‘हेमांगी’ आणि ‘चौफेर समाचार’ : ‘उत्तम अंकां’च्या मांदियाळीत ‘वरच्या’ श्रेणीत उत्तीर्ण होणारे दिवाळी अंक
पडघम - साहित्यिक
टीम अक्षरनामा
  • ‘हेमांगी’ आणि ‘चौफेर समाचार’ या दिवाळी अंकांची मुखपृष्ठे
  • Tue , 28 November 2023
  • पडघम साहित्यिक हेमांगी Hemangi चौफेर समाचार Chufer Samachar दिवाळी अंक Diwali Ank

गेल्या ४८ वर्षांपासून नियमितपणे प्रकाशित होणारा ‘हेमांगी’ हा दिवाळी अंक अजून दोन वर्षांनी सुवर्णमहोत्सवी वर्षांत पर्दापण करेल. हा दिवाळी अंक जाणकार वाचकांना नेहमीच आवडतो. याही वर्षी तो दर्जेदार म्हणावा असाच आहे. कथा, कविता, कादंबरीअंश, लेख, परिसंवाद आणि शताब्दी स्मरण असा वैविध्यपूर्ण मजकुरानं हा अंक सजला आहे. आर्ट पेपरवरची चांगली छपाई आणि नामवंत चित्रकार पुंडलिक वझे यांचं मुखपृष्ठ, सजावट आणि चित्रे यांनी हा अंक देखणा झालेला आहे.

प्रसिद्ध विनोदी लेखक डॉ. शरद वर्दे यांनी ‘चिनी चलाखी’ या लेखात चीनी राज्यकर्त्यांची आणि चिनी नागरिकांची मानसिकता अतिशय वेधक पद्धतीनं उलगडून दाखवली आहे. वर्दे आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करत असल्यानं त्यांचा जगातल्या वेगवेगळ्या देशांशी आणि तेथील लोकांशी सातत्यानं संपर्क येतो. त्यात चीनचाही समावेश आहे. दुसरी गोष्ट, वर्दे यांनी चीनविषयी पाश्चात्य लेखकांनी लिहिलेली अनेक पुस्तकं बारकाईनं वाचली आहे. त्यातून त्यांनी चीनचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांचा अतिशय समतोल, वस्तुनिष्ठ आलेख या लेखात मांडला आहे. या अंकातला हा एक सर्वोत्तम म्हणावा असा लेख आहे.

असाच दुसरा सर्वोत्तम लेख आहे अर्थतज्ज्ञ डॉ. नीरज हातेकर यांचा. ‘महाराष्ट्र : उद्योग, रोजगार आणि राजकारण’ असं काहीसं सपक शीर्षक असलेला हा लेख वर्तमान महाराष्ट्रातल्या रोजगाराची समस्या विविध अभ्यास, अहवाल आणि आकडेवारी यांच्या आधारावर अशा प्रकारे मांडतो की, ती वाचून कुठलाही सुबुद्ध माणूस हतबुद्ध व्हावा. महाराष्ट्राचं वास्तव किती दुष्कर, दुर्घट आणि भयंकर झालं आहे, त्याची लख्ख जाणीव या लेखातून होते. ‘‘एक समाज म्हणून महाराष्ट्र आज एका मोठ्या टाईम बॉम्बवर बसलाय. पण हे बदलायचे कोणालाच नाहीये. मंदिर बांधून, शहरांची नावे बदलून, देवळात ध्यान करून जर मते मिळत असतील, तर कोणाला नकोय ते?’’ असं हातेकरांनी या लेखात म्हटलं आहे. आपल्या जळजळीत वास्तवाची अशी रोखठोक पद्धतीनं जाणीव करून देणारा हा लेख महाराष्ट्रातल्या प्रत्येकानं वाचायलाच हवा.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘मोदींसमोर आव्हाने अनेक मात्र…’ हा विनायक एकबोटे यांचा लेख

आणि

‘ ‘मूड’ मोदींच्या बाजूने?’ हा प्रशांत दीक्षित यांचा लेख, दोन्ही वाचनीय आहेत. समतोल, अभ्यासू आणि तटस्थपणा ही त्यांची वैशिष्ट्यं आहेत. दीक्षित यांनी विविध सर्व्हेंच्या आधारे मांडणी केली आहे, तर एकबोटे यांनी आपल्या पत्रकारितेच्या अनुभव-व्यासंगाच्या आधारे. त्यामुळे हे दोन्ही लेख ‘आवर्जून वाचावे’ असे नक्कीच आहेत.

‘पुस्तकखुणा’ हा गणेश मतकरी यांचा, ‘गाथा अगाथाची’ (ख्रिस्ती) हा मीना वैशंपायन यांचा, ‘अक्वा अश्विनी मेट्रो’ हा चैतन्य काळे यांचा, ‘संघर्ष हाच श्वास, शिक्षण हाच ध्यास’ हा डॉ. सोमनाथ सलगर यांचा, ‘भगिनीमत्सरग्रस्त जॅकेलीन केनेडीचं विवाहपूर्व आणि नंतरचंही बेबंद जीवन’ हा दिलीप चावरे यांचा, ‘वास्तवाला सामोरे जाऊ या’ हा शफी काझी यांचा मुस्लीम समाजाविषयीचा, प्रसिद्ध उद्योगपती अजीज प्रेमजी यांच्या पत्नी यास्मिन प्रेमजी यांच्या ‘डेज ऑफ गोल्ड अँड सेपिया’ या कादंबरीचा परिचय करून देणारा संजीवनी खेर यांचा, ‘युजेनिक्स – एक बदनाम विज्ञानशाखा’ हा मिलिंद कोकजे यांचा, ‘आणि मी कृतकृत्य झालो’ हा एका अजाण मुलीचे जीवन उदध्वस्त होण्यापासून वाचवणारा निवृत्त पोलीस उपअधीक्षक अविनाश धर्माधिकारी यांचा, शिवाजी महाराजांच्या विविध चित्रकारांनी केलेल्या चित्रकारांविषयी सुहास बहुळकरांचा, ‘गाथा सप्तसती’बद्दलचा दीपा मांडलिक यांचा, छाबाहर बंदर कार्यान्वित करण्याच्या प्रकल्पावर काम करणारा मराठी माणूस उन्मेष वाघ यांच्याविषयीचा सुरेश वांदिले यांचा, हे लेखही ‘वाचनीय’ आहेत.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

याशिवाय प्रसिद्ध अर्कचित्रकार प्रभाकर वाईरकर यांची रमेश नागेश सावंत यांनी घेतलेली मुलाखत आणि श्रीकांत बोजेवार यांच्या आगामी कादंबरीतील एक प्रकरण, हेही खास आकर्षण म्हणावं लागेल.

वसंत वाहोकार, पंकज कुरुलकर, निखिलेश चित्रे, शैलेंद्र शिर्के, रवींद्र लाखे इत्यादींच्या कथा आणि ३७-३८ कविता यांचाही अंकात समावेश आहे.

‘पुढाऱ्यांचे ‘भाषावैभव’ आणि महाराष्ट्राचे ‘आधुनिक संस्कृतिदर्शन’ हा परिसंवादाचा विषय अतिशय चांगला आणि कल्पक होता. पण त्यात सहभाग घेतलेल्या अमरेंद्र धनेश्वर, राधाकृष्ण मुळी, सुषमा शाळिग्राम, यमाजी मालकर आणि सतीश लळीत या पाचही अनुभवी लेखकांचं लेखन मात्र निराशा करते. तशीच निराशा वासंती फडके यांचा ‘श्रीविद्या प्रकाशन – मधुकाका कुलकर्णी’ आणि ‘न.र. फाटक आणि य. दि. फडके’ हे दोन्ही लेखही करतात.

ज्या दिवाळी अंकात किमान पाच तरी चांगले लेख आहेत, तो उत्तम अंक, अशी ‘लॉजिकल’ व्याख्या केली तर, हा अंक त्यात ‘वरच्या श्रेणी’त उत्तीर्ण होणारा आहे.

