समीक्षक आणि विचारवंत प्रा. गो. मा. पवार यांच्या आयुष्यभराच्या चिंतन-व्यासगांची साक्ष असणारा हा लेखसंग्रह आहे
ग्रंथनामा - झलक
रणधीर शिंदे
  • ‘साहित्य, समाज, भाषा आणि अभिरुची’ या ग्रंथाचे मुखपृष्ठ
  • Mon , 02 February 2026
  • ग्रंथनामा झलक गो. मा. पवार G.M. Pawar साहित्य समाज भाषा आणि अभिरुची Sahitya Samaj Bhasha aani Abhiruchi

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

समीक्षक आणि विचारवंत प्रा. गो. मा. पवार यांचा ‘साहित्य, समाज, भाषा आणि अभिरुची’ हा समीक्षाग्रंथ नुकताच पद्मगंधा प्रकाशन, पुणेतर्फे प्रकाशित झाला आहे. या ग्रंथाला प्रा. रणधीर शिंदे यांनी लिहिलेल्या प्रास्ताविकाचा हा संपादित अंश...

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

समीक्षक आणि विचारवंत प्रा. गो. मा. पवार यांचा ‘साहित्य, समाज, भाषा आणि अभिरुची’ हा समीक्षाग्रंथ प्रकाशित होतो आहे, याचा स्वाभाविक असा आनंद आहे. डॉ. पवार शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातून प्राध्यापक व प्रमुख म्हणून १९९२ साली सेवानिवृत्त झाले. त्यानंतर ते सोलापूरला स्थायिक झाले. सेवानिवृत्तीनंतर ते लेखन आणि संशोधनात रमले. सेवानिवृत्तीनंतर त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले.

समीक्षात्मक लेखन व महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंविषयक लेखन असे त्यांच्या लेखनाचे स्वरूप आहे. तात्त्विक, वैचारिक व समीक्षात्मक असे हे तिहेरी स्वरूपाचे लेखन आहे. समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याविषयीचे लेखन हे त्यांच्या एकंदर लेखन कारकिर्दीतील महत्त्वाचे लेखन. या विषयावरील त्यांचे छोटे-मोठे नऊ ग्रंथ प्रकाशित आहेत. आंतरिक ध्यासाने व प्रदीर्घ व्यासंग संशोधनाने त्यांनी महर्षी विठ्ठल शिंदे यांच्या कार्यावर नवा प्रकाश टाकला.

‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य’ हे त्यांचे, महर्षी शिंदे यांचे प्रदीर्घ असे जीवनचरित्र २००४ साली प्रकाशित झाले. या ग्रंथाच्या आजवर पाच आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. या ग्रंथाची इंग्रजी (सुधाकर मराठे), हिंदी (गिरीश काशीद) व कन्नड (चंद्रकांत पोकळे) अशी भाषांतरे प्रसिद्ध झाली आहेत. शिंदे यांच्या जीवनकार्याची उपेक्षा कमी होण्यात काहीएक प्रमाणात प्रा. पवार यांच्या या लेखन-संशोधनाचा मोठा वाटा आहे.

‘विनोद : तत्त्व आणि स्वरूप’ (२००८) हा त्यांचा विनोद या वाङ्मयप्रकाराविषयीचा सैद्धान्तिक ग्रंथ. ‘विनोद : विविध आविष्कार रूपे’ (२०१५) या त्यांच्या ग्रंथात प्राचीन मराठी वाङ्मयापासून ते आधुनिक विनोदात्म वाङ्मयाचा परामर्श आहे.

या पुस्तकाच्या निर्मितीची गोष्ट. सात-आठ वर्षांपूर्वी, पवार सरांच्या असंग्रहित व काही अप्रकाशित लेखांचा ग्रंथ प्रकाशित करावा, अशी माझी इच्छा मी त्यांच्याजवळ बोलून दाखवली. ती त्यांना मान्यही झाली. याच दरम्यान त्यांचे ‘सुहृद आणि संस्मरणे’, ‘व्यंकटेश माडगूळकर : साहित्य आणि व्यक्तित्व’, ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्याचे पैलू’ हे लेखसंग्रह प्रकाशित झाले. मात्र या संकल्पित ग्रंथाचे काम पुढे जात नव्हते. मी त्यांच्या या ग्रंथाची अनुक्रमणिका केली. तसेच सर्व लेख एकत्रित करून त्यांच्याकडे पाठवून दिले. या लेखांची फाईल त्यांनी सोलापुरातील घरी ठेवली होती. मात्र निवांतपणे व शांतपणे ती पाहून ग्रंथकाम मार्गी लावावे असे घडत नव्हते. शेवटच्या वर्षभरात त्यांचे थोडे विस्मरण होत होते. एका भेटीदरम्यान त्यांना ही फाईल सापडेना, तेव्हा ते फार अस्वस्थ झाले होते.

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

प्रा. पवार यांच्या या ग्रंथात त्यांचे विविध काळातील लेख, निबंध, बीजभाषणे, परीक्षणे, भाषणे व मुलाखतींचा समावेश आहे. अगदी प्रा. पवार यांच्या आयुष्यभराच्या चिंतन-व्यासगांची साक्ष असणारे हे लेख आहेत. यातील लेख १९६२ ते २०१६ या सालातील आहेत. या ग्रंथाची जुळवाजुळव करत असताना, ग्रंथास काहीएक सूत्र असावे, असे पवार सरांना वाटत होते. ग्रंथनिर्मिती व ग्रंथशीर्षक याबाबत पवार सर अतिशय चोखंदळ आणि दक्ष होते. याचा प्रत्यय या ग्रंथातील सर्वच लेखांवरून येईल. या असंग्रहित लेखांची जुळवाजुळव करत असताना, त्याला काहीएक सूत्रबद्ध आकार प्राप्त झाला. आणि त्यांनीच या ग्रंथास ‘साहित्य, समाज, भाषा आणि अभिरुची’ असे शीर्षक सुचवले.

या ग्रंथातील लेखांचे स्वरूप हे वैचारिक लेख, वाङ्मयप्रकारनिष्ठ, लेखकनिष्ठ, सूत्रलेख, साहित्यकृतिकेंद्री अशा स्वरूपाचे आहेत, तर काही वाङ्मय- प्रश्नकेंद्री. ‘भगवान महावीरांच्या शिकवणुकीची प्रस्तुतता’, ‘न्या. रानडे यांचा धर्मविचार’, ‘छत्रपती शाहू महाराज यांचा सामाजिक दृष्टीकोन’, ‘संतांचा जीवनादर्श आणि एकविसावे शतक’ असे लेख आरंभीच्या भागात आहेत. पुढे ‘वैचारिकता आणि मराठी साहित्य’ या विषयावरील लेखांचा समावेश आहे.

साहित्य आणि समाज या विषयावरील दोन लेखांचा समावेश आहे. सामाजिक वास्तव आणि लेखकाची जडणघडण व मराठी साहित्याबद्दल त्यांनी महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यामुळेच ‘वास्तवाच्या यथार्थ ध्वनिलहरी ग्रहण करणारे एरियल व्यंकटेश माडगूळकरांच्या संवेदनशील मनात होते,’ यासारखी विधाने त्यांच्या लेखनात आहेत. या दृष्टीने मराठी साहित्यातील स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिकता व स्वातंत्र्योत्तर काळातील सामाजिकतेचा आंतरछेद त्यांच्या समीक्षाविचारात आहे.

प्रा. पवार यांचा अभिरुचीविचार हा महत्त्वाचा साहित्यविचार आहे. ‘साहित्यमूल्य आणि अभिरुची’ हा त्यांचा समीक्षाग्रंथ १९९४ साली प्रकाशित झाला. या ग्रंथातील अभिरुचिविषयक लेख व अलीकडील असे सूत्र असणारे लेख एकत्रित द्यावेत, या धारणेमुळे ‘साहित्यमूल्य आणि अभिरुची’'मधील काही अभिरुचिविषयक लेख या ग्रंथात घेतले आहेत. वाङ्मयीन अभिरुची ही लेखक आणि वाचकपक्षी असते. त्याचा प्रभाव आणि परिणाम वाङ्मयीन संस्कृतीवर असतो. ती आशयाशी जशी निगडित असते तशीच शैली व तंत्राशीदेखील. असा पवार यांचा अभिरुचीविचार आहे.

पवार यांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी वाङ्मयाभिरुची- संबंधी महत्त्वाचा असा विचार मांडला आहे. अभिरुचीच्या दृष्टीने त्यांनी मराठी वाङ्मयपरंपरेचे वाचन केले आहे. या दृष्टीने त्यांना मराठी वाङ्मयाभिरुचीमध्ये स्वायत्ततावादी-कलावादाचा प्रभाव दीर्घकाळ दिसतो, तर स्वातंत्र्यानंतर मात्र ‘जीवनोन्मुख नवनैतिकतावादी अभिरुची’ प्रभावी होताना दिसते.

या दोहोंत त्यांना द्वंद्व आणि टकराव दिसला. स्वायत्ततावादी अभिरुची एकांगी, मध्यमवर्गीय, श्रद्धाशील, परंपरावादी वाटली. श्री. ना. पेंडसे, पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर व भालचंद्र नेमाडे, भाऊ पाध्ये असे हे अभिरुची द्वंद्व मराठीत असल्याचे पवार यांच्या मांडणीत आहे. नव्या अभिरुचीने पारंपरिक अभिरुचीला शह दिला, असे त्यांचे मत आहे. लेखकाने वाचकांचा केलेला ‘कात्रज’, ‘लेखकाची प्रेक्षकशरणता’, ‘वाचकानुनय’ या प्रकारच्या शब्दप्रयोगांचा वापर त्यांच्या लेखनात जाणीवपूर्वक आहे. भालचंद्र नेमाडे व भाऊ पाध्ये यांच्या वाङ्मयाची त्यांनी केलेली समीक्षा नवी व महत्त्वाची आहे. रंजक साहित्याची निर्मिती बेसुमार व अव्वल दर्जाच्या साहित्याची निर्मिती अल्प, असे त्यांना मराठी साहित्याचे चित्र दिसते.

याबरोबरच कथा, काव्य व नाटक वाङ्मयावरील महत्त्वाच्या लेखांचा समावेश यात आहे. ‘रूपकात्म कविता’ यासारख्या उल्लेखनीय लेखाचा यात समावेश आहे. ‘मराठी नाटक हे परोपजीवी, इतिहास व पुराणप्रिय तसेच प्रयोगाला कमी महत्त्व देणारे आहे.’ ही त्यांनी मराठी नाटकांबद्दल नोंदवलेली निरीक्षणे महत्त्वाची आहेत. तसेच या ग्रंथात वाङ्मयीन संस्कृतीतील काही वाङ्मयविषयक प्रश्नांसंबंधी काही लेख आहेत. ‘वाङ्मयेतिहासाची संकल्पना’ व ‘प्राचीन मराठी वाङ्मयेतिहासातील काही समस्या’, ‘लोकसाहित्याचा अभ्यास : वाङ्मयीन दृष्टीकोनाची गरज’, ‘मराठीची क्षमता’ व ‘ग्रामीण बोलीचे काही विशेष’ अशा लेखांचा समावेश आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

गो. मा. पवार यांच्या समीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे वाङ्मयाचा वस्तुनिष्ठ व सुस्पष्ट असा विचार. वाङ्मयाविषयी त्यांची मते निर्भीड असतात. त्यांनी प्रस्थापित लेखकांच्या साहित्याच्या मर्यादा साधार नोंदवल्या आहेत. पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर व श्री. ना. पेंडसे यांच्या वाङ्मयातील परंपराशरणता, ऐतिहासिकतेचा अपलाप, स्वप्नरंजनपरतेचा घेतलेला परामर्श मार्मिक आहे.

पु. ल. देशपांडे व वसंत कानेटकर हे सर्वमान्य वाचक-प्रेक्षकांच्या अभिरुचीचा अनुनय करणारे नाटककार होत, अशी त्यांची भेदक अशी मीमांसा आहे. या प्रकारचे परखड समीक्षालेख मराठीत अपवादानेच लिहिले गेले आहेत. पवार यांचे साहित्यकृतींवरील संहितालक्ष्यी व उपयोजित समीक्षा यावरील हे विचारप्रवृत्त करणारे लेख आहेत. मराठी साहित्य परंपरेचे सूक्ष्म असे वाचन आहे. ‘मराठी साहित्य सूक्ष्मदर्शक भिंगाच्या साहाय्यानेच बघण्याची पाळी आज आली आहे.’ या त्यांच्या दृष्टीचा प्रभाव त्यांच्या लेखनावर आहे. हे लेख काळ, भौतिक बदल आणि सामाजिक-सांस्कृतिक बदलाच्या अक्षावर न्याहाळले आहेत. मराठी साहित्याचे ‘बदलकेंद्री’ विश्लेषण असा विश्लेषण फलक या लेखनास आहे.

या ग्रंथात प्रा. पवार यांच्या दोन मुलाखतींचा समावेश आहे. त्यामधून त्यांच्या काहीएक प्रमाणात आत्मपरतेचा व वैचारिक-वाङ्मयीन जडणघडणीवर प्रकाश पडला आहे. पवार यांनी दिलेली भाषणे, बीजभाषणे व नियतकालिकांत प्रसिद्ध झालेले लेख यांविषयी संस्था व व्यक्तींचा निर्देश ग्रंथाच्या आरंभी केला आहे. यातील काही लेख हे हस्तलिखित वा टंकलिखित स्वरूपात होते, तसेच अप्रकाशितही होते.

‘साहित्य, समाज, भाषा आणि अभिरुची’ हा ग्रंथ शिवाजी विद्यापीठास अर्पण केला आहे. प्रा. गो. मा. पवार हे शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभाग प्रमुख म्हणून दीर्घकाळ कार्यरत होते. शिवाजी विद्यापीठाचा मराठी विभाग नावारूपाला आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाविषयीची कृतज्ञता म्हणून हा ग्रंथ विद्यापीठास अर्पण केला आहे.

‘साहित्य, समाज, भाषा आणि अभिरुची’ – गो. मा. पवार | पद्मगंधा प्रकाशन, पुणे | पाने – ३६८ | मूल्य – ६५० रुपये.

.................................................................................................................................................................

लेखक रणधीर शिंदे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी विभागाचे प्रमुख आहेत.

rss_marathi@unishivaji.ac.in

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......