तालिबानची दाढी कुरवाळणार का मोदी सरकार?
पडघम - देशकारण
जयदेव डोळे
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Tue , 07 September 2021
  • पडघम देशकारण तालिबान Taliban अफगाणिस्तान Afghanistan अमेरिका America रशिया Russia चीन Chaina भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi

भाजपचे प्रवक्ते अन भाजपचे पाळीव चर्चक एक प्रश्न विचारला की, भयंकर बिथरत आहेत. भारत सरकार दहशतवादी तालिबान सरकारशी संबंध ठेवणार की नाही? कॅनडाने हे नवे अफगाण सरकार आपल्याला नामंजूर असून आपले व त्याचे काहीही संबंध नसतील असे जाहीर केले आहे. कोणी हिंदुत्ववादी व्यक्ती कॅनडाची पंतप्रधान आहे का काय, याने आम्हाला फार आनंद झाला. पण हाय, तसे काही नाही. दहशतवादी तो दहशतवादी! सरकार स्थापन करो की दऱ्याखोऱ्यात हिंडो. त्याच्याशी चर्चा, वाटाघाटी, तहनामा, समझोते कसचे करायचे? पण एक बरंय, मागच्या वेळी तालिबानी दहशतवादी अफगाणिस्तान काबीज करून बसले, तेव्हाही भाजपचे सरकार अन आता २०२१मध्येही भाजपचेच सरकार! मग काय तुमच्या सरकारची भूमिका? असे विचारले रे विचारले की, भाजपवाले प्रश्नकर्त्यालाच तुमची पात्रता काय, तुम्हाला काय कळते, तुमचे म्हणणे काय, असे उलट प्रश्न झाडून आपले अंगही झटकतात. मग ते भारतातल्या डाव्यांना, मुसलमानांना तुम्हीच तालिबानचे पाठीराखे असता असे म्हणून अफगाणिस्तानात पाठवून देतात.

अहो, पण ‘तुमचे काय म्हणणे त्या दहशतवादी संघटनेबद्दल?’ याचा उलगडा ते कधी करणार नाहीत. एकंदर दाढीवाले, पगडीधारी मुसलमान प्रथमच भाजपला गप्प करत असल्याचे आंतरराष्ट्रीय कूटनीतीज्ञांमध्ये बोलले जात आहे म्हणे! खरे-खोटे कोणीच न जाणे. काय करणार हो, तालिबानी (तेच ते दुष्ट, दहशतवादी, दरिंदे…) असे इतक्या वेगाने सत्तेत येतील असे वाटले नव्हते. त्यामुळे विचार करायला वेळ मिळाला नाही, असा नजरा चुकवत चुकवत भाजपवाले केविलवाणा खुलासा करू लागले आहेत. गल्लीतल्या बूथसेवकालासुद्धा कळून चुकले की, ‘दया, कुछ तो गडबड हैं’. सारे कसे शांत शांत!

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

तबलिगींची यथेच्छ बदनामी भाजपल्या अंगलट आली. दिल्लीतल्या दंगलीची दखल दिल्ली उच्च न्यायालयाने अशी काही घेतली की, जवळपास रोज पोलीस न्यायालयाची एक झापड खात आहेत. तशात अभिनेता नसीरुद्दीन शहा तालिबान्यांच्या चाहत्यांना एक चपराक देऊन बसला. घ्या आता! भाजपचे दोन मुस्लीम नेतेसुद्धा असे काही बोलले नाहीत. काय करायचे? भाजपला काही सुचेनासे झाले आहे.

काश्मीर खोऱ्यातले बंदूकधारी हे दहशतवादी, मग अफगाणिस्तानातले तालिबानी कोण? छे, छे! उत्तर फार कठीण आहे. भाजप गोंधळात सापडून डोके धरून बसला आहे. परराष्ट्र व्यवहार खाते आणखीनच गूढ, गुळमुळीत भाषेत बोलते आहे. आता आपल्या सच्च्या मित्राचा सल्ला घेतल्याशिवाय यांचे तोंड उघडणार नाही, असे पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्याची तारीख जाहीर झाल्याने वाटते आहे. काय हे, ‘अब की बार, ट्रम्प सरकार’ म्हणणाऱ्या माणसाला ‘बायडेन सरकार, करो उपकार’ असे म्हणावे लागणार. आमची तर मान खाली जाते, अशा मानभंगामुळे. एका सार्वभौम, स्वतंत्र देशाला दुसरा देश गुलाम झाला की नाही, हे ठरवता येईना? बंदुकीपुढे लोकशाही झुकली, त्याचा निषेध करवेना?

भाजपची एक अडचण त्याच्याच एका भूमिकेमुळे झाली आहे. मुसलमानांविषयी भाजप-संघ यांची मते भयंकर आहेत. मुसलमान स्वदेशावर इमान न ठेवता दूरदेशीच्या आपल्या धर्मस्थळावर ठेवतो, तो धर्मप्रिय, धर्मनिष्ठ आणि धर्मांध असतो. त्यामुळे देशभक्ती, राष्ट्रवाद, देशासाठी त्याग आदी भावनांपासून तो लांब असतो वगैरे. त्याचा दाखला म्हणून भाजपवाले सतत मुसलमानांकडून देशप्रीतीची पावती मागत असतात. मुसलमानांवर अविश्वास असल्यानेच अनेक विधानसभा, लोकसभा यांत भाजपचा लोकनियुक्त मुसलमान नाही. राज्यपालांत एक मुस्लीम असून ते मूळचे काँग्रेसवाले व जनता दलवाले आहेत. पक्षांतर करत ते स्वार्थ साधतात असा त्यांचा लौकिक आहे. अशा परिस्थितीत भारतीय मुसलमानांची दाढी कुरवाळावी लागणार की काय?

एकदा का तालिबान्यांना मान्यता देऊन झाली, त्यांच्या सरकारशी व्यवहार सुरळीत झाले की, मग भारतीय मुसलमानांशी तसेच प्रेमाने, नरमाईने, आदराने वागावे लागेल, या चिंतेमुळे भाजप स्तब्ध बसला आहे. त्याला काही सुचेनासे झाले आहे. दुसरे, तालिबानी सरकारच्या दडपणामुळे अथवा बदललेल्या धोरणांमुळे पाकिस्तानशी मैत्री करावी लागली तर? किंवा पाकिस्तान-तालिबान एकत्र आले तर, आपला शत्रू किती बळकट होईल ते कसे कळणार?

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

आयएसआयच्या सीरियामधील उठावासाठी भारतामधून कुमक म्हणून मुसलमान गेले, ते दोनशेच्या आसपास. वीस कोटींच्या मानाने नगण्यच. याचा अर्थ भारतीय मुस्लीम खिलाफत, अल्-कायदा यांना जुमानत नाही. भाजपची अडचण झाली. मग १४ ऑगस्टपासून भाजपवाल्यांनी देवबंदी पीठाची प्रेरणा, मोपल्यांचे बंड कसे तालिबानछाप होते वगैरे बोलणे सुरू केले. परंतु आपल्या सरकारने तालिबानचे काय करायचे त्यावर चुप्पी धरली. तालिबानचा आधार घेऊन भारतीय मुस्लिमांची निंदा, बदनामी सुरू झाली. भारतीय मुसलमान काय बोलतात ते पाहून भाजप सरकार तालिबानबाबत भूमिका घेईल असे वाटू लागले. पण मुसलमान मात्र ढिम्म! चार-दोन भंपक व बिनबुडाचे बोलले. पण एकटे पडले.

तालिबान्यांना दहशतवादी न म्हणता अतिरेकी, जहाल, स्वातंत्र्यसैनिक असे संबोधणारे मुसलमान भरपूर आहेत. तालिबान्यांनी अमेरिकन साम्राज्यशाही संपवल्याचे कौतुकही अनेक करतात. पण त्यामुळे लोकशाही, स्वातंत्र्य, प्रजासत्ताक, सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिकता, न्याय आदी जगन्मान्य मूल्यांची राखरांगोळी होत असते, याची त्यांनी जाणीव नसते. धर्मसत्ता हेच ध्येय मानणाऱ्या तालिबान्यांसारखे अनेक उजवे, सनातनी विचार अनेक देशांत सत्तेवर आहेत. तुमची ‘धर्मसत्ता’ तुमच्या देशात येवो, अशा शुभेच्छा तालिबानी भाजप सरकारला देऊ लागले, तर काय करायचे? ‘तुमच्या धर्मसत्तेला आमची हरकत नाही’, असे ते म्हणू लागले तर? आमच्या राज्यात हिंदू, शीख हे अल्पसंख्य सुरक्षित असतील, तुम्ही मुसलमानांच्या सुरक्षेच हमी द्या, असा सौदा तालिबान करू लागले, तर काय म्हणणार भाजप सरकार?