‘हेमांगी’ : संपादक प्रकाश कुलकर्णी, पाने – ३०८, मूल्य – ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मुखपृष्ठापासून शेवटच्या पानापर्यंत अतिशय देखण्या, आशययुक्त चित्रांमुळे, कल्पक मांडणीमुळे आणि आर्टपेपरवरील छपाईमुळे हा अंक ‘भारदस्त’ झालेला आहे. त्याचे श्रेय चित्रकार अन्वर हुसेन, शिरीष खांडेकर आणि सजावटकार अभिजीत पंडित, सचिन कदम यांना जातं.

हे या अंकाचे २८वं वर्ष आहे. आणि यंदाचं या अंकाचं वैशिष्ट्य आहे, प्रसिद्ध कवी व गीतकार जावेद अख्तर यांच्या कविता आणि ग़ज़लांचा अनुवाद. यात त्यांच्या १४ रचनांचा समावेश आहे आणि त्यांचा अनुवाद केला आहे डॉ. आलोक जत्राटकर यांनी. मूळ रचनांसोबत त्यांचा अनुवाद दिल्यानं त्या वाचताना मजा येते.

त्यानंतरचा विशेष विभाग आहे- आगामी पुस्तकांतील झलकीचा. त्यात प्रसिद्ध कादंबरीकार प्रवीण दथरथ बांदेकर यांच्या आगामी कादंबरीतील प्रकरण- ‘खरीखुरी मिथकथा’,  ‘प्रोपगंडा’, ‘रॉ- भारतीय गुप्तचर संस्थेची गूढगाथा’ या अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या पुस्तकांचे लेखक पत्रकार रवि आमले यांच्या आगामी पुस्तकातील एक प्रकरण – ‘डबल एजंट’, एअर इंडियामध्ये मुख्य वैमानिक असलेल्या कॅप्टन नीलम इंगळे-लोबो यांच्या आत्मचरित्रातलं एक प्रकरण, तरुण पत्रकार सचिन दिवाण यांच्या अफगाणिस्तानवरील पुस्तकातील प्रकरण -  ‘९\११ आणि तालिबान’ यांचा समावेश आहे. तर ‘द लॉस्ट रॉयल्टी’ (राजीव शुक्ला, अनु. मृदगंधी दीक्षित), ‘तवायफनामा’ (सबा दीवान, अनु. डॉ. शुभदा कुलकर्णी) आणि ‘द इंडियनन्स : हिस्ट्रीज ऑफ अ सिव्हिलायजेशन’ (संपा. गणेश देवी, टॉनी जोसेफ व रवी कोलीसेट्टर) मराठीत येऊ घातलेल्या पुस्तकातील राहुल मगर यांचा एक लेख ‘मध्ययुगीन महाराष्ट्र’, यांचाही समावेश आहे.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

दिवाळी अंकांची लोकप्रियता हा एक भास!

दिवाळी अंक आणि ‘प्रतिभे’ला बेजार करून सोडण्याचे दिवस!

दिवाळी अंक आणि साहित्याचे दिवाळे

.................................................................................................................................................................

प्रसिद्ध लेखिका व अनुवादक शांता गोखले यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये पाच वर्षं कलासंपादक म्हणून केलेल्या कामाचा व अनुभवांचा आलेख ‘कला संपादन : एक प्रवास’ या लेखात मांडला आहे. तो एक प्रकारे भारतीय वर्तमानपत्रांच्या ‘ऱ्हासपर्वा’चाही आलेख आहे. ‘ ‘पॅपाराझी’या’ या लेखात टीव्ही पत्रकार राखी पाटोळे यांनी हिंदी सिनेमांतील नट-नट्यांची विमानतळावर, राहत्या घरी, जिममध्ये, पबमध्ये छायाचित्र काढणाऱ्या काही ‘पॅपाराझी’ छायाचित्रकारांची ओळख करून देणारा लेख मनोरंजन विश्वातील जीवघेणी स्पर्धा आणि त्यात काम करणाऱ्या कलावंतांची भागमदौड अधोरेखित करतो. ‘कानडी मुलखातील सिद्दींच्या शोधात…’ हा प्रणव विजयकुमार पाटील यांचा रिपोर्ताज म्हणजे कधीकाळी गुलाम म्हणून दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणलेल्या या सिद्दींची जीवनशैली आणि संस्कृती यांची ओळख करून देतो. पाटोळे आणि पाटील या दोघांनाही त्यांच्या लेखांबद्दल धन्यवाद द्यावेत, असे हे दोन्ही लेख आहेत.

‘चाँदनी की पाँच परतें’ हा राणी दुर्वे यांचा लेख नर्मदा परिक्रमेच्या आठवणी सांगतो. दुर्वे या ललितलेखिका त्यांच्या वेधक आणि चित्रशैलीमुळे प्रवासवर्णनपर लेख अशा काही नजाकतीनं फुलवत, रंगवत नेतात की, त्याच्या प्रेमातच पडायला होतं. हाही लेख त्याला अपवाद नाही. रश्मी कशेळकर या कोकणातल्या ललितलेखिकेनेही अलीकडच्या काळात आपली नाममुद्रा लखलखीतपणे उमटवली आहे. त्याचा पुनर्प्रत्यय त्यांच्या या अंकातील ‘राज्य माझं… राज्यमासे माझे’ या लेखातूनही येतो.

‘सॅली मान’ या लेखात चित्रकार नितीन दादरावाला यांनी अमेरिकन महिला छायाचित्रकाराच्या लखलखत्या कारकिर्दीचा वेधक परिचय करून दिला आहे. दादरावाला सध्या ‘जागतिक स्त्री छायाचित्रकार’ या प्रकल्पावर काम करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी हा लेख लिहिला असावा. म्हणजे लवकरच ‘प्रतिमा-प्रचिती’सारखं त्यांचं नवं कलात्मकदृष्ट्याही उच्च अभिरुची असलेलं कलापुस्तक मराठी वाचकांसमोर येणार आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

उर्दू शायरीचे संशोधक मुहम्मद हुसैन उर्फ आझाद आणि त्यांच्या इतिहासग्रंथाची ओळख रेखा देशपांडे यांनी करून दिली आहे; तर फर्डिनंड मॅगेलिन या पहिली पृथ्वी प्रदशक्षिणा करणाऱ्या बहाद्दराची ओळख मकरंद जोशी यांनी करून दिली आहे. भारत सरकारच्या विदेश विभागाअंतर्गत सध्या पेरू या ठिकाणी भारतीय राजदूत म्हणून कार्यरत असलेल्या विश्वास सपकाळ यांनी फिझी या जवळपास ३८ टक्के लोकसंख्या भारतीय वंशाची असलेल्या देशाची ओळख करून दिली आहे.

‘राजीनामाख्यान’ – सॅबी परेरा, ‘देशांतरीच्या गोष्टी सांगता…’ - विशाखा पाटील, ‘प्रयोगशील पॉप आर्टिस्ट : यायोई कुसामा’ – अरुंधती देवस्थळे, ‘स्टोन स्टोरीज’ – भ. मा. परसवाळे, ‘कभी ऐ हकीकत-ए-मुंतजर’ – डॉ. नंदू मुलमुले, ‘वाघ : भारतीय कलेतील’ – अतुल धामनकर, हेही लेख ‘वाचनीय’ आहेत.

याशिवाय जयप्रकाश सावंत यांनी अनुवादित केलेली जितेंद्र भाटिया यांची कथा, सुनिल साळुंखे यांच्या पंचकथा आणि योजना यादव, अनिल साबळे, वसीमबारी मणेर, निहार सप्रे, असीम अमोल चाफळकर,  अनंत खासबारदार स्वतंत्र आहेत.

‘चौफेर समाचार’ – संपादक अरुण नाईक, पाने – २३२, मूल्य – ३५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा