‘टल्ली’ आणि ‘टीटोटलर’ - मद्यरूपी नाण्याच्या दोन बाजू
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 07 December 2020
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध तळीराम Taliram टल्ली Talli टुन्न Tunna टीटोटलर Teetotaller

शब्दांचे वेध : पुष्प सतरावे

‘मैं नशे में टल्ली हो गया, ओये, की करिये की करिये...’

आमच्या घराच्या आसपास बरीच तरुण मुले राहतात. त्यातल्या एकाच्या घरी परवा रात्री बहुधा ओली पार्टी चालू होती. जोरजोरात गाणी वाजत होती. ‘मैं नशे में टल्ली हो गया’ हे राजस्थानी गाणे त्यातलेच एक. कोणा सार्वन रासेटी नावाच्या गायकाच्या नरड्यातून बाहेर पडणारे ते भयंकर शब्द आणि त्याहीपेक्षा ते भयंकर सूर आणि तो अजीबोगरीब ठेका ऐकून मला न पिताच वैफल्याची भयंकर नशा चढली! पुन्हा एकदा रमचे घोट औषधादाखल घ्यावेत का, असाही मी विचार करू लागलो. पण त्या गाण्यामुळे इतर काही तरी विचारचक्रसुद्धा मनात सुरू झाले होते. मग ‘टल्ली’ आणि ‘तळीराम’ यांचा काही संबंध असावा का, हे मी (रम न पिताच) शोधायचे ठरवले.

‘टल्ली होना’ किंवा मराठीतले ‘टुन्न होणे’, हे वाक्प्रचार दारू चढणे, झिंगणे, नशाग्रस्त होणे, या अर्थाने वापरले जातात. अर्थातच हे स्लॅंग म्हणजे अनौपचारिक बोलीभाषेतले शब्द आहेत. यांची व्युत्पत्ती सांगणे कठीण आहे. ‘तल्लीन होणे’ यापासून तर हे शब्द निघाले नाहीत ना, असा माझ्या मनात विचार आला. पण ही ‘spurious etymology’ (भ्रामक, असत्य व्युत्पत्ती) ठरेल. बरं, ‘तल्लीन होणे’ आणि ‘टाळी लागणे’ यांचा काही संबंध असावा का? ‘ब्रह्मानंदी टाळी लागणे’ ही खरे तर ध्यानधारणेमधली एक अवस्था आहे. ‘सच्चिदानंदरूपात तल्लीन होणे’ असा त्याचा अर्थ आहे. ‘दाते कोशा’नुसार ‘टाळी’चा अर्थ ‘डोक्याचा वरचा भाग’ असा आहे. दारूची झिंग, नशादेखील डोक्यात जाते, म्हणून तिथेही ‘टाळी’ शब्द वापरला गेला असेल का? आणि याच ‘टाळी’पासून ‘तळीराम’ हा शब्द बनला असेल का, असे खूप प्रश्न या ‘टल्ली-चिंतना’मुळे मला पडले. सध्यातरी ते अनुत्तरीत आहेत.

‘तळीराम’ हे पात्र राम गणेश गडकरींमुळे प्रसिद्धीला आले, हे खरे आहे, पण त्याचा समावेश असलेले ‘एकच प्याला’ हे नाटक गडकरींनी १९१७ साली लिहिले. मात्र मराठी भाषेत ‘तळीराम’चा शिरकाव त्याआधीचा आहे, हे ‘मोल्सवर्थ’च्या १८५७च्या मराठी शब्दकोशातल्या प्रविष्टीवरून स्पष्ट होते. परंतु त्यातून ‘तळीराम’ टाळीपासून नाही, तर ‘तळी’ या शब्दापासून बनला आहे, असे दिसून येते. या प्रविष्टीत खूप अर्थच्छटा दिलेल्या आहेत, त्यातल्या समर्पक अशा या छटा बघा -

तळी taḷī 4 Powder of a preparation of Bháng with sugar &c. तळी or तळीराम गार करणें or, with g. of s., गार होणें (His तळी or ताट or dish is full. A jocose application of a little story.) To have a hoard or secret treasure. Others write तळीं राम and explain it A buried or hoarded treasure or stock; and तळीं राम गार करणें-होणें To cool and compose one's spirit through consciousness of possessing a hoard.

..................................................................................................................................................................

‘बिटविन द लाइन्स’ ​या चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5219/Between-the-Lines

..................................................................................................................................................................

या ठिकाणी मोल्सवर्थ तळीं राम गार करणें-होणें यासाठी ‘Mihi plaudo dum simul nummos contemplor in arca’ असा लॅटिन वाक्प्रचार उद्धृत करतो. पुढे ऑर्थर कॉनन डॉयलने शेरलॉक होम्सच्या ‘A Study in Scarlet’ या कथेतही हा वाक्प्रचार वापरला. “Populus me sibilat, at mihi plaudo ipse domi stimulac nummos contemplar in arca. (The public hiss at me, but I cheer myself when in my own house I contemplate the coins in my strong-box. लोक मला हसतात, पण घरात माझ्या तिजोरीत ठेवलेल्या सोन्यानाण्याकडे बघूनच मला खुशी मिळते.)” मात्र याचा अर्थ ‘तळीराम’ लॅटिन बोलणाऱ्या रोमन प्रदेशातला होता, असा होत नाही!

श्रीधर गणेश वझे आणि य. रा. दाते यांच्या मराठी शब्दकोशांतही ‘तळीं राम गार करणें-होणें’ याचा हाच अर्थ दिला आहे. ‘नळीचें वऱ्हाड करणें म्हणजे (स्वतःची) तुंबडी भरणें; तळीराम गार करणें’ हे देखील दाते सांगतात. वा. गो. आपटे आपल्या १९१०च्या ‘मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी’ या ग्रंथात ‘तळीराम गार करणें’ याचा अर्थ ‘जवळ द्रव्य जमवून मनाची तृप्ती करून घेणे (बहुधा दुसऱ्याच्या द्रव्याचा अपहार केला असता ही म्हण योजितात)’ असा सांगतात.

थोडक्यात, ‘एकच प्याला’ लिहिताना गडकरींना ‘तळीराम’ हा शब्द आधीपासूनच माहीत असावा, असे वाटते. पुढे त्यांनी निर्माण केलेल्या तळीरामाचा प्रभाव समाजमनावर एवढा पडला की, ‘तळीराम गार करणे’ याचा अर्थ नंतर समाधान होईपर्यंत, तृप्ती होईपर्यंत दारू पिणे, पोटातल्या आगीला दारूने थंडावा देणे, असा होऊ लागला. आज ही म्हण मुख्यत्वे याच अर्थाने वापरली जाते, आणि ‘तळीराम’ हा शब्द दारुड्यांसाठी वापरला जातो.

असा हा आपला प्रिय ‘तळीराम’. पोर्तुगिजांच्या सहवासामुळे आपले गोयेंकर बंधू त्याला लाडाने ‘बॅबदॉ’ अशी पण हाक मारतात. (हाच पुढे ‘बबड्या’ बनला असेल का?)

‘तळीराम’ ते ‘वाऊझर’ हा प्रवास आपण मागच्या खेपेला केला. त्या वेळी मी असे म्हणालो होतो की, पापद्वेष्टे वाऊझर लोक दारूसोबतच तळीरामांचाही द्वेष, राग करतात. माझ्या मते हे चूक आहे. तुम्हाला दारू आवडत नसेल, प्यायची नसेल, तर हरकत नाही. नका पिऊ. पण त्यासाठी दारू पिणाऱ्यांचाही का राग करता तुम्ही?

माझे म्हणणे असे आहे की, तुम्ही वाऊझर बनू नका, तुम्ही ‘टीटोटलर’ बना. जो अजिबात मद्यपान करत नाही, त्याला इंग्रजीत ‘टीटोटलर’ (teetotaller) म्हणतात. असा माणूस ‘जियो और जीने दो’ या विचाराचा असतो. तो म्हणतो, तुम्हाला प्यायची आहे ना, खुशाल प्या. मी घेणार नाही, पण मी तुम्हाला दूरही लोटणार नाही.

माझा मित्र सतीश आधीपासूनच या उदारमताचा होता. त्याने आयुष्यात कधी दारूच्या एका थेंबालाही स्पर्श केला नाही. आजही तो पीत नाही, पण कॉलेज जीवनात आमच्या मित्रांच्या खास मैफिलींत तो आनंदाने सहभागी व्हायचा. आमच्यासोबत बसायचा. आमचे ग्लास भरून द्यायचा, त्यात सोडा किंवा बर्फ टाकून द्यायचा, आणि आमच्यासोबत गावभरच्या गझाली करायचा. स्वतः कोकाकोला नाही तर लिमकाचे घोट घेत घेत तो आमचा चखना शेअर करत करायचा आणि एखाद्याची हळूच टांग पण खेचायचा - म्हणजे थट्टा करायचा.

एवढेच नाही तर एखाद्याला जास्त झाली असेल तर हा त्याला प्रेमाने त्याच्या घरी पण पोहचवून द्यायचा. तुम्ही दारू पिता म्हणजे तुम्ही पापी, मी तुम्हाला वाळीत टाकेन, असे त्याने कधीच म्हटले नाही. म्हणून तो आमच्या सगळ्यांचा लाडका मित्र होता आणि आजही आहे. माझ्या मते सतीश हा खरा ‘टीटोटलर’ आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

‘टीटोटलर’ हा शब्द तयार कसा झाला? त्याचे स्पेलिंग नीट बघा, ते ‘Teetotaller’ असे आहे, ‘teatotaller’ असे नाही. उच्चारसाधर्म्यामुळे अनेक लोक याला ‘टोटली (पूर्णपणे) टी (चहा) पिणारा’ म्हणजे ‘teatotaller’ असे समजतात. पण हे चूक आहे. काही लोक अज्ञानाने या शब्दाचा उच्चार ‘टी-टू-टॉलर’ असाही करतात. ते पण एकदम चुकीचे आहे. याचा उच्चार ‘टी’टोटलर’ असा होतो - आणि आधी त्यात जो ‘TEE’ आहे, तो आघात देण्यासाठी, जोर देण्यासाठी, भर देण्यासाठी उपयोगात आणला गेलेला एक उद्गार आहे.

या प्रकारच्या शब्दांना ‘इन्टेन्सिफायर’ (intensifier) असे म्हणतात. एखादी बाब प्रकर्षाने सांगण्यासाठी आपण तिला बहुधा अधोरेखित (underline) करतो, किंवा लाल शाईत लिहितो. इंग्रजीत यासाठी आणखीही काही पर्यायांचा वापर केला जातो. त्यातला एक म्हणजे तो पूर्ण शब्द किंवा त्याचे पहिले अक्षर कॅपिटल (अपर) केसमध्ये लिहिणे. (कंप्युटरचा जमाना सुरू व्हायच्या आधी जेव्हा छापखान्यांत टंकजुळणी (typesetting) जुळारी लोक (कंपोझिटर, compositor) हाताने करायचे, तेव्हा इंग्रजीतले (रोमन लिपीतले) टंक (types) लाकडाच्या एका मोठ्या पेटीत (case) ठेवलेले असत. ती पेटी उघडली की, तिच्या झाकणाच्या आतल्या बाजूला (म्हणजेच वरच्या किंवा upper Sideला) पहिल्या लिपीतली अक्षरे (A, B, C, D इत्यादी) ठेवलेली असत. आणि खालच्या (lower) बाजूला छोटी (small) तिसऱ्या लिपीतली अक्षरे (a, b, c, d इत्यादी) ठेवलेली असत. यावरून पुढे या अक्षरांना ‘अपर केस’ आणि ‘लोअर केस’ अक्षरे असे म्हणण्यात येऊ लागले.)

‘मी अजिबात दारू पीत नाही, पिणार नाही’ असे सांगताना एकदा एका व्यक्तीने हा ‘अजिबात’ शब्द (इन्टेन्सिफायर म्हणून) वापरला आणि त्यातून हा ‘Teetotaller’ शब्द जन्माला आला, अशी आख्यायिका आहे. अर्थात हे सारे इंग्रजी भाषेत झाले. त्यामुळे तो माणूस असे म्हणाला असेल – ‘I am Totally opposed to drinking. Totally, with a Capital T.’ यातला ‘Totally with a Capital T’ हा शब्दप्रयोग इन्टेन्सिफायर, आघात-दर्शक, भर देणारा, अधोरेखित करणारा आहे. त्याच्या श्रोत्यांना त्याचे हे सांगणे एवढे आवडले की, त्यांनी लगेच, तिथल्या तिथेच एका नव्या शब्दाची निर्मिती केली. ‘Total’ विरोध असणारा तो ‘Totaller’. आणि तोही कसा? With a Capital T. म्हणून त्या ‘Totaller’च्या आधी ‘Tee’ असे लिहिले गेले. (‘T’ या अक्षराच्या नावाचे स्पेलिंग ‘tee’ असे केले जाते.)

आणखी एका आख्यायिकेसाठी तुम्हाला मुळात या शब्दाच्या निर्मितीचा संपूर्ण इतिहास वाचावा लागेल. थोडक्यात सांगायचे तर-

अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकांत इंग्लंडमध्ये दारू पिण्याचे प्रमाण एकदमच खूप वाढून गेले. याला कारण म्हणजे वेस्ट इंडीजमधून रमचा होणारा मुबलक पुरवठा. त्याचसोबत डच जीनसुद्धा अतिशय स्वस्त आणि भरपूर प्रमाणात उपलब्ध होती. १७५०च्या नंतर जवळपास प्रत्येक शहरी इंग्रज माणूस रोज एक पिंट म्हणजे अर्ध्या लिटरहून जास्त जीन पिऊ लागला. यामुळे लोकांचे स्वभाव बदलले, गुंडागर्दी आणि खुलेआम भांडणे सुरू झाली. बायकांमध्येही जीन पिण्याचे प्रमाण वाढीला लागले. वरच्या वर्गातल्या लोकांची ही थेरे पाहून कामगार आणि अन्य कनिष्ठवर्गीय लोकांनीही भरपूर दारूपान सुरू केले. स्वतःची दुःखं आणि आर्थिक विपदा विसरण्यासाठी त्यांना हा सोपा आणि स्वस्त मार्ग सापडला होता. त्यांच्यासाठी गावोगावी, मोहल्ल्या-मोहल्ल्यांत दारूचे गुत्ते उघडले जाऊ लागले. 

इकडे अमेरिकेतही जवळपास अशीच परिस्थिती होती. पुढे एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी दोन डॉक्टरांनी दारू आणि मानवी शरीर यावर स्वतंत्रपणे संशोधन करून आपापले निष्कर्ष लोकांसमोर मांडले. यातला एक अमेरिकन डॉक्टर होता आणि एक स्कॉटिश. दोघांचंही म्हणणे एकसारखेच होते- अतिरेकी मद्यप्राशनाने मनुष्य शरीराला हानी पोहचते. यामुळे तिकडचे अनेक समाजहितैषी लोक चिंतित झाले. आपल्या समाजातले दारूचे वाढते प्रस्थ कसे कमी होईल, यासाठी त्यांनी विचारमंथन सुरू केले. त्यामुळे अल्कोहोलचे अमर्याद सेवन ही एक गंभीर सामाजिक समस्या मानली जाऊ लागली. याबाबत काही ठोस उपाययोजना करण्याच्या बाबत अमेरिकेने पुढाकार घेतला. १८०८ मध्ये न्यू यॉर्क राज्यातील साराटोगा या गावात जगातल्या पहिल्या ‘temperance society’ म्हणजे ‘मद्य-संयम समाजमंडळा’ची स्थापना झाली. इंग्लंडमध्ये मात्र यासाठी आणखी अठ्ठावीस वर्षे जावी लागली.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : तळीराम, बिब्युलस, वाऊझर यांच्यासह मद्यप्यांच्या दुनियेचा फेरफटका

.................................................................................................................................................................

‘टीटोटल’ या शब्दाच्या निर्मितीचे श्रेय आपल्यालाच मिळायला हवे असे, या दोन्ही देशांतल्या मद्य-संयम समाजामंडळांचा परस्परविरोधी दावा आहे. एका कथनानुसार प्रेस्टन, इंग्लंडमध्ये १८३३ साली अशा एका मंडळाच्या सभेत मद्य-संयम किती प्रमाणात हवा, थोडासा की संपूर्ण, यावर चर्चा चालू असताना रिचर्ड (डिकी) टर्नर नावाच्या कारागिराने जोरजोरात हातवारे करत सांगितले की, ‘nothing but te-te-total would do’. त्याची ही गर्जना उपस्थितांना एवढी आवडली की, ‘tee-total’ हा शब्द लगेच तयार झाला आणि १८३४च्या ‘द प्रेस्टन टेम्परन्स अ‌ॅडवोकेट’ या नियतकालिकात ‘tee-total’ राहण्यासाठी शपथ घेणाऱ्या लोकांची नावे प्रसिद्ध करण्यात आली. ‘Tee-total’ राहतो तो ‘tee-totaller’ असे म्हणून टर्नरचीही खूप तारीफ करण्यात आली. यामुळे तो अचानक देशभरात नावारूपाला आला. पुढे २७ ऑक्टोबर १८४६मध्ये तो मरण पावल्यावर त्याच्या कबरीपाशी लावलेल्या स्मृतीशिलेवर हे शब्द कोरण्यात आले -

‘Beneath this stone are deposited the remains of Richard Turner, author of the word Teetotal as applied to abstinence from all intoxicating liquors, who departed this life on the 27th day of October 1846, aged 56 years.’

भोवऱ्यासारख्या दिसणाऱ्या ‘टीटोटम’ (teetotum) नावाच्या लहान मुलांच्या एका खेळण्याच्या नावामुळे टर्नरला ‘Teetotal’ हा शब्द सुचला, असाही एक तर्क आहे.

अमेरिकनांचे याबाबत दोन दावे आहेत. पहिल्यानुसार १८३२ मध्ये जेम्स हॉलने हा शब्द आघातदर्शक म्हणून पहिल्यांदा वापरला होता. (James Hall - Legends of West Philadelphia). मिंगो जमातीच्या आदीवासी लोकांबद्दल बोलताना तो लिहितो- These Mingoes ought to be essentially, and paricularly, and tee-totally obliterated off of the face of the earth.

मात्र या वंशविद्वेषी वक्तव्यात कुठेही दारूचा उल्लेख नाही, त्यामुळे या दाव्यावर विश्वास ठेवता येणे कठीण आहे.

दुसरा अमेरिकन दावा रेव्ह. जोएल जूल (Joel Jewell) यांनी १८९१ मध्ये ‘सेंच्युरी डिक्शनरी’च्या संपादकाला लिहिलेल्या पत्रात केला होता. हेक्टर, न्यू यॉर्क येथील एका मद्य-संयम समाजमंडळाचे ते सचिव होते. जानेवारी १८२७पर्यंत त्या मंडळाची आंशिक मद्य संयमाला मंजुरी होती. मात्र पुढे त्यांनी संपूर्ण मद्य संयमालाही तयारी दाखावली. ज्या जुन्या आंशिक मद्य संयमींना संपूर्ण मद्य संयम नको असेल, त्यांना जुन्याच शपथेप्रमाणे वागण्याची मुभा होती. अशांच्या नावासमोर ओल्ड प्लेज ‘OP’ तर नव्या संपूर्ण मद्य संयमींच्या नावासमोर ‘T’ म्हणजे ‘Total abstinence’ असे लिहिले जाई. याच्या सतत वापरातूनच पुढे ‘T-totaller’ असा शब्द तयार झाला, असे रेव्ह. जूल यांचे म्हणणे होते.

याही दाव्याच्या पुष्टयर्थ कोणताही पुरावा उपलब्ध नाही. याउलट संपूर्ण मद्य संयमाची चळवळ अमेरिकेत यापेक्षा बरीच उशीरा सुरू झाली आणि प्रेस्टन, इंग्लंडमधल्या या संदर्भातल्या घडामोडींचा त्यावर प्रभाव होता, हे दाखवणारे अनेक पुरावे सापडतात. यामुळेच कदाचित वेब्स्टर आणि वूस्टरसारखे अमेरिकन शब्दकोशकार आणि वैद्यकीय तज्ज्ञ रिचर्ड टर्नरलाच ‘Teetotal’ या शब्दाचा जनक मानतात.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

माझा एक ज्येष्ठ मित्र आहे. वय वर्षे ८५, म्हणजे माझ्याहून किमान २३ वर्षांनी मोठा. अजूनही चांगला फिट आणि धडधाकट आहे. चिं. वि. जोशींच्या ‘माझे दत्तक वडील’ या कथेतील म्हातारबुवांप्रमाणे त्याचा लंघनापेक्षा उल्लंघनमीमांसेवरच भरोसा आहे. आठवड्यातून किमान दोनदा तरी तो दोन प्याले स्कॉच व्हिस्की पितो. तो अगदी अस्सल ‘incorrigible’ (न सुधरला जाऊ शकणारा) तिरसट ‘वऱ्हाडी मानूस’ आहे. नुकतेच त्याला मी रिचर्ड टर्नरबद्दल सांगितले तर एक कचकचीत शिवी देत तो म्हणाला, ‘‘अबे, हा *चा दारू पेत नव्हता. तरी ** ५६व्या वर्षी मेला. आन थो चर्चिल पाहा बरं. थ्याचाच जातभाई. बुढ्ढा ९२ वर्सांचा होऊन खपला, पन मरेपावेतो कशी रोज बाटली बाटली दारू प्येत व्हता थो! झालच त आपले सरदार खुशवंत सिंग बावाजी. थे पन उलिशीक स्काच रोज पिये, आन चांगले ९९ वर्स जिते रायले. याले म्हनथेत बा जगनं!”

मला हे कळत नाही, मी कोणाचे ऐकू? ‘या असंयमी मित्राच्या नादी लागू नकोस, तुझी साठी उलटली आहे’, असा निर्वाणीचा इशारा देणाऱ्या माझ्या बायकोचे की मला अस्सल, उमद्या, प्राचीन स्कॉचचे प्याले भरून देणाऱ्या माझ्या वऱ्हाडी तळीराम-सदृश मित्राचे? काही कळत नाही.

दरम्यान, मद्यप्यांच्या दुनियेचा फेरफटका अजून पूर्ण झालेला नाही. पण त्यासाठी पुढच्या आठवड्यापर्यंत धीर धरा.

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......