चीनने तर भारताला आणि भाजपला असे खिजवले की बस्स! चीन-तालिबान यांचे इतके जमले आहे की, आमचा विकास चिनी सहकार्याशिवाय होणार नाही असे तालिबानने म्हटले. गंमत अशी की, मोदींनी आजपावेतो त्यांच्या भाषणात चीनचे नाव ‘आक्रमक’ म्हणून घेतलेले नाही. तसे यूएनएससीच्या म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाच्या संरक्षण परिषदेत भारताकडे अध्यक्षपद असताना जो ठराव झाला, त्यात ‘तालिबान’ असे म्हटलेच नसल्याचे निष्पन्न झाले. १६ ऑगस्टची ती बैठक. ‘दहशतवादी’ वगैरे तर फार दूर.

याचा अर्थ चीन, रशिया, पाकिस्तान यांनी तालिबानला त्यांच्या स्वार्थासाठी पाठिंबा दिलेला आहे आणि हे तीन आपल्याला फसवायला निघालेले दिसतात, असे समजून मोदी आता जो बायडेन यांचे मार्गदर्शन घेऊन बोलणार!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

बघा, भाजपला परराष्ट्र व्यवहार खात्यातले काही कळत नाही, असे म्हणायचे की परराष्ट्र धोरणही मोदी यांच्या फायद्या-तोट्यानुसार वळवत राहायचे, देशाला समजत नाही. मोदींना अर्थव्यवहार, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण या महत्त्वाच्या विषयांत आपलाच हेका चालवायचा हे उघड दिसत असताना आता दहशतवादी, जुलमी, सनातनी तालिबान्यांबद्दल काय बोलावे ते समजत नाही? तालिबानी सत्ता येऊन १५ दिवस उलटले तरी हिंदुत्ववादी पक्षाचे सरकार ‘अजून विचार चालू’ असल्याचे सांगते, म्हणजे परिस्थिती कठीण आहे.

मुसलमानांविषयी यांची मते इतकी कलुषित आहेत की, आपल्या देशाच्या भल्याबुऱ्याचाही विचार त्यांना लवकर करवत नाही, असे सिद्ध होते आहे, नाही का?

द्वेष, तिरस्कार यामुळे डोके धड चालत नाही, असे म्हणतात ते खरेच आहे की!

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा

भारत या पूर्वीही तालिबानविरोधी उत्तर आघाडीचा प्रमुख समर्थक राहिलेला आहे. आताही तालिबानचा विरोधच केला पाहिजे

खरा मार्ग आणि खरे देशप्रेम हे दोन्ही रविन्द्रनाथांच्या ‘काबुलीवाल्या’चेच असू शकते, आत्ताच्या का‘बुली’(bully)वाल्यांचे नव्हे!

अमेरिकेने अफगाणिस्तानात विकास केला असता अन् अफूला मुळातून संपवले असते, तर अफगाणिस्तानच्या अन् जगाच्या वाट्याला हे भयानक दिवस आले नसते

तालिबान, अमेरिका, अफगाणिस्तान, रशिया, चीन आणि भारत… एक धावता दृष्टीक्षेप  

‘तालिब’ या शब्दाची पवित्रता आणि शुद्धता इतकी डागाळली आहे की, गेल्या काही वर्षांपासून ‘तालिबान’ हा शब्द ‘सैतान’ या शब्दाचा समानार्थी शब्द झाला आहे

जगात जिथं जिथं संकट येतं, तिथं तिथं बीबीसीची प्रतिनिधी लीस ड्युसेट हजर असते

सप्टेंबर २०२१नंतरचा अफगाणिस्तान, तालिबान, अमेरिका आणि भारत 

तालिबानबाबत भारताचा यू-टर्न का?

अफगाणिस्तानात आधी तालिबानचा उदय झाला, त्यानंतर अस्त झाला आणि आता पुन्हा उदय झालाय... त्याची गोष्ट

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा