प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे
ग्रंथनामा - झलक
निशिकांत भालेराव
  • ‘मोहोळ’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 11 March 2026
  • ग्रंथनामा झलक प्रवीण बर्दापूरकर Praveen Bardapurkar मोहोळ Mohol

ज्येष्ठ संपादक, लेखक प्रवीण बर्दापूरकर यांच्या लवकरच प्रकाशित होणाऱ्या ‘मोहोळ’ या व्यक्तीपर पुस्तकाला ज्येष्ठ संपादक निशिकांत अनंत भालेराव यांनी लिहिलेली ही प्रस्तावना -

.................................................................................................................................................................

माणसांचं काही खरं नसतं. कोण, कधी, कसा वाटेल ते समजणं अवघडच. चांगली जवळची माणसं अचानक शत्रुत्व घेतल्यासारखी वागतात, तर ज्यांचा भरवसा वाटत नाही, ते एकदम जिव्हाळा दाखवतात. शाळेतील खरे चड्डी दोस्त, कॉलेज-हॉस्टेलमधील यार, प्रत्यक्ष कामधंद्याच्या वेळी भेटलेले आणि प्रापंचिक जगातील माणसं; प्रत्येकाच्या तऱ्हा वेगळ्या!

आणि जर निरीक्षण करून पाहण्याचा छंद असेल, तर माणसाच्या–व्यक्तीच्या तऱ्हा इंद्रधनूसारख्या भासतात, दिसतात. माणसाच्या स्वभावातील गुंतागुंत, त्याची ध्येयासक्ती, स्वार्थ, अहंकार, जिद्द, एकारलेपण, हळुवारपणा, मूर्खपणा, व्यासंग, चिकाटी, नाटकीपणा असे कितीतरी गुण म्हणा वा तऱ्हा दिसू लागतात. उर्दू शायरीमध्ये मानवी स्वभावातील गुंतागुंत, स्वार्थ, अहंकार आणि माणुसकी यावर अत्यंत खोलवर भाष्य केलं आहे. मानवी स्वभावाला उर्दूत ‘इन्सानी फितरत’ असं म्हटलं जातं.

मिर्झा गालिब यांनी मानवी स्वभावाविषयी असं म्हटलं आहे की,

“बस-कि दुश्वार है हर काम का आसां होना,

 आदमी को भी मयस्सर नहीं इंसां होना।”

(प्रत्येक गोष्ट सहज साध्य होणं कठीण आहे; अगदी एका ‘माणसा’ला खऱ्या अर्थानं ‘माणूस’ होणंही तितकंच अवघड आहे.)

मराठी कवींनीसुद्धा मानवी स्वभाव-मुखवटे धारण करून करून वावरणारे लोक, माणसाचा अहंकार यावर भाष्य केलं आहे. शांताबाई शेळके यांनी,

“चेहरा तुझा निराळा आणि मन तुझे निराळे,

शब्दांतून अमृत, पण कृतीमध्ये विष निराळे...”

या दोन ओळींतच माणसाच्या तऱ्हांचा लसावि काढलाय.

अल्बर्ट आइन्स्टाईननं, “दोन गोष्टी अनंत आहेत : ब्रह्मांड आणि माणसाचा मूर्खपणा; आणि मला ब्रह्मांडाबद्दल खात्री नाही.” असं म्हणत माणसाचं चित्रच काढून ठेवलंय. मराठी साहित्यात व्यक्तिचित्राला केवळ, ‘कोणीतरी कसा होता’ एवढीच मर्यादा कधीच राहिलेली नाही. इथं व्यक्तीपेक्षा मोठा असतो माणूस आणि माणसापेक्षा मोठा असतो, त्याचा काळ. शब्दचित्रांच्या या परंपरेत व्यक्ती ही केंद्रस्थानी असली, तरी तिच्या अवतीभवती समाजाची धडपड, मूल्यांची ओढाताण आणि जगण्याची अस्वस्थ स्पंदनं सतत जाणवत राहतात.

मराठी साहित्यात व्यक्तिचित्र लेखनाची समृद्ध परंपरा आहे. काही व्यक्तिचित्रं चिकित्सक गुणवत्तेमुळे, काही सामाजिक आशयामुळे, तर काही शैलीमुळे गाजली. पु. ल. देशपांडे, वि. स. खांडेकर, ना. सि. फडके, ना. धों. महानोर, दुर्गा भागवत यांनी व्यक्तिचित्रं अजरामर करून ठेवलीत. भालचंद्र नेमाडे यांच्यासारखे लेखक वास्तवातील अनेक जण चतुष्टकातून आपल्यासमोर आणतात, तर महेश एलकुंचवार यांच्यासारखे महान लेखक काही व्यक्तींना नाट्यरूपातून आपल्याला भेटवतात.

माणसं आपण रोज पाहतो; पण सगळी माणसं आपल्याला दिसतातच असं नाही. काहींच्या चेहऱ्यामागे काळाची पावलं उमटलेली असतात, तर काहींच्या मौनात अख्खा जीवनप्रवास दडलेला असतो. अशा व्यक्तींना शब्दांत पकडणं, हे साधं काम नाही; त्यासाठी डोळ्यांत संवेदना आणि मनावर संयम लागतो. एखाद्या व्यक्तीचा चेहरा छायाचित्रात पकडता येतो; पण तिचा स्वभाव, काळजाचा ठाव, विचारांची जडणघडण आणि काळाशी चाललेला संघर्ष पकडण्यासाठी शब्दांची वेगळीच बैठक लागते.

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे. कुठं हळवेपणा आहे, कुठं उपरोधाची सूक्ष्म झलक, तर कुठं न बोलता व्यक्त होणारा संघर्ष. इथल्या व्यक्ती या केवळ आठवणी नाहीत, त्या काळाच्या साक्षीदार आहेत— समाजाच्या बदलत्या प्रवाहात स्वतःची ओळख जपणाऱ्या, कधी प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या, तर कधी तोच प्रवाह घडवणाऱ्या.

व्यक्तिचित्रांतून उलगडतात त्या केवळ व्यक्ती नाहीत, तर त्यांच्याबरोबर जगलेले काळाचे तुकडे आहेत. त्यात कुठं आठवणींची हळवी किनार आहे, कुठं संघर्षाची खरखरीत वाट, तर कुठं शांतपणे स्वीकारलेलं आयुष्य आपल्याला कळतं.

‘मोहोळ’मध्ये लेखक आपल्याला त्याला भेटलेल्या व्यक्तींच्या फक्त आठवणी सांगत नाही, त्या व्यक्तींबरोबर त्या काळातील अनेक घटनांची साक्ष काढतो, समाजातील बदलत्या प्रवाहात त्या व्यक्तींचं प्रवाहाविरुद्ध पोहणं दाखवतो, तर काही वेळा त्या व्यक्तीनंच कसा प्रवाह घडवला ते वाचकांना दाखवतो. लेखक प्रवीण बर्दापूरकर हे ज्येष्ठ पत्रकार (‘राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या लोकसत्ता दैनिकाचा मी संपादक होतो’, अशी ओळख आवडीने आणि अभिमानाने ते करून देत असतात!) असल्यानं त्यांचा संचार सर्वच क्षेत्रांत राहिला आहे. पत्रकाराची नजर आणि त्यातही संपादकीय अनुभव गाठीशी असल्यानं व्यक्ती निरीक्षण करण्याची खोड त्यांना असणारच. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीची क्ष-किरण तपासणी करण्याचा गुण-अवगुणांची लागण त्यांना झाली नसल्यास नवलच!

माणूस वाचणं ही जगातील सर्वांत कठीण आणि तितकीच रंजक कला आहे. एक पत्रकार म्हणून काम करताना आपल्या सभोवताली शेकडो चेहरे येतात आणि जातात, पण काही चेहरे मनाच्या कोपऱ्यात कायमची जागा मिळवत असतात. ‘माझे हितशत्रूमित्र’ (हे एकत्रच वाचावं) लेखक प्रवीण बर्दापूरकर यांनी त्यांच्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या प्रवासात केवळ बातम्यांचा पाठलाग केला नाही, तर त्या बातम्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘माणसा’चा शोध इथं घेतलेला दिसतो. विविध क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या कर्तृत्वाचा आलेख मांडतानाच, त्यांच्यातील 'सामान्य माणसा’चं दर्शन ते ‘मोहोळ’मधील काही व्यक्तिचित्रांतून घडवतात. त्यामुळे हे पुस्तक वाचताना ते केवळ शब्दांचा साठा किंवा व्यक्तिचित्रांचा संग्रह न होता, मानवी स्वभावाच्या विविध छटांची झालर लागल्यानं एक छानसं प्रदर्शन बघत असल्याचा फिल येतो.

पत्रकाराची नजर ही कॅमेऱ्याच्या लेन्ससारखी असावी असं मानलं जातं. इथं तर लेखकरावांना चष्माही आहेच, म्हणजे डबल लेन्सचा फिल्टर आहे. त्यामुळे लेखकानं ज्या व्यक्ती निवडल्या, त्या प्रत्येकाच्या जीवनातील वरवरचे प्रसंग नाही, तर जे दडून राह्यलंय ते नेमक्या शब्दांत पकडण्याचा यत्न केलाय. जे लपलेलं आहे, ते शोधण्याचा लेखकाचा प्रयत्न दिसतो.

बर्दापूरकर यांनी गेल्या काही वर्षांत राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक धुरिणांना जवळून पाहिलं, अनुभवलं आणि त्यांच्याशी संवाद साधला. मुलाखतींमधून व्यक्त होणारे विचार आणि प्रत्यक्षात जगलं जाणारं आयुष्य यातला जो ‘सेतू’ असतो, तो त्यांनी व्यक्तिचित्रांमधून (विशेषतः मारुती चितमपल्ली, नरेंद्र चपळगावकर, श्रीकांत चोरघडे, अजित वर्टी, विद्या सिन्हा, मोहन हिराबाई हिरालाल, मा. गो. वैद्य) समर्थपणे उभा राहिला आहे.

प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या या मान्यवरांचं साधेपण आणि त्यांच्या संघर्षाचे पदर लेखकानं अत्यंत तटस्थपणे पण तितक्याच आत्मीयतेनं उलगडले आहेत. (नरेंद्र लांजेवार, सुहास जेवळीकर, दिलीप बडे, अशोक मोटे) बर्दापूरकर हे पत्रकार असल्यानं ते ‘साहित्यिक अंगा’नं (म्हणजे नेमके काय? हे कोणीच सांगत नाही... ते जाऊ द्या.) लिहू शकणार नाहीत, असं मानायचं काही कारणच नाही. ते ललितशैलीतही लिहू शकतात, हे त्यांनी यापूर्वी प्रकाशित झालेल्या त्यांच्या पुस्तकांतून दाखवून दिलं आहे. (‘ग्रेस नावाचे गारूड’, ‘आई’)

पत्रकारितेत शब्दांची उधळण करता येत नाही. नेमकेपणा असावा लागतो, शब्द निवडीत चोखंदळ राहावं लागतं. ते स्वतः पत्रकारितेत ‘ओल्ड स्कूल’ असून अनेकदा आजकालच्या पत्रकारितेतील मराठी व्याकरण, शब्द निवड, भाषेची शुद्धता याविषयी टीकात्मक बोलत असतात, उपदेशही करत असतात. त्यामुळे ते स्वतः उत्तम भाषेत आणि चपखल शब्द वापरूनच लिहितात. त्याची उदाहरणं या त्यांच्या ‘व्यक्तिपर लेखना’त जागोजागी दिसतात.  

ज्येष्ठ पत्रकाराच्या अनुभवी लेखणीतून उतरलेली ही चित्रं बातमीच्या गतीपासून दूर जातात आणि माणसाच्या अंतरंगाशी थांबून संवाद साधतात—जिथं तथ्याइतकीच भावना महत्त्वाची ठरते. या संग्रहाचं  नाव ‘मोहोळ’ असल्यानं त्यात सहा कोनांचे खण आणि त्यात ‘मकरंद’ साठवून तो इतरांना वाटणारे अनेकजण बर्दापूरकर यांनी टिपलेत, असंही म्हणता येईल. (अजित वर्टी, मनोहर म्हैसाळकर, अशोक मोटे, सुधीर जोशी यांच्यावरील लेखन).

व्यक्तिचित्र म्हणा किंवा व्यक्तिपर लेखन यावर अनेकदा समीक्षक आक्षेप घेतात की, हे लेखन रूढ अर्थानं ‘साहित्य’ ठरत नाही. त्यात केवळ विविध गुणदर्शन दाखवणं इतकंच असतं. ते लेखकाचंच आत्मचरित्र वाटतं, कारण लेखक त्यात अनेकदा स्वतःविषयीच जास्त सांगत राहतो. त्यात स्मरणरंजन अधिक असतं, सामाजिक संदर्भ निसटलेले असतात. अनेकदा हे लेखन म्हणजे स्तुतिपाठ किंवा वर्णनात्मक निबंधच वाटतात. वास्तवाकडं पाठ फिरवून भावनांचा अतिरेक या लेखनात होतो. त्यात आत्मनिष्ठेचा आणि भावनेचा अतिरेक असतो, सगळीच आत्मचित्रं साचेबद्ध वाटतात, असे काही आक्षेप समीक्षक व्यक्तिचित्रांबाबत घेतात.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधील लेखनास ते लागू पडत नाहीत. या सगळ्या दोषांना (समीक्षकांना वाटणाऱ्या) लेखकानं दूर सारलं आहे. त्याचं कारण मला वाटतं ते लेखकाचं पत्रकार असणं. बातम्या, पाठपुरावा, राजकीय पतंग उडवणे, टेबल न्यूज, सनसनाटी मथळे, संपादकीय पानावर लिहिणं या सगळ्या प्रकारातून मुद्रित माध्यमातील पत्रकाराला जावंच लागतं. त्यात मुंबई-दिल्लीसारख्या ठिकाणी काम करण्याची संधी प्रवीण यांना मिळाल्यानं त्यांना भावलेल्या माणसाची दुसरी बाजू तपासण्याची व्यावसायिक सवय जडलेली असल्यानंच व्यक्तिपर लिहिताना त्यांची लेखणी इथं समतोल साधली गेलीय.

लेखक बर्दापूरकर यांचं मराठी उत्तम आहे. (पत्रकार असूनही?) त्यांची शब्दरचना सुटसुटीत असून अलंकारिक भाषेचा सोस त्यांना नाही. त्यांची राजकीय मतं मला ठाऊक आहेत. त्यांनी ती व्यक्तिचित्रं रेखाटताना कुठं आडवी येऊ दिलेली नाहीत. राजकीय व्यक्तिमत्त्वांविषयी लिहिताना ते अधिक उदार झाल्यासारखं वाटतं आणि बिगर राजकीय व्यक्तीविषयी लिहिताना ते अधिक प्रगल्भ झाल्यासारखं वाटतं. (मोहन हिराबाई हिरालाल, सुहास जेवळीकर).

लेखक प्रवीण बर्दापूरकर हे माझे मित्र आहेत. त्यांची राजकीय-सामाजिक मतं मला मान्य नसतात, त्यांच्या आणि माझ्या पत्रकारितेचा बाजही भिन्न आहे, पण तरीही आम्ही गेल्या चार दशकांपासून मित्र आहोत. दोन वर्षांपूर्वी त्यांची पत्रकार पत्नी मंगला विंचुर्णे यांचं निधन झालं. उत्कट प्रेमी असल्याने हे दुःख पचवणं प्रवीणला अवघड जाणार, तो ‘लोनली’ होण्याची चिंता आम्हा काही मित्रांना होती. त्यामुळेळं आमच्या भेटीगाठी वाढल्या. शिळोप्याच्या गप्पाही वयपरत्वे वाढल्या. त्यातून प्रवीणच्या स्वभावातील ममत्व भाव मला अधिक कळून आला. याच काळात त्यानं नियमित लेखनाला अधिक शिस्तीत बसवलं, वाचन वाढवलं, विचारांच्या कक्षा थोड्या सैल केल्या, त्यानंतरचं बरंचसं लेखन या संग्रहात आहे.

व्यक्तिपर लेखनातील एका वेगळ्या प्रवासास लेखक इथं वाचकांना घेऊन जातो. काही समाजसेवक, काही राजकारणी, नोकरशहा, साहित्यिक, कवी यांच्या सद्वर्तनाचं, स्नेहबंधाचं मनोज्ञ दर्शन या सहप्रवाशामुळं आपल्यालाही घडतंच. व्यक्तिचित्रातील एक वेगळी वाट लेखकानं निर्माण केलीय, असं मला वाटतं.

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील. त्यांच्या अपूर्णतेतूनच जगण्याचं सौंदर्य उलगडतं, हीच या ‘मोहोळ’ची खरी भेट. वाचन संपल्यावरही ही माणसं तुमच्यासोबत थोडा वेळ राहिली आणि त्यांनी नकळत तुम्हाला स्वतःकडं पाहायला लावलं, तर या लेखणीचा हेतू पूर्ण झाला असं समजा.

.................................................................................................................................................................

लेखक निशिकांत अनंत भालेराव ज्येष्ठ पत्रकार-संपादक आहेत.

nishikant.bhalerao@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......