ट्रम्प यांचे विमान ज्या ‘सोशल मीडिया’च्या जोरावर हवेत उडालं होतं, त्यानेच ते ‘या वेळी’ जमिनीवर आदळवलं?
पडघम - विदेशनामा
टीम अक्षरनामा
  • जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प
  • Wed , 11 November 2020
  • पडघम विदेशनामा डोनाल्ड ट्रम्प Donald Trump जो बायडेन Joe Biden अमेरिकन निवडणूक २०२० US election 2020

१.

चार दिवसांपूर्वी म्हणजे सात नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि चार वर्षांच्या बेताल राज्यकारभारानंतर अमेरिकन जनतेनं डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाईट हाउसमधून बोऱ्याबिस्तरा उचलून घरी जायला भाग पाडलं. पण आपणच परत निवडून येणार याचा ट्रम्प यांना जबरदस्त आत्मविश्वास होता. त्यामुळे ट्रम्प शेवटपर्यंत आणि निकाल पूर्ण स्पष्ट झाल्यानंतरही मीच निवडून आलोय, याविषयी बढाई मारत राहिले.

‘गिरे तो भी टांग उपर’ अशी एक हिंदीमध्ये म्हण आहे. त्याचा प्रत्यय ट्रम्प यांच्या निमित्ताने संपूर्ण जगाला पाहायला मिळाला. निकाल बऱ्यापैकी स्पष्ट झाल्यानंतर एनडीटीव्हीचे रवीश कुमार यांनी ट्रम्पविषयी एक उपहासात्मक पोस्ट लिहिली होती. तिचा मराठी अनुवाद असा –

श्रीयुत महामहिम डोनाल्ड ट्रम्पजी

नमस्कार,

मला आनंद वाटतो की, तुम्ही राष्ट्राध्यक्षपद सोडू इच्छित नाही. नका सोडू. चार वर्षं सुपर पॉवर राहिल्यानंतर खुर्ची सोडण्याची नशाच तशी असते. जसा गुटखा खाताना सुपारीऐवजी खडा लागल्यावर कळत नाही की, सगळा गुटखा थुंकून टाकावा की, अर्धा टाकावा. तुम्ही गुटखा खात नाही, ही चांगलीच गोष्ट आहे. तुम्ही स्वत:च एक प्रकारे गुटखा आहात. तुम्ही व्हाइट हाउसचा भोवरा आहात. तुम्ही इतर कुठल्या बागेत गुंजारव करत राहणं आम्हाला चांगलं वाटणार नाही.

ट्रम्पभाई, तुम्ही निवडणूक कुठे हरला आहात! अजिबात हरलेला नाही. ते फक्त बायडेनभाई जिंकले आहेत. तुम्ही तर बायडेन हरल्यावरही हरला नसता. लक्षात नाही आलं? लहानपणी थेथरोलॉजी (thethrology) वाचलं नाही का? तुमच्यासारखा रंगिला राष्ट्रपती आता होणार नाही. मजा यायची ट्रम्पभाई. वाटायचं गावच्या वरातीमध्ये नाच पार्टी आली आहे. तुम्ही दुनियेला दाखवून दिलंत की, राष्ट्रपती झाल्यानंतर सिरिअस होण्याची गरज नाही. हे पद मौज-मस्ती करण्याचं आहे. मोरबिर पाळलेत की नाही? न्यायालयात सांगा की, ‘आमची गाय इथं बांधलेली आहे. तिचा खुंटा आहे इथं. आम्ही जाणार नाही.’ मग काय हिंमत आहे कोर्टाची की, ते तुम्हाला व्हाइट हाइसच्या बाहेर काढेल! माझा प्रस्ताव गंभीरपणे घ्या.

बायडनभाईंना राष्ट्रपती व्हायचं असेल तर ते त्यांचं वेगळं व्हाइट हाउस बनवतील. तुम्ही खुर्ची सोडू नका. सोडलीच तर व्हाइट हाउसमधली खुर्ची सोबत घेऊन या. आम्ही लोक तर इथं तुमचे समर्थक आहोत. घाबरूनच करतो, नाही तर आयटीसेलवाले सत्यानाशाचा होमहवन करायला लागायचे. मंत्राचा नीट उच्चार केला नाही तर होमहवनाचा परिणाम उलटा होतो. मित्राकडून माहिती काढा की, मंत्रजाप करणाऱ्यांना त्यांचं उच्चारण नीट करता येतं होतं की नाही. जय-पराजय होत राहतो. कधी भारतात आलात तर बनारसला जाऊ. गंगामाता बोलावते आहे.

भारतासारखं तुम्हा लोकांना ल्युटन्स झोनमध्ये बंगला मिळत नाही का? त्याच्यामुळेच व्हाइट हाउस सोडायला घाबरत आहात का? खरी गोष्ट आहे. एकदम व्हाइट हाउसमधून निघून कुणी बुराडीमध्ये राहायला सांगत असेल तर प्रतिष्ठेला बाधा येणारच. बायडनला विचारा की, बंगला देणार की नाही?

तुम्ही जे काही खोटं बोललात ते स्वत:च बोललात. ते तुमचं वैशिष्ट्य होतं. तुम्ही तुमच्या खोट्याचा पुनरुच्चारही करायचात. तुमच्या कॅबिनेटमधील लोक तुमच्या खोट्याला रि-ट्विट करायचे नाहीत. तुम्ही खोटं बोलण्यासाठी न्यूज अँकरला हटवलं नाहीत की, वृत्तवाहिन्यांच्या मालकांना घाबरवलं नाही. तुमच्या या लोकशाही भावनेचा मी आदर करतो. तुम्ही व्हाइट हाउसमध्ये पत्रकार परिषदेला यायचात आणि थेट खोटं बोलायचात. खोटं सत्यासारखं सांगणारे तुम्ही एकमेव मोठे नेते आहात. बाकीचे लोक सत्याच्या आडून खोटं बोलतात. तुमचं सर्वांत मोठं अपयश हेच राहिलं की, तुमच्याकडील सर्व वृत्तवाहिन्यांनी तुमचं ऐकलं नाही. फक्त फॉक्स न्यूज तुमच्यासारखं होतं, बाकी कुणी तुमच्यापुढे झुकलं नाही. आम्हाला विचारलं असतं तर आम्ही इथून तुमच्यासाठी आयडिया पाठवल्या असत्या. नाही विचारलंत ना, आता हे पत्र वाचा.

अच्छा ट्रम्पभाई एक सांगा- मलेरियाच्या गोळ्या ठेवल्यात ना, की खाऊन टाकल्यात? उरल्या असतील तर पाठवून द्या. भारतात मलेरियाच्या गोळ्यांची गरज पडते असते सारखी. डास फार चावतात, नाहीतर आम्ही विचार करत होतो की तुम्हाला बोलवावं. औषध मारून मारून संपून जातं, पण डास जात नाहीत सगळे.

तुमच्यावर चुकीचे आरोप लावले गेले की, तुम्ही करोनाचा सामना करण्यासाठी नीट तयारी केली नाही. भारतात पुरेसे दवाखाने नाहीत आणि त्यामध्ये डॉक्टरही नाहीत, तरीही करोनाशी लढण्याच्या तयारीचं कौतुक केलं जातंय. बातम्यांमध्ये ऐकलीच असेल की भारताची तारीफ. कौतुक कोण करतंय हे सांगितलं जात नाही. तुम्ही कौतुक करत आहात?

गेल्या चार दिवसांपासून झोप घेताय की नाही नीट? झोप घ्या महाराज. तुम्ही ट्रम्प आहात. वीर आहात. ‘वीर भोग्या वसुंधरा’. तुम्ही विजेता घोषित केला आहे तर कमीत कमी व्हाउट हाउसमध्ये तरी झोपा. आम्ही मिस करणार. तिकिटे मिळाली नाहीत तर टॅक्सासच्या रॅलीत सामील होणार होतो. कुणी नाही. अहमदाबादला गडबडीत येऊन गेलात. आम्हाला वाटलं होतं की, तुम्ही दोन रॅलीनंतर दोन तृतीयांशाच्या पुढे गेला आहात. पैसे देऊन तर इथं लोकांची गर्दी जमवली नव्हती ना, माहिती घ्या जरा. टैक्सासमध्ये तर तुम्हाला जिंकून दिलं की नाही!

तुमचं हॉटेल पाहिलंय. व्हाइट हाउस फार लांब तर नाही. शेवटच्या माळ्यावरून व्हाइट हाउस दिसत असणारच. नाही तर छतावर खुर्ची टाकून पहा. तुम्हाला तर कुठे दुसऱ्या शहरात जायचंय. कोसी पट्ट्यात खूप समस्या आहेत. का सांगावं. थांबतो. आशा आहे पत्र तुमच्यापर्यंत पोहचेल. आम्हीच लिहिलंय.

तुमचं व्यक्तिमत्त्व असं आहे की, आम्ही ठरवलं की, अमेरिकन व्हावं. खूप आल्हाददायक वाटतं तिथं. तुम्ही न्यू यॉर्कमध्ये शेकोटीचा इंतजाम केला नव्हता. आमच्यासाठी तर सरकार हिवाळ्यात शेकोटी पेटवते. यंदा तर बर्फ साचला होता भाईजी. असं वाटलं की, आम्हाला उचलून फ्रीजमध्ये टाकलंय. थरथराहट सुटली होती. आता परत जाणार नाही.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/

..................................................................................................................................................................

आदल्या दिवशी रात्री रवीशकुमार यांनी आपला ‘प्राइम टाइम विथ रवीशकुमार’ या शोमध्ये ट्रम्प यांच्या फेक न्यूजचा समाचार घेतला होता.

निकालाला सुरुवात झाल्यानंतर ट्रम्प यांनी व्हाईट हाइसमध्ये पत्रकार परिषद घेऊन भाषण द्यायला सुरुवात केली. ते अमेरिकन वृत्तवाहिन्या लाइव्ह स्वरूपात दाखवत होत्या. पण ट्रम्प यांनी नेहमीप्रमाणे रेटून खोटं बोलायला सुरुवात केली, तेव्हा अमेरिकेतील एबीसी, एनबीएस आणि सीबीएस या तीन वाहिन्यांनी त्यांच्या भाषणाचं लाइव्ह कव्हरेज थांबवलं आणि आपल्या प्रेक्षकांना सांगितलं की, राष्ट्राध्यक्ष असत्य दावे करत आहेत. त्याची तपासणी करण्याची गरज आहे.

इतकंच नाही तर १३१६ दिवसांमध्ये ट्रम्प यांनी २२,२४७ वेळा खोटं बोललं असल्याचं अमेरिकन प्रसारमाध्यमांनी दाखवून दिलं आहे. १८ जुलै २०१८ रोजी ‘अक्षरनामा’वर ‘डोनाल्ड ट्रम्प हे जवळपास सव्वा वर्षांत ३,००० वेळा खोटं बोलले आहेत!’ हा लेख प्रकाशित झाला आहे. त्यात ट्रम्प यांच्या खोटं बोलण्याची आकडेवारी दिलेली आहे. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या प्रतिष्ठित वर्तमानपत्राने तर निवडणुकीच्या काळातच ‘DOLNAD TRUMP AND HIS ASSAULT ON TRUTH : The President’s Falsehoods, Misleadinng Claims and Flat-Out Lies’ हे पुस्तकच प्रकाशित केलं आहे.

आपल्या चार वर्षांच्या कारकिर्दीत ट्रम्प यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या अमेरिकन प्रसारमाध्यमांना सातत्याने लक्ष केलं होतं. पण तेथील प्रसारमाध्यमांनी त्यांना फारशी धूप घातली नाही. ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळात प्रसारमाध्यमांच्या विरोधात जवळपास २८८ ट्विट केली. ‘फेक न्यूज’ हा शब्दप्रयोग त्यांनी जवळपास प्रत्येक ट्विटमध्ये वापरला आहे. आपल्या धोरणाला विरोध म्हणजे देशाला आणि देशातील जनतेलाच विरोध असा समज करून घेत ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांना जनतेचे शत्रू ठरवून टाकलं. त्याची स्वाभाविक प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांत उमटली. त्यांनी राष्ट्राध्यक्षांचा खरपूस समाचार घ्यायला सुरुवात केली. प्रसारमाध्यमं अमेरिकन जनतेची शत्रू नाहीत, हे लोकांना पटवून सांगण्याची मोहीमच प्रसारमाध्यमांनी उघडली. एवढंच नव्हे तर ‘द बोस्टन ग्लोब’ या दैनिकानं देशातील सर्व प्रसारमाध्यमांना एकाच दिवशी सर्वांनी ट्रम्प यांच्या भूमिकेचा समाचार घेणारा अग्रलेख प्रसिद्ध करावा असं आवाहन केलं. त्यानुसार १६ ऑगस्ट २०१८ रोजी  अमेरिकेतील छोट्या-मोठ्या ३५० वृत्तपत्रांनी एकाच वेळी ट्रम्प यांच्या वक्तव्याचा समाचार घेणारे अग्रलेख लिहिले.

थोडक्यात अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यापुढे झुकायला नकार दिला. उलट त्यांचं प्रत्येक असत्यकथन उघडं पाडण्याचा प्रयत्न केला. अमेरिकन जनतेनं ट्रम्प यांना आसमान दाखवण्यामागे प्रसारमाध्यमांची ही निर्भीड आणि कणखर भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली.

२.

अलीकडच्या काळातले म्हणजे गेल्या ४०-५० वर्षांतले डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे एकमेव राष्ट्राध्यक्ष आहेत, ज्यांना अमेरिकन जनतेनं दुसऱ्यांदा निवडून दिलं नाही. ट्रम्प यांची चिथावणीखोर वृत्ती, मनमानी स्वभाव, बेभरवशाचे निर्णय, वंशवाद, परकीय विरुद्ध स्थानिक, धार्मिक उन्माद, बंदुका आणि दंगली, आणि करोनाकाळातली बेपर्वाई या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत ठरल्या.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

२०१६मध्ये ट्रम्प यांची अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाली, तेव्हाच त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतले गेले होते. खुद्द त्यांच्या रिपब्लिकन पक्षातील अनेकांचा त्यांना विरोध होता. त्याच काळात त्यांनी काही वर्षांपूर्वी महिलांविषयी काढलेल्या गलिच्छ उदगारांची ध्वनिफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ती अडचणीची ठरण्याची शक्यता आहे, हे लक्षात येताच ट्रम्प त्याबद्दल माफी मागून मोकळे झाले!

बेताल आणि बेलगाम वाचाळतेबद्दल ट्रम्प आधीपासूनच प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांनी अनेकांची नाराजीही ओढवून घेतली होती, कित्येकांना दुखावलं होतं. त्यांच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत तर प्रचाराची पातळी त्यांच्या जीभेपेक्षाही जास्त प्रमाणात घसरली होती. प्रचारकाळात ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांना गोळ्या घालून ठार केलं पाहिजे, असं चिथावणीखोर भाषणंही केलं होतं.

ट्रम्प यांच्या बेमूर्वतपणामुळे आणि बेलगामवृत्तीमुळे त्यांचा रिपब्लिकन पक्षही अडचणीत आला होता. त्यांच्या पक्षातल्या अनेकांना त्यांच्या उमेदवारीला विरोध होता आणि त्यांची वक्तव्यं तर अजिबात पसंत नव्हती. पण त्याविरोधात कुणी फारसं तोंड उघडलं नाही. त्यामुळे ट्रम्प यांची सरशी होत राहिली. मतदानपूर्व चाचण्यांमध्ये हिलरी क्लिंटन निवडून येणार असा अंदाज बहुतेक अमेरिकी प्रसारमाध्यमांनी वर्तवला होता. झालंही तसंच. ही निवडणूक क्लिंटन अगदी थोड्या फरकाने हरल्या. फ्लोरिडा, नॉर्थ कॅरेलिना आणि पेनसिल्व्हेनिया या तीन राज्यांमध्ये केवळ एक-दोन टक्क्यांनी त्यांच्यावर ट्रम्प यांनी आघाडी घेतली होती.

राजकारणाचा फारसा अनुभव नसलेला आणि मुळात राजकारणी नसलेला ट्रम्प नावाचा उद्योजक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर होतो काय नि नंतर निवडून जिंकतो काय, सगळंच अनपेक्षित होतं. त्यातही अमेरिकेसारख्या पॉवरफुल देशाचा, जागतिक महासत्तेचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासारखा बेजबाबदार माणूस होतो, हेच मुळी विलक्षण चमत्कारिक होतं.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : ‘ट्रम्प ही सबंध जगावरच आलेली आपत्ती आहे’ : सुनील देशमुख

..................................................................................................................................................................

ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर तर बहारच उडवून दिली. शिवराळपणा, आक्रस्ताळेपणा, रेटून खोटं बोलणं आणि प्रचंड धरसोडवृत्ती यांचं दर्शन त्यांनी रोजच्या रोज अमेरिकेला आणि जगाला घडवलं. कुठलंही तारतम्य नसलेली, अत्यंत गर्विष्ठ व्यक्ती सर्वोच्च पदावर पोहचवल्यावर जे काही घडू शकतं, त्याचं मूर्तीमंत दर्शन ट्रम्प यांनी गेल्या चार वर्षांत अमेरिकेला आणि जगाला दाखवलं.

३.

पण हळूहळू एकेक बातम्या बाहेर यायला सुरुवात झाली. रशियाने अमेरिकेच्या निवडणुकीत बराच हस्तक्षेप केल्याचं उघड झालं. डेमॉक्रेटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्याविरोधात समाजमाध्यमांवर खूप विखारी पद्धतीनं प्रचार केला गेला. त्याचे धागेदोरे मिळवून ‘चॅनेल4’ आणि ‘गार्डियन’ या ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी २०१८मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजय आणि ब्रिटनला युरोपियन संघातून बाहेर पडायला लावणारा ब्रेक्झिटचा निर्णय, यांत ‘केंब्रिज अ‍ॅनलिटिका’ या ब्रिटिश संस्थेची भूमिका आणि प्रचारतंत्र कारणीभूत असल्याचं उघड केलं. ही कंपनी जगभरातल्या राजकीय पक्षांना निवडणूक प्रचारात साह्य करत होती. विविध देशांत वेगवेगळ्या नावानं त्यांनी उपकंपन्या स्थापन केल्या होत्या. फेसबुक डेटाच्या अनधिकृत वापराबरोबर खोटी स्टिंग ऑपरेशन्स करणं, फेक न्यूज पसरवणं या सारख्या गोष्टींची बढाई या कंपनीचे अधिकारी मारताना ‘चॅनल ४’च्या गुप्त कॅमेरात कैद झाले. या कंपनीच्या मागे रॉबर्ट मर्सर हा अमेरिकी अब्जाधीश आणि अमेरिकी रिपब्लिकन पक्षाचा समर्थक असल्याचं उघड झालं. त्यानंतर युरोप-अमेरिकेसह जगभर गदारोळ माजला. सोशल मीडिया, बिग डेटा आणि प्रायव्हसी याविषयी चर्चा सुरू झाली. अखेर प्रचंड टीकेच्या भडिमारामुळे अखेर ही कंपनी बंद करावी लागली.

पण या प्रकरणाआधीच रशियानं अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचं उघड होऊन त्याचा तपास सुरू झाला होता. निवडणूक प्रचारादरम्यान डेमॉक्रेटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचे ई-मेल्स हॅक करून प्रकाशित करण्यात आले होते. त्यात रशियन हॅकर्सचा हात असल्याचं उघड झालं. ट्रम्प यांचे वरिष्ठ सहाय्यक मायकल फ्लिन निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर अमेरिकेतील रशियन राजदूत किझल्यॅक यांच्या संपर्कात होते ही गोष्ट बाहेर आली. याबद्दल त्यांच्याशी चौकशी करण्यात आल्यावर त्यांनी प्रथम याला नकार दिला, परंतु एफबीआयकडे त्याचे पुरावे असल्याचे कळताच त्यांनी सारवासारव करायला सुरुवात केली. ट्रम्प यांनी त्यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नेमलं होतं. पण प्रकरण उघड झाल्यानंतर त्यांना प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं. परिणामी फ्लिन यांना राजीनामा द्यावा लागला. पण तरीही ट्रम्प त्यांचं समर्थन करत राहिले.

ट्रम्प यांचे जावई आणि वरिष्ठ सल्लागार जॅरेड कुश्नर यांनी सत्तांतराच्या काळात रशियन राजदुतांशी भेट घेऊन ट्रम्प यांचं आगामी प्रशासन आणि रशियन सरकार यांच्यात चर्चेसाठी रशियन राजनैतिक वास्तूचा वापर करून एक गुप्त माध्यम स्थापित करण्याविषयी चर्चा केली, ही माहितीसुद्धा उघड झाली. केवळ एक सामान्य नागरिक असताना आणि प्रशासनातील कुठल्याही अधिकृत पदावर नसताना अमेरिकी गुप्तहेर यंत्रणेला अंधारात ठेवून रशियन सरकारशी अशा गुप्तपणे बैठका घेण्याची बुद्धी कुश्नर यांना कशी झाली? तेही नंतर एफबीआयच्या चौकशीच्या भोवऱ्यात अडकले.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : एक पाऊल पुढे, दोन पावलं मागे

..................................................................................................................................................................

अमेरिकेच्या सिनेट व काँग्रेसने काही चौकश्या समित्या नेमून या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यानुसार ऑक्टोबर २०१७मध्ये गुगल, फेसबुक आणि ट्विटर या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी चौकशीसाठी बोलावले होते. त्यातून हे समोर आलं की, रशियाच्या मदतीने ८०,००० फेसबुक पोस्ट तब्बल १२६ दशलक्ष अमेरिकन मतदारांपर्यंत म्हणजे जवळपास निम्म्या अमेरिकन जनतेपर्यंत पोहचवण्यात आल्या होत्या. शिवाय एका रशियन कंपनीच्या या निवडणुकीशी संबंधित ३००० जाहिराती १० दशलक्ष मतदारांपर्यंत पोहचवल्या गेल्या.

‘केंब्रिज अ‍ॅनलिटिका’ प्रकरण उघड झाल्यानंतर फेसबुकचा संस्थापक मार्क झकेरबर्गनं आपल्या फेसबुक वापरकर्त्यांची माफी मागितली होती. एवढंच नव्हे तर युरोप-अमेरिकेतील मोठ्या वर्तमानपत्रांमध्ये त्या माफीच्या पानभर जाहिराती प्रकाशित केल्या. झकेरबर्गनं मान्य केलं की, २०१६च्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी म्हणजे जानेवारी २०१५ पासून ते ऑगस्ट २०१६पर्यंत १४ कोटी साठ लाख अमेरिकन लोकांनी रशियानं पेरलेली चुकीची माहिती वाचली होती. एवढंच नाही तर गुगलच्या यूट्युबनं मान्य केलं की, याच काळात रशियाशी संबंधित ११०८ व्हिडिओ अपलोड झाले आणि ट्विटरनं मान्य केलं की, या काळात रशियाशी संबंधित ३६७४६ खाती उघडली गेली.

थोडक्यात फेसबुक, ट्युटब, ट्विटर यांसारख्या माध्यमांना हाताशी धरून २०१६च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बरीच बाजी मारली होती.

४.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार बराच आधीपासून सुरू होतो. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक न्यूज पसरवण्याचे कामही बरेच आधीपासून होते. त्यानुसार यावेळीही ट्रम्प प्रशासनाने फेक न्यूज पसवायला सुरुवात केली होती.

२०१६ साली सोशल मीडियाच्या माध्यमातून देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ढवळाढवळ होऊ शकते आणि लोकांना संभ्रमित वा आपल्याला हवं तसं मॅनेज करता येऊ शकतं, याचा अंदाज अमेरिकेतल्या प्रसारमाध्यमांना आला नाही आणि निवडणूक तज्ज्ञांनाही. पण जेव्हा तो हस्तक्षेप उघड झाला, तेव्हा अमेरिकेतील प्रसारमाध्यमं अधिक सतर्क झाली. तेथील संस्था-संघटनांनी त्याविरोधात संघटितपणे लढा दिला. फेसबुक, ट्विटर, युट्युब यांच्यावर कडक करवाई करण्याचे संकेत दिले.

त्यामुळेच या वेळच्या म्हणजे २०२०च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत २०१६सारखा प्रकार होऊ नये, यासाठी अमेरिकेत आधीपासूनच सतर्कता बाळगण्यात आली. ट्विटर, फेसबुक, यु-ट्युब, गुगल, यांना त्याबाबतीत खबरदारी घ्यायला सांगितली गेली. इतकंच नाही तर त्यांच्यावर लक्ष ठेवलं गेलं. निवडणुकीच्या काळात तीन प्रमुख सोशल मीडिया नेटवर्कनी पुढीलप्रमाणे आपली धोरणं जाहीर केली -

ट्विटर - label or remove misleading information intended to undermine public confidence in an election… eg claiming victory before election results have been certified".

फेसबुक - it will reject ads from US political campaigns prematurely claiming victory before results have been declared - and remove disinformation about the vote.

गुगल - block election ads after election day as a response to this same concern.

ट्विटरने तर स्वत:चा टास्कफोर्स स्थापन करून निवडणूक प्रचाराच्या काळात खोट्या माहितीला आळा घालण्याचे काम केलं. ट्रम्प आणि इतरांच्या चुकीच्या, खोट्या, दिशाभूल करणाऱ्या ट्विटखाली निळ्या अक्षरात ही माहिती पारखून घ्यावी, योग्य माहिती इथं मिळू शकेल म्हणून वर्तमानपत्रांचे हवाले दिले.

निवडणूक प्रचारादरम्यान ज्यो बायडेन यांनी ट्रम्प यांच्याबरोबर झालेल्या चर्चेच्या कार्यक्रमात ‘कोणीही असो जर अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केला तर मोठी किंमत चुकवावी लागेल,’ असा स्पष्ट इशारा दिला होता. त्याचबरोबर त्यांनी अमेरिकेच्या निवडणुकीत रशिया आणि इराण मतदानावर प्रभाव पाडत असल्याचा आरोपही केला होता.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

मे महिन्यात ट्विटरने ट्रम्प यांच्या दोन ट्विटखाली ‘मेल इन बॅलट्सची सत्यता तपासा’ अशी लिंक देऊन त्यांनी केलेल्या विधानांची पडताळून पाहायला सांगितली होती. त्या लिंकवर क्लिक करून ट्रम्प यांच्या दाव्याची सत्यता पडताळता येत होती. त्यावर ट्रम्प भडकले होते. त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.

ऑगस्ट २०२०मध्ये फेसबुकने ट्रम्प यांची एक जाहिरात हटवली होती, तर सप्टेंबर महिन्यात त्यांचे सहकारी रॉजर स्टोन यांच्यासह चार जणांचे फेसबुक अकाउंट बंद करण्यात आले. कारण ही अकाउंट परदेशातून वापरली जात होती. त्यांवरून खोटी माहिती पसरवली जात होती, असा खुलासा फेसबुकने केला होता.

त्याशिवाय ऑक्टोबर महिन्यात ट्रम्प यांनी करोना हा फ्लूसारखाच आजार असल्याचे ट्विट केले होते. त्यावर ट्विटरने नोटीस लावली होती.

फेसबुकनेही आपल्या परीनं सावधनता बाळगली, पण ती पुरेशा जोरकस आणि जबाबदारपणे राबवली नाही. त्यामुळे ट्विटरच्या तुलनेत फेसबुकचा हलगर्जीपणा उघड झाला. यू-ट्युबची कामगिरी अजून खराब राहिली. यावेळीही सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटी, दिशाभूल माहिती पसरवण्याचे उद्योग केले गेलेच. पण त्यातले बहुतेक हल्ले परतावून लावण्यात यश आलं. अमेरिकेच्या निवडणुकीत सोशल मीडियाची भूमिका कशी राहिली, याविषयी https://www.marketwatch.com या पोर्टलवर ७ नोव्हेंबर २०२० रोजी ‘Social media’s U.S. election performance : The good, bad and (sometimes) ugly’ हा लेख प्रकाशित झाला आहे. तो आवर्जून पाहण्यासारखा आहे.

५.

अमेरिकेतल्या ‘द इकॉनॉमिस्ट’ या प्रतिष्ठित साप्ताहिकाने ‘Forecasting the US election’ या नावाने जाहिर केलेल्या निवडणूकपूर्व मतदान चाचणीत ज्यो बायडेन यांचं पारडं जड असल्याचं सांगितलं होतं. त्यात त्यांनी ‘Right now, our model thinks Joe Diden is very likely to Beat Donald Trump in the electoral College’ असा अंदाजही व्यक्त केला होता. तो अखेर बरोबर ठरला असंच म्हणावं लागेल. तरीही ट्रम्प यांना या निवडणुकीत जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास मतं मिळाली. म्हणजे त्यांनी ही निवडणूक चांगलीच अटीतटीने लढवली. अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या समर्थकांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यात ट्रम्प बऱ्यापैकी यशस्वी झाले, हे त्यातून उघड होते. त्यासाठी त्यांनी त्यांना सोशल मीडियाचा काही प्रमाणात वापर करून घेतला. पण २०२० हे काही २०१६ नव्हते. त्यामुळे ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जी फेक न्यूज आणि द्वेषाची तटबंदी उभी करायचा प्रयत्न केला, त्याला यावेळी अनेक भगदाडे पाडली गेली. ती तटबंदी पूर्णपणे नेस्तनाबूत होऊ शकली नाही हे खरं, पण ट्रम्प यांचा पराभव करण्याइतपत ती तटबंदी खिळखिळी नक्की केली गेली.

थोडक्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या यशात २०१६ साली सोशल मीडियाचा मोठा वाटा होता, तो २०२० साली मात्र बऱ्यापैकी उदध्वस्त केला गेला. त्यामुळे ट्रम्प यांची कारकीर्द अवघी चार वर्षांची ठरली.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा