‘मिळून साऱ्याजणी’ आणि ‘उद्याचा मराठवाडा’ : ‘वाचकानुनय’ न करणारे आणि ‘सेलिब्रेटीं’ना नाकारणारे दोन उल्लेखनीय दिवाळी अंक
पडघम - सांस्कृतिक
टीम अक्षरनामा
  • ‘मिळून साऱ्याजणी’ आणि ‘उद्याचा मराठवाडा’ यांची मुखपृष्ठे
  • Mon , 04 December 2023
  • पडघम साहित्यिक दिवाळी अंक Diwali Ank मिळून साऱ्याजणी Milun Saryajani उद्याचा मराठवाडा Udyacha Marathwada

गेल्या २३ वर्षांपासून ‘ती, तो आणि ते यांचा स्वत:शी आणि परस्परांशी संवाद होण्यासाठी एक चळवळ’ म्हणून ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाचा प्रपंच केला जात आहे. चळवळीची मासिकं जशी सामाजिक उत्तरादायित्व निभावणारी असतात, तसाच ‘मिळून साऱ्याजणी’चा प्रत्येक अंक असतो, आणि प्रत्येक दिवाळी अंकही. त्याला यंदाचा अंकही अपवाद नाही. अवघ्या ११८ पानांचा हा दिवाळी अंक आहे. त्यात मोजक्या कथा, मोजके लेख, मोजक्या कविता यांचा समावेश आहे.

यातला पहिला उल्लेखनीय लेख आहे ओजस सु. वि. यांचा ‘भय इथले संपत नाही… मणिपूरची वेदना!’ हा. मे महिन्यापासून मणिपूरमध्ये चालू असलेल्या हिंसाचाराचा हा रिपोर्ताज आहे. मणिपूरमधल्या महिलांशी प्रत्यक्ष फोनवरून केलेला संवाद आणि ‘रिलीफ कॅम्प’ला दिलेली प्रत्यक्ष भेट, यांवर हा रिपोर्ताज आधारित असल्याने त्यातून मणिपूरची वेदना प्रतिबिंबित होते. शिवाय लेखकाचा मणिपूरशी विविध सामाजिक कामांच्या निमित्तानं प्रत्यक्ष संबंध असल्यामुळे आणि लेखकाकडे तटस्थ दृष्टीकोन असल्यामुळे हा रिपोर्ताज ‘ऑथेंटिक’ म्हणावा असा आहे.

त्यानंतर दोन चांगले लेख आहेत ते ‘समान नागरी कायद्या’विषयीचे. अर्चना मोरे आणि हसीना खान (अनु. प्रशांत कोठडिया) यांच्या या लेखांत स्त्रियांच्या दृष्टीकोनातून या कायद्याची चर्चा केली आहे. त्यामुळे हे दोन्ही लेख चांगले वठले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ‘समान नागरी कायद्या’ची चर्चा सातत्याने होत आहे, पण त्यात नेमका कुठल्या बाजूंचा, प्रश्नांचा अभाव आहे, याचे भान या दोन लेखांतून येते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

त्यानंतर उल्लेख करावा लागेल, तो मुख्य विभाग ‘मनोरंजन आणि बौद्धिक ग्लानी?!’ याचा. त्याचं संपादन सामाजिक कार्यकर्ते जमीर कांबळे यांनी केलं आहे. मनोरंजन या विषयाचं समाजशास्त्रीय, सांस्कृतिक, राजकीय आणि मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास करणं गरजेचं आहे, असं आम्हाला वाटलं म्हणून हा एक प्रयत्न’, असं कांबळे यांनी आपल्या मनोगतात म्हटलं आहे.

या विभागात एकंदर १२ लेखांचा आणि ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे व ज्येष्ठ कथा-कादंबरीकार भारत सासणे यांच्या मुलाखतींचा समावेश आहे. ‘बौद्धिक दहशतवाद आणि भावनिक उपासमार’ ही लेख डॉ. मोहन आगाशे यांच्या मुलाखतीचं त्यांच्याच शब्दांत शब्दांकन केलेलं आहे. आगाशे यांनी बुद्धी आणि भावना यांची मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून केलेली मांडणी अतिशय मुद्देसूद, गंभीर, तार्किक आणि तात्त्विक आहे.

‘एन्जॉयमेंटचा केमिकल लोचा’ या लेखात डॉ. मुक्ता पुणतांबेकर यांनी माणसं दारू वा ड्रगची नशा का करतात, त्यांच्या आहारी जात व्यसनी का होतात, मात्र ठरवलं तर त्यातून स्वत:ला कशा प्रकारे सोडवू शकतात, याची अनुभवाधारित मांडणी केली आहे. ‘मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्रा’च्या माध्यमातून अनेकांना व्यसनांतून बाहेर काढून त्यांचं आयुष्य सावरायला मदत करणाऱ्या पुणतांबेकर यांचा हा लेख आपल्या समाजातील विद्यमान समस्येची चांगल्या प्रकारे उकल करतो.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

‘हेमांगी’ आणि ‘चौफेर समाचार’ : ‘उत्तम अंकां’च्या मांदियाळीत ‘वरच्या’ श्रेणीत उत्तीर्ण होणारे दिवाळी अंक

‘अक्षर’ आणि ‘ऋतुरंग’ : स्वत:चं एक स्वतंत्र असं ‘मॉडेल’ निर्माण केलेले मराठीतले मान्यताप्राप्त दर्जेदार दिवाळी अंक

दिवाळी अंकांची लोकप्रियता हा एक भास!

दिवाळी अंक आणि ‘प्रतिभे’ला बेजार करून सोडण्याचे दिवस!

.................................................................................................................................................................

‘संगीत : गोड, गूढ आणि गहन’ या लेखात शेखर कुलकर्णी संगीताच्या जीवन बदलून टाकणाऱ्या जादूबद्दल सांगतात. संगीताचा आनंद कशा प्रकारे घ्यायला हवा आणि त्याचे काय काय फायदे होऊ शकतात, याची त्यांनी मांडणी केली आहे. पण संगीताचीही आता ‘बाजारपेठ’ झाली आहे. त्यामुळे चांगलं संगीत, चांगलं म्हणून सांगितलं जात असलेलं संगीत, पण प्रत्यक्षात तसं नसलेलं संगीत, यांविषयीही त्यांनी जरा लिहायला हवं होतं, असं वाटतं.

‘समाज, साहित्य आणि मनोरंजन’ ही सरधोपट शीर्षकाची ज्येष्ठ कथा-कादंबरीकार भारत सासणे यांची मुलाखत मात्र निराशाजनक आहे. तिचं शब्दांकनही फारसं नीट केलं गेलेलं नाही. आणि सासणे यांना नेमकं काय म्हणायचंही तेही कळत नाही. ‘आप आखीर कहना क्या चाहते हो?’ असा प्रश्न ही मुलाखत वाचताना पडतो आणि शेवटपर्यंत त्याचं उत्तर मिळत नाही.

या विभागाचे संपादक जमीर कांबळे यांचा ‘संस्कृती की मनोरंजन’ हा लेख मात्र गोंधळलेला वाटतो. त्यात संस्कृती म्हणजे नेमकं काय, याचं दिग्दर्शन न करता त्यावर भाष्य केलं आहे, आणि उत्तरार्धात लेख एकदम वेगळंच वळण घेऊन स्त्री पितृसत्तेतल्या स्त्रीशोषणाबद्दल सांगतो.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

मानसोपचारतज्ज्ञ गौरी जानवेकर यांचा ‘मनोरंजनाचे मानसशास्त्र’ हा लेख मनोरंजनामागील मानसशास्त्र उलगडून दाखवतो; तर डॉ. शंतनु अभ्यंकर यांचा ‘पोर्नातुराणाम…’ हा लेख लैंगिकतेचं दमन आणि त्यावर उभ्या राहिलेल्या बाजारपेठेची कुंडली मांडून दाखवतो. ‘पॉर्नातूर समाज’ त्यातून काय बोध घेणार? किंवा घेणार की नाही, यावर केवळ लैंगिकच नाही, तर एकंदरीत सर्वच समस्यांचं समाधान दडलेलं आहे, असा निर्वाळाही देतो.

निमिष वा. पाटगांवकर यांनी ‘खेळाचा खेळखंडोबा का? आणि कशामुळे’ या लेखात ‘स्पोर्टस् इकॉनॉमी’ची चर्चा केली आहे; तर वैशाली दिवाकर यांनी ‘चित्रपट वाटचाल : समाजशास्त्रीय नजरेतून अभ्यासताना’ या लेखात चित्रपटांमागची सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय बाजू उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

बस, एवढेच दखल घ्यावेत असे लेख आहेत.

‘मिळून साऱ्याजणी’ : संपादक - गीताली वि. मं., पाने – ११८, मूल्य – १०० रुपये.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अलीकडच्या काळात एक लक्षवेधी दिवाळी अंक म्हणून ‘उद्याचा मराठवाडा’ने आपली ओळख निर्माण केली आहे. यंदाचा त्याचा विशेष विभाग आहे – ‘युवापर्व’. या शिवाय या अंकात कथा, कविता, बाल असे तीन विभाग आहेत. आणि प्रशांत कुलकर्णी व शिवाजी जवरे यांची व्यंगचित्रंही. ही व्यंगचित्रं राजकीय व्यंगभाष्य करणारी आहेत आणि ते भाष्य बोचरं आहे.

यंदाचं या दिवाळी अंकाचं हटकेपण त्याच्या ‘युवापर्व’ या विभागात असल्यानं त्याविषयी सविस्तर पाहू. या विभागात एकंदर १६ तरुणांचे लेख आहेत. ‘चित्रकलेत मूलभूत स्वातंत्र्य दिले, तर चित्रकला एका आवर्तनातून मुक्त होऊन व्यक्ती-व्यक्तींच्या मनोविश्वातून आपले आविष्कार करेल… कोणी व्यक्ती आपल्या आत एक मर्यादा ओलांडून कुणाला प्रवेश देते? ही जाणीव चित्रकला देते…’ असं स्पष्टपणे चित्रकार आभा भागवत यांनी ‘कवितेप्रमाणेच चित्रही चित्त ढवळून काढते’ या लेखात म्हटलं आहे. हा लेख चित्रकलेबद्दल एक वेगळी, नवी दृष्टी देतो.

साताऱ्या जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेडेगावातल्या डॉ. अभिजित सोनावणे या तरुणाने स्वत:ला गुन्हेगार होण्यापासून वाचवलंच, पण भिकाऱ्यांसाठी काम करून आतापर्यंत १७५ कुटुंबांना भीक मागण्यापासून परावृत्त करून हमाल, वेटर, शिपाई, वॉचमन अशी कामं मिळवून दिली आहेत. ‘भीक देऊ नका, मदत करा. समोरच्या व्यक्तीला आपल्यावर अवलंबून ठेवणं म्हणजे भीक. जर आपल्या कोणत्याही गोष्टीमुळे समोरची व्यक्ती स्वावलंबी होत असेल त्याला म्हणतात मदत’, असं खणखणीतपणे सांगणाऱ्या या आगळ्यावेगळ्या तरुणाचं हे लेखवजा मनोगत प्रेरणादायी आहे.

डॉ. अपूर्वा जोशी ही तरुणी ‘फॉरेन्सिक अकाउंटंटस’ म्हणून काम करत ‘डिजिटल इन्व्हेस्टीगेशन’च्या क्षेत्रांत अतिशय चमकदार कामगिरी करत आहे. मुख्यत: पुरुषांचं क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या क्षेत्रात ही तरुणी ज्या धडाडीनं काम करत आहे, ते तिच्याच शब्दांत वाचणं, हा एक विस्मयकारक आणि प्रेरणादायी अनुभव आहे.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

पुढचा लेख आहे ‘जीआय’वाल्या गणेश हिंगमरे या तरुणाचा. ‘जीआय’ म्हणजे भौमितिक ओळख. याचा विविध प्रकारची कलाकुसर, वस्तू, कृषी उत्पादनं, औद्योगिक उत्पादनं, वनस्पती आणि फळं यांच्या विक्रीकरता कशा प्रकारे फायदा होतो, याची कहाणी त्यांच्या लेखात वाचायला मिळते.

गीतांजली रोहकले या ‘फोस्टर मदर’ आहेत, म्हणजे ‘संगोपनकर्ती आई’. ‘जेव्हा अनाथ मुले संस्थेऐवजी कुटुंबात वाढली-वाढवली जातात, त्याला ‘फोस्टर केअर’ म्हणतात’, आणि ‘संस्थेतून मिळालेले बाळ कोणतेही अधिकार नाहीत याची जाणीव ठेवून आपल्या घरच्यासारखे सांभाळायचे’, या दोन विधानांतून रोहकले यांच्या कामाचं स्वरूप समजू शकतं. ‘फोस्टर मदर’ आणि ‘फोस्टर केअर’ या बहुतांशी अनभिज्ञ असलेल्या आगळ्यावेगळ्या कामाची माहिती रोहकले करून देतात.

ग्रीष्मा सोले आणि कौस्तुभ दळवी या तरुण जोडप्यानं लडाखमध्ये पहिलं ‘बॅकपेकर्स हॉस्टेल’ सुरू केलं आणि नंतर मराठमोळी ‘खानावळ’. त्याचा रोचक प्रवास सोले यांनी सांगितला आहे. ‘शेती ही एक आध्यात्मिक साधनाच असते’ या लेखात सत्यजित हंगे या तरुणाने आपल्या भावासोबत केलेल्या सेंद्रिय शेतीच्या प्रयोगाचा गाथा सांगितली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातल्या भोंडणी या गावच्या या तरुणांचा शेती हाच पारंपरिक व्यवसाय होता. त्याला त्यांनी सेंद्रिय शेतीची जोड दिली. आता या तरुणांचं मोबाईल अ‍ॅप ५३ देशांमध्ये कार्यान्वित असून हे दोघं देशातील वेगवेगळ्या महाविद्यालयांत, विद्यापीठांत आपल्या सेंद्रिय शेतीच्या प्रयोगांविषयी बोलण्यासाठी जातात.

हर्षवर्धन पटवर्धन हा तरुण परेदशातून शिक्षण घेऊन आला, वडिलोपार्जित ‘टूर अँड ट्रव्हल्स’चा व्यवसाय न करता, त्याने ‘चॅपर्स’ हा कोल्हापुरी चपलांचा नवा ब्रँड सुरू केला, आणि तो आता जागतिक स्तरावर पोहचला आहे. त्याची ही कथा वाचताना त्याच्या आगामी योजनांचीही माहिती तुम्हाला होईलच.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

‘हेमांगी’ आणि ‘चौफेर समाचार’ : ‘उत्तम अंकां’च्या मांदियाळीत ‘वरच्या’ श्रेणीत उत्तीर्ण होणारे दिवाळी अंक

‘अक्षर’ आणि ‘ऋतुरंग’ : स्वत:चं एक स्वतंत्र असं ‘मॉडेल’ निर्माण केलेले मराठीतले मान्यताप्राप्त दर्जेदार दिवाळी अंक

दिवाळी अंकांची लोकप्रियता हा एक भास!

दिवाळी अंक आणि ‘प्रतिभे’ला बेजार करून सोडण्याचे दिवस!

.................................................................................................................................................................

मूळचा नाशिकचा पण आता मुंबईकर झालेला मंदार अनंत भारदे हा तरुण अलीकडे त्याच्या दै. ‘लोकसत्ता’मधील खुमासदार विनोदी लेखनामुळे मराठी वाचकांच्या परिचयाचा झालेला आहे. या तरुणाची ओळख आहे – ‘विमानं भाड्यानं देणारा मराठी तरुण’. आजघडीला १८ राजकीय पक्षांना विमानं भाड्यानं देणारा हा महाराष्ट्रीयन तरुण समजावून घ्यायलाच हवा, असा आहे.

पर्ण पेठे ही गुणी रंगकर्मी अलीकडे सातत्यानं चर्चेचा विषय होते आहे. प्रसिद्ध रंगकर्मी अतुल पेठे हे तिचे वडील असले तरी, या मुलीचं ‘पाणी’ स्वत:चं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आणि गुणवत्ता असलेलं आहे. तिचा ‘चौकट भेदून काहीतरी करायचंय’ हा लेखच वाचून पहा… तुम्हालाही पटेलच.

प्राची शेवगावकर या तरुणीनं ‘कुल द ग्लोब’ या अ‍ॅपची निर्मिती केली आहे. हे अ‍ॅप जगभरातील ११० देशांत वापरलं जातं. कशासाठी, तर जगभरातले सजग नागरिक पर्यावरणपूरक ज्या ज्या छोट्या-मोठ्या गोष्टी करतात, त्यांमुळे नेमका काय परिणाम होतो, याचं मोजमाप या अ‍ॅपद्वारे केलं जातं. आपण रोज किती पावलं चाललो किंवा किती किलोमीटर चाललो, तर आपल्या शरीरातील किती कॅलेरीज उत्सर्जित होतात, हे मोजण्याचं काम जसं आपल्या मोबाईलमधलं एक अ‍ॅप करतं, तसंच आपल्या छोट्याशा सावधनतेचा नेमका काय फायदा होतो, हे मोजण्याचं काम ‘कुल द ग्लोब’ हे अ‍ॅप करतं. प्राचीचा लेख आपल्याला एकाच वेळी स्थानिक, क्षेत्रीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यावरणाच्या प्रश्नांबाबत सजग करतो.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

पुष्कर औरंगाबादकर या तरुणाने कीर्तनाला दिलेल्या ‘कॉर्पोरेट चेहऱ्या’ची गोष्ट सांगितली आहे, तर सारंग कुलकर्णी या सॉफ्टवेअर इंजिनिअरने बनवलेल्या मराठी आणि इतर फाँटसची. सारंग साठे हा मराठी ‘स्टँडअप कॉमेडियन’ आहे. त्याचा प्रवास त्याने सांगितला आहे. ‘आद्या’ या आपल्या दागिन्यांच्या ब्रँडची कथा सायली मराठे या तरुणीने सांगितली आहे.

जगातल्या ९०पेक्षा जास्त देशांतल्या हजारो लोकांना खगोलशास्त्राची अधिकृत माहिती देणारी ‘अ‍ॅस्ट्रॉन इरा’ ही वेबसाईट आहे. तिची संस्थापक आहे श्वेता कुलकर्णी. जगभरातल्या कितीतरी खगोलप्रेमींना घरबसल्या अवकाशाची सफर घडवून आणण्याचं काम श्वेताची ही वेबसाईट करते. तिचा हा लेखानुभव मराठी तरुणींसाठी प्रेरणादायी ठरावा.

आठ तरुण आणि आठ तरुणी असा समतोल असणारा हा विभाग खरोखरच आगळावेगळा आहे. या तरुणांच्या बहुतेक लेखांचं शब्दांकन केलेलं आहे, पण त्यांची शीर्षकं मात्र इतरांनी त्यांच्यावर लिहिलेल्या लेखाला असावीत, तशा प्रकारे दिली आहेत. एवढी एक बाब वगळता, हा विभाग ‘सरस’ झालेला आहे.

‘उद्याचा मराठवाडा’ : संपादक – राम शेवडीकर, पाने – २३८, मूल्य – २०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा