मराठी वृत्तवाहिन्यांवर शेअरबाजारासंबंधीच्या (बुवाबाजीने भरलेल्या) कार्यक्रमांचा सुळसुळाट चालू आहे...
पडघम - अर्थकारण
पंकज बनकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 22 September 2020
  • पडघम अर्थकारण लॉकडाउन Lockdown करोना Corona शेअर मार्केट Share Market शेअर्स Shares शेअर बाजार Share Bazar पैसा Paisa संपत्ती Wealth

सहा महिन्यांपूर्वी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारतात लॉकडाऊनची घोषणा झाली, तेव्हा शेअर बाजार कमालीचा घसरला. १९२९च्या जागतिक मंदीपेक्षाही करोनामुळे खूप मोठे संकट जगावर ओढवणार असे वाटल्यामुळे धडाधड विविध कंपन्यांचे शेअर विकले गेले. बहुसंख्य कंपन्यांचे शेअर ७० ते ९० टक्क्यांपर्यंत कोसळले. परंतु गेल्या पाच-सहा महिन्यांत शेअर बाजाराने आपला मूड बदलला आणि तो चक्क वाढला. शेअर बाजाराने उसळी खाल्ली. अनेक शेअर मार्च महिन्यांतील त्यांच्या किमतींपेक्षा १०० ते ३०० टक्क्यांनी वधारले. काही त्याहूनही जास्त.

एरवी बाजाराला सट्टा म्हणणारे किंवा त्याच्याशी काडीमात्र संबंध नसणारे लोक शेअर बाजारात झालेली घसघशीत वाढ आणि त्यातून इतरांनी कमावलेले पैसे पाहून चक्रावले. आपणही जर शेअर बाजारात पैसे गुंतवले असते तर आपल्यालाही बक्कळ नफा मिळाला असता, आपलेही पैसे दुप्पट-तिप्पट झाले असते असे त्यांना वाटू लागले. शेअर बाजार आपल्यालाही चटकन श्रीमंत बनवू शकतो, आपलेही भाग्य उजळवू शकतो, असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांना कधी नव्हती एवढी आस्था शेअर बाजाराबाबत वाटू लागली. 

जेथे जेथे आस्था निर्माण होते, तेथे तेथे तिचा फायदा करून घेणारे बुवा-बाबाही तयार होतात. (कधी कधी बुवा-बाबा आधी तयार होतात आणि ते स्वत:भोवती ‘आस्था’ निर्माण करतात!) ही मंडळी आपल्या भक्तांच्या अज्ञानाचा, भोळेपणाचा आणि अभिलाषेचा फायदा घेऊन, आपला खिसा भरतात. हे सर्व कसे होते याचे दर्शन जर घ्यायचे असेल तर मराठी वृत्तवाहिन्यांपेक्षा दुसरी जागा नाही.

शेअर बाजारविषयक कार्यक्रमांचा सुळसुळाट

सध्या जवळ जवळ प्रत्येक मराठी वृत्तवाहिनीवर शेअर बाजारासंबंधी कार्यक्रमांचा सुळसुळाट चालू आहे. हे कार्यक्रम दिवसातून दोन-तीन वेळा प्रसारित केले जातात. ‘धन की बात’, ‘पासवर्ड श्रीमंतीचा’, ‘पैसा झाला मोठा’ यासारखी आकर्षक (की फसवी?) शीर्षके देऊन तज्ज्ञनामक बुवामंडळी प्रेक्षकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात. या कार्यक्रमांत सूटबूट घालून एक व्यक्ती येते, जी स्वतःला शेअर बाजाराचा तज्ज्ञ म्हणवते. पुढचे अर्धा तास ती आपल्या विक्री कौशल्याचा उत्कृष्ट वापर करून हे कार्यक्रम बघणाऱ्या प्रेक्षकांना ‘शेअर बाजार आपले नशीब कसे बदलू शकते’ याचे मंत्रमुग्ध पद्धतीने निरुपण करते.  

आपल म्हणणे पटून देण्यासाठी या तज्ज्ञ व्यक्ती वेगवेगळ्या गोष्टींची उदाहरणे देतात, रूपककथा सांगतात, दृष्टांत देतात, वैयक्तिक पराक्रमाची गाथा सांगतात, शेअर बाजारामुळे स्वतःला मिळालेल्या श्रीमंतीचे यथेच्छ वर्णन करतात. त्यानंतर या व्यक्ती आपल्या भक्तांच्या झोळीत एका ‘फ्री वेबिनार’चा प्रसाद टाकतात. जो कार्यक्रम संपताक्षणीच युट्यूबवर चालू होणार असतो. भोळेभक्त फुकटात मिळणाऱ्या प्रसादाच्या लालसेने लगोलग युट्यूब चालू करून वेबिनार पाहू लागतात. वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात सांगितलेल्या गोष्टी अधिक तपशिलाने (म्हणजे मीठमसाला लावून) या वेबिनारमध्ये सांगितल्या जातात. शेवटी एक महागडा ट्रेनिंग कोर्स सवलतीच्या दरात देऊ केला जातो. त्यातही जर पुढच्या एका तासात भक्तांनी तो जॉईन केला, तर तो अधिक स्वस्त दरात मिळण्याचे प्रलोभन देण्यात येते. या सर्व मंत्रमुग्ध मांडणीमुळे, झगमगाटापुढे आणि भावनिक संवादफेकीपुढे भरपूर भक्तमंडळी भाळतात आणि आपल्याला आता ‘श्रीमंतीचा पासवर्ड’ सापडला, या अविर्भावात ट्रेनिंग कोर्समध्ये सामील होतात.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

या कार्यक्रमांचे स्वरूप आणि केले जाणारे दावे

एखादा राजकारणी आपल्या निवडणुकीपूर्वीच्या भाषणात जेवढी आश्वासने देतो, दावे करतो, त्यापेक्षाही जास्त दावे अशा कार्यक्रमांत केले जातात.

जी तज्ज्ञनामक व्यक्ती या कार्यक्रमात आलेली असते, ती या क्षेत्रात १०-१५ वर्षांपासून काम करत आहे (मुख्यत्वे नवशिक्यांना ट्रेनिंग देण्याचे) असा दावा करते आणि त्यामुळे ती स्वतःला ‘तज्ज्ञ’ म्हणवते. अशी जर तज्ज्ञाची व्याख्या ठरत असेल तर महाविद्यालयात १५ वर्षांपासून अर्थशास्त्र शिकवणारा प्रत्येक प्राध्यापक स्वतःला अर्थशास्त्राचा तज्ज्ञ म्हणू शकेल किंवा बँकेत १५ वर्षांपासून कॅशिअर असणारा व्यक्ती स्वतःला बँकिंग क्षेत्राचा तज्ज्ञ म्हणू लागेल. एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रात तज्ज्ञ आहे की नाही, हे त्या व्यक्तीचा शैक्षणिक पात्रतेमुळे, केलेल्या विशेष कामामुळे, तिच्या सखोल अभ्यासामुळे, एकंदरच संबंधित अनुभवामुळे आणि त्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध केल्यामुळे ठरत असते. परंतु या सर्व कसोट्यांवर कार्यक्रमात येणाऱ्या व्यक्तीचे मूल्यांकन न करता अगदी सहजपणे त्याच्या तज्ज्ञपणावर शिक्कामोर्तब केले जाते. याबाबत तथाकथित तज्ज्ञांकडून किंवा वृत्तवाहिनीकडून काहीच स्पष्टीकरण दिले जात नाही.

शेअर बाजारातून आपण कशी गडगंज संपत्ती मिळवली, याचे ही तज्ज्ञ व्यक्ती रसभरीत वर्णन करते. अगोदर चाळीत किंवा भाड्याच्या घरात राहणारी व्यक्ती आज कशी स्वतःच्या बंगल्यात किंवा प्रशस्त फ्लॅटमध्ये राहतेय, तर कधी उपनगरात राहणारी, लोकलचे धक्के खाणारी व्यक्ती आज कशी श्रीमंत लोकवस्तीत (मलबार हिल, पवई, दक्षिण मुंबई इ.) राहतेय, याचे चविष्ट वर्णन करण्यात येते. याव्यतिरिक्त या व्यक्तीने घेतलेल्या उंची गाड्या, केलेल्या परदेश वाऱ्या, घेतलेल्या जमिनी इत्यादींचा मसालाही टाकण्यात येतो.

या दाव्यांची सत्यता कोण तपासतो? हे सर्व खरे आहे? यासाठी किती वर्षे लागली? श्रीमंत बनण्यासाठी फक्त शेअर बाजारच कारणीभूत होता की इतरही काही कारणे होती, जसे इतर जोडधंदा, वडिलोपार्जित संपत्ती इत्यादी... या प्रश्नांची उत्तरं कोणी देत नाही आणि कोणी विचारातही नाही.

याचबरोबर अस्मितेचा तडका देण्यासाठी मराठी माणसाची इतर भाषिक मंडळींशी तुलना करण्यात येते. उदाहरणार्थ, चौथी पास असणारा गुजराती माणूस आज शेअर बाजारामुळे कसा बंगल्यात राहत आहे, तर इडली-डोसा विकणाऱ्या तंबीकडे आज कशी पाच कोटींची संपत्ती आहे, असे दाखले दिले जातात. अशा व्यक्तींची नावे मात्र सोयीस्करपणे सांगितली जात नाहीत. त्यांची छायाचित्रं दाखवली जात नाहीत. तसेच अशा व्यक्ती जर खरंच असतीलही तर त्याचं प्रमाण एकूण लोकसंख्येपेक्षा किती आहे, याबद्दलही मौन पाळलं जातं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

इतर लोक पैसे कमावत असताना मराठी माणूस कसा मान खाली घालून कमी पगाराची नोकरी करत आहे, कसा तो लोकलचे धक्के खात आहे, त्याच्या आयुष्यात मनासारखं काहीच कसं होत नाही, तो कर्जाचे हप्ते फेडण्यात कसा गुंतून गेला आहे, मुंबईत राहूनसुद्धा त्याला कसा मान नाही, याचं भयाण वर्णन केलं जातं. या सर्व भावनिक उद्विपनानंतर गलितगात्र झालेल्या मराठी माणसाच्या मनावर शेअर बाजार हा कसा या सर्व परिस्थितीवर तरणोपाय आहे, तो कसा मराठी माणसाला गरिबीच्या दलदलीमधून काढू शकतो, त्याच्या सर्व आकांक्षा पूर्ण करू शकतो, हे ठसवलं जातं.

त्यानंतर काही दाखले देऊन शेअर बाजार कसा आपल्या श्रीमंत करू शकतो, याची उदाहरणं दिली जातात. ही उदाहरणं साधारणतः अशी असतात- “जर तुम्ही २००८ साली अबक बँकेमध्ये एक लाख रुपयांची मुदत ठेवी ठेवली असती तर तिचे मूल्य आजमितीला दोन लाख असते, पण जर त्या बँकेचे शेअर्स घेतले असते तर आज त्यांची किमत पंधरा लाख असती किंवा जर २०१० मध्ये अबक कंपनीची पाच लाखाची गाडी न घेता तेवढे पैसे जर त्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवले असते तर त्याचे मूल्य आजमितीला पंचवीस लाख झाले असते.”

या उदाहरणात गैर असं काहीच नाही. हे बऱ्या प्रमाणात खरंही असते. परंतु अशी मांडणी  करताना ज्या शेअर्सनी गेल्या काही वर्षांत भरपूर परतावा दिला आहे, त्यांचेच दाखले दिले जातात. अशी कामगिरी एकूण कंपन्यांपैकी किती कंपन्या करू शकल्या, याची माहिती मात्र दिली जात नाही. अशा अनेक बँका आहेत किंवा मोटार बनवणाऱ्या कंपन्या आहेत, ज्यामध्ये आपण दहा वर्षांपूर्वी एक लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे मूल्य आज दहा हजार रुपयांपेक्षाही खाली असते, याबद्दल मात्र अळीमिळीगुपचिळीचे धोरण ही तथाकथित तज्ज्ञ मंडळी स्वीकारतात. याला इंग्रजीमध्ये ‘selected focus’ किंवा ‘cherry picking’ असं म्हणतात. म्हणजे जे आपल्यासाठी सोयीस्कर आहे तेवढंच बोलायचं आणि जे अपकारक आहे ते प्रकर्षानं टाळायचं. शेअर बाजारात अनेक लोकांनी पैसा कमावला असला, तरी त्यात कित्येक कंपन्यांची पतझड झाली, कित्येक कंपन्या मोडीत निघाल्या, लोकांना अतोनात नुकसान झाले हेही खरं आहे. परंतु त्याविषयी एक चकार शब्द काढला जात नाही. 

..................................................................................................................................................................

हेही वाचा : ‘नव-उदारमतवादी युगा’चा अंत होऊ घातलाय. आता पुढे काय?

..................................................................................................................................................................

जर शेअर बाजार लोकांना श्रीमंत करणार असेल तर त्याचं स्वागतच आहे आणि आपण त्यात गतीही मिळवली पाहिजे. परंतु त्याआधी शेअर बाजारामुळे किती व्यक्ती श्रीमंत बनल्या आणि किती देशोधडीला लागल्या याचे सांख्यिकीय (statistical) पुरावे जर प्रेक्षकांसमोर मांडले तर ते अधिक समर्थनीय आणि विश्वासार्ह ठरेल. ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ होईल. स्वतःला तज्ज्ञ म्हणणाऱ्या मंडळींकडे अशी माहिती सहज उपलब्ध हवी. परंतु ही आकडेवारी न देता फक्त   शब्दफेक (की धूळफेक?) करण्यात ही बुवामंडळी व्यस्त असतात.

वृत्तवाहिन्यांची नेमकी भूमिका काय?

वृत्तवाहिन्यांवर असे कार्यक्रम करणाऱ्या या तथाकथित तज्ज्ञ लोकांना तसा फारसा दोष दिला जाऊ शकत नाही. कारण ते जे काही करत आहेत, त्याला व्यावहारिक भाषेत ‘धंदा’ असंच म्हणतात. कोणत्याही धंद्यात धंदा करणारी व्यक्ती स्वतःला किती जास्त पैसे मिळू शकतील, याचाच विचार करत असते. आपली जाहिरात करण्यासाठी ते फक्त विविध माध्यमांचा (उदा. मराठी वृत्तवाहिन्या) आधार घेतात. लोकांना मोठमोठी स्वप्नं दाखवून, त्यांचा विश्वास संपादन करून, अर्धसत्याचा प्रचार करून, त्यांची फसवणूक करून, त्यांच्या लालसेचा किंवा भोळेपणाचा फायदा घेऊन ही मंडळी पैसे कमावतात.

परंतु ज्या वृत्तवाहिन्या अशा कार्यक्रमांचे प्रक्षेपण करत आहेत, त्यांची मती मंदावली आहे का? का तेही धंदा करायलाच बसले आहेत? या तथाकथित तज्ज्ञ व्यक्तींकडून जाहिरातीसाठी मिळणाऱ्या पैशासमोर आपल्यामार्फत कशी चुकीच्या पद्धतीने शेअर बाजाराची माहिती लोकांना सांगितली जात आहे, याचे भानही वृत्तवाहिन्यांना नसल्याचे दिसते. 

‘लोकशाहीचा चौथा स्तंभ’ असे स्वतःला म्हणवणाऱ्या वृत्तवाहिन्या, अशा कार्यक्रमांचा आपल्या प्रेक्षकांच्या मनावर आणि आर्थिक जीवनावर काय परिणाम होऊ शकतो, याचा साधा विचार तरी करतात का? अगोदरच आर्थिक साक्षरतेची बोंब असणाऱ्या आपल्या समाजात असे कार्यक्रम दाखवून आपण लोकांची कशी फसवणूक करत आहोत, याची जाणीव वृत्तवाहिन्यांना बाळगायला हवी.

अशा कार्यक्रमांत केलेल्या दाव्यांची सत्यता वृत्तवाहिन्या तपासतात का? त्यांची ते जबाबदारी घेतात का? निदान या कार्यक्रमाच्या सुरुवातीला किंवा शेवटी ‘खबरदारीची सूचना’ (Disclaimer) देण्यात येते का? या प्रश्नांचे उत्तर ‘नाही’ असंच आहे.  

..................................................................................................................................................................

हेही वाचा : जबरदस्तीने तुम्ही ‘आत्मनिर्भर’ बनू शकता, पण ना आर्थिक महासत्ता बनू शकता, ना देशातील गरिबी हटवू शकता.

..................................................................................................................................................................

वृत्तवाहिन्यांचं नियमन करणाऱ्या संस्था (जसे प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया, न्यूज ब्रॉडकास्टिंग असोसिएशन) या सर्वांवर मूग गिळून गप्प आहेत. एवढंच काय पण शेअर बाजाराचं नियमन करणारी सेबी (सेक्युरीटीस अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) ही संस्थाही या सर्व प्रकाराकडे कानाडोळा करत आहे.     

‘रहा एक पाऊल पुढे’ असा उपदेश देणाऱ्या वृत्तवाहिन्या दुर्दैवाने असे कार्यक्रम करून आपल्या प्रेक्षकांची चार-पाच पाऊले मागे खेचण्याचेच काम करत आहेत. जर त्यांना खरंच आपल्या प्रेक्षकांच्या शेअर बाजारविषयक ज्ञानात भर पाडायची असेल तर त्यांना तसे विधायक प्रयत्न विविध पद्धतीने जरूर करता येतील, पण त्यांचा तसा मानस दिसत नाही.

हे सर्व बघून तुकारामबुवांच्या ‘बुडती हे जन न देखवे डोळा’ या ओवींची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

प्रेक्षकांनी काय करायला पाहिजे? 

पहिल्यांदा असे कार्यक्रम पाहू नयेत. ‘There are no free lunches’ असे इंग्रजीमध्ये म्हणतात. म्हणजेच सहजासहजी आयुष्यात काहीच मिळत नसतं. एखादा अर्ध्या तासाचा कार्यक्रम, त्यानंतरचा एक तासाचा वेबिनार आणि बारा-पंधरा तासांचा ऑनलाईन क्लास वगैरे करून कोणीही  झटकन श्रीमंत होत नसतं. तसं होत असतं तर आपण सर्वच जण मलबार हिल किंवा मोठ्या बंगल्यात राहत असतो. असे कार्यक्रम म्हणजे अशा तथकथित तज्ज्ञ मंडळींनी तयार केलेले ट्रेनिंग प्रोग्राम खपवण्यासाठी केली जाणारी जाहिरात होय. जाहिरातींप्रमाणे या कार्यक्रमांतही प्रेक्षकांच्या भावनांशी खेळलं जातं, मोठमोठे दावे केले जातात, त्यांना मोठमोठी स्वप्नं दाखवली जातात. पण प्रत्यक्षात हाती काहीच लागत नाही. अगदी नाममात्र ज्ञान या ट्रेनिंग प्रोग्राममधून देण्यात येतं, जे आजच्या काळात इंटरनेटवर सहज आणि विनामूल्य उपलब्ध असतं.   

शेअर बाजाराबद्दल माहिती मिळवायची असेल तर अनेक गोष्टी सहज उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ पुस्तकं, आर्थिक विषयांवरील नियतकालिकं, आर्थिक बातम्यांना वाहिलेली वर्तमानपत्रं आणि वृत्तवाहिन्या, शेअर बाजाराबद्दल प्रशिक्षण देणाऱ्या संस्था. याव्यतिरिक्त शेअर बाजाराबद्दल अनेक ब्लॉग्ज आणि माहितीपूर्ण व्हिडिओज इंटरनेट आणि युट्यूबवर उपलब्ध आहेत. मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कोर्सेसही विनामूल्य करता येतात. मेडिसिन किंवा इंजीनिअरिंगचं जसे आपण शिक्षण घेतो, त्याप्रमाणे शेअर बाजाराचं शास्त्रोक्त पद्धतीनं शिक्षण घेणं गरजेचं आहे.

असे शिक्षण घेण्यासाठी परिश्रम करावे लागतात, वेळ द्यावा लागतो, खऱ्या तज्ज्ञांकडे जाऊन त्यांच्या हाताखाली काम करावं लागतं, तेव्हा कुठे आपला या क्षेत्रातल्या संधीचा, अपेक्षित परताव्याचा (returns), त्याचप्रमाणे खाचखळग्यांचा, धोक्याचा (risk) अंदाज येऊ लागतो. अशा रीतीनं ज्ञान घेऊन जर शेअर बाजारात पैसे गुंतवले तर त्यातून उत्कर्ष होण्याची शक्यता नक्कीच जास्त असते.

परंतु वृत्तवाहिन्यांवरून दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमुळे शेअर बाजारात चटकन पैसा कमावणं किती सहज आणि सोपं आहे, याचा भ्रम प्रेक्षकांमध्ये निर्माण होतो. शेअर बाजारामुळे आपण रातोरात मालामाल होऊ शकतो, आपले पैसे दुप्पट-तिप्पट होऊ शकतात, आपल्या आयुष्यात भरपूर सुख येऊ शकतं इत्यादी स्वप्नं प्रेक्षक बघायला लागतात. परंतु स्वप्न कितीही मोहक असलं तरीही ते वास्तवाची जागा घेऊ शकत नाही.

जर शेअर बाजारातून एवढ्या सहजपणे पैसा कमावला जाऊ शकतो, तर या तज्ज्ञ मंडळींवर ट्रेनिंग देऊन पैसे कमवायची वेळ का येते, हाही एक प्रश्न असतो. सशक्त प्रचारापुढे अशक्त विचार टिकू शकत नाहीत. स्वप्नात रममाण झालेल्या भक्तांना असे प्रश्न पडत नसतात.

सध्या आपण ‘पोस्ट ट्रुथ’च्या जगात वावरत आहोत. त्यामुळे सत्य ही एक कल्पना बनली आहे. सत्याचा शोध घेण्यापेक्षा त्याचा भास निर्माण करण्यावरच जास्त भर दिला जात आहे. त्यासाठी सतत एककल्ली, अतर्क प्रचार हे दुर्दैवानं काही वृत्तवाहिन्यांचं साधन बनलं आहे. माध्यमांचा सशक्त प्रचार आणि लोकांचा अशक्त विचार यामुळे सर्वांची हानी होत आहे. म्हणून तथाकथित लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या माध्यमांनी समंजसपणा दाखवण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी आपल्यामार्फत दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची गुणवत्ता तपासणं आणि त्यात केल्या जाणाऱ्या दाव्यांची सत्यता पडताळणं जरुरीचं आहे. तसंच प्रेक्षकांनीही थोडा तर्कनिष्ठ विचार करणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण मराठी वृत्तवाहिन्यांवर शेअरबाजाराविषयी चाललेल्या बुवाबाजीपासून स्वतःला वाचवू शकू.

..................................................................................................................................................................

लेखक पंकज बनकर चार्टर्ड अकाउंटंट आहेत.

bankarpankaj100@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Nitin

Wed , 23 September 2020

गंदा है पर धंदा है... लगे रहो।


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख