‘हे राम’ म्हणून गांधीजी फक्त एकटे कोसळले नाहीत. त्यांच्याबरोबर संपूर्ण पृथ्वीचे पृथ्वी म्हणून असणेसुद्धा ‘हे राम’ म्हणून कोसळले आहे
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
श्रीनिवास जोशी
  • रॉय किणीकर आणि त्यांच्या ‘उत्तररात्र’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Mon , 15 April 2024
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो रॉय किणीकर Roy Kinikar उत्तररात्र Uttarratra रुबाया Rubaiya उमर खय्याम Omar Khayyam

१११)

‘जरी देव्हाऱ्यातून उठून गेले देव

मोडला जरी देव्हारा जपुनी ठेव

कापूर जळू दे, जळणे त्याचे काम

कोसळली पृथ्वी म्हणताना ‘हे राम’।।’

महात्मा गांधी ह्यांचा खून हा किणीकरांच्या पिढीवर मोठा आघात होता. पृथ्वी डळमळून गेली आहे, अशी भावना त्या काळी अनेक भारतीयांच्या मनात निर्माण झाली होती. मर्ढेकरांनीसुद्धा गांधींच्या जाण्यावर कविता केली आहे. त्यात ते लिहितात -

‘फुटेल होती वेडी आशा,

आभाळाचा कर्मठ सांधा.

देव्हाऱ्यातून साक्षात देव उठून गेले आहेत ही भावना किणीकरांच्या मनात आली. एवढेच नव्हे तर देव्हाराही मोडून गेला आहे, असे त्यांना वाटू लागले. महात्मा गांधींचा देव्हारा म्हणजे - त्यांचे विचार, त्यांची अहिंसा, त्यांचे तत्त्वज्ञान. अहिंसेच्या देवाचा खून झाला म्हणजे त्याच्या तत्त्वज्ञानाचा देव्हारा मोडण्यासारखेच होते. पण ते तत्त्वज्ञान जपून ठेवण्याची गरज किणीकरांना वाटत राहिली. मोडला तरी तो देव्हारा आहे. नृशंस तत्त्वज्ञानाला अडवण्यासाठी तो जपूनच ठेवला गेला पाहिजे.

महात्मा गांधींच्या मृत्यूचे दुःख करता करता, किणीकर एकदम मानवी आयुष्यातील मृत्यूच्या अपरिहार्यतेला कवेत घेतात-

‘कापूर जळू दे, जळणे त्याचे काम’

शरीर कधीतरी एकदा पडणारच! संपून जाणे हे त्याचे मुख्य लक्षण आहे. जळून जाणे हे कापराचे काम आहे. मागे फक्त सुवास उरतो. मृत्यू पावणे हे माणसाचे मुख्य लक्षण आहे, मागे त्याचे विचार उरतात. गांधींच्या मृत्यूच्या दुःखात असताना किणीकर मानवी जीवनातील मृत्यूची अपरिहार्यता स्वीकारण्याचा प्रयत्न करतात, पण परत एकदा ते दुःखात कोसळतात. त्यांना वाटून जाते - गोळी लागल्यावर, ‘हे राम’ म्हणून गांधीजी फक्त एकटे कोसळले नाहीत. त्यांच्याबरोबर संपूर्ण पृथ्वीचे पृथ्वी म्हणून असणेसुद्धा ‘हे राम’ म्हणून कोसळले आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

११२)

‘घाटावर होती वाळत छाटी भगवी

दोरीवर होती वाळत साडी हिरवी

चिलीम फुंकित म्हणतो बघ संन्यासी

देवाला देईन त्या दोरीवर फाशी।।

एक विक्षिप्त रुबाई. घाटाच्या दगडावर संन्याश्याने त्याची भगवी छाटी वाळत घातली होती. शेजारीच एका स्त्रीने तिची हिरवी साडी व्यवस्थित दोरी वगैरे बांधून वाळत घातली होती. ते बघून संन्याश्याच्या मनात स्त्री विषयीची इच्छा तर उत्पन्न झालीच, पण स्त्रीच्या अंगभूत व्यवस्थितपणामुळे सजणाऱ्या संसाराचीही इच्छा उत्पन्न झाली. देवाने हे स्त्रीच्या आकर्षणाचे आव्हान उभे केले आहे, ह्याचा त्याला राग आला. तो मनात म्हणाला - हे इतके मोठे अजिंक्य आव्हान उभे केल्याबद्दल

‘देवाला देईन त्या दोरीवर फाशी।।’

किंवा मग - देव प्राप्त करायच्या इच्छेला त्या दोरीवर फाशी देऊन त्याने संसार करायच्या इच्छेपुढे मान तुकवली.

११३)

‘मधुचुंबन म्हणजे क्षणभर धुंद विरक्ती

आलिंगन म्हणजे विरहाची आसक्ती

हे जीवन म्हणजे दीर्घ स्वप्न संभोग

हे जीवन म्हणजे मृगतृष्णेची आग।।

मधुचुंबनात माणूस स्वतःला विसरून जातो. त्याला स्वतःचे भान राहत नाही. त्या धुंदीमध्ये त्याला दुसरे काही नको असते. ही एक प्रकारची विरक्तीच! धुंद विरक्ती! अध्यात्मातली विरक्ती सावधपणातून आलेली असते.

आलिंगनातून मीलनाची आसक्ती वाढते, मीलन होते. मीलनातून विरक्ती येते. त्यानंतर स्त्रीला पुरुष नको असतो आणि पुरुषाला स्त्री नको असते. म्हणजे दोघेही विरहाकडे जातात. हे बघता, आलिंगन म्हणजे एका अर्थाने विरहाची आसक्तीच आहे.

धुंदीसुद्धा विरक्ती आणू शकते, आलिंगनसुद्धा विरहाकडे नेते. सारे विश्वच विरोधाभासाने भरलेले आहे.

जीवनातील विरोधी तत्त्वांच्या ह्या विचित्र रचना सांगून झाल्यावर किणीकर अजून दोन विरोधी तत्त्वे आपल्या लक्षात आणून देतात.

‘हे जीवन म्हणजे दीर्घ स्वप्न संभोग’

जीवन आणि स्वप्न या दोन्ही विरोधी गोष्टी मानल्या गेल्या आहेत. जीवन खरे असते, स्वप्न खोटे. पण आपण काय बघतो? आपली स्वप्न खरी करण्याच्या नादात माणूस आपले सगळे जीवन व्यतीत करतो. ह्या अर्थाने जीवन आणि स्वप्न ह्यांचा आयुष्यभर संभोग सुरू असतो. आता जीवनातील अजून एक विरोध -

‘हे जीवन म्हणजे मृगतृष्णेची आग।।’

जीवन म्हणजे पाणी. पाणी म्हणजे तृप्ततेची शांतता, पण खरे काय असते? जीवनात माणूस इच्छांच्या आणि वासनांच्या पूर्तीसाठी सतत तहानलेला असतो. आपल्या इच्छा आणि वासना पूर्ण झाल्या की, आपल्याला शांती मिळेल, असे त्याला वाटत असते. ह्या इच्छा आणि वासनांच्या पाण्यामागे, मृगजळामागे तो सतत भटकत राहतो. जीवनभर ही मृगतृष्णा तृप्त होत नाही.

११४)

‘घुमटावर येऊन स्वप्नपाखरू बसले

पदरात पारवे घुमताना फडफडले

उसवली रात्र गर्भात सांडले स्वप्न

पापण्यात शिरले स्तन भरलेले दोन।।

गर्भवतीच्या टपोऱ्या पोटाच्या घुमटावर मातृत्वाचे स्वप्न पाखरू येऊन बसले. हृदयात मातृप्रेम तयार झाले. स्तनांमध्ये दूध अनावर झाले. आणि एका उसवल्या रात्री गर्भपात झाला.

‘उसवली रात्र गर्भात सांडले स्वप्न’

आणि मग पुढे काय झाले? जी माया स्तनांतून दुधाच्या रूपाने वाहायची, ती डोळ्यातून दुःखाच्या रूपाने वाहू लागली.

‘पापण्यात शिरले स्तन भरलेले दोन।।’

११५)

‘वाजली शिटी अन् हलली दख्खन राणी

वाजली शिटी अन् हलले काजळ पाणी

वाजली कंकणे, पदर जरासा हलला

ओठावर हिरवा तीळ जरा विरघळला।

विरहाच्या वेदनेची रुबाई. शिट्टी देऊन डेक्कन क्वीन निघाली. त्या शिटीमुळे आपल्या प्रियकराला सोडायला आलेल्या प्रेयसीच्या काजळावरून अश्रू खाली आले. किणीकर ह्याला ‘हलले काजळपाणी’ असे म्हणतात. अश्रूंना किणीकर ‘काजळपाणी’ म्हणतात. किती सुंदर कल्पना!

‘वाजली कंकणे, पदर जरासा हलला’

तिने हात हलवून निरोप घेतला. त्या हात हालवण्यामुळे तिची छाती जराशी हलली, आणि त्यामुळे - पदर जरासा हलला. तिला हुंदका आला. तो आवरण्यासाठी तिने ओठ आवळून घेतले. त्यामुळे तिच्या ओठावरचा तीळ थोडासा भिजला. किंवा ओघळून खाली आलेल्या अश्रूंमुळे तिच्या ओठावरचा गोंदवून घेतलेला तीळ जरासा भिजला. एक अप्रतिम शब्दचित्र आणि भावचित्र!

११६)

‘भंगले इथे सिंहासन नर सम्राटांचे

स्तनमंडळ खचले उन्नत शृंगाराचे

या इथेच चढले प्रासादावर मजले

(अन्) उंदीर घुशीचे प्रसुतिमंदिर सजले।’

कालाच्या वेदीवर सगळेच संपून जातात. भव्य आणि दिव्य असे जे काही असेल त्याची जागा क्षुद्र आणि किरटे घेते. कालाच्या ओघात तरूण स्त्रीच्या छातीवरची स्तनमंडले ओघळून जातात. त्याचप्रमाणे, उन्नत श्रृंगारातील उन्माद उतरून जातो. मोठ्या मोठ्या सम्राटांची सिंहासने भंगून जातात. प्रासादांवर धुळीचे मजले चढतात. त्या धुळीच्या ढिगाऱ्यातील बिळांत उंदीर आणि घुशींचा सुळसुळाट होतो.

.................................................................................................................................................................

या लेखमालिकेतले आधीचे लेख

रॉय किणीकर रुबाईची परंपरागत ताकद आणि भारतीय आध्यात्मिक जीवनदृष्टी ह्यांच्या मिलाफातून एक वेगळेच जादूभरले रसायन तयार करतात…

रॉय किणीकर आध्यात्मिक होते की नाही, मानवी बुद्धीच्या पलीकडे ते गेले होते की नाही, हे कळायला मार्ग नाही, पण त्यांना अध्यात्म बुद्धीच्या पातळीवर तरी चांगलेच उमगले होते, ह्यात शंका नाही!

रॉय किणीकर ‘आधुनिक काळा’तील बंडखोर प्रवृत्तीचे कवी होते. म्हणून त्यांनी शारिरिक प्रेमाच्या रुबाया लिहिल्या...

रॉय किणीकर मोठे ठरतात ते त्यांच्या जीवनदृष्टीमुळे. त्यांच्या जाणीवेला एकाच वेळी मानवी जीवनातले आदर्श आणि पाशवीपणासुद्धा दिसतो!

किणीकरांच्या कवितेतील आशयघनता पचवायची असेल, तर खूप विचार करायला लागतो. ह्या अर्थाने ते मर्ढेकरांच्या खूप जवळचे आहेत

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

.................................................................................................................................................................

११७)

‘हे माझे घर, हा उंबरठाही माझा

थकलो नाही, कितीक केल्या ये जा

शेवटची आशा एकच होती त्याची

डोक्याला लागो माती उंबरठ्याची।।

उंबरठा कितीही वेळा दोन्ही दिशांनी ओलांडला तरी कधी कंटाळा येत नाही. ह्याला कारण घराचे आकर्षण. कितीही वेळा बाहेर गेलो, तरी घरी यावे असेच वाटत राहते. उंबरठ्याशी आपले अतूट नाते तयार झालेले असते. कितीतरी वेळा आपल्या पायाची धूळ उंबरठ्याला लागलेली असते.

आपल्या घराचा उंबरठा म्हणजे एक सुखाचे आमंत्रण असते. एक सुरक्षेचे आश्वासन असते. मार्गरेट थॅचर ह्यांनी घराची व्याख्या केलेली आहे. Home is place where you are always welcome. हे असे सुरक्षित घर आणि बाहेरचे बेपर्वा जग ह्यांना विलग करणारी रेखा म्हणजे उंबरठा! अशा ह्या उंबरठ्याला आपल्या पायाची माती लागत राहते. शेवटी हे घर कायमचे सोडताना ह्या उंबरठ्याची माती एकावर डोक्याला लागो, अशी कुणा हळव्या आणि कृतज्ञ व्यक्तीची भावना झाली, तर आश्चर्य वाटायला नको!

.................................................................................................................................................................

या लेखमालिकेतले आधीचे लेख

रॉय किणीकरांना कवी म्हणून जी प्रतिष्ठा मिळायला पाहिजे होती, ती त्यांच्या आयुष्यात आणि नंतरही मिळाली नाही…

या दुनियेत प्रेषित म्हणून आलेले, बुद्ध म्हणून आलेले, अवतार म्हणून आलेले सगळे मृत्यू पावलेले आहेत. प्रेषित असो, बुद्ध असो, अवतार असो, देव असो, कुणालाही मरण चुकत नाही

शब्दांना मानवी मनातील विचार पूर्णत्वाने सापडत नाहीत. मनाच्या पलीकडचे काय सापडावे?

ह्या दुनियेची रीतच उफराटी आहे. खरं तर देव माणसातच लपलेला आहे, असे अध्यात्म ओरडून ओरडून सांगते आहे. तरीही माणूस दगडाच्या मूर्तीत ‘देव’ शोधायला जातो

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

.................................................................................................................................................................

११८)

‘पिंजरा पोपटी लाल शीळही तीच

देऊळ आरती प्रदक्षिणाही त्याच

बाहुली तीच अन तशीच ओली माती

मातीवर जळते त्या मातीची पणती।।

पोपटाच्या शरीराचा पोपटी पिंजरा, प्रत्येक पोपटासाठी तोच असतो. लाल चोचीतून येणारी शीळसुद्धा तीच असते. दोन्हीत काही बदल होत नाही. किल्ली दिल्यासारखे जगणे. ज्या प्रेरणा आपल्यामध्ये निसर्गाने रचल्या आहेत, त्याबरहुकूम जगणे. स्वतःचे असे काही नाही!

कर्मकांडाचेसुद्धा तसेच आहे. देऊळ, आरती, प्रदक्षिणा सगळे सगळीकडे तसेच असते. जसे सांगितले गेले आहे, तसे लोक वागत जातात. त्यात त्यांचे स्वतःचे अध्यात्म असे काही नसते. प्रत्येक जन्माला आलेल्या माणसाचे शरीर तसेच असते. प्रत्येकाचे शरीर एकाच प्रकारची माती घेऊन बनवलेले असते. एकाच प्रकारच्या अणू-रेणूंनी मानवी शरीर बनवले गेलेले असते.

‘बाहुली तीच अन तशीच ओली माती’

पुढे किणीकर लिहितात -

‘मातीवर जळते त्या मातीची पणती।।’

मायेने बनलेल्या शरीरात व्यक्तिमत्त्वसुद्धा मायेने रचलेले असते. धर्मापासून जसे खरे अध्यात्म लपून राहिलेले असते, त्याप्रमाणे मानवापासून खरे चैतन्य आणि ह्या जीवनाचा खरा अर्थ लपून राहिलेला असतो.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

११९)

‘हातात न काही आता उरले कष्ट

पायात गुंतले पाय, अडकली वाट

अडकला श्वास ओठात, तडकली पाठ

अन् प्रेत प्रीतीचे उठून बसले ताठ॥

हातात आता कष्ट करायची ताकद उरलेली नाही. म्हातारपणामुळे पाय वाकडे झाले आहेत. त्यामुळे ते चालताना एकमेकांच्या मध्ये येत आहेत. अशा पद्धतीने अडकलेल्या पायांमुळे वाटसुद्धा एका जागी अडकून पडलेली आहे. कुठला मार्ग आक्रमायची ताकद आता संपली आहे. ओठात श्वास अडकत आहे. नीट श्वाससुद्धा घेता येत नाहिये. त्यामुळे नीट बोलताही येत नाहिये. पाठीची दुर्दशा झाली आहे. सरळ उठताही येत नाहिये आणि बसताही येत नाहिये.

पण मनाचे काय बोलावे! अशा शरीरात राहूनसुद्धा त्याने आपले तारुण्य जपलेले असते. ह्या अवस्थेत त्याला तारुण्यातील बहारदार प्रीती आठवत असते. एवढेच काय ह्या वयातील शरीरात राहूनसुद्धा ते नव्या नव्हाळीच्या तरुणीच्या किंवा तरुणाच्या नव्याने प्रेमात पडत असते. ह्या घटनेला किणीकर प्रीतीचे प्रेत म्हणतात! शरीराची पूर्ण वाट लागलेली आहे, आणि तरीही -

‘अन् प्रेत प्रीतीचे उठून बसले ताठ॥’

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......