुत्ववाद व सांप्रदायिकता यांना केलेला प्रखर विरोध दिसत आल्याने, ती नाराजी पुढे पुढे मावळली.

गंमत अशी की, मुस्लीम समाज सुधारणांच्या संदर्भात हमीद दलवाईंची भूमिका लावून धरली की, उदारमतवादी व उजवीकडे झुकलेले वाचक खूश होतात, पण दलवाईंनी हिंदुत्वावर व एकूण सांप्रदायिकतेवर केलेली टीका पुढे आणली, तेव्हा त्यांना ती मानवली नाही. त्या संदर्भात असा दावा करता येईल की, हमीद दलवाईंना ‘हायजॅक’ करण्याच्या उजव्यांच्या प्रयत्नाला रोखण्यात साधनाने महत्त्वाची भूमिका बजावली.

या दशकाचे महत्त्वाचे राजकीय वैशिष्ट्य म्हणजे, आम आदमी पार्टीचा उद्गम, विकास आणि घसरण. त्यांच्या मनातील ‘स्वराज्य’ या अर्ध्या कच्च्या कल्पनेला साधनाच्या संपादकीयातून विरोध केला. मात्र प्राप्त परिस्थितीत सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, तेव्हा त्याचे स्वागतही केले. म्हणजे आम आदमी पार्टीबद्दल साधनाची भूमिका बदलली असे नाही, तर ती पार्टी बदलली म्हणून तिच्या संदर्भातील विरोध नंतर स्वागतामध्ये रूपांतरित झाला. “हम ‘आप’ के हैं कौन?” या संपादकीयातून ती भूमिका नेमकेपणाने आली आहे.

आरक्षण हा विषय देशामध्ये गेल्या तीन दशकांत विशेष चर्चेचा आणि वादाचा राहिला आहे. मला नेहमीच असे वाटत आले आहे की, आरक्षण या विषयावर खऱ्या अर्थाने रॅशनल म्हणावी अशी आपली भूमिका आहे. गेल्या दशकात मराठा समाजाला आरक्षण या मागणीमुळे त्या विषयावर संपादकीय लिहिण्याचे अनेक प्रसंग आले. त्यातील निवडक चार लेख या पुस्तकात घेतले आहेत. मात्र अशा प्रकारची भूमिका कोणीही घेतलेली नाही याची खंत तर आहेच, पण मराठा आरक्षणावर साधनेतून इतके स्पष्ट लिहूनही त्याचा परिणाम कुठेही दिसला नाही, हे आणखी खेदजनक!

साधनाच्या संपादकीयांमध्ये संविधानातील मूल्ये, मूलभूत संकल्पना यांच्यावर वेळोवेळी भर दिलेला आहे. किंबहुना ‘या पुस्तकातील तंत्रशुद्ध लेखन कोणते?’ असे मला विचारले, तर ‘कायदा, न्याय आणि संविधान’ या संदर्भातील लेखांचा उल्लेख मी करीन. त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी त्याला वेळोवेळी पसंतीची पावती दिली आहे, त्यात लावलेले अर्थ अचूक असल्याचे म्हटले आहे. पण त्याला अपवादही आहेत. उदा. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत दोन मतदार संघांतून राहुल गांधी उभे राहिले तेव्हा त्यावर टीका करणारा संपादकीय लेख लिहिला, त्यावर काही हितचिंतकांची नाराजी आली. पण २०१४मध्ये नरेंद्र मोदी दोन ठिकाणी उभे राहिले, तेव्हाही त्याला विरोध करणारा संपादकीय लेख लिहिला होता. त्या दोन्ही लेखांतून ती तरतूद संविधानिक दृष्टीने चूक आहे, असे आग्रही प्रतिपादन केले आहे. भविष्यात ती तरतूद रद्द होईल, असा माझा ठाम विश्वास आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

‘मृत्यूलेख ही पत्रकाराची सर्वांत मोठी कसोटी असते आणि त्या कसोटीला हा अत्रे पुरेपूर उतरला आहे’, असे आचार्य अत्रे म्हणायचे. ते खरे आहे. मी अत्रे यांच्या पद्धतीने नाही लिहिले कधी, परंतु एखादी व्यक्ती परिचित असेल किंवा तिचे विचार आणि कार्य याबाबत माझा अभ्यास वा अनुभव असेल, तर मी लिहिलेले मृत्यूलेख चांगले उतरतात. तशा प्रकारचे काही मृत्यूलेख या पुस्तकात आहेत. तो प्रत्येक लेख लिहून पूर्ण होताना अगदी नकळत माझ्या डोळ्यांत पाणी आले होते. शितल आमटेंच्या आत्महत्येनंतर आनंदवनाच्या संदर्भातील लेख कमालीच्या विमनस्क स्थितीत लिहिला होता. तेव्हा माझ्या मनात केवळ ‘आनंदवन’ नव्हते, आनंदवनातून ऊर्जा घेऊन बाहेर पडलेल्या हजारो लोकांचे नाउमेद झालेले चेहरे होते. तो लेख त्यांना समोर ठेवून लिहिला होता आणि त्यावर आलेल्या बहुतांश प्रतिक्रियाही ‘आम्हाला स्वस्थता आली’ अशाच होत्या.

माझ्यासाठी मोठे आश्चर्य हे आहे की, २०२० या वर्षी जागतिक स्तरावर कोरोना संकट होते, तेव्हा आठ-दहा संपादकीय लेख त्याच संदर्भात लिहिले होते. ते तुलनेने लहानही होते. तेव्हा आणि नंतरही मला वाटले होते की, निवडक संपादकीय लेखांचे पुस्तक येईल तेव्हा त्यात हे लेख समाविष्ट करण्याची गरज पडणार नाही. पण चार वर्षांचा काळ लोटल्यावर आणि हे पुस्तक तयार करत असताना वाचल्यावर वाटले की, वेगळेच व अनपेक्षित समाधान देणारे ते लेख आहेत. विशेष म्हणजे सारे जग संकटात असताना आपण भलताच बॅलन्स राखून विचार करत होतो; आणि मोठ्या आत्मविश्वासाने लिहीत होतो, त्यातला आशावाद आणि धोक्याचे इशारे पोकळ ठरले नाहीत, असे मागे वळून पाहताना वाटते.

पुस्तकातील सर्वच संपादकीय लेखांविषयी इथे सांगण्याची गरज नाही. मात्र या पुस्तकात असेच लेख निवडलेले आहेत, जे परिपूर्णतेच्या जवळ जाणारे आहेत, जे आज-उद्याच्या वाचकांना वाचायला आवडतील आणि मुख्य म्हणजे त्या दशकात साधनाची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक बाबतीत भूमिका काय राहिली हे दाखवू शकतील. कदाचित या लेखनाचे मोल आज आहे त्यापेक्षा भविष्यात थोडे जास्त असेल.

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होत असतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल. अर्थातच, एका प्रवाहासाठी दुसऱ्या प्रवाहाविरुद्ध आणि एका प्रवाहासाठी त्याच प्रवाहाविरुद्धही! इथे मला विरोधासाठी विरोध अपेक्षित नाही, रचनात्मक वाटचाल अभिप्रेत आहे!

‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ - विनोद शिरसाठ । साधना प्रकाशन, पुणे । पाने - ५८४ । मूल्य – ७०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......