दिवाळी अंक आणि ‘प्रतिभे’ला बेजार करून सोडण्याचे दिवस!
पडघम - साहित्यिक
टीम अक्षरनामा
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 14 October 2020
  • पडघम साहित्यिक दिवाळी अंक मराठी लेखक प्रतिभा

दिवाळी जवळ येऊ लागली की, मला गो. वि. करंदीकर यांचा ‘स्पर्शाची पालवी’ हा छोटासा ललितलेखसंग्रह आठवायला लागतो. त्यातले काही लेख मनात रुंजी घालायला लागतात. त्यातही ‘‘नाही’ म्हणण्याची शक्ती’ हा लेख विशेषकरून आठवत राहतो. त्यात करंदीकर सुरुवातीलाच म्हणतात -

“दिवाळी अंकाची साथ सुरू होताच ‘नाही’ म्हणण्याची शक्ती नाहीशी होऊ लागते; आणि लेखकांच्या किंवा संपादकांच्या विनयी स्वभावामुळे बहुप्रसव स्त्रीच्या नशिबी येणारी बहुतेक दु:खे प्रतिभेला भोगावी लागतात. ऐन दिवाळीच्या दिवसांत प्रतिभेला मात्र अंधाऱ्या खोलीत पडून राहावे लागते. सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या विचाराने तिचा जीव बेजार होतो… तिच्या अपत्यांची संख्या वाढत जाते, पण ती सगळीच मुडदूस होऊन जन्मलेली दिसतात! जुन्या भांड्यांची ही नवी आदळआपट संपली नाही, तोच नवी दिवाळी आणि नवी दु:खे तिच्या डोळ्यांसमोर दिसू लागतात. आता प्रतिभेच्या या विटंबनेला नेहमी तिचा विनयच जबाबदार असतो असे मात्र नाही; क्वचित् अहंकार असतो, क्वचित् प्रदर्शनप्रियता असते, क्वचित् प्रसिद्धीची हाव असते; क्वचित् – पण फारच क्वचित् – आर्थिक ओढग्रस्तही असते! मात्र सर्वांत प्रभावी कारण प्रतिभेच्या अंगात ‘नाही’ म्हणण्याची शक्ती नसते हेच होय.”

मराठी साहित्यात बाई, आई यांचे कौतुकसोहळे सुरुवातीपासून अनेकांनी गायले आहेत. प्रतिभा ही तर स्वयंभू, बुद्धिमान बाई. त्यामुळे तिच्याबद्दल तर खूपच आदरानं, विनयानं आणि अभिमानानं लिहिलं जातं. कोण तिला ‘दैवजात देणगी’ म्हणतं, कोण कर्णाच्या कवचकुंडलांसारखी ‘जन्मजात दैणगी’ म्हणतं, कोण ‘प्रतिभाशक्ती’ म्हणून तिचा गौरव करतं, कोण तिला ‘प्रतिभा’राणीचा दर्जा देतं, तर कोण ‘प्रतिभादेवी’ म्हणूनही तिची आराधना करतं. दैवजात म्हणा नाहीतर जन्मजात म्हणा, अशा देणग्या क्वचितच कुणाला मिळतात. पण ती आपल्याला मिळावी किंवा मिळाली असती तर किती बरं झालं असतं, आपण यंव केलं असतं, त्यंव केलं असतं, असे मनचे मांडे बहुतेक मराठी लेखक खात असतात. त्यामुळे ज्यांना प्रतिभा ‘देणगी’ म्हणून मिळत नाही, ते लेखक तिची आराधना, कौतुक, खुशामत, अशा नानाविध प्रकारे ती आपल्याला कशी वश होईल, याच्या प्रयत्नात असतात.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आता प्रतिभा ही जात्याच बुद्धिमान असल्यामुळे तशी खूप स्वाभिमानी आणि स्वतंत्र विचारांचीही बाई असते. ती अशी कुणाही एैऱ्यागैऱ्याला सहजासहजी फशी पडत नाही. पण प्रतिभेने आपल्याला वश व्हावं, यासाठी जगात सर्वांत जास्त कोण खुशामतखोरपणा करत असेल तर ते मराठी लेखक! त्यांच्या या बाबतीतल्या प्रयत्नांना अक्षरक्ष: तोड नाही. हरप्रकारे, ऐनकेनप्रकारे, रात्रीचा दिवस करून किंवा दिवसाची रात्र करून, प्रयत्नांची पराकाष्ठा करून आणि अनेक जण कोंड्याचा मांडा करून प्रतिभेचा पिच्छा पुरवतात. सतत तिचा माग काढत राहतात.

वनप्रेमी अभ्यासक प्राण्यांच्या पावलांच्या ठशाच्या आकारांवरून हा कोणता प्राणी असेल, साधारणपणे तो कधी इथून गेला असेल, याविषयीचे बरेचसे अचूक अंदाज बांधतात. कारण ती एक शास्त्रीय अभ्यासातून तयार केली गेलेली पद्धत आहे. तशी काही शास्त्रशुद्ध पद्धत मराठी लेखकांनी आजवर शोधून काढल्याचं ऐकिवात नाही. त्यामुळे त्यांना प्रतिभेचा माग शांतपणे काढता येत नाही. ते आपल्या मूळ स्वभावासारखे घिसाडघाईने किंवा धसमुसळेपणा करत तिची आराधना करत राहतात.

आपण पाठलाग करतोय हे कळू नये म्हणून या लेखकांना मध्ये बरंच अंतरही राखावं लागतं. त्यामुळे होतं काय की, प्रतिभा हमरस्त्यावरून चालता चालता भर्रकन एखाद्या गल्लीत वळते. तेव्हा मराठी लेखकांची ज्याम पंचाईत होते. ते कोपऱ्यावरून हळूच तिला पाहण्याचा प्रयत्न करतात, पण ती त्या गल्लीतून बाहेर पडेपर्यंत त्यांना त्या गल्लीत शिरता येत नाही. या घोळात प्रतिभा मध्येच आपल्या ‘बॉयफ्रेंड’च्या घरात शिरून त्याच्याशी प्रेमालाप करून घेते. ती दिसत नाही, असं लेखकांना वाटल्यामुळे ते त्या गल्लीत शिरतात आणि दुसरीकडून बाहेर पडतात. पण तो चौरस्ता असतो. मराठी लेखक हमरस्त्यावरच्या रहदारीला, वेगाला, गोंगाटाला पाहूनच इतके गोंधळतात की, बस्स! चौरस्त्यावर तर हे सगळे प्रकार चारही बाजूंनी त्यांच्या अंगावर येतात. त्यामुळे ते भोवंडून जातात. तेवढ्यात प्रतिभा आपला कार्यभाग साधून पसार होते.

पण हा व्यवहार असा सरळपणे सहसा होत नाही किंवा मराठी लेखक तो होऊ देत नाहीत. त्यात प्रतिभा बुद्धिमान, मानी, अभिमानी, स्वतंत्र स्त्री; तिला तिचा ‘बॉयफ्रेंड’ही असतो. पण तिच्यावर जीव ओवाळून टाकणारे आणि तिच्यासाठी जीवाची आगपाखड करणारे ‘रोमिओ’ (पक्षी मराठी लेखक) काही कमी नसतात!

त्यामुळे ज्यांना ती प्राप्य होत नाही, ते तिला कुठल्या ना कुठल्या प्रकारे मिळवण्याचा प्रयत्न करतातच. त्यात स्त्रीलेखिकाही आल्या. पण त्यांना जेंडरचा फार प्रॉब्लेम नसतो. त्यामुळे त्यांना बहुतेक वेळा प्रतिभा आपली जिवलग मैत्रीण म्हणून हवी असते. तसं काही प्रमाणात पुरुष लेखकांचंही असतं म्हणा! मुळात प्रतिभा ही फारच विरळा असल्यामुळे बहुतेक मराठी लेखकांना ती आपली निदान मैत्रीण तरी असावी असं मनातल्या मनात वाटत असतंच. पण जेंडर वेगवेगळा असल्याने या बुद्धिमान, सौंदर्यवतीचं त्यांना आकर्षणही जबर असतं. त्यामुळे ते लगेच अधिर होतात.

त्यात प्रतिभा अनारकली असली तरी ती केवळ सलीमलाच वरणारी नाही, हा तिचा सर्वांत मोठा वीक पॉइंट आहे. तिला आपल्या चाहत्यांना, भक्तांना, प्रेमिकांना तडकाफडकी उडवून लावता येत नाही. खानदानी विनयशीलता आणि अभिजात सुसंस्कृतपणा अंगी मुरलेला असल्यामुळे ती ‘जमणार नाही’ असे ‘एक घाव, दोन तुकडे’ करू शकत नाही. तिच्या या ‘नाही’ न म्हणण्याचा शक्य तितका फायदा घेण्यासाठी मराठी लेखक टपलेलेच असतात. थोडेसे आढेवेढे घेतले, नकाराचा सूर लावला किंवा सौम्य शब्दांत निषेध दर्शवला, तर तो ‘होकार’च समजायचा असतो, या रुजलेल्या संकेताला वेठीला धरून ते आपला कार्यभाग उरकून घेतात.

यात होतं काय की, प्रतिभा आधीच अप्राप्य, त्यात ती काहीशी ओढूनताणून मिळवलेली. मग तिचा शांतपणे लाभ घ्यावा, हे मराठी लेखकांना कसं जमणार? शृंगार नावाचा एक रस असतो आणि त्याच्या आस्वादाचं एक शास्त्रही असतं, या गोष्टी बहुतेक मराठी लेखकांच्या गावी नसतात. त्यामुळे घिसाडघाईला उत्कटतेचं लेबल लावून आणि बटबटीतपणाला आविष्काराचा मुलामा देत ते प्रतिभेशी झोंबाझोंबी करत राहतात.

हौश्या-नवश्या-गवश्यांच्या मगरमिठीत सापडलेल्या प्रतिभेची तर लवकर सुटकाच होत नाही. तिला रात्रंदिवस त्या अंधाऱ्या खोलीत पडून राहावं लागतं, प्रत्येकाला आनंदी करावं लागतं. दिवाळी जसजशी जवळ यायला लागते, तसतशी ती अधिकाधिक ‘बेजार’ होत जाते!

काहींना आपला ‘परफॉर्मन्स’ दाखवून द्यायचा असतो, काहींना आपण अजूनही शर्यतीत आहोत हे दाखवून द्यायचं असतं, काहींना आपला ‘रियाज’ पारखून घ्यायचा असतो, काहींना आपणही ‘प्रतिभा’प्राप्त आहोत हे ठसवायचं असतं, काहींना आम्हीही ‘प्रतिभा’वान आहोत हे सांगायचं असतं, काहींना आपल्यालाही प्रतिभा ‘वश’ आहे हे मिरवायचं असतं, काही खरं तर आता थकलेले असतात पण त्यांना संपादकांना ‘नाही’ म्हणता येत नाही, काहींना आता आपल्यात ‘राम’ राहिलेला नाही हे कळत असतं पण वळत नसतं, असे सगळे प्रतिभेची विटंबना करायच्या मागे लागतात.

निवांतपणा, निश्चिती ही आपल्याच फायद्याची असते, याचा शोध अजून बहुतांश मराठी लेखकांना लागलेला नाही. घिसाडघाई, धसमुसळेपणा हे आपले सदगुण नसून दुर्गुण आहेत, याचा विचार कधी त्यांना करवत नाही. आणि दूरदृष्टी ही ध्येयनिश्चितीसाठीची सर्वांत गरजेची गोष्ट असते, याची बहुतांश मराठी लेखकांना कल्पनाही नसते. ज्यांना थोडीफार असते, त्यांनाही तिचा मार्ग अनुसरता येत नाही. कारण सभोवतालचे दबाव बलवत्तर असतात.

त्यामुळे मराठी लेखकांच्या धसमुसळेपणामुळे, घिसाडघाईमुळे आणि अमानुषपणामुळे प्रतिभा खंगत जाते. तिची प्रकृती खालावत राहते. तिचं भरणपोषण करण्याऐवजी शोषणच होत राहतं. तरीही तिला नवनव्या अपत्यांना जन्म द्यावा लागतो. मरणकळा म्हणाव्यात अशा बाळंतकळा सोसत राहाव्या लागतात.

मराठी लेखकांचं बळ आंधळ्या धृतराष्ट्रासारखं असतं. धृतराष्ट्राने तर शंभर अपत्यं जन्माला घातली. त्याच्या मुलांचं पुढे पांडवांबरोबरच्या युद्धात काय झालं ते सगळ्यांना माहीत असतं. पण ही गोष्ट अजून मराठी लेखकांना माहीत नसावी. कारण त्यातले बहुतांश धृतराष्ट्राच्या वरताण ‘कामगिरी’ करताना दिसतात. पुत्रप्रेम माणसाला किती आंधळं करतं, याचं जगात सर्वांत मोठं उदाहरण म्हणून मराठी लेखकांचंच नाव स‌र्वांत आघाडीवर असावं.

मराठी लेखकांच्या या ‘भीमपराक्रमी’ बाण्यामुळे महाराष्ट्रात सर्वांत जास्त शोषित, वंचित, अगतिक आणि पामर कुणी असेल तर ती ‘प्रतिभा’च!

याचा अर्थ ती कधीच आपला इंगा दाखवत नाही असं नाही. काहींना ती पहिल्या-दुसऱ्या अपत्यानंतरच दाखवते. काहींना पहिल्या अपत्यावेळीच दाखवते. काहींना शेवटपर्यंत दाद देत नाही. काहींना पावते, पण ती अवकृपा म्हणूनच. काहींच्या वाट्याला वळवाच्या सरीसारखी येते. काहींच्या वाट्याला नवससायास करूनही येत नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

पण तरीही मराठी लेखक काही तिचा पिच्छा सोडत नाहीत. तिला बेजार करणंही थांबवत नाहीत. हे गेल्या अनेक वर्षांपासून चालूच आहे. यापुढेही चालूच राहणार आहे. त्यातल्या त्यात यंदाची दिवाळी प्रतिभेला जरा बरी जाण्याची शक्यता आहे! या वर्षी काही तिच्यावर गेल्या अनेक वर्षांसारखी (किंवा पुढच्याही अनेक वर्षांसारखी) ‘बेजार’ होण्याची पाळी येणार नाही. तिला यंदा अनेक वर्षांनी बऱ्यापैकी उसंत मिळणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी प्रतिभेला चांगली जाण्याची शक्यता आहे!

कारण करोनामुळे गेले सहा-सात महिने देश सुरुवातीला काही काळ पूर्णपणे आणि गेल्या दोन महिन्यांपासून अंशत: ठप्प असल्याने यंदा बऱ्याच दिवाळी अंकांचे येते होणार नाहीत. ज्यांचे होणार आहेत त्यांचीही पाने बरीच कमी होणार आहेत. कारण दिवाळी अंकांचा प्राणवायू असलेल्या जाहिराती यंदा फारशा मिळण्याची शक्यता नाही. आणि किमतीही भरमसाठ वाढवता येणार नाहीत. त्या आधीच ३००च्या आत-बाहेर गेल्या आहेत. अजून वाढवल्या तर आधीच पगार कपात, महागाईने त्रस्त झालेला वाचक त्यांच्यावर फुली मारण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यंदा प्रतिभेला फारसं बेजार केलं जाणार नाही.

लेखक आणि संपादकांचे आग्रही स्वभाव आणि प्रतिभेचीही ‘नाही’ न म्हणण्याची वृत्ती कायम असली तरी करोनाकृपेमुळे प्रतिभेसाठी ही दिवाळी थोडीफार सुसह्य ठरणार यात शंका नाही!

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा