अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक २०२० : गोंधळाचा कौल की कौलात गोंधळ?
पडघम - विदेशनामा
अरुण खोरे
  • जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प
  • Tue , 03 November 2020
  • पडघम विदेशनामा डोनाल्ड ट्रम्प Donald Trump जो बायडेन Joe Biden अमेरिकन निवडणूक २०२० US election 2020 अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक United States Presidential election

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीने प्रचंड उत्सुकता आणि त्याच वेळी एक मोठा तणाव निर्माण केला आहे. या निवडणुकीच्या निकालाला आता अवघे काही तास उरले आहेत. त्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची फेरनिवड अमेरिकन मतदार करणार की, त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले जो बायडेन यांना निवडणार, हा कौल जगासमोर येईल.

अमेरिकेतील आणि पाश्चिमात्य जगातील जाणकार, पत्रकार आणि राजकीय विश्लेषक या सर्वांच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आणि अमेरिकेतील लोकशाहीला कोणते वळण त्यातून मिळेल, याचे सूचन करणारी आहे.

अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी माइक पेन्स हे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उभे आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने बराक ओबामा यांचे सहकारी असलेले माजी उपाध्यक्ष जो बायडेन हे ट्रम्प यांच्याविरुद्ध अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. उपाध्यक्षपदासाठी भारतीय अमेरिकन वंशाच्या कमला हॅरीस उभ्या आहेत. अमेरिकेत अध्यक्षपदासाठी निवडणुकीला उभी असलेली व्यक्ती ३५ वर्षे वयाची पाहिजे आणि अमेरिकेतील तिचे वास्तव्य किमान १४ वर्षांचे असले पाहिजे.

ही सगळीच निवडणूक कदाचित वादाच्या भोवऱ्यात किंवा कोर्टकचेरीच्या चक्रात अडकण्याची शक्यता ‘बीबीसी’ आणि ‘सीएनएन’ या वृत्तवाहिन्यांवरील अनेक विश्लेषक व्यक्त करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या वेळी मतदानासाठी खूप चांगला उत्साह दिसून येत असल्याचे निरीक्षण माध्यमांनी नोंदवले आहे. अमेरिकेतील मतदानास पात्र असलेल्यांची संख्या २३ कोटींपेक्षा जास्त आहे आणि आत्ताच काही वेळापूर्वी माहिती मिळाली त्यानुसार १० कोटींपेक्षा जास्त लोकांनी मतदान केले आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

आज (तीन नोव्हेंबर) मतदानाचा निर्णायक दिवस आहे. त्यानंतर कौल कोणाला मिळतो आहे, त्याची मोजणी सुरू होईल.

विद्यमान अध्यक्ष ट्रम्प यांनी २०१६ची निवडणूक लढवली होती, त्या वेळी त्यांना थेट मतदानातून त्यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा काही लाख कमी मते मिळाली होती. तथापि अमेरिकन घटनेनुसार होणाऱ्या या निवडणुकीत इलेक्टोरल कॉलेजमध्ये ज्यांना जागा जास्त मिळतील तो पक्ष सत्तेवर येतो आणि त्यांचा अध्यक्षीय उमेदवार अमेरिकेच्या सर्वोच्च स्थानी विराजमान होतो. त्यामुळे डेमोक्रटिक पक्षाचे आणि बायडेन यांचे प्रचारातील मार्गदर्शक असलेले बराक ओबामा यांचा प्रयत्न आहे की, इलेक्टोरल कॉलेजमध्ये अधिक जागा मिळाव्यात आणि बहुमताने आपला उमेदवार अध्यक्षपदी विराजमान व्हावा.

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीची मतदान प्रक्रिया ही खूप वेगळी आहे. यात वर उल्लेख केलेल्या इलेक्टोरल कॉलेजमध्ये अमेरिकेतील ५५ राज्यांची मिळून ५३८ मते असतात. त्यातील निम्म्याहून जास्त म्हणजे २७० एवढी मते ज्या पक्षाला मिळतील, त्याला अध्यक्षपद मिळते. ट्रम्प यांना २०१६च्या निवडणुकीत इलेक्टोरल कॉलेजची ३०६ मते मिळाली होती.

१ नोव्हेंबर २०२०च्या रात्रीपर्यंत मी तेथील अध्यक्षीय निवडणुकीचे जे अंदाज पाहत होतो, त्यात बायडेन यांनी आघाडी घेतल्याची टक्केवारी प्रसारित झालेली आहे. त्यांना ५२ टक्के आणि ट्रम्प यांना ४३ टक्के विजयाच्या शक्यता व्यक्त झाल्या आहेत.

विद्यमान अध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेपुढील प्रश्नांची गंभीर दखल न घेता जो कारभार केला, त्याबद्दल गेली चारही वर्षे तेथील जबाबदार प्रसारमाध्यमांनी कठोर टीकाटिप्पणी सुरू ठेवली आहे. गेल्या काही दिवसांत ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’, ‘न्यू यॉर्कर’, ‘सीएनएन’, ‘बीबीसी’ या प्रसारमाध्यमांतून देशातील एकूणच लोकशाही संकटात ढकलण्याचे काम ट्रम्प करत आहेत, असे परखडपणे सुनावले जात आहे. अमेरिकेच्या लोकशाहीवर आणि लोकशाही मूल्यांवरच हे अध्यक्ष आघात करत आहेत, अशी टीकाही सुरू आहे. त्यामुळे या निवडणुकीत पराभवाची चिन्हे दिसू लागली, तर ट्रम्प सैरभैर होतील, त्यांचे अनुयायी न्यायालयात जाऊन निकाल लांबवण्याचा प्रयत्न करून एकूणच निकालाच्या प्रक्रियेत प्रचंड गोंधळ माजवतील अशा शक्यताही व्यक्त होत आहेत. असे जर झाले, तर मात्र जगातील सर्व लोकशाही देशांवर त्याचे फार मोठे सावट पडल्याशिवाय राहणार नाही!

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

या निवडणुकीत ट्रम्प यांच्या विरोधात जाणारे काही ठळक मुद्दे होते आणि त्या बाबतीत अमेरिकेतील मतदारांचा मोठा वर्ग निश्चितपणे त्यांना मतदान करेल असे वाटत नाही. हे मुद्दे फार महत्त्वाचे आहेत आणि अमेरिकनांच्या जीवन-मरणाशी त्यांचा संबंध आहे!

१) यातला पहिला मुद्दा आहे- ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांनी कोविड-१९ या महामारीबाबत अनास्थेची जी भूमिका घेतली तो आहे.

या महामारीत अमेरिकेतील सर्वाधिक म्हणजे जवळपास अडीच लाख लोक मरण पावले आहेत. याखेरीज जवळपास कोटीच्या घरात लोक करोनाबाधित झाले. ट्रम्प यांनी अलीकडेच काही प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘हे तुम्ही सारखे कोविड, कोविड काय लावले आहे?’, असे म्हणून मल्लीनाथी केली होती!

सार्वजनिक जीवनात मास्क आवश्यक असताना त्याकडे एकूणच चेष्टेने बघण्याची भूमिका ट्रम्प यांनी घेतली. अगदी अलीकडच्या काही काळात मास्क घालून ते दिसत होते; पण गेल्या चार-पाच दिवसांतील सभेत किंवा मेळाव्यात त्यांनी मास्क न घालता आपण एक बेजबाबदार नागरिक आहोत, असेच दर्शन ते घडवत होते. तेथील अनेक वैद्यकीय संस्था, डॉ. अँथनी फासी यांच्यासारखे नामवंत केंद्रीय साथरोग आणि संसर्ग रोगविषयक संस्थांचे प्रमुख याबद्दल सतत नापसंती व्यक्त करत होते.

२) या महामारीच्या आरंभीच्या काळात ट्रम्प यांनी चीनला दूषणे दिली. त्यानंतर त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर ठपका ठेवला. आणि सर्वांत कहर म्हणजे या जागतिक संघटनेशी असलेला  संबंध तोडला. जगातील सर्वांत समर्थ लोकशाही देशाच्या प्रमुखाने अशी टोकाची भूमिका घेणे अजिबात प्रशस्त आणि योग्यही नाही अशी टीका अमेरिकेतूनही सुरू झाली. याखेरीज हवामान बदलविषयक पॅरिस करारातून अमेरिका ट्रम्प यांच्या दुराग्रहामुळे बाहेर पडली.

.................................................................................................................................................................

हेही पाहा : एक पाऊल पुढे, दोन पावलं मागे

..................................................................................................................................................................

३) पोलिसी अत्याचारात जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय नागरिकाचा बळी गेला. मे २०२०मध्ये ही घटना घडली. त्यानंतर अमेरिकेतील सुजाण नागरिक आणि कृष्णवर्णीय वर्गातील अनेक संस्था, संघटना यांनी रस्त्यावर येऊन निषेध मोर्चे काढले, आंदोलने केली. या आंदोलकांना आवरण्यासाठी लष्कर रस्त्यावर आणावे लागेल, असे जेव्हा ट्रम्प यांनी जाहीरपणे सांगितले तेव्हा त्यांच्यावर टीकेचा प्रचंड भडीमार सुरू झाला. ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ या आंदोलनाने अमेरिकेतील अनेक शहरांत लोक रस्त्यावर आले. जगातील अनेक देशांमध्ये त्याचे पडसाद उमटले. निवडणुकीत हा आफ्रिकन-अमेरिकन मतदारांचा वर्ग ट्रम्प यांच्या विरोधात जाईल अशी चिन्हे आहेत. याखेरीज महिला मतदारांचा कलही ट्रम्प यांना अनुकूल नाही, असे निष्कर्ष काही प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले आहेत.

४) अमेरिकेतील तरुणांच्या रोजगारावर करोना संकटामुळे फार मोठे आक्रीत कोसळले आहे. त्याचे पडसाद या मतदानात कसे उमटतात याची सर्व जगाला उत्सुकता आहे.

अमेरिकेतील जवळपास ५० लाख भारतीय मतदार या निवडणुकीत मतदान करत आहेत. कमला हॅरीस यांच्या उमेदवारीमुळे यातला मतांचा मोठा टक्का डेमोक्रॅटिक पक्षाकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘अमेरिकेचे सर्वंकष हित प्रथम’ ही ट्रम्प यांची भूमिका जगाला ठाऊक आहे. त्याचबरोबर श्वेतवर्णीय प्रभुत्व याला त्यांच्या धोरणात प्राधान्य आहे, असे जाणकारांना वाटते. या दोन्ही मुद्द्यांचा फायदा त्यांना अध्यक्षपदी पुन्हा निवडून देण्यात होईल, असे विश्लेषण काही तज्ज्ञ मांडत आहेत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

.................................................................................................................................................................. 

या निवडणुकीत पोस्टल मतदानाचा मुद्दा समोर आला आहे आणि तो गंभीर होतो आहे. या वेळी करोना संकटामुळे पोस्टल मतदानाचे प्रमाण वाढलेले असू शकते. अमेरिकन निवडणूक वेळापत्रकानुसार तीन नोव्हेंबरला मतदान पूर्ण होऊन पुढील प्रक्रिया सुरू झाली तरी पूर्ण निकाल किंवा स्पष्ट निकाल हाती यायला कदाचित महिनाभराचा उशीर लागण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील पोस्टल विभागाने ही जबाबदारी मोठी समजून तयारी केली आहे. तरीही मागील काही निवडणुकींत या पोस्टल मतामुळे उशीर झालेला होता. हा उशीर जितका वाढेल त्या प्रमाणात डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे अनुयायी एकूणच निवडणूक निकाल प्रक्रियेत गोंधळ निर्माण करू शकतील, अशीही शक्यता व्यक्त होत आहे. ट्रम्प आणि त्यांच्या अनुयायांनी पोस्टल मतदानावर सतत शंका उपस्थित केल्या आहेत. जॉर्ज फ्लॉईडच्या शोकसभेत बोलताना बराक ओबामा यांनी मतदारांनी पोस्टल मतदान करावे, असे आवाहन केले होते. या वेळी पोस्टल मतदानाचा टक्का वाढला आहे, असे दिसते.

एकूणच आज मतदान संपल्यावर जानेवारी २०२१मध्ये अध्यक्षपदाची सूत्रे ट्रम्प पुन्हा हाती घेणार की, बायडेन यांना तो सन्मान मिळणार, हा स्पष्ट कौल या वेळी उशिरा समजण्याची शक्यता आहे.

आपण भारतीय या निवडणुकीकडे लक्ष ठेवून आहोत. गेल्या वर्षी अमेरिकेच्या भेटीत एका मोठ्या मेळाव्यात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अगली बार ट्रम्प सरकार’ अशी घोषणा करून त्यांचा प्रचार सुरू करून दिला होता. अमेरिकेतील मतदार आणि तेथील भारतीय मतदार या घोषणेला कोणता प्रतिसाद देतील, हे आता लवकरच आपल्या लक्षात येईल.

..................................................................................................................................................................

लेखक अरुण खोरे हे दलित चळवळींचे अभ्यासक, लेखक आणि ‘लोकशाहीसाठी समंजस संवाद’ या मासिकाचे संपादक आहेत.

arunkhore@hotmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा