अजूनकाही
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
अलीकडील काही वर्षांत मोठ्या शहरांत पुस्तक महोत्सव वा बुक फेअर वा लिट फेस्ट अशा नावांनी होणाऱ्या या कार्यक्रमांचा हेतू लोकांनी पुस्तकांकडे, खरे तर वाचनाकडे वळावे, तेही पुस्तके विकत घेऊन वाचावीत, हा असतो. भारतात होणाऱ्या अशा महोत्सवांची संख्या आता दहावर गेली आहे. जयपूर, कोलकाता, केरळ, दिल्ली, पुणे इत्यादी ठिकाणी हे महोत्सव आयोजित केले जातात. त्यांचा कालावधी साधारण एक आठवडा वा क्वचित दहा दिवस एवढा असतो.
जयपूरचा महोत्सव सर्वांत मोठा, तर कोलकाता येथे सर्वाधिक लोक येणारा, असा या दोन महोत्सवांचा लौकिक आहे. दिल्लीचा जागतिक ग्रंथमहोत्सव विविध प्रकाशकांत भाषांतराचे करार होण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांना प्रतिसाददेखील चांगला असतो आणि पुस्तकांची विक्रीही काही लाख वा कोटी रुपयांच्या घरात पोहोचल्याच्या बातम्याही प्रसिद्ध होतात.
गेली तीन वर्षं पुण्यातही ‘लिट फेस्ट’ होत आहे आणि दरवर्षी होणारी गर्दी वाढतच आहे. तेथील एकंदर उलाढाल लाखांवरून आता कोटी रुपयांवर गेली आहे, म्हणजे ती दरवर्षी वाढत आहे. ही बाबही समाधानकारकच, पण आपण नीटपणे पाहिले, वाचले तर असे दिसते की, या महोत्सवांत प्रत्यक्ष साहित्य, पुस्तके यांना फार मोठे स्थान नसते. म्हणजे लेखकांच्या मुलाखती वा चर्चा, भाषणे, लेखकाची स्वाक्षरी आणि /किंवा त्याच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी. त्यात देशोदेशीचे नामवंत लेखकही सहभागी होतात. वाचकांना (?) सामोरे जातात, पण त्यांना दिलेला वेळ कमी असतो. पुस्तकांवर त्यांची स्वाक्षरी मिळवण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी ही चुरस असते. त्यासाठी मोठ्या रांगा लागतात. त्यामुळे पुस्तकविक्रीही चांगली होते, हीच त्यातली जमेची बाजू म्हणायची.
विविध भाषांतील पुस्तकांचे भाषांतर हक्क मिळवण्यासाठी करार होतात, पण ती भाषांतरेही बहुतेकदा खपावू पुस्तकांची असतात. त्यात दर्जेदार पारितोषिक विजेत्या पुस्तकांची दखल फारशी घेतली जात नाही. त्यामुळे त्यांची संख्या खूपच कमी असते. मध्यंतरी ‘द गार्लिक रेव्होल्यूशन’ नावाचे एका चिनी लेखकाचे पुस्तक वाचले होते. त्यात सरकारच्या आदेशावरून लसणीची लागवड मोठ्या प्रमाणात होते, पण भरमसाठ उत्पादन मिळाल्यानंतर ते खरेदी करण्यात सरकारची अळंटळं चाललेली असते. मोठ्या उत्पन्नाची हमी आणि सरकारचे आश्वासन यामुळे ही लागवड केलेली असते, पण सरकारच्या वेळकाढूपणाने शेवटी लोकांचा संयम संपतो. ते उठाव करून खरेदीक्रेंद्रालाच आग लावतात. तेथील कर्मचाऱ्यांनाही बडवतात. इत्यादीचे सुरेख वर्णन वाचून आपल्याकडे सोयाबीन, कांदा उत्पादकांची दयनीय अवस्था आठवते, पण त्या पुस्तकाचे भाषांतर कोणी केल्याचे पाहण्यात नाही.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
अशा या महोत्सवांमध्ये त्यांच्या मोजक्या कालावधीत शेकडो कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात संगीत, चित्र-शिल्पकला, मुलाखती, चर्चा इत्यादींचा समावेश असतो. एखादा प्रेक्षक या महोत्सवात सर्व दिवस उपस्थित राहिला, तरी त्याला सर्व कार्यक्रम बघता, ऐकता येत नाहीत. ते शक्यच नसते. कारण एकाच वेळी अनेक कार्यक्रम सुरू असतात. तरीही दरदिवशी या कार्यक्रमांना मोठी गर्दी असते. नवनवीन लोक येत असतात, काही जण पुन्हा पुन्हा येतात. त्यामुळे अशा कार्यक्रमांना कमी-जास्त संख्येने प्रेक्षक असतातच. पण या अशा कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्यांत खऱ्या वाचकांची संख्या किती असते?
सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. याचा अर्थ असा की, पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे. आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.
