व्लादिमीर पुतिन युक्रेनसोबतचे युद्ध आधीच हरले आहेत...
पडघम - विदेशनामा
युव्हाल नोआ हरारी
  • रशिया-युक्रेन संघर्षाची काही छायाचित्रं
  • Sat , 05 March 2022
  • पडघम विदेशनामा रशिया Russia सोव्हिएत रशिया Soviet Union युक्रेन Ukraine नाटो NATO अमेरिका America संयुक्त राष्ट्रसंघ United Nation

एका आठवड्यापेक्षाही कमी युद्ध-कालावधीत व्लादिमिर पुतिन हे एका ऐतिहासिक पराजयाकडे वाटचाल करत आहेत, असेच मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. ते कदाचित सगळ्या लढाया जिंकतीलही, पण तरीही हे युद्ध मात्र ते गमावतील. युक्रेन हे काही अस्सल राष्ट्र नव्हे, युक्रेनियन्स ही काही अस्सल प्रजा नव्हे, आणि कीव्ह, खारकीव्ह आणि ल्विव्हचे रहिवासी मॉस्कोच्या राजवटीसाठी आतूर आहेत, याच ‘असत्या’वर रशियन साम्राज्याच्या पुनर्बांधणीचे पुतिनचे स्वप्न नेहमीच आधारलेले आहे. युक्रेन हजारपेक्षाही जास्त वर्षांचा इतिहास असलेले राष्ट्र आहे. मॉस्को जेव्हा एक लहानसे खेडेही नव्हते, त्या काळी कीव्ह हे महानगर होते. आणि हे माहीत असूनही या निरंकुश रशियन सत्ताधिशाने कितीतरी वेळा असत्य सांगितले आहे.   

युक्रेनवरील हल्ल्याची योजना बनवत असताना पुतिन अनेक परिचित तथ्ये लक्षात घेऊ शकला असता. लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत रशिया युक्रेनपेक्षा प्रबळ आहे, हे त्याला माहीत होते. युक्रेनच्या मदतीसाठी नाटो सैन्याच्या तुकड्या पाठवणार नाही, हेही त्याला माहीत होते. रशियन तेल आणि वायू यावर युरोपियन देश अवलंबून असल्यामुळे जर्मनीसारखी राष्ट्रे कठोर निर्बंध लादण्यास का-कू करतील, हे त्याला माहीत होते. या परिचित तथ्यांवर आधारित, युक्रेनला जबर तडाखा देण्याची, युक्रेन सरकारचे शिरकाण करण्याची, कीव्ह येथे कळसूत्री सरकार स्थापन करण्याची आणि पश्चिमी निर्बंधांमधून सुटका करून घेण्याची पुतिनची योजना होती.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

पण या योजनेबाबत एक मोठीच बाब अज्ञात होती. जसे अमेरिकनांना इराकमध्ये आणि सोविएटसना अफगाणिस्तानमध्ये धडा मिळाला, एखाद्या देशावर विजय मिळवणे त्या देशाला ताब्यात ठेवण्यापेक्षा जास्त सोपे असते. युक्रेनला जिंकण्याचे सामर्थ्य आपल्याकडे आहे, हे पुतिनला माहीत होते. पण युक्रेनियन जनता फक्त मॉस्कोचे कळसूत्री बाहुले बनून राहणे स्वीकारील काय? मॉस्कोच्या हातातील खेळणे बनणे ते स्वीकारतील, असे समजण्याचे दु:स्साहस पुतिनने केले. काही का होईना, जो कोणी ऐकायला तयार असेल, त्या कुणालाही तो वारंवार समजावून सांगत असे- युक्रेन हे काही अस्सल राष्ट्र नव्हे, आणि युक्रेनियन्स काही अस्सल प्रजा नव्हेत. २०१४मध्ये क्रिमियामधील जनतेने रशियन हल्लेखोरांचा क्वचितच प्रतिकार केला. २०२२ तरी काही वेगळे का बरे असावे?

जाणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर पुतिनची खेळी अपयशी ठरतेय, हे जास्तच स्पष्ट होत चाललंय. सर्व जगाचे कौतुक मिळवत अन् युद्ध जिंकत युक्रेनियन नागरिक सर्व शक्ती पणाला लावून विरोध करत आहेत. पुढचे कित्येक दिवस अंध:कारमय आहेत. तरी अद्यापही रशिया संपूर्ण युक्रेनवर विजय मिळवू शकतो, पण युद्ध जिंकण्यासाठी, रशियनांना युक्रेनला काबूत ठेवावे लागेल. युक्रेनच्या नागरिकांनी ते होऊ दिले तरच ते शक्य आहे. आणि हे तर जास्तच असंभव वाटत आहे.

नष्ट होणारा प्रत्येक रणगाडा अन् ठार होणारा प्रत्येक रशियन सैनिक युक्रेनियन लोकांचे धैर्य वाढवत आहे. आणि मारला गेलेला प्रत्येक युक्रेनियन त्यांचा हल्लेखोरांबाबतचा तिरस्कार तीव्र करत आहे. पण जुलमाखाली दडपलेल्या राष्ट्रांसाठी, तिरस्कार हा एक छुपा खजिना असतो. हा तिरस्कार खोल हृदयांमध्ये पिढ्यानपिढ्या दबून राहू शकतो. रशियन साम्राज्य पुनर्स्थापित करण्यासाठी, पुतिनला त्यामानाने रक्तविहीन विजयाची गरज आहे. असा विजय त्याला, तुलनात्मकदृष्ट्या तिरस्कारविहीन ताबा मिळवण्याकडे नेईल. जास्तीत जास्त युक्रेनियन रक्तपात करत, स्वत:चे स्वप्न कधीही साकार होणार नाही, याचीच खात्री पुतिन करत आहे. रशियन साम्राज्याच्या मृत्यू प्रमाणपत्रावर मिखाईल गार्बाचेवचे नाव असणार नाही, तर पुतिनचे असेल. गार्बाचेवने रशिया आणि युक्रेनमध्ये भावंडांसारखे संबंध निर्माण केले होते; तर पुतिनने तेच संबंध शत्रुवत करून ठेवले, आणि युक्रेनियन राष्ट्र यापुढे स्वत:ला रशियाच्या विरोधात मानेल, याची खात्री करून घेतली आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

शेवटी राष्ट्रे ही कथांवर उभारली गेलेली असतात. मागे पडणारा प्रत्येक दिवस अशा कथांमध्ये भर घालत आहे. केवळ येणाऱ्या अंध:कारमय दिवसांमध्येच नाही, तर येणारी दशके आणि भावी पिढ्यांमध्येही या कथा सांगितल्या जातील. आम्हाला युद्धसामग्री हवीय, फेरफटका नकोय, असे अमेरिकेला सांगत, राजधानी सोडून पळून जाण्यास नकार देणारा राष्ट्राध्यक्ष; रशियन युद्धनौकांना ‘चालते व्हा’ असे बजावणारे स्नेक आयलंडवरील सैनिक; रशियन रणगाडे येणाऱ्या रस्त्यांवर बसून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणारे नागरिक या सर्वांतूनच राष्ट्रे घडत असतात. शेवटी, रणगाड्यांपेक्षा अशा कथांचे मोल निश्चितच जास्त असते.

इतर कुणाही सारखेच, रशियन जुलूमशहांनासुद्धा हे माहीत असायला हवे. एक लहान मूल म्हणून, लेनिनग्राडच्या वेढ्यातील जर्मन अत्याचारांच्या आणि रशियन शौर्यकथांच्या खुराकावरच तर ते पोसले गेले आहेत. आता ते स्वत:च अशा कथा निर्माण करत आहेत, पण स्वत:ला हिटलरच्या भूमिकेत ठेवून.

युक्रेनियन शौर्यकथा फक्त युक्रेनियनांनाच नव्हे, तर सर्व जगाला निर्धार देत आहेत. युरोपियन राष्ट्रांच्या सरकारांना, अमेरिकी प्रशासनाला, आणि इतकेच नव्हे तर, अत्याचाराखाली दडपल्या गेलेल्या रशियन नागरिकांनासुद्धा या कथा धैर्य प्रदान करतात. जर युक्रेनियन नागरिक साध्या हातांनी रणगाड्याला थांबवण्याची हिंमत करू शकतात, तर जर्मन सरकार त्यांना काही रणगाडाविरोधी मिसाइल्स पुरवण्याचे धाडस दाखवू शकते, अमेरिकन सरकार रशियाला स्विफ्टमधून काढून टाकण्याचे धैर्य दाखवू शकते, आणि रशियन नागरिक या निरर्थक युद्धाविरोधात प्रदर्शने करण्याचे धाडस करू शकतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आपण सर्वच जण काहीतरी करण्याचे धैर्य दाखवण्यास प्रेरित होऊ शकतो, मग भलेही ते देणगी देणे असो, निर्वासितांचे स्वागत करणे असो, किंवा या संघर्षाला ऑनलाईन मदत करणे असो. युक्रेनचे युद्ध सर्व जगाच्या भविष्याला आकार देईल. जुलूम आणि आक्रमणांना जर जिंकू दिले, तर आपणा सर्वांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. फक्त बघ्याची भूमिका घेऊन राहण्यात काहीच अर्थ नाही. ही वेळ आहे ठामपणे खडे होण्याची आणि आपला सहभाग नोंदवण्याची.

दुर्दैवाने, हे युद्ध दीर्घकाळ चालेल असे दिसत आहे. वेगवेगळी रूपे घेत, हे युद्ध वर्षानुवर्षे सुरू राहू शकते. पण सर्वांत महत्त्वाचा मुद्दा तर आधीच निश्चित झालेला आहे. मागील काही दिवसांनी सर्व जगाला हे सिद्ध करून दाखवले आहे की, युक्रेन हे अस्सल राष्ट्र आहे नि युक्रेनियन्स हे अस्सल लोक आहेत. आणि त्यांना नक्कीच नवीन रशियन साम्राज्याच्या अधिन राहावयाचे नाही हेही. हा संदेश क्रेमलिनच्या प्रचंड भिंतींना भेदून पार जाण्यास किती काळ लागेल, हा महत्त्वाचा प्रश्न मागे उरतोच.

..................................................................................................................................................................

हा मूळ इंग्रजी लेख https://www.theguardian.com या पोर्टलवर २८ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

https://www.theguardian.com/commentisfree/2022/feb/28/vladimir-putin-war-russia-ukraine?utm_source=instagram&utm_campaign=harariopinion

..................................................................................................................................................................

मराठी अनुवाद - मीना भोसले

meenabhosale1965@gmail.com

..................................................................................................................................................................

हेही पहा\वाचा

असं वाटतं की, व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर बायडेन व पुतिनला टॅग करता येतं का, ते बघावं! म्हणजे उद्यापर्यंत तेच जाहीर करतील- ‘युद्ध थांबवतो, पण फॉरवर्ड मेसेजेस नको!!...’

ही लढाई डेव्हिड आणि गोलियथची आहे. रशिया नावाच्या महाकाय गोलियथपुढे युक्रेन नावाचा डेव्हिड हार मानायला तयार नाही!

आज युक्रेनची गत ‘रामायणा’तल्या विभीषणासारखी झालीय. रशिया आणि नाटो देश त्याला ‘बिभीषण’सारखा घरभेदी मानायला लागले आहेत

रशिया-युक्रेन संघर्ष : अमेरिका, युरोपियन राष्ट्र, नाटो, चीन आणि भारत

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा