अजूनकाही
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
वाचायचा नाद कधीपासून जडला हे आठवत नाही आता, पण वाचनावर लिहायला लागलो तेव्हा चाळीशीपार झालो होतो, त्याला मात्र जेमतेम दहा वर्षं झाली. आधी वाचायचो, क्वचित काही फार आवडले तर डायरीत आपल्यापुरते नोंदवून ठेवायचो. संपादनात पंधरा-वीस वर्षं गेली. त्यातही निमित्तापलीकडचे काही लिहिल्याचे आठवत नाही, स्थानिक वृत्तपत्रांत काही टिपणे लिहिली तेवढेच. अगदी फेसबुकवरही पहिली पाच-सहा वर्षं मूक प्रेक्षकच होतो. क्वचित वाचलेल्या पुस्तकांची नावं टाकायचो. पण कसे कुणास ठाऊक, राम जगताप यांना त्यांचे ‘अक्षरनामा’ हे वेब पोर्टल सुरू करताना माझी आठवण झाली. त्यांनी मी त्या पोर्टलवर सुरुवातीपासूनच नियमित लिहावे, असा आग्रह केला. तेव्हा त्या काळात वाचत होतो त्या इस्लाम आणि त्या आधारावर निर्माण झालेल्या पाकिस्तानशी संबंधित पुस्तकांवर एक लेख लिहिला. ‘अक्षरनामा’वर तो त्याच नावाने पहिल्या आठवड्यातच प्रकाशित झाला. दोन-तीन दिवसांत लेखाला चांगला प्रतिसाद मिळतोय, ट्विटरवर पण त्याची लिंक अनेकांनी रिट्विट केली, असे राम जगताप यांनी कळवले तेव्हा आनंदाइतकेच आश्चर्य वाटलेले. तेव्हा वाटलेल्या चिमूटभर आत्मविश्वासातून मग आवडलेल्या पुस्तकांवर लिहायला लागलो. सुरुवातीचे बहुतेक लेख ‘अक्षरनामा’वरच आले.
सोलापुरात तेव्हा ‘निहारिका पुस्तकप्रेमी’ या नव्याने सुरू झालेल्या अनौपचारिक गटाच्या मासिक बैठका होत. तिथे तासभर कुणी आवडलेल्या पुस्तकावर बोलावे न् मग त्यावर उपस्थितांत थोडी चर्चा असे. ऐकणारे पाच-सातपासून तीस-पस्तीसपर्यंत कितीही जण असत. सगळे ओळखीचेच. त्यामुळे छान अनौपचारिक टोन असे. तेव्हा मी इतकी पुस्तकं वाचलेली असत की, एखाद्या पुस्तकावर तासभर बोलण्यापेक्षा एकाच विषयासंदर्भातल्या चार-सहा पुस्तकांवर बोलायचो. अन्य कुणी बोलणार नसेल, तेव्हा माझी आठवण करा असे सांगूनच ठेवले होते तिथे. बोलण्याचा आत्मविश्वास नव्हता तेव्हा (आताही फारसा नाहीच) तर टिपणे काढायचो आणि ती समोर ठेवून बोलायचो. या पुस्तकात समाविष्ट काही लेख हे या टिपणांमधून नंतर तयार झाले. आधी ‘अक्षरनामा’वर आणि मग अन्यत्रही प्रकाशित झाले.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
औपचारिक प्रकाशन झाल्यानंतर लेखकाचे बोट सुटते, तशी जत्रेत आईचा हात सुटून गेलेल्या लेकरासारखी सैरभैर होतात पुस्तकं. त्यामुळे वाचकाला भेटतात तेव्हा संवादाचं बोट पकडण्यासाठी अतीव उत्सुक असतात ती. ‘क्वालिटी टाईम’ म्हणतो तसा वेळ दिला की, साहजिकच त्याच्याशी ती अधिक मोकळा, आतला जिव्हाळ संवाद करतात. वाचनात आपणही त्यांच्यासोबत ‘पूर्ण उपस्थित’ मात्र असायला हवे. हे इंगित असे शब्दांत मांडता येण्याइतके नव्हते मनात अजिबात, पण असंख्य पुस्तकांशी अनावर संवाद होत गेला तेव्हा जाणवलेले.
पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी. त्यातून विंधणारे शारीर-मानसिक अनुभव सहजच मागे टाकता आले. या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याचा काही विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
तरी या लेखांचे पुस्तक होऊ शकेलसे वाटले नव्हते कधी. उलट फेसबुकवर लिहायचो त्या पुस्तकं आणि वाचनासंबधीच्या पोस्ट्स आणि डायरीतल्या नोंदी यांचच आधी पुस्तक आलं, ‘वाचनप्रसंग’ शीर्षकाने. लेखनाची अशीच अनावर असोशी असलेला तरुण लेखक प्रणव सखदेव याने या आणि अशा लेखांचे पुस्तक होऊ शकेल असे आधीच सुचवले होते. तरी मी बराच वेळ घेऊन हे बाड प्रदीप चंपानेरकर सरांकडे सोपवले, तेव्हा ‘रोहन’चा अलिकडचा लौकिक पाहता मनात धाकधूक होती. पण दरम्यान ‘रोहन साहित्य मैफल’मध्ये समकालीन पुस्तकांवर लिहिण्यासंदर्भात सरांशी संपर्क आणि काही संवाद झालेला. ‘आपण करू’ असे ते सहज म्हणाले, तेव्हा फार आनंद वाटलेला. मग रोहनच्याच संपादिका अनुजा जगताप यांच्या पारखी नजरेखालून हा ऐवज गेला, त्यांनी ते बारकाईने वाचून मौलिक सूचना केल्या.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
आपण कितीही ताटस्थ्याचा आव आणला तरी प्रेमात असतो आपल्या निर्मितीच्या. असे कुणी वेगळ्या, समोरच्या नजरेने ते पाहणे गरजेचे असते. अनुजा यांच्या सूचना विचारात घेऊन लिखाण पुन्हा एकदा नजरेखालून घातले, काही बदल केले. काही त्यांनी सुचवलेले, काही परत वाचताना मलाच जाणवलेले. काही वगळलेही. आधी वाटले होते त्यापेक्षा पुस्तक आता अधिक आटोपशीर, पण सुघड वाटतेय ते त्यामुळे. अचूक मुद्रितशोधन करणारे रवींद्र पाथरे व नेहा वैशंपायन यांचे आभार.
कमी वेळेत जास्तीत जास्त चांगले टाईपसेटिंग करणारे अरविंद आरतीविष्णू राजंदेकर यांचेही आभार. ‘साहित्य मैफल’मध्ये प्रदीपसरांच्या प्रेरणेने तीन वर्ष सलग लिहिले त्यामुळे रोहन परिवाराचे आभार मानत नाही, त्यांच्याशी दीर्घकालीन संवादाची ही नवी सुरुवात आहे असे सोयीस्करपणे समजतो. लेखनातले नेमके मर्म जाणवणारा कलावंत मुखपृष्ठ मांडणीसाठी लाभावा याचा योग असावा लागतो. सतीश भावसार यांच्या रूपाने तो या पुस्तकाच्या कुंडलीत उगवला याचा आनंद आहे. पुस्तकाला सुशोभित करणारी समर्पक रेखाचित्रे साकारणारे चंद्रशेखर बेगमपुरे यांचेही आभार.
त्र्यं. वि. सरदेशमुख आणि निशिकांत ठकार दोघेही माझ्यासोबत कायमच असतात, लेखनात संदर्भ असो वा नसो. स्नेहा अवसरीकरचा पाठीवरचा हातही असाच मायेचा म्हणून गृहित धरलेला. नेत्रा आणि मुली याही निर्मितीत न सांगता आहेत, तसेच शिरीष घाटेही... आणि या सगळ्या आपल्यांपलीकडेही आहेत अथांग पसरलेली पुस्तकं. ती नसती तर मी ‘मी’ असतो का? नसतोच बहुदा...
‘वाचून उरणारी पुस्तकं’ - नीतिन वैद्य | रोहन प्रकाशन, पुणे | पाने – १६९ | मूल्य – ३५० रुपये
.................................................................................................................................................................
nitinvaidya2708@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.

Post Comment