राजन खान : आडपडदा नसलेला रोखठोक माणूस आणि रोखठोक लेखक!
पडघम - साहित्यिक
राम जगताप
  • राजन खान यांची कालच्या वाढदिवशी काढलेली काही छायाचित्रं
  • Wed , 23 November 2022
  • पडघम साहित्यिक राजन खान Rajan Khan मराठी कथा मराठी कादंबरी

प्रसिद्ध कथा-कादंबरीकार राजन खान यांनी कालच्या १९ नोव्हेंबर २०२२ रोजी ६०व्या वर्षांत पदार्पण केलं. त्यानिमित्तानं त्यांच्याविषयीचा हा लेख…

.................................................................................................................................................................

.

राजन खान हा माणूस फाटक्या तोंडाचा असला तरी लोभस आहे. फटकळ असला तरी प्रेमळ आहे. कथा-कादंबरीकार म्हणून मोठा आहेच, पण माणूस म्हणूनही तितकाच मोठा आहे. ‘बिग इगोज, स्मॉल मेन’ अशा टाईपची माणसं मराठी साहित्यात खूप दिसतात. ‘बिग इगोज, बिग मेन’ असाही प्रकार पाहायला मिळतो. पण ‘बिग मेन, स्मॉल इगोज’ अशी माणसं मराठी साहित्यात फारशी पाहायला मिळत नाहीत. राजन खान हा लेखकमाणूस तसा आहे.

असं असलं तरी त्यांच्याबद्दल मराठी साहित्य आणि प्रकाशन व्यवहारातल्या बहुतेकांची दोनच मतं असल्याचं दिसतं. एक - फार अर्वाच्य मनुष्य आहे. काहीही बोलतो. दोन - अतिशय दिलदार आणि उत्साही मनुष्य आहे.

त्यांना जी माणसं जवळून ओळखतात किंवा जे त्यांच्या मित्रपरिवारातले आहेत, त्यांना ही दोन्ही मतं माहीत असतात, पण ती अजून काही अशीच प्रचलित असलेली वावदूक मतं सांगू शकतात. उदा. फार फटकळ माणूस आहे. त्यामुळेच मराठी साहित्यात त्यांच्याबद्दल सहसा कुणी चांगलं बोलत नाही. त्यांचं स्वतःवर फार प्रेम आहे. हा माणूस सतत काहीतरी लपवत असतो. त्याने मुद्दामहून ‘खान’ हे आडनाव लावलेलं आहे. राजन ‘खान’ आहेत, तर त्यांच्या मुलांची नावं ‘झिला’, ‘डेबू’ अशी का आहेत? इत्यादी इत्यादी.

त्यामुळे त्यांच्याबद्दल कुणी बोलताना दिसलं की, मला नेहमी ‘हत्ती आणि सात आंधळे’ यांची गोष्ट आठवते! त्या गोष्टीतले सातही जण आंधळे असले तरी ते हत्तीचं जे वर्णन करतात, ते एकत्रित केलं तर हत्ती तयार होतो, हे खरं, पण त्यापैकी कुणाही एकाचं वर्णन फारच मजेशीर वाटतं. राजन खान यांच्याबद्दलची आंधळे नसलेल्याही बहुतेकांची मतं त्या सात आंधळ्यांसारखीच असतात. आणि ती सगळी एकत्रित केली तरी त्यातून सगळेच्या सगळे राजन खान प्रतिबिंबित होत नाहीत.

कारण त्यांच्या एखाद-दोन कथा किंवा एखाद-दुसरी कादंबरी वाचून किंवा त्यांचं एखादं भाषण ऐकून\वाचून किंवा त्यांची एखादी भेट, यावरून बहुतेक जण काहीतरी ग्रह करून घेतात. थोडक्यात त्यांच्याबद्दलची बहुतेकांची मतं ही ‘अंदाजपंचे’ तरी असतात किंवा ‘अनमानधपक्यानं’ तरी काढलेली असतात. ज्यांना ‘खान’ या आडनावाबाबत कारण नसताना पूर्वग्रह असतो, त्यांचं मत राजन खान यांच्याबद्दल बहुधा चांगलं नसतंच, असंही दिसतं. किंबहुना त्यामुळेच ‘कथा-कादंबरीकार’ म्हणूनही त्यांच्याबद्दल बऱ्याच पत्रकार, संपादक, समीक्षक, प्रकाशक, वाचक यांचंही मत फारसं चांगलं नसतंच. (आणि ज्यांचं असतं, त्यांनीही त्यांचं फार काही वाचलेलं नसतं. ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांचे चाहते झालेले असतात!) तसंही खूप लिहिणाऱ्या लेखकाबद्दल मराठी माणूस सहसा चांगलं बोलत नाही. मराठीमध्ये असाही एक ‘संप्रदाय’ आहे, जो एखाद्या लेखकाचं फारसं काही न वाचताच त्याच्या एकंदर लेखनाबद्दल प्रतिकूल मत बनवून टाकतो! राजन खान यांच्याबद्दल मराठी साहित्य, प्रकाशनव्यवहार, पत्रकारिता या क्षेत्रांतल्या अनेकांची काहीशा अशीच अवस्था आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मराठीत अनेक मान्यवर, प्रतिष्ठित आणि सन्माननीय लेखकांचे मठ, आखाडे, चव्हाटे आणि कम्पू असतात. काहींनी ते स्वत:च उभे केलेले असतात, काहींसाठी त्यांचा भक्तसंप्रदाय उभा करतो. राजन खान यांचं असं काहीही नाही.

पुरस्कार निवड समित्या, शासकीय\बिगरशासकीय वाङ्मयीन संस्था, अशा ठिकाणी सतत स्वतःची वर्णी लावून घेणाऱ्यांभोवतीही खूषमस्कऱ्यांची गर्दी दिसते. मराठीतले तरुण, महत्त्वाकांक्षी आणि सत्त्वशील नसलेले लेखक नामांकित आणि साहित्य अकादमी मिळालेल्या लेखकाच्या अवतीभवती घोटाळत राहतात. आपल्याला पुढेमागे हा पुरस्कार मिळावा किंवा गेला बाजार आपल्या लेखनाला या मान्यताप्राप्त लेखकाचं ‘सर्टीफिकेट’ मिळावं, असे त्यांचे बहुउद्देशीय हेतू असतात. त्यासाठी ते एखाद्या राजाच्या दारात हत्ती झुलावेत, तसे ते त्या लेखकाभोवती झुलत असतात! बहुतांश मराठी लेखकांनाही स्वत:भोवती अशी गर्दी करवून घ्यायला आवडते. राजन खान हा माणूस त्याची स्तुती करणाऱ्याचीही कानशिलं प्रसंगी लाल करतो. अशा माणसाभोवती ‘भडभुंज्यां’ची गर्दी कशी होणार!

२.

हा पुण्यासारख्या शहरात राहणारा पण तरीही ‘मध्यमवर्गीय मनोवृत्ती’चा माणूस नाही, तो अजूनही ‘ग्रामीण मनोवृत्ती’चाच आहे. त्यामुळे अघळपघळ, पण थेट, स्पष्ट, रोखठोक बोलणं ही त्यांची ‘वृत्ती’ आहे. समोरच्याचा अंदाज घेत त्याला जोखण्याची घाई त्यांना नसते. ‘दाखवायचे आणि खायचे दात’ एकच असल्यानं त्यांना बोलताना, वागताना, जगताना एका विशिष्ट ‘भूमिकेचा सदरा’ अंगावर चढवावा लागत नाही. आणि म्हणूनच मराठी मध्यमवर्गीय लेखकांमध्ये दिसणारा दांभिकपणा, कोती मनोवृत्ती, दिखाऊपणा, आढ्यतेखोरपणा, तुच्छता आणि गॉसिपवृत्ती त्यांच्यात दिसत नाही.

राजन खान यांना कधी आडपडदा ठेवून बोलताच येत नाही. ते जे काही असेल ते सरळ, थेट, तोंडावर बोलतात. एखाद्याला शिव्या द्यायच्या असतील तर त्याही तोंडावर देतात (किंवा फोन करून). पाठीमागे टिंगलटवाळी करणं, उपहास करणं, कुजकट बोलणं, असले ‘मध्यमवर्गीय दुर्गुण’ राजन खान यांच्यात नाहीत. कुणाचीही खासगीत जात काढणं, लायकी काढणं, हा मराठीतल्या टिनपाट आणि महंत लेखकांचाही आवडता उद्योग असतो. राजन खान हा माणूस या बाबतीत ‘स्वच्छ आंघोळ केलेल्या चंद्रा’सारखा आहे!

आपण अमुक लेखकापेक्षा मोठे आहोत, पण त्याचंच लोक कौतुक करतात, आपली फारशी दखल घेत नाहीत, असा उसासा राजन खान यांच्या बोलण्यात कधीही नसतो. त्यांना खुशामतखोरपणा जसा करता येत नाही, तशीच कुणाची तरी कुणाकडे चहाडीही करता येत नाही. हा जात, धर्म, लिंग, वय, प्रतिष्ठा, मानसन्मान यांना फाट्यावर मारणारा माणूस आहे. जातीय गणितं किंवा जातीय शेरेबाजी ते कधीही करत नाहीत. ते हिशोबी नाहीत, बेहिशोबीपणे जगणं-वागणं हाच त्यांचा स्वभाव आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

राजन खान आपल्या पुस्तकांची परीक्षणं वर्तमानपत्रं, वाङ्मयीन नियतकालिकं यांमध्ये छापून यावीत, यासाठी कधीही प्रयत्न करत नाहीत. खरं तर मराठीतल्या जवळपास सर्वच वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे मित्र, स्नेही आहेत. पण ते त्यांनाही कधी माझ्या पुस्तकाची दखल घ्या, जरा लवकर परीक्षण छापा, असं सांगत नाहीत. किंवा कुणाकडून तरी परीक्षण लिहून घेऊन वर्तमानपत्रांच्या माथी मारत नाहीत. आपल्या अमुक पुस्तकाची माध्यमांनी वा समीक्षकांनी नीट दखल घेतली नाही, अमुक पुस्तक उपेक्षेनं मारलं, असे उसासे त्यांच्या बोलण्यात कधीही नसतात.

आपल्याला अमुक पुरस्कार मिळणार होता, पण अमक्या लेखकानं खोडा घातला म्हणून मिळाला नाही, असंही ते कधी बोलताना दिसत नाहीत. आवडीचा एखादा पुरस्कार मिळावा, म्हणून मराठीतले बहुतांश लेखक कुणाची तरी दाढी खाजवत असतात किंवा अमुक समीक्षकानं आपल्या पुस्तकावर लिहावं, गेला बाजार त्याचा जरा गवगवा करावा, यासाठी सतत कुणाचं तरी लांगुलचालन करत असतात. राजन खान या बजबजपुरीला भिरकावून देऊन आपल्याच मस्तीत जगणं पसंत करतात.

याचा अर्थ असा नाही की, राजन खान माणूसघाणे आहेत. त्यांना माणसं, त्यांच्याशी बोलायला आवडतं. तरुण तर खूपच. माणसं जपायला, त्यांच्याशी नातं जोडायलाही त्यांना आवडतं. पण जपलेल्या माणसांच्याही फालतू गोष्टींचं ते कधी खोटं कौतुक करत नाहीत. जे पटत नाही, ते त्याच्या तोंडावर सांगतात, आणि जे आवडतं तेही. त्यांच्याकडे आपला आणि परका, जवळचा आणि लांबचा, कामाचा आणि बिनकामाचा, हिताचा आणि मताचा, फायद्याचा आणि तोट्याचा, अशी कुठलीही वर्गवारी नसते. माणसाकडे ते माणूस म्हणूनच पाहतात. तेही वय, लिंग, जात-धर्म वगळून. मुख्य म्हणजे तसं त्यांना पाहता येतं, ही त्यांची एक खास खुबी आहे.

यावरून कुणी असा ग्रह करून घेऊन नये की, हा फारच गंभीर माणूस दिसतोय. तर तसं नाही. राजन यांना मित्रांची, सहकाऱ्यांची, स्नेह्यांची चेष्टा करता येते, टिंगलही करता येते आणि विनोदही करता येतो. पण ते कधीही जात, धर्म, लायकी, शारीरिक व्यंग यांवर हल्ला करत नाहीत. मराठीतल्या अनेक लेखकांना पाठीमागे किंवा स्त्रिया सोबत नसताना त्यांच्याबद्दल वाईट बोलण्याची, सेक्सबद्दल बढाया मारण्याची आणि विकृत प्रेमाची फँटसी रंगवण्याची सवय असल्याचं दिसतं. राजन खान त्या ‘संप्रदाया’चे शिलेदार नाहीत.

३.

मानवी व्यवहारांबाबतचं त्यांचं भान अतिशय सजग असतं. टिपकागदाप्रमाणे ते सामाजिक घडामोडी, त्यातील ताणेबाणे टिपतात. ते मनानं, वृत्तीनं आणि स्वभावानं अजूनही ‘ग्रामीण’च आहेत. त्यामुळे त्यांना स्वत:भोवती तटबंदी उभारायची गरज भासत नाही आणि चिखलाच्या टिरी लावून मिरवायचीही. त्यांना पुस्तकं, माणसं, राजकारण, लोकशाही, सिनेमा, पत्रकारिता कुठलाही विषय वर्ज्य नसतो. राजकारण, राजकीय नेते, लोकशाही, स्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांबद्दलची त्यांची मतं इतर बहुतांश मराठी लेखकांसारखीच तडकभडक स्वरूपाची आहेत, पण वेळप्रसंग पाहून आपली मतं व्यक्त करण्याचा दांभिकपणा त्यांच्यात सहसा दिसत नाही.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

लेखन हीच लेखकाची भूमिका असते, राजकीय-सामाजिक घडामोडींवर भाष्य करणं, हे लेखकाचं काम नाही, अशी भाषा ते कधी बोलताना दिसत नाहीत. ‘पोपट मेलाय’ किंवा ‘राजा नागडा आहे’, हे सांगायलाही त्यांची जीभ कधीही अडखळत नाही. प्रेमाच्या माणसाशीही ते कधी कधी इतक्या शिव्या देत बोलतात की, हा माणूस मागच्या जन्मी जल्लाद तरी असावा किंवा खाटीक तरी असं एखाद्या तिऱ्हाईताला वाटू शकतं. पण ज्याला ते शिव्या देत असतात, त्याला त्या ‘ओव्या’सारख्या गोडच वाटतात!

राजन खान उगाच मध्यमवर्गीयपणाचा किंवा उच्चभ्रूपणाचा आव आणणारे लेखक नाहीत. त्यांच्या ‘अक्षर मानव’ या संस्थेचं ऑफिस पुण्यात, स्वारगेट चौकात आहे. ऑफिस तिसऱ्या मजल्यावर, लिफ्ट नाही. जिन्यानं जावं लागतं. तुम्ही त्यांना भेटायला गेला तर ते ऑफिसला चहा मागवतात किंवा तुम्हाला खाली तीन मजले उतरून चहा प्यायला घेऊन जातात. त्या भागात अनेक हॉटेल्स आहेत, बसून आरामात चहा-कॉफी पिता येईल अशी. पण राजन खान तुम्हाला समोरच्या ‘अमृततुल्य’मध्ये घेऊन जाणार. तिथं जेमतेम एक बाकडं असतं. त्यामुळे तुमचं नशीब जोरावर नसेल तर तुम्हाला चहाही त्यांच्यासोबत उभा राहूनच प्यावा लागतो. आपण काही राणाभीमदेव नसतो आणि राजन खान हा कितीही नाही म्हटलं तरी महाराष्ट्रातला आपल्यापेक्षा मोठाच माणूस. पण त्यांना स्वत:लाच त्याची फिकीर नसते. ते गप्पा मारण्यात, तुमची खेचण्यात रमून गेलेले असतात. भौतिक सुखसुविधा किंवा पाहुण्यांची गैरसुविधा या त्यांच्या दृष्टीनं क:पदार्थ गोष्टी.

भेटायला आलेल्या चिरपरिचित आणि अपरिचितांमध्ये जो माणूस भेदभाव करत नाही आणि ज्याला रस्त्याच्या कडेला उभं राहून ‘अमृततुल्य’चा चहा पिता, पाजता येतो; त्याचे ‘इगोज’ हे नेहमीच ‘स्मॉल’ असतात आणि तो माणूस म्हणून ‘बिग’ असतो!

४.

ग़ज़लसम्राट सुरेश भट, कवी ग्रेस, दिलीप चित्रे, जी. ए. कुलकर्णी हे मराठीतले लेखक समाजापासून काहीसे फटकून राहत. भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर, मिलिंद बोकील, महेश एलकुंचवार या लेखकांचंही काहीसं तसंच आहे. पण तरीही या लेखकांभोवती प्रसिद्धी वलयाबरोबरच थोडंसं गूढतेचंही वलय आहे. हे लेखक प्रसारमाध्यमांत आणि सार्वजनिक कार्यक्रमांत क्वचितच दिसतात. येनकेनप्रकारेण सतत समाजापुढे जाण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ते आपल्या लेखन-वाचनात आणि कामाधंद्यात-जगण्यात गढून गेलेले असतात. समाजापासून काहीसं फटकून राहणाऱ्या अशा लेखक-कलावंतांचं समाजाला जरा जास्तच आकर्षण असतं. अशा लेखकांची पुस्तकं समाजासमोर येत असतात. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनामुळे समाजाला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल, कुटुंबाबद्दल आकर्षण वाटतं. पण या लेखकांना ‘सेलिब्रेटी’ होण्याचा सोस नसतो.

राजन खान हा लेखक खरं तर समाजापासून फटकून राहत नाही, त्यांच्याभोवती गूढतेचं वलय नाही, पण त्यांना ‘सेलिब्रेटी’ होण्याची आस मात्र नाही.

खरं तर आपली जीवननिष्ठा, तत्त्वनिष्ठा आणि लेखननिष्ठा परोपरीनं निभावणाऱ्या कुठल्याही लेखकाला प्रसिद्धीची झूल आपल्या अंगावर पांघरून बसायला आवडत नाही. त्याला जे वाटतं ते तो करत राहतो, लिहीत राहतो. पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्याचा एक प्रकारे त्या पुस्तकाशीही असलेला संबंध संपतो.

राजन खान या लेखकाचंही काहीसं असंच आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मराठीतले किती लेखक स्वत:चं स्वत:ला ‘सेन्सॉर’ करतात? काही जण खाजगीत करत असतीलही, पण जाहीरपणे? माझी अमूक कादंबरी किंवा अमूक कथा ‘टुकार’ आहे, असं राजन खान बिनदिक्कतपणे सांगतात. ‘टुकार’ हा त्यांचा अत्यंत आवडता शब्द आहे. ‘टुकारला टुकार म्हणायला लाजायचं कशाला?’, असा त्यांचा प्रश्न असतो. इतकंच नाही तर ‘टुकार कथा’ या नावानं ते एक कथासंग्रहही प्रकाशित करणार होते. तसं त्यांनी जाहीरही केलं होतं. पण आपण आपल्या वाचकांची फसवणूक तर करत नाही ना, असा विचार त्यांच्या मनात आला आणि तो प्रयत्न त्यांनी सोडून दिला.

जीवनशैलीच्या बाबतीत राजन खान काळाच्या चार पावलं पुढे आहेत, पण लेखनाच्या पद्धतीबाबत मात्र अजूनही चार पावलं मागेच आहेत. कारण ते आजही हातानं लेखन करतात. छापील रेषांचे लांबलचक कागद, काळ्या शाईचं फाउंटन पेन, तेही जाड रेघ असलेलं… अतिशय स्वच्छ, शुद्धलेखनाच्या चुका नसलेलं, खाडाखोड नसलेलं आणि गोंधळ नसलेलं एकटाकी लेखन... ही त्यांच्या लेखनशैलीची वैशिष्ट्यं आहेत. हे लेखन जेव्हा प्रसिद्धीसाठी किंवा पुस्तकप्रकाशनासाठी जातं, तेव्हा ते रीतसर टाईप करावं लागतं. पण या लेखकाला संगणकावरच्या मराठी अक्षरांच्या बऱ्याचशा जोडण्या आवडत नाहीत. ‘अद्भुत’, ‘वाक्प्रचार’ अशा जोडण्या त्यांना चालत नाहीत. त्यामुळे त्यांना जिथं शक्य असतं, तिथं ते त्यांच्या पद्धतीनं दुरुस्त्या करतात.

या लेखकाला लेखन करताना मध्येच कधी कधी रडायला येतं. इतरांची पुस्तकं वाचतानाही रडायला येतं. तेव्हा ते मनसोक्तपणे रडतात. मुख्य म्हणजे हे सांगण्याची त्यांना लाज वाटत नाही. हल्ली वर्तमानपत्रांच्या रविवार पुरवण्या अगदी बथ्थड झाल्या आहेत. त्यामुळे या लेखकाचा रविवारचा दिवस फार वाईट जातो. काहीतरी ‘चांगलं’ वाचण्यासाठी त्यांची तगमग होत राहते.

५.

हा जात, धर्म, पंथ, इझम या भेदांच्या पलीकडे गेलेला लेखक आहे. सुरुवातीच्या काळातल्या त्यांच्या कथा-कादंबऱ्यांमध्ये मुस्लीम स्त्रिया-पुरुष, समाज यांचे उल्लेख आलेले आहेत. पण नंतरच्या काळात त्यांच्या लेखनातल्या पात्रांना कुठलीही जात, धर्म, पंथ, इझम दिसत नाहीत. आवश्यकता नसेल तर ते आपल्या पात्रांना नावंही देत नाहीत, दिली तर आडनावं देत नाहीत. हा समाज, किंबहुना सबंध जगच जात, धर्म, पंथ, इझम या भेदांशिवाय असावं, असं त्यांचं स्वप्न आहे. अलीकडे एका जाहीर कार्यक्रमात ते म्हणाले होते – ‘‘ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत, त्या गोष्टी मानणारे लोक ‘मनोरुग्ण’ समजले जातात. देव, धर्म अशा काल्पनिक गोष्टी मानणारे माझ्या दृष्टीने ‘मनोरुग्ण’च आहेत.’’

हा ‘अ‍ॅटिट्यूड’ असलेला लेखक आहे. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्याला ते कधीही कचरत नाहीत. पण त्यांच्या लेखनात तुम्हाला कधीही इतर प्रसिद्ध लेखकांची अवतरणं किंवा दाखले\उदाहरणं दिसत नाहीत. कारण जगात ते कुणालाच आदर्श मानत नाहीत. होऊन गेलेली, हयात असलेली खूप माणसं त्यांना आवडतात, पण ते व्यक्तिपूजक वा प्रतिमापूजक नाहीत. इतरांच्या आधारानं आपलं लेखन सजवणं त्यांना चालत नाही.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मराठीतल्या अनेक लेखकांना ‘लेखक’ असण्याचं भूषण वाटतं. आपण लेखक आहोत, असा विचार करण्यात आणि तो इतरांना पटवून देण्यात ते आपला बराचसा वेळ घालवत असतात. त्यासाठी वाट्टेल ते आणि वाट्टेल तसं लिहितात. राजन खान यांना आपण लेखक आहोत, याचं ‘भूषण’ वाटत नाही, उलट ते ‘पाप’च वाटतं. त्यांच्या मेंदूत सतत अनेक पात्रं, घटना, प्रसंग, विचार, संवाद चालू असतात. पूर्ण निर्लेप, शांत, रिकाम्या मेंदूनं त्यांना जगताच येत नाही. पण तसं कधीतरी, दोन-चार दिवस तरी जगता यावं, असं त्यांना वाटत राहतं, पण ते शक्य होत नाही. लेखक असणं ही प्रचंड शिणवटा आणणारी गोष्ट आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून त्यांना ते ‘पाप’ वाटतं.

मोत्यासारख्या सुंदर अक्षरातलं राजन खान यांचं लेखन पाहिलं की, त्यांना त्यांच्या लेखनप्रक्रियेकडे तटस्थपणे पाहता येत असावं असं वाटतं. पण एवढं नक्की की, त्यांना त्यांची विचारप्रक्रिया बोलत असतानाच तटस्थपणे पाहता येते. बोलता बोलता ते एखादं चमकदार, महत्त्वाचं वाक्य बोलतात आणि पुढच्या क्षणाला म्हणतात – ‘आता मी छान\महत्त्वाचं बोललो बरं का?’ आणि ते खरंच असतं. गेल्या १५-१६ वर्षांत मी आणि माझ्या मित्रांनी याचा अनेकदा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. एखाद्या विषयावर बोलत असतानाच त्याकडे तटस्थपणे पाहता येणं, ही मला त्यांची ‘युनिक क्वालिटी’ वाटते. असं दुसरं एकच नाव माझ्या माहितीत आहे, ते म्हणजे ‘महात्मा गांधी’. एरवी लेखक, विचारवंत, कलाकार, प्राध्यापक विचार न करताच बोलतात किंवा आधी नीट विचार करून मग बोलतात. बोलता बोलता विचारही करता येणं, ही अतिशय दुर्मीळ गोष्ट आहे.

६.

आजवर त्यांची ५० पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. २३ कादंबऱ्या, १७ कथासंग्रह, १० लेखसंग्रह. ‘गुप्त झालेल्या नदीचं गूढ’ हे नाटकही त्यांनी लिहिलेलं आहे. मी काही त्यांची सगळीच पुस्तकं वाचलेली नाहीत. पण ‘सत ना गत’ ही त्यांची बरीच गाजलेली कादंबरी अतिशय चांगली आहे. योग्यता असूनही मराठीतल्या ज्या काही पुस्तकांना साहित्य अकादमी मिळालेलं नाही, त्यापैकी हे एक. ‘वळूबनातली कामधेनू’, ‘जातवान आणि विनशन’, ‘चिमूटभर रूढीबाज आभाळ’, ‘रस-अनौरस’ या त्यांच्या वाचलेल्या आणि आवडलेल्या कादंबऱ्या. ‘हिलाल’ (१९९९, आठ कथा) आणि ‘कसक’ (२००३, पाच कथा) या दोन कथासंग्रहांत त्यांनी मुस्लीम स्त्रियांचं जगणंवागणं, त्यांचं शोषण, ससेहोलपट आणि महाराष्ट्रातील तळागाळातल्या मुस्लीम समाजाचं जीवन अतिशय दमदारपणे रेखाटलं आहे.

कादंबरीकारापेक्षा कथाकार म्हणून राजन खान मला जास्त आवडत आले आहेत. ‘कथा आणि कथेमागची कथा’ (भाग १ व २, २०१०) हे त्यांचं मराठीतलं ‘युनिक’ म्हणावं असं पुस्तक आहे. २०१०पर्यंत त्यांनी जवळपास २०० कथा लिहिल्या. त्यापैकी १४ वैशिष्ट्यपूर्ण ‘कथांमागची कथा’ त्यांनी या पुस्तकात सांगितली आहे. प्रत्येक कथेमागची कथा आणि नंतर प्रत्यक्ष ती कथा, असं या पुस्तकाचं स्वरूप आहे.

लेखकाला विषय कसे सुचतात, कशा स्वरूपात सुचतात, तो लिहितो कसं, ही सगळी अतिशय सर्जनशील प्रक्रिया असते. त्यामुळेच अनेकांना त्याबद्दल कुतूहल असतं. मात्र बहुतांश मराठी लेखकांना लेखन करतेवेळची सर्जनशील प्रक्रिया नीट उलगडून सांगता येतेच असं नाही. तशी ती सांगता येणं कठीणही असतं. पण राजन खान यांनी ती ७० टक्क्यांहून अधिक प्रमाणात या पुस्तकात उलगडून दाखवली आहे.

आपल्याकडे पाश्चात्त्य देशांप्रमाणे ‘सर्जनशील लेखन’ (Creative Writing) या विषयावर अभ्यासक्रम नाहीत, पुस्तकं नाहीत आणि कुणी त्याविषयी कार्यशाळा-शिबिरंही घेताना दिसत नाही. ही गोष्ट तशी सांगता येत नाही, हीच आपल्याकडच्या बहुतेक लेखकांची नेहमीची रट असते. पण भविष्यात यदाकदाचित मराठीत असा अभ्यासक्रम, पुस्तक किंवा कार्यशाळा-शिबिर यांपैकी कुठलाही प्रयत्न कुणी करायचा ठरवला, तर त्याला राजन खान यांच्या या पुस्तकाचा विचार करावाच लागेल.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

हे जबरदस्त पुस्तक आहे, पण मराठीमध्ये त्याची आजवर फारशी दखल घेतली गेलेली नाही. यावरून मराठीतला साहित्यव्यवहार किती कुपमंडूक वृत्तीचा आहे, याची कल्पना येते.

राजन खान यांनी आतापर्यंत अहमदनगर (१९९७), सांगली (२००८) आणि बडोदा (२०१८) अशी तीन वेळा अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली आहे, पण तिन्ही वेळा त्यांचा दारुण पराभव झाला, दुसऱ्या क्रमांकाची मतंही त्यांना कधी मिळाली नाहीत. आजवर कितीतरी सुमार वकुबाचे लेखक संमेलनाध्यक्ष झालेले आहेत आणि कितीतरी गुणवान, श्रेष्ठ लेखकांनी संमेलनाध्यपदाची निवडणूकही लढवलेली नाही. लोकशाही शासनपद्धतीत राहणाऱ्या, तिचे सगळे फायदे उपटणाऱ्या कितीतरी मराठी लेखकांचं लोकशाहीबद्दलचं आकलन मात्र अतिशय सदोष असतं. राजन खान यांचं आकलन पूर्णपणे निर्दोष नसलं तरी ते इतर लेखकांइतकं सदोष नाही, हे मात्र खरं.

७.

गेली तीन वर्षं राजन खान यांना पोलीस संरक्षण आहे. त्यांच्या ‘कसक’ या कथासंग्रहात ‘हलाल’ नावाची कथा आहे. त्यावर २०१७मध्ये ‘हलाल’ (२०१७) या नावाने चित्रपट आला. पण त्यावरून काहींच्या भावना प्रथेप्रमाणे दुखावल्या गेल्या आणि त्यांना धमक्या आल्या तेव्हापासून. पण गेल्या तीन वर्षांत त्यांनी झुंडशाहीच्या, सेन्सॉरशिपच्या किंवा अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावानं ‘सोयीस्कर’पणे शंख केलाय असं दिसत नाही. कारण कुठल्याही गोष्टीचा सोयीस्कर कैवार घेणारा हा लेखक नाही. जे वाट्याला आलं, ते जगायचं, भोगायचं, हा त्यांचा स्वभाव आहे. (त्यांच्या आणखी एका कथेवर ‘धूडगुस’ (२००९), तर ‘सत ना गत’ या कादंबरीवर त्याच नावाने (२०१३) चित्रपट आले आहेत.)

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

वयाच्या १२-१३व्या वर्षांपासून राजन खान यांनी लिहायला सुरुवात केली. पण त्यांची पहिली कथा छापून आली, ती ‘साप्ताहिक माणूस’च्या १९८३च्या दिवाळी अंकात, तर ‘हिलाल’ हा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला १९९९मध्ये. ‘स्क्रीन टेस्ट’ हे त्यांची पहिली कादंबरी १९८९मध्ये प्रकाशित झाली. म्हणजे गेली ४०-४५ वर्षं हा लेखक सातत्यानं लिहीत आहे. प्रदीर्घ काळ लेखन करून मराठीतले लेखक जेव्हा ज्येष्ठत्वाला पोहोचतात, वेगवेगळे सत्कार-समारंभ-पुरस्कारांचे धनी होतात, तेव्हा त्यांची भाषणं, वक्तव्यं ऐकावीत! लेखक म्हणून त्यांच्या बोलण्यात ‘ऐट’ असते, देहबोलीत ‘कुर्रेबाजपणा’ असतो आणि विचारांत विचारांपेक्षा ‘दिमाख’च जास्त असतो. त्यांच्या भूमिका ‘जरतारी’ असतात आणि बहुतांश वेळा सामान्य मुद्दे ते ‘महिरपी चौकटीं’मध्ये सजवून सांगतात.

८.

साठीत प्रवेश करू पाहणारा राजन खान हा लेखक काय म्हणतो, तर “लोक मला लेखक म्हणत असले, तरी मी स्वतःला कधी लेखक नाही मानलं. लेखक म्हणजे आणखी काही वेगळं असू शकेल. मोठं असू शकेल. लिहिणं हा माझ्या जगण्याचा एक भाग आहे. लिहिण्यातून कोणाशी तरी बोलल्याचं समाधान मिळतं. लिहिलेलं सगळं छापलंच गेलं पाहिजे असाही माझा आग्रह नव्हता, नाही. माझी गोष्ट मी कोणाला तरी सांगून झालीये इतकंच पुरेसं असतं.”

मी फक्त ‘माणूस’ आहे, मला कुठल्याही भेदाशिवायचा माणूस म्हणून जगायचंय, हे जगही तसंच असावं, असं मला वाटतं… पण हे जग मला जसं वाटतं, तसं नाही, मात्र ते तसं असावं, ही माझी इच्छा आहे, म्हणून मी लिहितो… हे राजन खान यांचं ‘पसायदान’ आहे.

हा लेखक कथा-कादंबरीकार म्हणून खरोखर किती मोठा आहे, हे अजून तरी मराठी समीक्षेनं सांगितलेलं नाही. मलाही ते सांगता येणार नाही. पण ते ‘माणूस’ म्हणून आणि ‘लेखक’ म्हणूनही ‘विलोभनीय’ आहेत, हे मात्र मी अगदी खात्रीनं सांगू शकतो.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

राजन खान : ‘गू ते गुलाब लेखकाला काही परकं असू नये’

…बाकी सगळा दुःखाचा अखंड राजकीय बाजार! - राजन खान

म्हणे धर्मनिरपेक्ष राष्ट्र. अरे ह्या! - राजन खान 

.................................................................................................................................................................

लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.

editor@aksharnama.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......