अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या व्हाईट हाऊसमध्ये ‘बॉलरूम’ बांधण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत...!
पडघम - विदेशनामा
उज्ज्वला देशपांडे
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ‘बॉलरूम’च्या प्रस्तावित छायाचित्रासह
  • Tue , 09 December 2025
  • पडघम विदेशनामा डोनाल्ड ट्रम्प Donald Trump व्हाईट हाऊस White House

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

जगभरात सध्या चक्रम चमत्कारिकपणा चालू आहे. त्याचे वर्तमानकाळात भयानक दुष्परिणाम पाहायला मिळत आहेतच, पण भविष्यकाळात ते अधिक तीव्र स्वरूपात पाहायला मिळतील असं दिसत आहे. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विक्षिप्त चक्रमपणा तर त्या देशाबरोबर संबंध जगाला रोज पाहायला मिळत आहे. निदान सध्याच्या घडीला तरी त्यांच्या माथेफिरूपणाची बरोबरी कुणीही शकत नाही!

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

पूर्वी शाळेत इतिहास आणि महाविद्यालयात राज्यशास्त्र शिकताना विनोदी, विक्षिप्त लोक फारसे अभ्यासाला नव्हते. ‘ब्रेड नाही खायला तर केक खा’ अशी विधानं करणारी फ्रान्सच्या राणीसारखी एखाददुसरी व्यक्ती असायची. भविष्यामध्ये मात्र शाळा-महाविद्यालयात आत्ताच्या जागतिक घडामोडी अभ्यासताना खूपच चमत्कारिक घटना व व्यक्ती अभ्यासाव्या लागणार हे नक्की. त्यांचं विश्लेषण करताना, त्या वेळेचा समाज - म्हणजे आपण सर्व - यांचंही विश्लेषण होणार. आपल्यातले काही जण या चमत्कारिक घटना, व्यक्तींची मखलाशी करत आहेत, तर काही जण टीका, काहींनी मात्र गप्प बसण्याचे धोरण स्वीकारले आहे. 

जगभरात हा चमत्कारिकपणा चालू आहे. त्याचे वर्तमानकाळात भयानक दुष्परिणाम पाहायला मिळत आहेतच, पण भविष्यकाळात ते अधिक तीव्र स्वरूपात पाहायला मिळतील असं दिसत आहे. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विक्षिप्त चक्रमपणा तर त्या देशाबरोबर संबंध जगाला रोज पाहायला मिळत आहे. निदान सध्याच्या घडीला तरी त्यांच्या माथेफिरूपणाची बरोबरी कुणीही शकत नाही!

तर गोष्ट आहे ट्रम्प आणि अमेरिकन राष्ट्रपती निवास म्हणजे व्हाईट हाऊसची. अमेरिकेचं २२५ वर्षांपूर्वीचं हे राष्ट्रपती निवास सध्या एका मूलगामी स्थापत्यबदलाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामागचं उद्दिष्ट आहे, वॉशिंग्टनच्या परंपरागत गंभीरतेचं वातावरण झटकून ते अधिक ‘Mar-a-Lago’ शैलीचं बनवणं. म्हणजे ट्रम्प महाशयांचा फ्लोरिडामध्ये पाम बीचवर असलेला दिखाऊ, भपकेबाज महाल.

व्हाईट हाऊसच्या छतावरील राष्ट्रपती शिक्क्याभोवतीच्या तारकांना सोनेरी थर चढवण्यात आला आहे; फायरप्लेसवरील पुतळे, मॅंटल आणि त्यावरील सजावट सर्व काही झळाळतं आहे. भिंतींवर असंख्य चित्रं आहेत. अनेक ठिकाणी ट्रम्प यांच्या प्रतिमा विराजमान झाल्या आहेत.

परदेशी नेत्यांच्या सन्मानार्थ भव्य राज्यभोजनांचं आयोजन करण्यासाठी दिमाखदार हॉल तयार केला आहे. सध्याचा हॉल म्हणजे ईस्ट रूम केवळ सुमारे २०० पाहुण्यांना सामावून घेऊ शकते, पण नवीन हॉल तब्बल ८,००० चौ. मीटर (९०,००० चौ. फूट) क्षेत्रफळाचा असेल आणि त्यात ८०० पाहुण्यांना एकाच वेळी मेजवानीचा आस्वाद घेता येईल.

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

व्हाईट हाऊसच्या या नूतनीकरणाचे काम सप्टेंबरमध्ये सुरू झाले असून २०२९च्या जानेवारीपूर्वी, म्हणजेच ट्रम्पमहाशयांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ट्रम्पमहाशय अमेरिकेच्या संविधानात बदल करून तिसरा कार्यकाळ मिळवण्याच्या खटपटी करत आहेतच. मध्यंतरी सरकारी कामकाज बंद (Government Shutdown) सुरू असतानाही, ट्रम्पमहाशयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वेग मिळत होता, हे लक्षात घेण्यासारखं आहे.

त्यावर कॉमेडियन मायकेल कोस्टा यांनी त्यांच्या ‘द डेली शो’मध्ये टीका करताना म्हटलं होतं —“सरकार बंद आहे. लाखो कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही. अन्नसाहाय्य योजनांचे पैसे संपत चालले आहेत. आणि या सर्वांच्या मध्ये — राष्ट्राध्यक्ष दिवस-रात्र मेहनत घेत आहेत... बॉलरूम बांधण्यासाठी!”

अधिकृत माहितीनुसार या प्रकल्पासाठीचा पैसा ट्रम्पमहाशय स्वतः आणि काही अनामिक दात्यांकरवी उभारला जात आहे. त्याबाबत ते “मी पहिला राष्ट्रपती आहे ज्याने हा अत्यावश्यक प्रकल्प कोणत्याही करदात्यांच्या पैशाशिवाय सुरू केला आहे. या संपूर्ण बॉलरूम प्रकल्पासाठी उदार देशभक्त, महान अमेरिकन कंपन्या आणि... माझ्याद्वारेच वित्तपुरवठा केला जात आहे,” अशी आत्मप्रौढी मिरवत आहेत. यासाठी आयोजित खास मेजवानीमध्ये Amazon, Apple, Meta, Google, Microsoft, Palantir आणि Lockheed Martin यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ट्रम्प यांच्या या स्थापत्य प्रकल्पावर आता कायदे, कर आणि नागरी संस्थांकडून टीका सुरू आहे. मानवाधिकार वकील क़ासिम राशिद यांनी लिहिलं आहे—“अमेरिकेत संपत्ती आणि उत्पन्नातील विषमता विक्रमी पातळीवर आहे आणि आपण $२५० दशलक्ष एका वैयक्तिक दिखाव्याच्या प्रकल्पावर खर्च करत आहोत.”

दरम्यान, ‘नॅशनल ट्रस्ट फॉर हिस्टोरिक प्रिझर्वेशन’ या काँग्रेसमान्य वारसा-संरक्षण संस्थेनं व्हाईट हाऊसला पत्र लिहून इशारा दिला आहे की, कोणतंही पाडकाम सार्वजनिक पुनरावलोकनाशिवाय बेकायदेशीर ठरेल. त्यांनी हा निर्णय तत्काळ स्थगित करण्याची मागणी केली आहे.

पण ट्रम्प त्याची दखल घेताना दिसत नाही. त्यांना व्हाईट हाऊस ‘लहान’ आणि ‘गंभीर’ वाटतं. व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेव्हिट यांनी या सुशोभीकरणाबद्दल म्हटलं आहे —“हे आहे सोन्याचं कार्यालय, एका सोन्याच्या युगासाठी.” बाई विदुषकाच्याच सर्कशीत असल्याने त्यांना हे ‘सुवर्णयुग’ वाटणं, यात नवल ते काय! परंतु समीक्षकांनी त्याची तुलना ‘व्यावसायिक कुस्तीपटूच्या ड्रेसिंग रूम’शी केली आहे.

ट्रम्प हे मूळचे बांधकाम व्यावसायिक. नियम अडथळे नसतात, ते फक्त वाकवण्यासाठीच असतात, हा त्यांचा अनुभव त्यांना व्हाईट हाऊसच्या सुशोभीकरणासाठी उपयोगी पडत आहे. त्यांची हीच वृत्ती त्यांच्या पक्षीय, देशीय आणि परराष्ट्रीय राजकारणातही उतरली आहे. अधिकार आणि प्रदर्शन यांचं मिश्रण हाच ट्रम्पमहाशयांचा स्वभाव बनत आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

याच वेळी अमेरिका मात्र गंभीर आर्थिक आणि सामाजिक समस्यांशी झगडत आहे. महागाई आणि भाडेवाढीने सामान्य नागरिकांच्या कुटुंबांवर ताण वाढला आहे. अमेरिकेत सरकारी यंत्रणा ठप्प आहे, लाखो नागरिकांना पगार मिळत नाही, आर्थिक विषमता वाढत चालली आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्रम्प टॅरिफच्या म्हणजे शुल्क-वाढीच्या धमक्या देत आहेत.

अशा वेळी व्हाईट हाऊसचं रूपांतर एका वैयक्तिक महालात करणं, हे केवळ असंवेदनशील नाही, तर लोकशाहीच्या मूळ तत्त्वांना धक्का देणारं आहे. सत्ता जर स्वतःचं प्रतिबिंब सोन्याच्या आरशात पाहू लागली, तर तिला लोकांच्या अंधारात काय घडतंय, हे दिसेनासं होतं.

अमेरिकेतल्या ‘द गार्डियन’ या नामांकित वृत्तपत्राचे स्तंभलेखक सिडनी ब्लूमेंथल यांनी ट्रम्पमहाशयांवर टीका करताना लिहिलं होतं – ‘ट्रम्प यांनी ‘आतील शत्रूं’विरुद्ध सूड घेण्यासाठी धूर्त, महत्त्वाकांक्षी पण अकार्यक्षम लोक नियुक्त केले आहेत. ते सर्व ट्रम्प त्यांच्याकडे असलेल्या विक्षिप्तपणासह आतील शत्रूंविरुद्ध युद्ध करतात. एकेकाळी सर्वांत पात्र असलेल्यांनी घेतलेल्या पदांवर हे कब्जा करून आहेत. हे सर्व धूर्त, महत्त्वाकांक्षी पण अकार्यक्षम लोक ट्रम्पवादाचे धडधडणारे हृदय आहे.’’

ट्रम्पमहाशय आणि त्यांची सरकार चालवण्याची पद्धत जर तुम्हाला ओळखीची, परिचयाची वाटत असेल, तुम्ही जागरूक नागरिक आहात असं समजायला हरकत नाही. अर्थात ट्रम्पमहाशयांच्या चमत्कारिकपणाचे अमेरिकेत रोज वाभाडे काढले जात आहेत. जगभरातील विविध पत्रकार अतिशय कडक शब्दांत ट्रम्प ट्रम्पमहाशयांचा निषेध व्यक्त करत आहेत. तसं काही भारतात घडताना दिसत नाही. कारण ती आपली परंपरा राहिलेली नाही. ट्रम्प निवडून यावेत म्हणून पूजा-पाठ करणारे, त्यांचे मंदिर उभारणारे महाभाग आपल्या देशात मात्र आहेत!

संदर्भ : The Guardian वृत्तपत्रातील बातम्या आणि लेख.

.................................................................................................................................................................

उज्ज्वला देशपांडे

Ujjwala.de@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लोकसंख्येच्या प्रमाणातच जागा द्यायच्या झाल्या, तर महिलांना जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास जागा द्याव्या लागतील. पण तशी मागणी कुणीच, महिला प्रतिनिधीही, करत नाहीत, ही आश्चर्याचीच बाब म्हणायला हवी!

एकीकडे ‘नारीपूजा’ म्हणायचे, तर दुसरीकडे असे वर्तन, हे संघ-भाजपच्या दुतोंडीपणाचेच लक्षण आहे. या विधेयकामुळे त्यांचा मुखवटा गळून पडला असून खरा चेहरा उघड झाला आहे. खरे तर त्यांना हे विधेयक नव्याने आणण्याचीच आवश्यकता नव्हती, कारण २०२३मध्ये संसदेत ते एकमताने मंजूर झाले होते. पण तसे केले असते, तर तेच अडचणीत आले असते. कारण त्यांना महिलांना असे सामर्थ्य मिळायला नको होते.......

बाबाबुवा, गुरू, साधू, संत या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींनी लोकांच्या मानसिक दुर्बलतेचा, अज्ञानाचा आणि भीतीचा गैरफायदा घेत सातत्याने समाजाचे शोषण केले आहे – विशेषत: स्त्रियांच्या

अनेक बाबाबुवांनी ‘आध्यात्मिक साधना’, ‘देवाची कृपा’ किंवा ‘उपचार’ यांच्या नावाखाली स्त्रियांचे लैंगिक शोषण केले आहे. तरीही त्यांच्या अनुयायांनी त्यांना समर्थन दिले, ही गोष्ट समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभे करते. याचा विचार केला, तर एक गोष्ट स्पष्ट होते - अंधश्रद्धा ही केवळ अज्ञानाची समस्या नाही, तर ती एक सामाजिक, मानसिक, आर्थिक आणि राजकीय समस्या आहे.......