आता ‘परफॉर्मेटिव्ह रीडिंग’ म्हणजे पुस्तक वाचनाचा कार्यक्रम, असे ज्याचे नामकरण करण्यात आले आहे, तो प्रकार वेगळाच आहे, असे म्हणता येईल. कारण यात वेळेची मर्यादा असल्याने संपूर्ण पुस्तक न वाचता, वेगवेगळ्या पुस्तकांतील एखादा अंशच वाचला जातो. विजय आणि वीणा देव गो. नि. दांडेकर यांच्या कादंबऱ्यांचं अभिवाचन करत असत. अर्थात कादंबरीची संक्षिप्त आवृत्ती असायची. त्यामुळे मूळ पुस्तक वाचण्याची इच्छा कार्यक्रमाला आलेल्या श्रोत्यांची होत असे. अर्थात वाचनाची सवय नसलेल्यांनाही हे कार्यक्रम आवडत, कारण त्यांची तहान तेवढ्यावरच भागत असे.
भारताप्रमाणे अमेरिका (यूएसए), इंग्लंड (यूके), जर्मनी येथेही केवळ आनंदासाठी पुस्तके वाचणाऱ्यांची संख्या आता कमी होत चालली आहे. अर्थात वाचनासाठी देण्यात येणारा वेळही कमी झाला आहे. दुसरी बाब अशी की, पुस्तकांची खरेदीही आता मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांवर भरवसा ठेवून केली जाते आहे. याच समाजमाध्यमांवर आनंदासाठी वाचण्याऐवजी कार्यक्रमांचा-परफॉर्मन्सचा आनंद घेण्याला झुकते माप देण्यात येते. म्हणजे काही मान्यवरांनी वेगवेगळ्या पुस्तकांतील उतारे वाचण्याचे कार्यक्रम (ज्यांना प्रवाही वाचनही म्हणण्यात येते), त्याचे प्रमाण आता या महोत्सवांत वाढले आहे.
याबरोबरच पुस्तक परीक्षण ऑनलाइन केले जात आहे आणि त्याचा प्रभावही पुस्तकविक्रीवर पडला आहे. हे चांगलेच आहे. शिवाय सतत बाजारच डोळ्यापुढे ठेवून पुस्तक निर्मिती केली जात आहे. पुस्तकाची मुखपष्ठेही अधिकाधिक आकर्षक करण्याकडे कल वाढत आहे. ती अधिक धीट आणि विविधरंगी होत आहेत. हे सारे विक्री डोळ्यापुढे ठेवूनच करण्यात येत आहे.
याला एक सांस्कृतिक पदरही आहे. एखादे चित्र, प्रतिमाभोवताली पुस्तकांचे व्यवस्थित मांडलेले ढीग नीटपणे दिसतील, अशा प्रकारेच ही मांडणी केलेली असते. त्यात बाजूला वाचणारा, वाफाळलेली कॉफी वा अन्य पेयाचा मगही दिसतो किंवा शेजारी किंवा मागील बाजूला पुस्तकांनी भरलेले शेल्फही दिसते. हे सारे आपण किती मोठे वाचक आहोत, हे बघणाऱ्यांच्या मनावर बिंबावे यासाठी असते.
याच पुस्तकांनी भरलेल्या कपाटाबाबत भारतकुमार राऊत यांनी त्यांच्या भाषणात एक आठवण सांगितली होती. राऊत एकदा कुण्या श्रीमंत, मालदार व्यक्तीकडे गेले होते. तेथे त्यांना पुस्तकांनी भरलेली कपाटे दिसली. ज्ञानकोशाचे संग्रह नीटपणे मांडून ठेवलेले, पण ते कधी बाहेर काढलेले दिसत नव्हते. त्यांनी त्या व्यक्तीला म्हटले, ‘अरे वा! एवढा ग्रंथसंग्रह पाहून बरे वाटले.’ त्यावर ते उत्तरले, ‘अहो, काय झालं, त्यांची बांधणी मी पाहिली आणि ती या हॉलच्या रंगाला मॅच होईल अशा रंगाची होती. चांगले दिसेल म्हणून घेऊन टाकली. बरं कुणी हे पाहिलं तर आपलाही भाव वाढतो.’ राऊत मनात म्हणाले की, ‘ही सारी पुस्तके घेऊन कापाटात ‘टाकलीत’ हेच बरोबर. त्यांची मांडणीही बदलायचा प्रश्न नाही, कारण तुम्ही ती कधीच वाचणं तर सोडाच, पण हाताळणारही नाही.’ तर असेही पुस्तकांचे खरेदीदार असतात! त्यांना वाचक खरे वाचक कधीच म्हणता येणार नाही.
खरेखुरे वाचक कोण, तर जे केवळ वाचनासाठीच पुस्तके घेतात, ग्रंथसग्रहालयातही जातात, कारण तेथे काही दुर्मीळ पुस्तके बाहेर नेऊ दिली जात नाहीत. उदाहरणेच द्यायची तर, संपादक गोविंदराव तळवलकर, डॉ. अरुण टिकेकर, कुमार केतकर, संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे, ‘झुंडीचे मानसशास्त्र’ लिहिणारे विश्वास पाटील, निरंजन घाटे, अशी बरीच नावं सांगता येतील.
हे लोक पुस्तकांचा अचूक संदर्भ देतात, अगदी तो कोठे मिळेल हेही सांगतात. वाटलं तर पुस्तक काढून दाखवतात. क्वचित पान क्रमांकही सांगतात. आपण काय कोठे वाचले आहे, हेही त्यांच्या स्मरणात असते. हे लोक खूपच भरभर वाचतात. इतके की, पाहणाऱ्यांना वाटते- ते केवळ पुस्तक चाळताहेतच की काय, पण त्यांनी ते संपूर्ण वाचून ध्यानात ठेवलेले असते, हे ते जे संदर्भ देतात त्यावरून कळते.
‘पानिपतकार’ विश्वास पाटील हेही याच माळेतले आहेत. यंदाच्या साहित्य संमेलनात त्यांनी मुलाखतीच्या वेळी प्रवीण टोकेकर यांना प्रश्न विचारला की, ‘तुम्ही दै. ‘सकाळ’च्या रविवार पुरवणीत पाश्चात्य चित्रपटांवर ‘मोसम हैं क्लासिकाना’ हे सदर लिहीत होतात त्यांचे पुस्तक कधी येणार?’ यावरून ते वाचलेले स्मरणात ठेवतात हे स्पष्ट झाले. पण आजच्या काळात या प्रकारचे व्यासंगी वाचन करणाऱ्या व्यक्ती खूपच कमी आढळतात. (शाळा-कॉलेजांत काही मुलांना ‘पुस्तकी किडे’ असे म्हटले जाते, पण ते केवळ जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी हे करत असतात. नंतर ते त्यांच्या क्वचितच लक्षात असते.)
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
लोक वाचनापासून दूर जात आहेत आणि त्यांना वाचाल तर वाचाल असे सांगण्याची वेळ येत आहे, याला कारण आहेत प्रसारमाध्यमे. त्यामुळे आता पुस्तकांचे उतारे वाचण्याचे कार्यक्रम अधिकाधिक होऊ लागले आहेत. अशा कार्यक्रमांना जाणाऱ्यांचा वा नंतर ते बघणाऱ्यांचा, बऱ्याचदा असा गैरसमज असतो की, या कार्यक्रमांना गेले म्हणजे, प्रत्यक्ष पुस्तक वाचनाची आवश्यकता नाही. उपाहारगृहांत, कॅफेमध्ये, किंवा निवांत हवेशीर ठिकाणी जाऊन वाचन करणारे, वा प्रवास करताना वाहनांत वाचन करणाऱ्यांकडे आजूबाजूच्या लोकांकडून संशयाने पाहिले जाते. कारण या संशय घेणाऱ्यांचा समज असा असतो की, अशा गजबजलेल्या ठिकाणी तो आरामात वाचत बसला आहे, त्यामागे त्याचा निश्चितपणे काहीतरी हेतू असणार.
ही प्रतिक्रया ही आता नैसर्गिक बाबच बनली आहे. तसे पाहिले तर बऱ्याच जणांना अशी सवय असते आणि ते अगदी मनापासून वाचत असतात. खरे तर वाचत असत, असेच आता म्हणायचे. कारण ही गोष्ट समाजमाध्यमांनी पकड घेण्यापूर्वीचीं आहे. आता वाचन म्हणजे समाजमाध्यमांवर कुणी काय लिहिले म्हणजे पोस्ट केले आहे, त्याला किती लाइक्स मिळाल्या आहेत, त्यावर कोणी काय प्रकारच्या टिप्पणी केल्या जात आहेत, हे पाहण्यासाठीच असते.
हेही खरे आहे की, समाजमाध्यमांवरील साराच मजकूर काही दुर्लक्ष करण्याजोगा नसतो. कारण जग बदलत चालले आहे. त्याचे अनेक भाग तयार झाले आहेत. अशा परिस्थितीत ऑनलाइन वाचक गटांमुळे एक पर्याय मिळाला आहे. कमी होणाऱ्या खऱ्याखुऱ्या ‘वाचनसंस्कृती’ला हा थोडा दिलासाच म्हणायला हवा. यात महत्त्वाची बाब अशी की, यातील बरीच पुस्तके क्रिएटिव्ह\सर्जनशील नाहीत, म्हणजे आपल्याला खिळवून ठेवतील, त्यांच्यात सामावून घेतील या प्रकारची नाहीत. त्यामुळे वाचक वाढण्याऐवजी कमी होण्याचीच भीती असते.
वाचन मग ते व्यक्तिशः असो, खाजगी असो किंवा सामाजिक असो, ते केवळ पुस्तक वरवर चाळणे नसते, हे लक्षात ठेवायला हवे. तरीही या महोत्सवांतून या प्रकारचे जास्तीत जास्त खरेखुरे वाचक निर्माण होवोत, असेच कुणालाही वाटेल.
.................................................................................................................................................................
लेखक आ. श्री. केतकर ज्येष्ठ पत्रकार आहेत.
aashriketkar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment